गणिताला महत्त्व देऊ या.
सध्या प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांच्या बाबतींत जरा ज्यास्तच हळवी झाली आहेत. जरा कुठे विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागेल असे दिसले की त्यांच्या मनावरील ताणाचा मुद्दा उपस्थित केला जातो. (आजच्या - ९ मे च्या - 'लोकसत्ता'मधील मुकुन्द संगोराम यांचा "सोप्यातून सोपेपणाकडे...." हा लेख अपवादात्मक आहे. तो जरूर वाचावा). गणिताच्या बाबतींत लिहिल्या जाणार्या बहुतेक लेखांचा सूर तर गणित आले नाही तरी चालेल असा असतो. ज्यावेळी अशी सार्वत्रिक सूट मिळण्यासाठी शिफारस केली जाऊ लागते त्यावेळी कष्टसाध्य गोष्टींसाठी प्रयत्न न करण्याची प्रवृत्ति निर्माण होते.
गणितामुळे विचारशक्ति व तर्कशक्ति विकसित होते. दुसर्या शब्दांत सांगायचे तर गणितामुळे स्वतःपाशी असलेला निसर्गदत्त संगणक (आपला मेंदू) वापरण्याची संवय लागते. त्यामुळे एकदा गणित येऊ लागले की कुठलाही विषय येऊ शकतो. म्हणून गणितावर प्रभुत्व मिळवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे हिताचे आहे.
गणितांतील कौशल्य हे मूलतः मेंदू वापरण्याचे कौशल्य असल्यामुळे ते वाहन चालवणे, पोहणे, बाह्य संगणक वापरणे यांप्रमाणेच अत्यावश्यक कौशल्य समजण्यांत यावे, त्या दृष्टीने ते शिकवण्यांत यावे व विद्यार्थ्यांनी ते तितक्या तळमळीने शिकावे. गणित दहावीपर्यंत - म्हणजे जोपर्यंत पुढील ज्ञानशाखा निश्चित होत नाही तोपर्यंत - अनिवार्य असावे. त्यांत पास होण्यासाठी टक्केवारी इतर विषयांप्रनाणे ३५ न ठेवता ७५ ठेवावी कारण ते अत्यावश्यक कौशल्य आहे.
आपणांस काय वाटते?
Comments
गणित
गणितावर प्रभुत्व मिळवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे हिताचे आहे.
हे मान्य , पण फक्त "हिताचे"हे ल़क्षात रहावे. स्वःताचे हित करून घ्या म्हणून कुणावरही सक्ति होउ नये
गणितांतील कौशल्य हे मूलतः मेंदू वापरण्याचे कौशल्य असल्यामुळे ते वाहन चालवणे, पोहणे, बाह्य संगणक वापरणे यांप्रमाणेच अत्यावश्यक कौशल्य समजण्यांत यावे
ह्या मागे काही वैज्ञानिक आधार आहे काय? कारण बहुतेक सगळ्या व्यवसाय म्हणून वाहन चालवणा-यांचा गणिताशी दूर-दूर पर्यत संबंध नसतो असे दिसते. तेच पोहण्याच्या बाबतीत. बाह्य संगणक मध्ये गणितांतील कौशल्य लागत असेल अशी शंका घ्यायला जागा आहे.
गणित दहावीपर्यंत - म्हणजे जोपर्यंत पुढील ज्ञानशाखा निश्चित होत नाही तोपर्यंत - अनिवार्य असावे
हे मान्य, पण
त्यांत पास होण्यासाठी टक्केवारी इतर विषयांप्रनाणे ३५ न ठेवता ७५ ठेवावी कारण ते अत्यावश्यक कौशल्य आहे.
हे मात्र अमान्य आहे. कारण मुळात शाळेमध्ये जे गणित शिकवले जाते त्याचा व्यावहारिक जगात कितपत उपयोग होत असेल ही एक शंकाच आहे.
अनेकजण मुळात गणिताकडे inclined नसतात असे माझे निरिक्शण आहे.
आणि कुठल्याही गोष्टीची सक्ती केली जाऊ नये असे माझे मत आहे (जरी गणितावर माझे मनापासून प्रेम आहे तरी).
गैरसमज
.......बहुतेक सगळ्या व्यवसाय म्हणून वाहन चालवणा-यांचा गणिताशी दूर-दूर पर्यत संबंध नसतो असे दिसते. तेच पोहण्याच्या बाबतीत. बाह्य संगणक मध्ये गणितांतील कौशल्य लागत असेल अशी शंका घ्यायला जागा आहे.
काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. मी गणिती कौशल्य हे वाहन चालवणे, पोहणे किंवा बाह्य संगणक वापरणे यांप्रमाणे अत्यावश्यक कौशल्य समजण्यांत यावे असे म्हंटले आहे. यांसाठी गणिती कौशल्य लागते असा माझ्या विधानाचा अर्थ निघत नाही.
मान्य
मुद्दा मान्य. गैरसमज झाला होता.
पण मत अजूनही तेच - सक्ति कशाचीच नसावी.
दुवा
या लेखाचा दुवा द्याल का?
पल्लवी
संघटित कार्य
माझ्या मते दहावीपर्यंतच्या वयापर्यंतच्या वयोगटातील मुलांमध्ये एकप्रकारची अतुलनीय आकलन आणि अनुकूलन क्षमता असते जी किती हव्या त्या क्षेत्रात रुपांतरीत करून घ्यावी हे संबंधित परिस्थितीवर अवलंबून असते. मुलांच्या कलाने घेतघेत जर त्यांना एखाद्या विषयातली गोडी लक्षात आणून दिली तर ते अगदी मंतरल्याप्रमाणे ती कला आत्मसात करून घेऊन कधी तुमच्यावर कड करून मोकळे होतील हेच तुम्हाला कळणार नाही. ( माझ्या मते ) शाळेतले सगळेच विषय त्यांच्यालेखी चिल्लर असतात, फक्त १ शिकला तर २ शिकावा लागेल याबद्दल भीती न वाटता उत्सुकता वाटून पटापट आत्मसात करायची वृत्ती त्यांच्यात वृद्धिंगत कशी होईल हे बघणे हे त्यांच्या पालकांचे, भावाबहिणी-दोस्तांचे, शिक्षकांचे काम आहे असे मला वाटते.
माझ्या शाळेत जोशीबाई म्हणून एक शिक्षिका होत्या ज्या आम्हाला म्हणायच्या की जर वर्गातल्या सर्व मुलांनी दर आठवड्याचा गणिताचा अभ्यास नीट पूर्ण करून आणला आणि शुक्रवारच्या माझ्या तासात मी विचारलेल्या प्रश्नाची मी सांगेन त्या-त्या मुला/मुलीने अचूक उत्तर दिले तर शनिवारचा गणिताचा तास - हा खेळाचा तास होईल ! खेळाचा एक जादा तास ( ज्यात त्या बाई आम्हाला त्यांनी त्यांच्या लहानपणी खेळलेले पारंपारीक खेळ शिकवायच्या जे खेळताना खूप धमाल यायची कारण त्या स्वतःही आमच्यात खेळायच्या ! ) मिळवण्यासाठी गणितात इतर कुठल्याही कारणांनी गती नसलेल्या मुला/मुलींना आठवड्यातील अभ्यास पूर्ण करायला आणि शिकवलेले पाठ जितके जास्त जमतील तितके आत्मसात करून घ्यायला मदत करायला चढाओढ व्हायची. असे एका महिन्यात जर आम्ही सगळे खेळाचे तास मिळवले तर पुढच्या महिन्यातील पहिल्या गणिताच्या तासाला बाई त्यांच्या जबरदस्त गुंगवून ठेवणार्या कथनशैलीत आम्हाला एक छानशी गोष्ट/कथा सांगायच्या ज्यातली एक आणि एक ओळ - एक आणि एक शब्द अख्ख्या वर्गाने जिंकलेला असायचा ! ती जिंकल्याची धुंदीच काही निराळी होती जी आजही नुसतं कोणी 'गणित' शब्द उच्चारला तरी परत अनुभवल्याचा अप्रतिम आनंद होतो.
असे अनुभव अनुभवण्याचा प्रत्येक छोट्या दोस्ताला हक्क आहे आणि तो मिळवून देण्यात त्यांच्या आपल्यांनी त्यांची मदत करायला हवी असे मला वाटते. परिक्षेत प्राप्त गुणांकनावर माझे मूल्यमापन घरी कधीच केले गेले नाही त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलणे योग्य होणार नाही तरीही जबरदस्त हुशार मुलांच्या डोक्यात जर हे तथाकथित गुणांकनाचे खूळ भरवले गेले तर सर्व स्तरावरील बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे जर त्यांना एकही गुण कमी पडला तर ही गोष्ट ते अत्यंत मनाला लावून घेतात हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे जो मी माझ्या भाच्याबद्दल अनुभवते आहे. त्यांना त्या मनःस्थितीतून बाहेर काढणे हे अत्यंत जिकीरीचे काम असते आणि जे साध्य न झाल्यास ही मुले पार दुसर्या टोकाला - म्हणजे अभ्यास करूनही माझा एक गुण कमी केला, मी ऐनवेळी तात्पुरता अभ्यास केला तरी मला ७५% मिळू शकतात मग कशाला करा रोज अभ्यास? - जाण्याची दाट शक्यता असते - जी माझ्या मते अत्यंत घातक आहे. माझ्या मते तरी मुलांना केवळ त्या-त्या विषयातले गिमिक कसे अभ्यास करायला आव्हानात्मक आहे आणि जे शिकल्यास आयुष्यात कसा त्याचा उपयोग होऊ शकतो हे शिकवल्यास गुण वगैरे ऐहिक गोष्टी आपोआप पाठलाग करत त्यांच्यामागे यायच्या त्या येतीलच.
- वेदश्री.
ज्यांना म्हणजे माझ्या सारख्याला
जर गणित समजणे हे आकलन शक्तीच्या बाहेरचे असेल तर त्या विद्यार्थ्याने काय करावे? ७५% हे बंधन घातल्याने गणित येईल असे मला तरी वाटत नाही. हा भिती जर वाटत असेल तर ती दूर करायचा प्रयत्न मात्र करू शकतो आपण.
माझं मत..
त्यामुळे एकदा गणित येऊ लागले की कुठलाही विषय येऊ शकतो.
या विधानाशी असहमत. उत्तम गणित येणार्या माणसाला चित्रकलेत किंवा पाककलेत गती असेलच असे नाही!
त्यांत पास होण्यासाठी टक्केवारी इतर विषयांप्रनाणे ३५ न ठेवता ७५ ठेवावी कारण ते अत्यावश्यक कौशल्य आहे.
असहमत. मग विज्ञानाला, मराठीला, किंवा इतर कुठल्या विषयालाही ७५ टक्क्यांची अट का नको? कुठला विषय कुणाकरता किती आवश्यक आहे हे तुम्हीआम्ही कसं ठरवणार??
माझ्यामते बेरजा, वजाबाक्या, भागाकार आणि गुणाकार, टक्केवारी, सरळ व चक्रवाढ व्याज, एवढं जुजबी गणित जरी प्रत्येकाला आलं तरी ते समाजात वावरायला पुरेसं आहे! व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मलाही इतकंच गणित येतं. त्यापेक्षा अधिक गणिती नियम, प्रमेये अन् गृहितकं मला माहीतही नाहीत. परंतु त्यामुळे माझे सर्व व्यवहार कुठेही न अडता अगदी उत्तम सुरू आहेत. असो..
सदर चर्चा म्हणजे मला गणिताबद्दलचा अतिरिक्त अट्टाहास वाटतो!
धन्यवाद,
आपला,
(आर्यभट्ट) तात्या अभ्यंकर.
माझी उत्तरे
या विधानाशी असहमत. उत्तम गणित येणार्या माणसाला चित्रकलेत किंवा पाककलेत गती असेलच असे नाही!
सर्वसाधारणपणे बोलायचे तर 'गणित विषयांत समाधानकारक प्रगति नसली तरी इतर ज्ञानशाखांत हीच मुले नेत्रदीपक प्रगति करू शकतात' या लोकप्रिय विधानापेक्षा 'एकदा गणित येऊ लागले की कुठलाही विषय येऊ शकतो' या विधानाची सत्यता अधिक आहे.
..... मग विज्ञानाला, मराठीला, किंवा इतर कुठल्या विषयालाही ७५ टक्क्यांची अट का नको?....
तसे झाले तर फारच उत्तम. सुरवात गणितापासून करू या.
....... व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मलाही इतकंच गणित येतं. त्यापेक्षा अधिक गणिती नियम, प्रमेये अन् गृहितकं मला माहीतही नाहीत. परंतु त्यामुळे माझे सर्व व्यवहार कुठेही न अडता अगदी उत्तम सुरू आहेत. असो..
पण आपण इतर गोष्टींबरोबरच अधिक गणिती नियम, प्रमेये अन् गृहीतके यांवरही प्रभुत्व मिळवले असते तर आता आहांत त्यापेक्षा कितीतरी ग्रेट झाला असता.
माझी प्रत्त्युत्तरे..
'गणित विषयांत समाधानकारक प्रगति नसली तरी इतर ज्ञानशाखांत हीच मुले नेत्रदीपक प्रगति करू शकतात'
बहुधा ही फॅक्ट असावी,
या लोकप्रिय विधानापेक्षा
आणि म्हणूनच कदाचित हे विधान लोकप्रिय असावं!
सर्वसाधारणपणे बोलायचे तर 'गणित विषयांत समाधानकारक प्रगति नसली तरी इतर ज्ञानशाखांत हीच मुले नेत्रदीपक प्रगति करू शकतात' या लोकप्रिय विधानापेक्षा 'एकदा गणित येऊ लागले की कुठलाही विषय येऊ शकतो' या विधानाची सत्यता अधिक आहे.
ती कशी काय बुवा??
'एकदा गणित येऊ लागले की कुठलाही विषय येऊ शकतो' या विधानाची सत्यता अधिक आहे.
हे माझ्या मते हास्यास्पद विधान आहे. याचा अर्थ गणित येणार्या प्रत्येक व्यक्तिला या जगातला प्रत्येक विषय येऊ शकतो असे आपल्याला म्हणायचे आहे काय? तसे असेल तर माझ्यापुरता तरी हा चर्चाविषय संपला. कारण माझी अल्पबुद्धी यावर आणखी काही भाष्य करण्याची मला परवानगी देत नाही!!
तसे झाले तर फारच उत्तम. सुरवात गणितापासून करू या.
का बरं?? गणितापासूनच सुरवात का? मराठीपासून किंवा इंग्रजीपासून का नको? किंवा सर्व विषयांची एकदमच सुरवात का नको?? गणितातच काय असं खास विशेष?? की आपल्याला वाटतं म्हणून?
पण आपण इतर गोष्टींबरोबरच अधिक गणिती नियम, प्रमेये अन् गृहीतके यांवरही प्रभुत्व मिळवले असते तर आता आहांत त्यापेक्षा कितीतरी ग्रेट झाला असता.
Seems to be simply funny!
Anyways, काही खुलासे,
१) मी ग्रेट नाही,
२) संबंधित चर्चेवर मी फक्त वस्तुस्थितीनुसार विधाने केली आहेत.
३) पण आपण इतर गोष्टींबरोबरच अधिक गणिती नियम, प्रमेये अन् गृहीतके यांवरही प्रभुत्व मिळवले असते तर आता आहांत त्यापेक्षा कितीतरी ग्रेट झाला असता.
या वाक्यात 'जर-तर' ची शक्यता वर्तवली आहे, जी वस्तुस्थितीपासून मला दूर घेऊन जाते. त्यामुळे यावर मी काही फारसं भाष्य करू शकेन असं मला वाटत नाही!
धन्यवाद,
तात्या.
प्रत्युत्तरांवर उत्तरे ...
का बरं?? गणितापासूनच सुरवात का? मराठीपासून किंवा इंग्रजीपासून का नको? किंवा सर्व विषयांची एकदमच सुरवात का नको?? गणितातच काय असं खास विशेष?? की आपल्याला वाटतं म्हणून?
सर्व विषयांची एकदम सुरुवात करायला माझी हरकत नाही. पण मी गणित समुदायासठी लिहीत असल्यामुळे गणितापासून सुरुवात करू असे म्हंटले.
Seems to be simply funny!
I am serious.
Anyways, काही खुलासे,
१) मी ग्रेट नाही,
ही जशी वस्तुस्थिति असण्याची शक्यता आहे, तसाच हा आपला विनय असण्याची शक्यता आहे.
२) संबंधित चर्चेवर मी फक्त वस्तुस्थितीनुसार विधाने केली आहेत.
३) पण आपण इतर गोष्टींबरोबरच अधिक गणिती नियम, प्रमेये अन् गृहीतके यांवरही प्रभुत्व मिळवले असते तर आता आहांत त्यापेक्षा कितीतरी ग्रेट झाला असता.
या वाक्यात 'जर-तर' ची शक्यता वर्तवली आहे, जी वस्तुस्थितीपासून मला दूर घेऊन जाते. त्यामुळे यावर मी काही फारसं भाष्य करू शकेन असं मला वाटत नाही!
वस्तुस्थितीच्या पलीकडच्या शक्यता पहाण्यास हरकत नसावी.
उत्तरांवर उत्तरे..
सर्व विषयांची एकदम सुरुवात करायला माझी हरकत नाही. पण मी गणित समुदायासठी लिहीत असल्यामुळे गणितापासून सुरुवात करू असे म्हंटले.
ओक्के!
Seems to be simply funny!
I am serious.
I am honoured! पण खरंच मी कुणी ग्रेट नाहीये म्हणून आपलं विधान फनी वाटतंय असं मी म्हटलं!
ही जशी वस्तुस्थिति असण्याची शक्यता आहे, तसाच हा आपला विनय असण्याची शक्यता आहे.
आता यावर मी काय बोलू? ;)
वस्तुस्थितीच्या पलीकडच्या शक्यता पहाण्यास हरकत नसावी.
Done!
तात्या.
आबाजी बेडखळे आणि गणित! ;)
आबाजी बेडखळे!
मंडळी, आबाजी बेडखळे हा माझा अगदी चांगला दोस्त. त्याची माझी ओळख ही ठाण्याच्या स्मशानभूमीतली! तो तिथे महापालिकेच्या नोकरीत. आबाजी वयानेही माझ्यापेक्षा बराच मोठा. पण आमची दोस्ती कशी काय झाली हे माहीत नाही! ;)
वयाने असेल सुमारे साठीच्या आसपास!
ठाण्याच्या स्मशानभूमीत विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार करण्याची सोय आहे. त्या विद्युतदाहिनीचा ताबा हा आमच्या आबाजीकडे असायचा. काम एकच! आलेल्या मयताला पट्ट्यावरून आत सारणे, विद्युतदाहिनी सुरू करणे आणि दोन तासांनी संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात मयताच्या अस्थी देणे!
आज आबाजी निवृत्त आहे. आबाजीने आणि रखमाने संसार बाकी उत्तमच केला हो! दोन मुलं, दोन मुली, सुना, जावई, नातवंडं असा आबाजीचा परिवार आहे. आबाजीची बायको रखमा ही ठाण्याच्या भाजीमंडईत भाजी विकते.
पूर्वी विद्युतदाहिनी नसतांना लाकडं रचून त्यावर मयत ठेवून, आणि पावसळ्याचे दिवस असतील आणि लाकडं ओली असतील तर मीठ व घासलेट मारून आबाजी चिताही अगदी झकास पेटवायचा! ;)
असो, सांगायचा मुद्दा हा की आमच्या आबाजीला जरासुद्धा गणित येत नाही, की कोणतीही गणिती प्रमेये अथवा गृहितके माहीत नाहीत. कारण आबाजी जेमतेम सही करण्यापुरता दोन चार यत्ताच शिकलेला आहे! तरीही आबजीचं गणितावाचून काहीही अडलं नाही!
सुखा समाधानाने संसार करून आणि स्मशानात नोकरी करूनही प्रसन्न व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या आबाजीचा मी मात्र फ्यॅन आहे! ;) गणित आबाजीलाही आलं नाही अन् मलाही आलं नाही! ;)
आता बोला कोर्डेसाहेब!
उपक्रमावर आज ना उद्या ललितलेखनाला वाव मिळाल्यास "आबाजी बेडखळे" हे माझ्या गणगोतातलं व्यक्तिचित्र येथे रंगवायला मला अतिशय आवडेल! ;)
तात्या.
गणित आणि मी.
एकदा गणित येऊ लागले की कुठलाही विषय येऊ शकतो. म्हणून गणितावर प्रभुत्व मिळवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे हिताचे आहे.
प्रयत्न करणे गरजेचे आहे.सहमत आहे.(सार्वजनिक मत)
पण माझे खासगी मत असे की,माझ्याशी कोणी गणितावर बोलू लागला की मी कवी ग्रेस बद्दल, त्यांच्या प्रतिमांबद्दल बोलतो.मधेच आगरकरांच्या "सुधारक"बद्दल.आणि समारोप म.गांधी च्या मराठी साहित्यावरच्या जो प्रभाव आहे,त्याबद्दल बोलतो, त्यामुळे गणितावर माझ्याशी कोणी बोलत नाही. पण मला २० पर्यंतचे पाढे चुकत माकत येतात. म्हणू का !
गणित, गाणं वगैरे..!!
बिरुटेसाहेब,
पण मला २० पर्यंतचे पाढे चुकत माकत येतात. म्हणू का !
नका म्हणू! चुकाल अशी भिती वाटते! ;)
जर आपल्याला १०० पर्यंतचे पाढे चुकतमाकत न येता सफाईने म्हणता आले असते तर आपण आपली प्राध्यापकी अधिक चांगल्या प्रकारे करू शकला असता. आपण आपल्या नावामागे 'डॉक्टर' ही उपाधी लावता, पण आपल्याला तर जेमतेम २० पर्यंतचेच पाढे ते सुद्धा चुकतमाकत येतात तर आपण डॉक्टर किंवा पीएचडी झालातच कसे??
जयंत नारळीकरसाहेब हे प्रसिद्ध गणिती आहेत, आणि भीमण्णा हे प्रसिद्ध गवई आहेत. जयंत नारळीकरांना गणित उत्तम येत असल्यामुळे त्यांना भीमण्णांसारखा "इंद्रायणी काठी" किंवा "माझे माहेर पंढरी" असा एखादा अभंग किंवा एखादा पुरिया अगदी सहज जमवता आला असता. कारण? कारण काय विचारता महाराजा? कारण नारळीकरांना गणित येतं!! ;)
परंतु नारळीकरसाहेबांचं गाणं ऐकायचा आम्हाला अद्याप योग आला नाही, हा भाग वेगळा!! ;)
शालेय शिक्षण अर्धवट सोडून अण्णा लहानपणीच गुरूच्या शोधार्थ घरातून पळाले. त्यांच्या चरित्राचा, गायकीचा आमचा बराच अभ्यास आहे, परंतु गणितावरही अण्णांची जबरदस्त हुकुमत असावी असा आता आमचा समज झाला आहे! नाहीतर भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करून त्यांना मान दिलाच नसता!!
असो!
तात्या.
वैदिक गणित !
शरदराव,
मुळ विषयासंदर्भात जरा लिहीतो . (मी उपक्रमावर नवीनच आलो आहे, त्यामुळे हे वाचन आताच होतं आहे)
मी लहानपणी वैदिक गणित नावाचा प्रकार वाचला होता. ४ पुस्तकांची एक लहान मालिका मला पुण्यातील एका प्रदर्शनात मिळाली होती. ही पुस्तके ६ ते १० वी च्या मुलांना पुढील सर्व परीक्षांसाठी आणि त्यानंतरच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत आवश्यक आहेत.
गणित विषयातील गोडी वाढवण्यासाठी ही पुस्तके उपयोगी आहेत. मी ती सर्व पुस्तके वाचली आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे आताच्या नवीन् अभ्यासक्रमामधे वैदिक गणिताचा संदर्भ घेतला गेला आहे.
प्रसाद
नशिबाचा भाग.
माझ्या दुर्दैवाने मला चांगले शिक्षक मिळाले नाही. दहावीपर्यंत वर्गात गणितात पहिला येणारा परंतु नंतर मात्र शिक्षकाच्या भितीमुळे मला गणिताची तीव्र नावड निर्माण झाली. कसा पास झालो याचा विचार केला तर थंडीतही घाम येतो.
चांगले शिक्षक असेल कोणताही विषय हा अवघड नाही.
स्वानुभवी....