कमांडर दिलीप दोंदे - सागर परीक्रमा

भारतीय नेव्हीतील कमांडर दिलीप दोंदे (वय ४२ वर्षे) ह्यांना त्यांनी पुर्ण केलेल्या सागर परीक्रमाबद्दल एका परीसंवादात ऐकण्याची संधी मिळाली. त्यांनी सांगितलेल्या माहीतीचा थोडक्यात सारांश खाली दिला आहे. अधिक माहीती त्यांच्या अनुदिनीवर आहे. ह्या अवघड कामगिरीला पार पाडण्यात त्यांच्या आईने त्यांना सतत प्रोत्साहन दिले व ते त्याबद्दल आईचे आभार मानतात.

५ वर्षांपुर्वी नेव्हीने सर्कमनेव्हीगेशन (सागर परीक्रमा) उपक्रम आखला असल्याची माहीती त्यांना मिळाली व तो उपक्रम ते करण्यास उत्सुक आहेत का, ह्याबद्दल त्यांना विचारणा करण्यात आली. त्यांनी तत्काळ होकार दिला व अशी सफर कशी करतात, त्यातले नियम काय आहेत ह्याबद्दल माहीती आंतर्जालावरुन मिळवयला सुरुवात केली. माउंट एव्हरेस्ट ५००० पेक्षा जास्त लोकांनी चढला आहे तर असे सोलो सर्कमनेव्हीगेशन फक्त १७५ लोकांनी केले आहे. ह्यातही दोन प्रकार आहेत- थांबत आणि न थांबता पुर्ण केलेली. ह्यात दुसऱ्या प्रकारात आणखीनच कमी लोक आहेत. त्यामुळे अशा असामान्य आणि कमी संख्या असलेल्या लोकांच्या समुहात आपलेही नाव असावे असे त्यांना मनापासुन वाटायला लागले.

तांत्रिकदृष्ट्या सागर परीक्रमा म्हणजे नक्की काय हे सर्कमनेव्हीगेशनच्या व्याख्येत वाचायला मिळते. सागर परीक्रम करु शकेल व सागरपरीक्रमेचे नियम पाळू शकेल अशी नौका नेव्हीकडे नव्हती त्यामुळे उपक्रमाची सुरुवात अशी नौका तयार करण्यापासुन सुरवात झाली. ही परीक्रमा एका वाऱ्याच्या शिडाने गती मिळणाऱ्या नौकेनेच करायची असते. इंजिनचा उपयोग फक्त बॅटरीसंच रीचार्ज करण्यासाठीच व बंदरातून समुद्रात जाण्यासाठीच वापरायचा असतो. त्यासाठी त्यांनी अडमिरल आवटी ह्यांच्या मदतीने एक डच डिझाइन निवडले व मांडवी नदीतीरी ह्या नौकेची उभारणी सुरु केली. मांडवी नदीच्या नावावरुनच ह्या नौकेचे नाव त्यांनी म्हादेइ ठेवले.
१५ महीन्यांच्या अथक श्रमांनंतर त्यांनी ही नौका बनवुन घेतली व त्यावर अत्याधुनिक उपकरणे बसवली. ही नौका एका मराठी माणसानीच तयार केली आहे. चाचणी घेण्यासाठी सुरुवातील कोलंबो, नंतर मॉरीशसला जाऊन तेथून येतांना एकटे परत आले. ह्या बद्दलची माहीती त्यांच्या अनुदिनीवरच वाचावी.

सागर परीक्रमा एकुण ५ टप्प्यात आखली गेली. त्यासाठी पृथ्वीगोलाच्या दक्षिण गोलार्धाची निवड करणे सर्कमनेव्हीगेशनच्या नियमांनुसार ठरले. पहील्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाला, मग न्युझीलंड, फॉकलंड, साऊथ आफ्रिका आणि मग मुंबई असे ५ टप्पे ठरले व १८ ऑगस्ट २००९ ला मुंबईहून सुरुवात केली. ह्या प्रत्येक टप्प्यात त्यांना आलेल्या अडचणींची, वादळ, वारे, ९ मीटर ऊंचीच्या लाटांना, ई. तोंड देत त्यांनी एकट्याने जे कौशल्य, शारीरीक आणि मानसिक कणखरपणा दाखवला त्याबद्दल त्यांनी लिहीलेल्या अनुदिनीवर वाचायला मिळते. ही अनुदिनी त्यांनी प्रवासात असतांनाच लिहिली. इंटर्नेट सुविधा व उपग्रहीय फोनसेवेमुळे त्यांना रोज जगाशी संपर्क साधता येत असे.

सोबत नेलेल्या खाण्याच्या पदार्थात त्यांच्या आईने कामगिरी निघण्यापुर्वी अनेक प्रयोग करुन ३ महिने टिकेल असे खाद्यपदार्थ घरी करण्याचा प्रयत्न केला. ह्याबरोबरच त्यांनी हवाबंद डब्यातील अन्नही नेले होते. प्रत्येक टप्प्या्चा शेवट ज्या बंदरावर व्हायचा तेथे नेव्हीतील सहकारी त्यांना भेटून रसद पुरवीत.
प्रवासातील काही काही दिवस खूप तणावपुर्ण असायचे, त्यांना एकमेव भीती असायची की, जर ते चुकून पाण्यात पडले व नौका निघुन गेली तर काय! त्यामुळे ते वादळवाऱ्यात, खवळलेल्या समुद्रातून नौकेवर वावरतांना स्वतःला नौकेला बांधून ठेवून, रांगत जात. ऑटोपायलटमुळे त्यांना नौका चालवण्याशिवायची कामे करता यायची.
ते ज्या-ज्या ठिकाणी गेले त्याठिकाणच्या नेव्हीने त्यांचे आदराने स्वागत केले व माणसाच्या चांगल्या स्वभावाचे जागोजागी दर्शन घडले. त्यांची नौका पहाण्यास अनेक लोक खूप उत्सुकता दाखवत.

मे १८, २०१० रोजी ते मुंबईला परतले. दुर्देवाने ज्यादिवशी ते परतले त्यादिवशी मंगलोरचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले व ही बातमी झाकोळली गेली व अनेक सामान्य माणसांना ह्याबद्द्ल कळलेही नाही.

त्यांचे भाषण झाल्यानंतर त्यांना अनेकांनी प्रश्न विचारले. अगदी मुद्देसुद व नेमकी उत्तरे देत त्यांनी कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेला. शेवटी त्यांना विचारले गेले, "आम्हाला तुमच्याकडून प्रेरणा मिळतेच आहे, पण एखादे प्रेरणावाक्य सांगायचेच झाले तर तुम्ही काय सांगाल?", त्यांचे उत्तर- "कार्य सफल करण्यासाठी उठा आणि प्रथम कामाला लागा!" हे होते.

त्यांची अनुदिनी- http://sagarparikrama.blogspot.com/

लेखनविषय: दुवे:

Comments

कमांडर दिलीप दोंदे यांचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.

TIMES OF INDIA ह्या वृत्तपत्राने घेतलेली दखल.

कमांडर दिलीप दोंदे यांचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.

+१

सहमत आहे.

||वाछितो विजयी होईबा||

अजून

सुंदर ओळख पण तुमीच त्यांच्या अनुदिनीवरचे काही लिखाण अनुवाद करून का देत नाही?
काही किस्से वाचायला आवडतील.

मे १८, २०१० रोजी ते मुंबईला परतले. दुर्देवाने ज्यादिवशी ते परतले त्यादिवशी मंगलोरचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले व ही बातमी झाकोळली गेली व अनेक सामान्य माणसांना ह्याबद्द्ल कळलेही नाही.

सहमत आहे. अनेकदा वाहिन्या ' काय खपेल तेच दाखवा' अशाच वागतात. शिवाय त्यांचे आडनावही कपूर किंवा खन्ना वगैरे नाही.

आपला
गुंडोपंत

आडनाव

शिवाय त्यांचे आडनावही कपूर किंवा खन्ना वगैरे नाही.

आणि मल्होत्रा, वर्मा, शर्मा आणि विशेषतः मिश्रा/शुक्ला नाही.

||वाछितो विजयी होईबा||

अरे वा!

सोलो सर्कमनेव्हीगेशन २०१० मधे बरेच वेळा ऐकण्यात आले. दोंदे यांच्या पाच दिवस आधी १४ मे २०१० ऑस्ट्रेलियन १७ वर्षीय युवती जेसीका वॅटसन हिने २१० दिवसात ही परिक्रमा करुन सोलो सर्कमनेव्हीगेशन करणारी सर्वात तरुण व्यक्ती म्हणून विक्रम नोंदवला. याच वर्षी बहुतेक् डच कोर्टाने एका १३ का १४ वर्षीय मुलीला अशी परिक्रमा करायला मनाई केली व १६ वर्षीय ऑस्ट्रेलियन मुलगी ऍबी संदरलँड हिची बोट हिंद महासागरात निकामी झाल्याने तिचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

कमोडोर दोंदे यांच्या साहसाची व परिश्रमाची दाद द्यावी तितकी थोडीच. अतिशय अवघड असा हा प्रवास!

अजुन येऊ द्यात!

लेख चांगला आहे! अजुन येऊ द्यात!

 
^ वर