बालकांचा चिम्मणचारा

बालकेच ती, खेळणारच. जन्मजात स्वभावच त्यांचा, इकडे तिकडे हुंदडण्याचा. त्यामुळे त्यांनी पोटभर खाल्ले नाही की आईच्या पोटात कालवाकालव होते. मुळात बालकांचे वयच खाण्यापेक्षा खेळण्याकडे ओढा असणारे. त्यांनी पुरेसे म्हणजे एक चपाती, थोडी भाजी, वाटीभर वरणभात वगैरे खाल्लं नाही म्हणजे ती मुलं अर्धपोटी खेळत आहेत हा समजच चुकीचा!
खरे तर तासाभराने घासभर 'चरण्याची' बालकांची मूळ वृत्ती असते. परंतु आपण मोठी माणसं उगाचच त्यांचे खाणे वेळेत अन् वजनमापात तोलत बसतो. त्यांना वेळेनुसार खायला देण्याऐवजी वेळोवेळी द्यावे लागते तरच ते पचते, अंगी लागते. कारण त्यांच्या जठराचा आकार एकाच वेळी एक पोळी अन् वरणभात इतकं अन्न साठवून घुसळण करण्या इतका सक्षम नसतो. जसजशी वाढ होईल तशी पचन संस्थेची वृद्धी होत जाते. तरीही बालकांच्या अशा वाढीच्या वयात योग्य ते पोषकांश शरीराला प्राप्त करुन देणं हेच खरं पालकांचं काम.
काही बालकांना भूक लागल्याची जाणीव होते, कळते. मग ते खाऊ खाऊ करतात. तर काहींना भूक लागलीय याची नीटशी जाणीव न समजल्यामुळे ते रडतात, चिडचिड करतात. अशा वेळी पालकांचाच कस लागतो की बालकाला भूक लागलीय की झोप? भुकेच्यावेळी त्यांना आवडणारा, भावणारा पदार्थ लगेच असेल तर मुलं पोटभर जेवतात. ही त्यांची मानसिकता सवयीनं अन् अनुभवानं शिकण्याची गोष्ट आहे. फार थोडी मुलं 'मला खूप भूक लागलीय, जेवायला दे.' असं ओरडून सांगू शकतात. हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. काही बालकांना मोठे झाले तरी 'हा घास चिऊचा, हा घास काऊचा' असं करीत भरवावं लागतं. तर काहींना काहीही चारण्यासाठी मारावं लागतं. जितक्या बाललीला तितक्या खाऊ घालण्याच्या कला अंगिकाराव्या लागतात.
या वयातील (२ ते ५) बालकांना अधिक कॅलरीजची आवश्यकता भासते. कारण ते खेळकर असतात. त्यांचे शरी जादा ऊर्जेची मागणी करीत असते. शारीर क्रियांतील चयापचयाचा वेगही इतरांपेक्षा अधिकच असतो. अशामुळे योग्य तितके पोषकांश शरीराला मिळाले नाहीत तर कुपोषण होते. साधारणतः बालकांना पुढीलप्रमाणे कॅलरीजची आवश्यकता असते-
1) वय- १ ते ३ वर्षे
वजन- १२ कि.ग्रँ. (आसपास)
उष्मांक- १२२० किलोकॅलरीज.
2) वय- ४ ते ६
वजन- १९ कि.ग्रँ. (आसपास)
उष्मांक- १७२० किलोकॅलरीज.

पुढील वेळापत्रकानुसार बालकांचा आहार तक्ता आखावा-

सकाळी ६.३० दूध
७.३० नाष्टा- रवा, उप्पीट, गोड चपाती.
९.०० प्रोटीनेटेड मिल्क
११.०० गोड बिस्किटे

दुपारी १२.३० जेवण- पोळीभाजी, वरणभात, कोशिंबीर किंवा लस्सी
३.०० फ्रुट ज्युस किंवा मिल्क शेक
४.०० हॉर्लिक्स, कॉम्प्लँन, बूस्ट इ. एनर्जायझर द्यावे.
७.०० जेवण- मऊ चपाती, हेल्दी वेफर्स, इडली, डोसा, उत्तप्पा इ.

रात्री ९.०० दूध.

ही सारणी आदर्श आहारपद्धत म्हणून सुचविली जाते. यामध्ये बालकांच्या सवयीनुसार वेळांमध्ये बदल केला जाऊ शकतो. तसेच चवीनुसार विविध पाकसिद्धी देखील बदलता येऊ शकतात.

पूर्वी आमची आजी वा पणजी आमच्या खिशात सुकामेवा (बदाम, काजू, बेदाणे, खारीक खोबरे इ.) किंवा रानमेवा (फळे, शेंगा) यांचा 'चिम्मणचारा' भरायची. येता जाता आम्ही तो हादडत असू. त्यामुळेच बहुदा आम्ही धट्टेकट्टे निपजलोत!
आजच्या इन्स्टंट जमान्यात हा चिम्मणचारा कालबाह्य झालाय. तरीही बदलत्या काळानुसार सवयी बदलाव्याच लागतात. म्हणून बालकांच्या पुढ्यात कुरकुरे, वडापाव, भेळ असला निकृष्ट चिम्मणचारा न ठेवता त्यांना आवडणारे ड्रायफ्रूट्स (अक्रोड, प्रेस्ड अंजीर, आंबावड्या, चारोळ्या, पिस्ते इ.) किंवा सिजनल फळे, कंदमुळे (गाजर, रताळे, बीट इ.) हे द्यावे. बालकांच्या कलाकलाने त्यांना व्यवस्थित खाऊ घातल्यास ते किलोकिलोने वाढतील यात शंका नाही...

लेखनविषय: दुवे:

Comments

भूक लग्गी बस दो मिनट

भूक लग्गी बस दो मिनट च्या जमान्यात आपण आम्हाला आमच्या लहानपणाच्या जगात घेवून गेलात या बद्दल धन्यवाद . कोई लोटा दे मेरे बचपन के दिन असे म्हणावसे वाटते. आज डायटिंग च्या जाहिरातीच्या जमान्यात बाळाने काय खावे, डायपर कोणते घालावे , त्याला आईने दुध पाजावे की नाही , आंघोळ कोणत्या साबणाने घालावी हे TV वरील भाड्याच्या आई ठरवत असतात आणि सारासार विचार न करता आपण त्यांचे अंधानुकरण करत आपल्या बाळाला सक्षम बनविण्या ऐवजी दुर्बल बनवत आहोत याचे भान राहिलेले नाही. माझा डॉक्टर मित्र तर आई बाबांना सरळ सांगतो कांही करू नका बाळाच्या हाताशी लागेल त्याला सहज घेता येईल अश्या ठिकाणी शेंगदाणे , गुळ ,दाळव ठेवा त्याच्या मनाला येईल त्या वेळी त्याला बकाणा भरू द्या .अडथळे आणू नका. मग बघा . बाळाची प्रकृती..
thanthanpal.blogspot.com

वा - चांगला विषय

मध्यमवर्गीयांपैकी कित्येकांना हा चिम्मणचारा परवडण्यासारखा आहे.

भाजलेले शेंगदाणे, किंवा कुरकुरीत भाजलेली कडधान्ये हे पौष्टिक पदार्थही चवीला छान असतात.

ताजी फळे आणि भाज्या फार महाग* असू नयेत, अशा प्रकारचे आर्थिक आणि शेतकी धोरण असले, तर चांगले होईल. मध्यमवर्गाबरोबर कनिष्ठ मध्यमवर्ग आणि बहुजनसमाजही ताज्या भाज्या, ताजी फळे आहारात घेऊ शकेल.

- - -
*"फार महाग" या शब्दप्रयोगाने "शेतकर्‍याचा अपमान" ध्वनित होतो, असे श्री. ठणठणपाळ यांचे मत आहे. येथे शेतकर्‍यांचा अपमान अभिप्रेत नाही. अथवा शेतकर्‍यांची हानी व्यावी असे आर्थिक आणि शेतकी धोरण अभिप्रेत नाही. ज्या बहुजनसमाजाला अन्न परवडावे अशी आशा मी केलेली आहे, त्यांच्यापैकी कित्येक शेतकरीसुद्धा असावेत. शिवाय मध्यमवर्गीयांपैकी सुद्धा काही शेतकरी असावेत. कुठलाच शेतकरी सर्व पिके स्वतःच्या शेतात पिकवत नाही. अन्न विकतही घेतो. महाग अन्नाची झळ शेतकर्‍यांना पोचत नाही, फक्त फायदाच होतो, असे जर श्री. ठणठणपाळ यांना वाटत असेल, तर ते विस्मरणातून होत आहे. श्री. ठणठणपाळ यांचा गैरसमज होऊ नये, अशा प्रकारचा वेगळा शब्दप्रयोग कोणी मला सांगितला, तर मी तो जरूर वापरेन. मात्र त्यांच्या सोयीसाठी जो बदल करेन त्याला "आदल्या शब्दप्रयोगाबद्दल माफी" मानू नये. माफी मागण्यासारखे येथे काहीच नाही, असे माझे मत आहे.

शेतकऱ्याला अन्नदाता म्हणावयाचे

ताजी फळे आणि भाज्या फार महाग असू नयेत, अशा प्रकारचे आर्थिक आणि शेतकी धोरण असले, तर चांगले होईल. इतर सर्व वस्तूंचे भाव हे वस्तूचा निर्माता ठरवत असतो. आणि ग्राहक त्या भावात विनातक्रार तो माल खरेदी करत असतो. शेतकऱ्याला अन्नदाता म्हणावयाचे आणि दुसरी कडे शेत मालाचे भाव वाढले की तक्रार करायची ही नित्ती दुपट्टीपणाची आहे. शेतकऱ्याला एक दोन थेले खत सुद्धा लाठ्या खाल्या शिवाय मिळत नाही. हंगामात बियाणे बाजारातून गायब केले जाते. दामदुप्पट दराने बियाणे घ्यावे लागते. त्यात त्यास आस्मानी सुलतानी ( राज्यकर्त्याच्या ) संकटास तोंड द्यावे लागते. आठवड्य्तून एक वेळ बाहेर जेवणाचे जे बिल आजकाल होते . त्यात कपात केली तर आठवड्याचे सातही दीवस आपण ताजा शेती माल खावू शकतो. शेती जगली तर शहरे जगतील हे पाहीले ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

आम्ही शेती करत नाही.

---इतर सर्व वस्तूंचे भाव हे वस्तूचा निर्माता ठरवत असतो. आणि ग्राहक त्या भावात विनातक्रार तो माल खरेदी करत असतो. शेतकऱ्याला अन्नदाता म्हणावयाचे आणि दुसरी कडे शेत मालाचे भाव वाढले की तक्रार करायची ही नित्ती दुपट्टीपणाची आहे. शेतकऱ्याला एक दोन थेले खत सुद्धा लाठ्या खाल्या शिवाय मिळत नाही. हंगामात बियाणे बाजारातून गायब केले जाते. दामदुप्पट दराने बियाणे घ्यावे लागते. त्यात त्यास आस्मानी सुलतानी ( राज्यकर्त्याच्या ) संकटास तोंड द्यावे लागते. ----

हे असे आहे हे माहीती असल्यामुळे आम्ही शेती करत नाही.

तो संघटीत होईल तेंव्हा पळता भुई थोडी होईल.

आपण फार मोठा पराक्रम करत आहोत या थाटात हे असे आहे हे माहीती असल्यामुळे आम्ही शेती करत नाही. अशी भाषा करत आहात . उंटावरून शेळ्या हाकण्या सारखा हा प्रकार नाही, किंवा नोकरी सारखा सरळसोट मार्ग नाही हे आपणच मान्य केले हे बरे झाले.शेती करणारा हाडाचा मेहनती असतो. ते आपनासाराख्याचे काम नव्हे. आज तो असंघटीत आहे म्हणून आपण थाटात वावरत आहात ज्या दिवशी तो संघटीत होईल तेंव्हा पळता भुई थोडी होईल.
thanthanpal.blogspot.com

ठीक

ठीक. संबंध कळला नाही.

शेतकरी संघटित होता -> नोकरदारांची भुई पळता कमी झाल्यावर -> त्यांनी त्यांच्या बाळांना चिम्मणचारा देऊ नये...

अशी काही विचारांची साखळी आहे काय?

आपण फार मोठा पराक्रम करत आहोत...
आपण थाटात वावरत आहात...

(येथे पहिल्या वाक्यात "आपण = तुम्ही व मी" असा अर्थ लागतो आहे, आणि दुसर्‍या वाक्यात "आपण = तुम्ही" असा अर्थ लागतो आहे. त्यामुळे रोख नीट लक्षात येत नाही.
"ठणठणपाळ+उपक्रमाचे अन्य वाचक पराक्रम करत आहोत" अशी सुरुवात करून पुढे "ठणठणपाळ सोडून उपक्रमाचे अन्य वाचक थाटात वावरत आहोत" असा काही रोख आहे काय?

रोख वरील प्रतिसादकर्त्यांबद्दल आहे काय? (प्रतिसादाखाली उपप्रतिसाद असता तर कळायला सोपे गेले असते.) यातील एक प्रतिसादकर्ता मी आहे. शेतकर्‍यांनी आर्थिक बाबतीत संघटित व्हावे, याला माझा पाठिंबा आहे. जिथे मुळात पाठिंबा आहे, तिथे बळेच विरोधाचा आरोप करणे म्हणजे काय? खरूज नसून खाजवून पित्त उठवणे होय. भांडकुदळपणामुळे संघटना होण्यात अडथळा येत असेल काय -- असा विचार श्री. ठणठणपाळ यांनी स्वतःशी करून बघावा. नाहीतर श्री. ठणठणपाळ यांच्यासारख्या क्रोधिष्ठ आणि अकार्यक्षम संघटकाकडे सुज्ञ शेतकरी दुर्लक्ष करतील. जिथे पाठिंबा आहे, तिथे सांधे जोडून कार्यक्षम संघटन करून घेतील.

 
^ वर