रस्त्यांवरील अपघात

भोचक यांना कधी प्रत्यक्षात जरी भेटलो नसलो तरी, आज हूरहूर लागली आहे. जो काही थोडाफार संवाद झाला तो आधी पण पुरेसा नव्हता, पण आता अधूराच राहणार याचे वाईट वाटत राहील. हे माझ्याबाबतीतच नाही तर अनेकांच्या बाबतीत खरे आहे असे राहून राहून वाटते.

पण अशा चांगल्या आणि होतकरू व्यक्तीच्या अकाली मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना केवळ श्रद्धांजली म्हणून थांबणे जीवावर येत आहे. अशी शोक व्यक्त करण्याची वेळ का यावी हा प्रश्न टोचत आहे. अशी वेळ कुणावरही येऊ नये हीच प्रार्थना... ई-सकाळमधील त्याच्या अपघाताच्या बातमीच्या बाजूस संबंधीत बातम्यांकडे नजर गेली तर काय दिसले?

* अकोल्याकडे जाणारी बस उलटून २८ प्रवासी जखमी
* कुसुंबा, नेरजवळ अपघातात दोन ठार, ३ जखमी
* क्रेनसह विहिरीत पडून उंभर्टीत मजुराचा अंत
* मोटारसायकलसह दोन तरुण उड्डाणपुलावरून ३० फूट खाली
* सायने शिवारात घर कोसळून महिला ठार

जेंव्हा कोणीतरी ओळखीतले अशा अपघातात असते तेंव्हा जे जाणवते ते अशा इतर बातम्यांकडे जाणे शक्य नसते, त्यात अपराधीपणाची भावना असण्याची गरज नाही. पण खरेच याला दुर्दैव म्हणून सोडून द्यावे का? हा प्रश्न पडला आणि थोडी जालावर शोधाशोध चालू केली. त्यात भारत सरकारच्या "रोड ट्रान्स्पोर्ट अँड हायवेज" मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून अस्वस्थ करणारी माहीती मिळाली: (दुवा)

यातील विदा वापरुन खालील आलेख काढला:

traffic accidents fatalities

एक २००० सालच्या सुमाराचा अपवाद सोडल्यास रस्त्यावरील अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढतच चाललेले दिसते. अभिनयच्या अपघाताची बातमी कुठेतरी वाचतानाच असाच अजून एक तरूण पत्रकार गेल्यावर्षी अपघातात गेल्याचे वाचले. जागतिक आरोग्य संघटनेच्या गेल्या वर्षीच्या अहवालाप्रमाणे, भारतात आणि इतरत्र, रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण हे देखील एखाद्या रोगराईसारखे पसरत आहे. भारतात, दर तासाला १३ जणांना अपघातात मृत्यू येतो. शिवाय जाणार्‍या व्यक्तींबरोबर त्यांचे मागे राहीलेले कुटूंबिय आणि उध्वस्त झालेले संसार लक्षात घेतले तर त्याचे प्रमाण हे अधिकच भयावह आणि अस्वस्थ करणारे आहे...आणि हो, यात रेल्वेचे अपघात धरलेले नाहीतच...

अनेक अपघातात राजकारण्यांचे (काँग्रेस) अथवा त्यांच्या नातेवाईकांचे (शिवसेना) गेल्याचे आपण वेळोवेळी वाचले आहेत. कालानुरूप त्या बातम्या मागे पडतात, त्यात काही गैर नाही, पण परत असे घडू नये अथवा त्याचे प्रमाण हळूहळू कमी व्हावे यावरून सतत लागणारे लोकशिक्षण आणि स्वाध्याय आपण करत असतो का हे पहायची वेळ आधीपण होतीच आणि अजूनही आहेच आणि प्रमाण कमी झाले तरी कायमच रहाणार आहे. यात केवळ सरकारने काय करावे आणि काय करत नाही इतकाच मुद्दा नसून प्रसारमाध्यमे (ज्यांचे पण त्यांच्यातील व्यावसायिकांच्या जाण्याने नुकसान होते) तसेच समाजसेवी संस्था आणि अर्थातच तुम्ही-आम्ही सगळ्यांचाच विविध स्तरांवर सहभाग लागणार आहे.

  1. गाडीचालकाचा परवाना देताना नक्की काय शिकवले जाते आणि शिकले जाते?
  2. रस्त्यावर शिस्त पाळली जाते का? - सर्व वाहनचालक, पादचारी, सायकलवाले आदी...
  3. आता भारतात गाड्या वाढत आहेत - त्याबरोबर गाड्या चालवत फिरणे देखील. कधी कधी डोळ्यावर ताण येतो तर कधी खूप थकव्याने ग्लानी येते अथवा झोप येते. अशावेळेस कुठलाही पुरूषार्थ न समजता आपण बाजूला थांबून किमान ५-१० मिनिटे डोळ्यांना विश्रांती देतो का? अथवा बरोबर दुसरा/री चालक असेल तर गाडी चालवायला त्यांना देतो का? हे खूप महत्त्वाचे आहे.
  4. मद्य पिऊन गाडी चालवणे हे असेच एक अजून आमंत्रण आहे. त्याच्या मर्यादा सांभाळता येणे महत्त्वाचे आहे. - स्वत:साठी आणि रस्त्यावरील इतरांसाठी देखील.
  5. ट्रान्स्पोर्ट कंपन्यांनाना त्यांच्या ड्रायव्हर्सना (विशेष करून ट्रक ड्रायव्हर) सक्तीचे शिक्षण आणि "झिरो टॉलरन्स" आमलात आणायला लावणे महत्त्वाचे आहे. तसेच ज्या ट्रान्स्पोर्ट कंपन्यांच्या वाहनांकडून अपघात होतात, त्यांना दंड करणे आणि नावे जाहीर करणे, वगैरे शिक्षांची पण गरज आहे. हे केवळ खाजगीच नाही तर पिएमटी आणि इतर शहरातील तत्सम बस सेवा, एसटी आदींना पण बंधनकारक होणे महत्त्वाचे आहे.
  6. जर कोणी अपघातात अडकलेले दिसले तर जिथे शक्य आहे तेथे मदत पण किमान पोलीसांना फोन करून मदत करायचे काम आपण केले पाहीजे.

म्हणलं तर गोष्टी अगदी साध्या आहेत पण तरी देखील विचार आणि आचारात येयला अवघड जात आहेत.

आज हे सगळे सुचायचे कारण वर्षातल्या ८७६० तासातील, एका तासात गेलेल्या तेरा दुर्दैवी व्यक्तींपैकी एकास आपण सगळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ओळखत होतो. पण नुसती श्रद्धांजली म्हणत सोडून देण्याऐवजी जर आपण अपघात टाळण्यासाठी स्वतःकडून गाडी चालवत असताना, तसेच इतरांना या संदर्भात सतत सांगून जागे केले तर पुढच्या पाच-दहा वर्षात काहीतरी चांगले परीणाम पहाता येतील असे वाटते.

या धाग्यात या संदर्भात उपाय, अनुभव आदींवरून चर्चा झाली तर सगळ्यांनाच माहीती आणि शिक्षण मिळेल....

-------------

लेखनविषय: दुवे:

Comments

बदल होतोय

अपघात वाढले आहेत हे खरे पण वरील तक्त्यातील शेवटून दुसरा कॉलमही बघण्यासारखा आहे.
हा कॉलम दर्शवतो की दर दहाहजारी होणार्‍या अपघातांचे प्रमाण घटते आहे. याचा अर्थ एकूण गाड्या खूप वाढल्याने हा अपघातांचा निव्वळ आकडा वाढला असला तरी लोकांमधील अधिक जाण, मोठे रस्ते, चांगले तंत्रज्ञान आदिंमुळे अपघाताची टक्केवारी घसरली आहे.

अर्थात याचा अर्थ आहे ते चित्र उत्तम आहे असे अजिबात नाहि. तेव्हा ही चर्चा मोलाची ठरेल याची खात्री वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

असेच

अर्थात याचा अर्थ आहे ते चित्र उत्तम आहे असे अजिबात नाहि.

असेच म्हणायचे होते. बाकी येथे दिलेल्या सविस्तर उत्तरातील एक भाग येथे चिकटवतो...

सर्वप्रथम, रस्त्यावरील अपघातासंदर्भात आकडेवारी बघायची ठरवले तर जालावर अनेक संदर्भ सापडतात. मी दिलेला संदर्भ, भारतापुरता अधिकृत समजून दिला, जरी जागतिक आरोग्य संघटनेच्या ("हू") दृष्टीकोनातून ह्या बातमीप्रमाणे खरा आकडा हा बर्‍याचदा अधिक असू शकतो, कारण बर्‍याचदा सर्व अपघातांची आणि त्यांच्या परीणामांची नोंदणी होतेच असे नाही.

....

माझा मुद्दा होता तो केवळ (absolute and not relative) प्रत्यक्ष "जीवाचे मोल" या संदर्भात होता, म्हणून तसा आलेख काढला. त्यात भावनांच्या आहारी जाणे हा प्रकार नक्कीच नव्हता. पाश्चात्य राष्ट्रांशी प्रत्यक्ष तुलनेचा उद्देशही नव्हता, जरी तेथे बरेच काही शिकण्यासारखे असले तरी. आपल्या परीस्थितीत आपल्याला योग्य ती उत्तरे आपल्याला शोधावी लागणार आहेत.

--------------

शक्यता

लोकांमधील अधिक जाण, मोठे रस्ते, चांगले तंत्रज्ञान आदिंमुळे अपघाताची टक्केवारी घसरली आहे.

कदाचित असे झाले असेल की गर्दी, खड्डे, यांमुळे वेगवान वाहने चालवण्यायोग्य रस्ते कमी झाले असतील.

रस्त्यावरील वाहने किती?

१९७० ते २००४ मध्ये भारताची लोकसंख्या साधारण दुप्पट धरली तर वाहने पन्नासपट झाली, अपघात चौपट झाले, मरणारे सहापट झाले. रस्त्यांची लांबी किती वाढली माहित नाही.

एखादे वाहन रस्त्यावर चालणे बंद झाले तरी सरकारी अहवालात ते तसेच राहते. माझ्या माहितीतील एका दुरुस्ती अभियंताने सांगितले होते की असे वाहन काढून टाकणे जिकीरीचे असते. सध्या असलेल्या वाहनांच्या संख्येत अशा वाहनांची संख्या लक्षात घेतली पाहिजे.

प्रमोद

विचारकरण्याजोगा

१९७० ते २००४ मध्ये भारताची लोकसंख्या साधारण दुप्पट धरली तर वाहने पन्नासपट झाली, अपघात चौपट झाले, मरणारे सहापट झाले....एखादे वाहन रस्त्यावर चालणे बंद झाले तरी सरकारी अहवालात ते तसेच राहते.

विचारकरण्याजोगा मुद्दा आहे. धन्यवाद.

प्रबोधन व शिक्षा

वाहन परवाना काढेपर्यंत प्रबोधन व परवाना आल्यानंतर वाहनचालकावर कठोर कारवाई. हा उपाय वरकरणी जरी तर्क शुद्ध वाटला तरी सोपा नाही. कारण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अनुकुल परिस्थिती वास्तवात नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात वाहन संख्या किती? हा मुद्दा वर तक्त्यात आलेला नाही. बेजबाबदार वृत्ती वसत असलेल्या वाहनचालकांची संख्या खुप आहे. मधे पुण्यात विविध ठिकाणी कॅमेरा लावलेल्यातुन चित्रीत झालेल्या वाहतुकीत नियम मोडणार्‍या बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण खुप मोठे होते. कारवाई करणे हे अव्यवहार्य ठरावे इतके. आकडे वारी लक्षात नाही. एवढ्या मोठ्या संख्येवर कारवाई करण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर चौकट व यंत्रणा उपलब्ध नाही.
ज्याला काही जमत नाही त्याला 'बन डायवर न्हाई त व्हय पोलीसात भर्ती ' असे पर्याय ठेवले जातात. अशा वेळी त्यांच्याकडुन काय अपेक्षा करायची?
प्रकाश घाटपांडे

मी (स्वतःकरीता) काय करतो ?

१. कधीही रोड रेस मधे भाग घेत नाही. (एक जाहिरात नेहमी आठवते, बहूधा कॅस्ट्रॉल ची - एक मुलगा आणि त्याचे वडील कारमधे बसून जात असतात. मुलगा
म्हणतो, पापा सायकल भी अपने गाडी से तेज भाग रही है.) शहरात ४०-५० किमी चा वेग, हायवेवर ५५-६० किमी चा वेग.
२. नियम पाळण्यासाठी नाही तर डोके शाबूत राहण्यासाठी हेल्मेट न चुकता घालतो. (मागे बसणार्‍यालाही तोच नियम)
३. विम्याचे नियमीतपणे नुतनीकरण करुन घेतो.
४. बस, ट्रक ड्रायवर यांना खुन्नस देत नाही.
५. इतर वाहनांनी प्रवास करत असल्यास रात्रीचा प्रवास १००% टाळतो. (रेल्वेचा असेल तर नाही.)
६. गाडीची नियमीत तपासणी करतो.
७. एकदम ब्रेक मारणे किंवा टर्न (वळणे) टाळतो.
८. टुरीस्ट गाडीने प्रवास करताना ड्रायव्हर ने फक्त गाडीतच इंधन टाकले आहे, पोटात नाही याची खातरजमा करण्याचा प्रयत्न करतो. (डोळे लाल आहेत काय ? तसला वास येतो आहे का इ. इ.)

हे सगळे स्वतःकरीता.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

:)

हेल्मेटमुळे केस उस्कटतात.
यू टर्न ला बंदी असेल किंवा फुटपाथवर घुसून वेळ/अंतर वाचणार असेल तर हाताने बाईक ढकलत नेतो. असे केल्यास मी 'पादचारी' ठरत असेन कदाचित, पण पोलिसांच्या समोरून गेलो तरी ते अडवीत नाहीत हे नक्की!
जर मी फुटपाथच्या कडेलाच रस्त्यावर सिग्नल हिरवा होण्याची वाट पहात असताना कोणी हीरो माझ्या मागून फुटपाथवरून बाईक चालवत आला आणि त्याला खाली रस्त्यावर उतरायचे असेल तर मी जागा देत नाही. मी सांगतो की "मी पुढे गेल्यावर उतर".
सिग्नलविरहित चौकातील वाहतूक कोंडीत सर्वात आधी घुसणार्‍याला 'फर्स्ट मूवर्स ऍडवान्टेज' असते, थांबला तो संपला.
बसवाल्याने वाहतुकीला अडथळा होईल अशी बस उभी केल्यास त्याला 'गाठतो', बसपुढे बाईक उभी करून त्याला जाब विचारतो. थांबलेली बस आणि बसथांबा यांच्यात पाच फूट फट असेल तर तेथून बाईक जाऊ शकते. हॉर्न वाजविला की लोक बाजूला होतातच.
सिग्नलवर हिरवा दिवा झाल्याक्षणी जर पुढच्या वाहनांपैकी कोणा एकाचेही वाहन बंद असेल तर पी-पी-पी-पी चालू करतो.
बरेच लोक सतत ओवरटेक करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यात सफल फारच कमी होतात पण त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागाकडे अधिक गर्दी असते. डावीकडून ओवरटेक करण्यात अधिक यश मिळू शकते.
पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्याचा सिग्नल नसताना जर कोणी रस्ता ओलांडत असेल तर मी त्याच्या गन्तव्य दिशेला तिरका तिरका जातो (या आयडियाचा थत्ते यांनी उल्लेख केला होता असे स्मरते).
सार्‍या दुकानांच्या पाट्या वाचता येत असतील तर तुम्ही हळू जात आहात.
वाहतूक कोंडीत पादचारी घुसून अधिक गोंधळ उडू शकतो. तेव्हा माझ्या पुढील वाहन आणि माझी बाईक यांत किमान शक्य अंतर ठेवतो.

हा हा हा

हा हा हा...ह. ह. बे.!!!
कुठल्या शहरात असता हो तुम्ही!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

उणे

हे एकच शहर आहे जेथे हेल्मेटची सक्ती झाली तर दंगली होतील (कदाचित मीही जाईन झुंडीत, नक्की सांगता येत नाही ;) ).

 
^ वर