नातवाच्या जगात (भाग ३: कॉफी मेकर)

वा! आज चक्क नातवाच्या हातची कॉफी प्यायली. "बढीया" हा एकच शब्द सुचतो. त्याला म्हटलंही "तुझ्या हाताला चव आहे हं" तर म्हणतो कसा "अर्थातच! मी काही कॉफी मेकर नव्हे एकाच साच्याची कॉफी बनवायला. जशी हवी तशी कॉफी बनवू शकतो."
मला बरेच दिवस दुकानात हे कॉफी मेकर्स दिसत होते. परवा भाच्याच्या ऑफिसातही बघितला. पूर्वी कोणी आपल्या ऑफिसात आलं की पोर्‍याला "दोन चहा पाठव रे" हे सांगायचे दिवस गेलेले दिसतात. ह्या भाच्याने स्वतःच कॉफी मेकर वर तयार असलेली कॉफी ओतली आणि दुधाची भुकटी बरोबर मला दिली. ती कॉफी आयती असल्याने ती त्याने बनवली कशी हे काही कळले नव्हते. तेव्हा नातवालाच विचारले
"काय रे? हे कॉफी मशीन काय असत?"
"काही नाही हो साधं मशीन असतं त्यात कॉफीची पावडर आणि पाणी घालायचं, कोरी कॉफी बाहेर"
"ते कसं काय? गरम पाणी घालायचं का?"
"थांबा आपल्याकडे कॉफी मेकर आहे तोच दाखवतो"
आता माझ्याबरोबर आमच्या कुटुंबाचीही उत्सुकता चा़ळवली. स्वयंपाकघरात काही नवं आलंय आणि मला माहीत नाही हे तिला सहन होणं शक्यच नव्हत. नातवाने कॉफी मशीन काढलं. धूळ झटकली. भाडं धुताना सांगत होता.
"यात एकसारखी कॉफी तर होतेच पण यात घालायची कॉफी फक्त कॉफीची रवाळ भुकटी असते. आपल्याकडे भारतात चिकोरी घातल्याने येणारा दाटपणा व चव या कॉफीला नसते म्हणून इथे कोणालाच आवडत नाही. म्हणून हा मेकर नुसताच घरात पडलाय"
"अगो बाई! हे काचेचं भांड किती नाजुक आणि सुंदर आहे." कोणत्याही अद्ययावत उपकरणांची सवयीने स्तुती सौ.ने सुरू केली

कॉफी मेकर

"हे बघ ह्या पाणी भरण्याच्या जागेत आधी पाणी भरायचं साधंच. शिवाय, हा कॉफी विभाग. यात कॉफीची पूड गाळण कागदासोबत ठेवायची. झाकण लावायचं , वीज चालू करायची. झालं! ह्या काचेच्या भांड्यात कोरी गरमागरम कॉफी गाळून पडते ती दूध/दूध पावडर व साखर घालून प्यायची."
"अरे पण हे चालतं कसं?"
"हे ह्या पाणी साठवण्याच्या जागी खाली भोक दिसतंय?"
"बघू बघू" आजीबाई लगेच चष्मा वगैरे लावून आमच्या पुढे "हो दिसतंय तर!"
"तर ह्या भोकातून पाणी जातं हिटींग असेंब्लीकडे."
"म्हणजे रे काय? ती असेंब्ली असते कशी?"
"थांब उघडूनच दाखवतो"
"अरे नको" हे म्हणे पर्यंत दुसरा स्क्रू बाहेर निघायला आला होता.
" हे बघा.."

कॉफी मेकर (खालचा भाग)

" आता ही वरची नारंगी नळी आहे ना? ही त्या भोकाला जोडली आहे आणि खालची नळी दुसर्‍या एका पांढर्‍या नळीला. पाणी इथून आत येते आणि इथे विजेच्या मदतीने ही धातूची नळी तापवली जाते. त्यातून पाणी गेलं की तेही तापतं आणि हे तापलेलं पाणी पांढर्‍या नळीतून वर चढतं ते थेट कॉफीच्या विभागात पडतं. आणि आपल्याला मस्त कॉफी मिळते."
"अरे वा! किती दिवस हे शोधत होतो. वाटत होतं की असंच काहीतरी असेल पण कॉफी पावडर वर टाकतात ते बघून काही वेगळीच रचना आहे की काय असं वाटायचं" मी अगदीच हॅ नाही आहे हे दाखवायचा उगाच प्रयत्न केला

"बाकी विषय निघालाच आहे तर अजून एक शंका"
"काय?"
"अरे तुम्ही पोरं आजकाल ती एक्स्प्रेसो कॉफी पिता ते काय प्रकरण आहे? ती कशी बनवतात?" मला ही शंकाही बरेच दिवस होती म्हटलं आज वीर चक्क इतकी माहिती देताहेत तर अजून मिळवावी.
"त्याचं वेगळं मशीन असतं. "
"आधी सांग एक्स्प्रेसो म्हणजे काय?"
"एक्स्प्रेसो कॉफीचे बरेच प्रकार आहेत. एक्स्प्रेसो म्हणजे अगदी काँन्स्न्ट्रेटेड कॉफीचा 'शॉट' "
नशीब आमच्या कुटुंबाने "शॉट" म्हणजे काय विचारलं नाही असा विचार मनात आला. मात्र ती नातू काय सांगतोय ते सत्यनारायणाच्या कथेसारखं ऐकत होती
"एकदम गच्च दाबून भरलेल्या, अगदी बारीक दळलेल्या कॉफीमध्ये जेव्हा अगदी गरम पाण्याचा एक शॉट मारला जातो तेव्हा काही वेळाने बाहेर एक चिकट, द्रव बाहेर येतो. हा झाला एकदम दाटा कॉफीचा एक एक्स्प्रेसो शॉट. ह्या शॉटची क्वालिटी बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असते, जसे पाण्याचे तापमान, कॉफीची प्रत, त्याच्या पावडरीचा बारीकपणा, पाण्याचा वेग, कॉफीवरील दाब वगैरे वगैरे. बरिस्ता वगैरे मोठ्या कॉफीमेकिंग कंपन्यांकडे ह्यापैकी अनेक गोष्टी योग्य प्रमाणात कंट्रोल करू शकणारे उपकरणे असतात. थांबा तुम्हाला बेसिक उपकरण कसे असते ते काढून दाखवतो"

एक्स्प्रेसो मेकर

"ह्या मशीनच्या ह्या कप्प्यात अगदी वस्त्रगाळ केलेली भरपूर कॉफी ठासून भरलेली असते. उत्तम एक्स्प्रेसो शॉटसाठी कॉफी अशी आणि इतकी पाहिजे की पाण्याचा एक शॉट दुसर्‍या तोंडाने बाहेर पडायला जवळजवळ २५ सेकंद लागली पाहिजेत. आता वरच्या भांड्यात खाली पाणी उकळू लागते त्याला बाहेर यायला फक्त कॉफीतून पास होणे इतकाच मार्ग शिल्लक असतो. तेव्हा ते काही वेळातच कॉफीतून मार्ग काढते व वरच्या नळीतून बाहेर येते. आणि आपल्याला छान एक्स्प्रेसो मिळते. अर्थात दुकानांतली मशीन इतकी बेसिक नसतात."
मला नातवाला असणार्‍या माहितीबद्दल फार कौतुक वाटत तर होतंच. आजीने त्याला एक आल्याची वडी दिली. तिच्या चेहर्‍यावर सगळी उपकरणे उघडून बघणार्‍या उद्योगी नातवाचे कौतुक कॉफीपेक्षाही दुप्पट वेगाने वाहत होते

 
लेखनविषय: दुवे:

Comments

दक्षिण भारतातील कॉफी

इतर प्रकारच्या कॉफीची कितीही कौतुक केले तरी फिल्टर कॉफीची मजाच वेगळी.


फिल्टर कॉफीची भांडी

+१

सहमत आहे. फिल्टर कॉफी छानच असते. वरचे भांडेही माझ्याकडे आहे :)

बाकी ह्या लेखमालेचा उद्देश हल्ली सर्रास (नातवाच्या दुनियेतल्या) वापरल्या जाणार्‍या गोष्टी कशा चालतात, वगैरेची थोडक्यात ओळख असे असल्याने लेखात ही भांडी टाकली नव्हती

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मस्त!

लेख आवडला.

शेवटचा परिच्छेद हुच्च! :-)

लेख मस्त

लेख आवडला

उत्तम

आणखी एक उत्तम भाग.

भारतातही आता घराघरांत कॉफी मेकर दिसतात का?

नाही दिसत

नाही अजून घरोघरी दिसत नाहीत. परदेशातून आलेले काही भारतीय (कौतुकाने) घरी आणतात.. मात्र् हे मशीन ऑफिसांमधे सर्रास दिसु लागले आहे.

अजून चिकोरीयुक्त (ज्यामुळे पाणी घालताच चिकट होणार्‍या ) कॉफीसाठी मशीन्स निघेपर्यंत भारतात ही मशीन्स घरोघरी चालणे कठीण वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

असेच

आणखी एक उत्तम भाग.
असेच. उत्कृष्ट लेख.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

छानच!

मस्त लेख.

मस्त लेख.

मस्त लेख!

हाउसब्लेंड+हाफ'न्'हाफ+ भरपुर साखर हे माझे फेव काँबिनेशन आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला शुन्याजवळ तापमान् आहे, पावसाची भुरभुर सुरु आहे आणि सकाळच्या क्लासला हातात असा कॉफीचा मग घेउन चाललो आहे.. आहाहा!

-Nile

 
^ वर