मराठीत कंट्रोल शोध ची सुविधा उपलब्ध आहे का ?

संगणकाच्या माहितीचे आता सर्वत्र मराठीकरण झाले आहे. या मुळे ग्रामीण भागातील जनतेला विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. महाराष्ट्रा शासनाच्या विविध विभागाच्या भरती परीक्षांचे निकाल मराठीत जाहीर केले जातात. परीक्षा देणारयांची , उत्तीर्ण उमेदवारांची यादी मराठीत प्रसिद्ध होते. पण ही यादी वाचत असताना कंट्रोल F ची सुविधा उपलब्ध केल्या जात नाही . त्याच बरोबर ही यादी मराठी वर्णमाले क्रमानुसार अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ किंवा क ख ग घ ... या नुसार नसते. यामुळे यादीतील नाव शोधण्यास खूप अडचणी येतात. यादीचे प्रत्येक पान वाचावे लागते कधी नाव असून ही वाचण्याच्या नादात नाव एकदम समजत नाही. सरकारी कारभार असल्या मुळे क्रमा नुसार यादी बनविण्याचे कष्ट कोणी घेत नाही. ह्या नाव शोधण्याच्या समस्ये वर एखादे मराठीतील कंट्रोल F ची सुविधा असलेले साफ्टवेअर उपलब्ध आहे का? यासाठी कोणी प्रयत्न करत आहे का?
Thanthanpal,
http://www.thanthanpal.blogspot.com

लेखनविषय: दुवे:

Comments

तात्पुरता उपाय

यादी क्रमानुसार करायची असेल तर सारी यादी एखाद्या स्प्रेडशीटमध्ये (मायक्रोसॉफ्ट एक्सेल, ओपनऑफिस कॅल्क, इ.) पेस्ट करून 'सॉर्ट' सुविधा वापरून क्रमानुसार करता येईल.
सरकारी साईट युनिकोड असेल तर तिच्यात शोध घेण्यासाठी, उपक्रमच्या 'प्रतिसादलेखन' खिडकीत (किंवा बराहा किंवा गूगल ट्रान्सलिटरेट सुविधेत) शब्द टंकून मग तो शब्द सरकारी साईटवरील 'कंट्रोल F' खिडकीत पेस्ट करून शोधता येईल. साईट युनिकोड नसेल तर तेथेच उपलब्ध अक्षरांना कॉपी पेस्ट करून शब्द बनवून 'कंट्रोल F' खिडकीत पेस्ट करून शोधता येईल.

'संपर्कासाठी इमेल' च्या पत्त्यावर निरोप पाठवणे' हाच सोपा मार्ग

महाराष्ट्रा शासनाच्या विविध विभागाच्या भरती परीक्षांचे निकाल मराठीत जाहीर केले जातात. परीक्षा देणारयांची , उत्तीर्ण उमेदवारांची यादी मराठीत प्रसिद्ध होते. पण ही यादी वाचत असताना कंट्रोल F ची सुविधा उपलब्ध केल्या जात नाही .

ज्या वेबपेजवर ही यादी प्रसिद्ध होते. त्या यादीचे वर्गीकरण करण्यासाठी संगणकावरील दुसर्‍या स्वतंत्रपणे कार्य करणार्‍या सॉफ्टवेअरची मदत होणार नाही. या खटाटोपा एवजी शासनाच्या त्याच संकेतस्थळावरील 'संपर्कासाठी इमेल' शोधून त्यांना निरोप पाठवावा.

कृपया त्या वेबपेजचा दुवा वर दिला असता तर बरे झाले असते.

उस्तूक

चांगला प्रश्न. अशी सोय आहे का हे माहित करून घेण्यास उत्सूक.
शंतनु, ओंकार वा अन्य तज्ञांनी मदत करावी

वर रिकामटेकडा यांनी वर्कअराऊंड सुचवला आहे.. पण तो अशी सोय नसताना वाअपरायचा पर्याय झाला.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

पर्याय

कंट्रोल पॅनेलच्या रीजनल लँग्वेज सेटिंगमध्ये लँग्वेजेस टॅबमध्ये डीटेल्स हे बटन उघडावे. तेथे देवनागरी इन्स्क्रिप्ट इन्स्टॉल करता येतो आणि तो वापरून थेट देवनागरी लिहिता येते, कंट्रोल F च्या खिडकीत थेट युनिकोड देवनागरी लिहावयाचे असेल तेव्हा डाव्या ऍल्ट आणि शिफ्ट या कळी (अकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे अनेकवचन आकारान्त असते का ईकारान्त?) दाबून देवनागरी अक्षरे टंकता येतात. (तीही तात्पुरतीच सोय आहे, रोमन कळफलकावर देवनागरी इन्स्क्रिप्ट मॅपिंग शिकणे कैच्याकै आहे. नेहमीच्या लेखनासाठी गूगल ट्रान्सलिट किंवा गमभन सारखी फोनेटिक सोयच हवी.)

सहमत

मी सध्या असेच वापरतो आहे.






अनेकवचन

>>अकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे अनेकवचन आकारान्त असते का ईकारान्त

मांजर/घागर शब्दाचे अनेकवचन मांजरी/घागरी करतात. :)

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

मान्य

पण कळ (वेदना) चे अनेकवचन कळा असते ना?

माळ->माळा ; ओळ->ओळी

माळ->माळा ; ओळ->ओळी
काय नियम आहे, शोधून बघितले पाहिजे. व्युत्पत्तिजन्य असावे, असा कयास आहे.

प्रस्ताव :
संस्कृतात शब्द आकारांत असला, तर मराठीत अनेकवचन आकारांत (माला -> माळ -> माळा)
संस्कृतात शब्द आकारांता-वेगळा असला, तर मराठीत अनेकवचन ईकारांत (आवली -> ओळ -> ओळी)

प्रस्ताव पटण्यासाठी अधिक उदाहरणे (खोडण्यासाठी प्रत्युदाहरणे) हवीत.

(लत्ता) लाथ -> लाथा
(रेखा) रेघ -> रेघा
(?) शेंग -> शेंगा
(?) भेग -> भेगा
(?) चूक -> चुका
(संध्या) सांज -> सांजा

(चंचु) चोच -> चोची

(हे पुरेसे नाही.)

धन्यवाद

उदाहरणे दिल्याबद्दल आभार. (चोच-चोचा असेसुद्धा असते असे वाटते.)
मला आता असे वाटते की सामान्यतः, उपांत्य अक्षर अकारी असेल तर अनेकवचन ईकारान्त होते, उदा., दरड, पन्हळ, धग, सवड, किळस,? अडचण, सुसर, इ.

अवांतराबद्दल क्षमस्व मे.

अजून एक क्षमस्व मे

धग, सवड,

धगी, सवडी ही अनेकवचने आहेत का?

खात्री नाही

ती तशी असतात असे 'वाटते' आहे.
--------
काही अधिक उदाहरणे:
जिव्हा--जिभा
क्षुधा--भुका
ज्योति:--ज्योती
निद्रा--झोपा
पुत्रि:--पोरी
नौका--नावा
(?)-कोर-कोरी
शिला-शीळ-शिळा
(?)-ओढ-ओढी
(?)-चव-चवी
(?)-झडप-झडपा (हे उदाहरण माझ्या कल्पनेला चूक सिद्ध करते.)

 
^ वर