मध्यमवर्गाचे महत्वाचे आर्थीक प्रश्न
सर्वप्रथम मध्यमवर्गाचे मासीक खर्चाचे बजेट या धाग्यावर सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे मनःपुर्वक आभार.
एका मध्यमवर्गीय तीन (चार) सदस्यीय कुटुंबाला पुण्यासारख्या शहरात / पुण्याबाजुच्या उपनगरात किमान २० ते २५ हजार रु महीना खर्च येतो.
आपण पाहीले की हा फक्त महीन्याचा बेसीक खर्च (ऑपरेशन कॉस्ट) आहे व त्यात घरभाडे अथवा घराचा हप्ता अजुन् मिळवला नाही आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाला किंवा एका कर्त्या मध्यमवर्गीय कुटुंबाकडून अपेक्षीत असलेल्या घरच्या जबाबदार्या अजुनही असणारच.
एकदा त्याचीही यादी बनवून पाहूया. तर यावेळी खालील महत्वाचे आर्थीक प्रश्न दिसत आहेत. आपल्या सुचना, मत अपेक्षीत आहे.
१) घर भाडे, घरकर्जाचा हप्ता (उपप्रश्नः - जागेच्या क्षेत्रफळाच्या भुमीकेतुन ४ जणांच्या कुटुंबाला उपक्रमींना मध्यमवर्गीय लोकांकरता १बीएचके का २ बीएचके सदनिका योग्य वाटते ?) =
२) भविष्याकरता बचत निवृत्तीनंतर = (हा प्रतिसाद उपयुक्त होईल)
३) मुलांचे शिक्षण, लग्न = (मला वाटते शैक्षणीक कर्ज जे पाल्याने स्वता फेडावे व वधू वरांनी साठवलेल्या पैशातुन लग्नखर्च करावा तरि आज तसे सर्रास होताना दिसत नाही म्हणुन तुम्हास योग्य वाटेल ती रक्कम)
४) वेगवेगळी गॅजेट्स् = आज मोबाईल, म्युझीक् सिस्टीम, टिव्ही, फ्रीज ही तर ग्राह्य धरली जाणारी व संगणक, फुडप्रोसेसर, मायक्रोव्हेव इ. उपकरणे नियमीत दिसु लागली आहेत
५) घर भाड्याचे असो वा स्वताचे काही फर्निचर तर करावे लागतेच =
६) आता जर एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबावर् वृद्ध पालकांची जबाबदारी असेल तर् =
७) एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबावर पाठच्या भावंडाचा शिक्षण व लग्नाची जबाबदारी असेल तर =
८) समजा एखाद्या दुर्दैवी तरुण कुटूंबाचा वैद्यकिय विमा नसेल किंवा एकदा वापरुन् आता नवा जुन्या व्याधीकरता मिळत नसेल तर् करायला लागणारी तरतूद= तसेही १००% विमा सरंक्षण प्रत्येक केस मधे असतेच असे नाही.
९) मृत्यु = दहन, नंतरचे धार्मिक विधी इ विचारी माणसे याचीही सोय करुन जातात. माझ्या आजोबांचा मृत्यु १९९६ मधे झाला माझी आजी अजुनही हयात आहे वय वर्ष ९२, आजोबांनी केलेली तरतूद अजुनही आजी करता पुरत आहे. त्यांचे उभे आयुष्य काटकसरीत.... :-) अजिबात नाही उलट शिस्तबद्ध नियोजन असलेले होते.
नुस्ता वरवर विचार केला तर एखादी व्यक्ती / जोडपे या सर्व/ ऍज एप्लीकेबल खर्चाकरता मासीक प्राप्ती फारसे नसल्यास कर्ज काढा व फेडा तसेच लो क्वालीटी ऑफ लाईफ म्हणता येईल असेच जीवन जगणार किंवा/आणी वर लिहले तसे नवे विचार असलेले आयुष्य जगा जसे मुलांचे उच्च शिक्षण व लग्न ही मुलांची जबाबदारी.
एक तर रिव्हर्स मोर्टगेज कितपत यशस्वी झाले आहे याचा विदा नाही पण घराचे प्रचंड भडकलेले भाव जेव्हा रिव्हर्स मॉर्टगेजची खरी वेळ येते तेव्हा कितपत टिकतील किंवा खरे कळतील तेव्हा येणार्या किमान सौम्य र्हदयविकाराच्या झटक्याची तरतूद हा मुद्दा देखील विसरु नये.
आपल्यापैकी कितीजण हा विचार करुन हैराण होतात व याचा आपल्या मनःस्वास्थावर कितपत परीणाम होतो आहे? मी कबूल करतो :-(
अतिशय महत्वाचे लवकर जागे व्हा, आर्थीक नियोजन करा. जो २५ ते ४५ ह्या वयोकालात बचत व गुंतवणूकीचा यथायोग्य फायदा उठवेल तोच नीट तरेल. बाकीच्यांनी रोज लॉटरीचे तिकीट घेतले पाहीजे. काय म्हणता? डबल इन्कम हा मुद्दा निकालात निघाला म्हणता येइल का? फक्त आई-वडील नव्हे तर मुलांनी देखील काही काम करुन् पैसे मिळवले पाहीजेत असे नाही वाटत?
आहीरे-नाहीरे संघर्षाबाबत ढोल वाजवणार्यांनी आपली मते मांडावी नक्की किती पैसे कमवले तर त्यांना आहेरे वर्गात म्हणावे? खेडेगावातल्या कनवाळू जनसामान्यांनी त्यांची मते मांडावीत. त्यांच्या आयुष्याचे नियोजन कसे असते. दोन किंवा जास्त मुले असणारे व श्रीमंत नसलेले नेमका आर्थीक नियोजनाचा विचार कसे करतात हे मला न उलगडलेले कोडे आहे.
अन्यथा मला कोणी आपल्या मराठी मध्यमवर्गीय संस्कृतीत पचेल अशी जीवनशैली सांगावी.
Comments
मला
उपक्रमावरच्या जेष्ठ सदस्यांना विचारायचे आहे. मला अगदी महाविद्यालयीन आयुष्यात पण कधी करोडो रुपये वगैरे सरकार, कंपनी इ लोकांच्या खर्चाचे युनीट वाटायचे. बघता बघता ते आता मध्यमवर्गीय माणसाच्या गणीतातला शब्द होउ लागला आहे.
तर जेष्ठ सदस्यांना याबाबत काय वाटते? आजच्या तरुणांना घर गाडी इतर मित्रांसारखे आयुष्य हे प्रेशर जास्त आहे का? हे आकडे त्यांना चिंताजनक वाटतात का?
ज्येष्ठ सदस्य
एक ज्येष्ठ सदस्य न्हणून श्री. सहज यांच्या प्रश्नाचे उत्तर देतो. चाळीस किंवा पन्नास वर्षापूर्वी सोने 100 रुपये तोळा होते. चांगला शर्ट 40 ते 60 रुपयाला मिळत असे. मटार पावसाळ्यात 25 पैसे किलो मिळत असे. परंतु म्हणजे स्वस्ताई होती असे अजिबात नाही. त्या काळात मध्यमवर्गीय लोकांचे सरासरी उत्पन्न काही शे एवढेच असल्याने जमा खर्चाची तोंड मिळवणी करणे सध्या एवढेच अवघड होते. तेंव्हा आणि आता यात मुख्य फरक जाणवतो तो कन्झुमर उत्पादनांच्या उपलब्धतेबाबत जाणवतो. त्या वेळी अतिशय मर्यादित व ठराविक उत्पादनेच मिळत आता सारखी उत्पादनांची विशाल श्रेणी तेंव्हा उपलब्ध नसे. त्यामुळे पैसे असले तरी खर्च करायला फारसे मार्गच नसत. बजाज स्कूटर ला 25 वर्षे तर फियाट कार ला 12 वर्षे प्रतिक्षा काल असे. त्यामुळे लोकांचा सोने खरेदीकडे कल असे. तिथे सुद्धा गोल्ड कंट्रोल कायदा होताच. प्रायमरी गोल्ड विकत मिळत नसे. आयकराची कमाल आकारणी 86% ने होत असे. त्यामुळे लोक शक्यतो रोख रक्कमेने व्यवहार करण्याचा प्रयत्न करत. तेंव्हा आम्हाला हजार म्हणजे डोक्यावरून पाणी असे वाटे आता कोटि वाटते एवढाच फरक.
चन्द्रशेखर
+१
अगदी बरोबर.
एकेकाळी २००, ३०० रु पगार असायचा व महीन्याचा भागायचा. महागाई वाढली तसा पगारही वाढला २००-३०० चा ३००० रु झाला.
साध्या चप्पल, बाटाच्या स्लीपर्स घालून तेव्हाची मुले मोठी झाली. आजच्या मुलाला किमान एक फ्लोटर्स, एक स्पोर्टशुज. असे बर्याच उत्पादनांबद्दल म्हणता येईल घरातल्या सगळ्या सदस्यांच्या बाबत म्हणता येईल.
पण मग जेव्हा फक्त मिनिमन लाइफस्टाईल दुसर्या धाग्यात पाहीली तरी हिशोब सगळा बिकटच आहेत. मध्यमवर्ग-काटकसर- मुरड घालणे- हे आपले नव्हे. मग आता नक्की भौतीक प्रगती कशी?
की मागील पिढी जशी राहीली ती लाईफस्टाईल ह्या पिढीने किमान १०-१५ वर्ष करुन पैसा साचवुन मगच आजच्या मध्यमवर्गीय जीवनशैलीशी एडजस्ट करावे?
बाटोवी झावोडी
बाटा ही स्वस्त, देशी कंपनी असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे. बाटाच्या स्लीपर्सच्या किमतीच्या ३५% किमतीतही स्लीपर्स मिळतात.
बाटा
बाटा देशी असल्याच्या भ्रमात तो बाटा मेल्याची बातमी वाचेपर्यंत होता.
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
:-)
पाहुण्यांना मॉल मधे नेल्यावर अजुनही अरे वा तुमच्याकडे पण बाटा आहे, असे ऐकू येते, :-)
टाटा ला यमक..
म्हणून बाटा....हे भारतीय नाव असावे असे वाटले असेल. ;)
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
थोडे थांबायला हवे
अन्यथा मला कोणी आपल्या मराठी मध्यमवर्गीय संस्कृतीत पचेल अशी जीवनशैली सांगावी.
चर्चाचतुष्ट्यातल्या "चैन ही घातक आहेका? किंवा कुठली चैन घातक आहे?" ह्या चर्चेतले निष्कर्ष उपयोगी पडावे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
तडजोड
वरील पैकी मी कुठल्या गोष्टीत तडजोड करणार नाही व करेन याची यादी करुन पहा व तुलना करा.
प्रकाश घाटपांडे
आर्थिक साक्षरतेचा अभाव
दहावीला अर्थशास्त्र म्हणून एक विषय होता. त्यात आयुष्यात निरुपयोगी ठरणारी सरकारकडे कसा पैसा येतो व सरकार तो कसा खर्च करते वगैरे आकडेवारी होती. (मला 25 पैकी 25 गुण मिळाले होते.) त्याऐवजी शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण व आर्थिक साक्षरता वाढवणाऱ्या विषयांचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे.
मला कधी कधी वाटते माझ्या आईवडिलांनी दरमहा सुरक्षित साधनांत गुंतवणूक करण्याऐवजी दरमहा इन्फोसिसचे शेअर्स घेतले असते तर कित्ती मज्जा झाली असती.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
आर्थिक साक्षरता?
काय राव?
तेव्हा इन्फोसिस एवढी बरकतीला येणार आहे अशी त्यांना कल्पना असेल का?
मी आता एक नवी कंपनी काढतो. तुम्ही घ्याल दर महिन्याला माझ्या कंपनीचे शेअर्? असे कशाला? इन्फोसिसचेच शेअर घ्या ना तुम्ही दर महिन्याला.... आज अडीच हजाराला असलेले शेअर पुढे लाख रु पर्यंत जातील. ;)
नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)
इन्फोसिसचे फक्त उदाहरण दिले
स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक किंवा पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचे फॉर्मल शिक्षण त्यांना मिळाले असते तर त्याच्या लाँग टर्म बेनेफिट्सचा अधिक फायदा होऊ शकला असता असे म्हणायचे होते. (माझे आईबाबा कॉमर्स ग्राज्युएट आहेत पण त्यांच्या अभ्यासक्रमात हे नव्हते असे त्यांनी मला सांगितले.) स्टॉक मार्केट = जुगार ही चुकीची मानसिकता (त्यांच्यासह) अनेकांच्या मनात आहे.
इथे आईबाबांवर कोणताही हेत्वारोप नाही. आय एम ग्रेटफुल टू हॅव सच पॅरेंन्ट्स. पण अनेक कुटुंबांमध्ये गुंतवणुकीची साधने बदलली असती तर बराच फरक पडला असता.
इन्फोसिस सोडा. भेल, लार्सन, स्टेट ब्यांक, सेल वगैरे अनेक नावाजलेल्या कंपन्या होत्याच ना.
इन्फोसिसचे शेअर आता नको बुवा. त्यांचा काही भरवसा राहिलेला नाही. iRace मुळे कंपनीची पुरती बदनामी झाली आहे. मूर्ती आणि नीलकेणी गेल्यापासून त्यांच्या म्यानेजमेंटची अवस्था काप जाऊन भोके राहिली अशी झाली आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सगळी अंडी एका बास्केटमध्ये
शिवाय मी आयटीत नोकरी करतो. आयटी कंपनीत गुंतवणूकही केली आणि उद्या आयटी उद्योगाचे काही बरेवाईट झाले तर सगळीकडूनच बूच लागायचे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
+१
प्रतिसादाशी सहमत आहे.
हे असे ज्ञान "रेडी टू इट टाईप" खाद्यपदार्थासारखे नाही तरी तसे काहीसे लहानपणापासुन मिळाले तर आयुष्यात त्याचा फायदा आहे.
जागा खरेदी प्रमाणे, शेयरबाजार गुंतवणूक हा सध्यातरी मला फायदेशीर प्रकार वाटतो. नुस्ते बचतीचे महत्व जमाना संपला आहे आता बचत व तसेच गुंतवणूक हा जास्त महत्वाचा प्रश्न आहे असे मला वाटते.
जो काही पैसा आयटी व तत्सम नोकरदारांनी पाहीला तो सगळा बिल्डर, कारमॅन्युफॅक्चर्स, मोबाईलमेकर्सच्या खिशात जाताना मला दिसतोय व जो वाचला तो मॉलमधे जातोय. भले एखाद्याला वाटत असेल् की तो स्व:तासाठी कमावतोय पण दिसतेय तर वर उल्लेखलेल्या तिघा चौघांचीच कमाइ होते आहे व आजचा मध्यमवर्गीय नोकरदार एक प्रोसेसींग मशीन आहे.
हलकेच घ्या - किंवा थोडेसेच गंभीरपणे.
हे असे ज्ञान "रेडी टू इट टाईप" खाद्यपदार्थासारखे लहानपणीच मिळाले तर तरुणांचा फायदा आहे.
सहजराव,
आपण "रेडी टू इट टाईप" खाद्यपदार्थ लहान मुलाना कधीतरीच देतो. त्यांच्या या वयात त्यांना असले रेडी-टू-ईट् पदार्थ खायच्याऐवजी पौष्टिक पदार्थ आपण देतो हे खरे ना ? तर मग हेच या वयात त्यावयाच्या ज्ञानाच्याही बाबतीत खरे आहे असे मला वाटते.
आजानुकर्णाने उल्लेखलेल्या निरुपयोगी ज्ञानाची तुलना पुन्हा एकदा कुपोषण करणार्या पदार्थाशी करता येईल. त्याला पर्याय म्हणजे "रेडी टू इट टाईप" खाद्यपदार्थ नव्हेत. मुलांनी जीवनाच्या शर्यतीत तगायचे तर त्यांना निरुपयोगी ज्ञान नको त्याचप्रमाणे इन्स्टंट "गेट् रीच क्विकली"असेही नकोच. मुलांना श्रीमंतीचीच स्वप्ने दाखवायची तर (पुन्हा प्रस्तुत चर्चेतलीच उदाहरणे वापरायचे असतील तर ) इन्फोसिस् च्या शेअर्स् च्या पेक्षा नारायण मूर्तींच्या व्हिजनची, त्यांचा मेहनतीची , त्यांच्या मार्केट् यूएस्बी ची कल्पना द्यावी.
हे ही शिकवले जात नाही
हे शाळेत शिकवले जात नाही.
(तीन वर्षात श्रींमंत होण्याचा गुरुमंत्र.)
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
नसीब अपना-अपना
आपल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर आपला हक्क असतो. असे मला ही वाटायचे. पण तसे असत नाही.
मला दहा वर्षाआधी बोरीवली, मुंबईतच फ्लॅट घ्यायला वडिलांनी पाच-सहा लाखांची मदत केली असती तर कर्ज काढून मी एक फ्लॅट घेवू शकलो असतो. पण वडिलांची देखील स्वप्ने होती. त्यांना स्वतःची कार घेण्याची व कोकणात एक छोटे घर घेण्याची ईच्छा होती. त्यांनी ती पूरी केली. त्यांचा पैसा त्यांनी कसा खर्च करायचा? हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. आणि तो मला ही मान्य आहे.
आता मीरारोडमध्ये कंस्ट्रक्शन चालू असलेला फ्लॅट घेण्यासाठी (१बी.एच.के.) १५ लाखांच कर्ज काढालंय! पगार ३०,०००/- रुपये.
या पुढे अल्ला मालिक! जास्त विचार करायचा नाही.
वेगवान
चैन सापेक्ष आहे हे सर्वांना मान्य व्हावे. माझ्या पिढीतील बरेच समवयीन मुले-मुली कठीण आर्थिक परिस्थितीतून वर आले आहेत. आता परिस्थिती सुधारल्यावर त्यांना त्या वेळेस ज्या गोष्टी करता आल्या नाहीत त्या कराव्याश्या वाटतात. शिवाय आम्हाला जे भोगावे लागले ते मुलांना नको म्हणून मुले-मुली लाडात वाढलेली असतात. अशी कित्येक उदाहरणे माझ्या बघण्यात आहेत, तुमच्याही असतील. हे चूक आहे की बरोबर कुणी कुणाला सांगायचे?
आर्थिक परिस्थिती सुधारली की आता खूप पैसे आले, आता बास असे कोण म्हणते? साधु-संत (म्हणजे खरे साधु-संत, नाहीत आजकालचे साधुलोकच गब्बर असतात) सोडले तर प्रत्येकाला वरच्या स्लॅबमध्ये जायचे असते. आणि हे चूक आहे असेही नाही.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
+१
अगदी बरोबर! "अजुन पाहीजे" ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. आपण जे बोलत आहोत ते तर फक्त आहे तेच चक्र चालु ठेवण्यापुरते. त्यातच डोळे पांढरे होतायत.
वरच्या स्लॅबपर्यंत जायचे तर अग्निदिव्यच नाही का? :-)
+२
सहमत. म्हणून तर मसंवर त्याच त्या विषयांवर एक चर्चा अपूरी वाटते ;)
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
अर्ज किया है-
सुरू असलेल्या चर्चा (मध्यमवर्गाचे अर्थकारण) वाचून माझीच एक गझल आठवली -
मैफिलीला दीनसे संगीत नाही
घोट कोणी आसवांचे पीत नाही
ऊर्ध्वगामी भोवर्याला नाळ नाही
आणि त्याचे दु:खही बेंबीत नाही
उघडली सारी दुकाने ही सुखाची
पण उधारी ठेवण्याची रीत नाही
स्वप्न नाही - बुब्बुळांच्या गारगोट्या
घोरतो मी - झोपणे माहीत नाही
चंदनाचे खोड आता जून झाले
गंध त्याचा अंग हे जाळीत नाही
या भिकारी कागदांना काय देऊ?
एकही कविता कशी शाईत नाही?...
ही याच अर्थकारणावर आणि सामाजिक, मानसिक परिस्थितीवर बेतलेली होती. असो.
उपक्रमाच्या धोरणात हा प्रतिसाद बसत नसेल तर (पंतांनी/संपादकांनी) उडवून टाकावा.
चांगली कविता
क्या बात है...
(निद्रानाशग्रस्त अघोरी) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
आहीरे-नाहीरे संघर्षाबाबत ढोल वाजवणार्यांनी ....
आहीरे-नाहीरे संघर्षाबाबत ढोल वाजवणार्यांनी ..... जगात काय फक्त आहेरेचा मध्यम वर्गीय राहतो. जगात मध्यम वर्गीयालाच प्रोब्लेम्स आहेत अश्या थाटात चर्चा चालू असतात. मध्यम वर्गीय जसे आपले रडगाणे गातो तसे नाहीरेच वर्ग कधी रडगाणे गात बसत नाही. हा मध्यम वर्गीय नाहीरे बद्दल तिटकारा आणि श्रीमंत बद्दल असूया अश्या कात्रीत सापडले आहेत. किती पैसा मिळाला तर कोणता वर्ग हा प्रश्न . देवाने एकदा मानवाला वर दिला . आणि सांगितले सकाळ पासून सायंकाळ पर्यंत तू जेव्हढी पावले चालशील तेव्हढी जमीन तुझी. माणूस सकाळीच चालावयास निघाला . दुपार झाली सायंकाळ झाली तरी पाण्याचा थेब ही न पिता चालतच राहिला अखेरीस सूर्य अस्ताला जावू लागला . मानवाचे एक पावूल ही पुढे पडत नव्हते तरी पण अधिक जमिनीच्या लालसेने त्यने कष्टाने एक पावून पुढे टाकले तो चक्कर येवून धरतीवर कोसळून गतप्राण झाला. त्याच वेळी सूर्य मावळला
आणि देव म्हणाला मानवा खरे तर तूला तू पडलास तेव्हड्याच जमिनीची तुला आवश्यकता होती आणि आहे. पण तू अधिक च्या लालासेले पाण्याचा थेंब न पिता चालत पळत राहिलास आणि आपले प्राण गमावून बसलास. पण आता वेळ निघून गेली होती. मध्यम वर्गाचे ही तसेच झाले आहे. त्याला कितीही मिळाले तरी हावरटा सारखे अजून हवे असते ,त्यातच तो जीवनाचे सुख समाधान हरवून बसला आहे. कितीही मिळाले तरी अधिक मिळवण्याच्या नादात प्राण गमावून बसणार
सवंग
टॉलस्टॉयची गोष्ट देवाच्या नावे खपवू नका.
तुम्हाला काय माहिती? नाहीरे स्वतःच्या मनात गात असेल.
भौतिक प्रगती
मागच्या पिढीच्या अपेक्षा थोड्या होत्या, कारण त्यांना वस्तु कमी मिळत होत्या. अंथरूणच लहान होतं त्यामुळे पायही कमी पसरता येत होते. त्यांना फोन, टीव्ही, फ्रिजच्या पलिकडे विशेष काही मिळालं नाही, तेही उशीरा उशीरा. बर्याच लोकांना स्वतःच्या घरा ऐवजी वडिलोपार्जित घरात राहावं लागलं. आजचा मध्यमवर्गीय हौसेने वाहन, इंटरनेट, मोबाईल, बाहेर खाण्याचा खर्च हे महिन्याच्या बजेटात धरतो. या वाढलेल्या अपेक्षा (बहुतांशी पूर्ण होताना दिसतात त्या) हे भौतिक प्रगतीचंच प्रतीक आहे. दोन्ही पिढ्यात हे खर्च भागवण्यासाठी खेचाखेच दिसते हे साम्य केवळ अंथरूणाच्या थोडं पलिकडे पाय पसरण्याची मानवी इच्छा यातून येत असावं.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी