चिरीमिरी - अरुण कोलटकरांच्या कविता - रसग्रहण भाग १

डिस्क्लेमर
या कवितांमध्ये कवीने काही भडक लैंगिक शब्द, रूपकं वापरली आहेत. त्यांबद्दल चर्चा करताना ते व तसे इतर शब्द टाळणं अशक्य आहे . अशा शब्दांची ज्यांना अॅलर्जी आहे त्यांनी हे परीक्षण वाचू नये. विठ्ठलाबद्दल, रखुमाईबद्दल काही ओळी आलेल्या आहेत. ही नावं रूपकं म्हणून आलेली आहेत एवढं समजून घेण्याची परिपक्वता नाही, किंवा अशा विधानांनी दुखावण्याइतक्या ज्यांच्या भावना कोमल आहेत अशांनीही हे परीक्षण वाचू नये. आधी एकदा 'डिस्क्लेमर कशाला?' असाही प्रश्न आला होता, पण सध्या काही संस्थळांवर त्याची गरज आहे असं मला वाटतं. ज्यांना डिस्क्लेमरची गरज वाटत नसेल त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे.

चिरीमिरी

कोलटकरांच्या कविता वाचताना, त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करताना, राहून राहून मला एका फार पूर्वी वाचलेल्या गणिताच्या पुस्तकाची आठवण येते. पुस्तक अगदी छोटेखानी होतं. लेखकाचं नावही आठवत नाही. पण त्यातला एक संदेश मेंदूवर कोरला गेला आहे. लेखकाने गणितं सोडवण्यासाठी आकडेमोड कशी करावी यापेक्षा गणिताला सामोरं कसं जावं याविषयी लिहिलं होतं. त्यासाठी 'गणित व गोंधळ' अशी संकल्पना मांडली होती. सामान्यत: गणित करावं लागतं ते काही खरे प्रश्न सोडवण्यासाठी. उदाहरणार्थ 'राजूने प्रत्येकी 6 रुपये प्रमाणे 6 लाल पेन्सिली विकत घेतल्या तर त्याला किती खर्च आला?' हा प्रश्न झाला. त्यातलं शुद्ध गणित वेगळं काढायचं झालं तर राजू, लाल, व पेन्सिली ही माहिती बाजूला काढावी लागते. हा 'गोंधळ' काढला की मगच 6 X 6 = ? हे 'गणित' शिल्लक राहातं. सामान्य विश्वाशी संबंध तोडला जाऊन तो प्रश्न गणिताच्या विश्वात जाऊन पोचतो. इथपर्यंत पोचलं की पुढची आकडेमोड ही सोपी, यांत्रिक असते. गणिताच्या आधारे प्रश्न सोडवायचे असतील तर आधी त्यातली 'अनावश्यक' माहिती किंवा गोंधळ प्रथम बाजूला काढावा लागतो. शुद्ध गणित एकदा सापडलं की ते सोडवणं तितकंसं कठीण नसतं. खरं कर्तृत्व असतं ते हा गोंधळ नक्की कुठचा व तो बाजूला कसा काढायचा हे ओळखण्यात.

आता तुम्ही म्हणाल की कवितेचा या गणित, गोंधळ वगैरेशी काय संबंध? कोलटकरांच्या कविता तरी अशी कोडी, प्रश्न या स्वरूपात समोर येतात. वाचताना एक चित्र उभं राहातं. पण त्या चित्रामागे काही कूट अर्थ दडलेला आहे असं जाणवतं. चिरीमिरीमध्ये राजूच्या ऐवजी बळवंतबुवा असतात, लाल पेन्सिलींच्या जागी रांडा असतात. आणि बळवंतबुवाची भडवेगिरी म्हणजे काय किंवा एकंदरीतच यातून कवीला काय सांगायचंय हा प्रश्न असतो. हा सोडवायचा कसा? बळवंतबुवाच्या विश्वापासून दूर जाऊन, त्या रूपकांचा पडदा उलगडून संकल्पनांच्या विश्वात कसं जायचं? यासाठी गोंधळ बाजूला करणं भाग पडतं. ही जबाबदारी कोलटकर वाचकावरच टाकतात. आणि ती पार पाडल्याशिवाय त्यांची कविता आपला पिच्छा सोडत नाही. 'हरलो, आता उत्तर सांगा' असं म्हणण्याची, किंवा शेवटच्या पानांवर ते वाचण्याची इथे सोय नाही. पण हा गोंधळ बाजूला केलाच पाहिजे, त्याशिवाय अर्थाचं गणितही सापडत नाही. गणिताचं उत्तर तर सोडाच.

गोंधळाचं नीर काढून टाकलं की शुद्ध गणिताचं क्षीर शिल्लक राहातं. तसंच कवितेच्या मांडणीचं, तीमधल्या रूपकांच्या वर्णनाचं पाणी बाजूला काढलं की अर्थाचं दूध हाती लागतं. गारगोटीच्या दगडासारख्या दिसणाऱ्या हिऱ्याला पैलू पाडले की त्याचं खरं सौंदर्य बाहेर येतं. कोलटकरांच्या कविता हे करायचं आव्हान देतात. द्रोण च्या बाबतीत हे लागू होतं. चिरीमिरी च्या बाबतीतही हे लागू आहे. द्रोण मध्ये काहीशी सरळसोट रूपकं होती. गोंधळ बाजूला करणं सोपं होतं. चिरीमिरीमध्ये या गोंधळात अनेक पात्रं येतात. नाचून जातात. फिरत्या रंगमंचाप्रमाणे त्यांची पार्श्वभूमी बदलते. एकाच चेहेऱ्यावरचे मुखवटे बदलतात. आणि मुखवट्यांप्रमाणे, पार्श्वभूमीप्रमाणे, नाटकाची जातकुळीही कधी सामाजिक कधी धार्मिक तर कधी राजकीयअशी बदलते. नाटकात होणारे भावकल्लोळ, पात्रांच्या शब्दांची फेक बदलते. द्रोण मध्ये जाणवलेलं एका महानदीच्या पात्राचं स्वरूप, तिच्या उपनद्या, झरे कालवे यांसकटचं, खूपच एकमितीय वाटायला लागतं. चिरीमिरीमध्ये हेच एखाद्या प्राचीन वटवृक्षाप्रमाणे प्रतीत होतं. एकच मूळ, एकच जीव, पण अनेक फांद्या अनेक पारंब्या... आणि म्हणूनच अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून बघितल्याशिवाय अर्थ पूर्णपणे गवसला आहे म्हणायला कठीण. काही कवितांचा तर अनेक वेळा वाचूनही अर्थ गवसत नाही.

चिरीमिरीच्या कवितांमध्ये बळवंतबुवा व त्याच्या रांडा येतात. वेगवेगळ्या भूमिकांमध्ये.

तारेवरनं तिची
बोटं फिरली
लगेच बाई विसरली
देहभान

अशी वीणा वाजवणारी गजरा येते.

खरा देव कुठला सांगा खरी अंबु कुठली
खरं उत्तर दील त्याला देईन काढून चोळी

असं म्हणणारी अंबू येते. काही भूमिका उघड तर काही अतर्क्य. काही वेळा बुवा भडवेगिरी करतो, तर काही वेळा मडमेच्या झग्यात घुसतो आणि मार खातो. कधी बुवा आंघोळ करणाऱ्या बाईच्या मोरीत निर्लज्जासारखा उभा राहातो तर कधी टोमॅटोमध्ये चाराणे, आठाणे घुसवून पळवतो. या सर्वात काय साम्य आहे? काय वेगळेपण आहे? गोंधळ काय आहे? नक्की गणित कसलं मांडलंय? काहींना या कोड्यात बोलण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांची कविता नकोशी वाटते. ती कोडी सुटली नाहीत तर, डोकं दगडावर आपटल्यासारखं वाटतं. मला स्वतःला या प्रश्नांमुळेच कोलटकरांची कविता जिवंत वाटते. साद घालते.

कवितेत येणारा हा गोंधळ 'अनावश्यक' म्हणता येईल का? एकच गणित वेगवेगळ्या गोंधळाच्या आधारे मांडता येतं. एकच कंटेंट वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मांडता येतो. एखाद्या व्यक्तीचं चित्र आधुनिक फोटोग्राफीने घेतल्याप्रमाणे सप्तरंगात दाखवता येतं, किंवा सेपिया टोन्समध्ये घेतलेल्या, किंचित पिवळट झालेल्या फोटोतून दाखवता येतं, किंवा रविवर्म्यासारख्या कुशल चित्रकाराच्या कुंचल्यातून त्याचं तैलचित्र, पोर्ट्रेट होऊ शकतं. प्रत्येक माध्यमाची अदा निराळी. गोंधळाची जातकुळी वेगळी. 6 X 6 हे गणित म्हणजे राजूच्या सहा लाल पेन्सिली असू शकतात. किंवा युवराजने ब्रॉडला खेचलेल्या सहा बॉलमधल्या सहा सिक्सर असू शकतात. गणित बदलत नाही, पण नाट्य बदलतं. कवितेसाठी हे माध्यम, व त्यातून निर्माण होणारं नाट्यही महत्त्वाचं असतं. त्या दृष्टीने हा गोंधळ देखील त्यामागच्या रूपकांत दडलेल्या अर्थाइतकाच महत्त्वाचा आहे. अर्थवाहीपणासाठी, त्या रूपकांना आवश्यक शब्दांना कोंदण करून देणारा. संगमरवरातून संगमरवर बाहेर काढण्यासाठी संगमरवरच बाजूला करावा लागतो, तसं काहीसं. कोलटकरांनी चिरीमिरीतल्या कवितांसाठी हे रंगरूप पकडलंय ते अस्सल मराठमोळं. कवितेच्या आत्म्याला मिळालेलं ते शरीर आहे कपाळाला टिळा लावणाऱ्या वारकऱ्याचं. आणि त्या वारकऱ्याशी समन्वय साधलाय रांडांशी. विठ्ठलाच्या भेटीला चाललेल्या रांडा, व त्यांसोबत त्यांची भडवेगिरी करणारा बळवंतबुवा.

पंढरपूरला जाऊन
विठोबाला कळवा
तो बळवंतबुवा भडवा
येतोय म्हणून

..

मुंबईहून कालच
निघाला तांडा
एकशेसात रांडा
संगती आहेत

पहिल्या चार कवितांत आपल्याला बळवंतबुवाची व त्याच्या प्रवासाची ओळख होते. त्यानंतर वारीच्या वाटेतले काही प्रसंग येतात. हळुहळू कवितांच्या वृक्षाला फांद्या व डहाळ्या फुटतात. बऱ्याच वेळा आधीच्या कवितेतून पुढची कविता फुलते. पहिल्या 'रूपावरचा अभंग' व 'निरोप' मधून पुढची 'नगेली', तीमधल्या उल्लेखातून 'ठेसन' येते. वारीच्या रस्त्यातल्या कविता येतात. मग विठ्ठलाला 'फुगडी' घाल म्हणणाऱ्या अंबूने त्या कवितेत उल्लेख केलेला 'फोटो' 'विटेवरची फुगडी' नंतर येतो. 'फोटो' कवितेत ती विठ्ठलाला म्हणते मी घोंगडी खरेदी करून आणि मृत्यूची विहीर बघून येते - लगेचच 'घोंगडी' आणि 'मौत का कुआ' या कविता लागोपाठ नंतर येतात. पहिल्या वीस कवितांना या अर्थाने एक प्रकारची सूत्रबद्धता आहे. ती वाढ नैसर्गिक (organic) आहे. आदल्या रूपकांचा केवळ आधार घेऊन या कविता स्वतंत्रपणे आपल्या ताकदीने उभ्या राहातात. पंढरीच्या वारीच्या शेवटच्या कविता सरळसरळ देवाला किंवा त्याच्या देवत्वाला आव्हान करणाऱ्या आहेत. ज्या देवाला चोखामेळ्याची लेकरं येणार म्हणून कापरं भरतं त्याला इरसाल शिव्या म्हणा किंवा 'हरवलेल्या' देवाला तुझी जात काय ते तर सांग? म्हणणं काय...

कोण रे तू कुणाचा देव
काय तुझं नाव सांग तरी
...

तुला खायला देतो दूधभात
पण आधी तुझी जात काय ते तरी सांग

वारीच्या सर्वार्थाने पवित्र प्रवासाला रस्त्यात पडलेलं 'चातुर्वर्ण्याच्या गाढवाचं मढं' कसं विटाळून टाकतं या आशयाच्या.

यानंतर अचानक हे सूत्र तुटतं. आणि झाडाच्या एकाच फांदीला नवनवीन डहाळ्या फुटत जाण्याऐवजी एकदम भलभलतीकडे वेड्यावाकड्या फांद्या फुटायला लागतात. ही वारी, तो विठ्ठल, त्याची रखुमाई निघून जातात. बळवंतबुवा राहातो. पण मग कधी गोरे सोजीर येतात, कधी गीताईचे आपल्या चक्रम अठरापगड नवऱ्याविषयीचे अभंग येतात. रंगमंच फिरतात. मुखवटे बदलतात. नाटकात अचानक रणदुंदुभी बंद होऊन भजन सुरू होतं. वेश्या व त्यांना भेटलेले शेट येतात. काही वेळा बळवंतबुवाला देवरूस बनवून कवी अंधश्रद्धा व श्रद्धांविषयी बोलतो.

तोंडाला येईल तो म्हणायचा मंत्र
डोक्याला येईल ते सांगायचा तंत्र

असा हरामी डॅंबीस आहे बुवा भोंदू
पण पंचमीला अहो आला की तो धोंडू

शेवटच्या काही कवितांमध्ये कोलटकर मृत्यूविषयी बोलतात.

योगासने तीर्थयात्रा किंवा इतर व्यायाम
काही नको द्या यमाला चिरीमिरी हरिनाम

(इथेच कवितासंग्रहाच्या नावाचा उगम आहे)

वारीच्या, विठ्ठलाच्या कविता वाचताना तयार झालेली नीटस रूपकांची मांडणी विस्कळीत झाल्यासारखी वाटते. मग प्रश्न उपस्थित होतो की या सगळ्या विविधरंगी गोंधळामागची गणितं काय आहेत? व्हॉट इज द मेथड बिहाइंड द मॅडनेस?

बळवंत्या देतो फेकून टोमॅटो
खिशात घालतो अर्थ त्याचा

कवीने टोमॅटोमध्ये लपवून ठेवलेले पैसे काढून घेऊन टोमॅटो फेकून देण्याचा उल्लेख चिरीमिरीतल्या 'टोमॅटो' या कवितेत केलेला आहे. अर्थवरचा श्लेष लक्षात घेतला तर कोलटकरांनाही हाच गोंधळ काढून टाकण्याचा मुद्दा मांडायचा आहे. चिरीमिरीतल्या सर्व कवितांचं रसग्रहण करणं शक्य नाही, मला त्यातल्या काही अनेक वेळा वाचूनही कळल्या नाहीत. पण काही ज्या गवसल्या असं वाटतं त्यांच्या आधारे हे गणित सोडवण्याचा हा प्रयत्न.

क्रमशः

Comments

कोलटकर

बळवंतबुवाच्या विश्वापासून दूर जाऊन, त्या रूपकांचा पडदा उलगडून संकल्पनांच्या विश्वात कसं जायचं? यासाठी गोंधळ बाजूला करणं भाग पडतं. ही जबाबदारी कोलटकर वाचकावरच टाकतात. आणि ती पार पाडल्याशिवाय त्यांची कविता आपला पिच्छा सोडत नाही. 'हरलो, आता उत्तर सांगा' असं म्हणण्याची, किंवा शेवटच्या पानांवर ते वाचण्याची इथे सोय नाही. पण हा गोंधळ बाजूला केलाच पाहिजे, त्याशिवाय अर्थाचं गणितही सापडत नाही. गणिताचं उत्तर तर सोडाच.

तस आम्हाला कवितातल काही कळत नाही. जे पोहोचत ते कवितेतल्या नादमयतेमुळे. सुरवातीला कोलटकर मला विचित्र वाटायचे. हे काय यड्यावानी लिवलय? आन ही मासिकं बी काही बी छापुन र्‍हायलीत. समदा येड्यांचा बाजार.
नंतर अस समजल की कोलटकर हा चिंतनाचा विषय आहे. असेल ब्वॉ अस म्हणुन अंग काढुन घ्यायला सुरवात केली. आत्ता राजेश मुळे अडगळीत पडलेले कोलटकर दखलपात्र झालेत. फँटसी तील पात्र जिवंत व्ह्यायला लागतात.
बळवंत बुवा वाचताना मला गावाकडचा लव्हाराचा शंकर्‍या आठवला. वारी आली कि गडी खुष. वारीला पोचवायला गडी लई लांब जायचा. एक डोळा बारीक करुन म्हणायचा," तेवढीच 'कलुक' घावत्यात. केळी मदी डांगडिंग करायला चानस भेटतो यखांद्या टायमाला." डोक्याला तेल लावुन, कपाळाला गंध बुक्का लावुन गडी टेचीत 'शोधक' नजरेने डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या वारकरीणीं भोवती घुटमळत राहायचा. नंतर इठोबा 'पावला' कि नाई ते बी सांगायचा.
असो; कोलटकरांच्या निमित्तनी आठवण झाली.
प्रकाश घाटपांडे

कंडोमचे ढीग

नुकतीच वारी करुन आलेल्या एकाने चंद्रभागेच्या पात्रात कंडोमचे ढीग पाहिल्याचे सांगितले, ते आठवले.
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

मजा आली

आता तुम्ही म्हणाल की कवितेचा या गणित, गोंधळ वगैरेशी काय संबंध? कोलटकरांच्या कविता तरी अशी कोडी, प्रश्न या स्वरूपात समोर येतात. वाचताना एक चित्र उभं राहातं. पण त्या चित्रामागे काही कूट अर्थ दडलेला आहे असं जाणवतं. चिरीमिरीमध्ये राजूच्या ऐवजी बळवंतबुवा असतात, लाल पेन्सिलींच्या जागी रांडा असतात. आणि बळवंतबुवाची भडवेगिरी म्हणजे काय किंवा एकंदरीतच यातून कवीला काय सांगायचंय हा प्रश्न असतो. हा सोडवायचा कसा? बळवंतबुवाच्या विश्वापासून दूर जाऊन, त्या रूपकांचा पडदा उलगडून संकल्पनांच्या विश्वात कसं जायचं? यासाठी गोंधळ बाजूला करणं भाग पडतं. ही जबाबदारी कोलटकर वाचकावरच टाकतात. आणि ती पार पाडल्याशिवाय त्यांची कविता आपला पिच्छा सोडत नाही. 'हरलो, आता उत्तर सांगा' असं म्हणण्याची, किंवा शेवटच्या पानांवर ते वाचण्याची इथे सोय नाही. पण हा गोंधळ बाजूला केलाच पाहिजे, त्याशिवाय अर्थाचं गणितही सापडत नाही. गणिताचं उत्तर तर सोडाच.

कोडी सोडवणे हा चांगला विरंगुळा आहे. कुणाला दगडावर डोके आपटण्यातही आनंद मिळतो. देव पावला नाही तरी यातनेतून मिळणारे सुख स्वर्गीय असू शकते. हा मॅसोकिझमचा प्रकार आहे.
पण मुद्दा असा आहे की कवितेतली कोडी सुटलीच पाहिजेत का? (किंवा कवितेतून कोडी घातली पाहिजेत का किंवा कवितेत कोडीच शोधली पाहिजेत का?) कोलटकरांच्या कविता वाचताना मला मजा येते. त्यातून मला अर्थ मिळावाच अशी मी अपेक्षा ठेवत नाही. आपल्याला त्यातून काही मिळाले तर ठीक. नाही मिळाले तर काही बिघडत नाही. अशावेळी आम्ही आपले एक जहांगीर आर्ट गॅलरीतले पेंटिंग बघितले असे समजतो.

दुसरा मुद्दा जबाबदारीचा आहे. कवीने किंवा लेखकाने किती जबाबदार किंवा बेजबाबदार असायला पाहिजे? म्हणजे त्याला किती सूट आहे किंवा द्यावी? म्हणजे त्याने काहीतरी घाटपांड्यांच्या शब्दांत 'यड्यावानी' लिवायचं आणि आपण काठ्या आपटत फिरायचे हेच का आपले प्राक्तन? अहो प्रत्येक कोलटकराला किंवा रावळेला घासकडवी लाभतोच असे नाही. सतीश रावलेंनंतर कोलटकरांवरच का बरे लिहावेसे वाटले? काही साधर्म्य आढळले का ? समान धागा वगैरे?

असो. लेख उत्तम झाला आहे हे सांगायचे राहून गेले. वाचताना मजा आली.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कोडी

देव पावला नाही तरी यातनेतून मिळणारे सुख स्वर्गीय असू शकते. हा मॅसोकिझमचा प्रकार आहे.

नाही नाही, मी यातनेतून मिळणाऱ्या सुखाविषयी लिहीत नाही. मॅसोकिझमसाठी इतर अनेक चांगले पर्याय आहेत. कोडी सुटल्याचा आनंद हा अस्सल असतो. कोलटकरांच्या कवितांत तर ते सुटून जो अर्थ गवसतो ते म्हणजे गूढ सांकेतिक लिपीत लिहिलेल्या खजिन्याचा नकाशा उलगडून ते धन हस्तगत करण्याचं सुख असतं. धन हाती लागतंच. त्यासाठी वणवण करण्यात, गूढ उकलण्यात वेगळा आनंद असतो - समेवर यायच्या आधी घेतलेल्या तानांमध्ये भरकटण्याचा. विशिष्ट आवर्तनांनंतर त्या समेची सुटका नाही मिळाली, तर आनंद नाही.

पण मुद्दा असा आहे की कवितेतली कोडी सुटलीच पाहिजेत का? (किंवा कवितेतून कोडी घातली पाहिजेत का किंवा कवितेत कोडीच शोधली पाहिजेत का?)

हे प्रश्न कवीसापेक्ष आहेत. काही कवी आपल्या रचना कोड्यांप्रमाणे करतात. का करतात हे त्या कवीला विचारावं. काही संदेशांच्या बाह्य रचनेतच 'मी संदेश आहे, माझा अर्थ लावा' असा अधिसंदेश असतो. कोलटकरांच्या कवितांत ते कोडं आहे हा अधिसंदेश 'दिसतो'. बऱ्याच कवितात थोडे प्रयत्न केले तर ते सुटतंही. मला जो अर्थ लागला आहे तो मी मांडणार आहे, इतकंच. तो नाकारण्याचा तुम्हाला अर्थातच अधिकार आहे. किंवा अशा उत्तराने कोड्याची, अथवा कोडंच नाही असं म्हटलेल्या कवितेची मजा जाते असं वाटत असेल तर पुढचे भाग न वाचण्याचंही स्वातंत्र्य आहे.

कवीच्या जबाबदारीबद्दल सर्वसाधारण विधान करू धजत नाही. वाचकाने कवीला सूट देण्याचा, प्रश्नच नसतो. कोलटकर जबाबदारी तुमच्यावर टाकतात, पण ती तुम्ही उचलली तरच. नाहीतर त्यांची कविता मिटून दुसऱ्या, आपल्याला भावेल अशा कवीकडे वळण्याचा हक्कही आहेच. यड्यावाणी लिहिलं आहे हे काही वेळा सकृद्दर्शनीच सत्य असतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

छान

रसग्रहण आवडले. बरेचदा कलाकृती कुणीतरी उलगडून दाखवल्याशिवाय पूर्ण कळत नाही असा अनुभव आहे.

नंतरच्या प्रतिसादाशी सहमत आहे. रेंम्ब्रँटचे नाइटवॉच जेव्हा पहिल्यांदा पाहिले तेव्हा छान आहे म्हणून मिनिटभर बघितले आणि विसरून गेलो. चित्रकलेतील ओ का ठो कळत नसल्याचा परिणाम. नंतर बीबीसीवर त्या एका चित्रावर एका तासाचे विवेचन पाहिले तेव्हा त्यामागचे विश्वरूपदर्शन झाले. आता त्या चित्राकडे पहिल्या नजरेने बघणे कधीच शक्य होणार नाही. प्रश्न असा येतो की हे विश्वरूपदर्शन प्रत्येकाला व्हावे ही जबाबदारी बिचार्‍या रेम्ब्रँटने का उचलावी? त्या मिलिटरी सैन्याच्या पेंटींगमध्ये एक सोनेरी केसांची मुलगी काय करते आहे हा कळीचा प्रश्न मला पहिल्यांदा बघितले तेव्हा पडायला हवा होता. तो पडला नाही याला कारण माझी तोकडी दृष्टी आहे, त्याबद्दल रेम्ब्रँटला दोष देऊन काय फायदा? या चित्रावर लोकांनी लेखच नव्हे पुस्तके लिहीली आहेत हे नंतर कळाले. याशिवाय कुठलीही कलाकृती घडवताना कलावंताने लघुत्तम साधारण विभाजकाचा विचार करायला सुरूवात केली तर तो/ती कलाकृतीला संपूर्ण न्याय देऊ शकेल का?

बर्‍याच कलाकृती कळत नाहीत म्हणून सोडूनही दिल्या आहेत. युलिसिस त्यातलीच एक. स्क्रीम या चित्रामागे बराच अर्थ दडलेला आहे हे जाणवते. कधी उलगडा होतो याची वाट बघत आहे.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

शुभेच्छा

नाही नाही, मी यातनेतून मिळणाऱ्या सुखाविषयी लिहीत नाही. मॅसोकिझमसाठी इतर अनेक चांगले पर्याय आहेत.

असू शकतात. मुद्दा तो नाहीच.

कोडी सुटल्याचा आनंद हा अस्सल असतो. कोलटकरांच्या कवितांत तर ते सुटून जो अर्थ गवसतो ते म्हणजे गूढ सांकेतिक लिपीत लिहिलेल्या खजिन्याचा नकाशा उलगडून ते धन हस्तगत करण्याचं सुख असतं. धन हाती लागतंच. त्यासाठी वणवण करण्यात, गूढ उकलण्यात वेगळा आनंद असतो - समेवर यायच्या आधी घेतलेल्या तानांमध्ये भरकटण्याचा. विशिष्ट आवर्तनांनंतर त्या समेची सुटका नाही मिळाली, तर आनंद नाही.

सुरेख ललित.

मला जो अर्थ लागला आहे तो मी मांडणार आहे, इतकंच. तो नाकारण्याचा तुम्हाला अर्थातच अधिकार आहे. किंवा अशा उत्तराने कोड्याची, अथवा कोडंच नाही असं म्हटलेल्या कवितेची मजा जाते असं वाटत असेल तर पुढचे भाग न वाचण्याचंही स्वातंत्र्य आहे.

माझे अधिकार मला माहीत आहेत. पण मी तुम्हाला लागलेल्या अर्थांना नाकारलेले अथवा स्वीकारलेले नाही. कविता वाचताना वाचक काय करतो किंवा करत नाही ह्याचा शोध घेण्याचा मी माझ्या अतिसामान्य वकुबानुसार अतिशय अतिशय ओझरता प्रयत्न केला आहे. तसेच पुढचे भाग वाचण्याचे किंवा न वाचण्याचे, त्यावर प्रतिसाद देण्याचे किंवा न देण्याचे स्वातंत्र्यही मी विसरलेलो नाही. पुढील भागासाठी मनापासून शुभेच्छा.

असो. मुळात कधी कधी वाचकच फार प्रतिभावंत असतो. त्याला साध्या पवनचक्क्या दिसत नाहीत.

"Take care, sir," cried Sancho. "Those over there are not giants but windmills. Those things that seem to be their arms are sails which, when they are whirled around by the wind, turn the millstone."

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पवनचक्क्या, राक्षस

मुळात कधी कधी वाचकच फार प्रतिभावंत असतो. त्याला साध्या पवनचक्क्या दिसत नाहीत.

हा तुम्ही अतिशय चांगला मुद्दा मांडला आहे. लेखन वाचणे (अथवा चित्र पाहाणे इ.) व त्याचा अर्थ कळणे ही प्रक्रिया मूळ कलाकृतीवर जितकी अवलंबून असते तितकीच अर्थ काढणाऱ्या व्यक्तीवरही (यंत्रणेवर) अवलंबून असते. 'ग्योडेल, एश्चर, बाख' या पुस्तकात लेखकाने हे ठसवण्यासाठी एक चमत्कृतीपूर्ण उदाहरण दिलेलं आहे. त्यातल्या एका कॅरेक्टरकडे ज्यूकबॉक्स असतो. पण त्यात रेकॉर्ड एकच असते. आपल्याला वेगवेगळी गाणी ऐकायची असतील तर रेकॉर्ड प्लेयर्स बदलायचे. आता यातलं कुठचं गाणं 'खरं'? कुठची पवनचक्की व कुठचा राक्षस? मी म्हणतो, सगळी गाणी ऐकून बघावी, आवडतील ती मनात ठेवावीत.

प्रत्येकच लेखन, विधान, वा कलाकृतीत बहुपदरी अर्थ असतात, व प्रत्येक विधानाचा वाचकाप्रमाणे वेगळा अर्थ होतो असं मला म्हणायचं नाही. सामान्य जीवनात वापरली जाणारी बहुतेक विधानं एकपदरी, सरळसोटच असतात. (ठरवलं तर त्यांमधूनही वेगळेच अर्थ घेता येतात हेही खरंच). पण काही कलाकृतींचा वेगवेगळ्या लोकांना अर्थ वेगवेगळा लागतो. पवनचक्क्या किंवा राक्षस असं 'हे किंवा ते' हा विचार कवितांबाबत कोता वाटतो. मला राक्षस दिसला कारण ते पहा उघड उघड दात दिसतात वगैरे कोणी म्हटलं तर त्या दृष्टिकोनातून इतरांनीही पाहाण्याचा प्रयत्न करावा एवढंच मला वाटतं. प्रतिमा पटली नाही तर सोडून द्यावी.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

तेरा इमोसनल अत्याचार

|\—/

|\-/

⎛⏜︵⏜⎞

   .     .क्ष्

तुमच्या प्रतिसादातले

अत्याचार नीट मोजता आले नव्हते. ते तेरा आहेत का? अच्छा. माहितीबद्दल धन्यवाद.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

शुभेच्छा

मी कोलटकरांच्या काही कविता वाचायचा व्यर्थ आणि (फारसे काहि न कळल्याने) कंटाळावाणा प्रयत्न केल्याचे आठवते.. तेव्हा तरी काहि कळले नव्हते. तुमच्या ह्या सुरेख रसग्रहणानंतरही अजूनतरी कोलटकर पुन्हा वाचायची इच्छा चाळवलेली नाहि.. तेव्हा पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

असेच म्हणतो

रसग्रहण अतिशय सुरेख.

पुढील भागांसाठी शुभेच्छा. लौकर येऊ द्या.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हेच!

ऋषीकेश शी सहमत आहे. मी ही त्या कविता काही काळाने सोडून दिल्याचे आठवते... कदाचित त्या काळात हे रुपक आहे, हे माझ्या लक्षात आले नसावे.

परत वाचनाची इच्छा झाली आहे. पाहू योग कधी येतो ते.

राजेश, आपण पुस्तकाचे नाव आणि प्रकाशक ही माहितीही द्याल का?
भारताबाहेरून मागवताना उपयोग होईल.

-निनाद

रसग्रहण

रसग्रहण आवडले.

बर्‍याचदा एखाद्या कलाकाराला/कलाकृतीला सामोरे कसे जावे याबाबत संभ्रम निर्माण होतो. कोलटकरांच्या बाबतीत असे झाल्याचे मला आठवते. या निमित्ताने पडलेले काही प्रश्न :

चिरिमिरीतल्या कवितांचे सौंदर्य म्हणा किंवा त्यातली "गोम" म्हणा, ही त्या रूपकातच आहे असे कितपत म्हणता येईल ? जे चित्रण केलेले आहे तेच वास्तवदर्शी/गमतीदार/इरसाल/रोचक आहे की. बळवंतबुवा कशाचे रूपक आहे यापेक्षा , त्याचे आहे तेच चित्रण अस्सल वाटते.

हा असा प्रतिसाद काहीसा एकेरी आहे हे मला मान्य आहे. परंतु स्पेसिफिकली, "चिरीमिरी" बद्दल असे वाटते की, यामधे कुठल्या व्यवस्थेचे सूचन व्यक्त करावे असा हेतू दिसत नाही.

होय , विठोबासारख्या अत्यंत ठसठशीत, महत्त्वाच्या सांस्कृतिक आयकन् (मराठी शब्द ?) यामध्ये मध्यवर्ती आहे हे खरे आहे. परंतु इथे एका महत्त्वाच्या मराठी दैवताशी, त्याच्याशी संलग्न सबकल्चरशी ते कवितेतून खेळताहेत असे वाटले. एकास-एक किंवा एकास-अनेक संगती असे रूपक कितपत आहे याबद्दल थोडी शंका वाटली.

नेहमीप्रमाणेच , चूभूद्याघ्या .

बाह्यरूप व रूपक

जे चित्रण केलेले आहे तेच वास्तवदर्शी/गमतीदार/इरसाल/रोचक आहे की.

बरोबर. ते चित्रण रोचक आहेच, असावं अशा मताचा मी आहे. म्हणूनच लेखात 'हे गणित म्हणजे राजूच्या सहा लाल पेन्सिली असू शकतात. किंवा युवराजने ब्रॉडला खेचलेल्या सहा बॉलमधल्या सहा सिक्सर असू शकतात. गणित बदलत नाही, पण नाट्य बदलतं. कवितेसाठी हे माध्यम, व त्यातून निर्माण होणारं नाट्यही महत्त्वाचं असतं. त्या दृष्टीने हा गोंधळ देखील त्यामागच्या रूपकांत दडलेल्या अर्थाइतकाच महत्त्वाचा आहे.' असं म्हटलेलं आहे.

बळवंतबुवा कशाचे रूपक आहे यापेक्षा , त्याचे आहे तेच चित्रण अस्सल वाटते.

पण पहिल्याच कवितेत त्याच्या अस्सल वर्णनानंतर 'त्याने पायाला घड्याळ बांधलंय, त्याच्या पायावर डोकं ठेवू आणि किती वाजले ते पाहू...' अशा स्वरूपाच्या पंक्ती कोलटकर लिहितात. तेव्हा त्याचा अर्थ लावण्याची गरज पडतेच. घड्याळ हे कसलं रूपक आहे हा विचार करावाच लागतो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मनसोक्त रसग्रहण

मनसोक्त रसग्रहण आवडले.

(@धम्मकलाडू : रसग्रहण <-> समीक्षण <-> साहित्यमीमांसा अशी साहित्यचर्चेतील मितीची बिंदुगामी चर्चा अशोक केळकरांनी "रुजुवात"मध्ये केली आहे.)

गणिताचे रूपक आपडले, पण थोडेसे ताणल्यासारखे वाटले. खरे तर सैद्धांतिक दृष्ट्या मला ते तितकेसे पटत नाही. पटते, पुढे तुम्ही म्हणता तसे :

कवितेत येणारा हा गोंधळ 'अनावश्यक' म्हणता येईल का? ... (मधले तितकेसे पटत नाही.)... गोंधळ देखील त्यामागच्या रूपकांत दडलेल्या अर्थाइतकाच महत्त्वाचा आहे.

माझ्या दृष्टीने कलाकृतींचे वैशिष्ट्य असे असते की रूप आणि संदेश हे इतके घट्ट विणलेले असतात, की ते उसवणे शक्य नसते. फार पूर्वीपासून कालिदासाचे म्हणणे बघू : "वागर्थाविव संपृक्तौ" म्हणजे वाचा (रूप) आणि अर्थ (संदेश) हे संपृक्त (विरघळलेल्यासारखे सूक्ष्मातिसूक्षम मिसळलेले) आहेत. ही उपमा तो वाणी-विनायकांसाठी वापरतो. उपमेत उपमान हे रसिकासाठी सुस्पष्ट अर्थाचे मानले जाते. कालिदासाच्या मते वाग्-अर्थ संपृक्त असतात, हे रसिकांना आधीच मनापासून ठाऊक असते. येथे कालिदास एक "बाबावाक्य" म्हणून समोर ठेवत नाही, तर एक कलाकार म्हणून त्याचा संदर्भ मी देत आहे.

तुमच्या रसग्रहणात मात्र "गणित"-उपमेचा गोंधळ दूर करून संदेश प्राप्त करण्यास तुम्ही भाग पाडले, आणि माझ्या मताचे खंडन मलाच करायला लावले... हलकेच घ्या.

कोलटकरांच्या कविता विचारप्रवर्तक आहेतच. आणि तुम्ही करून दिलेली ओळखही त्यांच्याशी दोस्ती करायची इच्छा वाढवत आहेत. पुनश्च : रसग्रहण आवडले.

अर्थाच्या पातळ्या

रूप आणि संदेश हे इतके घट्ट विणलेले असतात, की ते उसवणे शक्य नसते.

बरोबर. पण अर्थाच्या पातळ्या असतात हे तर मान्य करावंच लागतं. आंबा या शब्दाचा अर्थ आपल्याला एक फळ म्हणून माहीत असतोच. 'राया माझ्या आंब्याना हात नका लावू' अशी ओळ लावणीत आली तर तिचा अर्थ फळ हा घेऊनही लावता येतो. पण तेवढाच मर्यादित घ्यावा का? त्या ओळीत फक्त फळ बघणाऱ्याला पवनचक्क्याच लखलाभ. फळ हा अर्थ आंबा शब्दात जितका एकजीव आहे, तितका स्तन हा अर्थ आहे का? शृंगारिक लावणीचा अर्थ लावताना निव्वळ फळ या अर्थाला मी 'गोंधळ' म्हटलेलं आहे. हा गोंधळ काढून टाकल्यावर मग जो अर्थ येतो तो त्यानंतर एकरूप होतोच. खिडकीवर बाहेरच्या देखाव्याचा पडदा असेल तर तो काढून टाकल्यावर बाहेरच्या दृश्याशी एकजीव होतोच ना... तसंच काहीसं.

निव्वळ शब्द ते सामान्य अर्थ ते सांकेतिक अर्थ असं मॅपिंग करता येतं. पहिलं वन टु वन असतं दुसरं वन टु मेनी असतं. या मेनी च्या अवकाशात धुंडाळलं तर अनेक गोजिरे अर्थ सापडू शकतात. तसं भटकता येणं हेच कवितेचं देणं असं मी मानतो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

कोलटकरच का?

'सांकेतिकतेच्या भोवर्‍यात गरगरणारे' लिखाण कोलटकरच नव्ह्ये तर बरेच प्रथितयश लेखक करताना दिसतात. नेमाड्यांचे काही लेखन वाचताना माझ्यासारख्या सुमार बुद्धीच्या वाचकाचा गोंधळ होतो. त्यावरचे नेमाडेंचे भाष्य किंवा स्पष्टीकरण वाचले / पाहिले की हा गोंधळ वाढतो.
एकलव्याचा आदर्श ठेवा, घासकडवी. कोलटकर समजोत अथवा न समजोत, तुमचे लेखन जोवर समजते, तोवर आम्ही वाचत राहू.
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

उत्तम रसग्रहण

रसग्रहण आवडले. 'कोलटकरांच्या निवडक कविता' वाचल्या तेव्हा वर अनेकांनी अनुभव व्यक्त केला तसाच अनुभव आला. काही कविता कळतात काही कविता कळत नाही. कवीची वृत्ती, कवीची भाषा, कवीला अपेक्षित असलेला आशय, या सर्वांचा अनुक्रम लावतांना एक [सुमार] वाचक म्हणून दमछाक होते. आपण केलेले रसग्रहण वाचून वाचकही प्रतिभावान असला पाहिजे असे जे म्हणतात ते पटते. जाणकार वाचकाकाडून कविता समजून घेतली म्हणजे आपले आकलनाचे क्षेत्र विस्तारते, तोच अनुभव आपले कवितेच्या रसग्रहण देत आहे, मनःपूर्वक आभार....!

-दिलीप बिरुटे

रसग्रहण की परीक्षण ?

(@धम्मकलाडू : रसग्रहण <-> समीक्षण <-> साहित्यमीमांसा अशी साहित्यचर्चेतील मितीची बिंदुगामी चर्चा अशोक केळकरांनी "रुजुवात"मध्ये केली आहे.)
(@धनंजय: बघतो. रसग्रहण आणि परीक्षण ह्या दोहोंत काही फरक नसावा. म्हणूनच कदाचित शीर्षकात रसग्रहण तर डिसक्लेमरात परीक्षण आहे. किंवा आधीचा मजकूर कॉपी-पेस्ट केला असावा.;) )

मला राक्षस दिसला कारण ते पहा उघड उघड दात दिसतात वगैरे कोणी म्हटलं तर त्या दृष्टिकोनातून इतरांनीही पाहाण्याचा प्रयत्न करावा एवढंच मला वाटतं. प्रतिमा पटली नाही तर सोडून द्यावी.

सवाल प्रतिमा पटण्याचा वा सोडून देण्याचा नाहीच. किंबहुना इतरांनीही तुमच्या बघण्याच्या पद्धतीला, तुमच्या दृष्टीला दाद दिली आहेच. इतरांनीही तुमच्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न केलाच आहे.
असो.

जे न देखे कवी
ते देखे घासकडवी
हेच खरे. :)

तुम्ही परीक्षणे/रसग्रहणे लिहीत राहा. वाचत आहोतच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हा हा

जे न देखे कवी
ते देखे घासकडवी

:) निखळ स्वरुपाचा विनोद आवडला.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हम्म!

जे न देखे कवी
ते देखे घासकडवी

:-)

तुम्ही परीक्षणे/रसग्रहणे लिहीत राहा. वाचत आहोतच.

सहमत!

 
^ वर