जातीपातींमधील दरी बुजवता येईल काय ?
जातीपाती नष्ट करा असा सूर अनेकदा आणी अनेक वर्षांपासून ऐकू येतोय मात्र ते होणे शक्य नाहीये असे दिसतेय. तर मग जातीपातींमधील दरी बुजविण्याचा मध्यममार्ग स्वीकारता येईल काय हे पाहणे आवश्यक आहे. तसा प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी कायदा काय करु शकेल, समाज काय करु शकेल असा विचार करण्याऐवजी मला स्वतःला काय काय करता येईल हे तपासून पाहणे आवश्यक आहे. खालील दिलेले मुद्दे आपल्या स्वतःला लागू आहेत असे समजून त्यावर मी कसा वागेन हे ठरविणे आवश्यक आहे. हे करताना काही नवीन प्रश्न तयार होतील हे मान्य आहे.
१. कुटुंबातील सदस्याला आंतरजातीय विवाह करायचा आहे. मी त्याला जातीपातीचा अडसर न मानता इतर सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर त्याला मान्यता देईन.
२. घरात / समाजात वावरतांना जातीचा उल्लेख करणार नाही. जातीवाचक शिव्या, उल्लेख टाळेन. दुसरा करत असेल तर त्याला त्यापासून थांबवेन.
३. दुसर्या जातीतील देवांबद्ल / दैवतांबद्दल मनापासून आदर दाखवेन.
४. मी ब्राम्हण / मराठा आहे पण मी रस्त्याने जाताना बुद्धविहार दिसले तर आदराने नमस्कार करीन. / प्रसाद भक्षण करीन.
५. मी ब्राम्हण / मराठा आहे पण मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या उत्सवात सामील होईन (नेता म्हणून नव्हे तर एक सामान्य माणूस म्हणून).
(मुंबईत बरेच ठिकाणी शिवजयंती, आंबेडकरजयंती आणी महात्मा फुले जयंती संयुक्तपणे साजरी केली जाते हे मला चांगल्या दिशेने एक पुढचे पाऊल वाटते.)
६. मी बौद्द आहे पण मी रस्त्याने जाताना रामाचे/इतर देवाचे मंदिर दिसले तर आदराने नमस्कार करीन. / प्रसाद भक्षण करीन.
७. मी इतर जातींच्या मित्रांच्या घरी अन्न घेईन.
वरीलपैकी काही जरी मुद्दे आपण आचरणात आणले तर बराचसा फरक पडू शकेल असे वाटते. या मुद्द्यांमधे आपण भर घालु शकता. काही मुद्दे चुकीचे वाटू शकतील. ते फक्त चुकीचेच आहेत असे न दाखविता उदाहरणासहीत स्पष्ट करावे व तो मुद्दा कसा मांडल्यास योग्य वाटेल ते सांगावे.
Comments
शक्य वाटत नाही
"मी बौद्द आहे पण मी रस्त्याने जाताना रामाचे/इतर देवाचे मंदिर दिसले तर आदराने नमस्कार करीन. / प्रसाद भक्षण करीन."
शंबूकाला मारणार्या रामाला नमस्कार करण्यास आंबेडकरांनी विरोध केला असता ना?
पुराणातील वांगी
पुराणातील वांगी पुराणात ठेऊन नवीन द्रुष्टीने विचार करणे शक्य आहे काय ? (उदा. लो. टिळकांनी सार्वजनीक गणेशोत्सव का चालू केला, तर समाजाच्या ऐक्यासाठी) असे. म्हणजे राम / बुद्ध असले नसले तरी केवळ नमस्कार केल्याने दरी सांधली जात असेल तर काय हरकत आहे ?
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
पण का म्हणून?
बिनडोकपणाचा आदर का करावा? दरी सांधून आत्मिक समाधान होणार आहे का? स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अनादर होऊन चिडचीड होते त्याचे काय?
बिनडोकपणाचा आदर का करावा?
स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अनादर होऊन चिडचीड होते त्याचे काय?
१. ऑफीसमधे तुमचा बॉस बिनडोकपणाने बोलतो आणी तुम्ही बरोबर असता तेव्हा काय करता ? (बॉस इज ऑल्वेज राईट म्हणून सोडून देतो की लगेच नोकरी बदलतो.)
२. रस्त्याने वाहन चालविताना लोक आडवेतिडवे (बिनडोकपणाने ) चालतात तेव्हा काय करता ? (चालायचच...रस्ता आहे म्हणून सोडून देतो की दोन-चार् शिव्या हासडतो.)
३. लहान मुल रडते व नको त्या वस्तूचा हट्ट घेऊन बसते तेव्हा काय करता ? (जाऊ द्या लहान आहे. समजेल हळू हळू की कानाखाली आवाज काढून गप्प करतो ?)
यासारख्या अनेक बाबींमुळे देखील कमी जास्त प्रमाणात बुद्धिमत्तेचा अनादर होतच असतो. मात्र आपण स्वार्थासाठी तडजोड करतो. मग समाजस्वास्थ्यासाठी काय करु शकतो हे बघणे आपले काम आहे. मी सुचविलेले मार्ग चुकीचे असतील (आहेच असे म्हणूया) . ही आपली स्वतःची समस्या आहे व आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे असे समजून उपाय देखील सुचवा.
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
समाजस्वास्थ्य आणि स्वार्थ
नोकरीतून पैशे मिळतात.
रस्त्यात शिस्त न पाळल्यास जिवाला धोका होऊ शकतो. तरीही मी मॅड (म्यूचुअली अश्युअर्ड डिस्ट्रकशन) तत्त्व वापरीत असल्याचा आभास करण्याचा प्रयत्न करतो.
लहान मुलात गुंतवणूक करण्यात स्वार्थ असू शकतो. लहान मुलाशी पॅट्रनाइजिंग दृष्टीने वागले तरी चालते. त्यांना मतदानाचा हक्क नसतो. चिडचीड होत नाही.
समाजस्वास्थ्यासाठी सुंता करावी अशीही एक विचारधारा असू शकते ना?
समाजस्वास्थ्यासाठी सुंता करावी अशीही एक विचारधारा असू शकते ना?
नका हो अशी वाक्ये लिहू. उद्या कोणीतरी ह्याच वाक्याचा धागा पकडून "तुमच्या विचारांची सुंता झाली आहे काय ? " अशा शीर्षकाचा भलामोठा लेख लिहून आमच्या कपाळी मारेल.
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
जातीभेद घालवण्याचे कर्मकांड
यातल्या बहुतेक गोष्टी निदान शहरातले उच्चवर्गीय "आचरणाने" पाळतात. पण मनातून पाळत नाहीत.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
"आचरणाने" पाळतात
जसा विचार तसा आचार किंवा जसा आचार तसा विचार असे होऊन माणसाच्या शेपटाप्रमाणे मनातूनही एक दिवशी हे विचार गळून पडतील असा प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे ?
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
काही गोष्टींची गरज नाही
गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ असे आमच्या घरात होत आहे म्हणून आम्ही कुठल्या जातीचे हे अद्याप विसरलेलो नाही.
माझ्या घरात हे थांबलेले आहे. मध्यंतरी घरात असे बोलणे झाले की "आपल्यात कांदा चुलीवर भाजून खोबर्याचे वाटप लावतात ना ती पाककृती करू."
लेकीने विचारले, "आपल्यात म्हणजे?"
(माझ्याकडे उत्तर होते मराठी माणसांत. आमच्या घरात नाही म्हणताही जाती आहेत - मराठी आणि कर्नाटकी)
जोपर्यंत मी क्ष हा देव मानत नाही म्हणून त्याचे अस्तित्त्व नष्ट करा असा विचार मी मांडत नाही तोपर्यंत काहीही करायची गरज नाही. आदरही.
जोपर्यंत मी क्ष हा देव मानत नाही म्हणून त्याचे अस्तित्त्व नष्ट करा असा विचार मी मांडत नाही तोपर्यंत काहीही करायची गरज नाही. आदरही. मात्र मी प्रसाद भक्षण करेन; मला प्रसाद आवडतो.
सर्वप्रकारचे रस्त्यावर उतरून केलेले जयंती उत्सव बंद व्हावेत असे मला वाटते. परंतु, जयंती निमित्त सभा, प्रदर्शने, सम्मेलन असल्यास मी जाईन.
जोपर्यंत मी क्ष हा देव मानत नाही म्हणून त्याचे अस्तित्त्व नष्ट करा असा विचार मी मांडत नाही तोपर्यंत काहीही करायची गरज नाही. आदरही. मात्र मी प्रसाद भक्षण करेन; मला प्रसाद आवडतो.
अवश्य! मी खादाड आहे.
जोपर्यंत मी क्ष हा देव मानत नाही
मुद्दा क्र. ३, ४ आणी ६ साठी :
"क्ष" असले नसले तरी केवळ नमस्कार केल्याने दरी सांधली जात असेल तर काय हरकत आहे ? असाही प्रसाद खाला की समोरच्याला आनंदच वाटेल. तो तुम्ही आवडतो म्हणून खाल्ला की दुसरे काही कारण हा मुद्दा वेगळा (समोरच्याला पॉझीटीव्ह मेसेज जाईल हे नक्की).
अवश्य! मी खादाड आहे.
उत्तम. माणसाला आपलेसे करण्याचा मार्ग पोटातूनच जातो म्हणतात. खादाड माणसाला आपलेसे करणे अधिकच सोपे ! नाही का !
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
खाली चंद्रशेखर म्हणाले आहेच
दरी सांधली जात असेल तर एकवेळ मी करेन पण अशी सवय पाडून घेणे मला आवडणार नाही. ज्या गोष्टींवर आपला विश्वास नाही ते करत राहणे म्हणजे मला नाटक वाटते; खाली चंद्रशेखर अशाच धर्तीचे काही म्हणाले आहेत आणि असे इतर धर्मीयांत वगैरे व्हायला नको तर स्वधर्मीयातही होतेच. घरातील ज्येष्ठांचे मन दुखावले जाऊ नये म्हणून बर्याचदा मला आवडणार्या रीती मी पाळते परंतु त्या साध्या असाव्या, त्यात बडेजाव नको किंवा सदर रीत कालबाह्य आहे वगैरे सांगायला विसरत नाही.
जातपात व आंतरजातीय विवाह
श्री. राजकुमार यांनी एका महत्वाच्या विषयावर चर्चा चालू केल्याबद्दल त्यांचे प्रथम आभार.
त्यांनी मांडलेले मुद्दे मात्र मला फारसे रुचले नाहीत. माझी वैयक्तीक मूल्ये किंवा अधिष्ठाने यंच्याकडे दुर्लक्ष करून दुसर्या एखाद्या व्यक्तीच्या समजुतींना किंवा निष्ठांना योग्य म्हणण्याची कल्पना मला रुचली नाही. उदाहरण द्यायचे तर मी जरी हिंदू असलो तरी जाता येता देऊळ दिसले की नमस्कार करण्यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे बुद्ध विहार किंवा आणि कोणती धर्मस्थाने दिसली की मी नमस्कार करणे किंवा आदर दाखवणे म्हणजे मी माझ्या निष्ठांचा अनादर करतो असे होणार नाही का? असे करणे राजकुमार यांना का अपेक्षित असावे?
मला भोजन एका विशिष्ट पद्धतीचे आवडते. दुसरी व्यक्ती माझ्या किंवा परजातीची असली तरी तिच्याघरचे अन्न मी ग्रहण करावे असा आग्रह का? माझ्याच जातीच्या उत्सवात समारंभात सामील होणे जर मला रुचत नसले तरी परजातीच्या उत्सवात मी भाग घ्यावा असा आग्रह का?
माझ्या मुलांनी जर स्वत:चा विवाह स्वत: ठरवला असला तर तो परजातीच्या व्यक्तीबरोबर आहे म्हणून त्याला विरोध करणे हे मला अमान्य आहे. परंतु जर ठरवूनच असा विवाह करावयाचा असेल तर माझ्या घरात आलेली स्वजातीची सून किंवा स्वजातीच्या जावयाच्या घरात सून म्हणून गेलेली माझी मुलगी या दोघींनाही त्यांच्या नवीन घरातले रीतिरिवाज ओळखीचे असल्याने सामावून जाणे तुलनात्मक रित्या सोपे जाणार असेल अशी नाती जोडण्याला आक्षेप का आणि कशासाठी घ्यायचा?
समाजातील सर्व लोकांची आर्थिक व शैक्षणिक पातळी समान करण्याचा प्रयत्न करणे हे जातींच्यातील दरी कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे असे मला वाटते. श्री. राजकुमार यांनी सुचवलेल्या कल्पना मला तरी रुचल्या नाहीत.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
श्री. राजकुमार यांनी सुचवलेल्या कल्पना मला तरी रुचल्या नाहीत.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
मी सुरवातीलाच सांगीतल्याप्रमाणे "काही मुद्दे चुकीचे वाटू शकतील. ते फक्त चुकीचेच आहेत असे न दाखविता उदाहरणासहीत स्पष्ट करावे व तो मुद्दा कसा मांडल्यास योग्य वाटेल ते सांगावे. " हे वाक्य लक्षात ठेऊन दिलेल्या प्रतिसादाचे स्वागत. काही शंका :
माझ्या घरात आलेली स्वजातीची सून किंवा स्वजातीच्या जावयाच्या घरात सून म्हणून गेलेली माझी मुलगी या दोघींनाही त्यांच्या नवीन घरातले रीतिरिवाज ओळखीचे असल्याने सामावून जाणे तुलनात्मक रित्या सोपे जाणार असेल अशी नाती जोडण्याला आक्षेप का आणि कशासाठी घ्यायचा?
पाणी, भाषा आणि रीतिरिवाज दर दहा कोसांवर बदलतात. स्त्रीला नवीन घरात सामावून जाणे किती सोपे असते हे या संस्थळावरील स्त्री सदस्यच जास्त योग्यरित्या सांगु शकतील.
समाजातील सर्व लोकांची आर्थिक व शैक्षणिक पातळी समान करण्याचा प्रयत्न करणे हे जातींच्यातील दरी कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे असे मला वाटते.
थोडे अधिक विवेचन आले तर समजण्यास सोपे जाईल.
श्री. राजकुमार यांनी सुचवलेल्या कल्पना मला तरी रुचल्या नाहीत.
मला वाईट वाटलेले नाही. परखड प्रतिक्रियांचे स्वागतच आहे. त्यातून मला माझा वैचारीक विकासच होईल याची खात्री वाटते.
आपण या संस्थळावर साधक बाधक चर्चा करण्यासाठीच एकत्र येतो. उगाच तु माझी पाठ खाजव मी तुझी खाजवतो असे करुन आपल्याला कंपू थोडाच बनवायचा आहे.
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
स्त्रीचे नवीन घरात सामावून जाणे
समजा माझ्या घरात सामिष भोजन वर्ज्य असेल तर ज्या घरात सामिष भोजन सतत घेतले जाते अशा घरात जाणार्या माझ्या मुलीला किंवा अशा घरातून माझ्या घरात येणार्या नवीन मुलीला ऍडजस्ट होणे कठिण जाईल की नाही. त्यामुळेच बघूनच लग्न ठरवायचे असले तर् आपल्या घरसारखेच रीतिरिवाज असलेल्या घराशी संबंध जोडणे केंव्हाही सोपे जाते. प्रेम विवाह असला तर हे प्रश्नच उपस्थित होत नाहीत कारण त्या मुलाने/मुलीने हा सर्व विचार करूनच् विवाहाचा निर्णय घेतलेला असतो
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
माझं मत
नव्याने लग्न होऊन मग ठरवून केलेला असो की प्रेमविवाह असो - दुसर्या घरात गेलेल्या प्रत्येक मुलीला घर बदलल्याचा त्रास हा होतोच आणि लग्न झाले की सर्वांना थोडेफार ऍडजस्ट करावे लागतेच; मग जातीतले असो की परजातीतले. चंद्रशेखर यांचा समिष भोजनाचा मुद्दा फार जुना झाला आहे. हा मुद्दा अजूनही पुढे करणार्या लोकांची मला गंमत वाटते.
माझ्या घरात परजातीय, परधर्मीय आणि परदेशस्थ अशी लग्ने झालेली आहेत. काही लग्ने होऊन ३० वर्षांपेक्षा अधिक काळ उलटलेला आहे आणि भोजनावरून खटके वगैरे उडाल्याचे आठवत नाही.
समिष भोजन करणारा आणि समिष भोजन न करणारा एकमेकांना फसवून भोजनपद्धती न सांगता लग्न करत असेल तर खटके उडणे साहजिक आहे. खुद्द माझ्या घरात माझा नवरा समिष भोजन अभावाने करतो. त्यातही माश्यांना अजिबात हात लावत नाही. त्याला लहानपणापासून सवय नसल्याने माशांचा वासाचा त्याला त्रास होत असावा याची जाणीव मला आहे. मला लहानपणापासून मासे खायची सवय आहे याची जाणीव त्याला आहे.
बर्याचदा बाहेर खरेदीला गेलो की तो मला मासे घ्यायला सांगतो. स्वतः खात नाही पण आम्ही खावे, आपले मन मारू नये अशी त्याची अपेक्षा असते. त्याला त्रास होतो म्हणून मी मासे सहसा घेत नाही. घेतलेच तर तो घरी नसताना शिजवते किंवा तो घरी यायच्या आधी शिजवून तयार ठेवते; ज्याने त्याला फार वास येऊ नये. घरी शिजवण्याबद्दल त्याने कधीही तक्रार केलेली नाही तरीही.
दुसरे उदाहरण माझ्या सख्ख्या भावाचे आहे. तो जन्मापासून माशांना हात लावत नाही. इतर खातात त्याचाही त्याला राग येतो. माझी वहिनी सारस्वतच आहे. पट्टीची मासे खाणारी. ती मासे खात असेल किंवा घरात बनवत असेल तर तो बोलून नाराजी व्यक्त करतो. (पण इथेही खटके उडालेले नाहीत. अशी नाराजी तो लहानपणापासूनच व्यक्त करत असे आणि त्याला काडीची किंमत द्यायची नाही असे आमचे धोरण होते. मात्र त्याच्यासाठी दुसरा आहार घरी बनवला जाई.)
आपल्या आहाराबद्दल श्रेष्ठत्वाच्या अवास्तव कल्पना असल्याशिवाय खाण्यावरून खटके उडण्याची गरज भासत नसावी.
सामिष आहार
हा मुद्दा खूप जुना व कालबाह्य झाला आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु मला हेच चपखल बसणारे उदाहरण सापडले म्हणून दिले एवढेच.
चन्द्रशेखर
तडजोडीची मर्यादा
काहींसाठी तो गंमतीशीर न राहता गांभीर्याचा असतो.
इथे केवळ श्रेष्ठत्वाच्या कल्ल्पनेचा संबंध नाही. शाकाहार श्रेष्ठ कि मांसाहार यातील श्रेष्ठत्वाची कल्पना अमान्य असताना देखील बोंबलाच्या वासाने एखाद्याची भुक वाढते तर एखाद्याला मळमळू लागते व असलेली भुक नाहीशी होते. अशा वेळी तडजोड कुठपर्यंत व कशी करणार? एखाद्याचे 'अन्न' हे दुसर्याचे 'विष' व्हायला लागते त्या वेळी 'जगण्याशी' तडजोड करुन 'मृत्यु' स्वीकारावा काय? एवढ्या टोकाचा प्रश्न जरी मला विचारायचा नसला तरी सहजीवनात अशा तडजोडींची वारंवरिता व तीव्रता या गोष्टींमुळे सहजीवन जगणे एक कसरत होते. (तशीही सहजीवन म्हणजे एक कसरतच असते)
जी गोष्ट आहाराबाबत तीच गोष्ट निद्रा, भय, मैथुन याबाबत लावता येते.
जातीपातीच्या दरी कमी करण्यात विविध जातीपातींचे सहजीवन ही बाब महत्वाची असते. रोटी व्यवहार अंगवळणी पडल्यावर बेटी व्यवहार देखील वाढु लागले आहेत ही बाब लक्षणीय आहे.
प्रकाश घाटपांडे
हास्यास्पद
वर अनुभवातून तडजोड लिहिली असतानाही तोच मुद्दा पुन्हा आळवणे म्हणजे आपली श्रेष्ठत्वाची महती गाणे हेच आहे. सहजीवनात तडजोड ही दोन्ही बाजूंनी होते. आपल्या माणसाला आवडेल असे काही करावेसे वाटते तेव्हा मळमळ नाहीशी होत असावी. सवयीनेही मळमळ नाहीशी होते. परंतु, मळमळ होते हे सांगणे आपले श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखवायची युक्ती असेल तर कठिण आहे.
आंतरजातीय विवाहांपैकी किती विवाह या मळमळण्यापायी मोडले याची संख्या मिळाली तर बरे होईल. माझ्यामते ती संख्या अत्यल्प असावी.
जर ठरवून आंतरजातीय विवाह करायचा असेल तर मुलाला किंवा मुलीला माशांच्या वासाने आपल्याला मळमळते किंवा मळमळत नाही हे आधी माहित असावे. नसल्यास त्याबाबत चौकशी करून ठरवता येईल. नाहीतरी, ठरवून केलेल्या लग्नांत कसून चौकशी होतेच. त्यात ही एक भर.
बोंबलाच्या वासाने मळमळते, चामड्याच्या वासाने मळमळते, गटाराच्या वासाने मळमळते - मळमळण्यावर उपाय करून घ्यावेत. उपलब्ध आहेत. :-)
बायदवे, बोंबलाचा वास आता फार जुना झाला. पुढच्या वेळेस सुक्या बांगड्याचा वास वापरा.
असो. आपण विषय काढलात तर माझा आपल्याला एक अवांतर प्रश्न आहे.
जेव्हा केव्हा बोंबलांचा विषय निघतो तेव्हा तेव्हा खो घातल्यासारखा आपण त्यात मळमळण्याचा प्रतिसाद देता. तो नेमका कशासाठी?
बहुदा नसावे
परंतु, मळमळ होते हे सांगणे आपले श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखवायची युक्ती असेल तर कठिण आहे.
बरेच लोक असे करत असावे, पण घाटपांड्यांबद्दल असे (का कोणास ठाऊक!) वाटत नाही.
लहानपणापासून सवय नसली, तर असे होत असावे. मी पोर्क सॉसेज पहिल्याने भारतातच खाल्ले त्यानंतर १० वर्षे खाल्ले नाही. पहिल्याच मिनिटाला जी काही उलटीची भावना झाली, ती विसरून परत सॉसेज खाऊन बघायला १० वर्षे वेळ लागला.
आंतरजातीय विवाहांपैकी किती विवाह या मळमळण्यापायी मोडले याची संख्या मिळाली तर बरे होईल. माझ्यामते ती संख्या अत्यल्प असावी.
हे मात्र खरे. विवाह मोडतात त्याची कारणे खाण्यासंबंधी नसतात.
हम्म!
मी त्याबद्दल खाली लिहिले आहे. एखादी गोष्ट खाल्ल्यावर मळमळणे साहजिक आहे पण ती मळमळ शब्दांवाटे सतत निघत राहणे साहजिक नाही.
मलाही वाटत नव्हते म्हणून इतकी वर्षे दुर्लक्ष करत होते.
हास्यास्पद
प्रियालीताईंना सामिष भोजनाचा मुद्दा हास्यास्पद वाटतो आहे. हा मुद्दा जुना आणि कालबाह्य झाला आहे असे मी आधीच म्हटले आहे. पण तो हास्यास्पद आहे असे घाटपांडॆ काका व मलाही वाटत नाही याचे मुख्य कारण म्हणजे प्रियाली व आम्ही दोघे हे या प्रश्नाकडे अगदी निराळ्या कोनांच्यातून बघत आहोत. प्रियाली आणि चित्रा या दोघीही हा पती-पत्नी मधल्या वादाचा हा प्रश्न आहे असे मानून लिहित आहेत. तर मी आणि घाटपांडेकाका या वादाकडे, एखाद्या घरात नवीन येणारी (किंवा जाणारी मुलगी) व (पती वगळून) त्या कुटुंबात असलेले इतर जण यांच्यामधला वाद समजतो आहोत.
पती आणि पत्नी हे या आणि इतर अनेक वादाच्या मुद्यावर तडजोड करतातच व या असल्या गोष्टींमुळे त्यांचे वैवाहिक जीवन उध्वस्त होत नाही हा प्रियालीचा मुद्दा एकदम मान्य. परंतु इतर नातेवाईक व ही नवीन पत्नी यांच्यामधले संबंध अशा परिस्थितीत तितकेसे घनिष्ठ रहात नाहीत हे सत्य आहे. एकत्र कुटुंबात तर (नवीन मुलीने तडजोड केली नाही तर) वेगळे होण्यापर्यंत पाळी येऊ शकते.
अर्थात नव्या समाजरचनेत, विभक्त कुटुंब किंवा आता नवीनतम व्यक्तीनिष्ठ कुटुंब असले तर हा प्रश्न प्रियाली म्हणते तसा हास्यास्पद ठरू शकतो. परंतु पारंपारिक भारतीय आणि मराठी समाजात ही वेळ येण्यास अजून थोडी वर्षे लागणार असल्याने अजून तरी हा प्रश्न हास्यास्पद आहे असे म्हणता येणार नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
खुलासा
मला कुठे खुट्ट झाले की बोंबलाची मळमळ बाहेर येते ते हास्यास्पद वाटते.
जेव्हा लग्न ठरवून करतात तेव्हा इतर गोष्टीही घरातल्यांना सांगितलेल्या असतातच ना - जसे, मुलीच्या ऑफिसच्या वेळा अनियमित आहेत, तिला स्वयंपाकाला वेळ नाही. मुलाला नोकरीनिमित्त ५-६ महिने घराबाहेर राहावे लागते. मुलीला तिखट आवडते - मुलाच्या घरातल्यांना तिखट चालत नाही. सजातीय विवाहात सुद्धा तडजोडीचे अनेक मुद्दे असतात आणि त्यात चौकशी करून, ठरून-ठरवून विवाह होतात. ज्यांना अनियमित वेळेवर कामे करणारी मुलगी नको असेल ते त्या स्थळाच्या भानगडीत पडणार नाहीत. त्याचप्रमाणे ज्यांना ती मुलगी चालेल ते तिला स्वीकारतील. आता हेच वाक्य समिष आहाराबद्दल लावावे.
माझ्या माहितीतील आधी मांसाहार न करणारी आणि आता करणारी अनेक कुटुंबे आहेत. त्यापैकी काहीजणांच्या दोन-तीन पिढ्या आता मांसाहार करतात. अशांना जर जातीतील दरी बुजवायची असेल तर समिष भोजन करणारी मुलगी चालेल असे वाटते. (पूर्वी ब्राह्मणांनी मटण महाग केले* असे म्हटले की ब्राह्मणांना हसू येत असे [वाक्य हास्यास्पद वाटत असे, विनोदी म्हणून त्याकडे बघितले जात असे]; आता त्यांना राग येतो आणि मला त्यांचा राग मान्य आहे. मटणावर कोणा एका जातीचा हक्क नाहीच. माझे अनेक मित्र-मैत्रिणी चापून मांसाहार करतात आणि त्यांचे जोडीदार आणि मुलेही. (माझ्या वडिलांचे मित्र आणि त्यांची कुटुंबेही असे करत.) भविष्यात त्यांनी मांसाहाराच्या मुद्द्यावरून विजातीय मुली/मुलगे नाकारले तर मला तो दुटप्पीपणा वाटेल.)
सजातीय विवाहात वेगळे राहण्याची पाळी किती आणि कुठकुठल्या मुद्द्यांवरून आली याचा विचार करता इतके मुद्दे येतील की भविष्यात येणारा समिष भोजनाचा मुद्दाही त्यात सहज खपून जाईल.
स्वानुभव
माझा मुद्दा तडजोडीतील मर्यांदांच्या व्यक्तिसापेक्षतेबाबत आहे.
सहमत आहे. पण तडजोडींची संख्या वाढत गेली कि कुरबुरी निर्माण होतात.
सहमत आहे.
भारतात त्यातुन पुण्यात व्यवहार्य व आम्हाला परवडतील असे उपाय सांगावेत. आम्ही ते इतरांनाही सांगु :-)
चांगली सुचना आम्ही ती अमलात आणू.
प्रतिसाद येतो खरा. आपल्याला तो खो घातल्यासारखा वाटतो याला माझा नाईलाज आहे. पण तो स्वानुभवावर अथवा तशा समान इतरांच्या अनुभवांवर आधारित आहे. उदा. माझ्या एका सहकार्याच्या तोंडातुन बोंबलाच्या वासाने लाळ गळताना मी पाहिली आहे त्याच वेळी त्या वासाने मला मळमळले.
मी प्रथम सुरमाई खाल्ली होती तेव्हा आपण सुरमाई खातोय हे मला माहित नव्हते. छान लागली. महत्वाचे म्हणजे नंतर समजल्यावर मळमळ वाटली नाही.
अवांतर- आपल्याला बोंबील जाम आवडत वाटत?
प्रकाश घाटपांडे
श्रेष्ठत्वाचाच प्रश्न
लग्ने तडजोडीशिवाय होतात का? की तडजोडी फक्त खाण्याच्या बाबतीतच होतात? कुरबुरी आणि तडजोडी या सजातीय विवाह केलेल्यांतही तेवढ्याच प्रमाणात होतात.
पुण्यातील आपल्या फॅमिली डॉक्टरकडे त्वरित जावे. ते आपल्यावर उपचार करतील आणि त्यामुळे नेटावर येणारे तुमचे हे वाह्यात प्रतिसादही बंद होतील. कदाचित, मानसोपचारतज्ज्ञही याबाबत मदत करू शकतील.
हो ना. मग ज्या मुलांना लग्न करायचे तेही आपल्याला कोणते मासे खायचे आहेत आणि खायचे नाहीत हे ठरवून घेतील. त्यात तुमची मळमळ कशाला?
मला बोंबील आवडतात आणि आवडत नसते तरी मी सतत मळमळत होते असे खो देणारे प्रतिसाद देत बसले नसते. (कधी एकदा सांगणे की मला हा पदार्थ आवडत नाही आणि सतत लिहित राहणे यात फरक आहे. तोच दाखवून देत आहे. ) इतरांच्या अन्नाबाबत किमान आदर दाखवण्याचा प्रयत्न मी करते.
हे मान्य केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. (मान्य केले नसते तर गूगल सर्चची सोय आहेच. ;-)) समजा चित्रा म्हणते त्याप्रमाणे तिला पोर्क सॉसेज आवडत नाही (मी तर खाल्लेलेही नाही अद्याप) पण याचा अर्थ ती तिच्यासमोर खाणार्या प्रत्येकाला "हे खाल्ल्यावर मला मळमळल्यासारखे होते" हे सांगत नसावी. मीही माझ्यासमोर कोणी खाल्ले किंवा मला खाण्याचा आग्रह केला तर त्याला "मला हे खाल्ल्यावर ओकारी येते" असे सांगत नाही. विचारलेच कोणी तर "मी हे खात नाही " किंवा "मला याची फारशी आवड नाही" इतके उत्तर पुरेसे असते, पण प्रत्येकवेळी हटकून "बोंबिल खाल्ल्याने मला मळमळल्यासारखे होते" असे लिहिणे हा आपले श्रेष्ठत्व सांगण्याचा प्रकार आहे हे निश्चितच.
कोणबद्दला काहीच हरकत नाहीये,
कोनाबद्दला काहीच हरकत नाहीये,
पण हे M-पब्लिक जरा जास्तच धर्मवेडे असतात, त्यांना सहन करू शकत नाही.
त्यांची जी दादागिरी असते तिला प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहवत नाही.
इथे राहून सुद्धा पाकिस्तानचा झेंडा फडकावितात,आणि भारताचा झेंडा जाळतात
डोक्यात सनक जाते.मग राहवत नाही.
आता अवघड आहे...
तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे साधे सोपे उत्तर आहे की ' हे सध्याच्या परिस्थितीत अवघड आहे'
जात
जाती मानने न मानने हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कायदा करून असे प्रश्न सुटणार नाहीत आणि कुठल्यातरि मंदिरात झुकणे किंवा जयंतीत सामील होणे म्हणजे जातीभेद मिटवणे का?
धन्यवाद
मुळात असे समन्वय साधण्याची गरज आहे, हे तुमच्या लेखातून सूचित होते आहे, याबद्दल धन्यवाद.
१. कुटुंबातील सदस्याला आंतरजातीय विवाह करायचा आहे. मी त्याला जातीपातीचा अडसर न मानता इतर सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर त्याला मान्यता देईन.
>>असे विवाह आमच्या गेल्या दोन पिढ्या तरी झालेले आहेत. घरातून थोडीशी सुरूवातीची मोठ्या व्यक्तींची (आजी) काहीशी नाराजी असली तरी विरोध केला नाही - संपत्तीच्या वाटपामध्ये जातीने वेगळे असण्याचा अडसर आला नाही. घरी आलेल्या मुलीला पूर्णतः सामावून घेतले गेले, तिच्यासाठी घरातले आचार, खाण्यापिण्याच्या रीती इ. बदलले गेले, तिचे भरपूर कौतुक मागील पिढ्यांनीही केले. जातीबाहेर लग्न झालेल्या मुलीलाही त्या कुटुंबाने खाण्यापिण्याचे थोडे काही वेगळेपण दर्शवले ते वगळता व्यवस्थित सामावून घेतले.
२. घरात / समाजात वावरतांना जातीचा उल्लेख करणार नाही. जातीवाचक शिव्या, उल्लेख टाळेन. दुसरा करत असेल तर त्याला त्यापासून थांबवेन.
करत नाही. मुलीला माझी किंवा तिच्या वडिलांची जात अजूनतरी माहिती नाही.
३. दुसर्या जातीतील देवांबद्ल / दैवतांबद्दल मनापासून आदर दाखवेन.
जातीतील दैवते म्हणजे काय हे मला कळले नाही, पण मी देवतांबद्दल आदर दाखवते. मला लोकांच्या घरातले देव/त्यांच्या मूर्ती इ. बघायला खूप आवडते.
४. मी ब्राम्हण / मराठा आहे पण मी रस्त्याने जाताना बुद्धविहार दिसले तर आदराने नमस्कार करीन. / प्रसाद भक्षण करीन.
ब्राह्मण/मराठा असण्याशी याचा संबंध नाही. मी कुठच्याही देवळाला/बुद्धविहाराला नमस्कार करणे याला प्रगती म्हणत नाही. पण तशी मी देऊळ दिसले म्हणूनही नमस्कार करत नाही. पण प्रसाद खायचा प्रश्न नाही!
५. मी ब्राम्हण / मराठा आहे पण मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या उत्सवात सामील होईन (नेता म्हणून नव्हे तर एक सामान्य माणूस म्हणून).
सार्वजनिक ठिकाणच्या मोठ्या उत्सवात वगैरे म्हणत असलात कशाला सामील व्हायचे? तिथे फार गर्दी असते. त्याऐवजी आंबेडकरांचे लिखाण वाचेन, कोणी सहकारी उत्सव साजरा करीत असला तर त्याला आवर्जून त्यावरून विचारेन. तो उत्सव घरी करत असला, त्याने आमंत्रण दिले तर नक्की जाईन.
(मुंबईत बरेच ठिकाणी शिवजयंती, आंबेडकरजयंती आणी महात्मा फुले जयंती संयुक्तपणे साजरी केली जाते हे मला चांगल्या दिशेने एक पुढचे पाऊल वाटते.)
६. मी बौद्द आहे पण मी रस्त्याने जाताना रामाचे/इतर देवाचे मंदिर दिसले तर आदराने नमस्कार करीन. / प्रसाद भक्षण करीन.
मी जन्माने बौद्ध नाही, त्यामुळे प्रश्न पास.
७. मी इतर जातींच्या मित्रांच्या घरी अन्न घेईन.
मित्रांकडे अन्न घेताना अन्यजातीचे असल्याने अन्न कसे घ्यावे, हा प्रश्न आमच्या घरी गेले निदान तीन पिढ्यातरी कोणी विचारलेला नाही हे फार मनाला बरे वाटते.
जातीभेदाच्या द-या आताच का बुजवाव्या वाटताहेत ?
जातीपातींमधील दरी बुजवता येईल काय ? नाही.
१. कुटुंबातील सदस्याला आंतरजातीय विवाह करायचा आहे. मी त्याला जातीपातीचा अडसर न मानता इतर सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर त्याला मान्यता देईन.
हो देईन.
२. घरात / समाजात वावरतांना जातीचा उल्लेख करणार नाही.
घरात / समाजात उल्लेख येतातच. महाविद्यालयात शिकणार्या विद्यार्थी जेव्हा शिष्यवृत्तीचा अर्ज भरुन देतो तेव्हा त्या अर्जाच्या रकान्यात जातीचा पर्याय असतो. महाविद्यालयात शिष्यवृत्तीचा अर्ज विद्यार्थ्याने व्यवस्थित भरला की नाही हे पाहतांना जातीचा पर्याय काळजीपूर्वक तपासावा लागतो. काही विद्यार्थी आपली जात सांगतांना अतिशय हळू आवाजात सांगतात. मात्र जातीचा उल्लेख करावाच लागतो. अनेक जाती कोणत्या प्रवर्गात आहेत हे माहिती नसल्यामुळे आम्ही विद्यार्थी गेल्यावर जातीच्या प्रवर्गावर सामाजिक आणि त्यांच्या आर्थिक स्तराविषयी चर्चा करतो आणि मागासलेला प्रवर्ग पुढे आला पाहिजे अशा समारोपाने चर्चा संपते.
३. दुसर्या जातीतील देवांबद्ल / दैवतांबद्दल मनापासून आदर दाखवेन.
आदर दाखवतो. माझा एक प्राध्यापक मित्र माझ्याबरोबर देवळात येतो पण नमस्कार बिमस्कार करण्याच्या भानगडीत पडत नाही. मला वाईट वाटू नये म्हणून तो देवळापर्यंत येतो.
४. मी ब्राम्हण / मराठा आहे पण मी रस्त्याने जाताना बुद्धविहार दिसले तर आदराने नमस्कार करीन. / प्रसाद भक्षण करीन.
बुद्धविहार,मंदिरे,चर्च,मशिदी इथे प्रसाद म्हणून जे मिळेल आणि ते जर माझ्या आवडीचे असेल तर मी ते आवडीने खाईन.
(मुंबईत बरेच ठिकाणी शिवजयंती, आंबेडकरजयंती आणी महात्मा फुले जयंती संयुक्तपणे साजरी केली जाते हे मला चांगल्या दिशेने एक पुढचे पाऊल वाटते.)
आदर असलेल्या सर्वांच्याच जयंत्या मयंत्या सारख्याच भावनेच्या असतात.त्यामुळे सर्वच उत्सवात मी असावे असे वाटते.
६. मी बौद्द आहे पण मी रस्त्याने जाताना रामाचे/इतर देवाचे मंदिर दिसले तर आदराने नमस्कार करीन. / प्रसाद भक्षण करीन.
प्रसाद मिळतो म्हणून मी खाईन. मात्र बौद्ध धर्मात देव वगैरे कल्पनांना कोणतेच स्थान नाही त्यामुळे देवांना नमस्कार करणार नाही. पण असे केल्यामुळे जातीभेद नष्ट होणार असेल तर नमस्कारही करेन.
७. मी इतर जातींच्या मित्रांच्या घरी अन्न घेईन.
व्वा....! आनंदाने जेवण करीन. किमान स्वच्छतेची काळजी घेतलेली असेल तर जेवण दमदारपणे
होते.
-दिलीप बिरुटे
एक दीवस रोटी-बेटी व्यवहार हेच जातीमधील दुरी नष्ट करतील
जात नाही ती जात असे म्हंटले जाते. हे कांही अंशी खरे आहे. हा प्रश्न भारतातच नाही तर जगात सर्वच धर्मात, समाजात आहे. मुसलमानात शिया सुन्नी, ख्रिश्चन मध्ये काळे, गोरे असे आहे. आणि आजच्या लोकशाहीच्या जमान्यात निवडणूक जिकण्यासाठी मतांची गरज असल्या मुळे जातीची एकगठ्ठा मते मिळवून निवडणून येण्या साठी जातीचा दुरुउपयोग सुरु झाल्या मुळे जात नष्ट होणार नाही .
आता प्रश्न आहे तो जाती भेदभावा मुळे समाजाचे, देशाचे कमीतकमी नुकसान कसे होईल याचा विचार करणे. आणि त्याकरता शिक्षण हाच एक उपाय आहे. लहान मुलाला जात काय असते धर्म काय हे कांहीच माहित नसते. यामुळे शालेय शिक्षणात सर्वधर्म समभाव . आणि सामाजिक,नैत्तिक मूल्याची शिकवणी देणारा विषय शिकणे अनिवार्य करणे . आज शिक्षणा मुळे सर्वांचाच जीवनमानाचा स्तर वाढला आहे. अंतर जातीय विवाह सहज केल्या जात आहे त्यास पूर्वी इतका प्रखर विरोध होत नाही. खाजगी वैयक्तिक जीवनात जातीचे महत्व निश्चित कमी होत आहे. एक दीवस रोटी-बेटी व्यवहार हेच जातीमधील दुरी नष्ट करतील
बारीकसारीक फरक
तुमच्या निर्देशांमध्ये बारीकसारीक फरक करून अंगीकारता येतील, असे वाटते.
जसाच्या तसा : १. कुटुंबातील सदस्याला आंतरजातीय विवाह करायचा आहे. मी त्याला जातीपातीचा अडसर न मानता इतर सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर त्याला मान्यता देईन.
थोडा बदलून : २. घरात / समाजात वावरतांना जातीचा उल्लेख (समाजशास्त्राच्या/इतिहासाच्या/अन्यायनिर्मूलनाचा संदर्भ सोडला तर) करणार नाही. जातीवाचक शिव्या, उल्लेख टाळेन. दुसरा करत असेल तर त्याला त्यापासून थांबवेन.
बराच बदलून : ३.
दुसर्या जातीतीलकाही लोक स्वतःची काहीतरी जात सांगतात, सांगितलेली जात काही का असेना,देवांबद्ल / दैवतांबद्दलसर्व लोकांबद्दल मनुष्य म्हणून मनापासून आदर दाखवेन.बराच बदलून : ४.
मी ब्राम्हण / मराठा आहे पणमी रस्त्याने जाताना बुद्धविहार/देऊळ दिसले तरआदराने नमस्कार करीनसामाजिक-सांस्कृतिक कुतूहलाने चांगल्या मनःस्थितीत बघेन . / सामाजिक-सांस्कृतिक कुतूहलाने चांगल्या मनःस्थितीत आणि सहभागाच्या मित्रत्वाने प्रसाद भक्षण करीन.थोडा बदलून : ५.
मी ब्राम्हण / मराठा आहे पणमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या उत्सवात सामील होईन(नेता म्हणून नव्हे तर एक सामान्य माणूस म्हणून)(???). सामील होईन म्हणजे काय? त्यांच्या खडतर/यशस्वी आयुष्याबद्दल स्फूर्तिदायक म्हणून कौतूक करेन आणि त्यांच्या युक्तिवादांचे आणि लेखनाचे गंभीर/तटस्थपणे परिशीलन करेन.द्विरुक्ती म्हणून ६.पुन्हा वेगळे लिहिलेले नाहीत.
थोडा बदलून : ७. मी
इतर जातींच्यासर्व मित्रांच्या घरी अन्न घेईन.वरील वागणे माझे हल्लीचेच आहे. मात्र "खोडलेल्या ओळी न-खोडता अंगीकाराव्या" असे कोणी समजावून सांगितले, पटले, तर निश्चित बदल करेन.
जात जनगणना
आधि जात जनगणना बंद् झाली पाहिजे..जातिची नोंदणी करायची व् असे वागणे जरा मजेदार् वाट्ते..
दरी
श्री.राजकुमार यांनी लेखाच्या सुरूवातीलाच "जातीपाती नष्ट करा असा सूर अनेकदा आणी अनेक वर्षांपासून ऐकू येतोय मात्र ते होणे शक्य नाहीये असे दिसतेय." हे मान्य केले असल्यामुळे "जात" या देशातील अभंग राहणार अशी स्थिती आहे हे सिद्ध होतेच. अर्थात भारतीय समाजव्यवस्थेचे जातीयता हे व्यवच्छेदक लक्षण असल्याकारणाने देशातील बहुतेक चळवळी अस्तित्वाच्या पहिल्या जाणिवेपासून जातीय असणे क्रमप्राप्त होते. आज २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात जी स्थिती आहे ती पुढील कित्येक दशकात बदलण्याची सुतराम शक्यता नसल्याने, लेखकाने म्हटल्याप्रमाणे केवळ "दरी" कमी करण्याचे प्रयत्न करणे इतपतच सद्यस्थितीत शक्य आणि व्यावहारिक आहे.
१. कुटुंबातील सदस्याला आंतरजातीय विवाह करायचा आहे. मी त्याला जातीपातीचा अडसर न मानता इतर सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर त्याला मान्यता देईन.
~~ मान्य. पण इथेही "आंतरजातीय लबाडीचे खेळ खेळले जातातच्". आता कॅनडास्थीत माझ्या थोरल्या मावसभावाने "मी प्रेमविवाह करणार आहे, पण मुलगी परजातीतील आहे..." असे कळविल्यावर आमच्या "सो-कॉल्ड कट्टर मराठा घराण्या"तील ज्येष्ठांत कल्लोळ उसळला आणि 'हा धर्म बुडव्या निघाला, उगाच याला परदेशात पाठविण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला, घेऊ नका त्याला घरात परत आल्यावर' इ. इ. मुक्ताफळे उधळण्यात आली. पण पुढच्या मेलमधून "ती परजातीय मुलगी ब्राह्मण आहे" असा खुलासा आल्यावर संतापाचा पारा झटकन जमिनीकडे येऊ लागला. "अरेच्या आस्सं हाय व्हय्.. मग लेकां आगुदर् नाही का सांगायच?" ~~ काय दर्शविते ही मनोगती? त्यामुळे कसला आला आहे अडसर आणि कुठली मान्यता. सोयीचा व्यवहार असतो हा आंतरजातीय विवाह. (मला वाटते नुकताच असाच एक मराठी चित्रपट येऊन गेला. चित्रपटातील नायिका - जी एका खेडेगावाच्या मोठ्या पाटलाची मुलगी असते - उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेली असते व इकडे आईवडिलांना "मी एका अमेरिकन तरूणाबरोबर विवाह करणार आहे" असे कळविते. अमेरिकन तरूण म्हटल्यावर पाटलाला वाटते की आपली मुलगी जणू काय बिल् क्लिंटन वा ग्रेगरी पेक यासम हिरोबरोबरच लग्न करून इकडे परत येणार आहे. गावात साखर वाटल्यासारखे आनंदाचे वातावरण पण प्रत्यक्षात तो नवरा निघतो "अमेरिकन निग्रो".... मग पाटलांचा काय रूबाब राहणार?)
२. घरात / समाजात वावरतांना जातीचा उल्लेख करणार नाही. जातीवाचक शिव्या, उल्लेख टाळेन. दुसरा करत असेल तर त्याला त्यापासून थांबवेन.
~~ मान्य. मी कटाक्षाने पाळतो/करतो.
३. दुसर्या जातीतील देवांबद्ल / दैवतांबद्दल मनापासून आदर दाखवेन.
~~ दाखवितो. इतकेच काय पण दिल्लीतील ख्रिश्चन, शीख आणि मुस्लिम मित्रांच्या घरात माझे त्यांच्या सणावारी सन्माननीय् अतिथी म्हणून निमंत्रण असते. (मुस्लिम भगिनीकडून राखीबंधनाचादेखील कार्यक्रम होतो.)
४. मी ब्राम्हण / मराठा आहे पण मी रस्त्याने जाताना बुद्धविहार दिसले तर आदराने नमस्कार करीन. / प्रसाद भक्षण करीन.
~~ हा प्रसंग अजून आलेला नाही, पण आला तर नक्की असेच वर्तन माझ्याकडून घडेल, इतकेच म्हणू शकतो.
५. मी ब्राम्हण / मराठा आहे पण मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या उत्सवात सामील होईन (नेता म्हणून नव्हे तर एक सामान्य माणूस म्हणून).
~~ नाही. याला कारण म्हणजे मी मराठा असूनही अद्यापि शिवजयंतीच्या उत्सवात सामील झालेलो नाही. त्याची कारणमीमांसा इथे नको.
७. मी इतर जातींच्या मित्रांच्या घरी अन्न घेईन.
~~ नेहमीच घेतो (तेही घेतात). विद्यार्थीदशेत जिथे पेईंग गेस्ट म्हणून होतो ते पारशी कुटुंब होते आणि त्यांच्याकडे आठवड्यातून् किमान दोन दिवस आग्रहाचे निमंत्रण असे, जे मी आणि माझा शीख मित्र कधीही चुकवत नसे. राजधानीच्या ठिकाणी तर तुम्हास समोरील् व्यक्ती "धर्मा"ची आहे हे कदाचित समजू शकेल पण जातीचा पत्ता (खोलात गेल्याशिवाय) कधीच लागू शकत नाही, त्यामुळे खर्या अर्थाने "गुण्यागोविंदाने" तिथे राहावे लागतेच लागते.
सहजपणे
१. कुटुंबातील सदस्याला आंतरजातीय विवाह करायचा आहे. मी त्याला जातीपातीचा अडसर न मानता इतर सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर त्याला मान्यता देईन.
२.( बदल करुन्) घरात / समाजात वावरतांना जातीचा जाणीवपुर्वक वा कुत्सितपणे उल्लेख करणार नाही. जातीवाचक शिव्या टाळेल, उल्लेख अपरिहार्य असेल तरच करेन. उदा शासकीय नोकरीत कर्मचार्यांचे स्टेटमेंट तयार करताना हे उल्लेख लागतातच. दुसरा करत असेल तर त्याला त्यापासून थांबवणार नाही पण कुठल्या हेतुनी तो करतो आहे हे समजावुन घेईन.
३. दुसर्या जातीतील देवांबद्ल / दैवतांबद्दल मनापासून आदर दाखवेन. पण मतभिन्नता असेल तर व्यक्त करेन
४. मी ब्राम्हण / मराठा आहे पण मी रस्त्याने जाताना बुद्धविहार दिसले तर आदराने नमस्कार करीन. / प्रसाद भक्षण करीन.
हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबुन शेजारच्याला बरे वाटणार असेल तर तसे करेनही अथवा नाहीही.
५. मी ब्राम्हण / मराठा आहे पण मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या उत्सवात सामील होईन (नेता म्हणून नव्हे तर एक सामान्य माणूस म्हणून).
उत्सवात सामील व्हायला काहीच आडकाठी नाही. पण सहज शक्य असेल तर.मी फारसा उत्सवप्रिय नाही
(मुंबईत बरेच ठिकाणी शिवजयंती, आंबेडकरजयंती आणी महात्मा फुले जयंती संयुक्तपणे साजरी केली जाते हे मला चांगल्या दिशेने एक पुढचे पाऊल वाटते.)
७. मी इतर जातींच्या मित्रांच्या घरी अन्न घेईन.
भुक लागल्यावर साधे अन्नही पण वेळेवर मला लागते. आषाढी एकादशीला इतर जातीतल्या मित्राकडे सामिष खाल्ले आहे. किंबहुना आषाढी असो कार्तिकी याला काही फरक पडत नाही हे माहित असल्याने त्याने आणुन ठेवले होते.
प्रकाश घाटपांडे
दरी
मूळ प्रश्न
जातींमधली दरी बुजवता येईल का?
याचं उत्तर अर्थातच हो आहे. सर्व फरक नष्ट करता येतील का, किंवा करावे का याबाबतीत काहीसा उदासीन आहे. म्हणजे जर एकमेकांना दूर ढकलणारे फरक नष्ट झाले, व काही मामूली फरक राहिले तर हरकत नाही. त्या दिशेने आपल्या समाजाचा प्रवास गेली शंभरेक वर्षं सुरू आहे असं वाटतं.
व त्यासाठी आपल्याला काही करता येईल का?
लेखकाने व्यक्तीगत वागणूक जाणीवपूर्वक बदलण्यावर भर दिलेला आहे. माझा या असल्या आवाहनांवर फारसा विश्वास नाही. महत्त्वाचे बदल होतात ते व्यवस्थेतल्या बदलांतून होतात. काही अगोदरच झालेले आहे.
'मी मनुस्मृती मानणार नाही'
'(तथाकथित) शूद्र जातीतलेही शेवटी माणसंच असतात हे लक्षात ठेवीन'
'महाराची सावली अंगावर पडली तर आंघोळ करावी लागेल असं मानणार नाही'
या गोष्टी लेखकाला म्हणाव्या लागल्या नाहीत यातच गेल्या काही दशकांमधली दरी बुजण्याच्या बाबतीतली प्रगती दिसून येते. ही दरी बुजलेली आहे ती शिक्षण व शहरीकरण अशा दुपदरी विकासामधून. कायद्याच्या पाठबळाने ही दरी बुजायला मोकळीक दिली आहे. उत्तरोत्तर शिक्षण व शहरीकरण हे वाढतच जाणार. तद्वतच जातीची दरी अजून बुजेल अशी खात्री आहे.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
सुधारकांचे मत
म्हणजेच, जनुकीय विषमता ०% असल्याचे 'तज्ञांचे' मत आहे.
आजचा सुधारक जात विशेषांक एप्रिल २००८
चर्चा भरकटते आहे....
आपल्या सर्वांचे प्रतिसाद वाचतो आहे. चर्चा केवळ चर्चा न राहता ती वैयक्तीक पातळीवर उतरते आहे. गाडी रुळावर राहू द्या ही विनंती.
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
क्षमस्व
चर्चेत प्रश्न स्वतःबद्दल विचारले आहेत त्यामुळे चर्चेचा कल वैयक्तिक पातळीवरच आहे. चर्चेत असहमती, आरोप (जे आरोपीला ;-) :प मान्य आहेत - ह. घ्या) आलेले असले तरी ते चर्चेशी सुसंगतच आहेत. घाटपांडे, चंद्रशेखर, चित्रा आणि मी उपक्रमावरचे मुरलेले वादपटू ;-) आहोत. थोडीशी हाणामारी केली तरी कटूता येणार नाही याची खात्री असावी.
तरीही चर्चाप्रस्तावकाला चर्चा भरकटते असे वाटत असल्यास मी माफी मागते. समिष भोजनाच्या मुद्द्यावरून मी प्रतिसाद वाढवणार नाही.
काळजी
राजकुमार आपल्याला काळजी वाटली तरी गाडी भरकटणार नाही जास्त. प्रत्येकाचे काही अशक्त बिंदु असतात. ते कळत नकळत छेडले गेले की माणुस आक्रमक होतो. शेवटी आपण सर्व माणसे आहोत. उपक्रम या कुटुंबातील सदस्य आहोत. वैयक्तिक मुद्दे हे शेवटी सामाजिक बनतात.
विवेकवादी माणसे का बर एकत्र येत नाहीत? आले तर टिकत नाहीत. भावना ही तितक्याच महत्वाच्या असतात. हे कळत पण वळत नाही. आभासी सहजीवनात एवढ्या अडचणी येतात तर वास्तव जीवनात किती येत असतील बर? हा मुद्दा यातुन अधोरेखित होतो.
या शेवटी सामाजिक नोंदी आहेत.अशा चर्चातुन उपक्रम हे ताकदीचे संकेतस्थळ बनत जात. हे वाचणारे सदस्यांबरोबर पाहुणेही असतात. मुद्यांची पुनरावृत्ती ही आपल्यासाठी असली तरी त्यांच्यासाठी तो मुद्द्दा वा नोंद नवीनच असते. कधी कधी आपल्याला देखील त्या मुद्द्याच आकलन नव्याने होत असत. पुनरावृत्ती ही बाब कधी उगाळणे / आळवणे बनते तर कधी पुनःप्रत्ययाचा आनंद देणारी असते.
अवांतर- गुंडोपंत कुठ गेलेत?
प्रकाश घाटपांडे
एक तत्त्व पुरे
प्रत्येक व्यवहारात (रोटी-बेटी किंवा अन्य कोणत्याही) सर्वजातीसमभावावर न थांबता जातीनिरपेक्षता कशी दाखवता येईल याचा प्रयत्न करेन
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
शंका
ये बोंबिल बोंबिल क्या है, ये बोंबिल बोंबिल?