"माफी मागा" ~~ कल्लोळ किती उपयोगाचा ?

"थेऊर" विषयावर प्रतिसाद देताना माननीय सदस्य श्री.ऑरॉगार्न यांनी अशा बातम्या देताना पत्रकार वापरत असलेल्या भाषेबाबत एक चांगले भाष्य केले आहे. त्यातील खालील एक ओळ :

>>> मात्र दुसर्‍या दिवशी सकाळ, लोकमतमध्ये अर्धा पान बातमी आणि बटबटीत हेडलाइन याला पीत पत्रकारीता म्हणण्यावाचून पर्याय नाही. <<<

याच्याशी सहमती व्यक्त करताना आणखीन एक निरिक्षण लक्षात आले, त्यासाठी हा स्वतंत्र धागा.

अशा पद्धतीचा विपर्यास करण्यात केवळ "प्रिंट मिडिया"च नव्हे तर इलेक्ट्रॉनिक मिडियाही तितकाच पुढे आहे. इंग्रजी, हिंदी थोडावेळ राहु दे, पण आपल्या "मराठी" वर सध्या बेताल पत्रकारितेचा लाभ घेणार्‍यात "श्री.निखील वागळे" यांना पर्याय दिसून येत नाही. एकेकाळी श्री.अमिताभ बच्चन हेच हिंदी चित्रपटसृष्टीतील क्रमांक १ ते १० चे अभिनेते असून त्यानंतर दुसर्‍या कुणाचा तरी ११ वा नंबर असायचा. त्याच चालीवर निखिलपंत सध्या वावरताना दिसतात.

कोणत्याही शासन निर्णयात वा त्याच्या अंमलबजावणीत काही कमतरता दिसलीच की तात्काळ संबंधित मंत्री महोदयांना आयबीएम लोकमतच्या स्टुडिओत बोलवायचे आणि चर्चेच्या नावाखाली त्यांच्या अंगावर् अशा पद्धतीने धावून जायचे की जणू काय "बघा मी लोकमत चॅनेलने मंत्र्याला सळो की पळो करून सोडले" अशी नंतर शेखी मिरवायची. स्वत:च निर्माण केलेल्या या कोषात श्री.वागळे इतके धुंद होतात की मंत्र्याना बोलवायचा मूळ उद्देश हवेत विरून जातो.

परवा कामगार मंत्री श्री.हसन मुश्रीफ यांच्याशी खडाजंगी करताना तावातावाने "तुम्ही अगोदर राज्यातील सर्व महिला डॉक्टरांची बिनशर्त माफी मागा" हेच पालुपद लावले होते. पब्लिक ट्रस्ट कायद्याच्या कलम 41 अ, अ अन्वये नोंदणी झालेल्या दवाखान्यांनी दहा टक्के गरीब रुग्णांवर मोफत उपचार करणे बंधनकारक आहे. हे दवाखाने मोठ्या लोकांचे आहेत. त्यात गरिबांवर अजिबात उपचार केले जात नाही, असे लक्षात आल्यानंतर विधीमंडळात याबाबत कायदा करून, जबर दंडाची तरतूद करण्यात आली. या विरोधात हे दवाखाने न्यायालयात गेले. न्यायालयानेही गरिबांसाठी दहा टक्के बेड राखीव ठेवावे व त्याचा खर्च दवाखान्याच्या एकूण बिलाच्या दोन टक्के करावेत, असे आदेश दिले. सदर कायद्याची अंमलबजावणी करणे, रेकॉर्ड तपासणे, कारवाई करण्याचे आधिकार धर्मादाय आयुक्तांना आहेत. मुंबईत अंदाजे असे 100 दवाखाने आहेत, ते दूरवर विखुरलेले आहेत; मात्र देखरेखीच्या कामासाठी केवळ दोन महिला आधिकारी आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे.

रात्री, बेरात्री गंभीर रुग्ण येत असतात. अशा रुग्णांना दवाखान्यात दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे रुग्ण दगावण्याचीही शक्‍यता असते. इतक्‍या रात्री दोन महिला अधिकाऱ्यांना संपर्क कसे साधणार? या महिला आधिकारी इतक्‍या दूरवरून कशा येणार? असे प्रसंग अनेकवेळा घडले आहेत. म्हणूनच आपण 14 जुलैला धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठवून महिला आधिकारी तत्परतेने काम करतात; पण त्यांना मर्यादा आहेत, असे कळवले होते; पण मर्यादा या शब्दाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. रात्री-अपरात्री त्यांना दूरवरून येण्याबाबत मर्यादा आहेत, असा त्याचा अर्थ होता. त्यात त्या महिला अधिकाऱ्यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता.

"मर्यादा" या शब्दाचा अर्थ मंत्र्याचा दृष्टीने इतकाच होता की, रात्रीबेरात्री सर्वच ठिकाणी त्या एकट्याने जाऊ शकणार नाहीत म्हणून त्यांच्यासोबत एकादा पुरुष सहकारी देता येईल का यावर खाते विचार करेल. बस्स्... "पुरुष सहकारी" यावर श्री.वागळे यांनी जो भडीमार चालू केला त्यावर आता तो थांबवायचा कसा हे सुचेनासे झाले म्हणून श्री.मुश्रीफ यांनी "भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असेही म्हटले." पण नाही, "सावित्रीबाई फुले यांच्या परंपरेत काम करीत असलेल्या महिला अधिकार्‍यांचा तुम्ही अपमान केला आहात, तर बिनशर्त माफी मागा."

कुठला प्रकार हा मुलाखतीचा? त्यातूनही समजा त्या मंत्रा महोदयांनी माफी मागितलीच तरीही समाजातील ज्या घटकाच्या स्वास्थ्याच्या प्रश्नावर तो संवाद चालू होता त्यांच्या स्थितीत कोणता लक्षणीय फरक पडणार आहे?

अती होत आहे ~ प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियातील शोधपत्रिका.

Comments

वागळे

वागळे खूप कॉफी पितात का न पिताच असे आहेत कल्पना नाही. त्यांचे हायपर वागणे मात्र डोक्यात जाते. ग्रेट भेटमध्ये पाहुणे चांगले असतात पण वागळे सळो की पळो करून सोडतात. परवा निळूभाऊंची मस्त मुलाखत चालू होती (पक्षी : निळूभाऊ मस्त बोलत होते.) वागळे इतके हायपर झाले की अर्धा सोफा सोडून पुढे झुकत होते. असे वाटले की काही वेळाने टुणकन उडी मारून निळूभाऊंच्या मांडीवर जाऊन बसतात की काय. :)

मुलाखत घेताना निळूभाऊंना विचारले, "तुमच्यात इतका साधेपणा कसा काय?" त्यांनी उत्तर दिले. काही वेळाने परत तेच. "पण मला सांगा निळूभाऊ, चित्रपटसृष्टीत राहूनही तुम्ही इतके साधे कसे काय?" निळूभाऊ म्हणाजे, "मी आपल्याला सांगितले, सेवादलाचा प्रभाव वगैरे वगैरे." निळूभाऊ खरोखरच साधे म्हणून त्यांनी संयम बाळगला. त्यांच्या जागी नाना पाटेकरसारखा असता म्हणजे वागळेंना बरोबर उत्तर दिले असते.

मुलाखत घेणे या कलेमध्ये स्वत: कमीत कमी बोलून, मुलाखत देणार्‍याला (त्याची वाक्ये स्वतः पूर्ण न करता) बोलते करणे अपेक्षित असते. वागळे स्वतःला टिव्हीवर बघत नसतील का असा प्रश्न कधीकधी पडतो.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

वागणे सगळ्यांत ग्रेट

त्यांचे हायपर वागणे मात्र डोक्यात जाते. ग्रेट भेटमध्ये पाहुणे चांगले असतात पण वागळे सळो की पळो करून सोडतात.
अहो वागणे सगळ्यांत ग्रेट. तेच मेन. ग्रेट भेट म्हणजे वागळ्यांशीच भेट. पाहुणे दुय्यमच्या त्यांच्यापुढे. बाकी ममता बॅनर्जी, सुषमा स्वराज, रविशंकर प्रसाद, राजदीप सरदेसाई, मिसेस राजदीप सरदेसाई आणि निखिल वागळे ह्यांत कुठला समान धागा आहे बरे?

परवा निळूभाऊंची मस्त मुलाखत चालू होती (पक्षी : निळूभाऊ मस्त बोलत होते.) वागळे इतके हायपर झाले की अर्धा सोफा सोडून पुढे झुकत होते. असे वाटले की काही वेळाने टुणकन उडी मारून निळूभाऊंच्या मांडीवर जाऊन बसतात की काय. :)
'अरे हो हो दमानं, दमानं. तूच मेन बाबा. तूच मेन!' असे म्हणत निळूभाऊ वागळेंना थोपटताहेत. असे चित्र डोळ्यांपुढे उभे राहिले.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हाहाहा!

वागळे इतके हायपर झाले की अर्धा सोफा सोडून पुढे झुकत होते. असे वाटले की काही वेळाने टुणकन उडी मारून निळूभाऊंच्या मांडीवर जाऊन बसतात की काय. :)

हाहाहा!

बाकी वागळ्यांना बघण्याचा संबंध आता येत नाही परंतु त्यांचे वर्तन परिचित असल्याने चर्चा वाचायला मजा येते आहे.

नाना

त्यांच्या जागी नाना पाटेकरसारखा असता म्हणजे वागळेंना बरोबर उत्तर दिले असते.

नियती म्याडमनी आमची मागणी ऐकली आणि आज चक्क नानाचीच मुलाखत होती. नानाने काही शुगरकोटेड तर काही इंट्रावेनस डोस दिले. वागळेंच्या ते लक्षात आले नसावेत किंवा त्यांच्या त्वचेची जाडी अधिक असावी. काही मासलेवाइक उदाहरणे.

"अरे निखिल, पैसा म्हणजे सगळं नसतं. आता मला कुणी विचारल, की तुझी किंमत काय तर सांगता येईल का?" :ड्

"अरे, आयुष्यात प्रत्येक गोष्ट मीच जिंकली पाहिजे असं आहे का? आता ही मुलाखत, इथे फक्त माझेच वर्चस्व असावे असा अट्टाहास मी का धरावा? इथे मी कुरघोडी केल्यामुळे कुणाच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? त्यापेक्षा सहजपणे, जशी सुचेल तशी मनमोकळी मुलाखत झाली तर मला जास्त आवडेल." (जसे आठवले तसे, चूभूद्या घ्या)

एकूणात नानाची फटकेबाजी पाहून आणंद मणात माइणा. मुलाखतीचा पुढचा भाग पुढच्या रविवारी आहे, सोडू नका. :ड्

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

निखिल वागळे

काही दिवसांपूर्वी कॉमनवेल्थ घोटाळ्याबाबत वागळे निरनिराळ्या लोकांना प्रश्न विचारीत होते. त्यांत कलमाडी यांचे एक निकटवर्तीय विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांचे बोलणे चालू आसतानाच वागळे मधेमधे पचकत होते. त्यात त्यांनी एकूण प्रकरणात अगोदरच मत बनवून ठेवल्याचे स्पष्ट दिसत होते. मला तर हा निखिल वागळेंच्या बालीशपणाचा कळसच वाटला. यापूर्वीच्या कार्यक्रमातही वागळे यांची अशीच तर्‍हा दिसून आली होती. त्यांचा एकूण उद्देश चर्चेची सत्यशोधनाला मदत व्हावी हा नसतो. तर फ्रीस्टाइल शाब्दिक कुस्त्या जिंकण्याचा असतो.

'शान' मधला डॉयलॉग...

वागळेंचे कार्यक्रम बघितल्यावर 'शान' चित्रपटातील शाकालचा (कुलभूषण खरबंदा) एक डॉयलॉग आठवला
'यहाँ सवाल करने का हक सिर्फ शाकाल को है, बाकी सब लोग जवाब देते है'

पुन्‌न्हा पुन्‌न्हा माफी

पण नाही, "सावित्रीबाई फुले यांच्या परंपरेत काम करीत असलेल्या महिला अधिकार्‍यांचा तुम्ही अपमान केला आहात, तर बिनशर्त माफी मागा."
कुठला प्रकार हा मुलाखतीचा? त्यातूनही समजा त्या मंत्रा महोदयांनी माफी मागितलीच तरीही समाजातील ज्या घटकाच्या स्वास्थ्याच्या प्रश्नावर तो संवाद चालू होता त्यांच्या स्थितीत कोणता लक्षणीय फरक पडणार आहे?

वागळे बरे पुन्‌न्हा पुन्‌न्हा माफीची मागणी करत होते ;) सध्याच्या काळात माध्यमांनी द्रुतगती न्यायालयांची भूमिका घेतली आहे.

वागळे की दुनिया

वागळे हा अत्यंत आत्मकेंद्रित माणूस वाटतो. शोधपत्रकारितेच्या नावावर सवंग पत्रकारिता करायची आणि त्यातही सतत स्वतःला प्रकाशात ठेवायचे हे त्यांचे धोरण आहे. 'पण मला तुम्हाला असं विचारायचंय... ' हे त्यांचे आगाऊ पालुपद तिडीक आणणारे असते. शिवसेना करते ते कधीकधी बरोबर आहे की काय अशी कधीकधी भीषण शंका येते.
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

वागळेंची हिंदी आवृत्ती ~ प्रभु चावला

श्री.आरागॉर्न यांनी उल्लेखिलेली "निळूभाऊं" ची मुलाखत मी पाहिली होती. मुळात भाऊ हे "अंडरटोन" मध्ये बोलण्यासाठी प्रसिद्ध होते शिवाय उत्तरांमधील सविस्तरपणा मुलाखत पाहणार्‍यांवर योग्य तो परिणाम करीत होता, पण नाही....वागळेंची बॉडीलाईन बोलिंग चालूच... "मग मी तुम्हाला असे विचारतो की...." मग परत ते काटेरी चावे. श्री.आरागॉर्न म्हणतात तेच खरे, तिथे "निळू ऐवजी नाना" च हवा उत्तर द्यायला.

श्री.निखिल वागळे यांची हिंदीतील आवृत्ती म्हणजे आजतकचे "प्रभू चावला". यांना तर मुलाखत देणार्‍या व्यक्तीची वाक्य तोडण्याची इतकी वाईट सवय की एकदा उमा भारती आणि नंतर जया भादुरी यांनी प्रभूना तोंडावरच सुनावले, "हे पहा, माझ्याकडून अशी अर्धवट उत्तरे काढून घेणार असाल तर मला दहा ऐवजी पाचच प्रश्न विचारा, ज्याची ठरलेल्या वेळेत मी नीट उत्तरे देऊ शकेन." मग नेहमीप्रमाणे आपले "आय नो ऑल" धर्तीचे बनेल हास्य करून चावलांची कोलांटी उडी. (आपल्याकडे नाना पाटेकरने नक्की अशीच उमा आणि जया सारखी भूमिका घेतली असती.)

एकदा प्रभु चावला यांनी "प्राण" यांना आमंत्रित केले होते. किती अनुभव जमा असेल या अभिनेत्याकडे. चित्रपटसृष्टीतील चढउतार, वैभवाचा काळ, शेकडो अभिनेते अभिनेत्री, निर्माते, दिग्दर्शक, निर्मिती क्षेत्रातील पायापासून शिखरापर्यंत कामे करणार्‍या हजारो लोकांचा, त्यांच्या कार्याचा चालताबोलता इतिहास म्हणजे "प्राण". तर अशा सर्वार्थाने ज्येष्ठ अशा कलाकाराची मुलाखत घेत असताना काय पथ्य पाळावे, आदराने कसे बोलावे, त्यांच्याकडून सुखदु:खाच्या गोष्टी कशा जाणाव्यात आदी बाबींना अगदी फाट्यावर मारून चावला निव्वळ,
"मग ५०-६० वर्षाच्या या काळात तुमचा वाद कुणाबरोबर झाला ते आमच्या प्रेक्षकांना सांगा."
यावर प्राण मंद हसून म्हणाले, "नाही, माझ्या सिनेकारकिर्दीत एकाही व्यक्तीबरोबर माझा कोणताही वाद, भांडण झालेले नाही. सर्वांनी मला द्यावयाच्या काळात प्रेम दिले, मान दिला, दर्जा दिला."
चावला बावचळून् "मग तुमची हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल कोणतीच तक्रार नाही?"
"बिलकुल नाही." प्राण यांचे परत तेच स्मितहास्य.
"बरं, पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये निर्मात्यांनी कधी फसवणूक केली असेलच ना?" चावलाचा परत रेटा.
"त्याबद्दलही काही तक्रार नाही. ज्या निर्मात्यानी मानधनाचे पैसे दिले नाहीत, ते त्यांनी सर्वांचेच दिलेले नसतात. केवळ प्राणला पैसे दिले नाहीत असे होत नसते. जिथे दिलिप, देव, मीना, नूतन यांच्यासारख्या दिग्गजांचे पैसे निर्माते बुडवितात, तिथे मी कुठे? हा बिझिनेस असाच आहे हे इथे प्रवेश करणार्‍याला पूर्ण माहित असतेच, त्यामुळे तक्रार कुणीच करत नाही."
"म्हणजे थोडक्यात तुम्ही आता या क्षणाला अतिशय सुखी आहात?" चावलाचा शेवटचा बीमर.
"होय. मी सर्वार्थाने रिटायर झालोय आणि अन्य रिटायरांप्रमाणेच वाचन, चिंतन, भटकंती आदी कार्यक्रमात अतिशय छान वेळ व्यतीत करतोय्." प्राण यांचा तोच शांत अभिप्राय.

मग प्रभु चावला यांचे हताश समेशन, "तर हे होते प्राण ! एकेकाळी ज्यांचे नाव घेतले तर लोकांना संताप यायचा... पण..." इ. इ.

कोणत्या लोकाना एकेकाळी संताप येत होता, ते प्रभुची मायाच जाणे. थोडक्यात चावला काय, वागळे काय किंवा प्रितिश नंदी काय... या जमातीला गंगा शांत नितळ वाहते हे पाहण्याची अजिबात इच्छा होत नाही.

वट-वट वागळे

बापरे! इतकी मंडळी वागळे दुचिवावर दिसत असताना ती वाहिनी बदलत नाहीत? कमाल आहे. मी आयबीएन लोकमत वर वागळेंचा आवाज जरी आला तरी लगेच ती वाहिनी बदलून टाकतो.

पाहुणा महत्वाचा

>>> ती वाहिनी बदलत नाहीत? <<<

हा मुद्दा बरोबर आहे, पण काहीवेळा जी व्यक्ती "पाहुणा" म्हणून आलेली असते तिच्याबद्दल आपणास आदर, प्रेम असतोच असतो, म्हणून तो/ती कशाप्रकारे आपल्याशी संवाद साधते याचीही उत्सुकता असतेच. उदा. सचिन तेंडुलकर. मी खूप आनंदित झालो होतो, आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला तिथे पाहताना; ऐकताना. त्यामुळे अशाप्रसंगी वागळे सहन करावे लागतातच. इतकेच.

सहमत

सहमत आहे. अशा वेळी आधुनिक तंत्रज्ञानाने फक्त वागळेंचा आवाज म्यूट करता आला तर किती बरे असे वाटते. :)

असेच म्हणतो

शिवाय तंत्रज्ञानाने त्याचा चेहराही झाकता आला तर बरे होईल.
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

काही समांतर चर्चा

प्रसारमाध्यम स्वरुप, कारणे आणि उपाय
ही चर्चा आठवली. आपल्याला संजय आवटे व आनंद आगाशे यांचे भाषण ऐकता येईल

प्रकाश घाटपांडे

मराठीतला राजदीप सरदेसाई + करण थापर

वटवटवागळे यांच्या मी-मी-मी पणामुळे त्यांना गमतीने काही लोक निखिलऐवजी मीखिल असे म्हणतात हे आठवले. त्यांना मराठीतला राजदीप सरदेसाई आणि करण थापर यांचे मिश्रण व्हायचे आहे हे त्यांच्या वागण्यावरुन समजते. त्यांना शिवसेना वेळोवेळी सटकावते हे मला फार आवडते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अगदी बरोबर

हे असले निवेदक किवा मुलाखतकार बघितले कि पुलं म्हणतात तसं - उगाचच ज्याचा कान गरम करावा वाटतो असा माणूस (भाषेत बदल केला आहे, संपादन होईल ह्या भीतीने, मी वागळे नाही म्हणून).
आणि एका अर्थाने वागळे हे फोटोमधील contrast shade वाला भाग आहेत, त्यांच्या सारख्या लोकांमुळे सुधीर गाडगीळ ह्यांच्याबद्दलचा आदर आजून दुणावतो ( काही लोकांचं दुमत असू शकते), पण सुधीर हे समोरच्याला नेमके आणि आदर/काळ/वेळ/व्यक्ती बघून प्रश्न विचारतात, आणि मग ती व्यक्ती सुद्धा मन मोकळं करते. माधुरीची अशीच एक मुलाखत आठवली, सगळच कसा सुंदर होतं. :)

राजू परुळेकर

राजू परुळेकर यांच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. अतिशय संयत, सुंदर आणि अभ्यासपूर्ण गप्प मारतात ते पाहुण्यांशी.

||वाछितो विजयी होईबा||

 
^ वर