भाषेच्या प्रमाणीकरणाबद्दल विवाद नव्या समाजव्यवस्थेचे द्योतक आहे

मागच्या आठवड्यात समाजाच्या "सुमारीकरणा"बद्दल उपक्रमावर चर्चा झाली. चर्चेत उल्लेख आला की मराठी भाषे प्रमाण बोली आणि प्रमाण लेखनपद्धतीचा ढळतो आहे. तुलना म्हणून इंग्रजीभाषक देशांतल्या प्रमाणित इंग्रजीबद्दल उल्लेख आला. असे निदर्शन करण्यात आले - इंग्रजी भाषेच्या प्रमाण बोलीचा उपयोग आणि प्रमाण लेखन-नियमांचा उपयोग वर्तमानपत्रांत आणि बिगर-ललित साहित्यात होतो, त्याबद्दल कोणाचा विरोध नसतो. मराठीमध्ये मात्र विरोध-विवाद दिसतो. त्या चर्चेची दिशा अशी होती, "मराठी समाजास दुय्यम दर्जाच्या सुमार शिक्षणाचे कोडकौतूक फार होते आहे, तसे इंग्रजीभाषकांत होत नाही". यात इंग्रजी आणि मराठी भाषांच्या इतिहासाबद्दल अदूरदृष्टी आहे, असे मला वाटते. ते असे :

इंग्रजीबद्दल
येथे आठवण्यालायक गोष्ट आहे - इंग्रजीचे तरी प्रमाणीकरण कसे झाले? (पुढील परिच्छेदासाठी मी "स्टँडर्डायझेशन ऑफ इंग्लिश" येथून माहिती घेतलेली आहे.) इंग्रजीचे प्रमाणीकरण होण्याकरिता इंग्रजी बोलणार्‍यांचे राज्य स्थिर व्हावे लागले. हे काही एका रेषेत झाले नाही.
पहिला टप्पा - जुने प्रमाणीकरण : इसवीसनाच्या ७व्या-८व्या शतकानंतर अँग्लोसॅक्सन राजा ऍल्फ्रेड याच्या कारकीर्दीच्या आसपास इंग्रजी भाषेचे एक प्रमाण स्वरूप घडू लागले होते. या राजाने सरकारी कागदपत्रे लॅटिनमध्ये न लिहिता इंग्रजीमध्ये लिहावी, यावर भर दिला. यावेळी बहुतेक लेखन वेसेक्स भागातली बोली प्रमाण होऊ लागली होती.
दुसरा टप्पा - र्‍हास आणि दु:स्थिती : फ्रान्स मधून आलेल्या नॉर्मन टोळ्यांनी इसवीसनाच्या ११व्या शतकात इंग्लंड जिंकले. यानंतर कागदपत्रे फ्रेंच-लॅटिन-इंग्लिशच्या वेगवेगळ्या बोलींत लिहिली जात होती.
तिसरा टप्पा - हल्ली चालू असलेले प्रमाणीकरण : १४व्या शतकानंतर इंग्रजी बोलणार्‍यांची सद्दी पुन्हा सुरू झाली. यात पूर्व मिडलंड भागातला व्यापारी वर्ग मोठा बलवत्तर होता. यांचा संवाद इंग्रजीच्या ईस्ट मिडलंड बोलीत होई. शिवाय याच मिडलंड भागात व्यापाराची/विद्यादानाची केंद्रे होती : लंडन-ऑक्सफोर्ड-केंब्रिज हा त्रिकोण. इंग्लंडातल्या सर्व प्रांतातले अभिजन येथे व्यापारासाठी आणि शिक्षणासाठी येत. त्यांनी संवादात आपल्या प्रांतीय बोलीचे अंश आणले, पण मिडलंड बोलीचा मोठा भाग स्वीकारला. येथे मानले पाहिजे, की प्रमाणीकरणाचा कायदा नव्हता, तर समाजातील धनाने किंवा मानाने वरचढ असलेल्या लोकांच्या संवादातून ती उद्भवली. फ्रेंच भाषेच्या प्रमाणीकरणाकरिता एक सरकारी संस्था आहे, तशी संस्था इंग्रजीसाठी कधीच बनू शकली नाही. अभिजनांची बोली ती प्रमाण. मात्र वेगवेगळ्या अभिजनांच्या बोलींमध्येही फरक फार होते. खुद्द शेक्सपियरच्या लिखाणात शब्दांची स्पेलिंगे बदलतात, काही व्याकरणातले फरक येतात. एका व्यक्तीच्या अंतर्गतच जर फरक दिसतो, त्यापेक्षा पुष्कळ अधिक फरक भिन्न लोकांत दिसत.

येथे काही लोकांनी आणि संस्थांनी प्रमाणीकरणाचा हक्क आपणहोऊन अंगावर घेतला. हे प्रमाणीकरण व्याकरणाचे होते, तसेच शुद्धलेखनाचेही होते. जॉनसनने सर्व इंग्रजी शब्द सामावण्याची महत्त्वाकांक्षा असलेला शब्दकोश लिहिला, त्यापूर्वी असा कुठला संदर्भ उपलब्ध नव्हता. ऑक्स्फोर्ड विद्यापीठातील विद्वानांनी शब्दकोश लिहावयास घेतला. त्यांच्या विद्वत्तेच्या दबदब्यामुळे त्यांना "कायदे" करता आले. यात एक गमतीदार गोष्ट झाली, ती शुद्धलेखनाबाबत. इंग्रजी स्पेलिंगे ही पूर्वीच्या काळच्या उच्चाराला अनुसारतात. त्या काळात उच्चार ऐकून वाटेल तसे स्पेलिंग लिहीत - वेगवेगळे लोक वेगवेगळी स्पेलिंगे लिहीत. (येथे "शेक्स्पियर" शब्दाच्या स्पेलिंगांबद्दल गंमत बघावी - विशेष कठिण आणि ओबडधोबड उच्चार असल्यामुळे त्याची खूपच स्पेलिंगे होती.) कठिण शब्द सोडा. सोप्या शब्दांची फार वेगळी स्पेलिंगे होत नसत. उत्तमोत्तम लेखकांनी उच्चारानुसार स्पेलिंगे अंगीकारली, ती वाचकांनी "प्रमाण" मानली. मात्र त्याच्या पुढच्या काही शतकांत (१४५०-१७५०) काळात इंग्रजीच्या उच्चारांत फार मोठी उलथापालथ झाली - याला म्हणतात "ग्रेट व्हावेल शिफ्ट". अनेक शब्दांचे उच्चार आणि हेल बदलले.

"इंग्रजी लेखन उच्चारानुसारी नाही?" असा प्रश्न मनात येताच "कधीची इंग्रजी" हा विचार मनात यावा. काही का असेना, तेव्हा प्रमाण केलेली स्पेलिंगे हल्लीच्या इंग्रजी उच्चारांच्या अनुसार नाहीत. पण तोवर मिडलंड बोली बोलणारे व्यापारी आणि अभिजन -> उत्तम साहित्यिक -> शब्दकोश लिहिणारे यांनी प्रमाणीकरण जवळजवळ पूर्ण केले होते.

आता येथे सांगणे आलेच, की त्या काळात इंग्लंडात निरक्षरतेचे प्रमाण फार होते. (१९०० काळच्या कादंबर्‍यांमध्ये आपल्याला हे वाचायला मिळते.) १८७६ मध्ये जरी प्रौढांपैकी पूर्ण-निरक्षरांची संख्या "केवळ ~२०%" होती (पीडीएफ दुवा), तरी बहुजन समाजातील बहुतेक लोकांना फक्त हळूहळू अक्षरे जुळवता येत - मजकूर वाचता येत नसे. ज्या अभिजनांनी आपल्या बोलीचे प्रमाणीकरण केले, त्या बोलीबद्दल आणि प्रमाणीकरणाबद्दल मत व्यक्त करायला बहुजन समाज समर्थच नव्हता. औद्योगिकीकरण, शिक्षणाचा प्रसार, वसाहतवाद वाढून इंग्रजी भाषा अधिकाधिक लोक शिकू लागले, तोवर अभिजन समाजाचे प्रमाण व्याकरण दगडावर कोरून स्थिर झाले होते. कुठल्यातरी भलत्याच उच्चारांना अनुसरणारे शुद्धलेखनही प्रमाण झाले, त्याला कुठला आधुनिक ताळमेळ नव्हता. येथे लोकशाही नव्हती. मात्र ज्यांच्यापाशी सत्ता होती त्यांच्यात्यांच्यात मुक्त बाजार होता खरा - म्हणजे कोण्या एका व्यक्तीचा मक्ता नव्हता. (कदाचित असेल तर जॉनसनचा असेल.) अमेरिकन इंग्रजी बोलणारा समाज मुळात इंग्लंडमधून स्थलांतरित मर्यादित उपसमाज होता. इंग्लंडात आहे, तशी बोलींची रेलचेल अमेरिकेत नाही. इंग्लंडातल्या अभिजनांच्या बोलीशी या समाजाचे काही वाकडे नव्हते. बिगर-इंग्रजी आगंतुकांनी ही भाषा परभाषा म्हणून आत्मसात केली, आपलीशी केली.

इंग्रजीबाबत सारांश : हे लक्षात येईल, की इंग्रजीचे प्रमाणीकरण होण्यासाठी जी परिस्थिती आवश्यक होती त्याचे अंश असे - (१) इंग्रजीभाषकांकडे सत्ता, (२) एका प्रदेशात सत्तेचे केंदीभवन, (३) निरक्षरतेमुळे बहुजनांची "कुठली बोली निवडावी" याबाबत अनास्था, (४) शेकडो वर्षे अवधी.
- - -

मराठीबद्दल
मराठीच्या विकासातही असे टप्पे दिसतात. (मराठीच्या पहिल्या तीन ऐतिहासिक टप्प्यांसाठी संदर्भ राजारामशास्त्री भागवत यांचे लेख आहेत. बाकी काही माहिती प्रा. अशोक केळकर यांच्या लेखांतले आहेत.)
(पहिला टप्पा) यादवकालीन विकास. मराठवाड्यातील बोली प्रमाण होऊ घातली होती.
(दुसरा टप्पा) मुसलमान अमलात मराठीचा र्‍हास. कागदपत्रे फारसीमध्ये.
(तिसरा टप्पा) शिवशाही आणि पेशवाई. शिवाजीराजाने मराठीत सरकारी कागदपत्रे लिहायचा नियम केला. प्रमाणीकरण एका व्यक्तीच्या हातात दिले (नाव बहुधा "हणमंते" आहे, माहीतगारांनी सुधारून सांगावे). सत्तेचे केंद्र सातारा-कोल्हापूर-पुणे अशा भागात राहिल्यामुळे प्रमाणबोली ही दक्षित महाराष्ट्राकडची झाली. विशेषतः पुण्याच्या आजूबाजूच्या बोलीचा प्रभाव फार. त्यातल्या त्यात सुशिक्षित फक्त ब्राह्मण होते, त्यांच्या घरगुती बोलीचा प्रमाणबोलीवर प्रचंड परिणाम झाला. "घरगुती बोली" कशी काय? अशिक्षित असलेल्या ब्राह्मण स्त्रिया सुद्धा शतकापूर्वी पुण्यात हीच बोली बोलत.
(चवथा टप्पा) सत्ता नसली तरी प्रमुख औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रे मुंबई-पुणे येथे राहिली. लेखन बहुतेक करून आदल्या प्रमाणबोलीतच होत राहिले.
*मध्येच मराठी-वगैरे भाषांच्या लेखनाबद्दल हे लक्षात घ्यावेसे वाटते - यांचे लेखन बर्‍याच प्रमाणात उच्चारानुसारी आहे. १८व्या-१९व्या शतकात "शुद्धलेखनाचे" कितपत प्रमाणीकरण होते, ते कुणी केले याबद्दल माहीतगारांनी भर घालावी.
(पाचवा टप्पा) स्वातंत्र्योत्तर काळात लवकरच मराठी राज्यभाषा असलेला प्रांत तयार झाला. बहुजन समाजाची साक्षरता झपाट्याने वाढली. काही दशकांतच साक्षरता वाढण्याचे - साक्षरसमाज रुंदावण्याचे - असे उदाहरण आपल्याला युरोपात-इंग्लंडात सापडणार नाही. लोकशाहीच्या चौकटीमध्ये प्रमाणीकरण समित्या लोकांनी निवडलेल्या सरकारने नेमल्या. *पुन्हा येथे लक्षात घेतले पाहिजे, की मराठीचे प्रमाणलेखन काही प्रमाणात उच्चारानुसारी ठेवण्याचा कल या समितींनी घेतलेला आहे.

इंग्रजीच्या प्रमाणीकरणाच्या परिस्थितीबाबत आणि मराठीच्या परिस्थितीबाबत काही ठळक फरक दिसतात.
(१) सत्तेचे एका प्रदेशात केंद्रीभवन असलेली बरीच सलग शतके मराठीला मिळालेली नाहीत.
(२) मधल्या इंग्रज अमलात काय झाले? अभिजनांची भाषा बोलल्याशिवाय व्यापार करता येत नाही, उच्चशिक्षण घेता येत नाही, म्हणून अभिजनांनी प्रमाण मानलेली रूपे शिकलीच पाहिजे, अशी आर्थिक परिस्थिती नव्हती. (याबद्दल दु:ख वाटावे की नाही - माहीत नाही.)
(३) शासकीय सत्ता प्राप्त झाल्यानंतर शिवशाही-पेशवाईत प्रमाणीकरण करणार्‍या उपसमाजाकडून सत्ता अतिशय थोड्या काळात अन्य समाजांकडे गेली. इंग्रजीला बहुजन-अनास्थेची बरीच शतके प्रमाणीकरणासाठी मिळाली, ती मराठीला मिळालेली नाहीत. (यात विशेष दु:ख करण्यासारखे काही नाही.)
(४) "ग्रेट व्हावेल शिफ्ट"सारखी कुठली विचित्र घटना मराठीत घडलेली नसावी. "लेखन उच्चारानुसारी नाही" असे इंग्रजीभाषकांना पटणे फार सोपे. मूळ मिडलंड प्रदेशातली बोली घरात न बोलणार्‍यांना तर हे पटणे फारच सोपे. मराठी लेखन मात्र अजून बरेचसे उच्चारानुसारी आहे. ते मुळी उच्चारानुसारी नाही, घोकून शिकले पाहिजे, असे शैक्षणिक धोरण अजूनतरी उपयोगाचे नाही, असे माझे मत आहे. (यात विशेष दु:ख करण्यासारखे काही नाही.)
{"शिफ्ट"बाबत काही प्रमाणात मी खुद्द साशंक आहे. मराठीत बहुधा "अनुनासिक/अंत्यस्वर संक्रमण" झाले, ते "महान" असू शकेल. अनेक अनुनासिके गेल्या शतकात नाहिशी होऊन पुण्याची बोलीसुद्धा बरीचशी निरनुनासिक झालेली आहे, आणि अंत्य 'ए'कार जाऊन त्या ठिकाणी दीर्घ 'अ'कार आलेला आहे. कदाचित ही दक्षिण महाराष्ट्रातल्याच बहुजनांनी दक्षिण महाराष्ट्रातील प्रमाणबोलीला दिलेली भेट आहे.}
- - -

या विश्लेषणास पोषक अशी भारतीय भाषांची आणखी उदाहरणे द्यावीशी वाटतात. (१) दीर्घ साम्राज्य/सत्ता असल्यामुळे १३व्या शतकात जी ग्रांथिक तेलुगू बोली प्रमाण झाली, ती हल्लीहल्लीपर्यंत लेखी, साहित्यिक प्रमाण म्हणून टिकली आहे. (म्हणजे शिवशाही/पेशवाईतील प्रमाणित झालेली मराठी बोली आतापर्यंत टिकली तशी.) मात्र स्वातंत्र्योत्तर काळानंतर विजयवाडा परिसरातील अभिजनसमाजाची बोली एक नवे प्रमाण म्हणून होऊ घालत आहे. (२) स्वातंत्र्योत्तर-ब्राह्मणविरोधी सत्तेनंतर संस्कृतोद्भव शब्द गाळलेली तमिऴ बोली (हीसुद्धा विशिष्ट उपसमाजाचीच) प्रमाण झाली. (३) फारसी शब्दांची पखरण असलेल्या हिंदुस्थानी बोलीच्या ठिकाणी संस्कृतप्रचुर केलेली खडी बोली हिंदीमध्ये प्रमाण झालेली आहे. हे सर्व "सत्तांतरात कोण वरचढ झाले" यावर अवलंबून आहे. यात लोकशाहीमधले डावपेच आहेत.
- - -

प्रमाणीकरणाबद्दल माझे मत मी अन्यत्र दिलेलेच आहे. दूरपर्यंत व्यापार, माहितीचा प्रसार करणारी पत्रकारिता, भरपूर साहित्याचे लेखन-वाचन, शालेय शिक्षणासाठी उत्कृष्ट पाठ्यपुस्तकनिर्मिती, या सर्वांसाठी मोठे क्षेत्र असल्यास बरे. हे सर्व करण्यासाठी संपर्कबोली असल्यास फार सोयीचे. हीच प्रमाणबोली. दस्तऐवजांसाठी प्रमाण असे प्रमाणलेखन उपलब्ध असणेसुद्धा सोयीचे. आता हे प्रमाण म्हणून कुठली बोली निवडावी? याबद्दल मला अंततोगत्वा ठाम मत नाही. परंतु हल्ली प्रमाणित झालेली शिवशाही-पेशवाईतली बोली अधिक समावेशक करण्यासाठी त्या मानाने कमी प्रयास लागतील. खर्च कमी लागेल. यात अस्मिताभंगही फार नाही. फुले किंवा अंबेडकरांनी प्रमाणित मराठी बोलीत बहुजनांची अस्मिता वधारली, घटवली नाही. प्रमाणित बोलीवर प्रभुत्व मिळवले, की ती मुळातल्या उपसमाजापेक्षाही अधिक "आपली" होऊ शकते. जाचक राहात नाही. हा हिशोब सर्वात फायदेशीर आहे मी लोकांना पटवले पाहिजे. नाहीतर अन्य कोणी मला (आणि अन्य लोकांना) पटवले पाहिजे. हीच लोकशाही. येथे कुणी राजा आल्फ्रेड, डॉक्टर जॉनसन, किंवा ऑक्स्फोर्ड विद्यापीठ स्वतःहून प्रमाणीकरणाचा हक्क घोषित करू शकत नाही.

- - -
चर्चेचा विषय असा : माझे मत आहे "इंग्रजी किंवा संस्कृतसारखे प्रमाण मराठीत सहजच सर्वमान्य का होत नाही?" हा प्रश्न ऐतिहासिक विचाराअंती योग्यच नाही. काही शतके जाऊद्या. लोकशाही सत्तेच्या चौकटीत प्रमाणित झालेल्या भाषांची २५-१०० रूपे आपल्याला भारतात बघायला मिळतील. ही सर्व रूपे इंग्रजीच्या ऐतिहासिक अनुभवापेक्षा वेगळी असतील. बहुधा व्यापार-शासन-उच्चशिक्षण-कवन या चौकडीच्या बाजाराचा रेटा हे रूप बनवण्यात बलवत्तर असेल. मराठी राज्यभाषा प्रमाणीकरण समित्यांनी या प्रवाहाचा विरोध करू नये. अलगद - देता येईल तितकी - दिशा द्यावी. तुमचे मत काय आहे?

लेखनविषय: दुवे:

Comments

माहितीपूर्ण लेख

माहितीपूर्ण लेख, धन्यवाद.

खूपच प्रयासा-अंती माहिती मिळवली आहे असे दिसते, एवढे प्रयास मी घेतले नाहीत, पण लेखावरील माझे एक मत तरीही मी देतो आहे.


लोकशाही सत्तेच्या चौकटीत प्रमाणित झालेल्या भाषांची २५-१०० रूपे आपल्याला भारतात बघायला मिळतील. ही सर्व रूपे इंग्रजीच्या ऐतिहासिक अनुभवापेक्षा वेगळी असतील. बहुधा व्यापार-शासन-उच्चशिक्षण-कवन या चौकडीच्या बाजाराचा रेटा हे रूप बनवण्यात बलवत्तर असेल. मराठी राज्यभाषा प्रमाणीकरण समित्यांनी या प्रवाहाचा विरोध करू नये. अलगद - देता येईल तितकी - दिशा द्यावी.

---अलगद देता येईल अशी दिशा हे खूपच मोघम आहे. माझे मत आहे कि प्रमाणीकरण हे करायलाच हवे. आता ज्याप्रमाणे कायदे-पंडित कायदे बनवतात व ते समाजात रूढ देखील होतात(किवा क्वचित काही कायद्यांमध्ये बदल केला जातो..(खरे खोटे माहित नाही, कदाचित केला जात असावा)), त्याचप्रमाणे भाषा-पंडित एकत्र येऊन प्रमाण भाषा बनवू शकतात जी कालान्वाये समाजात रूढ होऊ शकते, हे प्रमाण अमुक एका समाजाशी किवा जागेशी संबंधित नसावे तर ते भाषा-शास्त्राने ठरविलेल्या काही नियमांना अनुसरून व जनमानस लक्षात घेऊन तयार केले जावे. सर्व क्लिष्ट बाबी लक्षात घेता कदाचित कायदा बनवणे सोपे असू शकते पण भाषा प्रमाण करणे दुरापास्त असे वाटू शकते, पण ते करणे हे भाषा आणि समाजहिताचे असेल.

आपल्या शासनव्यवस्थेत

प्रमाणित प्रयोगांमुळे व्यापार, पत्रकारिता यांची सोय होते (समाजहित आहे) याबाबत माझे मत लेखात दिलेलेच आहे, सहमती आहेच. प्रमाणीकरण करणार्‍या समित्या शासन नेमतेच. (तुम्ही म्हणता त्याच प्रकारे भाषा पंडित एकत्र बसवते.) पण निर्माण केलेल्या प्रमाणाचे पालन करवून घेण्याचा त्यांचा अधिकार मर्यादित आहे. या अधिकारशून्यतेला महत्त्वाचे अपवाद आहेत :

१. एका क्षेत्रात प्रमाण वाक्प्रयोगांबद्दल अधिकार गाजवता येतो, ते क्षेत्र महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षण आणि शासकीय परीक्षा.
२. आणखी एक क्षेत्र म्हणजे राज्यशासनाच्या नोकरांचा अंतर्गत पत्रव्यवहार.

आपण नागरिकांनी निवडून दिलेले महाराष्ट्र शासन या दोन्ही क्षेत्रांत प्रमाणित प्रयोगांबाबत आग्रह करतेच. काही काळ तरी महाराष्ट्र शासनाकडे नोकरी केल्यामुळे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. माझी मावशी महाराष्ट्रात शाळाशिक्षिका होती. राज्य सरकारने नेमलेल्या समितीने प्रमाण केलेले शुद्धलेखन शाळेत शिकवले पाहिजे, असे धोरण असल्याबद्दल मी तिच्याकडून ऐकलेले आहे.

आता शाळेत शिक्षण पुरवण्यात कमतरता आहे, हे खरे. गणिताच्या शिक्षणातही कमतरता आहे. शालेय शिक्षणाचा सर्वांगीण विकास कसा करावा, हा मुद्दा वेगळ्या व्यापाचा आहे.

मात्र नागरिकाने शासनाशी केलेल्या पत्रव्यवहाराबाबत शासन प्रमाणित शब्दप्रयोगांबाबत हेका करू शकत नाही. नाहीतर उद्या एखादी व्यक्ती "माझ्यावर बलाक्तार झाला" अशी लेखी तक्रार करेल, आणि पोलीस "अशुद्धलेखन अमान्य" म्हणून गुन्ह्याचा तपास करण्यास नकारेल! आणि प्रमाणित प्रयोग केला नाही, तर व्यापार ठप्प करावा, असे बंधनसुद्धा व्यवहार्य नाही. किराणा व्यापारी किंवा ग्राहक "शाबूदाना" म्हणाला, म्हणून उपासाच्या दिवशीची ही खरेदी-विक्री थांबणार आहे का? एखादे वर्तमानपत्र अप्रमाणित प्रयोग करते, म्हणून शासन त्याला दंड करू शकते का? नाही. आणि नागरिकां-नागरिकांमधील खाजगी संवादामध्ये तर शासनाची लुडबूड मुळीच चालायची नाही.

आपल्या समाजव्यवस्थेत अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक नागरिकाला शासनाला दिशा देण्याचा समान अधिकार आहे. ही स्वातंत्र्ये सांभाळून बरेच कायदे बनतात, नाही का? पुष्कळदा व्यापार-माध्यमे-कला या माध्यमांतून समाज रेटला जातो. अशा परिस्थितीत जुलुमी सत्ताधीशांकडून रेटलो गेलो, असे मानले जात नाही. मग ही स्वातंत्र्ये सांभाळून, व्यापार-माध्यमे-कला यांच्या रेट्याचा सुयोग्य उपयोग करून जर प्रमाणीकरण झाले तर तसे आपल्याला हवे आहे.

सहमत

प्रथम सहमत आहे हे सांगतो.

माझा आधीचा प्रतिसाद हा बोली भाषेला प्रमाणित करण्याबद्दल नव्हताच, मी सामाजिक माध्यमांमध्ये,शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा कोणच्याही लिखित स्वरूपाच्या व्यवहारामध्ये भाषा प्रमाणित करणे सक्तीचे करावे किवा त्यास रेटा द्यावा असे होते, जे आपण म्हणल्याप्रमाणे सरकारी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राबवले जाते.

सक्ती ह्यासाठी असावी कारण हि माध्यमे (वृतपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी) सामान्य लोकांसाठी भाषेचे स्त्रोत आहेत, त्यामध्येदेखील जर प्रमाण भाषा वापरली गेली नाही तर हळू हळू भाषा लोप पावेल असे मला वाटते, निदान भाषा भ्रष्ट होईल असे वाटते.

पण अगदीच आपण म्हणत आहात असे पहिले तर इंग्रजी देखील दैनंदिन व्यवहारात प्रमाणित आहे असे म्हणता येणार नाही, सरकारी कामकाज, शाळा, नाटक (अपवाद वगळता) सोडल्यास प्रमाण बोली भाषा कुठेच आढळत नाही. तोच अनुभव इतर भाषांबाबत असावा असे वाटते. संस्कृत ज्या काळी बोली भाषा असेल त्यावेळी देखील ती सर्वदूर प्रमाणित वापरली जात असेल असे वाटत नाही, किंबहुना ती प्रमाणित वापरली गेली नसल्यामुळे संस्कृतोद्भव प्राकृतचा जन्म झाला असावा.

मग ही स्वातंत्र्ये सांभाळून, व्यापार-माध्यमे-कला यांच्या रेट्याचा सुयोग्य उपयोग करून जर प्रमाणीकरण झाले तर तसे आपल्याला हवे आहे
:) एकदम मान्य.

शासकीय शाळांमधील प्रमाण लेखनाचा आग्रह?

माझी मावशी महाराष्ट्रात शाळाशिक्षिका होती. राज्य सरकारने नेमलेल्या समितीने प्रमाण केलेले शुद्धलेखन शाळेत शिकवले पाहिजे, असे धोरण असल्याबद्दल मी तिच्याकडून ऐकलेले आहे.

माझ्या माहितीप्रमाणे हा नियम आता अस्तित्वात नाही. वर्गातल्या फळ्यावर (शिक्षिकेकडूनच) अप्रमाण लेखन तर मी पुण्यातल्या शासकीय शाळांतही नियमित पाहिले आहे. माझी माहिती चूक असल्यास सांगावे. मला आनंदच होईल.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

शिक्षका-शिक्षकांमध्ये फरक

येथे शिक्षका-शिक्षकांमधील नियम पाळण्यात फरक असू शकते.

ज्या शाळा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती)ने प्रकाशित केलेली पुस्तके वापरतात, त्यांनी त्या पाठ्यपुस्तकांमधील भाषिक प्रयोग वापरावेत, असे अध्याहृत असते. या अध्याहृत विचाराला "नियम" म्हणणे वावगे नाही. काही शिक्षकांकडून पाठ्यपुस्तकातले प्रयोग वापरले जात नाहीत. तसेच काही शिक्षक फळ्यावरती गणित करताना चुका करतात.

आता कुठल्या चुकीबद्दल शिक्षकाला काय दंड द्यावा, त्याबाबत नियम नसावा. म्हणजे कुठली चूक केली तर मुख्याध्यापकाने शिक्षकावर कारवाई करावी. नोकरीतून बडतर्फ करण्याइतपत, किंवा नोकरी नकारली जाण्याइतपत पाठ्यपुस्तकापेक्षा फरक म्हणजे किती? हे शाळा-व्यवस्थापनाचे प्रश्न आहेत. जर शाळांमध्ये शिक्षकांची चणचण फार भासत असेल, तर नोकरी देण्यासाठी किंवा बडतर्फीसाठी गुन्हा फार मोठा असावा लागेल. बाजारात शिक्षक सहज मिळत असतील तर निवड/बडतर्फीसाठी व्यवस्थापन अधिक निकष वापरू शकते.

"शाळेत फळ्यावर चूक केलेली दिसली" यावरून "नियम नाही" हे सिद्ध होत नाही.

माझी मावशी सध्या निवृत्त आहे. परंतु तो विषय संवादात निघण्याचे कारण असे (संवाद ९०च्या दशकात झाला) : त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांमध्ये "आशीर्वाद" असे लिहावे की "आशिर्वाद" याबाबत वाद होता. शेवटी शिक्षका-शिक्षकांनी मिळून शुद्धलेखनाचे घोषित नियम तपासले. (त्यात "आशीर्वाद" असे लेखन प्रमाण होते.) ही कथा मावशीने मला सांगितली. त्या अर्थी माझ्या मावशीच्या शाळेत काही शिक्षक उघडउघड अप्रमाणित रूप वाप्रत होते. म्हणजे काही "नियम नाही" असे सिद्ध होत नाही. उलट "जेव्हा संदेह असतो, तेव्हा नियमाचा आधार घेतात" हे सिद्ध करण्यासाठी अशा घटनांचाच आधार घ्यावा लागतो.

श्री. चिंतातुर जंतू यांनी कदाचित पूर्वीच्या शाळा फार अनुभवलेल्या नसून, फक्त उत्तम तितक्याच अनुभवलेल्या असाव्यात. गावाकडच्या शाळांत (आणि कदाचित महानगरपालिकेच्या शहरी शाळांतसुद्धा) शिक्षक चुका भरपूर करत. कुठल्याशा विनोदी लेखकाची "दिपोटी" ही कथा मी पूर्वी वाचली होती - तो अनुभव बर्‍याच आदल्या पिढीतला होता. (शिवाय "मिरासदारी"तही अशा प्रकारच्या कथा आहेत. ते अनुभवसुद्धा मागच्या पिढीतलेच. द. मा. मिरासदारांच्या सांगण्यावरून काही वर्णने तथ्यवर्णने आहेत.) यात शाळाशिक्षकांचे अज्ञान अतिरंजित करून व्यंग साधलेले आहे. हे विनोद कळण्यासाठी बहुतेक रसिकांनी अकुशल शिक्षक खुद्द बघितलेले असावेत, असा कयास नक्की करता येतो.

उत्तरपत्रिका तपासताना...

"शाळेत फळ्यावर चूक केलेली दिसली" यावरून "नियम नाही" हे सिद्ध होत नाही.

हे मान्य, पण याविषयी शाळेच्या विद्यार्थ्यांना विचारल्ं तेव्हा असं सांगण्यात आलं की आमच्या उत्तरपत्रिका तपासताना प्रमाण लेखनाच्या चुका काढायला आता बंदी आहे, त्यामुळे कसंही लिहिलं तरी चालतं. त्यामुले शिक्षकही कसंही लिहितात. हे शासनाचं धोरण आहे का (म्हणजे उदा: दहावीच्या उत्तरपत्रिका तपासताना महाराष्ट्र बोर्डाचं धोरण असं आहे का) ते मला माहीत नाही. कुणाच्या ओळखीत मराठी माध्यमात बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणारं असल्यास ते कळू शकेल.

टीपः वर उल्लेख केलेली शाळा सदाशिव पेठेत आहे. इतरत्र याहून वाईट परिस्थिती असू शकेल.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

दुवा

प्रतिसाद कसा सम्पादित करावा ह्याची कला मज अवगत नाही, म्हणून दुसरा प्रतिसाद.

भाषेबाबत आज एक दुवा आढळला, त्यातील हे वाक्य - "Preserving languages contributes to human history."
हेच भाषेच्या प्रामाणिकारणाकरता लागू होईल असे मला वाटते.

सहमत

देता येईल तितकी - दिशा द्यावी. तुमचे मत काय आहे?

भाषांचे प्रमाणीकरण या विषयावर एक चांगला लेख वाचायला मिळाला. धन्यवाद.

या लेखात आधुनिकतेमुळे आलेले मुद्दे राहिले असावेत. भाषा दर १२ कोसाला बदलत जाते या सारखे ऐकले होते. ते कदाचित प्रसारमाध्यमे येण्यापूर्वीचे असेल. प्रमाणभाषा ऐकूच न आल्याने, शिवाय प्रवासाची दगदग फार असताना स्थानिक भाषा मनुष्यजीवनाला सर्वात उपयोगी असेल. आता तसे राहिले नाही. दरवेळेस कक्षा रुंदावत गेल्या असणार असे वाटते. छपाई (पुस्तके, वर्तमानपत्रे), रेडिओ (ऐकणे), टेलिविजन (दृकश्राव्य) आणि आता संगणक. या चारही प्रकारांनी बोलीभाषा-प्रमाणभाषा यात फरक केला. (चर्चेतील मुद्यांशिवाय). टेलिविजनचा आवाका (श्रोतृवर्ग) मोठा असल्याने एकच भाषा आता सर्वत्र समजू लागली आहे. बोलीभाषा त्यामुळे उतरतीकडे लागल्या आहेत असे वाटते. यातील संगणक माध्यमाने इंग्रजीत स्पेलिंग आणि व्याकरण यांचे प्रमाणीकरण होत आहे. छपाई, रेडिओ वा टीव्ही यांच्या पोटात शिरून संगणकाने हे प्रमाणीकरण जास्त मजबूत केले आहे. मराठीत हे घडू बघत आहे आणि मला वाटते की ते फार दूर नसावे. (शंतनू सारख्यांच्या प्रयत्नांमुळॅ).

प्रमाणीकरणाची मागणी व रेटा कदाचित यामुळे झाला असावा. उच्चाराआधी लेखन (संगणकीय लेखन हे हळू हळू अपरिहार्य होत आहे.) प्रमाणीकरण होईल. प्रमाणीकरणाचा हा वेगळा प्रवास (अपरिहार्यता) बघता कदाचित प्रमाणीकरण वाल्यांचे म्हणणे मान्य करावेसे वाटते. पण त्याच बरोबर प्रमाणभाषा-व्यवहारभाषा यांची ताटातूट मागे खेचते.

याच बाबतीत आणखी एक मुद्दा म्हणजे नवीन भाषा तयार होणे. इतिहासात याची बरीच उदाहरणे आहेत. सध्या इंग्रजीपासून हिंग्लिश तयार होत आहे तशी मराठी तून 'स्मार्ट मराठी' (आंग्लाळलेली) तयार होत आहे. कदाचित या दोन्ही भाषा मूळ भाषे पासून फारकत घेऊन सवता सुभा स्थापन करतील असे कधी कधी वाटते.

प्रमोद

काही तांत्रिक फेरफार

लेखातले "व्यापार-शासन-उच्चशिक्षण-कवन" आणि त्या आधीच्या परिच्छेदातील "पत्रकारिता" यांच्यात प्रसारमाध्यमे येतात.

पण तरी प्रसारमाध्यमांच्या महत्त्वाची भूमिका विशद केली हे योग्यच.

"बोलीभाषा-प्रमाणभाषा-भेद" हा तांत्रिक दृष्ट्या फारच सुळसुळीत आहे, घट्ट पकडता येत नाही. प्रसारमाध्यमांमध्ये जी बोली अधिक वापरली जाते, ती प्रमाण मानली जाऊ लागते, हे तुमचे विवेचन असावे. ते पटण्यासारखे आहे.

भाषा दर १२ कोसाला बदलत जाते या सारखे ऐकले होते. ते कदाचित प्रसारमाध्यमे येण्यापूर्वीचे असेल.
बोलीभाषा त्यामुळे उतरतीकडे लागल्या आहेत असे वाटते.

वगैरे वाक्यांबद्दल असहमत. अगदी पुण्यातल्या पुण्यात एका दिवसात मी अनेक बोली ऐकलेल्या आहेत. सुशिक्षित शहरी लोक हे. लोक जोवर बोलतात, आणि काही लोक एकमेकांशी अधिक बोलतात, तोवर त्या उपसमाजात काही वैशिष्ट्ये राहाणारच.

माझा एक कॉलेजमित्र आयुष्यभर बिहारात राहिला होता, पण त्याच्या इंग्रजी बोलण्याची ढब ऐकून माझ्या अन्य मल्याळी मित्रांनी केलळातला त्याचा जिल्हा सांगितला होता. मला पूर्वी गोव्यातल्या लोकांच्या बोलण्याचा हेल ऐकून तालुका आणि धर्म-समाज सांगता येत असे. आता सुद्धा सराव नसला तरी उत्तरगोवा/दक्षिणगोवा//जुन्याकोन्क्विस्ती/नव्याकोन्क्विस्ती इतके चार भेद सांगता येतात. प्रमाणीकरण स्थिर होते, तेव्हा कुटुंबात प्रमाणित बोली बोलली जात नाही. इंग्रजीबाबतही असाच अनुभव आहे.

पण ही वाक्ये तुमच्या "प्रसारमाध्यमांचे महत्त्व" मुद्द्यासाठी आवश्यक नाहीत.

हिंग्लिश/हिमराठी/मराठ्लिश हे प्रमाण होईल काय? यात मोठा प्रश्न असा - या बोली बोलणारे हिंदी किंवा मराठी समाजात प्रतिष्ठित मानले जातील काय? जर हिंग्लिश बोलणार्‍या व्यक्तीच्या मनातले प्रमाण म्हणजे प्रमाण-इंग्रजी-बोली असेल, तर नाही. पण त्यांना स्वभाषा "हिंदी" किंवा "मराठी" असेच वाटत असेल, तर ते हिरिरीने आपले बोलणे हिंदीच आहे, किंवा मराठीच आहे, असे ठासून सांगतील. ते प्रतिष्ठित असतील, व्यापारात किंवा कलाक्षेत्रात किंवा पत्रकारितेत सहजरीत्या वावरत असतील, तर अन्य लोकांना त्या क्षेत्रात सहज वावरण्यासाठी त्यांची बोली आत्मसात करावी लागेल. त्यांची बोली प्रमाण होईल. (हा परिच्छेद सहमतीचा आहे.)

धन्यवाद.

भाषांचे प्रमाणीकरण या विषयावर एक चांगला लेख वाचायला मिळाला. धन्यवाद.
असेच म्हणतो.

उच्चाराआधी लेखन (संगणकीय लेखन हे हळू हळू अपरिहार्य होत आहे.)
हा मुद्दा अगदी विचार करण्यासारखा आहे. आंतरजालावर/नेटवर च्यांटिग करता-करता काही दिवसांनी मनुष्यप्राणी बोलण्याची शक्ती गमावून बसेल की काय असे वाटू लागले आहे.

भाषेच्या प्रमाणीकरणाबद्दल विवाद नव्या समाजव्यवस्थेचे द्योतक आहे
माझ्यामते सांस्कृतिक सत्ताधाऱ्यांचा वर्ग हा प्रमाणीकरणाबद्दल आग्रही असू शकतो. आपले वर्चस्व टिकवण्यासाठी किंवा सवर्णपण अधोरेखित करण्यासाठी अथवा सिद्ध करण्यासाठी भाषेचा असाही वापर होऊ शकतो.

पण प्रमाणीकरणाची गरज नाकारता येत नाही. प्रमाणीकरणाला टाळता येत नाही. ते हवेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नव्हे! ते नव्या विचारव्यवस्थेचे द्योतक आहे.

मला समजलेला चर्चेचा विशयः
प्रमाणित बोलीवर प्रभुत्व मिळवले, की ती मुळातल्या उपसमाजापेक्षाही अधिक "आपली" होऊ शकते. जाचक राहात नाही. हा हिशोब सर्वात फायदेशीर आहे मी लोकांना पटवले पाहिजे. नाहीतर अन्य कोणी मला (आणि अन्य लोकांना) पटवले पाहिजे. हीच लोकशाही. येथे कुणी राजा आल्फ्रेड, डॉक्टर जॉनसन, किंवा ऑक्स्फोर्ड विद्यापीठ स्वतःहून प्रमाणीकरणाचा हक्क घोषित करू शकत नाही.

त्यावर माझे मतः
भाशांचे स्वरूप आधुनीक जगात झापाट्याने बदलत आहे व बदल जाणार. पण मग हे भाशीय बदल कुठे-कुठे होत आहेत? भाशेच्या कोण-कोणत्या स्तरावर होत आहेत? हे आधी समजूनच घेतल्याशीवाय प्रमाणीकरण कसे करणार?

बदल आणी अटकाव:
1 नकळत होणारे अटकाव:
महाराश्ट्रात जी मंडळी परीस्थितीमुळी भावनीकदृश्ट्या दबलेली होती व आहेत ती मंडळी 'त्यांची जगाकडे पहाण्याची दृश्टी वेगळी असल्यामुळे' आपली वेगळी मते मांडण्याचा जेंव्हा- जेंव्हा प्रयत्न करणार तेंव्हा त्यांच्या हृदयात दबलेल्या भावना देखील मोकळ्या होत जाणार त्याचा परीणाम त्यांच्या विचार सादरीकरणावर पडत जाणार. मी इथे श्रीमंत नसलेल्या, अतीसुशिक्शीत वातावरणात न वाढलेल्या पण तरीही तल्लख बुद्धीमत्ता असणार्‍या सदगुणी, व होतकरू तरूण स्त्री/पुरूशांबाबत बोलत आहे. त्यांच्या त्या दोशांकडे दुर्लक्श कसे करायचे? व याचे द्न्यान 'जे विचार सादरीकरणात पारंगत' आहेत त्यांना कसे द्यायचे? हे झाले नकळत होणारे अटकावा बाबत.

2 जाणूनबूजून होणारे अटकाव:
प्रचलित प्रमाणलेखनात पारंगत असलेल्यांकडून बर्‍याचदा 'प्रचलित प्रमाणलेखन नीयमांचा' उपयोग नव्यां व्यक्ती/ वा गोश्टींना अटकाव करण्यासाठी वापरला जातो. तो न होण्यासाठी थेट 'भाशेला वा तीच्या लीपीला प्रमाणीकरणाच्या' नीयमात ओढण्याआधी ती भाशा वापरणार्‍यांच्या वागणूकीला शीस्तबद्ध का केले जावू नये? 'भाशेच्या प्रमाणीकरण करण्याचा आधार' हा होवू शकतो का?' हे पहायला हवे.

बदल आणी 'विकासाची संधी'
1 विकासासाठीची 'नव्या संकल्पनांना प्राथमिकता'
(केवळ) प्रचलित प्रमाणलेखनात पारंगत असलेले जेंव्हा बर्‍याज गोश्टी गृहीत धरून असतात कींवा ते चूकीच्या वा बंदिस्त संकल्पनांना धरून असतात. त्यांच्या ह्या वागण्याने नव्या विचारांना केवळ त्याचे सादरीकरण, उच्चार, लेखन यांमध्ये चूका आहेत म्हणून अटकाव करणार असतील तर नव्या गोश्टी समजणार कशा? आणी म्हणूनच 'भाशेला वा तीच्या लीपीला प्रमाणीकरणाचे' काम हे दुय्यम आहे. मग प्राथमीकता कशाला द्यायला हवी? हा प्रश्न येतो.

2 विकासाठी 'सामाजिक आवड'
एकाद्या समाजाची भाशा त्या समाजातील व्यक्ती एकमेकांशी कशाप्रकारे व कशासाठी संवाद साधत आहेत यावर त्या भाशेचा त्या-त्या अनुशंगाने विकास होईल की नाही हे अवलंबून असते. गुजराती भाशेत शेअरबाजार, अर्थव्यवहार या संबंधित बाबीवर अवलंबलेले वृत्तपत्र, वेबसाईट भरपूर आहेत. कारण गुजराती समाज एकमेकांशी संवाद साधतो त्यात 'अर्थव्यवहार' हा वीशय त्यांच्या आवडीचा असतो.

3 विकासाचे 'विविध स्तर व विभाग'

मराठी माणसाची मुख्य आवड काय आहे? ह्या प्रश्नाच्या उत्तर ही 'नाण्याची एक बाजू' आहे व त्या बाजूवर 'मराठीचा विकास' 'होणार की नाही' कींवा झाला तर 'कोण-कोणत्या बाबतीत' हे अवलंबून असणार.

मराठी समाजाने आप-आपसात संवाद साधण्यासाठी एकत्र कशासाठी यायचे? म्हणजे मला असे म्हणायचे आहे की चर्चा, संवाद, वाद-विवाद हे माध्यम आहे. पण ते माध्यम 'कशासाठीचे' आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर ही नाण्याची दुसरी बाजू आहे.

वाचनीय

वाचनीय लेख आहे. इंग्रजी आणि मराठी यांची सरळ तुलना करताना जाणवलेला एक फरक म्हणजे इंग्रजी एका देशाची भाषा आहे. उच्चार बदलले तरी इंग्लंडमध्ये सगळीकडे ती वापरली गेली/जाते. मराठी भारतातील एका समूहाची भाषा आहे. भारतात याच प्रकारे आणखी कितीतरी भाषा आहेत. त्यामुळे इंग्रजीला त्या काळात इंग्लंडमध्ये जे स्थान होते ते मराठी (किंवा इतर कुठल्याही भारतीय भाषेला) मिळणे शक्य नाही. बदल लवकर सर्वमान्य का होत नाहीत यामागे हे एक कारण असू शकेल.

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

अतिशय माहितीपर लेख

अतिशय माहितीपर लेख. शिवाय लेख रोचक आणि माझ्या मताशी साधर्म्य असणारा .. तेव्हा

मराठी राज्यभाषा प्रमाणीकरण समित्यांनी या प्रवाहाचा विरोध करू नये. अलगद - देता येईल तितकी - दिशा द्यावी.

याच्याशी सहमत!

बाकी संस्कृत ही त्यावेळी (विविध समुहांमधे संवाद साधण्यासाठी)खास प्रमाणीकरण करवून बांधलेली भाषा आहे असाही एक प्रवाह काही तज्ञांमधे आहे. तो लक्षात घेतला तर, तज्ञांनी प्रमाणीकरण केले असता, ती भाषा दस्तऐवजीकरण करण्यास अथवा दोन भिन्न प्रकारच्या बोली बोलणार्‍यांना काहि काळ उपयोगी पडले तरी ती भाषा व्यावहारीक दृष्ट्या काळाच्या कसोटीवर कितपत टिकेल याची शंका वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

माहितीपूर्ण लेखन

माहितीपूर्ण लेखनाबद्दल आभारी....!

-दिलीप बिरुटे

उत्तम लेख

माहिती व विचार यांचा योग्य समन्वय.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

चांगला लेख

बहुधा व्यापार-शासन-उच्चशिक्षण-कवन या चौकडीच्या बाजाराचा रेटा हे रूप बनवण्यात बलवत्तर असेल. मराठी राज्यभाषा प्रमाणीकरण समित्यांनी या प्रवाहाचा विरोध करू नये. अलगद - देता येईल तितकी - दिशा द्यावी. तुमचे मत काय आहे?

+१

दिशा देण्याचे काम अलगद चाललेले असावे असे वाटते. लोकांची मते कशी बदलावीत हा मोठा प्रश्न आहे.

उपक्रमचे प्रमाणीकरण

कोणत्याही सुधारणेला घरापासून सुरवात करावी असे म्हणतात. भाषेच्या प्रमाणीकरणाला उपक्रम पासूनच का सुरवात करू नये? माझी संपादक मंडळींना एक विनंती की उपक्रमवर टाकले जाणारे लेख जर प्रमाणित मराठीमधे नसले तर उडवून द्यावेत. अर्थात असे करण्यापूर्वी प्रमाणित मराठी म्हणजे काय हे उपक्रमच्या संकेत स्थळावर प्रथम प्रसिद्ध करावे.
उपक्रमवरचे अशुद्ध मराठी मधले लेख वाचून माझ्या मनात या पुढे उपक्रमवर लेखन करावे की करू नये याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. उपक्रमवरचे काही लेख वाचून तर प्रौढांसाठी असलेल्या रात्रीच्या शाळांच्या मधले विद्यार्थी हे लेखन करतात की काय असे मला वाटू लागले आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

चॅरिटी बिगिन्स ऍट होम

उपक्रमावरील बहुतेक लेख प्रमाण मराठीत असतात. चंद्रशेखर, आनंद घारे, यनावाला, धनंजय, रिकामटेकडा वगैरे लेखक प्रमाण मराठीतच लिहितात. जे लोक प्रमाण मराठीत लिहीत नाहीत त्यांचा समाचार इतर मंडळी घेतातच.

अनावश्यक

उपक्रमवरचे काही लेख वाचून तर प्रौढांसाठी असलेल्या रात्रीच्या शाळांच्या मधले विद्यार्थी हे लेखन करतात की काय असे मला वाटू लागले आहे.

हे विधान अनावश्यक वाटले. ज्या व्यक्ती शिकण्याची इच्छा मनात ठेवून दिवसभर हमालीपासून कुठचीही कामे करून शिकायचा प्रयत्न करतात त्यांना प्रोत्साहन देयचे का असले काहीतरी लिहायचे. असेच आपण मग, केवळ आपल्याला प्रमाण भाषा वाटत नाही म्हणून दलीत साहीत्यसंमेलनाबद्दल अथवा दलीत साहीत्याविषयी पण बोलणार का? असे इतरांबद्दल लिहीणे हे येथील सर्वांनाच योग्य वाटते का?

माफ करा आणि हे व्यक्तीगत समजू नका, कारण तसा मनातूनही उद्देश नाही. आपल्याबद्दल तसेच इतर सर्वांबद्दल समान आदर राखतच असे विचारत आहे. पण, भाषा प्रमाणित असले पण विचार हे इतरांना कस्पटासमान लेखत असले तर असल्या भाषेचा आणि त्या भाषेतील शुद्धलेखनाचा काय उपयोग?

गैरसमज

चंद्रशेखर यांचा प्रतिसाद औपरोधिक होता असे मला वाटते, विशेषतः, "अर्थात असे करण्यापूर्वी प्रमाणित मराठी म्हणजे काय हे उपक्रमच्या संकेत स्थळावर प्रथम प्रसिद्ध करावे." हे वाक्य पहा.

औपरोधिक

अर्थातच माझे वाक्य औपरोधिक होते. आपल्या लहान वयात शिक्षणाची संधी न मिळाल्याने मोठेपणी जी मंडळी दिवसभर कष्ट करून रात्रीच्या शाळेत जाऊन शिक्षण घेतात त्यांच्याबद्दल अनादर वाटण्याचे मला काहीच कारण नाही. उलट मला अशा मंडळींचे कौतुकच वाटते. परंतु म्हणजे या मंडळींचे लेखन शुद्ध आहे असे म्हणता येणार नाही. या प्रतिसादातला माझा सगळा रोख आणि राग उपक्रमवर मुद्दाम किंवा अजाणता अशुद्ध लिहिणार्‍यांबद्दल आहे. उपक्रमवरच्या लेखांचा दर्जा उत्तम राखण्याचे, त्यात अशिष्ट वाटेल असे कोणतेही लिखाण येऊ न देण्याचा संपादक मंडळ आटोकाट प्रयत्न करत असते. मग शुद्धलेखनाच्या बाबतीत एवढी ढिलाई का दाखवली जाते ते मला खरोखरच समजत नाही.
उपक्रम सारख्या पण इंग्रजी भाषेत असलेल्या एखाद्या संकेतस्थळावर एखाद्याने स्पेलिंग़च्या चुका असलेला लेख प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर तो तसाच प्रसिद्ध केला जाईल का? मग उपक्रमने अशुद्ध लेख का प्रसिद्ध करावेत? हे मला समजत नाही. या बाबतीत पावले उचलण्याची वेळ आली आहे असे मला वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अतिच व्हायला लागले आहे.

>>>उपक्रमवरचे अशुद्ध मराठी मधले लेख वाचून माझ्या मनात या पुढे उपक्रमवर लेखन करावे की करू नये याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

नै नै, मनात कोणताही संभ्रम होऊ द्यायचा नाही, लिहावे वाटले तर लिहित राहावे उगाच उपक्रमींवर अटी टाकू नये असे वाटते.

-दिलीप बिरुटे

उत्तम

लेख वाचायला अंमळ वेळ झाला पण त्यामुळे काही चांगल्या प्रतिक्रियाही लेखासोबत वाचता आल्या.

प्रमाणभाषेत शुद्धलेखनासोबत भाषेचा लहजा (हाच शब्द का? मला फॉर्मॅट या अर्थी वापरायचा आहे.) सांभाळणेही महत्त्वाचे वाटते. उदा. वृत्तपत्रांतील बातम्या लिहिताना वापरलेल्या भाषा, शासकीय कामकाजासाठी वापरली जाणारे फॉर्मॅट, प्रसारमाध्यमांसाठी वापरले जाणारे फॉर्मॅट, ललित लेखन, वैचारिक लेखन यांतही फॉर्मॅट सांभाळणे महत्त्वाचे वाटते.

धन्यवाद

सविस्तर माहिती आणि विश्लेषणाबद्दल आभार.

मराठी राज्यभाषा प्रमाणीकरण समित्यांनी या प्रवाहाचा विरोध करू नये. अलगद - देता येईल तितकी - दिशा द्यावी.

दिशा देणे हा विरोधच असतो. त्यामुळे, काही प्रकारच्या दिशा देण्याचे प्रयत्न करावेत पण इतर काही प्रकारचे प्रयत्न करू नयेत असे तुम्हाला म्हणायचे असावे. मराठी राज्यभाषा प्रमाणीकरण समित्या कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न करण्यास समर्थ आहेत? "नागरिकांनी 'हक्क बजावण्यासाठी' सरकारशी केलेले संवाद शुद्धलेखनाच्या नियमातून मुक्त ठेवावेत" हे पटतेच. बाकी काय उदाहरणे आहेत? या समित्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर कसे आक्रमण करतात?
परिस्थिती बिघडलेल्या शाळांचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले नसल्याची शक्यता मान्य केली तरी तेव्हा वाईट शाळांतील विद्यार्थी आणि चांगल्या शाळांतील विद्यार्थी यांना आयुष्यात क्वचितच मांडीला मांडी लावून बसावे लागत असावे. आज त्यांची क्रयशक्ति वाढली आहे, मोठमोठ्या अनेकमजली दुकानांतही आज रफी-तलत-गीता दत्त प्रभृतींच्या गैरफिल्मी गझला-गाण्यांच्या सी.डीं.ना जागा मिळत नाही या घटनेविरुद्ध 'केवळ' गळा काढला तर ते अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील आक्रमण का ठरावे? त्याहीपुढे जाऊन, जर अशा गझला-गाण्यांना एक किमान अवकाश मिळावा या हेतूने त्यांची विक्री करमुक्त करण्यासाठी (=बाकीच्यांवर जिझिया) सरकारवर दडपण आणले तर ते कदाचित अनैतिक (सत्तेचा गैरवापर?) म्हणता येईल (पर्याय: रोल ओवर ऍन्ड डाय) परंतु त्यातही काही अन्याय वाटत नाही. तुम्ही नेमका काय ऍक्शन आयटेम (स्वीकारण्यास/टाळण्यास) समित्यांना सुचवीत आहात?

मतभेद

आता हे प्रमाण म्हणून कुठली बोली निवडावी? याबद्दल मला अंततोगत्वा ठाम मत नाही. परंतु हल्ली प्रमाणित झालेली शिवशाही-पेशवाईतली बोली अधिक समावेशक करण्यासाठी त्या मानाने कमी प्रयास लागतील. खर्च कमी लागेल. यात अस्मिताभंगही फार नाही. फुले किंवा अंबेडकरांनी प्रमाणित मराठी बोलीत बहुजनांची अस्मिता वधारली, घटवली नाही. प्रमाणित बोलीवर प्रभुत्व मिळवले, की ती मुळातल्या उपसमाजापेक्षाही अधिक "आपली" होऊ शकते. जाचक राहात नाही. हा हिशोब सर्वात फायदेशीर आहे मी लोकांना पटवले पाहिजे. नाहीतर अन्य कोणी मला (आणि अन्य लोकांना) पटवले पाहिजे. हीच लोकशाही.

मी तरूणपणी युक्रांद, दलित पँथर, रास्वसं, साम्यवादी चळवळींमधल्या कार्यकर्त्यांमध्ये वावरलो आहे. त्यातील (रास्वसं वगळता) काही लोकांचा "शुद्ध (प्रमाणित)मराठी"वरचा आक्षेप असा: ही साडेतीन टक्के ब्राह्मणांची भाषा/बोली आहे. ती बाकी ९६.५% लोकांनी का स्वीकारावी? दुसरे म्हणजे ती पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या कोकणस्थ ब्राह्मणांची भाषा आहे. कोकणस्थ ब्राह्मणांची संख्या एकूण ब्राह्मणांच्या ५% आहे ("अंतर्नाद" मधल्या कोकणस्थ ब्राह्मणांवरचा लेखात म्हटले आहे). म्हणजे फक्त ०.१७५% इतक्या लोकांची भाषा ९९.८२५% लोकांवर का लादली जावी? त्यातही पुण्यातल्या, सदाशिव पेठेतल्या कोकणस्थ ब्राह्मणांची समजली तर ही टक्केवारी आणखी कितीतरी खाली येईल. ब्राह्मणेतर समाजामध्ये पेशवाईबद्दल टोकाचा तिरस्कार आहे. संस्कृत ब्राह्मणांची भाषा म्हणून तिच्यावरही राग आहेच.

त्यामुळे तमिळ ब्राह्मणेतरांनी तमिळमधले संस्कृत शब्द वगळून जशी नवी भाषा तयार केली तसे मराठीमध्ये करता येईल काय? म्हणजे सावरकरांनी भाषाशुद्धीमध्ये जे केले त्याच्या अगदी उलट. फारसी, इंग्रजी, पोर्तुगीज वगैरे भाषांमधून आलेले शब्द तसेच वापरायचे. संस्कृत, तत्सम किंवा तद्भव शब्द वगळायचे. त्यासाठी एकदम ज्ञानेश्वर किंवा चक्रधरस्वामींचे मराठी वापरायला लागेल. पण हाय रे दुर्दैवा! ज्ञानेश्वर आणि चक्रधरस्वामी हेही ब्राह्मणच. तेही या लोकांना पटणे मुश्कील.

त्यामुळे ९६.५% लोकांना मान्य होईल, संस्कृत किंवा तत्सम, तद्भव शब्द नसतील आणि त्याचवेळी ज्ञानेश्वर, महानुभाव यांच्यासारखी प्राकृताशी साम्य नसणारी अशी मराठी भाषा तयार करणे हे भाषातज्ज्ञांसमोर आव्हान आहे. ते तज्ज्ञ लोक कसे पेलणार?

विनायक

जाता जाता - फुल्यांनी प्रमाणित बोलीत लेखन केलेले नाही. त्यांच्या लेखनाची तुलना टिळक, आगरकर, चिपळूणकरांच्या लेखनाशी केली असता हे लक्षात येते. आंबेडकरांबद्दल सहमत.

खोटं बोलू नका.....

>>>>मी तरूणपणी युक्रांद, दलित पँथर, रास्वसं, साम्यवादी चळवळींमधल्या कार्यकर्त्यांमध्ये वावरलो आहे.

आपला प्रवास रास्वसं ते दलित पँथर असा काही झाला असेल हे काही खरे वाटत नाही.
आणि तसा प्रवास झालाच असेल तर आपला प्रवास कसा-कसा झाला ते सांगा ना राव..!

-दिलीप बिरुटे

शक्य आहे

वावरणे म्हणजे केवळ ओळखी ठेवणेही असू शकते. प्रवास असाच अर्थ विनायक यांना अध्याहृत असेल तर तोही शक्य आहे.

विंदा करंदीकर सावरकरवादाकडून मार्क्सवादाकडे वळले, उतारवयात ग. प्र. प्रधान अध्यात्माकडे वळले.

माझ्या आजोबांचा प्रवास संघ ते भागानगर सत्याग्रह ते स्वातंत्र्यसैनिक ते कम्युनिस्ट असा झाला आहे.

मतपरिवर्तन होते असे सांगणारा एक विनोदही आहे: विशीत समाजवादी नसतो त्याला हृदय नाही आणि चाळिशीतही समाजवादी असतो त्याला डोके नाही.

खोटे कोण बोलते?

बिरुटे खोटे बोलतात हे मी पूर्वी सिद्ध केले आहे. आठवा - सभासदाची बखर ही शिवाजीच्या मृत्यूनंतर १०० - १५० वर्षांनी लिहिली गेली असे बिरुटे यांनी लिहिले होते. ते मी आणि आजानुकर्ण यांनी ते खोटे असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे या आरोपाची मला पर्वा नाही.

काही मजकूर संपादित.

चिडू नका राव....!

सभासदाच्या बखरीवरुन मला खोटे ठरवले होय. गम्मतच आहे. :) असो, बर्‍याच संपादित बखरी जमा करुन ठेवल्या आहेत. पुढे कधीतरी त्यावरही चर्चा करु......!

आणि विनायकराव चिडू नका राव...! 'रास्वसं ते दलित पँथर' हा आपला प्रवास [वैचारिक प्रवास] कसा झाला ते जाणून घेण्याची इच्छा झाली होती. आपला संस्थळावरील प्रवास हा मनसेकडून मनसेकडे किंवा शिवसेनेकडून शिवसेनेकडे झाल्यासारखे वाटले, म्हणून प्रश्न केला होता, बाकी विशेष काही नाही....!

संपादकांनी मजकूर संपादित केलेला दिसतो. काय लिहिले होते ते जरा खरडवहीत लिहिता काय !

-दिलीप बिरुटे

अट्टहास?

काही लोकांचा "शुद्ध (प्रमाणित)मराठी"वरचा आक्षेप असा: ही साडेतीन टक्के ब्राह्मणांची भाषा/बोली आहे. ती बाकी ९६.५% लोकांनी का स्वीकारावी? दुसरे म्हणजे ती पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या कोकणस्थ ब्राह्मणांची भाषा आहे. कोकणस्थ ब्राह्मणांची संख्या एकूण ब्राह्मणांच्या ५% आहे ("अंतर्नाद" मधल्या कोकणस्थ ब्राह्मणांवरचा लेखात म्हटले आहे). म्हणजे फक्त ०.१७५% इतक्या लोकांची भाषा ९९.८२५% लोकांवर का लादली जावी? त्यातही पुण्यातल्या, सदाशिव पेठेतल्या कोकणस्थ ब्राह्मणांची समजली तर ही टक्केवारी आणखी कितीतरी खाली येईल. ब्राह्मणेतर समाजामध्ये पेशवाईबद्दल टोकाचा तिरस्कार आहे. संस्कृत ब्राह्मणांची भाषा म्हणून तिच्यावरही राग आहेच.

ज्याच्या हाती सत्ता त्या वर्गाच्या वापरातली भाषा प्रमाण भाषा म्हणून मान्यता पावते ही जगरहाटी आहे. इंग्लंडमधली प्रमाण भाषा ही सर्व इंग्रजांची भाषा नव्हे. फ्रान्समध्ये प्रमाण भाषा फ्रेंच अकादमी घडवते, पण पॅरिसमधल्या पंडित आणि अभिजनवर्गाकडून बोलली जाणारी ती प्रमाण असाच तिचा प्रवास राहिलेला आहे. 'आमचीच भाषा वापरा' असा ज्यांचा दावा खरा ठरू शकेल अशी बहुजनांची बहुमताची अशी एक कोणती तरी (पण आताच्या प्रमाण भाषेहून वेगळी अशी) मराठी आहे असंही दिसत नाही. त्यामुळे काहीही केलं तरी बहुसंख्य लोकांची एक अशी कोणती तरी मराठी प्रमाण होणं शक्य नाही. मग ज्या भाषेत इतकी वर्षं ज्ञाननिर्मिती झाली ती भाषा प्रमाण म्हणून मान्य करणं सोयीचं नाही का? एकेकाळच्या सत्ताधार्‍यांवरचा राग ज्ञानभाषेवर काढून ती नाकारणं हा एक प्रकारचा अट्टहास नाही का? अगदी आजपर्यंत या प्रमाण भाषेत उपलब्ध झालेल्या ज्ञानाला नाकारायचं आहे का? जर नसेल, तर मग वेगळी प्रमाण भाषा शिकून पुन्हा सध्याची प्रमाण भाषा शिकावी लागणारच ना? आणि ती नवी प्रमाण भाषा शिकायला जे कष्ट घ्यावे लागतील ते आजची प्रमाण भाषा शिकायला लागणार्‍या कष्टांपेक्षा कमी असतील का?

त्यामुळे अशा विरोधामागे विचारापेक्षा अविचार जास्त दिसतो असं वाटतं.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

सहमत

पूर्णपणे सहमत. प्रमाणभाषा किंवा जिला काही लोक शुद्ध भाषा म्हणतात ती बोलणारी माणसे समाजात नेहमीच अल्पसंख्य असणार. हे मराठीप्रमाणेच अन्य भाषांच्या बाबतीतही लागू पडते. कोकणस्थ ब्राह्मणांचे एकूण लोकसंख्येत काय प्रमाण आहे या गोष्टीचा, कुठली भाषा प्रमाण मानायची याच्याशी काही संबंध नाही. तेव्हा आधीच स्थिरावलेली प्रमाण मराठी बदलून तिच्याऐवजी दुसरी भाषा प्रमाण ठरवण्याचा प्रयत्‍न करणे अश्लाघ्य आहे. आजही कोकणातले थोडेफार शिकलेले हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन आणि ज्यू पुणेरी मराठी बोलतात. पु. ल. देशपांडे जेव्हा पहिल्यांदा पुण्याला यायला निघाले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, "जरा सांभाळून रहा, पुण्यातली माणसे छापील मराठी बोलतात."
कोणतीही प्रमाणभाषा ही भाषेच्या सुरुवातीच्या काळात कुणाची तरी बोलीभाषा असते. कुणाची हे महत्त्वाचे नसते. पण जेव्हा चार विद्वान त्या भाषेचा लेखनात उपयोग करू लागतात आणि उरलेले ते लिखाण वाचू लागतात, तेव्हा प्रमाणभाषा बनू लागते. पुढे तीच भाषा शुद्ध समजून तिचे व्याकरण तयार होते आणि भाषेच्या उच्चरणाला अनुसरून शुद्धलेखनाचे नियम आपोआपच बनतात. इथे कुठलीही जबरदस्ती नसते. एकदा का ह्या व्याकरणाला धरून नियमात बसणारे लेखन मोठ्या प्रमाणात व्हायला लागले की प्रमाणभाषा स्थिरावते. तेव्हा आधी बोली आणि मग प्रमाण हे फक्त भाषेच्या सुरुवातीच्या काळात. नंतर मात्र, जे प्रमाण आहे तेच बोलताना वापरायचे असा सर्वसाधारण संकेत आहे.
बोलीभाषा स्थल-काल-कुटुंबागणिक बदलत असते. तिचा थोडाफार परिणाम प्रमाणभाषेवर होऊ शकतो. पण तो कमीतकमी होऊ दिला तरच प्रमाणभाषा ही सार्वत्रिक लेखी वापराला योग्य राहते. प्रत्येक नपुंसकलिंगी एकारान्‍त शब्दाचे अंकारान्‍त(दीर्घ अकारान्त) उच्चारण करायला हरकत नाही, पण ते फक्त बोलताना किंवा वाचताना. लिहिताना ते शब्द एकारान्‍तच लिहिले तर शोभून दिसते.
बहुतेक भाषांना जे जमलेले नाही तसले उच्चारांनुसारी लेखन ही कल्पना मोडीतच काढायला पाहिजे. जी गोष्ट भाषेचा जन्म होण्याच्या काळात अटळ होती ती प्रमाणभाषा दृढ झाल्यानंतर करणे ह्यात शहाणपणा नाही. त्यामुळे त्या तत्त्वानुसार घडवलेले सरकारी शुद्धलेखनाचे नियम कितपत योग्य आहेत याबद्दल मी साशंक आहे. हिंदी-फ़्रेन्च आदी अनेक भाषांत अर्धोच्चारित अनुनासिक शब्दोच्चार आहेत. हिंदीत आणि संस्कृतमध्ये अक्षरावरती चंद्रबिंदू काढून ते दाखवतात. मराठीत आपण अक्षराच्या डोक्यावर दिलेला चंद्र हा अ‍ॅ-ऑ ची स्वरचिन्हे म्हणून वापरत असल्याने मराठी अनुनासिक उच्चारासाठी चंद्रबिंदू काढणे चालणार नाही. पण म्हणून मराठी लिपीत अनुनासिक उच्चारांची सोयच नसावी का? शब्दाचे व्याकरणसूचक अनुस्वार आणि अर्धोच्चारित अनुस्वार काढून टाकून मराठी महामंडळाने फक्त फायलींवर लिहिणार्‍या कारकुनांची सोय पाहिली, पण मराठी भाषेचे नुकसानच केले. पुण्यातली कोकणी माणसेदेखील आता शब्दांचे अनुनासिक उच्चार करीत नाहीत, याचे केवळ कारण असे, की तसली अनुस्वारित अक्षरे प्रमाण लेखनात दिसत नाहीत. लिहिले आहे तसेच वाचणे आणि तसेच बोलणे ही सहजप्रवृत्ती आहे. इंग्रजी शिकवताना ते म्हणजे इट्‌ आणि ते म्हणजे they पण, हे मुलांना समजावून सांगताना शिक्षकांना नाकेनऊ येतात. पूर्वी त्यांतल्या एका ते वर अनुस्वार असल्याने ही पंचाईत होत नसे.
ललित लेखनात अट्टहासाने वापरल्या जाणार्‍या बोलीभाषेतली सर्व नपुंसकलिंगी अंकारान्त रूपे निक्षून सांगतात की, महामंडळाने अनुस्वार द्यायला मनाई केली हे आम्हाला मान्य नाही; आम्ही अंत्याक्षरे अनुस्वार देऊनच लिहिणार!
प्रमाणभाषा ही बहुमताने पास करायची गोष्ट नाही तर दूरदृष्टी असलेल्या अल्पसंख्य विद्वान भाषापंडितांनी लेखन करताकरता बहुसंख्याकांवर, त्यांच्या नकळत लादायची वस्तू आहे.---वाचक्‍नवी

याचेही ऐतिहासिक उदाहरण नाही

प्रमाणभाषा ही बहुमताने पास करायची गोष्ट नाही तर दूरदृष्टी असलेल्या अल्पसंख्य विद्वान भाषापंडितांनी लेखन करताकरता बहुसंख्याकांवर, त्यांच्या नकळत लादायची वस्तू आहे.

कुठल्याही लोकशाही देशात प्रमाणभाषा लादून रुजली असल्याचे उदाहरण मला माहीत नाही. तुम्हाला माहीत आहे काय?

बिगरलोकशाही देशांत राजाने स्थापन केलेली अशी समिती आपल्याला माहीत आहे. फ्रेंच तेराव्या लुई राजाने स्थापलेली आणि मग नेपोलियन बोनापार्त याने पुनरुज्जीवित केलेली आकादेमी फ्रांसेज्. स्पेनची "रेयाल आकादेमिया" ही सुद्धा राजानेच स्थापन केलेली आहे. इंग्रजीचे प्रमाणीकरण बाजाराच्या पद्धतीने झाले, पंडितसभेने केलेले नाही. (व्यापार्‍यांना सोयीची प्रादेशिक बोली उत्तम लेखकांनी उचलली, आणि उत्तम लेखकांचे प्रयोग पंडितसभेने संकलित केले - हा इतिहास वर दिलेला च आहे.) संस्कृताचे प्रमाणीकरण "त्या काळातल्या मध्यभारतातल्या सभ्य समाजाला जे चांगले वाटते ते प्रमाण + वेदोक्त बोलींमधले सर्वकाही प्रमाण" असे आहे. त्या काळात मध्यभारतातले लोक जी जी काय वेगवेगळी रूपे वापरत, ती सर्वच रूपे पाणिनि-कात्यायन-पतंजली यांनी संकलित केली.

तुमच्या माहितीत असे काही आहे काय?

आकादेमी फ्राँसेज

कुठल्याही लोकशाही देशात प्रमाणभाषा लादून रुजली असल्याचे उदाहरण मला माहीत नाही. तुम्हाला माहीत आहे काय?

बिगरलोकशाही देशांत राजाने स्थापन केलेली अशी समिती आपल्याला माहीत आहे. फ्रेंच तेराव्या लुई राजाने स्थापलेली आणि मग नेपोलियन बोनापार्त याने पुनरुज्जीवित केलेली आकादेमी फ्रांसेज्.

'आकादेमी फ्राँसेज' राजेशाहीखाली निर्मिलेली संस्था होती, पण संस्थेचा कारभार निवडलेल्या (लोकशाही मार्गाने नव्हे) सदस्यांतर्फे होई. आजच्या लोकशाही फ्रान्समध्ये निवडीचे निकष बदलून अधिक सर्वसमावेशक झाले (उदा: पहिली महिला सदस्य ही १९८० मध्ये निवडली गेली). आता प्रश्न असा राहतो की 'लादण्याची' नक्की व्याख्या काय?

प्रमाणभाषानिश्चितीसारख्या तांत्रिक कामासाठीच्या कोणत्याही समितीत निवडल्या जाणार्‍या सदस्यांच्या निवडीचे निकष हे दिलेल्या कामासाठीच्या प्रस्तुत सदस्याच्या लायकीनुसार असावेत का? तर याचं उत्तर बहुधा 'हो' मिळावं. मग हे सदस्य सार्वत्रिक निवडणुकीत जनतेनं प्रत्यक्ष निवडून दिलेले नसणार. भाषाशास्त्र वगैरे भाषाविषयांत पारंगत असणारे असे हे सदस्य मग अभिजनवर्गातूनच येणार. मग हे असे सदस्य आजच्या लोकशाही फ्रान्समध्येही बहुजनांवर प्रमाण भाषा 'लादतात' असं म्हणता येईल का?

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

नैतिक आणि ऐतिहासिक मुद्द्यांचा नीरक्षीरविवेक

धोरणे बनवताना शेवटी ऐतिहासिक तथ्यांचा आणि नैतिक मूल्यांचा संश्लेष होतो, हे खरे. पण विश्लेषणाच्या वेळेला शक्यतोवर होऊ नये. माझ्या वाक्यातला "लादणे" शब्द गाळून "भाषेचे प्रमाण घोषित केले" असे वाचावे.

आकादेमी फ्रांसेस् हिला प्रमाण घोषित करण्याचे अधिकारपत्र राजाने आणि पुढे सम्राटाने दिले. फ्रान्स या बहुभाषिक प्रदेशाततील सर्व भाषा अप्रमाण घोषित केल्या गेल्या. पॅरिस शहर नव्हे तर तिच्या आजूबाजूच्या प्रदेशातली जी "फ्रेंच" भाषेची बोली होती, ती प्रमाण झाली. लोकशाही आल्यानंतर फ्रान्सची नोकरशाही, आणि बर्‍याच संस्था पूर्वीचे अधिकारपत्र ठेवून चालू राहिल्या. नेपोलियन बोनापार्तनंतर झालेल्या कुठल्याही सत्तांतरात सत्तेत आलेल्या लोकांची भाषा आणि हितसंबंध बदललेले नाहीत.

प्रमाण घोषित करून ते स्थिर व्हायचे कुठलेही उदाहरण लोकशाही राज्यपद्धतीत आजवर दिसले आहे काय? असा प्रश्न आहे.

तुमचा "संस्थेत अभिजन असणार, उच्चशिक्षित लोक असणार" परिच्छेद ठीक आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने स्थापलेल्या मंडळातही असेच लोक आहेत. या बाबतीत जर माझी असहमती आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर अगदी "अथ"पासून माझा मुद्दा तुम्हाला मी सांगू शकलेलो नाही. याबद्दल दिलगिरी वाटते, आणि ओशाळलेलो आहे. या मंडळाने "पूर्वीपेक्षा आज समाजाची धोरणे बनवायची पद्धत वेगळी आहे" हे जाणून धोरणे कशी बनवावीत? ही माझी विचारणा आहे. जर "पूर्वीच्याच पद्धतीने घोषित केलेली धोरणे आजही रूढ होऊ शकतात" असे आपल्याला दिसले, तर पूर्वीच्याच पद्धतीने धोरणे घोषित करावीत. मात्र सत्तांतर झाल्यानंतर अशा पद्धतीने धोरणे रूढ झाल्याचे उदाहरण मला माहीत नाही. माझ्या मते धोरणे रूढ होण्यासाठी वेगळी पद्धत स्वीकारावी लागेल.

- - -

(येथे "आधुनिक हिब्रू" भाषेचे उदाहरण कदाचित देता येईल. १८९० मध्ये काही पंडितांनी हिब्रू प्रमाणीकरण संस्था स्थापिली गेली, ती राजाने स्थापली नाही, आणि १९५३ मध्ये इस्रायल सरकारने तिला स्थायी शासकीय स्वरूप दिले. पण अधिक विचाराअंती हे उदाहरण ठीक नाही, असे दिसून येईल. आधुनिक हिब्रू भाषेचा पंडित-जनक एलिअझर बिन यहुदा याने १९व्या शतकात घडवलेली भाषा दक्षिण युरोपातल्या सेफार्डिक ज्यू लोकांच्या बोलीशी मिळती-जुळती होती. मात्र त्यानंतर हिब्रूमध्ये उत्तम लेखन बहुतेक आशकेनाझी जमातींच्या लोकांनी केले. हे प्रमाण विविध देशांतल्या ज्यू लोकांनी मानण्यास नकार दिला हे जाता-जाता सांगावे. इस्रायल राज्य झाल्यानंतर तिथे सद्दी आशकेनाझी लोकांची होती - अजून आहे. युरोपातील अधिकांश ज्यू विस्थापितांची मातृभाषा जर्मन भाषेची "यिडिश" बोली होती, तिच्या जर्मनसाधर्म्याबद्दल त्या होरपळलेल्या समाजाला तिटकारा वाटू लागला होता. त्यांनी जुने विसरण्याचा निश्चय केला, मात्र त्यांनी हिब्रू भाषेचा जो प्रकार अंगीकारला त्यात यिडिशचा अंश पुष्कळ होता. हीच आधुनिक प्रमाण हिब्रू. या उदाहरणातही आपल्याला दिसते, की "सत्तेत सध्या सद्दी कोणाची?" यावरून प्रमाण ठरते. काही शतकांपूर्वी सेफार्डिकांना त्यातल्या त्यात प्रगती करण्याचे स्वातंत्र्य होते, त्यांच्या बोलीत उत्तमोत्तम ग्रंथरचना होत होती, १९व्या शतकात पवित्र ग्रंथांपेक्षा वेगळे हेच ग्रंथ उपलब्ध होते. सेफार्डिकांच्या हिब्रूचे प्रमाण होऊ घातले होते. पुढे आझकेनाझी जमातींची प्रगती अधिक होती, तेव्हा त्यांची बोली प्रमाण झाली. इस्रायलमध्ये सत्ता आली तेव्हा सरकारमान्य झालेल्या हिब्रू भाषा संस्थेने समाजात घडणार्‍या बदलाला स्वीकारून प्रमाणित केले. संस्थेने सत्तेतल्या प्रबळ समाजाला हवे त्यापेक्षा वेगळे प्रमाण घोषित करून मग समाजाने ते स्वीकारले, असे मुळीच झाले नाही.)

लोकशाही तत्त्वांनुसार प्रमाण भाषेची घडण?

या मंडळाने "पूर्वीपेक्षा आज समाजाची धोरणे बनवायची पद्धत वेगळी आहे" हे जाणून धोरणे कशी बनवावीत? ही माझी विचारणा आहे.

इस्रायलमध्ये सत्ता आली तेव्हा सरकारमान्य झालेल्या हिब्रू भाषा संस्थेने समाजात घडणार्‍या बदलाला स्वीकारून प्रमाणित केले. संस्थेने सत्तेतल्या प्रबळ समाजाला हवे त्यापेक्षा वेगळे प्रमाण घोषित करून मग समाजाने ते स्वीकारले, असे मुळीच झाले नाही.

अभिजनांना हव्याश्या असलेल्या जाचक प्रमाणापेक्षा अधिक लोकाभिमुख धोरण स्वीकारल्याची उदाहरणं सापडू शकतील. फ्रान्समधलं इंग्रजीकरण हा तिथल्या भाषा-अस्मितेतला एक कळीचा मुद्दा आहे. बहुजन आंग्लाळलेलं फ्रेंच वापरतात, पण अभिजन शुध्द फ्रेंच वापरू इच्छितात. विशेषतः आधुनिक तंत्राशी संबंधित शब्द अनेकदा इंग्रजीत आधी रूढ होतात म्हणून फ्रान्समध्येही त्यांचा सर्रास वापर होऊ लागतो. पण प्रमाण भाषेसाठी मुख्यतः नवीन शब्द घडवले जातात. उदा: Data या शब्दासाठी Donnée हा शब्द घडवला गेला. त्याचा मूळ अर्थ 'दिलेला' असा आहे. नवे शब्द बनवायची प्रक्रिया अर्थात वेळखाऊ आहे. अशानं कधीकधी एखाद्या इंग्रजी शब्दाचं फ्रेंचाळलेलं रूप प्रमाण होऊन जातं. उदा: सी.डी-रॉम हा शब्द उच्चारानुसार cédérom असा लिहून प्रमाणित केला गेला. अशा प्रमाणीकरणातून कधीकधी गमतीशीर फ्यूजन होतं. उदा: 'इंटरनेट'ला फ्रेंच प्रमाण शब्द Internetच आहे. पण इंटरनेट वापरणार्‍यासाठीचा फ्रेंच शब्द Internaute हा घडवलेला आहे. अंतराळवीरासाठीचा Astronaute याच्यासारखा हा शब्द खास फ्रेंच आहे; त्याला इंग्रजी पर्याय नेटिझन असावा, पण फ्रेंच शब्दातल्या 'संचार करणारा' अशा अर्थानं गंमत येते (असं मला वाटतं!). हा शब्द घडण्यासाठी 'नेटस्केप नॅव्हिगेटर'नं मरायच्या आधी हातभार लावलेला असावा, कारण ब्राऊझरला फ्रेंच शब्द 'navigateur web' असा आहे. म्हणजे टोकाच्या अस्मितेपायी इंग्रजीला पूर्ण विरोध करण्यापेक्षा इंग्रजी शब्दांना आत्मसात करण्याची अशी ही 'फ्यूजन' प्रमाणीकरण साधणारी फ्रेंच शैली आहे असं म्हणता येईल. हा मध्यममार्ग कदाचित थोडा लोकाभिमुख आहे असं म्हणता येईल.

टीपः अजूनही मला तुमचा मुद्दा कळला नसेल तर मी ओशाळायला तयार आहे!

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

प्रमाणित लेखन

लेखनाची भाषा प्रमाणित करण्याची आवश्यकता आहे ती ब्राम्हणी बोली आहे की बहुजन समाज बोली आहे हा मुद्दा गौण आहे. एकदा भाषा प्रमाणित केली की ज्यांना त्या भाषेत लिहायचे असेल ते लिहितील बाकीचे लिहिणार नाहीत. उपक्रमवरच्या काही लेखात अशिष्ट शब्द येऊ लागले आहेत. ते वापरायचे किंवा नाही याबद्दल संदिग्धता नको. नियम ठरवा व त्यांचे पालन करा एवढेच म्हणायचे आहे. ज्यांना हे नियम आवडणार नाहीत ते त्या संकेतस्थळावर लिहिणार नाहीत. हा काही फारसा मोठा इशू आहे असे वाटत नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

प्रतिसाद संग्रही ठेवावा असा....

>>>>प्रमाणभाषा ही बहुमताने पास करायची गोष्ट नाही तर दूरदृष्टी असलेल्या अल्पसंख्य विद्वान भाषापंडितांनी लेखन करताकरता बहुसंख्याकांवर, त्यांच्या नकळत लादायची वस्तू आहे.

क्या बात है.....!

-दिलीप बिरुटे

कुछ बात हैच!

तीन महत्त्वाच्या गोष्टी. पहिली, जे विद्वान भाषापंडित आहेत त्यांना दूरदृष्टी आहे. अशी माणसे अल्पसंख्यच असणार. दुसरे, हे भाषापंडित ज्या प्रकारची भाषा आपल्या लेखनात वापरतात किंवा सभेत वा अन्यत्र बोलताना वापरतात, ती वाचतावाचता आणि ऐकताऐकता जनतेमध्ये आपोआपच रूढ होणार आहे. आणि मग तिला लोक प्रमाणभाषा समजणार आहेत. म्हणजे वाचकांच्याच नकळत नाही, तर पंडितांच्याही नकळत अशी तथाकथित प्रमाणभाषा लोकांवर लादली जाणार. आणि तिसरी गोष्ट अशी की, यासाठी, विद्वज्जनांच्या समितीमध्ये बहुमताने कोणताही ठराव पसार न होता, किंवा कुठलीही घोषणा किंवा कसलाही गाजावाजा न करता, भाषा प्रमाणित होणार आहे. मराठीच्या बाबतीत सुरुवातीला थोडेसे असेच झाले असावे. नंतर मात्र, थॉमस कॅन्डीने पुणेरी विद्वानांचा विरोध न जुमानता प्रमाणित मराठी निर्माण केली.

जो पर्यंत विशिष्ट पद्धतीची शब्दरचना व वाक्यरचना असलेली भाषा लेखनालेखनांतून वाचायला, आणि सभासभांमधून ऐकायला येत नाही, तोपर्यंत ती प्रमाण होणारच नाही. --वाचक्‍नवी

"थोड्यांनी नकळत लादणे" ऐवजी "फायदा म्हणून बहुतेकांनी स्वीकारणे"

काही दूरदृष्टीचे लोक लेखन किंवा भाषणात असे काही विषय हाताळतात, त्यांचे विचार असे काही मौलिक/आकर्षक असतात, की अन्य लोकांना त्यांचे लेखन/भाषण वाचावेसे ऐकावेसे वाटते. यात लेखन/भाषणातला आशय महत्त्वाचा. (विषय किंवा विचार शतकानुशतके मौलिक असेल असे नाही - काही दशके मौलिक असेल.)
अशा लेखन/भाषणाचा लोकांत बोलबाला होऊन त्या लेखन-भाषणातली शैली प्रमाण होऊ लागेल.

या दूरदृष्टीच्या लोकांनी आपली शैली आणि आपल्या बोलीतल्या लकबी लादल्या नाहीत. तर त्यांनी आशय-विषय असा निवडला, आशय-विषय उत्तम पद्धतीने सांगितला, की अन्य लोकांनी त्यांचा भाषाप्रयोग बोलीच्या लकबींसह स्वीकारला.

कोणी म्हणेल की यात फरक काय? "थोड्या लोकांनी नकळत लादणे" मध्ये एका प्रकारची लबाडी आहे. "खूप लोकांना महत्त्वाचे वाटले म्हणून स्वीकारले" मध्ये कल्पनांची उघड-उघड देवाणघेवाण, उघड-उघड स्पर्धा आहे.

लोकांना वाचावे-ऐकावेसे विषय हाताळून त्यावर मौलिक लेखन-वाचन करण्याच्या कष्टसाध्य पर्यायावेगळा असा, नकळत प्रमाण लादण्याचा कुठला चकवाचकवीचा पर्याय उपलब्ध नाही.

यामध्ये

या दूरदृष्टीच्या लोकांनी आपली शैली आणि आपल्या बोलीतल्या लकबी लादल्या नाहीत. तर त्यांनी आशय-विषय असा निवडला, आशय-विषय उत्तम पद्धतीने सांगितला, की अन्य लोकांनी त्यांचा भाषाप्रयोग बोलीच्या लकबींसह स्वीकारला.

यामध्ये शेक्सपिअरसारख्या द्रष्ट्या लेखकांचाही समावेश होईल असे वाटते.

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

रिवर्स इंजिनियरिंग

काही दूरदृष्टीचे लोक लेखन किंवा भाषणात असे काही विषय हाताळतात, त्यांचे विचार असे काही मौलिक/आकर्षक असतात, की अन्य लोकांना त्यांचे लेखन/भाषण वाचावेसे ऐकावेसे वाटते. यात लेखन/भाषणातला आशय महत्त्वाचा. (विषय किंवा विचार शतकानुशतके मौलिक असेल असे नाही - काही दशके मौलिक असेल.)
अशा लेखन/भाषणाचा लोकांत बोलबाला होऊन त्या लेखन-भाषणातली शैली प्रमाण होऊ लागेल.

किंवा असेही शक्य आहे की 'आपल्यासारखा' बोलणारा किंवा 'आपल्यातील' एक जण प्रमाणभाषा वापरुन संवाद साधत असेल तर आपोआपच तो आशय महत्त्वाचा आहे असा बोलबाला करवला जाऊन त्या व्यक्तीला प्रभावशाली करण्यात येते किंवा दूरदृष्टीचे मानण्यात येते. याचा एक वाईट परिणाम म्हणजे, 'आपल्यातला' नसणारा कोणी एक जर आशयसंपृक्त बोलत असला तरी त्याची भाषा प्रमाण नसल्याने आशयातील नसलेले न्यूनही दिसू लागते.

शक्य आहे

शक्य आहे. कोणाला समजणार नाही अशा प्रकारे संवाद साधणार्‍याचे म्हणणे मौलिक आणि महत्त्वाचे असेल, तर ते आपल्याला समजणारही नाही. "कोणाला न-समजणे" याची मात्रा कमीअधिक असू शकते.

"कोणाला-न-समजणे"च्या एका टोकाला पुर्णपणे मुक्या-थिट्या व्यक्तीने डोळे उघडझाप करून, बोट थरथरून संवाद साधायचा प्रयत्न केला तर तो कोणाला न समजणे सहज शक्य आहे. (स्टिव्हन हॉकिंग यांची शक्ती हळूहळू कमी होत गेली यंत्रे बसवून त्यांचे बोलणे समजण्यासाठी लोकांनी खटपट केली. अगदी बाळपणापासून ही स्थिती असती, तर तशी महागडी यंत्रे त्यांना मिळू शकली नसती.)

माझ्या एका मावसआजीला जन्माच्या वेळी अर्धांग-इजा झाली, (सेरेब्रल पॅल्सी) आणि तिला फक्त "बरळत" बोलता येत. फक्त तिच्या घरच्यांना तिचे बोलणे समजे. मला कळत नसे. परंतु ती "जन्म-मूर्ख" नव्हती, तिला खूप काही समजू शकत असे, असे घरचे सांगतात. (सेरेब्रल पॅल्सी मध्ये पुष्कळदा विचारशक्तीला इजा होत नाही.) तिला जर काही मौलिक सांगायचे असेल तर त्या संदेशाला महाराष्ट्र मुकला. वाईट वाटते, पण काय करावे?

"न-समजण्याची" मात्रा कमी करत करत "लोकांना जवळजवळ समजते" असे असल्यास अप्रमाण व्यक्तीच्या मौलिक विचारांना कमी गांभीर्याने बघितले जाईल, हा धोका आहे. अप्रमाण बोलणार्‍याशी दूरदूरचे (त्याच्या कुटुंबाबाहेरचे) अन्य विचारी लोक आजवर संवाद साधू शकले नसणार. त्यामुळे असे बोलणार्‍याचे अनुभवविश्व काही महत्त्वाच्या बाबतीत सीमित असल्याचा पूर्वदूषितग्रह (कदाचित चुकलेला ग्रह) ऐकणार्‍यांमध्ये उद्भवेल. हे सर्व शक्य आहे.

मात्र मौलिक माहिती सांगून आजूबाजूच्यांचा फायदा होत असेल, नेतृत्व मिळत असेल, रंजन होत असेल, तर त्या "अप्रमाण" भाषकाचे म्हणणे लोक ऐकून घेतात - याची खूप उदाहरणे इतिहासात दिसतात. आता अप्रमाण-भाषकाला आपला आशय लोकांनी अंगीकारावा याबाबत कितपत कळकळ वाटते? त्यासाठी तो व्यक्ती काय प्रयत्न करणार आहे? एखादा कुशल नेता राज्यसत्ता उलथवून आपल्या बोलीच्या लोकांना "अभिजन" म्हणून घोषित करेल. एखादा कारागीर उपयोगी वस्तू बनवून बाजार काबीज करेल, आणि त्याच्याकडून कारागिरी शिकायला येणारे शिष्य त्याची बोली आपण होऊन शिकतील. एखादा मौलिक विचार सांगणारा तेवढ्यापुरती प्रमाण बोली शिकेल.

फायद्यातोट्याचा विचार करावा. "खूप लोकांचा संवाद व्हावा", ही आपली इच्छा आहे. सर्वांनी शेकडो बोली-उपबोली शिकाव्या आणि मौलिक विचार मात्र आपल्या बोलीमध्ये सांगावेत. ऐकणारा ती शिकलेलाच असेल, असे मानावे. हा एक टोकाचा उपाय. मात्र हा उपाय अत्यंत खर्चिक आहे. आणि तरी संवाद होईल याची खात्री नाही. अकुशल श्रोता आशय समजणार नाही.

अनेक बोलींवर प्रभुत्व मिळवण्याइतका वेळ बहुतेक लोकांकडे नसेल. त्या ऐवजी खूप लोकांनी एकच बोली शिकावी. अशी सोय शाळेत असावी. हा उपाय कमी खर्चाचा आहे. (याचा तोटा तुम्ही वर सांगितलेलाच आहे. पण खर्चाच्या मानाने तोटा कुठला अधिक आहे?)

उत्तम लेख

आवडला. भाषेचा असा प्रवास, विवाद युनिव्हर्सल आहे.

अवांतर् - १३व्या का १४व्या शतकात 'कॅटरबरी टेल्स' या मिडल इंग्लीशमधे लिहलेल्या उत्तम कथासंग्रहाला मिडल इंग्लिश अश्या भ्रष्ट्र भाषेला कमी आयुष्य असेल म्हणुन (नाव आठवत नाही) एकाने लॅटीन मधे भाषांतर करुन सुरक्षीत ठेवले. पुढे १५व्या शतकातच मॉडर्न इंग्लीश( म्हणजे अजुनच भ्रष्ट भाषेचा उदय झाला) लॅटीनची नौका.....

गुगल शोधयंत्र ह्या देशविदेशच्या शुद्ध, अशुद्धलेखनाला कसे सामावुन घेते? यावर जाणकारांनी प्रकाश पाडावा.

माझ्या प्रतिसादातला लादणे

माझ्या प्रतिसादातल्या लादणे या शब्दाला झालेला विरोध समजण्यासारखा आहे. पण त्याच प्रतिसादात "थॉमस कॅन्डीने पुणेरी विद्वानांचा विरोध न जुमानता प्रमाणित मराठी निर्माण केली." असे एक वाक्य होते. त्या वाक्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलेले दिसते आहे.

यासंबंधात कृ.भि. कुलकर्णी लिहितात, "मराठीत चांगली भाषांतरे व्हावीत म्हणून टॉमस कॅन्डीने त्यांचे काही नियम तयार केले. भाषांतर करताना मुळातील सर्व विचार व्याकरणशुद्ध मराठीत कसे आणावेत, शब्दश: भाषांतर का टाळावे, परकीय शब्द मराठीत कोणत्या पद्धतीने लिहावेत, अनोळखी शब्दांबद्दल टीपा कोठे व कशा द्याव्यात, शास्त्रीय परिभाषिक शब्द कसे तयार करावेत, दोन भिन्‍न भाषांमधील शब्दांचे समास कसे टाळावेत इत्यादी मार्गदर्शक सूचना कॅन्डी यांनी भाषांतरकर्त्यांना दिलेल्या आढळतात. कॅन्डीला इंग्रजी व मराठी भाषा मार्मिकपणे कळतात म्हणून सरकारने त्यांच्याकडून इंडियन पिनल कोड, सिव्हिल प्रोसीजर कोड, क्रिमिनल प्रोसीजर कोड यांची मराठी भाषांतरे करवून घेतली. प्रमाणभाषा सिद्ध करण्यासाठी त्यांनी बहुमोल प्रयत्‍न केले. मराठी वाक्यरचनेतील शैथिल्य व अनियमितपणा काढून टाकून भाषेला बंदिस्तपणा आणण्याचे श्रेय कॅन्डीला दिले जाते. मराठी भाषेच्या लेखनात विरामचिन्हे वापरण्याची पद्धतही त्यांनीच सुरू केली. कॅन्डीचे व्याकरणविषयक नियम तत्कालीन भाऊ महाजन, रामचंद्र भिकाजी गुंजीकर, दादोबा पांडुरंग या विद्वानांना आवडले नाहीत. पण त्यांना न जुमानता ते नियम पाळून नीतिज्ञानाची परिभाषा(१८४८), विरामचिन्हांची परिभाषा(१८५०). शाळांतील मुलांकरिता क्रमिक पुस्तके(एक ते सहा) अशीही पुस्तके त्यांनी लिहिली. अव्वल इंग्रजी अमदानीतील मराठी गद्यग्रंथांची भाषिक घडण हे कॅन्डीच्या परिश्रमाचे फळ होय.
थोडक्यात काय तर प्रमाणभाषा जर प्रचलित करायची असेल तर वेळप्रसंगी ती लादावी लागली आहे. --वाचक्नवी.

 
^ वर