प्रेझेन्स ऑफ स्टेट

कालच्या निकालानंतर जो संयम दोन्हीकडील पक्षांनी दाखवला त्याला मानवी इतिहासात एक चांगली घटना म्हणून नोंदवायला कुणाची हरकत नसावी असे मी मानतो.

येथून पुढेही, ह्या विषयावर असेच सामंजस्य टिकुन राहण्यासाठी जे प्रयत्न सातत्याने घडणे आवश्यक आहे त्यात प्रथम क्रमांकावर "प्रेझेन्स ऑफ स्टेट" असावा असे वाटते. याचे कारण म्हणजे, कालची शांतता ही उत्स्फुर्त प्रतिक्रिया नव्हती तर एक अत्यंत काटेकोरपणे केलेले नियोजन होते. ह्यालाच मी "स्टेट" चे अस्तित्व म्हणेन. हे अस्तित्व किती महत्वाचे आहे हे कालच्या उदाहरणाने दाखवुन दिले आहे. एखादी अनुचित घटना, विघातक वर्तन (दुधात भेसळ- जो होमीसाईडचा प्रकार मानावयास हवा) नको असेल तर ते न होऊ देण्यात जे स्टेटचे अस्तित्व दिसायला हवे ते दिसले व त्याने दर्शन खूप सुखावह होते!

लेखनविषय: दुवे:

Comments

होमवर्क

यात काही गोष्टी कारणीभूत आहेत.

१. निकालाची कल्पना सरकारला आधीच दिली गेली असणारच.
१अ. निकाल 'कायदेशीरदृष्ट्या आश्चर्यकारक असला' तरी तो रेकलेस नसल्यामुळे सर्व पार्ट्यांना फेससेव्हिंगची सोय होती. कोर्टाने थोडा शहाणपणा दाखवला.
२. त्याचबरोबर ती विविध पार्ट्यांच्या नेत्यांनाही दिली गेली असावी आणि त्यांनाही योग्य ती समज दिली गेली असावी. 'विजयी' पार्टीकडून जी संयत प्रतिक्रिया आली त्यावरून असे वाटते.
३. २६/११ च्या अनुभवाने मीडियाला समज दिली गेली असावी आणि मीडिया "सॉ द पॉईंट".

हे पुढे चालू राहील अशी आशा.

उल्लेखनीय बाब : एक दावेदार श्री हाशमी यांचे "आम्ही कोर्टाचा निर्णय मान्य करू असे पहिल्यापासून म्हणत होतो. आणि अजूनही तसेच म्हणतो" असे निकाल विरुद्ध गेल्यावर म्हणणे हे सुखद होते. गांधींची आठवण झाली.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

पोस्टफ्याक्टो

खरे आहे, एकंदरीतच सगळा पोस्टफ्याक्टो अतिशय संयमीत आणि आवश्यक वाटला. त्यामागे योगायोग नसुन चांगले नियोजन आहे हे समजु शकतो.

असेच

सहमत आहे. निकालानंतर सर्व बाजूंनी दाखवलेला संयम स्पृहणीय आहे. असेच भविष्यातही चालू रहावे ही इच्छा.

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

सहमत

सहमत आहे. निकालानंतर सर्व बाजूंनी दाखवलेला संयम अभिनंदनीय आहेच. या निमित्ताने काहि अजून काही महत्त्वाच्या तर काही गमतीशीर बाबी दिसून आल्या:
-- देश (यात सगळे आले, जनता, मिडीया, सरकार वगैरे) १९९२-९३ पेक्षा काही बाबतीत मॅच्युअर् झाला आहे.
-- नव्या पिढीला हे जुने ओझे झुगारून पुढे जायचे आहे
-- जर केंद्रीय मंत्रीमंडळाची त्यातही गृहमंत्र्यांची इच्छा असेल तर दंगल होणे कठीण वाटते. (शंकरराव चव्हाण बाबरी मशीदीच्या रात्री वेळ झाली म्हणून झोपायला गेले असल्याची आठवण राजदिप सरदेसाई काल सांगत होते. दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत सुधाकरराव नाईकही झोपेत असल्याचे उत्तर मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले)
-- याचा उपयोग रास्वसंने अतिशय चांगला करून घेतला व हिंदुंची अशी पहिली प्रतिक्रीया स्वतःकडून येईल याची दक्षता घेऊन (बाकी सर्व पार्ट्यांना विहिंप, भाजप वगैरे यांच्या पत्रकार परिषदा रास्वसंच्या परिषदेनंतरच घेतल्या गेल्या) स्वतःकडे हिंदूचे नेतृत्त्व आहे हे दिसेल याची खात्री करून घेतली
-- मायावतींनी यामिनित्ताने चाणाक्षपणे निकालाची अंमलबजावणी केंद्रावर आहे हे लगोलग घोषित करताना, उप्र वर केंद्र कसा अन्याय करते हे पूर्ण मिडीया व लोकांचे लक्ष असतानाच घोषित करून एक चांगली चाल खेळली.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

आवश्यक पावुल

--नव्या पिढीला हे जुने ओझे झुगारून पुढे जायचे आहे--

हे खरंच खूप आवश्यक पावुल आहे.

तडजोड

  • केंद्र सरकार आणि अन्य राजकीय पक्ष यांना निकालाची केवळ कल्पनाच नव्हती, तर आपसातील तडजोडीनेच निकाल तयार करण्यात आला, असे म्हणण्यास वाव आहे. चिदंबरम, मोहन भागवत, भाजप नेते आणि मुस्लिम नेते यांच्या वक्तव्यातील समानता पाहिली तर जाणीवपूर्वक या प्रकरणात तडजोड करण्यात आली, या गृहितकाला बळ मिळते. हा निकाल आपल्या बाजूने असल्याचे सर्वांनाच सोय झाली.
  • माध्यमांना असा निकाल अनपेक्षित होता. त्यामुळे त्यांना यावर प्रतिक्रिया देताच आली नाही. शिवाय माध्यमे जे गदारोळ करतात, त्यातील मुख्य पात्रे (राजकीय व धार्मिक नेते) आधीच निकालाच्या 'पक्षात' गेलेली असल्यामुळे आक्रस्ताळेपणा करायला वावच नव्हता. शेवटी माध्यमे स्वतः कुठलाच गोंधळ माजवू शकत नाहीत. काही चेहरे पुढे आणून गोंधळाला वाट करून देण्याचेच काम ते करू शकतात. कालच्या प्रकरणात असे चेहरे कुठेच नव्हते. ज्या प्रकारे निकालापूर्वी वातावरण तापविण्यात आले होते, त्यावरून मीडिया सॉ द पॉइंट हे खरे नसल्याचे दिसत होतेच. एवढ्या शांततामय परिस्थितीतही एकांगी मांडणी करून एखाद्याचा उपमर्द कसे करता येते, यासाठी आजचा लोकसत्ताचा अग्रलेख उत्तम उदाहरण ठरेल.
  • लोकांनी पाळलेला संयम हा सरकारी यंत्रणेच्या भीतीने नव्हे, तर कोणालाही त्यात आपल्यावर अन्याय झाल्याचे वाटले नसल्यामुळे पाळल्या गेला. १९९२ सालापर्यंत त्या जागी एक वास्तू उभी होती, ती अन्यायाचे प्रतीक म्हणून दाखविणे सोपे होते. त्यामुळे लोकांचे भडकणेही सोपे होते. आज तिथे काहीच नाही त्यामुळे प्रत्यक्ष भौतिक चिथावणी नव्हतीच. मुस्लिमांच्या दृष्टीनेही तिथे नमाज पढल्या जात नव्हताच. त्यामुळे त्या जागेसाठी भांडण्यात हशील नाही, अशी त्यांची भावना झाली. (सदरचे वाक्य आजच माझ्या एका मुस्लिम सहकाऱ्याने बोलून दाखविले. )

सर्वात महत्वाचे म्हणजे, या निर्णयावर त्वरीत कारवाई होणार नसून, आणखी काही वर्षे न्यायालयीन वाद खेळण्याची संधी आहे ही जाणीव.

अग्रलेख

एवढ्या शांततामय परिस्थितीतही एकांगी मांडणी करून एखाद्याचा उपमर्द कसे करता येते, यासाठी आजचा लोकसत्ताचा अग्रलेख उत्तम उदाहरण ठरेल.

अग्रलेख वृत्तपत्रातील सीनीयर व्यक्तीने लिहीलेला असणे अपेक्षित असते. त्यामुळे त्यात परिस्थितीवर मार्मिक भाष्य, वरकरणी लक्षात न येणारे दृष्टीकोन, रीडींग बिटविन द लाइन्स असे असायला हवे. सध्याच्या बहुतेक वृत्तपत्रांमधील अग्रलेख वाचवत नाहीत इतके वाइट असतात. कधीकधी यापेक्षा आपल्याला बरे लिहीता येईल असे वाटते.

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

खरे आहे

एकेकाळी अग्रलेख आवर्जून वाचणारे लोक म्हणून मराठी वाचकांची ओळख होती. अलीकडे तर बातमी आणि अग्रलेख यांतील फरकच नाहीसा झालाय. लोकसत्तातील अग्रलेख त्यातील उठावदार भाषेमुळे चांगले वाटतात. मात्र कोणाची भलामण करायची म्हटली, की तर्काच्या कोलांटउड्या आल्याच. त्यातही मग वस्तुस्थितीचा विपर्यास होतो. उदा.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने बाबरी मशीद-रामजन्मभूमी प्रकरणात जो निर्णय दिला, त्याविरोधात हिंदू महासभा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे, असे त्या पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. बाबरी मशीद कृती समिती आणि सुन्नी वक्फम् बोर्ड यांनी ‘हा कायद्याच्या राज्याचा विजय’ असल्याचे म्हटले आहे.

वास्तविक सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दोन्ही पक्षांनी दाखविली आहे. निकाल येण्याच्या आधीपासून अडवाणी वगैरे मंडळी हे बोलत होती.

बाबरी मशीद त्या जागेवर होती, हेही न्यायालयाने मान्य केले आहे. विश्व हिंदू परिषद, भाजप तसेच अन्य हिंदू संघटनांकडून ती पाडली जाईपर्यंत म्हणजेच ६ डिसेंबर १९९२ पर्यंत ती त्या जागेवर होती, हे लखलखीत सत्य, हे न्यायालयाने मान्य केले आहे. त्यामुळे त्यासाठी मशिदीच्या हक्कदारांना एकतृतीयांश जागा देण्याचे न्यायालयाने सुचविले आहे.

हेही वाक्य अनाठायी आहे. या खटल्यात हा मुद्दाच नव्हता. संपूर्ण लेखच अशा तऱ्हेने लिहिलेला आहे. असो.

अग्रलेख

अग्रलेख हे सत्यतेचे दस्तऐवज अथवा बातमीसारखे केवळ माहितीदेणारे नसावे. ते संपादकाच्या मताचे प्रकटीकरण असते. (वृत्तपत्राची भुमिका नव्हे). संपादकाला असे मत प्रकट करण्यासाठी अग्रलेख हे हक्काचे व्यासपीठ असते. तिथे त्याने स्वतःला पटलेल्या / हव्या असलेल्या भुमिका मांडणे मला बरोबर वाटते.
उगाच गोलगोल, सगळ्यांना चुचकारणार्‍या अग्रलेखांपेक्षा (कधी एकांगी व नेहमी गांधीघराण्याची का होईना,) एक ठाम बाजु घेणारे लोकसत्ताचे अग्रलेख उजवे वाटतात. अर्थातच ते मला नेहमी पटतात असे नाहीत्यामानाने सकाळ, मटा, लोकमत वगैरेचे बरेच अग्रलेख (अर्थात अपवाद आहेत) ठाम मतप्रदर्शानापेक्षा वेगळ्या धर्तीचे वार्तांकनच वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सहमत

उगाच गोलगोल, सगळ्यांना चुचकारणार्‍या अग्रलेखांपेक्षा (कधी एकांगी व नेहमी गांधीघराण्याची का होईना,) एक ठाम बाजु घेणारे

अग्रलेख असेच असले पाहिजेत. अक्कल वाटण्याचा मक्ता घेणार्‍यांना मिळणारी प्रतिष्ठा हल्ली कमी होते आहे असे मला वाटते.

गोलगोल अग्रलेख

असे गोलगोल अग्रलेख एका संकेतस्थळाच्या संपादकीय सदरामध्ये वाचायला मिळाले होते. संकेतस्थळाचे नाव जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी व्यनि करावा किंवा खरड पाठवावी.

बरोबर्

ही तर उघडच गोष्ट आहे. मराठी किंवा बहुतांश भारतीय वर्तमानपत्रांचे मूळ स्वरूप मतपत्रांचे होते. मात्र त्यासाठी तथ्यांची मोडतोड करण्याची मुभा नाही. खासकरून अयोध्येसारखा विषय असताना. एरवी अग्रलेख हा interepretation चाच भाग असतो आणि त्यासाठी प्रत्येक संपादकाला स्वातंत्र्य असतेच. आता संपादक स्वत:च हे स्वातंत्र्य इतरांच्या चरणी रुजू करत असतील, तर तोही त्यांच्या स्वातंत्र्याचाच भाग आहे!

चला

उगाच गोलगोल, सगळ्यांना चुचकारणार्‍या अग्रलेखांपेक्षा (कधी एकांगी व नेहमी गांधीघराण्याची का होईना,) एक ठाम बाजु घेणारे लोकसत्ताचे अग्रलेख उजवे वाटतात.

मग हेच सामनाबद्दल बोलायचे का?!

फरक

आग्रही भूमिका ही सत्यकथनासाठी आवश्यक असली तरी पुरेशी नसते.

मशीद

खटल्यात मशीद होती की नाही हा मुद्दा होताच. आणि ती होती असेच तिन्ही न्यायाधीशांनी म्हटले आहे. न्या शर्मा यांनीच फक्त ती 'इस्लामी तत्वांनुसार बांधलेली नव्हती म्हणून ती नव्हतीच असे म्हटले आहे. ('व्हॉईड ऍब इनिशिओ /मुळातून रद्द (?)') इतर दोघांनी ती बाबराने बांधल्याचा पुरावा नाही असे म्हटले आहे.

रामजन्मभूमी न्यासाच्या वकीलांनी (रविशंकर प्रसाद) न्या शर्मा यांचे जजमेंट न्यायालयाचे म्हणून सांगितले आहे. मशीद नव्हती असे न्यायालयाचे 'बहुमताने म्हणणे नाही'.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

मुद्दा

माझ्या माहितीप्रमाणे, तेथे मशीद होती का नव्हती, याबाबत खटला नव्हता. जागेची मालकी कुणाकडे यासंबंधात तो खटला होता. मंदिर पाडून मशीद बांधली का, हा वादाचा मुद्दा होता. त्याबाबत न्या. खान यांनी नकारात्मक मत व्यक्त केले आहे. त्यात लखलखीत सत्य हा शब्दप्रयोग अनाठायी होता. जी वास्तू लाखो लोकांनी पडताना पाहिली, ती असल्याबाबत शंका नव्हतीच. अगदी विहिंप नेत्यांनीही कधी मशीद नव्हतीच असे आधी म्हटले नव्हते. (माझी आठवण बरोबर असेल तर डिसेंबर 1992 नंतर पडली ती मशीद नव्हतीच, तो केवळ वादग्रस्त ढांचा होता असा युक्तिवाद गिरीराज किशोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केला. तोगडियांचा तोपर्यंत प्रादुर्भाव झाला नव्हता.)

सहमत

डीडी, आपल्या विचारांशी सहमत आहे. एकंदरीत परिस्थिती बघता मीसुद्धा असाच विचार केला. तिसर्‍या मुद्द्याशी १००% सहमत.

या सर्व बोलण्याच्या गोष्टी झाल्या . सरकारने आपले कणखर अस्तिव...

लोकांनी संयम वगैरे पाळला . अभिनंदनीय आहे. १९९२-९३ पेक्षा काही बाबतीत मॅच्युअर् झाला आहे.येथून पुढेही, ह्या विषयावर असेच सामंजस्य टिकुन राहण्यासाठी जे प्रयत्न सातत्याने घडणे आवश्यक आहे
या सर्व बोलण्याच्या गोष्टी झाल्या . सरकारने आपले कणखर अस्तिव दाखवून दिल्या मुळे हे शक्य झाले. निकाला आधी हजारो गुंडा नेत्यांना स्थानबद्ध केल्या गेले होते, आणि जागोजागी बंदुकधारी अर्ध सैनिक , गावोगावी पोलीस संचालन , दिल्ही च्या जामामशीद च्या परीसरा पासून ते मंदिर परिसरात सैनिक गस्त चालू होती. या सर्वांमुळे आपण कांही आगलावे पणा केला तर सरळ जेल मध्ये रवानगी होईल हे मतलबी नेत्यांना कळून चुकले. आणीबाणी नंतर देशात शासन नावाची गोष्ट अस्तिवात आहे हे प्रथमच जाणवले आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला. जनता नव्हे गुंड राजकारण्यांना हात चोळत गप्प बसावे लागले. जनतेला ना राम ना रहीम मध्ये रस आहे, त्यांना त्यांच्या रोजच्या रोजीरोटीची जास्त काळजी आहे. भारतात एक दीवस बंद झाला तर राजकारण्यांचे कांही वाकडे होत नाही पण ज्यांचे रोज कमावणे आणि प्रपंच चालवणे असते त्यांना उपाशी राहावे लागते.त्यांना कोणी फुकट जेवण आणून देत नाही,जसे नेत्यांना जेल मध्ये गेल्यावर सरकार यांचे चोचले पुरवत जेवण देते.
आजच हळूहळू राजकारणी यांनी आपले आपले रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. मतलबी राजकारण्यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा सुरु केली आहे. कारण सामंजस्य राहिले तर यांची दुकानदारी बंद पडेल. आणि सरकारने निकाल ठरवून लावला असला तरी देश हिता साठी ते आवश्यक होते. १९९२-९३ पेक्षा काही बाबतीत मॅच्युअर् झाला आहे. तसले कांही नाही. कायद्याच्या धसक्यानेच सरळ वागण्यास मिडिया मजबूर झाला.

thanthanpal.blogspot.com

बरं

बरं!

+१

बरं!

 
^ वर