टु पेंट ऑर मेक लव्ह
अनेक दिवसांनी चित्रपट ओळख सादर करतो आहे.
जमेल तसे अजून वेगवेगळ्या भाषांमधल्या चित्रपटांच्या ओळखी टाकण्याचा मानस आहे.
-निनाद
टु पेंट ऑर टू मेक लव्ह
मॅडेलीन (सबीन अझेमा) ही एक मध्यमवयीन हौशी चित्रकार आहे. शिवाय ती स्वतःचा व्यवसायही चालवते. तीच नवरा विलियम (डॅनियल अत्वाल) हा हवामान खात्यात नोकरी करतो. पण त्याने आता मुदतपूर्व निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
या दांपत्याला एक मुलगी आहे. ती ला आता शिष्यवृत्ती मिळाल्याने ती इटलीमध्ये रोमला जाते आहे. व्यवसायातल्या ताणातून निवांतपणा मिळवण्यासाठी मॅडेलीन फ्रांसच्या ग्रामीण भागात भटकत असते आणि आवडलेल्या ठिकाणांची चित्रे काढत असते.
अशाच एका भटकंतीमध्ये आल्प्स च्या सुंदर पर्वराजीतल्या एक जुन्या घराचे चित्र काढायला ती जाते. निवांत जागा आणि चांगला व्ह्यु पाहून ती आपले रंग आणि साहित्य काढते. सुरुवात करते तोच ती ला दुरून एक माणूस तिच्याकडे येतांना दिसतो. हा माणूस म्हणजे ऍडम (सर्जी लोपेझ). हा अंध असतो आणि रंगांच्या वासाने मॅडेलीनला शोधतो. चौकशी अंती मॅडेलीनला तो सांगतो की ती ज्या घराचे चित्र काढत आहे ते विकायला आहे. हे सुंदर पर्वतराजीत वसलेले घर मॅडेलीनला आवडते. मॅडेलीन विलियम सोबत ते घर विकत घेण्याचा निर्णय घेते. ऍडम आता त्यांचा शेजारी बनतो. घर घेतल्यावर ऍडम त्याच्या बायको इव्हा (अमीरा कॅसर) सह जेवायला येतो. संगीत गाणी आणि चित्र आणि फ्रेंच वाईन अश्या अनेक आवडी निवडी जुळतात. गप्पा रंगतात. एक प्रकारचा मोकळेपणा मॅडेलीन आणि विलियम अनुभवू लागतात. आणि ऍडम आणि इव्हा पण त्यांना जेवणाचे आमंत्रण देतात. ऍडम आणि इव्हा कडचे जेवणही असेच संगीत गाणी आणि चित्र आणि फ्रेंच वाईन सोबत रंगते. जेवण झाल्यावर मॅडेलीन आणि विलियम घरी येतात. दुरून त्यांना ऍडम आणि इव्हा च्या घराला आग लागल्याचे दिसते. पटकन गाडी काढून ते तेथे पोहोचतात. पण घर भस्मसात झालेले असते. ऍडम आणि इव्हाला ते घरी घेऊन येतात.
आत चौघेजण एकत्रच राहू लागतात. अशाच एका धुंद जेवणानंतर ऍडम मॅडेलीनचा हात धरतो आणि तिला घेऊन वरच्या खोलीत जातो. इव्हा आणि स्तिमित विलियम दोघेच खाली राहतात. विलियम पुढे जाऊ लागताच इव्हा त्याला हात धरून सोफ्यावर ओढते. प्रणयाची एक धुंद रात्र संपून दुसरा दिवस सुरु होतो.
आता अचानकपणे आलेल्या शृंगारातील या नव्या घटनेला कसे सामोरे जावे हे मॅडेलीन आणि विलियम या दोघांनाही कळत नाही. यातून वेगळेच काही आकाराला येऊ लागते. आणि मॅडेलीन आणि विलियम दोघेही ऍडम आणि इव्हाच्या प्रेमात पडले आहेत असे त्यांच्या लक्षात येते. मध्यम वयात बुर्झ्वा आयुष्यात आणि कोणतेही थ्रिल नसलेल्या जीवनात, हे नवीनच शृंगारिक धाडस धरून ठेवण्यासाठी त्यांची नकळतपणे धडपड सुरू होते.
पण ऍडम आणि इव्हा फ्रांस सोडून पॅसिफिक महासागरातील एका बेटावर जाऊन राहण्याचा निर्णय घेतात. मॅडेलीन आणि विलियम ला हा विरह सहन होत नाही. ते ठरवतात की आपणही तेथेच जाऊन राहू. घर विकण्याचा निर्णय होतो.
जाहिरातीमुळे काही लोक घर पाहायला येतात. पण काही जमेल असे दिसत नसते. आता सगळे लोक येऊन गेले असे वाटत असतांनाच अजून एक तरुण जोडपे तेथे उगवते. त्यांना ते घर खूपच आवडते. पण पैसे मात्र तेव्हढे नसतात. विषय थांबतो. सायंकाळचा अंधार दाटून आलेला असतो. मॅडेलीन या नवीन जोडप्याला म्हणते की आता जेऊन जा. फारसे आढेवेढे न घेता तेही तयार होतात. परत एकदा वाईन सोबत गपा ताल धरू लागतात. आवडी निवडी संगीत आणि कला जुळत जाते. नकळतपणे परत 'तेच घडते'.
आता काहीसे सरावलेपण आलेले असल्याने सकाळ चांगली जाते! ते जोडपे निघून गेल्यावर विलियम मॅडेलीन ला विचारतो की, आपल्याला खरोखर बेटावर जायला हवे आहे का?
आता घर विकण्याची आवश्यकता संपलेली असते!
सुंदर चित्रण आणि साधी सोपी शृंगारीक कथा असा हा चित्रपट आहे. काही गोष्टी मात्र खटकल्या - काही खुप ढोबळपणे दिलेले क्ल्युज किंवा अतिसूचक गाण्यांचा वापर मला मठ्ठ वाटला, मजा घालवणारा वाटला. पण चित्रपट बटबटीतही नाही, हे मात्र तेव्हढेच खरे.
साध्या सरळमार्गी आणि निवृत्ती ला आलेल्या लोकांच्या आयुष्यातही सेन्सेशनल गोष्टी घडू शकतात हे दाखवून देणारा चित्रपट.
चित्रपटाचे नाव - Peindre Ou Faire L'amour
भाषा - फ्रेंच
लेखक, दिग्दर्शक - अर्नाद लारौ आणि जीन मारी लारौ
कलाकार
मॅडेलीन - सबीन अझेमा
विलियम - डॅनियल अत्वाल
ऍडम - सर्जी लोपेझ
इव्हा - अमीरा कॅसर
वर्ष - २००५
पुरस्कार - कान्स २००५ मध्ये पाम द् ओर साठी नॉमिनेशन
Comments
नाव
क्षमा करा चित्रपटाचे नाव टु पेंट ऑर मेक लव्ह असे आहे.
-निनाद
मध्यमवयीनांना आवडेल
मध्यमवयीनांना आवडेल असेच कथानक आहे. पिक्चर पाहून फंट्यासी करायला लोक मोकळे. हसू कसे येतेय पहा विलियमला.
ह्या कथेतील पात्रे येणेप्रमाणे-
मॅडेलीन
विलियम
इव्हा
ऍडम
चित्रे
शक्य आहे.
चित्रे दिल्या बद्दल धन्यवाद!
-निनाद
आदम आणि हव्वा!
आदम आणि हव्वा स्वतः नंदनवन सोडून जातात.
ते मॅदलेन आणि विल्यमचे नंदनवन होते ???
चित्रपट सांकेतिक (रूपककथात्मक) असावा असे वाटते.
कदाचित
मलाही असेच वाटले होते.
मुळात ऍडम आणि इव्ह अशी निवडलेली नावे वगैरे पाहून. पुढील घडामोडींमध्ये मात्र तसे दिसत नाही.
दिग्दर्शकाला ते सांकेतिक रूपककथात्मक रितीने देणे जमले नसावे असे म्हणायला जागा आहे.
-निनाद
हा लेखही
इथे आणि तिथे? चालू द्या!
कथानकातून एक चांगला शृंगारिक चित्रपट (हाफ एक्स वगैरे चालेल का?) असावा एवढेच वाटले.
शीर्षकात टू पेंटने सुरूवात होत असली तरी चारांपैकी (का सहांपैकी) केवळ एकच चित्रकार आहे त्यामुळे पेटींगशी चित्रपटाची नेमकी सांगड कशी घातली गेली आहे हे कळत नाही. चित्रकारीचे संदर्भ फिरून फिरून येत राहतात का? चित्रकलेचा, पात्रांचा वगैरे रूपकात्मक वापर केला असल्यास परीक्षणातून तशी कल्पना येत नाही.
आणि तसे काही झाले नसल्यास कथानक खास वाटले नाही.
नाही
नाव तसे असले तरी चित्रकारी पेक्षा सर्वसामान्य आयुष्यातून अचानकपणे आलेल्या स्विंगर्स लाइफस्टाईलच्या चटकीचे वर्णन आहे, असेही म्हणता येईल.
रूपकात्मक वापर केला असे मलाच जाणवले नाही, त्यामुळे ओळखीत आलेच नाही.
चित्रपट ढोबळ आहे हे, हे वर ओळखीत म्हंटलेच आहे...
परिक्षण वगैरे मला जमते की नाही याची कल्पना नाही. मी, मला जसा चित्रपट 'वाटला किंवा समजला' तसे लिहितो.
म्हणूनच मी त्याला ओळख म्हणतो परिक्षण नाही. परिक्षणासाठी अधिक मोठी मजल जायला हवी ती माझी नाही.
चित्रपटात थोडीफार नग्नता सोडल्यास शृंगाराचे चित्रण फारसे नाही.
त्यामुळे हाफ एक्स वगैरे म्हणायचे की नाही याची कल्पना नाही.
-निनाद
:-)
>अचानकपणे आलेल्या स्विं.. ...स्टाईलच्या चटकीचे वर्णन, हाफ् *
उपक्रमावर ऑटोमॅटीक जाहीरतीचे ऍप्लेट नाही याचे हायसे वाटत आहे. :-)
निनाद बरेच दिवसांनी सिनेमा परिक्षण लिहलेत. अजुन् येउ दे.
धन्यवाद
धन्यवाद सहज.
जमेल तसे लिहितो. पाहतो बरेच पण लिहावेसे वाटणारा एखादाच असतो.
तसे चिको नावाच्या जर्मन सिनेमावर लिहायचे मनात होते पण उतरले नाही.
-निनाद
छान
छान परीक्षण. अजून येऊ देत.
हे लोक फ्रेंच आहेत त्यामुळे आयुष्यातील कुठल्याही टप्प्यावर त्यांच्या आयुष्यात सेन्सेशनल गोष्टी घडू शकतात. :)
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
सेन्सेशनला आगापिछा
--हे लोक फ्रेंच आहेत त्यामुळे आयुष्यातील कुठल्याही टप्प्यावर त्यांच्या आयुष्यात सेन्सेशनल गोष्टी घडू शकतात. :)
होय, आणि ह्या सेन्सेशनला आगापिछा काहीही असु शकतो
फ्रेंच शृंगारिकता आणि तात्त्विक बैठक
मी चित्रपट पाहिलेला नाही, पण उपलब्ध वर्णनावरून आणि एकंदर फ्रेंच चित्रपटांविषयीच्या माहितीतून काही अंदाज बांधत आहे.
विवाहबाह्य संबंधांचं चित्रण ही फ्रेंच चित्रपटांत फारच सहजपणे घडणारी गोष्ट आहे. विशेषतः साठच्या दशकातल्या 'न्यू वेव्ह'नंतर आणि १९६८ नंतर विवाहसंस्थेविषयीच्या संकल्पनांत जे बदल झाले त्यानंतर तर त्यातला होता नव्हता तो अनैतिकतेचा सूर फारच क्षीण झाला. त्यामुळे अशा प्रकारच्या कथानकांचे चित्रपट ही फ्रान्समध्ये काही विशेष बाब नाही. शिवाय, साबीन आझमा आणि दानिएल ओतय हे फ्रेंच चित्रपटसृष्टीतले दोन अत्यंत ज्येष्ठ आणि आदरणीय अभिनेते आहेत. त्यामुळे चित्रपट पोर्नोग्राफिक वगैरे असण्याची अजिबात शक्यता नाही. कानमध्ये 'गोल्डन पाम'साठी नामांकन मिळालेलं आहे हे लक्षात घेतलं तर चित्रपटात किमान गांभीर्यानं काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न असावा असा अंदाजही करता येतो.
शीर्षक आणि दिलेली कथा यांचा विचार करता हा चित्रपट एक प्रकारे अपोलोनिअन आणि डायोनिसिअन डायलेक्टिकचं एक मूर्त स्वरूप असावं असं वाटतं. चित्र काढणं (आणि त्यातून आनंद मिळवणं) हे अपोलोनिअन तर अनिर्बंध शारिरीक संबंधांतून आनंद मिळवणं किंवा जीवनाचं तत्त्वज्ञान गवसणं हे डायोनिसिअन असं मानता येईल. आयुष्यातला डायोनिसिअन भाग वगळलेल्या बूर्झ्वा जोडप्याला तो नव्यानं गवसतो तेव्हा त्यांच्या आयुष्यात क्रांती घडते असं काहीसं म्हणायचं असावं असं वाटतं.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
छान
एका जोडप्याने (जोडीने) दुसर्या जोडप्याच्या प्रेमात पडणं ही कंसेप्ट मजेशीर वाटली आणि तितकीशी समजलीही नाही ;)
बाकी चांगली ओळख मात्र मला स्वतःला विषय ठिक ठिक वाटल्याने सहज मिळाला तर चित्रपट नक्की बघेन..
एक विनंती: संपूर्ण कथानक देणार असाल तर आधी तसा श्रेयअव्हेर / सुचना द्यावी
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
नक्की
पुर्ण कथानक द्यावे की न द्यावे हे मलाही समजत नव्हते. पण बहुदा बहुसंख्य सदस्य हा चित्रपट पाहणार नाहीत असे मानून दिले आहे. तसाही चित्रपट सस्पेन्स नसल्याने या कथेत 'मजा जाणे ' होणार नाही अशी आशा आहे. पण पुढे ही सुचना लेखाच्या सुरुवातीला अवश्य देईन.
-निनाद
अजून येऊ द्या
मालक, चित्रपट ओळख आवडली. अजून येऊ द्या. [आपल्या मिपावर]
-दिलीप बिरुटे
का?
का? इथे दिले तर शुचि बाईंना वाचायला मिळत नाही म्हणून का? मास्तरला आवरा...
-डॉन कोर्लिओनी