महागाई, मध्यवर्ती सरकार व कृषी मंत्रालय

भारतात दोन प्रकारचे निर्देशांक, सरकार दर महिन्याला घोषित करत असते. त्यातल्या एकाला WPI (Wholesale Price Index) किंवा ठोक किंमतीचा निर्देशांक असे म्हटले जाते. या शिवाय CPI (Consumer Price Index) किंवा उपभोक्ता किंमतीचा निर्देशांक हा ही दर महिन्याला जाहीर केला जातो. यापैकी WPI हा निर्देशांक दर आठवड्याला भारत सरकारचे उद्योग मंत्रालय प्रसिद्ध करते. यात अन्नधान्यापासून ते कापूस, शेंगदाणे यासारखी कृषी उत्पादने, खनिजे, लोखंड, काचा, सुती व कृत्रिम वस्त्र धागे, कागद, कणीक, साखर, या सारखी उपभोक्ता उत्पादने व वीज दर, पेट्रोल, गॅस या सारखी उर्जा साधने या सर्वांची खिचडी असते. या सर्व गोष्टींचे या निर्देशांकामधे काय प्रमाण असते ते मंत्रालय त्या गोष्टीच्या एकूण उपभोगाप्रमाणे ठरवते. हा किंमतींची माहिती हे मंत्रालय फक्त चार महानगरांच्यातूनच मिळवते. प्रवास, बॅंकांचे दर, इंन्शुअरन्स आणि वैद्यकीय सेवांचे दर या निर्देशांकामधे नसतातच. या सगळ्यावरून हे स्पष्ट व्हावे की हा WPI आणि उपभोक्त्याला बाजारात ज्या किंमतीला तोंड द्यावे लागते त्याचा एकूण तसा काही फारसा संबंध असत नाही. बाजारात सर्वसाधारणपणे किंमतीची पातळी काय आहे? एवढेच काय ते यावरून आपल्याला समजू शकते.

बाजारात उपभोक्ता किंमती काय आहेत यासाठी भारत सरकारचे श्रम मंत्रालय, CPI-IW (Consumer Price Index for Industrial Workers), CPI-AL ( for agricultural labourers) आणि CPI-RL ( rural labourers) असे तीन उपभोक्ता निर्देशांक प्रसिद्ध करते. या तीन निर्देशांकात अशा उपभोक्ता किंमती विचारात घेतलेल्या असतात की ज्या त्या वर्गातील मजूरांच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. आता हा निर्देशांक काढताना मूळ आधार म्हणून कोणते वर्ष घेतले जाते? माहिती कोठून मिळवली जाते? वगैरे गोष्टी श्रम मंत्रालयालाच माहीत असाव्यात. तसेच हे निर्देशांक दोन महिन्याच्या कालानंतर प्रसिद्ध होत असतात. या व्यतिरिक्त भारत सरकार Food Price Index व Fuel Price Index म्हणून आणखी दोन निर्देशांक आता प्रसिद्ध करू लागले आहे. या सर्व निर्देशांकाच्यातला कोणता निर्देशांक आपण संदर्भ म्हणून विचारात घ्यायचा हाच प्रश्न आहे.
हे इतर निर्देशांक व WPI यांच्यात प्रचंड तफावत दिसते. WPI मागच्या सप्टेंबर महिन्यात -2% टक्के होता तो आता 10% आहे तर अन्नधान्य किंमती निर्देशांक याच कालात 11% पासून 17% परत वाढून आता 14 % आहे. या सगळ्या विवेचनावरून एक गोष्ट मला तरी अगदी स्पष्ट होते आहे. बाजारात सर्व वस्तूंच्या किंमती वाढत आहेत का कमी होत आहेत हे यापैकी कोणताच निर्देशांक स्पष्टपणे सांगू शकत नाही.त्यातल्या त्यात अन्नधान्य निर्देशांक आपल्याला थोडी फार कल्पना अन्नाबद्दल तरी देऊ शकतो आहे.
मागच्या वर्षी जेंव्हा जगभर आर्थिक मंदीची लाट पसरली होती. व्यापार कमी झाला होता त्या वेळेसही हा अन्नधान्य निर्देशांक 10 टक्के होताच. याचा अर्थ असा होतो की त्या वेळेसही अन्नधान्याच्या किंमती दर महिन्याला 10% वाढतच होत्या. बाकी सर्व उत्पादनांच्या किंमती 2 % घटलेल्या असताना अन्नधान्यांच्या किंमती 10% कशा वाढू शकत होत्या या मागचे कारण तरी काय असावे बरे? आणि या किंमती सरकारने वाढू कशा काय दिल्या? त्या रोखण्यासाठी प्रभावी पावले सरकार किंवा रिझर्व बॅंक यानी का उचलली नाहीत? असा विचार मी करू लागलो व त्याचे अगदी सोपे उत्तर माझ्या समोर आले.
अन्नधान्य किंमत निर्देशांक हा WPI या निर्देशांकाचा जरी एक भाग असला तरी प्रत्यक्षात या दोन्ही निर्देशांकात जी वाढ होते आहे त्याची कारणे व या कारणांना जर कोणी जबाबदार असलेच तर त्या संस्था किंवा व्यक्ती संपूर्णपणे भिन्न आहेत. त्यामुळेच या दोन्ही निर्देशांकांची गल्लत न करता त्याचा स्वतंत्रपणे विचार करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते. त्यामुळे प्रथम WPI मधल्या -2% ते 10% या वाढीचा विचार आपण करू.
अर्थशास्त्रातला एक अगदी मूलभूत सिद्धांत वस्तूंच्या किंमतीबद्दल आहे. या सिद्धांताप्रमाणे वस्तूंच्या किंमती या मागणी व पुरवठा यांच्यातल्या तफावतीवर अवलंबून असतात. मागच्या वर्षी जेंव्हा सर्व जगभर आर्थिक मंदी आली होती तशीच ती भारतातही आली होती. आर्थिक वाढीचा वेग 5 तक्क्यांपर्यंत मंदावला होता. कृषी क्षेत्र सोडून बाकी सर्वच क्षेत्रांमधले उत्पादन घटल्याने बाजारातील एकूण मागणीच घटली होती. या घटलेल्या मागणीचा परिणाम म्हणून वस्तूंच्या किंमती खाली येण्यास सुरवात झाली व म्हणून WPI -2% पर्यंत घसरला. आर्थिक वाढीच्या मंदावलेल्या वेग परत पूर्ववत करण्यासाठी भारत सरकारने एक मोठा कार्यक्रम हातात घेतला. व्याज दर कमी करणे या सारख्या आर्थिक उपायांबरोबरच रस्ते, दळणवळण यासारख्या पायाभूत सोयी निर्मितीसाठी सरकारने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कामे सुरू केली. या कामांमुळे अनेक कंपन्यांना कामे मिळाली व एकूणच अर्थव्यवस्थेवर याचा चांगला परिणाम 3,4 महिन्यांतच दिसून येऊ लागला व आर्थिक वाढीचा दर परत 7 टक्क्याच्या पुढे गेला. याचा परिणाम अर्थातच बाजारातील मागणी वाढण्यात झाला व वस्तूंच्या किंमती वाढू लागल्या. इतर वेळी सरकारने किंमती वाढू नयेत म्हणून व्याज दर वाढवणे, बाजारातील अतिरिक्त पैसे कमी करणे यासारखी पाऊले उचलली असती. परंतु सुरू झालेली आर्थिक वाढ परत मंदावण्याची शक्यता नजरेसमोर असल्याने सरकारला या बाबतीत एक प्रकारची असहाय्यता जाणवत असली पाहिजे. सरकारने हातात घेतलेल्या अतिरिक्त कामांमुळे त्याचा कर्जबाजारीपणा नकीच वाढला असणार. या कर्जावर साधारणपणे (इंग्लंड, स्पेन, ग्रीस या देशांनी केला तसा) खर्च कमी करणे हा उपाय आहे. परंतु भारताच्या बाबतीत एकूण कर्जबाजारीपणा नियंत्रणाच्या बाहेर गेलेला नसल्याने सरकारने काहीच पावले आतापर्यंत तरी उचलली नाहीत असे दिसते. सरकार कोणतेच कठोर उपाय करण्याच्या परिस्थितीत नसल्याने उपभोक्त्यांना वैयक्तिक पातळीवरच या महागाईचा सामना करावा लागेल असे दिसते.
आता आपण वळूया कृषी उत्पादनांच्या किंमतींच्याकडे.
प्रथम गेल्या 3,4 वर्षातल्या भारतातल्या अन्नधान्य उत्पादनाकडे एक नजर टाकली तर असे लक्षात येते की 2006-07 मधे अन्नधान्यांचे उत्पादन 21.7 कोटी टन होते. 2007-08 मधे ते 23 कोटी टन, 2008-09 मधे 23.4 कोटी टन होते. मागच्या वर्षी(2009-10) भारताच्या मोठ्या भागात तीव्र दुष्काळ पडला होता. तरी सुद्धा हे उत्पादन 21.8 कोटी होण्याचा सरकारने केलेला अंदाज आहे. याच वर्षी गव्हाचे उत्पादन 2008-09 च्या विक्रमी 806.8 लाख टनावरून वाढून 809.8 लाख टन होण्याचा अंदाज आहे.
2006-07 मधे भारताने 62411 कोटी, 2007-08 मधे 79039 कोटी तर 2008-2009 मधे 85961 कोटी रुपयांची कृषी उत्पादने निर्यात केली. तर याच कालात 29637,29906,36736 कोटी रुपयाची कृषी उत्पादने आयात केली. हे सगळे आकडे मी अशासाठी दिले आहेत की मागच्या एक वर्षात भारतात कोणत्याही अन्नधान्याची काही मोठी तूट दिसते आहे असे मला तरी वाटले नाही. त्यामुळे पुरवठा योग्य असताना व मागणीत कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नसताना अन्नधान्याच्या किंमती दर महिन्याला प्रथम 10%ने व नंतर 17%ने का वाढत राहिल्या? या गौडबंगालाचे रहस्य तरी काय आहे?
भारत सरकारचे कृषी मंत्रालय म्हणते की त्यांचे ध्येय कृषी उत्पादकाच्या शेतमालाला रास्त भाव मिळवून देणे हे आहे. या पार्श्वभूमीवर, हे ध्येय गाठण्यासाठी हे मंत्रालय कृषी उत्पादनाच्या किंमती सतत वाढत्या राहतील अशी धोरणे आखते आहे असे आपण समजायचे का?
या वर्षीच्या मे महिन्यात कांद्याचे उत्पादन खूपच आले असताना व आंतर्राष्ट्रीय बाजारात कांद्याला चांगली किंमत असताना सरकारने अचानक निर्यात बंदी आणली. परिणामी असंख्य कांदा उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागला. एप्रिल महिन्यात हीच परिस्थिती कापसाची झाली होती. कधी नव्हे तर आंतर्राष्ट्रीय कापसाच्या किंमती वर गेल्या होत्या. त्याच वेळेस भाव वाढू नयेत म्हणून सरकारने निर्यात बंदी आणली. सध्या साखर कारखान्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात साखरेचे साठे झाले आहेत. कित्येक टन साखर पावसाच्या पाण्यात विरघळून जाते आहे. तरी खुल्या बाजारात साखर इतक्या कमी साखरेचे वितरण होते आहे की भाव खाली जाऊच शकत नाहीत. 2 वर्षापूर्वी आंतर्राष्ट्रीय बाजारपेठेतून अतिशय महाग किंमतीला सरकारने गहू आयात केला होता. त्या वेळेस कृषी मंत्र्यांच्यावर झालेली टीका वाचकांना आठवत असेल.
मी कृषी तज्ञ नाही किंवा व्यापारीही नाही. मला या खरेदी विक्रीतले फारसे कळतही नाही. त्यामुळे कृषी मंत्रालय हे असले निर्णय का घेते यावर काहीही मल्लीनाथी करण्याची माझी पात्रता आहे असे मला वाटत नाही. तरीही कृषी उत्पादनांच्या किंमती का सतत वाढत्या ठेवल्या जात आहेत याची दोन कारणे मला दिसतात. ती बरोबर असतील किंवा चूकही असू शकतात. धान्यांपासून मद्यार्क बनवण्याच्या प्रक्रियेला कृषी मंत्रालयाने दाखवलेला हिरवा कंदिल हे याचे एक महत्वाचे कारण मला वाटते.हा मद्यार्क बनवणार्‍या कारखान्यांना महाराष्ट्र सरकार 5000 कोटी रुपये सबसिडी देणार आहे हे किती लोकांना माहिती आहे. अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली तर लोकांना दारू द्यावी असा विचार याच्या मागे आहे की काय अशी सुद्धा शंका घेता येईल. आता हे मद्यार्क बनवणारे कोण आहेत हे मी सांगण्याची जरूरी आहे असे मला तरी वाटत नाही.
शेतमाल किंवा कृषी उत्पादनांच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकर्‍यांचा फायदा होत नाही हे एखादा लहान मुलगाही सांगू शकेल. प्रत्यक्षात शेतकर्‍यांना ज्या किंमती शेतमालाच्या मिळतात त्या दलाल व अडते ठरवतात. दर्शनी रित्या या मालाचा मार्केट यार्डात लिलाव केला जातो. परंतु हा लिलाव करताना अडते व खरेदीदार यांच्यात गुप्तपणे व्यवहार होतात. शेतकर्‍याला लिलावाची किंमत कळतच नाही. त्याला अडता सांगेल तीच किंमत मिळते. अन्नधान्यांच्या सतत वाढणार्‍या किंमतींनी छोटे शेतकरी सधन होत असण्याची शक्यता फार कमी वाटते.
शेतमालाच्या सतत वाढणार्‍या किंमतींचा फायदा बडे शेतकरी व अडते यांनाच होत असला पाहिजे. मध्यवर्ती सरकार व राज्य सरकारातील राज्यकर्ते व ही सगळी मंडळी यांची काय नातीगोती आहेत हे मला तरी सांगणे शक्य नाही. एक गोष्ट नक्की या वाढत्या किंमतीमुळे बडे शेतकरी व अडते हे लोक नक्की गब्बर होत असले पाहिजेत. धान्यांपासून दारू बनवणार्‍यांना या वाढीव किंमतीची झळ सबसिडीमुळे बसणार नाही हे नक्की. मद्यार्क बनवण्यामुळे धान्यांची मागणी तर वाढणार. पुरेसा पुरवठा नसला तर किंमती या वाढणारच.
(माझ्या ब्लॉगवरील नवीन ब्लॉगपोस्ट मधील महत्वाचा भाग येथे दिला आहे. ज्यांना संपूर्ण लेख वाचावयाचा असेल ते येथे वाचू शकतात.)

लेखनविषय: दुवे:

Comments

शंका

मागच्या वर्षी जेंव्हा जगभर आर्थिक मंदीची लाट पसरली होती. व्यापार कमी झाला होता त्या वेळेसही हा अन्नधान्य निर्देशांक 10 टक्के होताच. याचा अर्थ असा होतो की त्या वेळेसही अन्नधान्याच्या किंमती दर महिन्याला 10% वाढतच होत्या.

१० टक्के वाढ ही प्रतिवर्षी असेल प्रतिमाह नव्हे, कृपया खात्री करा.

तरीही कृषी उत्पादनांच्या किंमती का सतत वाढत्या ठेवल्या जात आहेत याची दोन कारणे मला दिसतात.

धान्यविक्रीतून अधिक फायदा मिळविण्यासाठी धान्यांच्या किंमती वाढत्या ठेवल्या जात आहेत हे एक कारण समजले. दुसरे कारण काय आहे?
धान्यांच्या किंमती मुद्दाम वाढविल्यामुळे दारू उत्पादनाला फायदा होईल असे काही आपण सूचित करत आहात का?

मद्यार्क बनवण्यामुळे धान्यांची मागणी तर वाढणार. पुरेसा पुरवठा नसला तर किंमती या वाढणारच.

किंमतीतील ही वाढ पॅसिव प्रकारची (मुद्दाम नसलेली) आहे. माझ्या वरील प्रश्नाचे ते उत्तर नाही असे वाटते. शिवाय मद्यनिर्मितीसाठी वापरल्या गेलेल्या धान्याचे प्रमाण कमी आहे.

हा मद्यार्क बनवणार्‍या कारखान्यांना महाराष्ट्र सरकार 5000 कोटी रुपये सबसिडी देणार आहे हे किती लोकांना माहिती आहे.

ती सबसिडी नसून अबकारी करातील सवलत आहे.

आता हे मद्यार्क बनवणारे कोण आहेत हे मी सांगण्याची जरूरी आहे असे मला तरी वाटत नाही.

निर्माण या संस्थेने बरीच माहिती जमविलेली आहे. बरेच कारखाने राजकारण्यांचे आहेत.

निर्देशांक

सर्व निर्देशांक इयर टू इयरच असतात

मद्यार्क बनवण्यासाठी धान्य वापरले गेले की त्याची मागणी वाढते. मागणी वाढली व पुरवठा कमी असला की किंमती वाढतात.
अबकारी करातील सवलत ही एक प्रकारची सबसिडीच आहे.

चन्द्रशेखर

फरक

जर सवलत दिली नाही तर धान्यापासून दारू बनविण्यास कोणी तयार होणार नाही असे सरकारचे मत आहे. जर दारूच बनली नाही तर शून्य कर मिळेल. सवलत दिली तर थोडेतरी पैसे सरकारला मिळतील. म्हणजे येथे करदात्यांच्या पैशातून सबसिडी नाही.

मद्यार्क बनवण्यासाठी धान्य वापरले गेले की त्याची मागणी वाढते. मागणी वाढली व पुरवठा कमी असला की किंमती वाढतात.

एकूण धान्याच्या काही टक्केच धान्य दारूसाठी वापरले गेले आहे.

दुख तो अपना साथी है...

चंद्रशेखरजी,
छान लिहिलंय तुम्ही. महागाई वाढण्याची कारणे कृत्रिम आहेत आणि त्यात कुणाचे हितसंबंध कसे गुंतले आहेत, हे सर्वसामान्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. भाववाढीच्या कारणांत आणखी काही गोष्टींचा समावेश होऊ शकेल.
१) अन्नधान्य खरेदी-विक्रीमधील अमाप फायदा लुटण्यासाठी अनेक बड्या कंपन्या या व्यवहारात उतरल्या आहेत.
२) कमोडिटी एक्सचेंजवर होणार्‍या वायदे व्यवहारांमुळे आणि सट्ट्यामुळे बाजारात कृषिमालाच्या किंमतीत अनैसर्गिक वाढ होत आहे.
३) व्यापारी करत असलेल्या साठेबाजीचा आवाका वास्तवात प्रचंड आहे, पण त्यातील फारच थोडी प्रकरणे उजेडात येत आहेत. हिमनगाचे टोक म्हणा ना.
४) देशाचा कारभार जनतेने ज्यांच्या हातात सोपवला आहे त्या व्यक्ती विश्वसनीय नाहीत. त्यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ तुटलेली आहे. त्यांना केवळ पैशांची भाषा समजते.

आता 'राही मनवा दुख की चिंता क्यूं सताती है? दुख तो अपना साथी है' ही तीव्र निराशा बहुतेक भारतीयांनी स्वीकारली आहे.

इंटुक अर्थ पंडितांच्या मते

>>> बाजारात सर्व वस्तूंच्या किंमती वाढत आहेत का कमी होत आहेत हे यापैकी कोणताच निर्देशांक स्पष्टपणे सांगू शकत नाही. <<<

ज्या उद्योग मंत्रालयाद्वारे बाजारातील चढउताराचे निर्देशांक प्रसिद्ध केले जातात त्याना कारणमीमांसा देता येत नाही, थोडक्यात "आज पश्चिम महाराष्ट्रात तापमान ३५ डिग्री सेल्शीयस होते तर विदर्भ ४५ ने होरपळून निघाला" असे ज्यावेळी हवामानखात्यातर्फे बुलेटीन आकाशवाणीकडे पाठविले जाते तीत कारणमीमांसा नसते, तद्वतच उद्योग असो वा श्रम, या दोन्ही खात्यांना परिस्थितीवर "टिपणी" करण्याचा अधिकार नाही, जो "अर्थ" खात्याला असतो. पण लेखक श्री.चंद्रशेखर म्हणतात त्याप्रमाणे निर्देशांकाच्या हेलकाव्यात अनेक छुप्या बाबी असू शकतात ज्या मध्ये मध्यवर्ती सरकारातील कित्येक घटकांना मलिदा मिळत असतो. मद्यार्काला मिळू घातलेली एक्साईज मधील सवलत हा त्यातीलच एक लक्षणीय घटक आहे. (श्री.रिकामटेकडा म्हणतात त्याप्रमाणे ती सबसिडी नसून सवलत आहे ~~ अर्थ मंत्रालय ज्यावेळी एखाद्या बाबीसाठी "सबसिडी" जाहीर करते तेव्हा ती "इररिव्होकेबल" असते, मात्र सवलत किंवा "कन्सेशन" हे त्या त्या परिस्थितीपुरते असते, जे केव्हाही रद्दबातल केले जावू शकते. उदा. पूरग्रस्तासाठी मदतीबरोबर त्या भागातील विद्यार्थी वर्गाला खास "सवलत" त्या वर्षापुरती जाहीर केली जाते, पण ती "सबसिडी"च्या व्याख्येत येत नाही.)

"निर्देशांक" ची भेडसावणारी छाया ही प्रामुख्याने भारतातील दोनच घटकांशी संबंधीत आहे, जिला आर्थिक व्याख्येत (अलिखीत स्वरूपात) "इंडिया" व "भारत" असे संबोधतात. आजची आर्थिक परिस्थिती खरोखरी अशीच आहे की, जी जनता "इंडिया"त राहते त्यांनाच फक्त निर्देशांकाच्या चढउतारात "दिलचस्पी" आहे कारण या समाजात येतात ते इंडियातील् मोठे उद्योगपती, वरच्या वर्गातील नोकरशहा, ब्रोकर्स, बँकर्स, सट्टेबाज आणि आयटीशी निगडीत इंटुक ! "इंडिया" त राहणारा हा वर्ग श्रीमंतीकडून अधिक श्रीमंतीकडे जात आहे तर ब"भारता"त राहणारा वर्ग ज्यात प्रामुख्याने शेतकरी आणि कामगार येतात ते गरीबीकडून गरीबीकडे वाटचाल करीत आहे, कारण "निर्देशांका"चा फटका बसतो तो याच घटकाला. एखादे वेळेस निर्देशांक सावरला असे ज्यावेळी अर्थ खाते म्हणते त्यावेळी त्याचा फार मर्यादित अर्थ अपेक्षीत आहे, म्हणजे बाजार कुटुंबाला लागणारा सर्व प्रकारच्या धान्याने ओसंडून वाहत आहे, मात्र त्यासाठी या शेतकर्‍याने आणि कामगाराने "नारायणराव" सोडला पाहिजे. खरा प्रश्न असा आहे की, खरंच या घटकाकडे असा मुबलक पैसा किंवा खरेदीची ताकत आली आहे का?

दिल्लीतील्, मुंबईतील अडते आणि दलाल यांच्या तालावर शेतकर्‍याने टँगो डान्स करावा असेच हे निर्देशांक सांगतात. अर्थ काय किंवा उद्योग/श्रम मंत्रालय काय, यांना फक्त् जीडीपीमधील् वाढीची चिंता असते कारण त्यांच्या आणि इंटुक अर्थ पंडितांच्या मते "इंडिया" ची तीच खरी प्रगती होय, असे हे दुष्टचक्र आहे.

चांगला, चिंतनपर लेख

श्री. चंद्रशेखर आपले चितंन योग्य आहे.
माझे सध्याच्या परिस्थितीबाबत वेगळे मत आहे.

माणसाने व प्रत्येक समाजाने आधी पहिले आपले भले पाहीले पाहीजे.
ह्या मुलभूत तत्वावरच आपण ज्या अर्थव्यवस्थेबाबत विचार करीत आहात ते बेतलेले आहे.

'भारत हा देश जागतिक महासत्ता व्हावा' ह्या विचाराने भारलेल्या विचारवंतांनी, तद्न्यांनी, राजकिय पक्षांनी म्हणूनच ह्या अर्थव्यवस्थेचा अवलंब करीत व त्या शास्त्राच्या मागे लागल्यामुळे नकळतपणे हि वृत्ती प्रत्येक भारतीयांमध्ये झिरपवली आहे.
सध्याची अर्थव्यवस्था हि पाश्चिमात्य मंडळींनी त्यांच्या मुलभूत स्वभावाला गृहित धरून आकारलेली आहे.
भारतीय जनांचा मुलभूत स्वभाव हा परोपकारीच आहे. त्यानूसार हि अर्थव्यवस्था व तिचे शास्त्र नाही.

'सर्वायव्हल ऑफ द स्मार्टेस्ट' जगण्यासाठी हा नियम पाळावाच लागतो. हा ही एक नियम आहे. भारताला जागतिक महासत्ता होण्या आधी/साठी या जगाला ही काहीतरी नवा विचार (जो भारतीय असेल, नवा असेल) व त्यावर बेतलेले शास्त्र, त्यावर बेतलेले निर्देशांक द्यावे लागतील.

वैश्य युग संपले. हे मी मानतो. आताचे युग शूद्र युग आहे.
आता वैश्यानुसार विचार करीत (म्हणजे 'मालाची आवक कमी (केली) तर भाव जास्त (मिळणार!)' ) निर्देशकांचे पालन सरकारद्वारे केले जावे अशी अपेक्षा चूकीची होणार.

नव्या युगाचे नवे निर्देशांक, ते ज्यावर बेतलेले असणार ते वेगळे शास्त्र, ते ज्या विचारावार बेतलेले असणार ती तत्वे कोणती असणार? ह्यावर यापूढे विचार केला जायला हवा. तर नक्किच. सरकारने महागाई, भाववाढ कशी रोकायची? ह्यांबाबतची वेगळी उत्तरे मिळू शकतील.

हं आहे अवघड

हे सगळे समजले पाहीजे खरे एकदा. :-(

>WPI मागच्या सप्टेंबर महिन्यात -2% टक्के होता तो आता 10% आहे

हे आदल्या महीन्यात सांगीतलेल्या निर्देशांकाच्या तुलनेत असे असावे का?

बाकी माझा अनुभव देखील असाच काहीसा आहे की २००७-२००८ पासुन भाववाढ अन्नधान्याची जगभर झाली व मग काही कडाडलेले भाव परत तुलनेत खाली आले पण भारतातुन येणारे अन्नपदार्थ आता अजुन महागले आहेत, परदेशात रहाणार्‍या अजुन कोणाचा असा अनुभव आहे काय?

निर्देशांक

मागच्या सप्टेंबर महिन्यात WPI -2% होता याचा अर्थ सप्टेंबर 2008 मधे ज्या किंमती होत्या त्यापेक्षा सप्टेंबर 2009 मधल्या किंमती 2%नी कमी होत्या. आज हा निर्देशांक 10% आहे म्हणजे जून 2009 मधे ज्या किंमती होत्या त्यापेक्षा आजच्या किंमती 10%नी अधिक आहेत.
चन्द्रशेखर

 
^ वर