केतकरांच्या लेखाविषयी

कुमार केतकर यांनी रविवार दिनांक ०१/०८/२०१० रोजी लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमध्ये ’टिळक आणि जीना : नुरानींच्या नजरेतून’ या नावाचा लेख लिहिला होता. ही लिंक पाहा. या विषयाला बैरागींनी तोंड फोडण्याचा प्रयत्न केला असावा परंतु तो विषय दुसरीकडेच जाऊन पोहोचला.
केतकरांनी हा लेख खरोखरच नुरांनीच्या नजरेतून लिहिला आहे असे वाटते. मुस्लीम प्रश्न समोर आला की त्यांचा चिकित्सकपणा बंद होतो. याचा प्रत्यय याही लेखातून येतो. या विषयीचे काही मुद्दे पुढील प्रमाणे :
१) " केवळ मुसलमानांना स्वराज्याचे अधिकार देण्यात आले, तरी त्याचे आम्हास काही वाटणार नाही" हे टिळकांचे विधान केतकरांनी उदधृत केले आहे. अशाच आशयाची विधाने गांधीजींनीही केली आहेत. यावरून टिळक व गांधी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी किती उदार व त्यागी भूमिका घेत होते याचा प्रत्यय येतो. लखनौ करारासारख्या कृतीतून ही गोष्ट स्पष्ट होते. परंतु "सर्व सत्ता हिंदूच्या हाती गेली तरी चालेल" अशा आशयाचे विधान एका तरी मुसलमान नेत्याने केले आहे काय?
२) ज्या हसरत मोहानींच्या टिळकप्रेमाचा उल्लेख मोठ्या कौतुकाने केतकरांनी केला आहे. त्या मोहानींची मोपला बंडाविषयीची मते धर्मांधता दर्शवणारी आहेत. या बंडात झालेल्या धर्मांतराविषयी ते म्हणतात "मोपल्यांनी हिंदूंसमोर मृत्यू अथवा धर्मांतर हे पर्याय ठेवणे योग्यच होते, जर हिंदूंनी मृत्यूऐवजी मुस्लीम धर्म स्वीकारला असेल तर त्यांना जबरी धर्मांतर म्हणता येणार नाही, तर ते त्यांनी स्वखुशीने स्वीकारले असेच म्हटले पाहिजे." (Ambedkar B. R., Pakistan or Partition of India, Bombay, 1990, P.160) या विधानावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. मोहानींचे टिळकांवर प्रेम होते याचा अर्थ असा नव्हे की हिंदूसमाजावर प्रेम होते. मौलाना महमंद अली किंवा मौलाना शौकत अली हे दोन बंधू ’या’ प्रकाराचे आणखी एक उदाहरण. त्यांचेही टिळकांवर फार प्रेम होते मात्र त्यामुळे त्यांची विरोधीवृत्ती कमी झाली नाही.
३) केतकर लेखात एके ठिकाणी म्हणतात, "....फाळणी वाचवायचे प्रयत्न टिळकांपासून सुरू झाले-आणि ते अगदी १९४६ पर्यंत-म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत-म्हणजे जीनांच्या बाजूने चालू होते." टिळकांनी फाळणी वाचवण्याचे प्रयत्न केले हे उघडच आहे, मात्र जीनांच्या बाजूनीही असे प्रयत्न चालू होते असे म्हणणे म्हणजे इतिहासाचा अगदीच विपर्यास आहे. जीनांनी हिंदू मुस्लीम ऐक्यासाठी मुस्लिमांच्या वतीने काही त्याग करणे सोडाच उलट आपल्या न्याय्य अधिकारापेक्षा जास्तीच्या मागण्या करणे चालू ठेवले. त्यांच्या सुप्रसिद्ध चौदा मागण्या पाहिल्या तर हे पुरेसे स्पष्ट होते. (Pakistan...P.257-258)
खरी गोष्ट अशी आहे की जीनांच्या या भरमसाट मागण्या पूर्ण करणे कोणत्याच कॉंग्रेस नेत्याला शक्य नव्हते. म्हणून त्या कॉंग्रेस नेत्यांनी जीनांनीच मांडलेला व मुस्लीम समाजात रुजवलेला फाळणीचा पर्याय नाईलाजाने स्वीकारला. बरे या आपल्या भरमसाठ मागण्या किंवा फाळणीचा पर्याय स्वीकारावयास लावण्यासाठी जीना कोणत्या थरापर्यंत गेले, तर त्यांनी ’प्रत्यक्ष कृतीची’ (डायरेक्ट एक्शन) हाक दिली व ती प्रत्यक्षात आणली. या प्रत्यक्ष कृतीत ५००० लोक ठार झाली, १५००० जखमी तर लाखाहून अधिक निराश्रित झाले. (तळवळकर गोविंद, सत्तांतर:१९४७, खंड : २, मुंबई, १९९७, पृ.१५२) ही सरकारी आकडेवारी आहे. प्रत्यक्षातील आकडा यापेक्षाही अधिक मोठा असू शकतो. या सर्व गोष्टी केतकरांना जीनांच्या बाजूने फाळणी टाळण्याच्या प्रयत्नाचा भाग वाटतात काय? केतकरांनी स्वत:च्या स्वातंत्र्य लढ्यावरील ग्रंथात ’पाकिस्तानची मागणी जीनांनीच मुस्लीम समाजामध्ये मुरवली होती’ असे स्वच्छपणे म्हटले आहे. (केतकर कुमार, कथा स्वातंत्र्याची, पुणे २००३, पृ.३०३) मात्र ’प्रत्यक्ष कृती’ या गंभीर घटनेचा उल्लेखसुद्धा करणे या साडेतीनशे पानी ग्रंथात आवश्यक वाटलेले नाही.
४. केतकरांनी आपल्या लेखामध्ये ए.जी. नुरानी यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे, त्याची दुसरी बाजू दाखवणे आवश्यक आहे. मुस्लीम समाजातील बुद्धिवादी समाज सुधारक हमीद दलवाई यांनी ’राष्ट्रीय एकात्मता व भारतीय मुसलमान’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे त्यात त्यांनी ए. जी. नुरानी या अभ्यासकाविषयी बरीच माहिती दिली आहे. ती पुढीलप्रमाणे-ए.जी. नुरानी हे उदारमतवादाचा लेप लावलेले छुपे जातीयवादी असून अलीगढ विद्यापीठाच्या जातीयवादी राजकारणात ते सक्रिय सहभागी असत. भारत पाक संघर्ष आणि कश्मीर प्रश्नाच्या संदर्भात ते नेहमी पाकिस्तानवादी भूमिका घेत. भारतात सुशिक्षित मुसलमानांची पाकिस्तानवादी लॉबी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्यात ते पुढे होते. त्यांच्या अतिरिक्त पाकिस्तान प्रेमामुळे १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात सरकारने त्यांना भारत संरक्षण कायद्याखाली स्थानबद्ध केले. पुढे १९७१ साली परत भारत पाक संघर्ष झाला. त्याही वेळी आपल्याला अटक होईल या भीतीने नुरानींनी महाराष्ट्राचे तत्कालीन आरोग्यमंत्री रफिक झकेरिया यांच्यामार्फत अटक टाळण्याचे प्रयत्न केले. इ.(दलवाई हमीद,’राष्ट्रीय एकात्मता व भारतीय मुसलमान’ पुणे, २००२, पृ.१४९-१५८) नुरानींच्या अशा ’कर्तृत्वाविषयी’ बरेच तपशील दलवाईंनी दिले आहेत जिज्ञासूंनी ते मुळातूनच पाहावेत.
केतकरांनी इतिहासाचा विपर्यास केला आहे, हे उघड आहे. आपण असेही गृहीत धरू की त्यांनी हे लिखाण उदात्त हेतूनेच केले आहे.( म्हणजे उदा.हिंदू मुस्लीम ऐक्य व्हावे वैगेरे) मात्र समकालीन उदात्त हेतूसाठीही कोणी ’इतिहास’ या ज्ञानशाखेला वेठीस धरून त्याचा विपर्यास करता कामा नये. या ज्ञानशाखेची स्वायत्तता जपणे आवश्यक आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

ही प्रतिक्रिया

ही प्रतिक्रिया लोकसत्ताला पाठवली आहे का?

आपण असेही गृहीत धरू की त्यांनी हे लिखाण उदात्त हेतूनेच केले आहे.( म्हणजे उदा.हिंदू मुस्लीम ऐक्य व्हावे वैगेरे) मात्र समकालीन उदात्त हेतूसाठीही कोणी ’इतिहास’ या ज्ञानशाखेला वेठीस धरून त्याचा विपर्यास करता कामा नये. या ज्ञानशाखेची स्वायत्तता जपणे आवश्यक आहे.

इथेच तर गोची होते ना? जो तो आपापल्या सोयीने इतिहासाचे विश्लेषण करतो. इतिहासातील पात्रे वर्तमानात थोडीच येणार आहेत? शिवाजी महाराजांच्या पदरी निष्ठावंत मुस्लिम होते याचेही विश्लेषण रंगभरीत करता येते.
असो
अवांतर- केतकर आता राज्यसभेवर खासदार म्हणुन नियुक्त होणार असल्याचे भाकीत आम्ही केव्हाच वर्तवले आहे
प्रकाश घाटपांडे

प्रतिसाद नाही

कुमार केतकरांच्या लेखावरील ही प्रतिक्रिया लोकसत्ताला पाठवली, तसेच कुमार केतकरांनाही पाठवली परंतु त्यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. केवळ कौतुकाच्या प्रतिक्रिया छापल्या आहेत. चिकित्सक प्रतिक्रियांना काहीही स्थान नाही, असे दिसते.असो

लाख पते की बात

समकालीन उदात्त हेतूसाठीही कोणी ’इतिहास’ या ज्ञानशाखेला वेठीस धरून त्याचा विपर्यास करता कामा नये. या ज्ञानशाखेची स्वायत्तता जपणे आवश्यक आहे.
लाख पते की बात. तुमचा प्रतिसाद आवडला. कुमार केतकरांना ह्या लेखाचा दुवा पाठवून द्यायला हवा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पाठवला

त्यांच्या हॉटमेल पत्त्त्यावर पाठवला आहे दुवा. माहित नाही उघडतात का हॉटमेल्
प्रकाश घाटपांडे

 
^ वर