'खमंग थालिपीठ' चं भाषांतर कसं करावं?

पुलंच्या कुठच्यातरी लेखात/भाषणात 'आता, आमच्या हिनं काय खमंग थालिपीठ बनवलं होतं, या वाक्याचं इंग्रजीमध्ये कसं भाषांतर करणार?' असा प्रश्न विचारला होता. पुलंना मराठी मनाची जाण होती, व 'खमंग, थालिपीठ' ह्या खास मराठी गोष्टी आहेत. त्यामुळे हे वाचकांना/श्रोत्यांना पटायला फारसा वेळ लागत नाही.

पण या वाक्याचा नक्की अर्थ काय? इंग्रजांकडे इतर गोष्टी आहेत पण त्यांना बिचाऱ्यांना थालिपीठाचा खमंगपणा माहीत नाही असं म्हणून स्वतःलाच हुरळवण्याचा तो प्रकार आहे का? अर्थात इंग्लिश पाकपद्धतीला जे सगळेच जण हसतात व जोडे हाणतात, त्यामुळे तेवढा भाग खराही असेल. विनोदाचा भाग सोडला तरी भाषा, संस्कृती व त्यांना जोडली गेलेली, त्यांतून घडणारी अनुभूती याबाबतचा व्यापक प्रश्न शिल्लक राहातोच. थत्तेंनी १९८४ ची ओळख करून देणाऱ्या लेखात न्यूस्पीकविषयी लिहिलं, व त्याखाली धनंजय यांनी जुना दुवा दिला. त्यावरून हे विचार मनात आले.

'आमच्या हिनं केलेलं खमंग थालिपीठ' यामध्ये थालिपीठाची चव, खमंगपणा, घरात शिरताना त्या वासाने तोंडाला सुटलेलं पाणी, चाळवलेली भूक, आणि ते खाऊन झालेली तृप्ती तर आहेच. पण शिवाय ओळखीच्या, प्रेमाच्या हातची चव व त्यामागची आपुलकीही आहे. इतकं सगळं, किंवा बरोब्बर हेच शब्दाला शब्द ठेवून दुसऱ्या भाषेत कदाचित सांगता येईलही, पण तशी शब्दशः भाषांतराच्या क्षमतेची अपेक्षा अतिरेकी वाटते. पण याचा अर्थ इतर संस्कृतींमध्ये चवदार पदार्थ, तोंडाला पाणी सुटणं, भूक, तृप्ती व आपुलकी या गोष्टी नाहीतच का? आपण जेव्हा इतरांपेक्षा वेगळे असं म्हणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच मूलभूत बाबतीत साम्यं असतात हे खरं का?

एखादा समूह वापरत असलेली भाषा व तद्जन्य अनुभूती हे कितपत जोडलेले असतात? (दुव्यात विशिष्ट भाषेत डावं, उजवं, मागे, पुढे ऐवजी कायम पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर वापरणाऱ्या समूहाविषयी छान उदाहरण आहे) व्यापक दृष्टीने एखाद्या समाजाची संस्कृती (भाषा हे केवळ एक अंग झालं) ही त्या समाजाच्या, त्यातील सर्वसाधारण व्यक्तीच्या अनुभूतींना घडवते का? तसं असल्यास नक्की कुठच्या पातळीला दोन समूहांमध्ये हे संस्कृतीजन्य अनुभूतीतले फरक असतात/दिसतात, व कुठच्या पातळीला साम्यं असतात? (न्यूरॉन्सच्या पातळीवर संस्कृतीजन्य फरक नगण्य असावेत...पण त्या पातळीला अनुभूतीही नसते.)

लेखनविषय: दुवे:

Comments

हम्म

'खमंग'ला 'उमामी' हा प्रतिशब्द ठरू शकेल का?
समान कृतींमधून समानच अनुभव येतील असे वाटते. पण ते व्यक्त करण्यासाठी भाषा तोकडी पडू शकते हे मान्य आहे. विचारांची दिशा त्यामुळे मर्यादित होणार नाही काय? हॉटँटॉट लोकांच्या भाषेत म्हणे तीनपेक्षा मोठ्या संख्याच नाहीत. अशा परिस्थितीत विचारांवर मर्यादा येणार नाहीत का?
शिवाय, न्यूस्पीकच्या मर्यादांमुळे, नवे विचार करणार्‍यांना पकडणे सोपे ठरले असते, त्यांचे विचार इतरांना समजणेसुद्धा कठीण गेले असते, असेही वाटते.
आपल्या मेंदूत असे काही होकायंत्र असते हा दावाही निराधार वाटतो.

हेच - अजिनोमोटो

अजिनोमोटोच्या पाकिटावर लिहीलेली पाचवी की (सहावी?)चव आठवली.
गोड, कडू, खारट, तुरट, आंबट ,उम्मट?

व्यापक चर्चेची अपेक्षा

व्यापक दृष्टीने एखाद्या समाजाची संस्कृती (भाषा हे केवळ एक अंग झालं) ही त्या समाजाच्या, त्यातील सर्वसाधारण व्यक्तीच्या अनुभूतींना घडवते का? अशा दोन वेगवेगळ्या समाजांमध्ये अनुभूतीत भिन्नता असते का? तशी आजच्या मुख्य समाज, संस्कृती, देश यांमधील लोकांत दिसते का? यावर चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. (थालिपीठाला, किंवा खमंगला नक्की प्रतिशब्द काय हे तितकंसं महत्त्वाचं नाही)

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

खाद्यसंस्कृती

पण याचा अर्थ इतर संस्कृतींमध्ये चवदार पदार्थ, तोंडाला पाणी सुटणं, भूक, तृप्ती व आपुलकी या गोष्टी नाहीतच का? आपण जेव्हा इतरांपेक्षा वेगळे असं म्हणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच मूलभूत बाबतीत साम्यं असतात हे खरं का?

माझ्या मते असावं. एखाद्या संस्कृतीत एखाद्या विवक्षित चवदार पदार्थाच्या वासाने तोंडाला पाणी सुटण, भुक निर्माण होणे, त्याचे ग्रहण झाल्यावर तृप्ती ची संवेदना निर्माण होणे. यातुन एक सहभागी लोकांमधे आपुलकी निर्माण होणे. हा सर्व प्रकार खाद्य संस्कृतीत ढोबळमानाने वर्गीकृत केल्यास एकाच संस्कृतीत खाद्य संस्कृती वेगवेगळ्या असतात.
कारण वरील वर्णनात अ हा खाद्यपदार्थ असल्यास तशाच वर्णनाचा ब हा खाद्य पदार्थ त्याच संस्कृतीतील दुसर्‍या खाद्य संस्कृतीत असू शकतो.
थोडक्यात अ या पदार्थामुळे होणार्‍या क्ष या व्यक्तिच्या संवेदना या ब या पदार्थामुळे होणार्‍या य या व्यक्तिच्या संवेदनासम असतात.
खमंगपणा हा थालपीठाव्यतिरिक्त अन्य पदार्थांनाही असतो.

एखादा समूह वापरत असलेली भाषा व तद्जन्य अनुभूती हे कितपत जोडलेले असतात?

नागपूरकडचे लोक साबुदाण्याच्या खिचडीला साबुदाण्याची उसळ म्हणतात. आता खिचडी या शब्दातुन येणारी अनुभुती व उसळ या शब्दातुन येणारी अनुभुती ही वेगळी आहे.
प्रकाश घाटपांडे

पण्

नागपूरकडचे लोक साबुदाण्याच्या खिचडीला साबुदाण्याची उसळ म्हणतात. आता खिचडी या शब्दातुन येणारी अनुभुती व उसळ या शब्दातुन येणारी अनुभुती ही वेगळी आहे.

हो, पण

तुम्हाला खिचडी म्हणुन खाताना आणि नागपुरकरांना उसळ म्हणुन् खाताना येणारी अनुभुती एकच का? असा प्रश्न असावा, नाही?

-Nile

हो पण

हो जेव्हा मला माहित नव्हत तेव्हा आज साबुदाण्याची उसळ आहे असे म्हटल्यावर मला हा काहीतरी वेगळा पदार्थ आहे असे वाटले. म्हणजे मटकी ऐवजी साबुदाणा अशी कल्पना मी करुन पाहिली.
बाकी खाल्यानंतर येणारी अनुभुती मान्य
प्रकाश घाटपांडे

भिन्नता

पण याचा अर्थ इतर संस्कृतींमध्ये चवदार पदार्थ, तोंडाला पाणी सुटणं, भूक, तृप्ती व आपुलकी या गोष्टी नाहीतच का?

अर्थातच इतर संस्कृतींमध्येही चवदार पदार्थ, तोंडाला पाणी सुटणं, भूक, तृप्ती व आपुलकी या गोष्टी असतातच. अडचण ही की त्यासाठी त्यांनी वापरलेले शब्द खमंग या शब्दाच्या समानार्थी धरावेत किंवा नाही हे ठरवणे कठीण/अशक्य आहे. याचे कारण गौरी यांनी एकदा नेमक्या शब्दात मांडले होते. "दोन भाषांमध्ये ‘प्रतिशब्द’ नसतात, साधारण सारखा अर्थ असणारे शब्द असतात. एकेका शब्दाच्या मागे त्या त्या भाषेत जो सामाजिक, सांस्कृतिक संदर्भांचा डोंगर उभा असतो, तो कधीच दुसर्‍या भाषेत नेमकेपणाने सांगता येत नाही."

नेपल्स येथील पिझ्झाची चव घेतली की क्षणभर सदेह स्वर्गात जाऊन आल्याचा भास होतो. (आणि नंतर इतर कुठल्याही पिझ्झा खावासा वाटत नाही.) पण ती चव खमंग म्हणता येईल का? माझ्या मते नाही. याउलट इटालियनमध्ये वाईनची चव दर्शविण्यासाठी इतके शब्द आहेत की त्यासाठी वेगळा शब्दकोश उपलब्ध आहे. अमुक वाइन ऍग्रेसिव्ह आहे याचे मराठीत भाषांतर करणे शक्य नाही.

--
वेगवेगळ्या संस्कृतींमधील अनुभूतींमध्ये अर्थातच भिन्नता असते, मात्र याला भाषा हे एकमेव कारण नसावे. यात भाषेचा भाग किती आणि वातावरणाचा भाग किती हे ठरवणे अवघड दिसते. मात्र काही बाबतीत भाषा नक्कीच कारणीभूत ठरते, याची उदाहरणे न्यू यॉर्क टाइम्समधील लेखात आलीच आहेत. म्हणूनच हायकू जपानीतून वाचणार्‍याला आणि त्याचा अनुवाद इंग्रजीमध्ये वाचणार्‍याला सारखीच अनुभूती येईल असे वाटत नाही.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नि अगिविनयो, चिट्टि नि वुयथिनयो, मिनसारम वुडलिल रत्तम, नवीन उळगतिल अरविल अधसियम
वायवुंड अनार वयनिल्लय, पेचीवुंड मूचियिल्लय, नाडीवुंड इरथियम इल्लय, गोवर्धन मुंड थिमिर इल्लय

तंतोतंत भाषांतराचा आग्रह धरु नये...

प्रत्येक भाषेतील शब्द त्या प्रदेशाची संस्कृती, भूगोल, लोकजीवन, खाद्य परंपरा, शिष्टाचार आणि इतरही बर्‍याच घटकांमुळे वेगवेगळे असतात. आपल्याला अचूक हवा तो रंग मिळाला नाही तर आपण त्याच्याशी मिळती जुळती छटा निवडतो तोच प्रकार शब्दांच्या बाबतीत असतो. खमंग थालिपीठला तंतोतंत इंग्रजी शब्द मिळाला नाही तर अस्वस्थ होण्याचे कारण नाही. जर इंग्रज व्यक्तीला हा पदार्थ काय आहे, हे समजाऊन द्यायचे असेल तर तुम्ही 'यम्मी स्पायसी पॅनकेक' म्हटलात तरी त्याच्या लक्षात येईल.

आपण दह्याला विरजण लावतो. पहिल्या टप्प्यात ते अदमुरे (अर्धवट मुरलेले) असते नंतर ते आंबट होते. आता परदेशी लोकांना 'योगर्ट' (गोड दही) हा एकच प्रकार माहीत आहे. त्यांना तुम्ही दही विरजणे किंवा अदमुरे हे कसे सांगणार? पण आहेत त्यालाही शब्द आहेत. टु सेट द कर्ड = दही लावणे आणि अदमुरेला टेंडर कर्ड म्हणू शकतो. अट्टहासच धरायचा ठरवला तर मग मनाशी झगडा ठरलेला. काकडी कोचवणेला काय म्हणावे? तिकडच्या बाजूनेही तसेच उदाहरण देता येईल. टॉसिंग म्हणजे पदार्थ हवेत उडवणे, ही कृती भारतीय स्वयंपाकात आढळत नाही. चायनीज पदार्थात मात्र हे टॉसिंग हमखास असते. त्याला मराठीत आपण काय म्हणणार?

थोडे अवांतर. साखरपुडा, डोहाळजेवण, मंगलाक्षता या आपल्या विवाहातील रुढी आहेत. त्याचे शब्दशः भाषांतर (उदा: शुगरबॉक्स) हास्यास्पद ठरु शकेल. पण या परंपरा तिकडेही, पण थोड्या वेगळ्या स्वरुपात असतातच. तिकडची आईपण गर्भवती मुलीला घरी बोलवून भेटवस्तू देतेच. हा! अगदी आपल्याइतके 'चांदण्यात न्या गं हिला, झोपाळे झुलवा' असे कौतुक नसेल, पण माया व्यक्त करण्याची रीत समानच. आपण लग्नात अक्षता टाकतो. त्यांच्यात अक्षता टाकत नसल्या तरी विवाहानंतर वर-वधू उपस्थितांच्या गराड्यातून जाताना रंगीत कागदी चकमक उधळतात. त्याला ते लोक 'ब्रायडल शॉवर' म्हणतात. मग जेव्हा मंगलाक्षता शब्दाचे भाषांतर करण्याची वेळ येईल तेव्हा आपण हाच 'ब्रायडल शॉवर' हा त्यांनाही समजेल असा शब्द वापरला तरी हेतू साध्य होईल.

स्वाध्याय : पुढील कृतींचे इंग्रजीत भाषांतर करा.
दृष्ट काढणे, नाव घेणे, सारवण, बाजूला बसणे, करणी करणे, नवस

पुढील वाक्यांचे इंग्रजीत भाषांतर करा.
१) मला ठेच लागली
२) पोराचे नाक सारखं वाहतंय.
३) एका पेंडीची भाजी चोरटी होणारच.
४) फार नाही लागलं. मुका मार बसलाय
५) वासानंच उमासे यायला लागलेत.

भाषांतर नव्हे, अनुभूत्यांतर

त्याचे शब्दशः भाषांतर (उदा: शुगरबॉक्स) हास्यास्पद ठरु शकेल. पण या परंपरा तिकडेही, पण थोड्या वेगळ्या स्वरुपात असतातच. तिकडची आईपण गर्भवती मुलीला घरी बोलवून भेटवस्तू देतेच.

तुम्ही अवांतर म्हटलं असलं तरी हा खरा कळीचा मुद्दा आहे. साखरपुडाचं संकल्पनांतर एंगेजमेंट सेरिमोनी असू शकतो. भाषा हे केवळ सांस्कृतिक वैविध्याचं उदाहरण म्हणून घेतलं असलं तरी भिन्न संस्कृतींमध्ये अनुभूती भिन्न असतात का? असल्या तर कितपत, नसल्या तर तसं अनुभूत्यांतर बहुतेक बाबतीत करता येतं का? हे प्रश्न आहेत.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मला थोडेसे समजले नाही...

राजेशजी,
आवडत्या पदार्थांच्या दर्शनाने, त्याच्या वासामुळे, वर्णनामुळे किंवा आठवणीमुळे भुकेची, आस्वादाची अनुभूती येणे, हे मानवासह सर्व प्राण्यांमध्ये समानच आहे. खानावळीतून जेव्हा चपात्या/रोट्या शेकल्या जात असतात तेव्हा बाहेर गिर्‍हाईकांप्रमाणेच कुत्रीही नाक फुलवून उभी असतात. मासे घरात आणले की मांजरे मालकाच्या पायात घुटमळू लागतात.

पण खाद्य संस्कृतीनुसार अनुभूतीही भिन्न असते. एकाची आवड ती दुसर्‍याची किळस ठरु शकते. परवा एका चर्चेत बोंबिलांचा उल्लेख झाला. कुणाला त्या वासाने लाळ टपकायला लागेल तर कुणाला त्या वासाने मळमळू लागेल. कांदा लसणाचा वास हिंदूंना आवडेल, पण कट्टर जैन तिथे उभा राहणार नाही. परदेशातही राहणार्‍या भारतीयांबद्दल स्थानिक शेजार्‍यांची हीच तक्रार असते, की त्यांच्या घरातून कायम फोडण्यांचे उग्र वास येतात. याऊलट आपल्याला त्या लोकांचे मांस-भाज्या नुसते उकडून आणि त्यावर मीरपूड भुरभुरुन खाणे अळणी वाटते. आले, लसूण, मिरची, कढीपत्ता नसेल तर स्वयंपाक बेचव लागतो आपल्याला.

अनुभूती न येण्यामागे कधीकधी पूर्वग्रहही कारणीभूत असतात. ज्याचे मन खुले त्याला रसास्वाद अधिक हेच खरे. माझा एक मित्र अळंबी (मश्रुम) कधीही खात नाही. एकदा कारण विचारले तर म्हणाला, 'मश्रुम म्हणजे बुरशी असते'. त्यातून त्याच्या मनात अळिंबी नावापेक्षा 'कुत्र्याची छत्री' हे नाव घट्ट बसलेले. कसे समजावणार त्याला? रानातील काही अळिंबी विषारी असू शकतात, पण आपण जी अळिंबी खातो ती खास कल्टिव्हेट केलेली असते आणि मश्रुम कवक असले तरी मिनरल्सनी समृद्ध असते, हे त्याला काही केल्या पटतच नाही. अर्थात त्याला दोष देण्यात अर्थ नाही. बस्तर भागात आदिवासी लाल मुंगळ्यांची चटणी आवडीने खातात. तेथील बाजारात अशा मुंगळ्यांचे भरलेले द्रोण विकत मिळतात. आपण खाऊ शकू का ते?

(मुद्दा न समजल्याने लिहिताना मी भरकटलो असल्यास माफ करावे.)

खरपुस

खमंग ला खरपुस हा दुसरा शब्द तितका प्रभावी वाटतो का?
प्रकाश घाटपांडे

खमंग आणि खरपुस

खमंग आणि खरपुस लेख/ विचार.

संस्कृती, अनुभूती , भाषांतर - हत्ती आणि आंधळे

भालचंद्र नेमाड्यांच्या हिंदू कादंबरीचे प्रत्ययकारी भाषांतर (अनुभूत्यांतर) इतर भाषांमध्ये करता येईल का? अशी शंका मनात येते.
माझ्या मताने या शंकेचे उत्तर 'नाही' असे आहे.

किंबहुना अनुभूती म्हणजे शाब्दिक अर्थाबरोबरच त्या मजकुराशी निगडीत असलेल्या (संज्ञांनी निर्देशित केलेल्या) अनेक स्मृतींचे एकत्र विश्लेषण ('कॉग्नीशन') असते.
रोजच्या जीवनापलिकडील अनुभव सांगणारी कथा/कादंबरी वाचताना {उदा.इंग्रजी कादंबरी(स्थल विपर्यास) अथवा ऐतिहासिक कादंबरी (काल विपर्यास)} मेंदू जी चित्रे निर्माण करतो ती भासमान दिवास्वप्नेच असतात. अशी मानसिक चलत-चित्रे जर चित्रित करण्याची सोय असती तर प्रत्येक वाचकाची चित्रफीत (त्यात्या वाचकाच्या अनुभूत जगाअन्वये) वेगळी बनली असती.
याचाच अर्थ भाषा/संज्ञा/शब्द ज्याचे वाहक आहेत तो अर्थ प्रत्येकाच्या 'मेंदूतल्या स्मृतींचे जिगसॉ पझल' असतो.

उदा. 'दिवेलागणीला देवळात भजन सुरू होतं. माझे वडील मृदंग वाजवतानाच 'हेचि दान देगा देवा' आळवत होते.' किंवा 'ट्ठालवि,ट्ठालवि,ट्ठालवि,ट्ठालवि,ट्ठालवि' -
यासारखी हिंदू कादंबरीतील वाक्ये माझ्या शहरात जन्मलेल्या / वाढलेल्या मुलालाही (मराठी भाषेवर प्रभुत्व असूनही) अनुभूतीसह कळतील असे वाटत नाही.

वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी व्याती असलेले शब्द

वेगवेगळ्या भाषांत जे रूढ शब्द आहेत त्यांची व्याप्ती वेगवेगळी आहे. अगदी भावनिक शब्द शोडले, तरी वस्तुनिष्ठ व्याप्तीसुद्धा वेगवेगळी असते.

उदाहरणार्थ : इंग्रजी-"अंकल" याची व्याप्ती मराठी-"काका-मामा-आत्तोबा-मावसोबा" यांच्यापैकी प्रत्येकांपेक्षा वेगळी आहे.
मात्र मराठीतसुद्धा "काका-मामा-आत्तोबा-मावसोबा-यांच्यापैकी-कुठलाही-एक" हा विचार सांगण्यासारखा आहे. मराठीत ही कल्पना सांगणे अशक्य आहे, असे म्हटल्यास भ्रम आहे. त्याच प्रमाणे इंग्रजीत "पॅटर्नल अंकल-मॅटर्नल अंकल-पॅटर्नल अंकलबाय मॅरेज-मॅटर्नल अंकलबाय मॅरेज" असे शब्दप्रयोग मराठी शब्दांशी समसमान व्याप्तीचे होऊ शकतात.

असे दिसते की भौतिक बाबतीत तरी वरील चर्चेतला प्रश्न सौंदर्यशास्त्रातला किंवा शैली-तंत्रातला आहे.
"मामा" हा शब्द मराठीत बोलताना जितका सहज-शैलीचा आणि डौलदार वाटतो, ते बघावे. त्या मानाने "मॅटर्नल अंकल" हा प्रयोग इंग्रजीत बोलताना सहज-शैलीचा वाटत नाही आणि बेडौल वाटतो.
शब्दप्रयोगाचा डौल आणि अर्थानुभूती यांचा विचार वेगवेगळा केला पाहिजे, असे मला वाटते.

अधिक विचार करता भावनिक तपशीलही भाषांतरात सांगता येतात. येथे चर्चाप्रस्तावकाराने "खमंग"चे उदाहरण घेतलेले आहे. तसेच "खरकटे"चे उदाहरण प्रा. अशोक केळकरांनी अनुवादाबद्दलच्या त्यांच्या लेखात विशद केलेले आहे.

भाषांतर करताना भाषेचा डौल हे जर फलित असेल, तर समव्याप्तीचे बेडौल भाषांतर टाळावे लागते. मूळ संदर्भ तपासून बघावे लागते, की त्या शब्दाच्या अर्थाचे जे खूप कंगोरे आहेत, त्यांच्यापैकी काही अप्रधान आहेत काय? उदाहरणार्थ "खरकटे" कधी वस्तुनिष्ठ संदर्भात येते, तिथे ओले-शिजवलेले अन्न मनुष्याच्या अंगाला लागल्याचा संदर्भ असतो. भावनिक संदर्भ नसतो. (माझी आजी मला एकदा समजावत होती "भाकरी खरकटी असते, पण दशमी खरकटी नसते, म्हणून भाकरी सणासुदीला चालत नाही, दशमी चालते...") कधीकधी भावनिक संदर्भ प्रधान असतो, पण वस्तुनिष्ठ व्याख्या अप्रधान असते. उदाहरणार्थ : "स्वयंपाकघरात खरकटी भांडी साचलेली बघून मला शिसारी आली". मग प्रधान अर्थांगाशी भाषांतराची व्याप्ती जुळवून डौलदार शब्द शोधावा, अशी तडजोड करावी लागते. "खरकटे"साठी संदर्भानुसार "नॉट ओके, डर्टी, स्मिअर्ड विथ फूड" असे सहज-इंग्रजी शब्द पुष्कळदा सुयोग्य असतात.

याबाबत अधिक ऊहापोह अ. रा. केळकरांच्या निबंधात वाचावा. "भाषांतर - विज्ञान की कला" असे काहीसे निबंधाचे नाव आहे.

भाषा-भाषांमधील शब्दांची व्याप्ती वेगवेगळी असते, या फरकाला तात्त्विक फरक मानू नये, असे माझे मत आहे. गूगु येमिथिर्र् भाषकांना "मी", "येथे" वगैरे स्वकेंद्री संकल्पना कळतात, आणि गरज असल्यास ते त्या संकल्पना वापरतातही. (येथे पीडीएफ निबंध बघावा.)

व्यक्ति की, व्याप्ती

धनंजय ही व्यक्ति आहे की, व्याप्ती आहे ह्याच अंदाज इतर उपक्रमींना असेल पण मला मात्र नुकताच कळत आहे. द्यानी माणसाकडुन द्यानकण मिळतील तेव्हढे घेत रहावे असे म्हणतात तसेच केले पाहीजे.

इतरही ब-याच उपक्रमींची ओळख होते आहे; मला एक म्हण आवडते= अति शहाणा त्याचा बैल रीकामा.

चर्चा प्रस्तावाची मांडणी स्पष्ट नाही.

घासकडवी साहेब चर्चेला तुम्ही जो प्रस्ताव ठेवला आहे त्यात मला दोन गोष्टी आढळत आहेत.
एक म्हणजे संस्कृतीबद्दल अनभिद्न्य असणार्‍या वाचकबाद्दल अनादर व समजूतदारपणाचा अभाव:-
एक म्हणजे वेगवेगळी संस्कृती असली तरीही दुसर्‍या संस्कृतीमधील एखाद्या भाषेतील केवळ एक लेख वाचून त्या लेखातील एखादा शब्द जर त्या नव्या वाचकाला, जो वेगळ्या संस्कृतीत, वेगळ्या भाषेत वाढलेला आहे, कळला नाही म्हणून त्याला व त्याच्या भाषेला आधी कमी लेखणं. पण मग लगेचच समजूतदारपणा दाखवत, तसं असल्यास नक्की कुठच्या पातळीला दोन समूहांमध्ये हे संस्कृतीजन्य अनुभूतीतले फरक असतात/दिसतात, व कुठच्या पातळीला साम्यं असतात? असं म्हणणं मला चूकिचं वाटत आहे.

भाषांतर करण्याबाबत व शब्दांच्या अनुभुतीबाबत :-
दुसर्‍या संस्कृतीवर बेतलेल्या लेखाचा आस्वाद घेताना तो भाषक त्या लेखातून / कथेतून जे त्याच्या संस्कृतीत नाही जे त्याला परके आहे त्याकडे कुतुहलाने पहाणारच. एका नवीन संस्कृतीचा अनुभव घेणं हीच वेगळी अनुभूती त्याच्यासाठी असणार.

एखाद्या पुस्तकाचे / लेखाचे भाषांतर करायचे असेल तर आधी त्यातील आशय बाजूला काढावा लागेल मग ते ज्या भाषेत भाषांतरीत करायचे आहे त्यातील संदर्भ शोधून त्यानुसार त्या भाषेत लिहावे लागेतील.

'आता, आमच्या हिनं काय खमंग थालिपीठ बनवलं होतं?' या वाक्याचा आशय (आशय सुचक रुपिका- 'आसुरू') असा असेल -
'लेखकाने आपल्या पत्नीच्या पाककौशल्याचे विशेशपणे 'थालीपिठ' नावाच्या पदार्थाचे तोंडभरून कौतुक केले.'
हे आसुरू ज्या भाषेत भाषेत भाशांतरीत करायचे आहे त्या भाषेचे संदर्भ ध्यानात घेवून जर भाषांतरीत केले की, नवख्या संस्कृतीविशयी जाणून घेणार्‍या त्या वाचकाला ही लेखातील्/कथेतील आशय समजून शब्दांद्वारे 'अनुभुती' मिळेलच, पण त्या सोबत त्याला हे ही कळेल कि या संस्कृतीत 'थालिपिठ' नावाचा खायचा पदार्थ देखील असतो ते.

अनादर नाही...

एक म्हणजे संस्कृतीबद्दल अनभिद्न्य असणार्‍या वाचकबाद्दल अनादर व समजूतदारपणाचा अभाव:-

दुसर्‍या संस्कृतीमधील एखाद्या भाषेतील केवळ एक लेख वाचून त्या लेखातील एखादा शब्द जर त्या नव्या वाचकाला, जो वेगळ्या संस्कृतीत, वेगळ्या भाषेत वाढलेला आहे, कळला नाही म्हणून त्याला व त्याच्या भाषेला आधी कमी लेखणं.

थालिपीठ, खमंग वगैरेचं शब्दशः भाषांतर करता येणं शक्य नाही, तशी 'शब्दशः भाषांतराच्या क्षमतेची अपेक्षा अतिरेकी वाटते.' म्हणजे (संस्कृतीच्या भिन्नतेमुळे) इंग्रजाला थालिपीठ कळण्याची, किंवा त्या शब्दाचं इंग्लिश भाषेत भाषांतर करता आलंच पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं रास्त नाही. यात अनादर कसा काय दिसतो? कमी लेखणं कुठे आलं?

तुम्ही जे आसुरु सांगितलंत ते परिपूर्ण नाही हेच सांगण्याचा प्रयत्न मूळ लेखात आहे. त्यात त्या थालिपीठाचा खमंगपणा नाही.

-माझ्या बायकोने फारच छान थालिपीठ केलं.
-अगं तू खूपच चवदार थालिपीठ करतेस.
-तुझ्या हातचं थालिपीठ खाणं म्हणजे मी माझं नशीब समजतो.
-माझ्या बायकोची स्तुती मी कशी करू कळत नाही, उदाहरणार्थ ती थालिपीठ उत्तम करते.

या व अशा अनेक वाक्यांचं ते आसुरु होतं. मग भाषांतरासाठी आसुरु वापरण्याचा फायदा काय?

मग ते आसुरु बदलून असं करावं का,
'लेखकाने आपल्या पत्नीच्या जिला त्याने जवळिकीने 'आमची ही' असे म्हटले, तिच्या पाककौशल्याचे विशेषपणे 'थालिपीठ' नावाच्या पदार्थाचे तोंडभरून कौतुक 'ते खमंग होतं' असं म्हणून केले.'

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

विधानावरच तर प्रतिसाद अवलंबून असतो

लेखकाने आपल्या पत्नीच्या जिला त्याने जवळिकीने 'आमची ही' असे म्हटले, तिच्या पाककौशल्याचे विशेषपणे 'थालिपीठ' नावाच्या पदार्थाचे तोंडभरून कौतुक 'ते खमंग होतं' असं म्हणून केले.'

मी सांगितलेले आसुरू तितके चूकीचे नाही. पण तुम्ही त्याएवजी आसूरू म्हणून जे वाक्य दिले आहे त्यात भयानक चूका आहेत. आसुरू हे सोबरच असायला हवे. त्यातून वेगळा अर्थ निघता कामा नये.

एक व्यक्ती जी यजमान आहे तीने आपल्या घरी आलेल्या एका पाहुण्यासमोर किंवा मित्रासमोर आपण दिलेले वाक्य 'आता, आमच्या हिनं काय खमंग थालिपीठ बनवलं होतं.' म्हटलेले आहे.
या वाक्यावर पाहुण्याने काय प्रतिक्रिया द्यावी?
१) 'अरे वा! छान.' इतकं बोलून पाहुण्याने आपल्या चेहर्‍यावरील स्मित आटोपतं घेतले.
मनातल्या मनात म्हणणार 'चल पूरे आता! च्यायला स्वतःच्या बायकोचे नुसते गुणगानच करणार कि ज्या कामासाठी आलो आहे त्यावरही काही बोलणार? बायकोला काही पदार्थ बनवायला तर सांगत नाही आहे. चोर लेकाचा.'
२) 'अरे वा! वहीनी, आम्हाला ही तुमच्या पाककौशल्याची चुणूक पहायला मिळायला हवी. असे म्हणून वहीनीकडे (आवंढा गिळत) पहात तिच्या कडून 'कोणती प्रतिक्रीया मिळणार?' असे भाव चेहर्‍यावर आणले. व मनात म्हटले, 'अरे वा आज नाही तर उद्या मला इथे 'जेवायाला' मिळू शकते.'
३) 'काय! म्हणता, खमंगपणा म्हटला कि मला तर वेड लागते. जिभली चाटत वहीनीकडे पहात तो पाहुणा म्हणतो, वहीनी, खमंग थालिपीठ खल्य्याशीवाय मी काही इथून निघणार नाही.' दोन्ही हात पुढे करीत, बोटांची हवेत वळवळ करीत तो पाहुणा वहिनीच्या दिशेने धावत जात, 'वहिनी, खमंगपणा, खमंगपण, थालिपीठ, खमंग वहीनी, मला पाहिजे, नाही मला पाहीजे, म्हणजे पाहीजे.'

या पर्यायांपैकि कोणता पर्याय निवडून पुलंच्या लेखात पुढे लिहीला गेला होता? किंवा वास्तवात घडू शकतो?

जेव्हा घरी आलेल्या पाहुण्यासमोर आपण आपल्या भावना व्यक्त करतो, तशाच त्या भावना आहेत. त्यात 'आमच्या बायकोचा पाकक्रियेचा खमंगपणा' पाहुण्याला काय कळणार? असा विचार नसतोच.
पाहुणा देखील आपली औपचारीकता पार पाडतो. तो जास्त चेकाळत नाही.

लिहीताना, वा भाशांतर करताना वा पुस्तकांचं वाचन करताना (तेही दुसर्‍या संस्कृतीतील, भाषेतील) देखील आपण काही मर्यादा पाळतो, पाळाव्या लागतात.
ह्या आसूरूचे 'आपल्या पत्नीच्या पाककौशल्याचे विशेशपणे 'थालीपिठ' नावाच्या पदार्थाचे तोंडभरून कौतुक केले.' त्याचे
गुजरातीत ,'म्हारी ए! वहू स्वादिष्ट 'लापसी' बनावे छे.' हे असू भाशांतर होवू शकते.
स्वादिष्ट म्हणताना गुजराती माणसाच्या जिभेला पाणी येणारच.

मी फक्त एवढंच म्हणत आहे की वाचकाला एक स्पेस द्यायला हवी. त्यासाठी समजूतदारपणा हवाच.

रिकामटेकडा यांचा खालील प्रतिसाद मला संयुक्तीक वाटतो. त्यावरूनच.....
'अल्लाह हेच अंतिम सत्य आहे.'
'पूणे हे विद्येचे माहेरघर आहे.'
'खमंग थालिपीठं' याचे भाशांतर कसे होणार?'

तुमचा प्रतिसाद कळला नाही

आसुरुचा सोबरपणा म्हणजे काय हे कळलं नाही. अर्थात आसुरु हे तुम्हीच तयार केलेलं असल्यामुळे त्याच्या व्याख्या काय हे ठरवण्याचा तुम्हालाच अधिकार आहे.
समजूतदारपणा कुठे वापरायचा किंवा मुळात समजूतदारपणा म्हणजे काय याबाबतही आपल्या वेगळ्या व्याख्या दिसतात.

दोन्ही हात पुढे करीत, बोटांची हवेत वळवळ करीत तो पाहुणा वहिनीच्या दिशेने धावत जात, 'वहिनी, खमंगपणा, खमंगपण, थालिपीठ, खमंग वहीनी, मला पाहिजे, नाही मला पाहीजे, म्हणजे पाहीजे.'

हे चेष्टा करण्यासाठी लिहिलं आहे की काय हेही कळलं नाही.

असो. प्रतिसाद कळला नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

कुराण

अजून कोणी पिंकर, चोम्स्की, यांचा उल्लेख कसा केला नाही?

अरेबिक शिकल्याशिवाय देवाचा संदेश नीट समजत नाही, अल्ला म्हणजे गॉड नाही, इस्लाम हा केवळ धर्म नाही, असल्या विधानांना केवळ आधुनिकोत्तरवादी लोकच भाव देतात.

"कुरकुरीत भाजल्या-तळल्यामुळे स्वादिष्ट भाजक्या गंधाचे"

खमंग = "कुरकुरीत भाजल्या-तळल्यामुळे स्वादिष्ट भाजक्या गंधाचे" अशी काही व्याख्या आहे, असे मला वाटते.

(शिरा करताना रवा भाजतात, तोही खमंगच ना? की नुसता खरपूस? "खमंग"च्या बहुतेक संदर्भात "मसालेदार"सुद्धा असते. पण "शिर्‍यासाठी रवा खमंग भाजला" असे कधी ऐकले होते, म्हणून "मसालेदार" हे व्याख्येत घातलेले नाही.)

असेच काहीसे

काही वेळा खमंगला समानार्थी शब्द म्हणुन खरपुस वापरला जातो. असेही म्हणता येईल कि "खमंग = "कुरकुरीत भाजल्या-तळल्यामुळे स्वादिष्ट भाजक्या गंधाचे" यातील खरपुस हा शब्द फक्त भाजण्याबाबत लागु होउ शकतो.
मी खमंग थालपीठ खाल्ले
मी खरपुस थालपीठ खाल्ले
मी खरपुस मार खाल्ला
मी खमंग मार खाल्ला
अशी वाक्ये वाचल्यावर डोळ्यासमोर काय भावार्थ येतो?
समूह, जथा,चमु, कळप, टोळी,जमाव,झुंड, मेळा हे शब्दप्रयोग केव्हा कुठे वापरायचे याबाबत असलेली भाव सापेक्षता. कळप हा प्राण्यांचा समूह पण त्यात माणुस हा प्राणी मात्र वगळला आहे. चोरांचा मेळा व साहित्यिकांची टोळी हे शब्द कसे वाटतात?
सामान्य बाई बाळंत होउन तिला मुलगा किंवा मुलगी होते, महाराणी प्रसुत होउन त्यांना पुत्ररत्न वा कन्यारत्न होते, गाय व्याते आणि तिला कालवड किंवा गोर्‍हा होतो.
अ संकेतस्थळावरील लोक चर्चा करतात, ब संकेतस्थळावरील लोक काथ्याकूट करतात.क संकेतस्थळावरील लोक बरळत असतात. ड संकेतस्थळावरील लोक वितंडवाद घालतात
प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ

साहित्यिकांचा तर रमणा अस्तो म्हणे?

अ संकेतस्थळावरील लोक चर्चा करतात, ब संकेतस्थळावरील लोक काथ्याकूट करतात.क संकेतस्थळावरील लोक बरळत असतात. ड संकेतस्थळावरील लोक वितंडवाद घालतात.

चर्चा बाब्या-कार्टे वादाकडे जाऊ शकेल. ऑर्वेलचा शुभाशीर्वाद आहेच ;)

अनूभूती म्हणजे भावना असा अर्थ घेऊन

आपण जेव्हा इतरांपेक्षा वेगळे असं म्हणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच मूलभूत बाबतीत साम्यं असतात हे खरं का?

मूलभूत साम्ये असतात - ती म्हणजे माणसाच्या समूहांना संवाद साधण्याची गरज असते. त्यावेळी भाषा आड येत नाहीत. शब्दांची भाषा ही माणसांना एकमेकांशी संवाद (किंवा विसंवाद!) साधायला उपयोगी होते. भाषा समजत नसली, तर हातवारे, आविर्भाव यातून संवाद घडतात.


एखादा समूह वापरत असलेली भाषा व तद्जन्य अनुभूती हे कितपत जोडलेले असतात? (दुव्यात विशिष्ट भाषेत डावं, उजवं, मागे, पुढे ऐवजी कायम पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर वापरणाऱ्या समूहाविषयी छान उदाहरण आहे) व्यापक दृष्टीने एखाद्या समाजाची संस्कृती (भाषा हे केवळ एक अंग झालं) ही त्या समाजाच्या, त्यातील सर्वसाधारण व्यक्तीच्या अनुभूतींना घडवते का?

अनुभूती भाषेतून व्यक्त होते असे वाटते. भाषा बहुतेक अनुभूतींना (त्या समाजाच्या परिघात) सर्वांना समजेल असा एक कॉमन अर्थ प्राप्त करून देत असावी आणि संस्कृती एका समाजाला जोडणार्‍या अशा अनुभूती व्यक्त करण्याच्या सर्वसाधारण चौकटीला म्हणू शकू असे वाटते. ही चौकट/फ्रेम काळाप्रमाणे बदलत असावी.

खमंग म्हटल्यावर आपल्याला जो वास, रंग डोळ्यासमोर येतो (अनुभूती) तो आपल्या समाजापुरता मर्यादित राहतो. बाहेरच्या कोणाशी खमंग म्हणजे काय ते सांगताना आपण त्याला वर्णन करून सांगू किंवा दुसरा जवळचा शब्द शोधू. धनंजय यांनी उदाहरण दिल्याप्रमाणे कोणी खमंग असा रवा भाजला आणि कोणा परदेशी मित्राला दाखवले (किंवा भिन्नप्रांतीय) मित्राला दाखवले आणि या अशा भाजण्याला खमंग म्हणतात असे म्हटले तर तोही त्या शब्दाचा अर्थ जाणणार, आणि तेवढ्यापुरता त्या शब्दाचा अर्थ जाणण्यापुरता त्या समाजाचा भाग होणार.

तसं असल्यास नक्की कुठच्या पातळीला दोन समूहांमध्ये हे संस्कृतीजन्य अनुभूतीतले फरक असतात/दिसतात, व कुठच्या पातळीला साम्यं असतात?

आपल्याकडचे "अहो" आणि अमेरिकेतील "स्वीटहार्ट" ही दोन्ही नवर्‍याला उद्देशून संबोधनेच आहेत. त्यामागे प्रेम ही अनुभूती धरली तर ती बदलत नसावी, पण संस्कृतीतील काळाचा फरक आणि समाजमान्यतेचा समज या दोन संबोधनांमधील फरकाचे कारण असावीत.

आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ कसा जाणवतो हे आपल्या परिघाप्रमाणे ठरणार. उदा. अमेरिकेत मॅड या शब्दाला वेगळा अर्थ आहे असे मला वाटते. मॅडचा अर्थ आपण सर्वसाधारणतः वेडा असा धरतो, इथेही तोच अर्थ आहे पण वापरताना त्यात चिडणे, डोके फिरणे अशा प्रकारचा अर्थ आहे असे जाणवते. त्यात वेडसरपणाची झाक असावी, पण राग येणे हे अधिक अभिप्रेत असते. त्याउलट वेडसरपणाला लोक "क्रेझी" असे म्हणतात असे दिसते. राग येणे, वेडसरपणा हे दोन्ही अनुभूती सगळ्या समाजांना येत असाव्यात. त्याअर्थी त्यात फरक नसावा. पण व्यक्त करायला शब्द वेगळे वापरले जातील कदाचित.

दुसरे एक असे की, एखाद्या समाजाच्या एका कालखंडात जे वर्तन साधारण आहे, ते दुसर्‍या कालखंडात तसे साधारण नसू शकते त्यामुळे होणारी प्रतिक्रिया (अनुभूती) आणि त्या अनुषंगाने वापरली जाणारी भाषा, दोन काळांत अगदी विरोधी असू शकते. म्हणजे एकाच समाजाच्या काळाप्रमाणे एकाच घटनेमुळे होणार्‍या अनुभूती वेगळ्या असतात, बदलतात त्याअर्थाने संस्कृती बदलत जाते, तशी भाषाही बदलत जाते.

थोडक्यात साम्य एवढेच असावे, की समाजाला होणारे राग, लोभ, प्रेम या भावनांचे दोरे तेच राहतात, पण कुठचे दोरे कशामुळे कधी एकत्र येऊन कसले वस्त्र बनेल याचे गणित बदलते.. (फारच फुलोरा असलेले खांडेकरी वाक्य वाटते आहे! ).

जर विषय भरकटला असला/मला अर्थ कळला नसला, तर क्षमस्व.

खमंग ला पर्यायी शब्द खमंग च

खमंग ला पर्यायी शब्द खमंग च आहे. ज्या भाषेत जो शब्द असतो त्याला परकीय भाषेत प्रति शब्द असेलच असे नाही. त्या मुळे तो शब्द जश्याचातसा दुसऱ्या भाषेत वापराने सोयीस्कर ठरते. जसे रेल्वे, स्टेशन, फोन , असे इंग्रजी शब्द भारतीय भाषेत जश्या तसे वापरले तरी कांही फरक पडला नाही. हे शब्द भारतीय भाषात सामावून गेले आहेत. आणि प्रत्यक्ष थालीपीठ जेंव्हा कोणी परकीय खाईल तेंव्हा तेंव्हा त्याला खमंगपणा आपोआप जिभेला जाणवेल.

सहमत

सहमत आहे.
श्री. ठणठणपाळ यांच्याशी सहमत होण्याची दोन दिवसात दुसरी वेळ :)

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नि अगिविनयो, चिट्टि नि वुयथिनयो, मिनसारम वुडलिल रत्तम, नवीन उळगतिल अरविल अधसियम
वायवुंड अनार वयनिल्लय, पेचीवुंड मूचियिल्लय, नाडीवुंड इरथियम इल्लय, गोवर्धन मुंड थिमिर इल्लय

तरी थालीपीठ वाढण्यापूर्वीसुद्धा मित्रांशी बोलावे

श्री. ठणठणपाळ म्हणतात की परकीयांना थालीपीठ खाण्याची अनुभूती होईल तोवर त्यांना "खमंग" कळणारच नाही. आणि अर्थ कळल्यावर ती परकीय व्यक्ती कुठला प्रतिशब्द न-वापरता "खमंग" हाच शब्द वापरेल.

ठीक आहे.
- - -
पण परकीय मित्राशी खाद्यपदार्थांबद्दल बोलताना "खमंग" शब्द अडखळताच बोलणे बंद करू नये. "थालीपीठ करून तुला वाढतो तोपर्यंत दोघे चुऽऽप्!" असे केल्यास सर्व संवाद बंद होईल.

माझ्या मते थालीपीठ करून घालण्यापूर्वीसुद्धा काही अर्थपूर्ण देवघेवीचे संवाद होऊ शकतात. झालेच पाहिजे.

- - -
नाहीतर कोणी मुंबईकर उर्वरित महाराष्ट्रातील शेतकर्‍याला म्हणेल : "अकाली आणि वारंवार वीज गेल्याचा अनुभव मला आलेला नाही, त्यामुळे "वीजकपाती"मुळे तुझी होणारी ससेहोलपट मला मुळीच समजू शकत नाही. मला कार्यालयातून दीर्घकालीन सुटी मिळून जोवर मी बराच वेळ तुझ्या गावात घालवत नाही, तुझी अनुभूती अनुभवत नाही, तोवर आपण ही चर्चा ठप्प करू!"

माझ्या मते हे ठीक नव्हे. तंतोतंत अनुभूती होण्यापूर्वी काही सामान्य अनुभूतींचा संदर्भ घेऊनही संवाद अर्थपूर्ण होऊ शकतो. म्हणजे मुंबईबाहेरचा मुंबईकराला आठवण करून देतो - "घरचा फ्यूझ उडाला की उपकरणे बंद होतात तो अनुभव तुला आहे का? त्याला म्हणतात वीज जाणे. दिवस-रात्र यांचे चक्र तू अनुभवले आहेस का? काही गोष्टी दर दिवशी होतात ते तू अनुभवले आहेस का? त्याला म्हणतात दररोज. वीज पुरवठा करणार्‍या संस्थेला रक्कम भरण्याचा तुला अनुभव आहे का? त्या संस्थेला वीज पुरवठा चालू-बंद करता येतो, त्याची काही कल्पना स्वानुभवातून तुला आहे का? त्याला म्हणतात वीजमंडळाकडून वीज खंडित होणे. वगैरे, वगैरे... अशा तर्‍हेने मुंबईकराला स्वतः अनुभूती घेण्यापूर्वी "दररोज वीजकपात" या शब्दप्रयोगाचा काही अर्थ सांगता येतो. इतकेच काय, या "वीजकपाती"ने भावनिक "ससेहोलपट" होते. हासुद्धा अर्थपूर्ण संवाद बहुधा होऊ शकतो.

होऊ शकतच असावा. नाहीतर श्री. ठणठणपाळ यांचे वीजकपातीविषयी लेखन मुंबईकराला निरर्थक होऊ लागेल. मुंबईकरासाठी सुद्धा ते पूर्णपणे निरर्थक नसावे, असे श्री. ठणठणपाळ यांनाच वाटते - त्यांच्या लेखनशैलीवरून असा भास होतो.

- - -

पित्झ्यावर कांदा-मिरेपूड घालून तो भाजला तर खमंग वास-स्वाद येतो. थालीपीठ न-खाल्लेल्या काही पित्झेकर लोकांना ही अनुभूती असेल. चिनी लोक चरचरीत परतून भाज्या करतात, किंवा तांदळाची "थालीपिठ-वजा" पॅनकेक बनवतात, त्याला खमंगपणा असतो. त्या स्मृतीच्या साहाय्याने पित्झेकर किंवा चिनी लोकांना अर्थ सांगता येतो का? संवाद साधता येतो का? असा प्रयत्न करून बघावा.

चिनी

चर्चा बंद करू नये याच्याशी सहमत आहे.

--

चिनी भाषेबद्दल इतक्या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकल्या आहेत की उत्सुकता शिगेला पोचली आहे. त्यांच्याकडे म्हणे ~ ४८,००० मूळाक्षरे असतात त्यातील जी वापरात नसतील ती विस्मृतीत जातात. आजच एका चिनी गावातील लोकांना त्यांचे नाव फारच दुर्मिळ होते आणि टंकता येणे शक्य नव्हते म्हणून बदलावे लागल्याची बातमी वाचली.

या पार्श्वभूमीवर त्यांच्या कडे चवीसाठी काय शब्द असतील, कसे वापरत असतील सगळेच अद्भुत वाटते.

अवांतर : विक्रम सेठ म्हणे एका वर्षात चिनी भाषा शिकला. प्रयत्न करावासा वाटतो पण ५००० मूळाक्षरे शिकायची म्हटल्यावर छाती दडपते.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम

नावे बदलणे!

इथे वेल्समध्ये उलट प्रकार दिसतो (दुवा).

("मुळाक्षर" ही संकल्पना चिनी लिपीमध्ये नि:संदर्भ आहे. हजारो शब्द आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळी चिह्ने आहेत, हे खरे. चिनी मित्रांना विचारले तर कळते, की प्रौढ वयात ते अधूनमधून काहीकाही नवीन शब्द/चिह्ने शिकत असतात. म्हणजे आपण प्रौढ वयात अधूनमधून नवीन मराठी शब्द शिकत असतो, तसेच. शिकणे कधीच संपत नाही. रास वाटत असेल तर बिनधास्त चिनी शिकायला घ्या, या बाबीचा धसका घेऊ नका, असा मी तुम्हाला आग्रह करतो.)
("मुळाक्षर" च्या थोडेसे समांतर "कुंचल्याचे ठराविक फराटे' असू शकतील, असे मला वाटते. ते फक्त ८ आहेत, किंवा थोडे अधिक बारकाईने बघितल्यास ३१ आहेत. या आठ प्रकारच्या फराट्यांमधून सर्व शब्द-चिह्ने बनतात. [अक्षर-चिह्ने असे काही नसते.])

अनुस्वार

म्हणजे चीनी भाषेत अक्षरसाधर्म्यामुळे गोंधळ उडत नसावा.

माडी आणि मांडी यांची शब्दचिह्ने पूर्णपणे वेगळी असणार. केवळ अनुस्वाराचा फरक नसणार. :)

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

आभार/काळ-काम-वेग

माहितीबद्दल आभार. मुख्य अडचण काळ-काम-वेगाच्या गणिताची आहे. अशी गणिते शाळेत सोडवायलाच सोपी होती, प्रत्यक्षात नव्हे.
चिनी कदाचित पुढेमागे घेईनही शिकायला. पण त्याआधी फ्रेंच आणि बंगाली यांचा नंबर आहे :)

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम

शब्द

चांगली चर्चा चालू आहे.

विनोबा भावेंचे एक मत यावरून आठवले. त्यांच्या मते शब्द हे आपल्या मनातील भावना/अनुभूती इत्यादींचे विकृतीकरण असते. (म्हणून त्यांचे मौन!) म्हणजे नेमके आपल्याला काय वाटते हे शब्द सांगू शकत नाही. थालिपीठाचा खमंगपणा हा अर्थ मी दुसर्‍याला खमंग थालिपीठ खायला घालूनच समजावू शकतो. पण त्यातही मला वाटणारा आणि दुसर्‍याला वाटणारा खमंगपणा वेगवेगळाच राहणार. दुसरे तसेच मत म्हणजे एका शब्दाचा अर्थ दुसरा शब्द होत नाही. (हे पण खूप प्युरिटन झाले.) नाहीतर आपण दोन वेगवेगळे शब्द म्हणून ओळखले नसते. लहानपणची आठवण म्हणजे 'माणूस' शब्द उच्चारल्यावर मला नेहमी आमचा भाजीवाला आठवायचा (दिसायचा), 'इसम', 'मानव', 'असामी' शब्द उच्चारल्यावर ते रूप वेगळे असायचे. ही अनुभूती माझ्या साठीची दुसर्‍याला सांगणे दुरापास्त आहे.

विंदा करंदीकरांचे (गो.वि.करंदीकर या नावाने) एक लघुनिबंधाचे पुस्तक आहे. त्यात पानगीवर एक निबंध आहे. लहानपणी खाल्लेली पानगी आताशा कोणी बनवत नाही (ती चव, वातावरण वगैरे सकट) अशी त्यात खंत आहे. अनुभूतींचा प्रवास काही शब्दात पकडणे कठीण म्हणून एक लघुनिबंध झाला.

प्रमोद

थालीपीठ इज खमंग

एखाद्या नेटीव्ह इंग्रजी माणसाला जर खमंग थालीपीठामागची संकल्पना नीट समजावुन सांगितली तर ती म्हणेल, "आय विल बॉरो थिस वर्ल्ड ऍज इज" आणि असे ट्रान्सलेशन करेल, "माय वाईफ मेक्स द थालीपीठ खमंग"!

तुमचा विषय थोडा वेगळा आहे ह्याची जाणीव आहे पण इंग्रजी माणसाला ह्यासगळ्या बद्दल काय वाटेल ह्याचा अंदाज न घेता ह्यावर चर्चा करणे म्हणजे एकांगी विचार होतील असे वाटले म्हणून वरील मत.

इंग्रजी समृद्धा होण्याच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण असावे की, तेथील भाषाकारांना ह्या अनुभूतीची नेमकी जाणीव असावी आणि त्यामुळे एखाद्या शब्दाचे उगीच्च ओढून ताणून भाषांतर करण्यापेक्षा तो शब्द जसाचातसा घेऊन त्याचा अर्थ नेमकेपणे स्पष्ट होईल ह्यासाठी डिक्शनरीमधे त्याबद्दल लिहीणे.

 
^ वर