पती चालक तर पत्नी वाहक

श्री. धम्मकलाडू यांच्या "डबल इंजिन" धाग्याने शतक ओलांडल्यावर त्या धाग्यातील सर्व विचार आणि मते परत एकदा अभ्यासासाठी नोंद करून घेत असतानाच, मध्येच चहा घेता घेता तसेच हाच धागा डोक्यात असताना आजच्या "सकाळ" च्या इंटरनेट आवृतीत योगायोगाची एक बातमी वाचण्यास मिळाली, ती प्रतिसाद स्वरूपात येथील सदस्यांसाठी देत आहे :-
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हल्लीच्या काळात तर पती आणि पत्नी दोघांनाही संसाराला हातभार म्हणून नोकरी किंवा स्वयंरोजगार करावा लागतो. कोल्हापूर् येथील महापालिका परिवहन विभागाकडे कार्यरत असणाऱ्या चालक राहुल शिर्के आणि वाहक वैशाली शिर्के या दांपत्याने तर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. योगायोगाने राहुल ज्या बसवर चालक आहेत, त्याच बसवर पत्नी वैशाली यांची पहिलीच ड्युटी राहुल यांच्याबरोबर लागली. हल्ली पती आणि पत्नी दोघेही नोकरी करीत असेल तर धावपळ उडते. मुलांवर लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही, अशा तक्रारी वारंवार ऐकायला मिळतात. या दांपत्याने मात्र सर्वच स्तरावर नेटके नियोजन केले आहे. आता दोघांच्या ड्युटी बदलल्या आहेत; मात्र इमाने-इतबारे नोकरी सांभाळताना मुले आणि घरांसाठीही तितकाच वेळ ते देतात.

सकाळी मुलांना आवरण्यापासून ते संध्याकाळी घरी परतेपर्यंत विविध कामे एकत्र करतात. सिद्धेश आणि विनायक या दोन्ही मुलांना शाळेमध्ये नोकरीवर हजर होण्यापूर्वी एकत्रच शाळेत सोडतात. वैशालीना सासूबाई इंदूताई यांचे मोलाचे पाठबळ मिळत आहे. वैशाली आणि राहुल यांना पहाटे सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत कोणत्याही वेळेतील ड्युटी करण्यासाठी तयार राहावे लागते. वैशालीला दिवसभरचा पैशाचा भरणा आणि राहुलला डेपोमध्ये गाडी जमा केल्यानंतरच सुटी मिळते.

राहुल सेवेत कायम आहेत, तर वैशाली रोजंदारीवर काम करतात. सकाळी लवकर ड्युटी पाहणे, गाडी, तिकिटे, सुटे पैसे घेऊन त्यांचा बसचा प्रवास सुरू होतो. बसचा एक मार्ग मिळाल्यानंतर दिवसभरात ते दोघेही साधारण नऊ गाडीच्या फेऱ्या करतात. त्यामध्ये प्रवासी चढणे-उतरणे, त्यांची तिकिटे, योग्य थांबा, रस्त्यावरील वाहतूक यावर मात करत बरोबर वेळेत गाडी पोहचण्याची करसत करावी लागते. वैशालीना दिवसभराचे कष्ट केल्यानंतर 154 रुपये मिळतात. जास्तीत जास्त पगार हातात मिळावा, यासाठी वैशाली महिन्याचे 25 ते 27 दिवस काम करतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बरे वाटले वाचून, हे अशासाठी म्हणत आहे की, "त्या" धाग्यात आपण सर्वजण मध्यमवर्गीय कुटुंबीय तसेच आय्.टी.सारखी "पॉलिश्ड् कपल" यावरच प्रामुख्याने लक्ष केन्द्रीत केले होते, पण जिल्हा पातळीवर जर अशा प्रकारचे "डबल इंजिन" कार्यरत असेल तर त्याचे आपण स्वागतच करायला हवे असे वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

आमच्या हापिसातली जोडी

अरे वा मस्तच. (बाय द वे, मस्त सेटिंग आहे.) शिर्केदांपत्याचे अभिनंदन. आमच्या हापिसातही अशी जोडी आहे. नवरा हा प्यून (शिपाईगडी) आहे. तर बायको हापिसाची निगा राखायचे काम करते. ह्याशिवाय नवरा सकाळी पेपरवाटपाचे काम करतो. त्याच्याकडे १००-१२५ घरे आहेत. ह्या दोघांचे एकंदर उत्पन्न २० हजाराच्या घरात आहे. दोघे १२ जणांच्या एकत्र कुटुंबात राहतात. तीन खोल्यांचे घर. नवरा-बायको दोघे सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबराब राबत असतात. एकत्र कुटुंबात राहत असल्यामुळे लहान मुलांकडे लक्ष देण्यासाठी कुणी ना कुणी असतेच. सासूसासरेही आहेत. मला एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते. ह्या दोघांना कुठल्याही चैनीची सवय नाही. पण ह्या देवीचा नवस कर, त्या देवीचा नवस कर ह्यात मात्र पैसे घालवतात. अगदी कर्ज काढून. असे का? कळत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+१

असेच म्हणतो :)

- दण्कटलाडू

डबल इंजन

सासू-सासरे धरूनही १२ जणांचे कुटुंब का ?कमी मुले असतील तर त्यांना चांगले शिक्षण व कुटुंबाचे चांगले राहणीमान ठेवता येते , हे त्यांना मध्यमवर्गियांप्रमाणे कळत नाही का ? सारखे नवस कशासाठी करतात ? अर्थात त्यामुळेच कदाचित मध्यमवर्गियांपेक्षा जास्त समाधानी राहत असतील.

प्रथा

>>>> अर्थात त्यामुळेच कदाचित मध्यमवर्गियांपेक्षा जास्त समाधानी राहत असतील.<<<<

नाही, बिलकुल नाही. समाजातील हा घटक, (त्यांच्या दुर्दैवाने) समाधानी राहत नाही, आणि म्हणूनच तो देवधर्म, मांत्रिकतांत्रिक, पिडा टळो, लिंबू-मिरची-पिवळा भात उतारा आदी अघोरी गणल्या गेलेल्या प्रथेला बळी पडत असतो. या क्षेत्रात सामाजिक पातळीवरील "स्वयंसेवक" म्हणून काही ज्येष्ठांसमवेत मी बर्‍यापैकी काही काळ कामे केली असल्याने फार वेळा "याची डोळा" काही प्रकार पाहिले आहेत, ज्यामध्ये दिवसरात्र घाम गाळून मिळविलेला पै-पैका लबाड लुटारुंच्या हवाली केला गेला जातो, आणि वैषम्य वाटते ते अशासाठी की तो पैसा घरी "समाधान" मिळावे या कारणासाठी केलेला असतो, जे या गटाला मृगजळासम शाबित होते.

हं

सासू-सासरे धरूनही १२ जणांचे कुटुंब का ? कमी मुले असतील तर त्यांना चांगले शिक्षण व कुटुंबाचे चांगले राहणीमान ठेवता येते , हे त्यांना मध्यमवर्गियांप्रमाणे कळत नाही का ?
तीन भाऊ, बायका-पोरे, सासू सासरे असे कुटुंब आहे.

सारखे नवस कशासाठी करतात ?
मध्यंतरी त्याच्या आईची तब्येत बरी नव्हती. ती कुणाशी बोलत नसे. भूतबाधा झाली आहे असे म्हणत होते घरचे. असो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मुख्य घटक

>>>>ह्या दोघांना कुठल्याही चैनीची सवय नाही. पण ह्या देवीचा नवस कर, त्या देवीचा नवस कर ह्यात मात्र पैसे घालवतात. अगदी कर्ज काढून.<<<<

याला जे घटक जबाबदार आहेत त्यातील प्रमुख म्हणजे एकविसाव्या शतकातदेखील हटायला तयार नसलेली "शिर्के" वा त्या शिपायाच्या घरातील "अंधश्रद्धा". या विषयावर इथे खूप लिहिता येण्यासारखे आहे.

:-)

धाग्याचे महत्व किंवा प्रयोजन समजले नाही. "डबल इंजीनचा" आदर होताच व असेल.

असो अजुन वेगळ्या विषयावरचे रोचक लेख येउ द्या.

धागा प्रयोजन

>>> धाग्याचे महत्व किंवा प्रयोजन समजले नाही. <<<

मी कबूल करतो की, ही बातमी काही स्वतंत्र धाग्याचा विषय नव्हता तर त्या "डबल इंजीन"ला पूरक असे लिखाण होते. पण त्याने शतकी मजल मारल्यावर व त्याचे प्रयोजन पूर्ण झाले असल्याने त्या पृष्ठाकडे कदाचित पुन्हा कुणाचा माऊस जाणार नाही व वरील एक चालक व वाहक यांच्या बातमीकडे दुर्लक्ष होईल असे वाटल्यामुळे त्याच बातमीला थोडे "धागा" स्वरूप द्यावे असे वाटले, म्हणून तो प्रयास. बाकी यानंतर नूतन/स्वतंत्र धागा लेखन करीन.

मला

पती चालक तर पत्नी वाहक

मला वाटले लग्न या विषयाची व्याख्याच करताय...
म्हणजे बायकोनी बेल मारली की आम्हाला थांबावेच लागते, तसे!

आम्ही तर या स्टेशनवरचे बिनपगारी हमाल म्हणजे भारवाहीही आहोत हॅहॅहॅहॅ!

आपला
गुंडोपंत

 
^ वर