ग्रामीण विकास व निवडणुकांतील यशापयश

वरील विषयावरील स्वामिनाथन अय्यर यांचा "ग्रामीण विकास, निवडणुकांत यश मिळवून देऊ शकत नाही." हा लेख वाचनात आला.

लेखातील ठळक/लक्षवेधी मुद्दे :

  • एकूण सत्ताधारी पक्षांपैकी केवळ २०% पक्षच पुन्हा निवडून दिले जातात.
  • भाजप २००४ च्या निवडणुका "ग्रामीण भागाकडे दुर्लक्षिल्याने" हरला हा निष्कर्ष खोटा भासवणारी आकडेवारी उपलब्ध आहे.
  • गेल्या दशकाभरातला ग्रामीण विकासाचा दर शहरी भागा इतकाच किंवा अधिक होता.
  • भारतात एखादा किंवा काही महिने अन्न मिळू शकत नाही अशा परिस्थितीत असणार्‍या कुटुंबांची संख्या आजही २.६% आहे. (जी या आधी ५.६% होती.)
  • अशी टक्केवारी सर्वाधिक असणार्‍या बंगाल (१०.६%) व ओरिसा (४.८%) मध्ये सत्ताधारी पक्षच पुन्हा निवडून आले. ही टक्केवारी सर्वात कमी असणार्‍या हरियाणात मात्र सत्तापालट झाला.
  • केरळ व तामिळनाडू चे सामाजिक/ आर्थिक प्रगतीचे निर्देशक सर्वोत्तम असतानाही तिथे सत्तापालट नियमित आहे.

निष्कर्षः मतदाता प्रामुख्याने ग्रामीण असणार्‍या भारतीय राजकारणाची समीकरणे मात्र आजही जाती/धर्म व आघाड्याच निश्चित करतात.

१. वरील निष्कर्ष आपल्याला पटला का?
२. वरील पैकी (वा लेखातील) कोणती माहिती आपल्याला सर्वाधिक अपेक्षित किंवा धक्कादायक/न पटणारी वाटली?

Comments

माझे मत

वरील सर्व निष्कर्ष मला पटले. धक्कादायक असे काहिच वाटले नाही.


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

लोकशाहींतील सत्ता व कार्य यांचा संबंध

साधारणपणे असे आढळून येते की लोकशाहींत नकाराधिकाराला महत्त्व असल्यामुळे सत्ता हातांत असल्यावर कार्य करता येईलच असे नाही. म्हणूनच कुठल्याही पक्षाच्या सरकारला जाहीरनाम्यांतील आश्वासने पूर्ण करता येत नाहीत. त्याचप्रमाणे कार्य केल्याने निवडणुकींत विजय मिळेलच असे नाही. कित्येकदा प्रस्थापितांविरुद्धचा असंतोष (अंटी इन्कम्बन्सी फॅक्टर) महत्त्वाचा ठरतो. निवडणुका लाटेवर जिंकल्या जातात. निवडणूक हमखास जिंकायची असेल तर एखादी लाट निर्माण करता यायला हवी. ही लाट धर्माभिमान, भाषाभिमान, तरुणाई, व्यक्तिपूजा, वा इतर कशाही प्रकारची असू शकते.

बिग फाइट

काही दिवसांपूर्वी एनडीटीव्ही च्या बिग फाइट या कार्यक्रमात अमरसिंहानी चंद्राबाबू नायडू आणि भाजप आघाडी सरकारचे उदाहरण देऊन असेच काहीसे मत मांडले होते. त्यांनी (लोकलज्जेस्तव केलेला) थोडाफार विकास, या विकासाची माहिती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी मार्केटिंग (ब्रँड अँबॅसिडर्स, अमिताभ बच्चन उ.प्र.चे ब्रँड अँबॅसिडर आहेत.), खोटे बोलणे (हो, 'यू हॅव टू लाय' अश्या अर्थाचे वाक्य ते जाहीरपणे म्हणाले) आणि 'सोशल इंजिनियरिंग' ('जातीयवादाला' दिलेले गोंडस नाव) ही निवडणू़क जिंकण्यासाठीची चतु:सुत्री सांगितली.

लेखाविषयी

निष्कर्षः मतदाता प्रामुख्याने ग्रामीण असणार्‍या भारतीय राजकारणाची समीकरणे मात्र आजही जाती/धर्म व आघाड्याच निश्चित करतात.

बिमारू राज्यात हे काहीप्रमाणात खरे असले तरी महाराष्ट्र व दक्षिण भारतीय राज्यात याशिवाय इतर कारणे जास्त प्रभावी आहेत असे वाटते. (वीज, पाणी, रस्ते, शेतमालाचा भाव इ. व्यावहारिक मुद्दे जातीधर्मापेक्षा महत्वाचे वाटणे, प्रतिस्पर्धी अमेदवार एकाच जातीचे किंवा समांतर विचारसरणी असलेल्या पक्षांचे असणे इ. कारणांमुळे)

मूळ लेखात ज्या सर्वेक्षणाचा आधार घेतला आहे त्यातील विकासाठी वापरलेले निकष फारच अपुरे वाटतात. दरडोई उपलब्ध वीज, पाणी, रस्ते, इतर सोयी-सुविधा, साधने असे सर्वंकष निकष वापरले तर ग्रामीण भागाचा विकास शहरांच्या तुलनेत अगदीच कमी झाला आहे हे दिसून येते. त्यामुळेच अजूनही मोफत वीज, पाणी, किंवा टिव्ही, सायकल सारखी साधने हीच ग्रामीण मतदारांना देण्यात येणारी आश्वासने आहेत.

इटली

इटलीत ५० एक वर्षात ५२ वगैरे पंतप्रधान झाले असे ऐकून आहे. इटलीच्या आर्थिक प्रगतीला याने खीळ बसली नाही असे दिसते. आजही इटली जी-८ मधे आहे हे पाहता याविषयीचा विदा देखील आर्थिक प्रगती - सत्तापालट विषयावर प्रकाश पाडू शकेल. उपक्रमींनी याबद्दल माहिती असल्यास द्यावी.

(भारतातील राजकारणाच्या विश्लेषणासाठी इटली कडे पाहणे पोलिटीकली इनकरेक्ट ठरणार नाही असे वाटते ;)

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

३७

इटलीमध्ये १९५३पासून ३७ पंतप्रधान झाले आहेत. ह्याचा अर्थिक प्रगतीवर कसा परिणाम झाला हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. माझ्या मते इटलीच्या आर्थिक प्रगतीमध्ये पर्यटनासारख्या गोष्टींचा वाटा आहे ज्यामधून सरकारला बराच फायदा होतो.

अवांतर :
(भारतातील राजकारणाच्या विश्लेषणासाठी इटली कडे पाहणे पोलिटीकली इनकरेक्ट ठरणार नाही असे वाटते ;)
सहमत आहे. याशिवाय सध्या युरोप आणि भारत यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील सहकार्यासाठी बरेच नवीन कार्यक्रम सुरु केले आहेत.

 
^ वर