चिरीमिरी - अरुण कोलटकरांच्या कविता - रसग्रहण भाग २

डिस्क्लेमर
या कवितांमध्ये कवीने काही भडक लैंगिक शब्द, रूपकं वापरली आहेत. त्यांबद्दल चर्चा करताना ते व तसे इतर शब्द टाळणं अशक्य आहे . अशा शब्दांची ज्यांना अॅलर्जी आहे त्यांनी हे परीक्षण वाचू नये. विठ्ठलाबद्दल, रखुमाईबद्दल काही ओळी आलेल्या आहेत. ही नावं रूपकं म्हणून आलेली आहेत एवढं समजून घेण्याची परिपक्वता नाही, किंवा अशा विधानांनी दुखावण्याइतक्या ज्यांच्या भावना कोमल आहेत अशांनीही हे परीक्षण वाचू नये. आधी एकदा 'डिस्क्लेमर कशाला?' असाही प्रश्न आला होता, पण सध्या काही संस्थळांवर त्याची गरज आहे असं मला वाटतं. ज्यांना डिस्क्लेमरची गरज वाटत नसेल त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे

चिरीमिरी - पंढरीच्या वारीच्या कविता

चिरीमिरीमध्ये पहिल्या वीसेक कविता पंढरीच्या वारीच्या आहेत. इथे बळवंतबुवाचं कॅरेक्टर आपल्या समोर येतं. त्याच्या भडवेगिरीबद्दल कवी सांगतो. त्याच्या रांडांशी ओळख होते. पंढरीला जायचं की नाही, जायचं तर कसं जायचं याविषयी कविता दिसता. पंढरीचा विठूराया दिसतो, रखुमाई भेटते. वारीच्या वाटेवर घडणाऱ्या घटना दिसतात. रांडांकडे पाय उंचावून बघणारा विठोबा येतो.पंढरीला पोचल्यावर विठोबाबरोबर फोटो, फुगडी, आणि मौत का कुआ ची वर्णनं येतं. पंढरीला पोचल्यावर, विठोबा भेटतो व नंतर तो नाहीसा झालेला दिसतो. या सर्व स्वतंत्र कविता असल्या तरी एकमेकांत गुंफल्या गेलेल्या आहेत. सुरूवातीच्या काही कवितांमध्ये कवी या रूपकांची मांडणी करतो.

सुरूवात होते ती बळवंतबुवाच्या ओळखीतून. बुवांची मूर्ती ठेंगणीठुसकी - पायाखाली विठ्ठलाची वीट सरकवली तरी पाच फूट होईल इतकीच. रंग काळाकुट्ट - विठ्ठलाच्या मूर्ती सारखा. महाराष्ट्राच्या देशाच्या मातीसारखा. डोक्याला टिळा, कानात भिकबाळी, वर टोपी. हे चेहेऱ्यामोहोऱ्याचं वर्णन झाल्यावर कोलटकर

हजारांची खोटी नोट
वसे आतल्या खिशात

गळ्यात तुळसीमाळ
पायी बांधले घड्याळ

चपला त्या कोण चोरी
एक काळी एक गोरी

पायावर डोके ठेवू
किती वाजले ते पाहू

असं बुवांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करतात. बुवांमध्ये खोट्या नोटा बाळगण्याचा इरसालपणा आहे. गळ्यात देवाची भक्ती असली तरी पायात पापपुण्याच्या काळ्यागोऱ्या चपला आहेत - त्या दोन्ही घालून डावा उजवा असा अविरत प्रवास चालू आहे. पायाला घड्याळाचे काटे बांधलेले आहेत. जीवनाला एक काळाचं बंधन आहे. घड्याळाची टिकटिक ही आत्म्याची धडधड, बुवांच्या पावलांमध्ये आहे. पंढरीकडे जाण्याच्या प्रवासातली ही पावलं. या पावलांवर डोकं ठेवून घड्याळात किती वाजले ते आपण बघू असं कवी म्हणतो. 'चला, या बळवंतबुवाच्या जीवनात डोकवून पाहू' असं वाचकाला तो खुणावून सांगतो असं वाटतं. 'व्हॉट मेक्स हिम टिक्?' हे पाहाण्यासाठी.

यातल्या पुढच्या तीन कवितांत बळवंतबुवाच्या प्रवासाची सुरूवात आहे. बुवा व त्याच्या रांडा यांची तोंडओळख. विठोबा, वारी, आणि रांडा या रूपकांची प्रथम मांडणी इथे होते. या तिन्ही कविता स्वतंत्र असल्या तरी एकमेकांच्यात गुंतल्या आहेत. म्हणून त्यांचा एकत्र विचार करणं सोयीचं आहे. किंबहुना एकत्र वाचल्याशिवाय पूर्ण अर्थ लागत नाही. अगदी संक्षेपात या तीन कवितांचा अर्थ बघितला तर - 'निरोप' मध्ये कवी 'जा त्या विठोबाला सांगा म्हणाव, हा बळवंतबुवा आपल्या एकशेसात रांडांसह निघाला आहे म्हणून' असं सांगतो. 'नगेली' मध्ये एक जण जी जात नाही तिचं वर्णन आहे. 'ठेसन' मध्ये बुवाचा प्रवास सुरू झालेला आहे.

या कविता वाचून उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त निर्माण होतात. रांडा घेऊन एखाद्या भडव्याने विठ्ठलाकडे का जावं? या रांडा एकशेसात का? आणि ही अनोखी वारी नक्की काय आहे? भडवा याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे देवापर्यंत प्रार्थना पोचवणारा, विधी पूर्ण करून देणारा गंगेच्या घाटावरचा भट - भटुआ - भडवा. दुसऱा अर्थातच वेश्यांचा दलाल. दोन्हींना त्यांच्या दलालीपोटीच समान शब्द मिळाला आहे. एक शरीरसौख्याची दलाली करतो, तर दुसरा आत्मिक सौख्याची. दोघेही आपापल्या कडे असलेल्या या सौख्यदायी मालमत्तेचं रक्षण करतात, त्यांच्यावर इतरांनी अधिकार गाजवू नये म्हणून भांडतात. कोलटकरांनी मोठ्या चतुराईने या दोन अर्थांची सरमिसळ केली आहे. देव आणि रांडा एकत्र केलेल्या आहेत.

या रांडा एकशेसात का? याचं उत्तर शोधताना 'नगेली' आणि 'ठेसन' या दोन्ही कविता एकत्र बघाव्या लागतात. 'नगेली' मध्ये एक रांड आपल्या पंढरीच्या वारीची इच्छा सांगते. रोज धंदा करून माझा जीव उबगला आहे, म्हणून म्हटलं एकदा पंढरीला जाऊन यावं, तर

वाटत होतं जाउसं जाउसं
ठेसन पाहून फिटली हाउस

केवढं बांधून ठेवलं ठेसन
बघूनच खाली बसावं मटकन

पंढरीराया तू हवा आहेस मला, पण हे मला झेपणार नाही. माझं तिकीट फुकट गेलं तरी चालेल. पण हा प्रवास नको.

जमल्यास तूच ये ना केव्हातरी
तुझी वाट पाहीन मी माझ्या घरी

ही घरी बसली पण बुवा मात्र इतर बायांना घेऊन गेला. ठेसन कवितेत त्याचं वर्णन येतं.

एकशेसात बायका
स्टेशनात फुलला ताटवा
बळवंतबुवा आठवा
फूलवाला

आपली सुंदर फुलं घेऊन बुवा विठ्ठलाकडे चालला. त्याच्या पायी अर्पायला.

बळवंतबुवा म्हणतो
जरा गाडी थांबवा
मोरपीस आणि पावा
घरी ऱ्हायला

बुवाबरोबर गेलेल्या एकशेसात. मागे राहिलेली एक, म्हणजे एकशेआठ झाल्या. 'मोरपीस आणि पावा' चा उल्लेख समजून घेतला तर बुवा स्वतःला कृष्ण मानतो असं समजता येईल. निदान कवीने तरी कृष्णाची आठवण करून दिली आहे. कृष्णाला एकशेआठ बायका होत्या हे लक्षात घेतलं की सगळा हिशोब बरोबर लागतो.

बळवंतबुवाची कृष्ण आणि भडवा या दोन रूपांची सांगड कशी घालावी? मला असं वाटतं की इथे कृष्णाचं रूपक त्याच्या संपूर्ण शक्तीनिशी, संदर्भांसकट येत नाही. म्हणूनच कवितेत व एकंदरीतच पुस्तकात त्याचा आडून उल्लेख आहे. कृष्णाला जशा एकशेआठ बायका होत्या तशा एकशेआठ (वजा एक, न आलेली) बायका घेऊन बळवंतबुवा विठ्ठलाकडे चालला आहे. या रांडांची नुसता तो भडवेगिरी करत नाही, तर त्या काहीशा त्याच्या आहेत हे सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. त्याच मर्यादेने कृष्णाचं प्रतीक येतं.

जर या रांडा बुवाच्या स्वतःच्या बायकांप्रमाणे असतील तर तो त्यांना धंद्याला का लावतो? त्यांची दलाली का करतो? यासाठी रांडा व विठ्ठलाच्या भेटीचं, पंढरीच्या वारीचं रूपक समजून घ्यायला हवं. पंढरीची वारी म्हणजे आयुष्य. जीवनाला एखाद्या प्रवासाचं रूपक अनेक ठिकाणी वापरलेलं आहे. हा प्रवास काळाचा तर असतोच. लहानपणापासून मोठं होण्याच्या वेगवेगळ्या अवस्थांमधून जावं लागतं. पण त्याहीपलिकडे हा 'काहीतरी कडे' प्रवास असतो. कोणी त्याला मोक्षप्राप्ती म्हणतात. कोणी निर्वाण म्हणतात. कोणी देवाशी एकरूप होणं म्हणतात. कोणी आत्म्याचं परमात्म्याशी मीलन म्हणतात. जीवनाचं प्रत्येकाच्या मनात काहीतरी ध्येय असतं. ते दरवेळीच असं आध्यात्मिकच असलं पाहिजे असं नाही. 'माझ्या मुलांचा संसार सुरळीत झालेला पाहिला आणि नातवंडं मांडीवर खेळवली की मी सुखाने मरायला तयार आहे' हेही एक प्रकारचं ध्येयच आहे. ज्यासाठी बाजीप्रभूने 'सरणार कधी रण ...कुठवर साहू घाव उरी' म्हटलं ते तोफेचे पाच बार हेसुद्धा ध्येयच आहे. त्या ध्येयाकडे चाललेला आपला प्रयत्नपूर्वक प्रवास म्हणजे ही वारी. आणि जे गाठल्याने हे ध्येय पूर्ण होणार आहे तो म्हणजे विठ्ठल. जीवनाच्या वारीची सार्थकता.

हा प्रवास करताना सगळे जण झगडा देतात. कधी रस्त्यावरून पाऊल चुकतं, कधी भजनाच्या धुंदीत कसा वेळ जातो हे कळत नाही. पण दररोज हा प्रवास पावलापावलाने चालू असतो. उन्हातान्हातून, पावसावाऱ्यातून. हे ध्येय गाठण्यासाठी आपल्या वारकऱ्याकडे पाय असतात. बाजीप्रभूकडे त्याची तलवार, दांडपट्टा आणि निधडी छाती असते. कलाकाराकडे त्याची लेखणी, कुंचला, छिन्नी हातोडे असतात. कवीने निर्माण केलेल्या कविता, त्याची प्रतिभा, त्याच्या मनश्चक्षुंपुढची चित्रं, ही सगळी साधनं आहेत. यांच्या सहाय्याने कलाकार निर्माण करतो त्या कलाकृती या देखील शेवटी सरस्वतीच्या चरणी अर्पण करण्याची फुलं आहेत. ही फुलंच बळवंतबुवाकडे आहेत. हाच त्याचा ताटवा. म्हणूनच कवी त्याला फूलवाला म्हणतो. याच त्याच्या रांडा. म्हणूनच तो दलाली करत असला तरी त्याच्या या एकशेआठ बाया लग्नाच्या बायका असल्याप्रमाणे स्व चा भाग आहेत. एकशेआठ या प्रत्यक्ष आकड्याला यापलिकडे तितकंसं महत्त्व नाही. आपला मोक्ष प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या वारीत आपण सतराशे साठ वेगवेगळ्या गोष्टी करतो. किंवा आपल्या अंगी काही गुण असतात, आपण काही पुण्यं साठवतो. या साऱ्यांचं संचित या अर्थाने त्या रांडा येतात. आपल्या देवाला त्या अर्पण करतो आणि म्हणतो, बघ मी हे हे केलं आहे. आता तरी मला मोक्ष मिळू दे.

बुवाची दलाली दोन्ही अर्थाने आहे. आपल्या 'बायका' तो विठ्ठलाकडे नेऊन त्याला प्रसन्न करणार आहे. तर विठ्ठलाची दलाली देखील तो करणार आहे. ही दुहेरी भडवेगिरी कशासाठी? या प्रश्नाला उत्तर नाही. ती असते, वारकऱ्याच्या कपाळाला लावलेल्या टिळ्याप्रमाणे नशीबातून सुटत नाही हेच सांगण्याचा 'चिरीमिरी' चा प्रयत्न आहे (किमान पंढरीच्या वारीच्या कवितांत तरी). मी कोण आहे, माझं ध्येय काय, उद्देश काय हा प्रश्न कवीला पडलेला नाही. कुठून कसं येतं कोण जाणे, पण प्रत्येकाचं काही ना काही उद्दिष्ट असतं, प्रत्येक जण काहीतरी मिळवण्याच्या मागे असतो हे 'चिरीमिरी' त गृहित धरलेलं आहे. प्रत्येकाला एक विठ्ठल असतो. आणि तो नसला तरी समाज धर्मव्यवस्थेच्या द्वारे तो बनवतो. मग ही दुहेरी भडवेगिरी प्रत्येकाच्या खांद्यावर ओझ्यासारखी चिकटते. माझा 'मोक्ष' मिळवण्यासाठी मी ही कर्म केली आहेत, त्यांचं संचित बघता मला मोक्ष मिळावा ही अपेक्षा आहे. या अपेक्षेतच एक सौदा आहे. आणि मोक्षदात्याकडे हा सौदा करणं, त्यासाठी रांडा जमवून आणणं यात ही दलाली सुटत नाही. पण ही दलाली दुधारी आहे. दुहेरी आहे. या मोक्षाचं प्रलोभन स्वतःलाच विकून स्वतःकडून या रांडा गोळा करवण्याचं कामही त्यात येतंच. इथे गंगेवरच्या भडव्यांची भूमिका येते. शेवटी दलाली म्हणजे काय? तर एकाकडे घर आहे, पैसे हवेत अशा माणसाची दुसऱ्याकडे घर हवंय, पैसे आहेत अशाशी गाठ घालून देणे. नक्की तो कोणासाठी काम करतो हा प्रश्न तसा गौण होतो. स्वला मोक्ष हवाय, मोक्षदात्याला स्व कडून पुण्याई हवी आहे - या दोघांची एकमेकांशी गाठ घालून देणारा (निदान तसा प्रयत्न करणारा) मनाचा (किंवा थोड्या व्यापक अर्थाने समाजाचाही) भाग म्हणजे दलाल, भडवा, बळवंतबुवा.

ही वारी म्हणजे काय, आयुष्य म्हणजे काय याविषयीची गहन चर्चा करण्यासाठी या बुवाला आणि त्याच्या रांडांना कवीने वेगवेगळ्या प्रसंगात घातलं आहे, त्यांच्या मनचे विचार टिपले आहेत. कोलटकरांसारखा प्रतिभावान कवी आणि 'आयुष्यावर बोलू काही...' असं उथळपणे म्हणणारे कवी यांमध्ये हाच फरक आहे. कोलटकर देखील आयुष्यावर बोलतात. पण आयुष्य हा शब्द एकदाही वापरत नाहीत. आत्मा परमात्मा मीलनाविषयी बोलतात, पण लिहिलेलं असतं फुगडी, भिंगरी विषयी. या रूपकांच्या वापरामुळे कवितेची व्याप्ती व खोली वाढते. पंढरीच्या वारीच्या कवितांत तरी ही रूपकांची वीण पक्की आहे. पुढच्या कवितांत ती ढिली पडल्यासारखी (सकृद्दर्शनी) वाटते. पण त्याविषयी आपण पुढे विचार करू.

ही दुहेरी भडवेगिरी कशासाठी? का? या प्रश्नाला उत्तर नाही, असं आधी म्हटलं. कदाचित कवी इथे त्याच्या अत्यंत खवचट स्वरात, हा सगळा मूर्खपणा आहे, हे सगळं निरर्थक आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत असेल. बळवंतबुवा नक्की येतो कुठून? फ्रॉइडने मांडलेल्या सुपरइगो ची संकल्पना बळवंतबुवाच्या संकल्पनेबरोबर थोडीफार मिळते जुळते. सुपरइगो कडे असे करावे, असे करू नये अशा विध्यर्थी वाक्यांचा संग्रह असतो. विध्यर्थी वाक्यं ही ध्येयं ठरवणारी असतात. काय करावं किंवा काय करू नये, कुठच्या मार्गाने जावं, कशासाठी जगावं - ही विध्यर्थी वाक्य झाली. बहुतेक वेळा ही वाक्यं सुपरइगोला संस्कारातून मिळतात. समाजमान्य चालीरीती, नीतीमूल्यं यांचं ते भरताड असतं. सुपरइगो ती तो स्ववर - इगोवर लादण्याचा, किंवा त्याला 'विकण्याचा' प्रयत्न करतो. ही उपमा अजून थोडी ताणली तर 'नगेली' हे काही प्रमाणात इड चं स्वरूप मानता येईल. हे काहीसं अतिसोपेकरण झालं आहे, असं एकास एक नातं नाही. कोलटकरांना ते अपेक्षित होतं असं म्हणण्याचा प्रयत्न नाही. पण इतर उपमांप्रमाणेच सर्व साधारण चित्र उभं करायला याची मदत होते.

नगेली म्हणते, देवा मला तू हवा आहेस पण तुझ्याकडे प्रवास करण्यासाठी तू एवढं जगड्व्याळ ठेसन बांधून ठेवलंस. हे सगळं इतकं कठीण का आहे? जर तूच मला बनवलंस आणि आपली भेट व्हावी अशी तुझी इच्छा असेल तर हे मधलं ठेसन, त्यातल्या गाड्या, त्यांची वेळापत्रकं, सामानाची बांधाबांध, हा लांबचा प्रवास असल्या भानगडी कशाला बनवून ठेवल्यास? हा सर्व कर्मकांडाचा पसारा कशासाठी? अशा बाह्य गोष्टी करून का विठ्ठल मिळवावा लागतो? कर्मकांडांनी मिळणारा विठ्ठल खरा का? माझा विठ्ठल मला इथेच मिळाला पाहिजे (हा भाग इड सारखा हट्टी, आत्मकेंद्रित वाटतो, पण त्याचा अर्थ अधिक व्यापक आहे). पुंडलिकाला कुठे प्रवास करावा लागला? त्याच्यासाठी नाही का तू त्याच्या घरी गेलास? ही नगेली बळवंतबुवांकडच्याच एकशेआठापैकी एक. आपल्याच मनची एक विचारधारा. आपल्या मनात कुठे तरी 'हे सगळं कशासाठी? याचा काय उपयोग आहे? ही धावपळ कशाला करायची?' असं म्हणणारी एक कुणकुण असते. तिच्यामुळे, प्रवास करत असतानाही मनाचा एक भाग या प्रवासात सहभागी नसतो. तो मनाचा भाग, ती कुणकुण म्हणजे ही नगेली.

पण ती नाही आली तरी बुवा प्रवास करतातच. इतर एकशेसात जणींना घेऊन. त्यातली एखादी खरी लाडकी असते. ती लाडकी म्हणजे अंबू.

सगळ्या सिटा भरल्या
तो बघ अंबु तुझा नंबर
बुवाच्या मांडीवर
लिवलाय स्वच्छ

तिला मांडीवर घेऊन, गोंजारत बुवाचा प्रवास चालू आहे.

क्रमश:

Comments

रागावतील

कोलटकरांसारखा प्रतिभावान कवी आणि 'आयुष्यावर बोलू काही...' असं उथळपणे म्हणणारे कवी यांमध्ये हाच फरक आहे.

रागावतील बरं काही लोकं! जपत किनारा नाव सोडणे नामंजुर्!
कधी चुकीचे कधी बरोबर बोलू काही मधुन अनेकांना बरोबर घेत॑ल्याची भावना आहे त्यामुळे प्रतिभे पेक्षा प्रतिमा त्यात डोकावते.
बाकी कोलटकरांच्या कवितेत लपलेल्या फ्रॉईड ला अलगद हात घातलात ब्वॉ!
प्रकाश घाटपांडे

सुरेख

हा भाग सुरेख..
पायाला बांदलेलं घड्याळ मस्त उलगडलं आहे.. पुढील भागाची प्रतिक्षा करतोय.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सुंदर

हाही भाग आवडला. गंमत म्हणजे आज 'चिंता करितो विश्वाची' पोज मध्ये माझ्या मनात बळवंतबुवांच्या नायकिणींची संख्या 107 च का असा विचार योगायोगाने आला होता. ही 108 संबंधित संख्या असावी असा कयास मनात मी बांधला होता पण 108 वी व्यक्ती कोण याचा उलगडा आजच्या लेखाने झाला.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आवडला

हाही भाग आवडला. मजा आली.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हा भागही आवडला

मूळ कविता वाचायचे कुतूहलही होत आहे.

 
^ वर