निद्रेची चिरफाड

निद्रादेवीची कुंडली मांडून तिला समजून घेणं फारसं अवघड नाहिये. ती आपल्यावर का बरे रुसलीये याचीही उत्तरे मग शोधता येतात. पूर्वीची माणसं उशाला दगड घेऊनही प्रगाढ झोपत असत असे म्हणतात. याउलट आजच्या सिमेंटच्या जंगलात दगड सापडणे दुरापास्त झाल्यामुळे की काय कोण जाणे, माणसांना मऊ उशा अंगाखाली घेऊनही 'म्हणावी तशी' झोप लागत नसते. किंबहुना अशी तक्रार नेहमी कानावर येते. त्यामुळेच निद्रेची चिरफाड करण्याचे योजिले आहे.

तर ती निद्रादेवी एकटी नसून त्या दोन जुळ्या बहिणी असतात. भिन्न स्वभावाच्या, विरोधी आचरणाच्या. रात्रभर त्या फेर धरुन कधी झिम्मा, कधी लपाछपी तर कधी खोखो खेळतात. एकीनं व्यक्ति झोपवली की दुसरी त्या व्यक्तिला उठवण्याचा, जागते ठेवण्याचा प्रयत्न करते.
एकीचं नाव शांता. ती नावाप्रमाणेच शांत झोपेचं वरदान देते. तिला शास्त्रीय परिभाषेत नॉनरैपीड आय मूव्हमेंट स्लीप (नॉनरेम) म्हणायचं.
तर दुसरीला रैपीड आय मूव्हमेंट स्लीप (रेम) अर्थात परखड भाषेत 'चळमुंगळी' म्हणायचं. ही बयाच फार त्रासदायक असते. हीच व्यक्तिला 'जागते रहो'ची साद घालीत सतावते.
नॉनरेम निद्रेच्या १, २, ३, ४ अशा उत्तरोत्तर गडद होणाऱ्‍या प्रत्येकी ९० मिनिटांच्या पायऱ्‍या असतात. म्हणजे शांतेची चौथी स्टेज ही प्रगाढ वा साखरझोप असते. वाढत्या टप्प्याप्रमाणे चौथ्या स्टेजला एकदम परब्रह्म समाधीच लागते, इतकी की काही कोवळ्या नवजात बालकांना किंवा मृत्युशय्येवरील वयस्कांना याचवेळी स्वर्गाची द्वारे खुली होतात! हू नाही की चू नाही, डायरेक्ट मुक्तीच. अशा 'शांते'चं गुणवर्णन करावं तितकं कमीच.
असो.
तर या नॉनरेमच्या चारही स्टेजमध्ये हटकून व्यत्यय आणते ती रेमनिद्रा. ती साधारणतः ५ ते ३० मिनिटे (व्यक्तिपरत्वे) प्रत्येकाला सतावते. याच काळात डोळे गरागरा फिरुन व्यक्ति चाळवली जाते. रेम मध्ये पडलेली वाईट स्वप्ने दिवसाही आठवून भिववतात. हीच चळमुंगळी बया उत्तेजित करुन पुरुषांचे कपडे ओले करण्याचं धारिष्ट्य दाखवते. हिच्यामुळेच व्यक्ति झोपेत बावचळतात. एकंदर हिचं वर्तनच हानिकारक. आणि म्हणूनच जेव्हा या बयेचा ताल बेताल होतो (३० मिनिटांपेक्षा अधिक) तेव्हा आपल्याला नीटशी झोप लागत नसते, आपण अनिद्रेची तक्रार करतो.

आता वाचकांच्या लक्षात आलंच असेल की कसेही करुन या 'चळमुंगळी'चा बंदोबस्त केला की 'शांता' नक्की भेटणार.
तेव्हा रेमचा कार्यकाल कमी करणं हेच शांतेला प्राप्त करण्याचं प्रभावी सूत्र ठरतं. याकामी पुढील औषधे तज्ञांच्या सल्ल्याने घेतल्यास फायदा होतो-
१) बार्बीच्युरेट्स- फिनोबार्बीटोन, अमायलोबार्बीटोन इ.
२) बेंझोडायझेपाईन्स- डायझेपाम, फ्लूराझेपाम, लोराझेपाम, अल्प्राझोलँम इ. (हेच जास्त वापरले जातात व फायदेशीर ठरतात.)
३) अल्कोहोल- सर्व प्रकार! (पण योग्य प्रमाणात.)
४) अल्डीहाईडस्- पँराल्डीहाईड इ.
५) इथिनामेट
६) इतर- अँटीहिस्टामिन्स (कोडीन- कोरेक्स, सायपॉन इ.),स्कोपोलँमाईन.

नवीन आलेले औषध- झोपीक्लोन (नावपण काय भारी बघा- झोपेचा क्लोन!) सर्वात प्रभावी व सवय लागणार नाही असे आहे.
मात्र यातील कोणतेही औषध तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवस घेऊ नये.

आता 'निद्रानाश' चर्चेला घेऊयात...
निद्रानाश अर्थात निद्रादेवीची अवकृपा म्हणजे व्यवस्थित झोप न लागणे, जागता पहारा सुरु राहणे, रात्रभर स्वप्नेच पडणे, मांजर-कुत्र्यासारखी क्षणिक डुलक्यांची माळ लागणे, डोळे उघडे असल्याप्रमाणे टक्क दिसत राहणे इ. लक्षणे ही निद्रानाशाची- इन्सोम्नियाची असतात.
हा दोन प्रकारचा-
(१)साधा निद्रानाश-
(३ दिवस ते ३ आठवड्यांपेक्षा कमी)-
यामध्ये झोपेची वेळ घटणे, भयंकर स्वप्नांची रात्र असणे, सकाळी ताजेतवाने न वाटणे अशी लक्षणे आढळतात.
याची संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे-
१.जीवनमानातील बदलामुळे (नोकरी, व्यवसाय, हवापाणी, प्रदेश बदलणे) आलेले ताण, तणाव.
२.जीवनातील आर्थिक, सामाजिक अस्थिरता, बेरोजगारी.
३.पूर्वेकडून पश्चिमेकडे किँवा उलट जगप्रवास करणे, उदा. पर्यटक, वैमानिक इ.
४.शारीरिक कारणे- वेदना, अस्थमा, ज्वर किँवा आजाराचे औदासिन्य.
५.मानसिक कारणे- विरह, वियोग यांमुळे आलेली उदासिनता.
६.औषधांमुळे निद्रानाश- १)उत्तेजके- एफेड्रीन, कॅफीन (कॉफी)
२)भुकेसाठीची औषधे- व्हायट्यझाईम्स, एन्झाईम्स
३)नाक चोंदणे कमी करणारी औषधे- फेनिलेफ्रीन, फेनिलप्रोपीलॅमाईन
४)मनोविकारावरील काही औषधे
५)क्लोरोक्विन, मेट्रोनिडॅझोल, फ्लुरोक्युनोलोन्स.
म्हणून वरील सर्व कारणे टाळली असता शांतेचे धनी होता येते.
या साध्या निद्रानाशाचेच आणखी दोन उपप्रकार देता येतील-
१.प्राथमिक निद्रानाश-
हा बहुतेक वेळा खूपच तात्पुरत्या कालावधीचा असतो. पुढील पथ्ये व नियम आचरणात आणले तर नक्कीच निद्रादेवी प्रसन्न होईल-
1.दिवसाची झोप टाळावी.
2.झोपण्यापूर्वी काही तास घाम येईपर्यँत व्यायाम करावा.
3.झोप लागलेली असतांनाच लवंडावे, उगाच आढे मोजीत निजू नये.
4.शयनमंच फक्त त्याच 'कामा'साठी वापरावा, तिथेच जेवणे, टीव्ही पाहणे टाळावे.
5.तंबाखूजन्य पदार्थ, कॉफी वर्ज्य.
6.मानसिक ताण देणाऱ्‍या गोष्टी झोपेच्या वेळी करुच नयेत.
२.वयोमानानुरुप येणारा निद्रानाश-
याचा त्रास बहुतांश वृद्धांना हमखास होतो. जसे आपले वय वाढते तशी चळमुंगळी (रेम) झोपही वयात येऊन छळू लागते. तिचा कार्यकाल बऱ्‍यापैकी वाढत जातो. यावर थोडी बहुत मात करण्यासाठी पुढील उपाय योजावेत-
1.संध्याकाळनंतर पाणीच पिऊ नये म्हणजे वारंवार उठावे लागणार नाही.
2.कोणाला वाटते ग्लासभर दूधाने झोप येईल. परंतु दूधातील ट्रिप्टोफॅन मुळे झोप लवकर येत नसते.
3.स्नायूशैथिल्याचा प्रयोग उपयुक्त.
4.योगोपचार फायदेशीर ठरतात, उदा. शवासन.

(२) तीव्र निद्रानाश-
३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ झोप आली नसेल तर ट्रीटमेंटची नितांत गरज असते. या प्रकारात निद्रेचा नाश करण्याकामी कोणत्यातरी चिँतेचा पाश कारणीभूत ठरतो हे नक्की जरी असले तरी पुढील काही गोष्टीँमुळेही तीव्र निद्रानाश संभवतो- अतिऔदासिन्य, मनोविकार, तीव्र मानसिक ताण तणाव इ.
या प्रकारचा निद्रानाश मात्र तज्ञांकडूनच सोडवून घ्यावा लागतो.

सर्वांना 'शांता' लाभो...

लेखनविषय: दुवे:

Comments

काही प्रश्न

झोपेची औषधे घेणे हा एक तात्पुरता उपाय हो ऊ शकतो. मित्रांकडून असा अनुभव ऐकला आहे की अशी औषधे घेणे बंद केल्यावर आपण औषध घेतले नाही या कल्पनेनेच झोप लागत नाही. तसेच औषधांचे साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते. असे असताना औषधे घेणे हा निद्रानाशावरचा उपाय आहे असे कसे म्हणता येईल?

नाक चोंदले म्हणून झोप न लागण्याचा माझा स्वानुभव आहे. यावर औषधे घेतल्यावर झोप लवकर लागत नाही. या प्रकारच्या निद्रानाशावर दुसरा काही मार्ग आहे का?

बहुतेक वृद्धांना मलावरोधाचा त्रास असतोच. अशा वृद्धांना भरपूर पाणी प्या म्हणून सल्ला दिलेला असतो. असे लोक संध्याकाळनंतर पाणी न पिता कसे राहू शकतील? तसेच मधूमेहींना घशाला कोरड पडून तहान लागते. अशा लोकांना पाणी पिणे एक गरज असते. हे लोक पाणी पिण्याशिवाय कसे राहू शकतील.

आरोग्यासंबंधी एका डॉक्टरांनी लिहिलेला लेख प्रथमच उपक्रमवर वाचला. कल्पना खूप आवडली. अशाच अनेक लेखांची आपल्याकडून मी अपेक्षा करतो.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

छान

छान लेख. आणखी वाचायला आवडेल.
आपल्याला रेम आणि नॉन-रेम् दोन्ही प्रकारच्या निद्रांची आवश्यकता असते असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. संदर्भ मिळाल्यास टाकतो.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

असेच म्हणतो - रेम

लेखात "रेम" प्रकारच्या झोपेला "सतावणारी" म्हटलेले आहे, त्यामुळे आश्चर्य वाटले. अधिक माहिती कळली तर हवी आहे.

रेम

मध्यंतरी मला अशी माहिती मिळाली की रात्रभर गाढ झोपण्यापेक्षा मध्यरात्रीनंतर अध्येमध्ये (सुमारे ९०-१२० मि.) उठण्याची [डोळे उघडण्याची] सवय ठेवावी. त्यामुळे माणसाला वेळेवर उठण्याची आणि नियमित झोपेची सवय लागते. :-) याचा संबंध रेमशी आहे का?

हे असे काहीसे मी आधी कधी ऐकले नव्हते आणि माहितीवर विश्वास ठेवावा का नाही हे देखील कळले नाही.

बाकी, लेख आवडला.

छान माहिती

नॉनरेम निद्रेच्या १, २, ३, ४ अशा उत्तरोत्तर गडद होणाऱ्‍या प्रत्येकी ९० मिनिटांच्या पायऱ्‍या असतात.

माझ्या माहितीनुसार, नॉनरेमच्या सर्व पायर्‍या आणि रेम निद्रा मिळून एकूण ७०-९० मिनिटांची 'एक झोप' असते.

उत्तम प्रतिसाद

औषध द्यायचे की नाही हे प्रत्येकाचे फँमिली डॉक्टर ठरवतील. प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम असतातच. सर्वसमावेशक उपाय व उपचार मी येथे दिलेले आहेत. शेवटी डॉक्टरांच्या प्रत्यक्ष भेटीनंतरच सल्ला घ्यावा लागतो. एक माहिती या स्वरुपात या लेखाची निर्मिती केली आहे. ती उपचार पद्धती नव्हेच.
असो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

 
^ वर