मातृभाषेतून शिक्षण आणि चीन जपान
यनावालांच्या चर्चेचा दुसरा भाग म्हणून ही चर्चा सुरू करत आहे. मराठी भाषेवर प्रेम दाखवणारे विचारवंत नेहमी चीन आणि जपानचे उदाहरण घेतात परंतु चीन आणि जपानमध्ये नेमक्या किती भाषा आणि कोणकोणत्या भाषा वापरून प्रगती झाली ही माहिती गुलदस्त्यात ठेवतात असा अनुभव आहे. (ही माहिती त्यांना स्वतःलाही असते का हा पुढचा प्रश्न झाला.)
जेव्हा सामाईक भाषेतून शिक्षण द्यावे का आणि त्यासाठी हिंदीची निवड करावी का? असा प्रश्न विचारता बरेच आढेवेढे घेऊन विवेक डोके यांनी "हो" असे उत्तर दिल्याचे आठवते. राईलकर काय म्हणतात ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
तांत्रिक शब्दांना प्रतिशब्द हवेत असे मानणारे - "बसमध्ये चढलो आणि स्टेशनपर्यंतचे तिकिट काढले." हे वाक्य कसे बोलत असावेत असा प्रश्न मनात येतो. असो.
खूप सविस्तर लिहिण्यास वेळ नसल्याने मूळ चर्चेत दिलेला प्रतिसादच येथे चिकटवत आहे. बर्याचजणांनी मूळ चर्चा वाचल्याने त्यांना संदर्भ लागेलच. उद्धृत केलेली वाक्य यनावालांच्या प्रतिसादातील आहेत.
ज्या संज्ञा आपण परकीयांकडून घेतल्या आहेत, त्यांच्याकरता त्यांचे शब्द घेण्यात हरकत नसावी. तरीही शब्द आपल्या भाषेत बनवण्याची आकांक्षा धरण्यात काही चूक नाही.
अजिबात चूक नाही. वरील वाक्याशी अनेकजण सहमत होतीलच. समाज प्रचलित शब्द उचलतो असे मला वाटते.
प्रा.राईलकर हे "मातृभाषेतून शालेय शिक्षण" या मताचे पुरस्कर्ते आहेत.
त्यांनी पुरस्कर्ते असणे ठीक आहे परंतु ते करताना जे जपानचे उदाहरण का देतात हे मला अद्यापही कळलेले नाही. जपानमध्ये शालेय शिक्षण जपानीत होऊन उच्चशिक्षण इंग्रजीत होते का? होत नसावे. इथे लळींगकर म्हणतात की शालेय शिक्षण मराठीतून परंतु उच्चशिक्षणाला इंग्रजीतून पर्याय नाही. म्हणजे जपानचे उदाहरण व्यर्थ आहे.
चीन आणि जपानसारखी आपणही सामाईक भाषा स्वीकारू असे म्हटल्यावर या विचारवंतांचे तोंड बंद होताना दिसते.
त्यांनी विज्ञानातली पाच नोबेल पारितोषिकं मिळवली. १९४९ साली एक.२००८ साली २ आणि चालू वर्षी दोन. आपल्याला एकही मिळवता आलं नाही.
विज्ञानाला वाहिलेल्या संशोधनसंस्थांची संख्या जपानमध्ये ५,३०० आहे. आणि भारतात फक्त १९! म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात पंचवीस हजारपट!
आम्हाला ऑलिम्पिकमध्येही पदके मिळत नाहीत आणि तिथे तर घडाघडा भाषाही बोलावी लागत नाही. :-) यावरून पाणी मातृभाषेशिवाय इतरत्र मुरते आहे हे या विचारवंतांच्या लक्षात येत नाही असे दिसते. घोकंपट्टीवजा शिक्षण, भ्रष्टाचार, लाचलुचपत, संशोधनासाठी प्रोत्साहन, शिक्षणसंस्थांचा दर्जा, समाजाची मानसिकता यांचा आणि मातृभाषेतून शालेय शिक्षणाचा काय संबंध आहे?
शहाणा भारत आणि वेडा जपान या निबंधात राईलकरांनी जे मुद्दे मांडले आहेत त्यावर नीट विचार केला तर ते मुद्दे किती ठिसूळ आहेत त्याची कल्पना यावी.
निबंधातील त्यांचे म्हणणे की पालकांना त्यांच्या मुलांची काळजी देशापेक्षा अधिक आहे यावर त्यांचा आक्षेप का असावा हे कळत नाही. शिक्षणाचे माध्यम प्रादेशिक भाषा असल्यास त्यामुळे विविध विषयांतील तज्ज्ञ आणि जनता यांच्यातील दरी मिटेल हे वाक्य अर्धसत्य आहे कारण बदललेल्या परिस्थितीनुसार स्थलांतर करणारी जनता, कॉस्मोपॉलिटियन समाज, आंतरजातीय-प्रांतीय-धर्मिय विवाहित लोकांचा विचार येथे केलेला दिसत नाही.
बिहारमधील मजुरी करणारे एक कुटुंब, उत्तरप्रदेशातील मजुरी करणारे एक कुटुंब आणि तमिळनाडूतील मजुरी करणारे एक कुटुंब मुंबईत स्थायिक होणार असेल तर त्यांच्या मुलांनी कोणत्या भाषेतून शिक्षण घ्यावे असे राईलकरांना वाटते हे कळत नाही. कारण या मुलांना जसे कदाचित इंग्रजीतून शिक्षण देऊन चालणार नाही तसे मराठीतूनही चालणार नाही. मराठी त्यांची मातृभाषा नाही आणि त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देणे सरकारला परवडणारे नसावे.
फक्त आपला प्रांत आणि आपली मातृभाषा यांचा संकुचित विचार करताना देशाचा विचार कोण करत नाही हे इथे दिसून येईल. :-)
ज्यांची मातृभाषा इंग्रजी आहे त्या इंग्लंड अमेरिकेतल्या मुलांना मातृभाषेतून शिकवलेले गणित कळत नाही हे तर निबंधातले सर्वात मजेशीर वाक्य. इथे इंग्रजी भाषेवर टीका आहे की मातृभाषेत शिकवण्यावर. :-) हे मी उपहासाने म्हटले तरी निबंधात राईलकर यावर जोर देत नाहीत हेही खरे.
१९४५ मध्ये जपानवर दोन अणुबाँब पडले.नंतर प्रगतीला सुरुवात झाली असे मानता येईल.
देव करो आणि आपल्यावर अणुबाँब न पडो. ;-)
राईलकरांचा निबंध येथे वाचा. निबंधातून आक्षेप केवळ इंग्रजीवर आहे की इंग्रजीऐवजी इतर माध्यमांच्या शाळेवर (समजा हिंदी ही सामाईक भाषा असती आणि पालक तेथे वळले असते.) आहे हे देखील कळत नाही.
Comments
थोडी भर
माझे शालेय शिक्षण मराठीतून झाले. माझ्याच वयाच्या माझ्या मामेबहीणीचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. माझ्या वर्गातील अनेकांशी आजही माझे उत्तम संबंध आहेत त्यातून कळते की जवळपास पूर्ण वर्ग उच्चशिक्षित आहे. तिच्याही वर्गातल्या अनेकांशी माझ्या ओळखी आहेत. (एकाच गावातले असल्याने) ते सर्वही उच्चशिक्षित आहेत.
मातृभाषेतून शिक्षण घेतल्या न घेतल्याने या सर्व व्यक्तींमध्ये मला बाहेरून तरी फारसा फरक दिसत नाही कारण उच्चशिक्षण सर्वांनी एकाच माध्यमातून घेतले आहे.
गुर्हाळ
श्रद्धा, बुद्धिप्रामाण्य, इ. विषयांवरील चर्चांमध्ये तेचतेच मुद्दे किमान नवनव्या प्रकारांनी आणि वेगवेगळ्या उदाहरणांनी मांडले जातात. या विषयावरील चर्चांमध्ये तर लोक काहीच नवे मुद्दे न देता भांडताना दिसतात. म्हणून मीही जुनाच मुद्दा दामटतो.
'शब्द हा अर्थपूर्णच असावा' या गृहीतकामुळे संस्कृतोत्भव शब्दांचा पुरस्कार केला जातो परंतु सामान्य व्यवहारांत शब्दांना एक निरर्थक ध्वनि/अक्षरसमूह म्हणूनच वापरले जाते. लाज वाटेल अशा शब्दांसाठीतर मुद्दाम पारिभाषिक शब्द (संस्कृत/ग्रीक-लॅटिन) वापरले जातात. पिवळे वस्त्र हे वर्णन आहे, विशेषण आहे; पीतांबर हे मात्र नाम आहे. विट्रिअस ह्यूमर या शब्दाचा 'अर्थ' 'डोळ्यातील काचेसारखा द्रव' असा आहे हे जाणण्याची सामान्यांना आवश्यकता नसते. त्यांच्या लेखी विट्रिअस ह्यूमर म्हटले काय आणि नेत्रकाचांभ द्रव म्हटले काय, दोन्ही निरर्थकच आहेत. अभ्यासकांना दोन्ही शब्दांतून समानच अर्थबोध होतो त्यामुळे त्यांच्या लेखीही दोन्ही शब्द समानच ठरावे. पण भाषेलाच प्रगल्भ बनवावयाचे असेल, ज्ञानव्यवहार एका भाषेत करावयाचे असतील, तर मात्र त्या भाषेतच प्रत्येक पदार्थाला प्रतिशब्द शोधणे किंवा बनविणे आवश्यक ठरेल.
सगळा घोळ
सगळा घोळ त्या एका भाषेचाच आहे नं! :-)
खुलासा
भारतासारख्या विविधता असलेल्या देशात इंग्रजीशिवाय ज्ञानव्यवहार शक्य नाहीत हे मला मान्यच आहे. परंतु, शालेय शिक्षणात ज्या पातळीचे ज्ञान दिले जाते त्या पातळीचे शब्द मराठीत आता अस्तित्वात आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रात वास्तव्य करणार्या मराठी मुलांना मराठीतून शालेय शिक्षण सर्वात सोपे जाईल असे मला वाटते. शालेय ज्ञान मिळाल्यानंतर ज्ञानभाषा बदलण्यात मला काहीही कष्ट पडले नाहीत.
आता कुठे?
तुम्ही काय म्हणता हे लक्षात आले होते.
.
ते शब्द माझ्या लहानपणापासूनच अस्तित्वात आहेत. समलंबही होता आणि समांतरभुजही होता. :-)
नव्हे. जेथे मराठी ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते तेथे मराठी भाषेतून शिक्षण सोपे जाईल. मुंबईतील काही भागात मराठी अभावाने बोलली जाते असे वाटते. तेथील पालकांनी आपल्या मुलांना त्या माध्यमाच्या शाळेत घातले तर कुठे बिघडले? महाराष्ट्रात वास्तव्य करून मराठी वातावरणात वाढल्याने मराठीतून शालेय शिक्षण घेणार्या अनेक गुजराथी मुलांना मी ओळखते.
परंतु, हीच परिस्थिती महाराष्ट्रात राहणार्या इतर अमराठी भाषकांची असेलच असे नाही आणि जर का ते आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात टाकत असतील तर त्या भागात राहणारे मराठी भाषकही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात टाकण्यास प्रवृत्त होतील. (यात चूक/बरोबर असा मुद्दा नसून वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न आहे. मुंबईतील अनेक मराठी/गुजराथी शाळा यामुळे खालावल्या असाव्यात असे जाणवते.)
सहमत
'आता' म्हणजे 'कित्येक दशके' असे म्हणावयाचे होते.
'महाराष्ट्र' या शब्दाऐवजी 'जेथे मराठी ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते तेथे' हा शब्दप्रयोग अधिक योग्य आहे.
मान्य.
मान्य.
प्रतिशब्द
माझे शिक्षण मराठीतून झले. त्यावेळी भौतिकशास्त्रादि पुस्तकांत बरेच पारिभाषिक शब्द "बनवलेले" होते. म्हणजे वेलॉसिटी साठी वेग हा प्रचलित मराठी शब्द असला तरी ऍक्सिलरेशन साठी त्वरण, मोमेंटम साठी संवेग इत्यादि मुद्दाम बनवलेले (म्हणजे मराठी /संस्कृतमध्ये अस्तित्वात नसलेले) होते. ते शिकावे लागले. ते रुळल्यानंतर पुढे अकरावीत त्यांचे इंग्रजी प्रतिशब्द (मूळ शब्द) शिकावे लागले. (सुदैवाने जीवशास्त्र सोडता आले त्यामुळे बराच त्रास वाचला :-) )
त्या ऐवजी व्हेलॉसिटी ऐवजी वेग आणि ऍक्सिलरेशनसाठी ऍक्सिलरेशन हाच शब्द असता तर शाळेत काही फरक पडला नसता आणि अकरावीतला त्रास कमी झाला असता. (बाकी "कर्बद्विप्राणील" वायू बद्दल न बोललेलेच बरे. यातला कर्ब मुळात कोणत्या भाषेतला आहे ते माहिती नाही).
नितिन थत्ते
हेच
हेच. जीवशास्त्र सोडल्याचा आणखी एक फायदा. ;-)
सहमत आहे. त्या त्रासाने खूप नुकसान झाले असे वाटत नाही परंतु वैताग यायचा कधीतरी आणि आमचं नुकसान झालं असे म्हणणारेही मी पाहिले आहेत. त्यांचे सर्वस्वी चुकते असे मला वाटत नाही.
इथेच गोची आहे.
महाराष्ट्रात वास्तव्य करणार्या इतर मुलांचे काय? त्या सर्वांवर मराठीची जबरदस्ती करायची की त्यांनी इंग्रजी किंवा एखाद्या प्रादेशिक भाषामाध्यमात शिकायचे? आणि मग त्या मुलांत आणि मराठीतून शिकलेल्या मुलांत दरी निर्माण झाली तर त्याला कोण जबाबदार? निदान विविध भाषिक माध्यमांच्या सर्व शाळांचा दर्जा एक असावा हेही सरकारला का कळू नये?
प्रा. राईलकर हे यापूर्वीच्या काही लेखांमध्ये आणखी एक मुद्दा पुन्हापुन्हा उगाळत. "केंद्रीय विद्यालयात शिकणार्या मुलांना दहावीच्या परीक्षेत दोनच भाषांची परीक्षा द्यावी लागते, एस्एस्सीच्या मुलांना तीन. आणि त्यामुळे मराठी मुलांना कमी मार्क मिळतात आणि ती मागे पडतात. त्यासाठी शाळांतून हिंदी शिकवणे बंद करावे. नाही तरी ती आपली राष्ट्रभाषा नाहीच." माझ्या माहितीप्रमाणे केंद्रीय विद्यालयांतील शिक्षणात हिंदी, इंग्रजी, संस्कृत यांशिवाय एक प्रादेशिक आणि एक परकीय भाषा शिकायला मिळते, भले शेवटच्या परीक्षेत दोनच भाषा का असेनात.
मध्यंतरी मला, भोपाळ आणि इंदूर येथे काही महिने राहण्याचा योग आला होता. त्या दोन शहरांतील शाळांची, आणि त्यांतूनही इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या प्रचंड आहे. शाळांच्या भव्य इमारती, मोठमोठाली क्रीडांगणे आणि मुलांची नेआण करणार्या भरपूर बसेस, हे पाहिले की महाराष्ट्र शिक्षणात का मागासलेला आहे ते समजते.
शिक्षणाच्या माध्यमावर त्याचा दर्जा अवलंबून नसतो. मातृभाषेतून शिक्षण द्यायचा हट्टाग्रह सोडला आणि शाळांचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष दिले तर या वायफळ चर्चा थांबतील.--वाचक्नवी
वेगळा विषय
तो त्यांचा निर्णय आहे, त्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार कटिबद्ध नाही. महाराष्ट्रात केंद्र सरकारने बनविलेल्या किंवा खासगी शाळांतून त्यांनी शिक्षण घ्यावे.
राज्य सरकारने अमराठी मुलांच्या शिक्षणाची फारशी काळजी करण्याची आवश्यकता नाही.
केंद्र सरकारच्या सर्व शाळांचा दर्जा एक असावा/असतो असे मला वाटते. प्रादेशिक सरकारांचे दर्जे एकसमान होतील तेव्हा त्यांच्या शाळांचेही दर्जे एकसमान होतील.
'भले' या शब्दामुळे तो मुद्दा गौण आहे असे सूचित होते आहे परंतु तो मुद्दा गौण नाही.
मराठी संकेतस्थळे
प्रतिशब्द असावेत का नाही यावर चर्चा करायची असेल तर मराठी संस्थळांमधे आपण आता किती मराठी पारीभाषिक शब्द वापरू लागलो आहोत हे ध्यानात घेतले तर समजू शकेल...
शिक्षण मातॄभाषेत/आजूबाजूच्या भाषेत घ्यावे का इंग्रजी माध्यमाच्या भाषेत घ्यावे ह्या मुद्यावर मला वाटते सगळ्यात महत्वाचे ते कुठल्याही प्रकारच्या "गंडा"मुळे होत नाही ना हे महत्वाचे. तुर्तास प्रतिसाद मराठी-इंग्रजीपुरताच ठेवतो...
मराठीच्या (आंधळ्या) स्वाभिमानापोटी मराठीत करणे आणि इंग्रजीला पर्यायच नाही म्हणत इंग्रजीत करणे दोन्ही चुकीचे वाटते. त्यात पालकांचा हट्टच जास्त दिसतो. मराठीत शिकलेल्यांना इंग्रजी जमत नाही असा जो मधल्याकाळात विचार होता तो आता खरा वाटेल असे वाटत नाही... बरं इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांना मराठी येत नाही असे म्हणले तर ब्रिटीशांच्या काळात संस्कृत देखील, "गम गच्छ टू गो" असे शिकणार्या पिढीतच टिळक-आगरकर-सावरकर तयार झाले होते. टिळक-आगरकरांनी तर आम्हाला मराठी लिहीणे शक्य नाही म्हणून सुरवातीस केसरी-मराठ्याची जबाबदारी नाकारली. मात्र "तळमळ असेल तर कूठल्याही भाषेत उतरेल" असे आव्हान कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी दिले आणि या दोघांनी मराठी वृत्तपत्रांच्या दुनियेत इतिहास घडवला. थोडक्यात न्यूनगंड अथवा अहंगंड असण्यापेक्षा तळमळ, आवड, उत्सुकता सगळे जमवू शकते.
येथे अनेक मराठी मुले सहज अस्खलीत मराठीत बोलू शकतात, थोडेफार वाचू-लिहू शकतात हे पाहीले आहे, घरी देखील अनुभवत आहे. अर्थात त्यासाठी घरात मराठी बोलावे लागते आणि तितकेच आवडीने मुलांशी इंग्रजीत पण संवाद अथवा त्यासंदर्भातील गप्पा माराव्या लागतात....
---------------
बाकी यकृत, प्लीहा वगैरे शब्द आम्हाला त्याज्य आहेत कारण पुलंनी त्यांना संस्कृत भाषेतील शिव्या म्हणले आहे. ;)
तसे नाही
प्रतिशब्द असावेत की नाही यावर चर्चा करायची नाही. :-) प्रतिशब्द असू नयेत असे कोणाचे मत सहसा नसते परंतु संवेग, त्वरण वगैरे शब्द वापरून नेमके काय साधतो? ते साहजिक नाहीत आणि प्रचलितही नाहीत. असो. त्या अनुषंगाने थत्ते आणि रिटेचे प्रतिसाद आहेतच. परंतु, मूळ चर्चाविषय असा आहे की
आपले मत ठासून मांडण्यासाठी ज्या जपान आणि चीनचा हे विचारवंत उपयोग करतात (राईलकर, डोके आणि लळिंगकर) त्यापैकी कोणालाही चिनी-जपानी भाषांचा मराठीशी सरळ संबंध जोडणे जमलेले नाही. ते ठिसूळ मुद्दे पुढे करतात आणि लोकांनी प्रश्न विचारले की काहीतरी तिसरेच उपस्थित करू लागतात. (उदा. लळिंगकर यांनी प्रतिसादात आणलेला अल-जेब्रा किंवा डोके आणि माझे तिरपे प्रतिसाद.)
या चिनी-जपानी गैरसमजूतीचा आणि मातृभाषेतील शिक्षणाशिवाय पर्याय नाही या गैरसमजूतीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ही चर्चा आहे.
मुद्दा असा आहे की -
आपण ज्या समाजात राहतो, जी भाषा प्रामुख्याने बोलतो त्या भाषेत मुलांना शिक्षण देणे सोपे पडू शकते. त्यासाठी या विधानाला मातृभाषेची अस्मिता लावण्याची गरज नाही. हेच वाचक्नवींच्या प्रतिसादातही दिसते.
"वेडा जपान" मधले मुद्दे ठिसूळ - सहमत
"शहाणा भारत आणि वेडा जपान" मधले मुद्दे ठिसूळ आहेत - सहमत. तो भावुक निबंध आहे, सत्यशोधक युक्तिवाद नाही.
भारतात किती संशोधनसंस्था आहेत? १९ हा आकडा (माशेलकरांनी सांगितल्याचा संदर्भ असला तरी) जरा कमी वाटतो. जपानपेक्षा कमी असतील याबद्दल शंका नाही. पण उगाच अति-नेमक्या आकड्यांची फेकाफेकी केल्यास बरे नाही.
काही का असेना - यात मातृभाषेचा संबंध काय आहे, ते कळत नाही. वाटल्यास चीन आणि जपानची तुलना करावी.
वेगवेगळ्या देशांमधून किती संशोधनात्मक निबंध लिहिले जातात, त्याबद्दल आकडेवारी येथे सापडेल.
पूर्वप्राथमिक शिक्षण मातृभाषेत (किंवा वाटल्यास मातृबोलीत), प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्थानीय प्रमाण-असलेल्या भाषेत द्यावे, याबाबत सहमती असूनही हा "शहाणा भारत वेडा जपान" निबंध मला आवडलेला नाही.
माझे स्वतःचे पूर्वप्राथमिक ते उच्च, सर्व स्तरांवरील शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले. माझे शालेय वयातले जीवन बिगर-मराठीभाषक प्रांतात गेले. पूर्वप्राथमिक घरगुती शिक्षण [लेखन-वाचन, पाढे वगैरे] आईने मराठी भाषेत पुरवले. कोणास हा तपशील सुसंदर्भ वाटेल, म्हणून दिलेला आहे.
बर्याच
हा मुद्दा बरेचदा येतो. मराठी भाषेचा स्वाभिमान कसा नाही हे दाखवण्याकरता लगेच "फ्रेच बघा त्यांच्या भाषेबद्दल किती स्वाभिमानी आहेत." असणारच, त्यांच्या आख्ख्या देशात ती एकच भाषा आहे. अगदी वर बेल्जियमच्या टोकापासून ते खाली स्पेनपर्यंत फ्रेचशिवाय दुसर्या कुठल्याही भाषेचे तोंड बघावे लागत नाही. हे कित्येक शतके चालू आहे. (खरे तर बेल्जियमच्या अर्ध्या भागातही फ्रेंच बोलली जाते.)
आपल्याकडे किमान २६ ते तीस अधिकृत स्वाभिमान आहेत (बोली भाषा किती गणती नाही) त्यांचे काय करायचे? भारताची तुलना फ्रान्स किंवा जपान अशा एका देशाशी न करता युरोप खंडाशी केली पाहिजे. दर काहीशे किमीनंतर भाषा, संस्कृती, खाणे-पिणे सर्व बदलते.
सगळ्या भारतात मराठी, कन्नड किंवा आसामी ही एकमेव भाषा केली तर आणखी २०० वर्षांनी फ्रान्स/जपानशी तुलना करायला हरकत नसावी.
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
नेहमीची झापडबंद ओरड
आधिच्या चर्चेत म्हटल्याप्रमाणे जपानमधेही तांत्रिक अथवा परभाषिक शब्दांचे नेहमी भाषांतर होतेच असे नाही. बर्याचदा परकीय शब्द तसाच वापरला जातो. फक्त त्याचे लिप्यंतर होऊन ते शब्द काताकाना मधे लिहिले जातात.
आपल्यासारख्या जपानी न कळणार्यांना सगळी अक्षरे सारखीच वाटत असल्याने जपानमधे सगळे कसे जपानी वापरतात नै असे भासते.. मात्र तसे नसल्याने राईलकरांच्या निबंधाकडे 'नेहमीची झापडबंद (वायफळ) ओरड' याव्यतिरिक्त अन्य प्रकारे बघता येत नाहि
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
भ्रष्टाचार, लाचलुचपत, यांचा आणि शिक्षण कोणत्या भाषेतून द्यावे
शिक्षण मातृभाषेतूनच हवे. भ्रष्टाचार, लाचलुचपत, यांचा आणि शिक्षण कोणत्या भाषेतून द्यावे या विषयाचा संबंध कोठून आला.
भ्रष्टाचार
भष्टाचाराचे शिक्षण मातृभाषेतच होते. लाच, लुचपत, पैसे खाणे वगैरे सगळे शब्द आपल्या मातृभाषेतलेच. प्रतिशब्द शोधण्याची गरजच भासली नाही.
--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||
बिचारे चोर-दरोडेखोर
--भष्टाचाराचे शिक्षण मातृभाषेतच होते. -- हे कसे ते कळले नाही.
लोक उच्चशिक्षीत होतात व व्हाईट क्राईम करु लागतात. कर बुडवेगिरी, नियमांना फिरवणे, इ. अनेक शिक्षीत लोकच करु शकतील असे गुन्हे घडतात. बिचारे चोर-दरोडेखोर फुकट पकडले जातात.
अवांतर
हा विषय अवांतर असल्याने आपण कृपया खरडवहीतून तथागत यांच्याशी चर्चा करावी.
वरील चर्चा चीन-जपान मार्गावरून जाणे अपेक्षित आहे. म्हणजे पुढील वेळेस दिशाभूल करणार्या विचारवंतांना आम्हा सामान्यांचे विचार दाखवता येतील.
अवांतर ? सुधारणा...
माझ्या वरील प्रतिसादाच्या सुरुवातीला "चीन-जपानप्रमाणेच, येथेही..." असे वाचावे.
--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||
वाद मिटतील.
आता दहावीच्या आत असलेली पिढी वयात आली की हे प्रश्नच उरणार नाहीत. सगळेच इंग्लिशवर प्रभुत्व असलेले असतील व त्यामुळे मराठीची गरजच शिक्षीतांना उरणार नाही. मला जेव्हढे कळते त्यावरुन असे वाटते की, २०-२५ वर्षात मराठी अस्तंगत होइल, मग सगळेच वाद मिटतील.
माझाही प्रतिसाद
१. भाषा टिकवायची, संस्कृती टिकवायची की फाडफाड इंग्रजी बोलायला शिकून भविष्य सुरक्षित करायचे, ही मध्यमवर्गाची शृंगापत्ती (डायलेमा) आहे. ज्या भाषेतून भविष्य घडवता येत नाही तिला फारसे उज्ज्वल भविष्यही असत नाही.
मध्यमवर्गाची मुले इंग्रजाळत आहेत म्हणून मध्यमवर्गीय आईबाबांना, आजीआजोबांना चिंता वाटणे साहजिक आहे. ती चिंता आपण समजून घ्यायला हवी आणि तिच्याशी सहानुभूत व्हायला हवे. पण इंग्रजीतून शिक्षण घेणारे1 नीट इंग्रजी तरी बोलू शकतात का?
माझ्यामते मराठीला हे मराठीचे अतिरेकी नको आहेत. ही मंडळीदेखील मराठीचे मारेकरी आहेत. अहो, मुलांना विज्ञान शिकू द्या ना2. हे कर्बद्विप्राणील कशाला हवे? हे असले प्रतिशब्द फार दुःखद असतात. असो. कशाला हवे आत्त (धनंजय क्षमस्व. धनंजय हे मराठीचे अतिरेकी आहेत असे मला अजिबात वाटत नाही. कुणी चुकीचा अर्थ काढू नये, ही विनंती), विदाफिदा. डेटा घ्या ना डेटा3. काय बिघडणार आहे?
1. ह्यात हायफाय कॉनवंटवाले आणि टिनपाट कानमेंटवाले दोन्ही गृहीत धरले आहेत. दोन्हीकडे शिकणाऱ्यांच्या कथा वेगळ्या.
2. विज्ञानविषय मराठीतून शिकवणारे शिक्षकदेखील मराठीचे शिक्षक असतात हे डॉ. अशोक केळकर ह्यांचे मत इथे नमूद करावेसे वाटते.
3. हा प्रतिसाद लिहिता-लिहिता डेटावरून 'देता' हा शब्द सुचला :)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सपशेल सहमती
अगदी पूर्णपणे ११०% सहमत आहे.
विज्ञानाच्या वर्गात विज्ञान शिकावे, भाषा नाही.
--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||
गडबड
केळकरांचे वाक्य वाचून त्यांना बहुधा गणित आणि विज्ञानाचा शिक्षकही भाषा शिकवू शकतो असे सांगायचे असावे. त्यात मला काही गैर वाटत नाही. इथे माझ्या मुलीला सोशल स्टडीज आणि विज्ञान या विषयात वोकॅब्युलरी टेस्ट असते. त्या त्या विषयासाठी कोणते शब्द वापरले जातात हे त्या त्या शिक्षकांनी सांगणे अधिक उपयोगी आहे. केवळ भाषा हा विषय शिकवणारा शिक्षक मुलांना सर्व विषयातील शब्द शिकवू शकत नाही.
+१
तुम्ही म्हणता तसाच अर्थ आहे. विज्ञानशिक्षणाच्या संदर्भात मराठी शब्द शिकले, तर मराठीचे ज्ञानही वाढते.
सहमत
>>>विज्ञानशिक्षणाच्या संदर्भात मराठी शब्द शिकले, तर मराठीचे ज्ञानही वाढते.
सहमत आहे आणि त्याचबरोबर मराठी भाषा समृद्ध होईल.
-दिलीप बिरुटे
मराठीचे अतिरेकी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
याच्याशी सहमत आहे. मध्यमवर्गाला थोडक्या वेळात जी उंची गाठायची आहे किंवा भविष्य बनवायचे आहे (किंबहुना, ती ते सध्या गाठत आहेत. अन्यथा, आमच्या लहानपणी फोन, गाडी, एसी, परदेश प्रवास वगैरे म्हटले की डोळे विस्फारत. आज मध्यमवर्ग हे सहजी करतो आहे.) त्यानुसार ज्या भाषेला भविष्य नाही त्या भाषेच्या वाटेला ते जाणार नाहीत हे सत्य आहे.
सहमत आहे आणि सहानुभूतीही आहे परंतु वस्तुस्थितीकडे डोळेझाक करता येत नाही. माझी मराठी शाळा बंद व्हावी असे मला वाटत नाही. ती बंद झाली तर मला वाईट वाटेल पण माझ्या शाळेची स्थिती पूर्वीसारखी नाही कारण माझ्यावेळेस जो मध्यमवर्ग या शाळेत जात होता त्याने आता शाळेकडे पाठ फिरवली आहे. त्या मध्यमवर्गाला कोणी तुमचे तुमच्या देशावर प्रेम नाही, तुम्ही फक्त तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी करता असे म्हटले तर त्यांना काय फरक पडतो? एका कानाने ऐकून दुसर्या कानाने सोडून द्यायची गरजही त्यांना नाही. येथे चर्चेशी संबंधित मुद्दा असा की आपल्या हातातून काहीतरी निसटते आहे ही जाणीव माणसाला अतिरेकी बनवते असे वाटते आणि तेच या विचारवंतांचे होत आहे हे पाहून खेद होतो.
जेव्हा, भाषेवर निबंध लिहिणारे प्राध्यापक आणि विचारवंत मंडळी चिनी-जपानी भाषेच्या खोट्या कुबड्यांचा आधार घेतात किंवा मातृभाषेत शिक्षण घेत नाही म्हणजे देशावर तुमचे प्रेम नाही अशी विधाने करतात तेव्हा यांचा अतिरेक पुढे वाढत जाऊन -महाराष्ट्र हे वेगळे राष्ट्र बनावे, मराठी ही राष्ट्रभाषा बनावी, महाराष्ट्रात अमराठी लोकांना मज्जाव असावा, सर्व शाळांत मराठी सक्तीची करावी, मराठी मुला मुलींनी बाहेरगावी नोकरी धरू नये, मराठी मुलामुलींनी अमराठी मुलामुलींशी लग्न करू नये, महाराष्ट्र सोडून उर्वरित भारतावर अणुबॉम्ब पडावा वगैरेमध्ये फोफावत जाईल अशी शंका वाटते आणि या विचारवंतांना हाताशी धरून राजकारणी राजकारणही खेळतील.
वरील काही विधाने गंमतीदार वाटली तरी इतर काही विधानांना सत्यात उतरवण्याचे प्रयत्न झालेले आहेत हे विसरता येत नाही.
मराठीचे शिक्षक आणि प्राध्यापक कुठे नीट मराठी बोलतात? हा आपल्याकडल्या शिक्षणाचा दर्जा झाला. आनंद सर्वत्र सारखाच आहे. :-)
डेटा मराठीत उत्तम चालतो. डेट्याने, डेट्याला, डेट्यासाठी, डेट्यातून वगैरे.
एक उपयुक्त शोधनिबंध
शोधता शोधता या बाबतीत एक उत्तम शोधनिबंध सापडला :
(दुवा)
शीर्षक : भारतात इंग्रजी भाषाकौशल्याची फलिते (The Returns to English-Language Skills in India)
लेखक : मेहताबुल आझम, एमे चिन आणि निशित प्रकाश
लेखाचा सारांश असा काही : लेखात "इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट सर्व्हे २००५" या सर्वेक्षणातील आत्त वापरलेले आहे. अन्य बाबी समान असता प्रवाही रीतीने इंग्रजी बोलू शकणार्या पुरुषाला इंग्रजी न-बोलू शकणार्या पुरुषापेक्षा ३४% अधिक उत्पन्न मिळते (ही सरासरी). मात्र वेगवेगळ्या उप-वर्गवारीत इंग्रजी कौशल्याचे फायदे या सरासरीपेक्षा खूपच कमी-अधिक आहेत. अधिक शिक्षण झालेल्या, अधिक अनुभवी लोकांच्या अंतर्गत बघितले, तर इंग्रजीत कुशल असल्यामुळे अधिक फायदा होतो. तर अकुशल, कमी शिक्षित लोकांना इंग्रजी येऊन-न-येऊन फार फरक पडत नाही. शिक्षणाच्या दोन टोकांमध्ये इंग्रजी-फायदा वेगळा असण्याचा हा फरक तरुण पिढीत अधिक प्रकर्षाने जाणवतो.
शिक्षण इंग्रजीमध्ये असावे, की स्थानिक भाषेमधे, याविषयी लेखक विचार सांगतात :
जरी इंग्रजी भाषा कौशल्यामुळे उत्पन्न वाढते, तरी उच्चशिक्षित लोक सोडले, तर असा फायदा फारसा नाही. ... प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेत असल्यास ते अधिक लोकांना सहजग्राह्य होईल, मात्र अशा उच्चशिक्षितांना इंग्रजीभाषक बाजारपेठेतले फायदे मिळवणे कठिण होईल ... म्हणून माध्यमिक शाळेत इंग्रजी शिक्षण पुरवावे, (म्हणजे यांच्यापैकी जे उच्चशिक्षण घेतील, त्यांना स्थानिक भाषेत प्राथमिक शिक्षण आणि इंग्रजी भाषा-कौशल्य दोहोंचा फायदा मिळेल, असा मथितार्थ असावा.) ...
हा भाग
म्हणून माध्यमिक शाळेत इंग्रजी शिक्षण पुरवावे,
काही मराठी माध्यमाच्या शाळा आठवीपासून गणित, विज्ञान हे विषय इंग्रजीतून शिकवतात हे फार पूर्वीपासून चालत आले आहे. पूर्ण इंग्रजी माध्यमाच्या शाळांना हा एक उत्तम तडजोडीचा पर्याय होता असे मला वाटते. (आमच्या शाळेत हा पर्याय नव्हता, त्यामुळे माझा कॉलेजच्या सुरुवातीच्या वर्षांत नक्कीच तोटा झाला).
माझ्या मते इंग्रजी शिक्षण हल्ली महत्त्वाचे झाले आहे. त्यापासून मुलांना वंचित करू नये. पण आपल्याकडे अजूनही शाळा अतिशय दुर्गम भागात आहेत. तेथे इंग्रजी शिकवणारे शिक्षक मिळणे कठीण आहे, तसे मिळाले तरी ते टिकणे कठीण आहे. स्थानिक भाषांमधून सक्षमीकरण करावे आणि मग त्यातील विशेष चमक दाखवणार्या मुलांसाठी इंग्रजीतून शिक्षणाची योजना बनवावी.शिवाय मुलांना एकदम इंग्रजीच्या प्रवाहात ढकलून देण्याची गरज असते का, हे मला माहिती नाही. आमच्या राज्यात काही वर्षांपूर्वी स्पॅनिश बोलणार्या मुलांचे "इंग्लिश इमर्शन" केले गेले. तेव्हा मला ते योग्य वाटले नव्हते. पण येथील स्पॅनिश बोलणारे लोक हे विशेषतः शहरांमध्येच राहतात. इथे त्यांना इंग्रजी येणे हे नागरिकत्व, हक्क, कायदे यादृष्टीने महत्त्वाचे आहे. भारतात तसे काही प्रमाणात जरुरीचे आहे, पण थेट संबंध लावता येईल का काय माहिती नाही. पण खालील लेख वाचनीय असावा.
http://www.enterstageright.com/archive/articles/1102/1102englishimm.htm
सेमी-इंग्रजी
सध्याचा अनुभव.
माझ्या मुलीला पहिली पासून इंग्रजी (सरकारी नियमानुसार) व पाचवी पासून गणित व विज्ञान इंग्रजीतून (पालकांच्या आग्रहास्तव) शिकावे लागत आहे.
आमचा अनुभव असा की विज्ञान किंवा गणित इंग्रजीतून शिकणे अवघड जाते. इतकेच नव्हे तर विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत = नफा हे (इंग्रजीतून) माहिती असले तरी नफ्यातोट्याची शाब्दिक गणिते (स्वतःची स्वतः) करता येत नाहीत कारण काय लिहिले-विचारले आहे हे कळत नाही. यावर उपाय काय? तर पाठ्यपुस्तकातली तशी गणिते घोटून घेणे आणि परीक्षेत तीच विचारणे. पण याने फक्त परीक्षेचा/मार्कांचा प्रश्न सुटतो.
(ज्यांनी पहिल्यापासून सर्व शिक्षण इंग्रजीतून घेतले आहे पण ज्यांच्या समाजात वावराची भाषा इंग्रजी नव्हती त्यांचे याबाबत काय अनुभव आहेत?)
माझ्यामते माध्यमिक शिक्षणसुद्धा मराठीतूनच व्हावे आणि दहावीपर्यंत जे इंग्रजी शिकवले जाते त्याची पातळी वाढवावी. विद्यार्थ्यांनाही टीव्हीवरील बातम्या, मॅचची कॉमेंटरी वगैरे पाहून इंग्रजीशी पुरेशी दोस्ती करता येईल आणि इंग्रजी पुरेसे समजू लागले असल्यामुळे अकरावीत अडचण येणार नाही. आमच्या पिढीत टिव्ही खूप कमी होता आणि त्यावर मराठी कार्यक्रमच प्रामुख्याने असत. आज तसे नाही आणि टीव्हीचा प्रसारही खूपच आहे. हा उपाय पाचवीतल्या इंग्रजीला लागू नाही. म्हणजे चौथीपर्यंत टीव्हीपाहून इंग्रजीशी दोस्ती होणार नाही कारण टीव्हीवरच्या बातम्या/चर्चांमधल्या विश्वाशीच लहान मुलांची पुरेशी ओळख नसते.
नितिन थत्ते
हाही मुद्दा आहेच
माध्यमिक शिक्षणसुद्धा मराठीतूनच व्हावे आणि दहावीपर्यंत जे इंग्रजी शिकवले जाते त्याची पातळी वाढवावी.
दहावीपर्यंतच्या इंग्रजीची पातळी वाढवावी, हा मुद्दा बरोबर आहे. पण माध्यमिक शिक्षणासाठी जे शब्द वापरले जातात ते मनात तसेच ठसतात. त्वरण ऐवजी ऍस्किलरेशन आणि त्याहीपेक्षा अधिक म्हणजे सर्डस, इर्रॅशनल नंबर्स अशा शब्दांशी कधी जवळून संपर्कच आलेला नसताना अचानक ते वापरायला लावायचे, बाकोबा, बाबाबा, असे सर्व डोक्यात असताना अचानक इंग्रजीतून भूमितीचा विचार करायचा हे उगाचच त्रास देण्यासारखे आहे.
प्रत्येक शब्दाचा इंग्रजी अर्थ लावायचा, तो मनात भिनवायचा, त्याचा वापर बोलताना करायचा हे सर्व शिक्षण अचानक कसे द्यायचे? हे नुसते टीव्ही बघून येणार नाही. मला शाळेत असताना लहानमोठी इंग्रजी पुस्तके वाचण्याची सवय होती, तरीही शास्त्रीय परिभाषा अंगवळणी पडणे अवघड झाले असे आठवते.
सहमत
'वेग', 'त्वरा' हे शब्द कधी ना कधी मुलांनी ऐकलेले असतात त्यामुळे 'त्वरण', 'संवेग', या शब्दांचे अर्थ लक्षात ठेवणे/कल्पिणे थोडे सोपे जाईल. 'करणी' हे बांधकामातील उपकरण (व्युत्पत्ती 'कर' या शब्दापासून असेल का?) माहिती असेल तर 'करणी' हा शब्द 'सर्ड'पेक्षा अधिक वर्णनात्मक वाटेल असे मला वाटते. आधीच रुळलेल्या शब्दांच्या बाबतीत अपवाद सापडतील. उदा., 'क्रोमोसोम' या शब्दाचा अर्थ 'रंगपिंड' असा आहे, तो प्रचलित झालेला नसल्यामुळे 'गुणसूत्र' असा अर्थपूर्ण शब्द शिकविण्याची संधी सोडू नये पण 'मलेरिया' या चुकीच्या अर्थाच्या शब्दाचा रुळलेला वापर मोडण्याचा प्रयत्न करू नये.
मराठीतून
माध्यमिक शिक्षण मराठीतून याचा अर्थ वाक्यरचना, व्याकरण वगैरे मराठीतून. तांत्रिक शब्द इंग्रजीतून वापरायला हरकत नाही. खरेतर ग्रॅज्युअली इंग्रजी शब्दांची ओळख करून दिल्यास (असे प्रतिशब्द असलेली एकदोन पाने आमच्या पुस्तकातही होती) निदान शब्दांचा प्रश्न येणार नाही.
अकरावीतल्या (वाढ पूर्ण झालेल्या) मुलांना जी अडचण जाणवते ती अडचण मुलांवर पाचवीच्या कोवळ्या वयातल्या मुलांवर लादणे अयोग्य आहे असे माझे मत आहे. पहिलीत लादणे तर अजून भयंकर आहे.
नितिन थत्ते
चित्रा आणि थत्ते
यांच्या प्रतिसादांतील बरेचसे मुद्दे पटणारे आहेत. थत्ते म्हणतात त्याप्रमाणे भाषेचे माध्यम मराठी असावे परंतु तांत्रिक शब्द इंग्रजीच असावेत. जेणे करून विद्यार्थ्यांना ११वीत त्रास कमी होईल.
शाब्दिक गणितांबद्दल थत्ते जे म्हणतात त्याबद्दल माझा अनुभव असा की ती गणिते बहुधा सर्वांनाच कठिण नसली तरी चॅलेंजिंग वाटत असावीत. जी मुले प्रथम भाषा इंग्रजी घेऊन शिकतात त्यांनाही ती कठिणच वाटत असावीत. शाब्दिक गणिते ही तर्कक्रिडेप्रमाणेच असतात.
सुमारे एक-दोन वर्षांपूर्वीचे एक गणित पाहा.
फूटबॉलमधील एका गेममध्ये क्वार्टरबॅक पहिल्या खेळीत "लाईन ऑफ स्क्रिमेज"च्या मागे १० यार्डाने सॅक झाला. दुसर्या खेळीत त्याने बॉल ८ यार्ड रश केला आणि तिसर्या खेळीत पंधरा यार्ड पास केला तर त्यांना पुढील गेमसाठी फर्स्ट डाउन मिळाला की नाही?
हे साधे बेरीज-वजाबाकीचे गणित आहे. मोठ्यांना रश,पास या शब्दांतून कदाचित कळेल परंतु ज्यांना त्यात गुण मिळवायचे आहेत त्यांना त्या गणिताच्या उत्तरासाठी ते कळणे गरजेचे आहे आणि ते कळण्यासाठी अमेरिकन फूटबॉलचा खेळ त्या लहान मुलांना थोडाफार कळावा लागेल. अन्यथा, गणित पाठ करणेच आले.
या वर्षीची काही मजेशीर गणिते वेळ झाला तर टाईप करेन.
वाचतो आहे.
वाचतो आहे.
वाचतांना एक त्रयस्थ दृष्टीकोन बाळगण्यामुळे वाचावयास मजा येते. असो. श्री. राईलकर, श्री. डोके आणि श्री. लळींगर इत्यादिंना दुसर्या देशांच्या उदाहरणाआधी स्वतःच्या देशातील उदाहरणे अभ्यासा म्हणावे. सुज्ञास अधिक सांगणे नच लगे.. तरीही, दक्षिणेत ह्या विषयाबाबत बोलावयाचे झाल्यास "आंग्लभाषा शिकणे" आणि "आंग्लभाषेतून शिकणे" हे दोन विषय वेगवेगळे गृहित धरले जातात, अर्थाच्या एवढ्या मोठ्या अंतराबद्दल सहसा गल्लत केली जात नाही. कोण्या एका भाषेत सुसंवाद साधावयाचा हे ठरविताना "आपली भाषा कोठली" आणि "दुसर्याची भाषा कोठली" हे भान ठेवणे सहजशक्य आहे. असो. कितीही झाले तरी एकाद्या दाक्षिणात्य मनुष्याचे मातृभाषाप्रेम आणि महाराष्ट्रीय मनुष्याचे मातृभाषाप्रेम ह्याची तुळना होवूच शक्य नाही हे माझे अनुभवांतीचे मत आहे. अधिक लिहत नाही. चालू देणे.
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
डाऊनमार्केट
माझा मित्र तामीळ आहे. त्याला हिंदी येत नाही त्यामुळे त्याला होणारी कुचंबणा आवडत नाही. तो म्हणाला की, आजकालची तामीळ तरुण पिढी इंग्लिशमधुनच व्यवहार करते, सणासुदीच्या शुभेच्छा देते, ई. जे घडते आहे ते मराठीबद्दलच घडते आहे असे नाही तर जगातील अनेक स्थानिक भाषा इंग्लिशच्या तोडीच्या होऊ शकत नाहीत तो पर्यंत त्यांचा र्हास होतच राहणार आहे. कॉमनवेल्थ देशात तर हे अनेक वर्षांपुर्वी घडायला लागले; इतर देशात इंग्लिशच्या मागासलेपणामुळे जे तोटे होतात ते लक्षात आल्यामुळे त्यांनी उपाययोजना केली.
थोडक्यात काय तर, मराठी भाषा डाऊनमार्केट आहे.
"आत्त"बद्दल स्पष्टीकरण
जर मराठीत समानार्थी शब्द आधीच उपलब्ध असेल, तर मी शक्यतोवर तो वापरतो.
"आत्त" हा शब्द जुन्या आणि नवीन अशा दोन्ही मराठी शब्दकोशांत सापडतो. त्याचे अर्थवलय इंग्रजी शब्द "डेटा"शी मिळतेजुळते आहे. असे असता त्या शब्दाच्या जागी "डेटा" वापरणे म्हणजे "त्रिकोण"च्या जागी "ट्रायँगल" वापरण्यासारखे मला वाटते.
१. जर थोडीशी वेगळी अर्थछटा असती, तर "डेटा" वापरण्याला माझा काहीच विरोध नाही.
२. "आत्त" शब्द जर कालबाह्य होऊन पूर्णपणे विसरला गेला असता (हे "जर-तर"चे वाक्य आहे, हा शब्द शब्दकोशांत सापडतो, म्हणजे ही अट प्रत्यक्षात खरी नाही, हे आलेच), तर त्याचे पुनरुज्जीवन करावे की नाही? याबाबत माझे ठाम मत नाही. मराठीत मी वापरतो त्या बोलीला दोन मूर्धन्य "ड" आणि "ट" हे एका शब्दात मानवत नाहीत.
(हिंदी, पंजाबी, वगैरे भाषांना "डांटना"सारखे दुहेरी मूर्धन्य शब्द मानवतात. त्याच्या समांतर मराठी रूप "दटावणे" असे आहे. म्हणजे एक व्यंजन दंत्य केलेले आहे. हिंदी "ठाठ" शब्द मराठीत "थाट" शब्दाशी समांतर आहे. पुन्हा एक व्यंजन दंत्य केलेले आहे. किंवा हिंदी "डेढ़", मराठी "दीड". मराठीत अपवादात्मक निरर्थक शब्द "टाटा" मध्ये दोन मूर्धन्य आहेत. अभ्यासासाठी आणखी अपवाद आहे "डिटेलमंदी सांग, डेटॉल कायाला पायजे?" या प्रयोगात अगदी मराठमोळ्या लोकांना एका शब्दात ड-ट मानवतात. अपवाद काही का असेना -)
मला तरी मराठीच्या माझ्या बोलीत बोलताना "डेटा" हा शब्द अडखळतो, ही बाब अनुभवाने खरी आहे. (इंग्रजीत या शब्दात दोन दंतमूलीय आहेत. तो उच्चार इंग्रजीतल्या माझ्या बोलीला सुलभ आहे.) म्हणून त्याच्या जागी काना-जिभेला बरा वाटेल असा शब्द मला आवडतो. म्हणून "आत्त" आणखी घट्ट झालेला आहे. अर्थात, "डेटा" शब्द प्रचलित झाला, तर मी तो जरूर वापरायला लागेन. "डेटा" हा शब्द वापरण्याची वेळ सामान्य व्यवहारापेक्षा तांत्रिक चर्चेत अधिक येईल. अशा तांत्रिक चर्चा मी मराठीमध्ये फारशा वाचत-ऐकत नाही. त्यामुळे "हा शब्द प्रचलित झाला आहे, पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळे हा ध्वनी मराठीभाषकांना नैसर्गिक झाला आहे" असे समजायला मला उशीर होईल, हे तर मान्यच आहे.
तांत्रिक चर्चा मराठीत व्हायला लागतील, तेव्हा वरील सगळा ऊहापोह बादच होईल. "काय प्रशस्त आहे" वगैरे तात्त्विक चर्चा न होता, "वापर काय होतो" ही बाब निरीक्षणाने सिद्ध होईल. मोटारगाडी दुरुस्त करणारे "स्पॅनर->पाना", "पंक्चर->पंचर", "टायर->टायर", "व्हॅल्व्ह/व्हॉल्व्ह->वाल" वगैरे इंग्रजी-व्युत्पत्तीचे शब्द मराठीमोळे करून वापरतात. तेव्हा "प्रशस्त" वगैरे चर्चा भाकड होतात.
मात्र मराठीभाषक कामगार "चाक" शब्द विसरून "व्हील" वापरू लागले आहेत काय? "सीट" शब्द वापरतात, ती फक्त मोटार/बसगाडीतली वगैरे असते. घरातल्या खुर्ची-कोचांसाठी "सीट" शब्द वापरत नाहीत. म्हणजे तो शब्द मराठीमध्ये नवी अर्थछटा घेऊन आलेला आहे. उपलब्ध असलेल्या मराठी शब्दांना घालवणारा शब्द नाही. अशाच प्रकारे "डेटा" नवी अर्थछटा घेऊन मराठीत आला, तर मी जरूर वापरू लागेन.
हरकत नाही
डेटा, डाटा किंवा आत्त कुठलाही शब्द वापरण्यास हरकत नसावी. किंबहुना कुणावरही अमुक शब्दच वापरायला हवेत असे बंधन नाही. जर तुमचे विचार नि:संदिग्धपणे पोचत असतील, तर शब्द कुठले आहेत याला फारसे महत्व नाही. कारण सुदैवाने तुम्ही-आम्ही कुठले शब्द वापरतो यावर भाषेचा प्रवाह अवलंबून नाही. (इथे गांधीमधील वाक्य आठवले, "भारत का मतलब है ७००००० गांव, न कि दिल्ली और बंबई के कुछ गिने-चुने वकील.") भाषा ही एखाद्या ऐरावताप्रमाणे आहे. जनमताच्या रेट्यानुसार त्याला जशी हवी तशी वळणे तो घेतो. कित्येक युगांनंतर शेक्सपिअरसारखा एखादा या ऐरावतावर आरूढ होतो आणि त्यावर अंकुश लावून वेगळे वळण देण्यात यशस्वी होतो. अन्यथा असे करण्याचे इतर सर्व प्रयत्न म्हणजे या ऐरावताला काडीने मारण्यासारखे आहे.
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
आत्त
उपसर्ग लागलेल्या तिसर्या गणातल्या दा धातूची आत्त, प्रत्त, अवत्त, नीत्त, वीत्त, सूत्त, अनूत्त अशी अपवादात्मक क.भू. धा. वि. रूपे होतात हे माहीत होते, पण आत्त हा शब्द कधी मराठी कोशात पहायचा योग आला नव्हता.
डेटासाठी विदा रूढ होऊ पहात आहे . त्यामुळे आत्त, किंवा दा पासून बनलेले तत्सम शब्द, ऍब्स्ट्रॅक्त(सारांश, गोषवारा) किंवा एक्स्ट्रॅक्ट (सार, अर्क, उतारा) यांसाठी प्रतिशब्द म्हणून वापरण्यासारखे आहेत. आत्त आणि ऍब्स्ट्रॅक्ट यांतले ध्वनिसाधर्म्य लक्षणीय आहे.(लहानपणी रामरक्षा म्हणताना आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ म्हणताना दमछाक व्हायची आणि मग जमले की हसू यायचे, त्याची आठवण झाली.)
नासिक्य वर्ण नसलेली दोन सुटी मूर्धन्य व्यंजने एक शब्दांत आली की शब्द मराठी नाही हे नक्की समजते. पण काय करणार? इंग्रजी डी आणि टीसाठी मराठीत ड आणि ट वापरण्याखेरीज पर्याय नाही.
असाच काहीसा प्रकार क्स, क्श, स्ट, ट्स, स्ड यांचा आहे. ही जोडाक्षरे असलेले शब्द मराठी नसले तरी नाइलाजाने लिहावेच लागतात. हिंदीतल्या नुक्ताधारी क, ख, ग, ज, फ, ड, ढ या उच्चारांसाठी आपण तीच अक्षरे नुक्ताविरहित लिहितोच ना! मराठीमधल्या डावा आणि वाडा या दोन शब्दांतल्या डा चे उच्चार भिन्न असले तरी आपल्याकडे दोन डंसाठी वेगळे व्यंजनचिन्ह नसल्याने ते एकसारखेच लिहावे लागतात.
--वाचक्नवी
बापरे
तुम्हाला असं सगळं लिहिताना त्रास नाही होत का हो ?
(शब्दकोशात "रावले सतीश" ह्याचा विरुद्धार्थी शब्द बघायला हवा.)
--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||
शब्द न मानवणे
मराठीत मी वापरतो त्या बोलीला दोन मूर्धन्य "ड" आणि "ट" हे एका शब्दात मानवत नाहीत.
म्हणूनच मी देता हा शब्द सुचवला होता. पण काळ बदलतो तशी भाषेची प्रकृतीही बदलत असावी. संगणक वापरणारे बहुसंख्य मराठीभाषक डेटा, कंप्यूटर, फ्लॉपी, हार्ड डिस्क, सीडी, डीव्हीडी, लॅपटॉप हे शब्द अगदी सहज वापरतात. ते विदा, संगणकादी शब्द वापरत नाहीत. असो. एका शब्दासाठी ३-३ प्रतिशब्द वापरात असले की गोंधळायला होते कधीकधी.
एक शंका: विदापासून विदागार तर आत्तपासून आत्ताशय का? एक गमंत: विदा शब्द रूढ करण्याच्या प्रयत्नांमागे हे सावरकरवादी असावेत असा संशय मध्यंतरी माझ्या एका मित्राने व्यक्त केला होता. एक पांचटपणा: विदागार पूर्णपणे कोसळला तर अलविदा म्हणायचे की विदाई ?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
गांधीवादी
विदा शब्द रूढ करण्याच्या प्रयत्नांमागे हे सावरकरवादी असावेत असा संशय मध्यंतरी माझ्या एका मित्राने व्यक्त केला होता.
मित्राला सांगा की संशय चुकीचा आहे. ह्या शब्दामागे काही गांधीवादी सामील आहेत. त्यांना "सामील" सारखे असंस्कृत परभाषीय शब्दही मराठीत आलेले चालतात ;-)
--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||
फारतर मोक्का
विनायक दामोदर सावरकर ह्या नावातून विदा हा शब्द आला आहे असा त्याला संशय आहे. मोहनदास करमचंद गांधी ह्या नावातून पासून फारतर ओढूनताणून मोक्का येऊ शकेल/आला असेल.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
जपान आणि इंग्रजी
बरोबर-चूक, समर्थन-विरोध या संदर्भात ही बातमी देत नसून केवळ आत्ता काय चालले आहे हे समजण्यासाठी देत आहे. कारण आपण काय करायचे हे आपण आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे ठरवावे, जपान, चीन, अमेरिकेवरून नाही असे वाटते...
आजच नॅशनल पब्लीक रेडीओवर संध्याकाळच्या कार्यक्रमात, जपान मधे इंग्रजी शिकणे आता थोड्याफार प्रमाणात सक्तीचे होऊ घातले असल्याची बातमी आहे. त्यात उद्योग असे त्यांच्या कर्मचार्यांना करायला लावत आहेत हे झालेच (नाहीतर पदावनतीचे भय) पण सरकारने हायस्कूलचे शिक्षण हे २०१३ पासून इंग्रजीतच असेल असे म्हणत आहेत... (ही बातमी अजून काही तासांनी तेथे ऐकता येईल अथवा छापील स्वरूपात उपलब्ध होईल).
बाकी त्याच बातमीत खालचा तूनळीचा दुवा दिला आहे. त्यात जपानी मुली नाचत जे काही इंग्रजी बोलताना शिकताना दाखवल्या आहेत ते पाहून त्यांना इंग्रजी नक्की येत नसावे असे वाटले. ;)
डायरिया
अमेरिकन इंग्रजीने होमिओपॅथीमधला एक ओ गाळल्याचे माहीत होते, पण डायरियातलाही गाळला आहे हे आज समजले. बाकी ही तूनळी बघणीय व ऐकणीय आहे.--वाचक्नवी
मष्ट वाच
भाषेवरील एक मष्ट वाच चित्रफित इथे.
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
१९ हा आकडा किती सालातला आहे?
१९ हा आकडा किती सालातला आहे? माझ्या माहितीत भौतिकशास्त्राच्या (खगोलशास्त्र पकडून) भारतातल्या किमान ११ संस्था मला आठवत आहेत. यांतल्या काही संस्थांमधे इतर विषयांवरही काम चालतं. भारतात इतर विषयांसाठी (त्या त्या विषयासाठीच) फक्त ८ संस्था आहेत हे पटणं कठीण जात आहे. पुण्यातच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, शेतकी संशोधन संस्था, इ. संस्था आहेत. या ११ संस्थांंमधे आयसर्सचा समावेश नाही. आजघडीला भारतात ५ (का जास्तच?) आयसर्स सुरू आहेत.
बाकी मुख्य विषयाबद्दल मौन!
१८० भाषा आणि १७०० बोलीभाषा
ईशान्य भारतात सिक्कीम धरून आठ राज्ये आहेत. त्या सर्व राज्यांत एकूण १८० भाषा आणि १७०० बोलीभाषा आहेत, असे नुकतेच वाचनात आले. हे जर खरे असेल तर मातृभाषेतून शिक्षण ही संकल्पना ईशान्त भारतात राबवणेच शक्य नाही हे सहजी ध्यानात यावे.
चीनमध्येही भाषांची संख्या अशीच प्रचंड असावी--वाचक्नवी
धन्यवाद
अनेक लेखांत विचारवंतांकडून चीन जपानमध्ये देण्यात येणार्या मातृभाषेतून शिक्षणाचे जे उदाहरण दिले जाते ते दिशाभूल* करणारे आहे हे पटवून देणे हाच चर्चेचा उद्देश होता. तो सफल झाला असे वाटते. उपक्रमावर मातृभाषेतून शिक्षण देण्याबद्दल भविष्यात जे लेख किंवा चर्चा येतील आणि त्या चर्चांमध्ये चीन-जपानमधील शिक्षणाचा असा दिशाभूल करणारा उल्लेख येत असेल तर पुन्हापुन्हा वादविवाद करत बसण्यापेक्षा या चर्चेचा दुवा देणे सुकर होईल.
या चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार.
* दिशाभूल या विचारवंतांची स्वतःची की वाचकांची हे जोपर्यंत या व्यक्ती स्वतः चर्चेत भाग घेऊन सांगत नाहीत तोपर्यंत कळणे कठिण आहे परंतु दिशाभूल होते हे खरे आहे.