साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद का मिळवायचे ?

"मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद" मिळावे ही जवळपास प्रत्येक साहित्यिकाची मनोकामना असतेच (आणि त्यात काही गैर आहे असेही नाही). संमेलनाचे अध्यक्षपद मिळावे म्हणून अलिकडील काळात इच्छुकार्थी कोणत्या थरावर जाऊ शकतात ते यापूर्वी अनेकदा रसिक भाषाप्रेमींच्यासमोर उघड झाले आहे तसेच एखाद्याला हा मान (?) मिळू नये म्हणूनदेखील दुसर्‍या गटातून कोणकोणत्या क्लृप्त्या लढविल्या जातात हेही सर्वश्रुत आहे. याचा लेखाजोखा पाहून भलेभले साहित्यिक निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहणे पसंद करतात, मात्र ज्यांना या पदात "स्पेशल इंटरेस्ट्" वाटतो ते निवडणुकीतील सर्व "गिमिक्स"ना सामोरे जाऊन अध्यक्षपद एक वर्षापूरता मर्यादित असलेला मान मिळवितातच हे आपण एक वाचक म्हणून पाहतोच.

पण आता एकदा येनकेनप्रकारे, मानापमानाची क्षिती न बाळगता जर का ते पद मिळाले तर संमेलनाचे सूप वाजल्यानंतर त्या पदाला असलेल्या "लायकी"बद्दल अश्रू का ढाळायचे? काल कोल्हापुरात प्रख्यात समीक्षक व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांचा रितिनुसार करवीर नगर वाचन मंदिरने जाहीर सत्कार केला. "ग्रंथ विकत घेवून वाचावेत, वाङ्मयीन चर्चा कराव्यात" इतपर्यंत भाषणाचा सूर ठिक होता, पण अचानकच अध्यक्षांची गाडी घसरली आणि 'साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे एक बाहुलेच असते, त्याला कसलाही अधिकार नाही' असा पंचम त्यांनी लावला आणि थोडक्यात "साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे सत्ता नसलेल्या सम्राज्ञीप्रमाणे आहे,' असे प्रतिपादन करून टाकले. मराठी साहित्याचा एक सर्वसामान्य वाचक आणि प्रेमी या नात्याने माझ्यासारख्या अनेकांना हा प्रश्न पडला की, डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्यासारख्या नामवंत समीक्षकाला, अभ्यासकाला ही जाणीव "संमेलनाचे अध्यक्षपद" मिळाल्यानंतर झाली का या अगोदरही त्यांना या पदातील फोलपणा माहितच नव्हता? माहित नसेल, ही एक मोठी आत्मवंचना ठरेल. कारण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुणीही "डिक, टॉम, हॅरी" उतरत नाही वा कुणालाही मारून मुटकून घोड्यावर बसवित नाही. या "युद्धात" पडायचे असेल तर त्यातील जमाखर्च चांगलाच माहित असावा लागतो, अन डॉ.द.भि.कुलकर्णी सारख्या मराठी भाषेच्या प्रांगणात काळेच्या पांढरे झालेल्या व्यक्तीला याचा ल.सा.वि. माहित नसेल असे समजणे दूधखुळेपणाचे होईल.

मग एकदा त्या मांडवाखालून गेल्यानंतर "मला कसलाही अधिकार नाही" असा गळा काढणे औचित्यपूर्ण होईल का?

(शेवटी शेवटी, रात्रीच्या पंगतीच्या बोलीवर आलेल्या स्थानिक पत्रकारांनी १९६० पासून शिजत असलेला "सीमाप्रश्न" काढलाच. आता जे अध्यक्षमहाशय दहा मिनिटापूर्वीच व्यासपिठावर जाहीर बोलले की, "साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला कसलेही अधिकार नसतात", त्यांना सीमाप्रश्नावर काही अधिकारवाणीने बोलता येईल का? पण नाही, अध्यक्षांना त्या ज्वलंत प्रश्नाबद्दल विचारले नाही तर ते पत्रकार कसले? मग डॉक्टरांनीदेखील खास पळवाटी उत्तर दिलेच "या प्रश्नाबाबत सीमावासियांनी विवेकाने वागावे" ~ म्हणजे काय असा भाव समस्त पत्रकार भावांच्या चेहर्‍यावर उमटला.)

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रश्न

मला एक मूलभूत प्रश्न नेहेमी पडतो.

साहित्यसंमेलनामुळे नेमके काय साध्य होते? किंवा वेगळ्या शब्दात

जर साहित्य संमेलन भरवले नाही तर मराठी साहित्याची नेमकी कोणती हानी होईल?

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

पुस्तकविक्री

बंपर पुस्तकविक्री हा एकमेव फायदा वगळता साहित्य संमेलनांमुळे काही विधायक कार्य होते असे वाटत नाही. मराठी संकेतस्थळांवरील सदस्यांप्रमाणे साहित्यिक लोक एकमेकांची उणीदुणी काढण्यात मग्न असतात. दोन वर्षांपूर्वी प्रभूबाईंनी वयोवृद्ध ज्येष्ठ लेखक हातकणंगलेकरांविरोधात कोर्टात घेतलेली धाव, मागील वर्षी गैरमार्गाने प्रसिद्धी मिळवण्याचा डाव असणारे आनंद यादव यांच्यासारखे लेखक आणि ठाले पाटलांचे कौतिक हे सगळे पाहून साहित्य संमेलनाचे हसू येते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पद नव्हे रसिकांची दाद....!

मराठी संकेतस्थळांवरील सदस्यांप्रमाणे साहित्यिक लोक एकमेकांची उणीदुणी काढण्यात मग्न असतात.
हम्म थोडा सहमत आहे. पण् लेखक मंडळी पाहावयास मिळतात. संवाद साधता येतो. परिसंवाद ऐकता येतात. अशा चर्चा सत्राने विचारांच्या कक्षा रुंदावण्यास मदत होते. प्रतिभावंत मंडळींना पाहून नमस्कार करावासा वाटतो. नवनवीन पुस्तकांचे दर्शन होते. थोडी खरेदी होते. या निमित्ताने साहित्यप्रेमी मित्रांची भेट होते. अशा खूप चांगल्या गोष्टीही संकेतस्थळाप्रमाणे सम्मेलनातही असतात...!
ठाले पाटलांचे कौतिक....
आमच्यासाठी ते आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. मोठमोठ्या साहित्यिकांचा विरोध असूनही भल्या माणसानं विश्वसाहित्य संमेलने भरविली. एक नवा प्रयोग करुन पाहिला. मराठवाड्यात लहानसहान गावात छोटेखानी विभागवार साहित्य संमेलने भरविली. नवलेखकांना बोलण्याची संधी अशा चर्चासत्र आणि परिसंवादात दिली. दर आठवड्याला एका लेखकाची, त्यांच्या साहित्यावर चर्चा घडवून आणली आजही तो प्रयोग आमच्या औरंगाबादेत मसापत [मराठवाडा साहित्य परिषद ]होतो. असो, माणूस काही तरी करतो हे महत्त्वाचे यश-अपयश ही दुसरी गोष्ट.

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्यक्षेत्रातील रसिकांनी दिलेले ते एक मोठे आणि मानाचे पद आहे. साहित्यिक करत असलेल्या साहित्य सेवेची रसिकांनी केलेल्या कदराची ती एक पावती असते. हं..! आता एक गोष्ट खरी की अशी निवड थेट साहित्य रसिकाडून होत नाही. तेवढा भाग सोडला तर असे पद मोठेच आहे. आणि त्या पदावर प्रतिभासंपन्न व्यक्ती पाहणे मला नेहमीच आवडते.

साहित्यसंमेलनात घेतले जाणारे ठराव आणि साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षाला काही किंमत आहे का ?
मला असे वाटते संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरुवात अशा साहित्यसंमेलनाच्या ठरावापासूनच झालेली पाहावयास मिळते. आता येणारे नवनवीन ठराव आणि त्या ठरावांसाठी शासनाकडे करावा लागणारा पाठपुरावा त्यात येणार्‍या अडचणी,भानगडी ही सर्व आता अडथळ्यांची शर्यत झालेली आहे. असे असले तरी एक महाराष्ट्रभर मराठी भाषा बोलणार्‍यांचा तो एक उत्सव असतो आणि अशा उत्सवातील सर्व लेखक,रसिकांसाठी साहित्यसंमेलन एक आनंदाची पर्वणी असते असे वाटते.

-दिलीप बिरुटे

गदगदलो

भलतेच भावुक!

हो ना राव...!

तरी कमी लिहिलं...!

अजून खूप गोष्टी राहिल्या आहेत.
त्या लिहितो नंतर कधीतरी. ;)

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

साहित्य संमेलने

श्री आरागॉर्न यांना माझा सल्ला की त्यांनी एखाद्या साहित्य संमेलनाला हजर राहून सर्व कार्यक्रम ऐकावे. त्यांच्या प्रश्नाचे त्यांनाच उत्तर मिळेल.
चन्द्रशेखर

अनुभूती

एकदम एखाद्या बाबाच्या भक्तासारखे उत्तर वाटते आहे.

एल् ओ एल्

हहपुवा
||वाछितो विजयी होईबा||

प्रत्यक्ष

आतापर्यंत साहित्य संमेलनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नाही हे खरे आहे. घ्यावासाही वाटत नाही हे ही खरेच.
मात्र च्यानेलवर वृत्तांत वगैरे पाहिले आहेत आणि काही वेळा जड शब्दातील भाषणेही* वाचली आहेत. तरीही हा प्रश्न पडला.

* "झपाट्याने बदलणार्‍या एकविसाव्या शतकातील साहित्याच्या अनुभूतींना छेदून जाणार्‍या कक्षा" टाइप.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

मराठी साहित्य वृद्धी

>>> साहित्य संमेलनाला हजर राहून सर्व कार्यक्रम ऐकावे. <<<

२००२ मध्ये पुणे येथे श्री.राजेन्द्र बनहट्टी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या संम्मेलनापासून मी आणि माझे महविद्यालयीन मित्र जाणीवपूर्वक मराठी साहित्य संमेलनाला हजर राहतोच. त्याला कारण साहित्याविषयीचे प्रेम तर आहेच पण त्या निमित्ताने, नोकरी-व्यवसायाच्या कारणास्तव चारी दिशेला गेलेल्या, आम्ही मित्रांनी एकत्र जमायचे हा विचारदेखील आहेच, शिवाय एकाच ठिकाणाहून मनासारखी पुस्तके खरेदी करता येतात. अध्यक्षांच्या भाषणाला ज्यांना थांबावे असे वाटते ते थांबतात बाकीचे त्या त्या शहरातील अन्य साहित्यविषयक घडामोडी पाहत दोन दिवस एकत्रीत काढतात. कवि संमेलनाचा मात्र सर्वानीच धसका घेतला असल्याने त्या तंबूकडे जाणे होत नाही.

इथे हेही सांगणे गरजेचे आहे की, श्री.अरूण साधूंच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले २००७ चे "नागपूर" संमेलन हुकले त्याला काही घरगुती कारण होते, तर मागील सालातील महाबळेश्वरचे टाळले (त्याला कारण अर्थातच "आनंद यादव वाद"). पण अध्यक्षपदावर आरूढ झालेल्या व्यक्तीचे (निवडून येण्यापूर्वी वा आल्यानंतर) संमेलनाबाबत कसलेही आणि कोणतेही मत असले तरी "मराठी साहित्य वृद्धी" साठी अशी संमेलने आवश्यकच आहेत ~~ यातील सर्व डाव्याउजव्या बाजू विचारात घेऊनसुद्धा !

साहित्यिक अध्यक्ष हा गुळाचा गणपती झाला आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदा करता सार्व साहित्यिक गुडघ्याला बाशिंग बांधून तय्यार असतात. पण वरून मात्र मी नाही त्यातली.... अशी त्यांची वर्तवणूक असते. त्यात नावाजलेले साहित्यिकांचे वेगळेच मानापमान असतात. एकदा लोकशाही मान्य करून सुद्धा आम्ही मतांचा जोगवा मागणार नाही अशी फुकटची बढाई मारतात. जोगवा मागणे हे देवीच्या देवळात मानाचे पान समजले जाते. पण यांच्या विद्वान समजुतीनुसार जोगवा म्हणजे भिक मागणे हा अर्थ होतो.
दुसरे म्हणजे साहित्य संमेलने मराठवाडा विदर्भ पासून सर्वदूर महाराष्ट्रात भरत असल्या मुळे मराठी पुस्तकांची विक्री रेकार्ड तोडत मोठ्या प्रमाणात होते. आणि हो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष पदा चे मुंबई पुणे येथील पुस्तक प्रकाशक, वर्तमान पत्रे . विभागवार साहित्य मंडले यांच्यात चांगलेच राजकारण चालते या बातम्यांनी मराठी माणसाची चांगले करमणूक होते.
संमेलनात साहित्या पेक्षा जेवणाची खाण्या-पिण्याचीच राहण्याच्या व्यवस्थेची दैनिक जाण्या-येण्याचा पैशाची कंपूशाही ची जास्त चर्चा होते. आणि आजकाल ही संमेलने परभणी पासून प्रचंड खर्चाची झाल्या मुळे अध्यक्ष पेक्षा प्रायोजित राजकारणी , साखर, शिक्षण, सहकार सम्राटांनी HIGH JACK केल्या मुळे साहित्यिक अध्यक्ष हा गुळाचा गणपती झाला आहे.
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

काही प्रथा

>>> अध्यक्षपदा करता सार्व साहित्यिक गुडघ्याला बाशिंग बांधून तय्यार असतात. पण वरून मात्र मी नाही त्यातली.... अशी त्यांची वर्तवणूक असते. >>>

+ सहमत. मूळ धाग्याचा हाच उद्देश आहे. बाय हूक ऑर बाय क्रूक ते पद मिळवायचे आणि एकदा का मांडवाखालून गेले की त्याबद्दल ओरड करायला एकदम तय्यार !

>>> दुसरे म्हणजे साहित्य संमेलने मराठवाडा विदर्भ पासून सर्वदूर महाराष्ट्रात भरत असल्या मुळे मराठी पुस्तकांची विक्री रेकार्ड तोडत मोठ्या प्रमाणात होते. <<<

असहमत. कारण यापूर्वी मराठवाडा विदर्भात झालेल्या साहित्य संमेलनात (अगदी वर्धा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी संमेलने यशस्वीरित्या पार पडली आहेत असा म.सा.परिषदेचा अहवाल सांगतो) पुस्तकांची पश्चिम महाराष्ट्रात होते तशीच विक्री होते. या विषयावर "ललित" मध्ये जोरदार चर्चा होते आणि मराठवाडा विदर्भातील लेखक/वाचक यांचेही मत काही वेगळे नाही (पुस्तक विक्री व्यवहाराबाबत), त्यामुळे श्री.ठणठणपाळ यांनी याबाबत शहानिशा करावी असे सुचवितो.

>>> संमेलनात साहित्या पेक्षा जेवणाची खाण्या-पिण्याचीच राहण्याच्या व्यवस्थेची दैनिक जाण्या-येण्याचा पैशाची कंपूशाही ची जास्त चर्चा होते. <<<

हे मान्य. पण ही पद्धत फक्त साहित्य संमेलनातच पसरली आहे असे मानू नका. दिल्लीमध्ये विविध खात्यांच्या दिवसाला डझनांनी कॉन्फरन्सेस झडत असतात आणि सचिव पातळीवर चालणार्‍या परिषदातील "जेवण" या गटासाठी तर अगदी आय.ए.एस. पातळीवरील अधिकार्‍यांची नियुक्ती केलेली असते. मंत्री सोडाच पण अत्यंत वरिष्ठ पदावरील शासकीय अधिकार्‍यांच्याही जेवणातील कॅलरीजचे प्रमाण काटेकोरपणे तपासले जाते (टेबलवर ठेवण्यात येणारे पाणीही तज्ज्ञाकडून टेस्ट केले जाते.) आपले साहित्यिक संमेलनात जर विशिष्ट जेवणाचाच वा प्रकाराचा आग्रह धरत असेल् तर त्यांची मागणी अवास्तव मानता येणार नाही.

संमेलने साहित्यिकांसाठी की प्रेक्षकांसाठी?

व्यावसायिक संमेलने बहुतांशी त्या व्यवसायातल्या लोकांनी एकमेकाला भेटण्यासाठी, आणि एकत्रित मागण्या करण्यासाठी असतात.

व्यावसायिक लोकांनी एकत्रित भेटणे हे गरजेचे असते. त्यामुळे संमेलनांना त्या व्यवसायातले लोक जात असतात. साहित्यिकांच्या एकत्रित मागण्या (न मिळणारी रॉयल्टी, शुद्धलेखनाचे नियम, राजकारणी हस्तक्षेप संमेलनात नसणे) असाव्यात. हल्ली याबद्दल फारसा वाद ऐकिवात नाही. पूर्वी कदाचित हे घडत असेल.

हल्लीचे साहित्य संमेलन हे प्रेक्षकांसाठी (पुस्तक विक्री, प्रेक्षकांची उपस्थिती) घडवायचे असे बातम्यांवरून वाटते. असे असल्यास कित्येक इतर कार्यक्रमातूनही हे घडविता येईल त्यास साहित्य संमेलन कशाला हवे? फक्त एक ब्रँड म्हणून त्याचे वेगळे महत्व .

प्रमोद

कोणाच्या खांद्यावर?

व्यावसायिक संमेलने स्वखर्चाने भरविली जातात. (डॉक्टरांची संमेलने औषधकंपन्या भरवितात कारण तेथे डॉक्टर हे त्यांचे उपभोक्ते असतात.) साहित्य संमेलने सरकारी खर्चाने भरतात ना?

शासन कर्तव्य

>>> साहित्य संमेलने सरकारी खर्चाने भरतात ना? <<<

बरोबर ! पण शासनाच्या अनेक कर्तव्यापैकी "मराठी भाषा आणि परंपरेचे जतन" हे आद्य कर्तव्य मानले जाते आणि त्यासाठी प्रत्येक अर्थसंकल्पात तरतूद केलेली असतेच. आता अशा संमेलनांची निष्पती काय हा जरी वादाचा मुद्दा असला तरी शासकीय पातळीवर तो ऐरणीवरील मुद्दा होऊ शकत नाही. शासनाच्या "सांस्कृतीक विभागा" साठी जे बजेट मंजूर असते तीत "ग्रंथालय अनुदान, फाईन आर्टस डेव्हलपमेन्ट, मराठी चित्रपट निर्मिती प्रोत्साहन, विविध कार्यशाळा" अशा अनेक बाबीवर खर्च अपेक्षित असतो. साहित्य संमेलनाला अनुदान देणे हे शासन स्वतःस बंधनकारक मानते.

शिवसेना-भाजप सत्तेच्या काळात मा.बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांना उद्देश्यून (त्यांच्या टिपिकल भाषेत) उदगार काढले होते की, "आमच्याकडून पैसे घेता आणि आम्हालाच मंचावरून शिव्या देता". यावर त्यावेळी जो गदारोळ उठला होता, तीतून जनतेला समजले की, संमेलनाला अनुदान ही शासनाची जबाबदारी मानली जाते. अर्थात मंडपातील मंत्र्यांची डोकेदुखी वाटणारी वाढती उपस्थिती ही बाब या धाग्याच्या कक्षेत येत नाही, त्यामुळे त्यावर काही भाष्य करणे उचीत नाही.

वाचक व साहित्यिक

अनेक संमेलने त्या व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांकरता असतात.

उदाहरण

अनेक संमेलने त्या व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांकरता असतात.
एखादे बरेसे उदाहरण मिळेल का?

प्रमोद

उदाहरण

समजले

समजले. माझ्या डोक्यात असे नव्हते.
आपली साहित्य संमेलने अशी असू शकतात.

प्रमोद

साहित्य संमेलन कशाला हवे? ~~ यासाठी

>>> साहित्य संमेलन हे प्रेक्षकांसाठी (पुस्तक विक्री, प्रेक्षकांची उपस्थिती) घडवायचे असे बातम्यांवरून वाटते. असे असल्यास कित्येक इतर कार्यक्रमातूनही हे घडविता येईल त्यास साहित्य संमेलन कशाला हवे? <<<

"इतर कार्यक्रमातून" म्हणजे नेमका बोध होत नाही. सध्या आपल्या राज्यातील प्रमुख शहरात नित्यनेमाने पुस्तक प्रदर्शने भरविली जातात. त्या त्या शहरातील किती साहित्यप्रेमी तिथे त्यावेळी संयोजकामार्फत आयोजित केल्या जाणार्‍या "साहित्यविषयक" कार्यक्रमाला जातात? जाणारी किती मंडळी पुस्तके विकत घेतात (पाहतात मात्र सर्वजण). त्यातही भगिनीवर्गाची सायंकाळचे ७.३० वाजले की "अनुबंध" चुकेल म्हणून चुळबूळ सुरु ! सध्याच्या केबलच्या युगात "इतर कार्यक्रमाची" व्याप्ती फार संकोचित झाली आहे. 'साहित्य संमेलन" हा एक वार्षिक मेळावा आहे, जिथे हजर राहण्यासाठी "वेल् इन ऍडव्हान्स" आखणी करता येते, खरेदीचे अंदाजपत्रक तयार करता येते. शिवाय मी वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे विविध ठिकाणी विखुरलेल्या "मित्रां"ना या निमित्ताने एकत्र बोलाविता येते, आपल्या आवडीच्या विषयावर संमेलनस्थळी बोलता येते. येणारे संमेलन "ठाणे" येथे होण्याचे घाटत आहे, त्याला अजून काही महिन्याचा अवधी आहेच, पण निव्वळ ठाण्याचे नाव निघताच तेथील दोन मित्रांनी राज्यात व राज्याबाहेर असणार्‍या सात ठिकाणाच्या मित्रांना "आलेच पाहिजे" असे हक्काचे आमंत्रण आत्ताच देऊन ठेवले आहे. आखणी करायला भरपूर वेळ असल्याने इथे अशा प्रसंगी वेळ नाही म्हणून "नकार" देण्याचा प्रश्न येत नाही. ~~ किमान अशा कारणासाठी तरी साहित्य संमेलन हवेच हवे.

इतर कार्यक्रम

पुस्तक प्रकाशन समारंभ, साहित्यिकांची भाषणे (संवाद वा इतर कार्यक्रम), कवि संमेलन, याशिवाय वाहिन्यांवरच्या मुलाखतीवजा कार्यक्रम असे घडत असतात.

तुम्हाला या संमेलनाचा आस्वाद घेता येतो यात काही नवल नाही. (माफ करा तुम्हाला साहित्यिक म्हटले नाही.) साहित्यिकांना यातून काय मिळते ते महत्वाचे. तर ते साहित्यसंमेलनांना येतील. सध्या तरी प्रसिद्धी (अध्यक्षास) मिळते हे नक्की. आणि हेच जर फलित असेल तर प्रसिद्धीलोलूप व संघटनकौशल्य असणार्‍यांची तिथे रेलचेल असेल हे साहजिक नाही का.

एक व्रँड म्हणून साहित्य संमेलन आज यशस्वी (?) आहे. त्यामुळे काही वजनदार साहित्यिक आस्थेने जातात. (माझी माहिती फार तोकडी आहे.) . पण हाच ब्रँड अध्यक्षपदासाठी स्पर्धात्मकता आणून घात करतो आहे. लोकांचे लक्ष वेधून घेणारा साहित्यिक असल्याने लोकांचा त्रागा भोगतो आहे (वारकरी). राजकारण्यांना (साहित्यात रस नसलेल्या), मंचावर आणतो आहे. तुमच्या मूळ प्रश्नाचा गाभा इथे आहे का?

प्रमोद

गाभा

>>> पुस्तक प्रकाशन समारंभ, साहित्यिकांची भाषणे (संवाद वा इतर कार्यक्रम), कवि संमेलन, याशिवाय वाहिन्यांवरच्या मुलाखतीवजा कार्यक्रम असे घडत असतात. <<<

मान्य. छोट्या छोट्या शहरात ही प्रथा (क्रमांक २) अल्प प्रमाणात का होईना अजून चालू आहे, पण तिथे "पुस्तक प्रदर्शन" हा प्रकार नसतो. पुस्तक प्रकाशन समारंभ, मला वाटते फक्त पुणे-मुंबई या महानगरातच होत असावेत. कारण मराठीतील ८०% प्रकाशक या दोन शहरातच आढळतात. अन्यत्र होत असतील तर तेथे प्रकाशित पुस्तकच तुम्हास घेता येते. "कवि संमेलन" ही प्रथा तर मृतावस्थेतच आहे.

>>> तुमच्या मूळ प्रश्नाचा गाभा इथे आहे का? <<<

मी आपल्या "एक व्रँड म्हणून साहित्य संमेलन" या विधानाला दुजोरा देतो, तो एवढ्यासाठी की चला त्या निमित्ताने का होईना हजारो लोक एका मांडवाखाली जमतात, दोन्-तीन दिवस नेहमीच्या धकाधकीस विसरतात आणि संमेलनाचे सूप वाजल्यानंतर परत नेहमीच्या रामकहानीस जुंपून घेतात. आस्थेने संमेलनास जाणार्‍या "वजनदार साहित्यिक" संख्येत लक्षणीय घट होत चालली आहे. कारण हा गट "जात" नाही तर "नेला" जातो आणि नेणारे असतात तितकेच वजनदार प्रकाशक. खरे पाहिले तर आजकाल ही प्रकाशक मंडळी आणि साखर कारखान्यांचे हुकूमशहा मालक हेच कोण सोम्या वा गोम्या यंदाचा अध्यक्ष झाला पाहिजे हे ठरवितात. कोल्हापुरात "शिक्षणमहर्षी (?)" डॉ.डी.वाय.पाटील यांनी आणि त्यांच्या संमेलन निमंत्रक पिलावळीने "रमेश मंत्री" हेच अध्यक्ष झाले पाहिजे तरच संमेलन अशी लोकशाही तत्वाची उघडउघड पायमल्ली करणारी भूमिका घेऊन म.सा.प.ला एक प्रकारे धमकीच दिली होती आणि पैशाच्या व राजकारणाच्या हल्ल्यापुढे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा रात्रंदिन घोष करणारी चूप बसली होती. गेल्या वर्षी झालेल्या सांगलीच्या संमेलनातदेखील सांगलीचेच "म.दा.हातकणंगलेकर" अध्यक्ष नसतील तर सहकार्य करायचेच नाही असा पवित्रा स्थानिक समितीने घेतला होताच. आता तर ही प्रथाच होऊन बसणार आहे, कारण राजकारण्यांना "आपल्या भागात" आम्ही काही तरी करतोय हे दाखविण्याची सुरसुरी असतेच.

दुर्दैवाने ज्यांना आज आपण "प्रतिष्ठित वा वजनदार साहित्यिक" समजतो तेदेखील आयुष्यात एकदा ते "अध्यक्षपद" आपणास मिळावे अशी कामना करीत असतातच आणि मूकपणे "क्रियेटर्स्" च्या हालचालीना पाठिंबा देत असतात.

असे असले तरी त्यांच्यासाठी नाही तर निदान स्वानंदासाठी तरी संमेलनाला एक दिवसाची का होईना हजेरी लावावी असे एक वाचक या नात्याने मी मानतो.

'साहित्य संमेलन म्हणजे बैलबाजार..'

मराठी साहित्य संमेलन म्हणजे बैलबाजार आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तसे ते पत्रकारांनाही घुबड, गांडुळे म्हणाले होते. त्यावेळी त्यांच्या त्या उपमांवरून गदारोळ उडाला होता, पण ठाकरे यांचे निरीक्षण मार्मिक आणि पटण्यासारखेच आहे.

प्रतिक देसाई यांनी आपल्या प्रतिसादात समर्पक मुद्दा मांडला आहे. रमेश मंत्रींसारखा पाचकळ आणि रद्दी लिहिणारा लेखक 'मी कोल्हापूरचा भूमिपुत्र' म्हणून तेथील राजकारण्यांच्या मदतीने साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो आणि इंदिरा संत यांच्यासारख्या थोर विदुषीला माघार घ्यावी लागते, यासारखे दुर्दैव नाही. अनेक थोर साहित्यिक त्या धुळवडीपासून लांब राहातात तेच बरे आहे.

शेवटी साहित्य संमेलनसुद्धा एक जत्रा आहे. जत्रेत विविध लोक विविध हेतूंनी भाग घेत असतात. भाविकांना देवदर्शन घ्यायचे असते. दुकानदारांना दुकाने लावायची असतात. प्रतिष्ठितांना मिरवायची हौस असते. पुजारी आणि पालखी वाहणार्‍यांची लगबग सुरु असते. मानापानाचे कलगीतुरे सुरु असतात. या सगळ्यात काही जण निवांत भटकायला आलेले असतात. असो. प्रत्येकाचा विरंगुळा.

?

गैरमार्गाने प्रसिद्धी मिळवण्याचा डाव असणारे आनंद यादव

????

 
^ वर