तर्कक्रीडा ९:पंचकन्या
...... "मी आजन्म लग्न करणार नाही." असे वारंवार सांगणारा मन्मथैव देशपांडे शेवटी वधुवर-सूचक मंदडळात गेलाच!तिथे त्याला मदालसा,मालविका,मीननयना.मेघानंदा आणि मोहमयी या पाच स्थळांची माहिती मिळाली.त्यांतील पहिल्या तिघींचे आडनाव जोशी तर उर्वरित दोघींचे कुलकर्णी होते.
*****१.या पाच जणींचे दोन वयोगट होते.तिघींचे वय (म्ह.पहिल्या तिघींचेच असे नव्हे.) तीस वर्षांपेक्षा कमी तर दोघीनी तिशी ओलांडली.
***** २. दोघी जणी शिक्षिका तर उरलेल्या तिघी बँकेत .
***** ३. मदालसा आणि मालविका एकाच वयोगटातील.
***** ४. मीननयना आणि मेघानंदा यांचे वयोगट भिन्न.
***** ५.मोहमयी आणि मेघानंदा यांचा व्यवसाय एकाच प्रकारचा.
***** ६ मालविका आणि मीननयना यांचे व्यवसाय भिन्न.
***** ७. या पंचकन्यांतील एकीशी मन्मथैवचा वाङनिश्चय झाला.ती वयाची तिशी ओलांडलेली शिक्षिका होती.
तर देशपांडे याच्या नियोजित वधूचे नाव काय?
(लांबलचक युक्तिवाद अनावश्यक. पाच सहा विधानांत उत्तर यावे.ते सयुक्तिवाद लिहावे.)
...............यनावाला.
Comments
उत्तर
मीननयना जोशी.
मीननयना जोशी
१. मो आणि मे या शिक्षिका असू शकत नाहीत कारण त्यामुळे उरलेल्या तिघींचा व्यवसाय सारखा होतो - हे शक्य नाही (अट ६)
२. म्हणून मो आणि मे ह्या बॅंकेत आहेत. आता मा आणि मी यांचे व्यवसाय भिन्न असल्यामुळे
अ) मो, मे आणि मी ह्या तिघी बॅंकेत असल्या तर म आणि मा ह्या शिक्षिका असतील
किंवा
ब) मो, मे आणि मा ह्या तिघी बॅंकेत असल्या तर म आणि मी ह्या शिक्षिका असतील
३. २अ) खरे असेल तर म आणि मा ह्या शिक्षिका असतील आणि त्या दोघींचे वय (समान वयोगट असल्यामुळे) तीस पेक्षा जास्त असायला हवे. (कारण एक तरी शिक्षिका तिशीपेक्षा मोठी आहे - मन्मथैवची वधू). पण यामुळे उरलेल्या तिघींचे वय ३० पेक्षा कमी असायला हवे. म्हणजे मी आणि मे एकाच वयोगटात येतील. म्हणून हाही पर्याय बाद. (अट ४)
३. २ब) खरे असायला हवे. म्हणजे म आणि मी ह्या शिक्षिका आणि त्यांच्यापैकी एकीचे वय ३० पेक्षा जास्त.
जर म चे वय ३० पेक्षा जास्त असेल तर मा चे वयही ३० पेक्षा जास्त असेल (अट ३), म्हणजे बाकी तिघी (मी मे मो) एकाच वयोगटात येतील. - हे शक्य नाही (अट ६)
म्हणून म चे वय ३० पेक्षा कमी असेल, मी चे वय ३० पेक्षा जास्त असेल (कारण १ तरी शिक्षिका तिशीच्या पुढची आहे).
म्हणजे मन्मथैवची वधू मीननयना आहे.
मी
१. नियोजित वधू ३० पेक्षा अधिक (२/५) वयोगटातील शिक्षिका (२/५) आहे.
२. म, मा एकाच वयोगटात असल्याने मी, मे पैकी त्यांच्या गटात नसणारी, नववधू आहे. (पर्याय मी/मे)
३. मो, मे चे व्यवसाय सारखे असल्याने नववधू मी, मा पैकी त्यांच्या गटात नसणारी आहे. (पर्याय मी/मा)
४. वरील २ व ३ वरून मीननयना जोशी हेच्याशी मन्मथैवचा वाङनिश्चय झाला.
(हीच नियोजित वधू मानायला हरकत नाही :) )
अवांतरः मन्मथैव चा अर्थ काय?
मन्मथैव
श्री. तो यांस
तुम्ही मन्मथैव या शब्दाचा अर्थ विचारला.
मन्मथैव=मन्मथ+एव. मन्मथ म्ह. मदन (मदनो मन्मथो मार:...अमरकोश). यावरून मन्मथैव =जणुकाही मदनच.
........यनावाला.
(ता.क. तुम्ही योग्य युक्तिवादासह अचूक उत्तर दिले आहे." मानायला हरकत नाही."या वाक्याशी मी असहमत आहे.तिथे "आहे' किंवा 'होय' असे हवे.)
मीननयना
१. मदालसा, मालविका एका वयोगटात (ममा गट) आणि मीननयना आणि मेघानंदा यांचे वयोगट भिन्न असल्याने या दोघींपैकी एक, ममा गटात. ममागटात आता तीन जणी असल्याने त्यांचे वय ३० हून कमी. पैकी मदालसा, मालविका नक्की बाद.
२. मोहमयी आणि मेघानंदा यांचा एक व्यवसाय (मोमे गट) आणि मालविका आणि मीननयना यांचे व्यवसाय भिन्न, मालविका आणि मीननयना यापैकी एक मोमेगटात त्यामुळे या गटात तीनजणी त्यांचा व्यवसाय बँक, येथे मोहमयी आणि मेघानंदा नक्की बाद.
३. दोन्ही गटांतून चारजणी बाद झाल्याने राहिली मीननयना जोशी, ३० वर्षांहून अधिक वयाची शिक्षिका, तिचा वाङनिश्चय मन्मथैवशी झाला.
असेच
असाच युक्तिवाद व उत्तर.
मीननयना
१. मोहमयी आणि मेघानंदा यांचा व्यवसाय एकाच प्रकारचा पण मालविका आणि मीननयना यांचे व्यवसाय भिन्न. त्यामुळे मोहमयी आणि मेघानंदा बँकेत. मदालसा, मालविका आणि मीननयना शिक्षिका.
२. मदालसा आणि मालविका एकाच वयोगटातील पण मीननयना आणि मेघानंदा यांचे वयोगट भिन्न. त्यामुळे मदालसा, मालविका आणि मेघानंदा ३० पेक्षा कमी. मीननयना आणि मेघानंदा ३० पेक्षा जास्त.
त्यामुळे उत्तर मीननयना.
तीचे आडनाव कसे काढायचे?
शीर्षकात ५ की ९?
लेखाचे शीर्षक तर्कक्रीडा ९ असे हवे होते का? का हेही एक कोडे आहे?
क्षमायाचना
मृदुला यांस,
तर्कक्रीडा ९ च्या ठिकाणी ५ पडणे हा माझ्या हातून मुद्रण दोष घडला. तरी क्षमस्व.
........यनावाला.
तर्क.९:उत्तर
मनीमाऊ(युक्तिवाद नाही),अमित,तो,प्रियाली,मृदुला आणि आवडाबाई यांचे 'मीननयना जोशी' हे उत्तर बरोबर आहे.प्रियाली यांचा युक्तिवाद प्रभावी असून तो वाचता वाचता पटत जातो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.!
........यनावाला