भाराततली वाहतुक जगाच्या तीसपट सुरक्षित!?

सोमवार, 21 जून 2010 च्या सकाळ -पुणे च्या पहिल्या पानावर पुण्यातील मेट्रोविषयी 'जागर' या विभागाचा लेख होता. एकंदरीतच त्या दिवशी जागर ने पुण्यातल्या वाहतुकीवर भर दिला होता. वाहतुक ही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुक, वाहतुकीची शिस्त, पावसाळ्यातली सुरक्षा, व एकंदरीतच अपघात या विषयांवर एकत्रितपणे लेख देणं हा जागर चा चांगला उपक्रम होता.

पण त्यातला 'गोल्डन अवरचा लाभ घेऊयात' हा लेख (लेखक - सुजित शिमळकर, अध्यक्ष - पुणे नागरिक संघ) वाचून प्रचंड निराशा झाली. कारणं उघड होतीलच.

या लेखाचा साधारण मतितार्थ - जगभर वाहतुकीचे अपघात होतात, पुण्यातही ते होतात. त्यात जखमी होणाऱ्यांना मदत करण्यासाठी प्राथमिक उपचारांनी सुसज्ज अशा गाड्या तयार ठेवाव्यात.

हे सर्व छानच आहे.

तक्रार आहे ती अत्यंत ढिसाळपणे दिलेल्या विद्याबाबत. (विदा म्हणजे data) लेखकाने निम्मा लेख आकडेवारी देण्यात घालवला आहे. वा. छान. कोणीतरी आकडेवारी देऊन एखाद्या प्रश्नाची तीव्रता व्यक्तिनिरपेक्ष स्वरूपात मांडतो आहे. पण ती इतकी निरर्थक आहे की त्यापेक्षा भावनेला हात घालणारा लेख परवडला असता.

'जगात दर वर्षी 12 लाख लोक मृत्यूमुखी पडतात... पुण्यात गेल्या पाच वर्षात शहरात 1200 बळी गेलेले आहेत'

या वाक्यांच्या अधे मधे, अलिकडे पलिकडे अपघातांचा प्रश्न कसा तीव्र आहे, (पुण्यातले) युवक यात कसे अधिक प्रमाणात बळी पडतात याची चर्चा आहे. तसंच 'आता देशातील सर्वाधिक अपघातांचे शहर म्हणून पुढे येत आहे' असंही म्हटलं आहे. बापरे, या पुण्याच्या ट्राफिकविषयी काहीतरी करायलाच पाहिजे!

पण थांबा. प्रत्यक्ष गणित करून बघूया. जगाच्या साडेसहा अब्ज लोकसंख्येत बारा लाख - म्हणजे दर दहा हजारात सुमारे 18 लोक दरवर्षी अपघातांत मृत्युमुखी पडतात. पुण्याची लोकसंख्या सुमारे चाळीस लाख धरली तर पुण्यात दरवर्षी... आता हिशोब करूया चाळीस लाख म्हंजी ...धा हजार चार वेळा घेतले तर फकस्त चाळीस हज्जार होतंत.. म्हंजी चारशे वेळा घेतले तर चाळीस लाख व्हतील... तर 1200 ला चारशेनी भागलं तर बगा येतात 3... पन ह्यो बाराशे पाच वरसांचे न्हवं का.. तवा त्या तीनाला पन पाचानं भागायला हवं...म्हंजी येतात 0.6. भाजीवालीला हे गणित येतं.

जगात दर दहा हजारात 18 मरतात तर पुण्यात दर दहा हजारात 0.6. पुण्यातले अपघाती मृत्यू 30 पटींनी कमी आहेत! आणि हे भारतातल्या सर्वात अधिक अपघाती मृत्यू होणाऱ्या शहरापैकी एक... म्हणजे एकंदरीत भारतात जगाच्या अपघाती मृत्यूच्या दरापेक्षा सुमारे पन्नासेक पट कमी असतील तर! अरे ढोल ताशे आणा, भारताच्या सेफ्टी रेकॉर्डचा गाजावाजा करा...

नक्की कुठे घोटाळा आहे? मुद्दा तो नाही. मला सकाळला किंवा शिळमकरांना दोष द्यायचा नाही. मला जो मुद्दा मांडायचा आहे तो अधिक मूलभूत आहे. एखाद्या प्रश्नाचा विचार करताना सर्वसामान्य माणूस आकडेवारीपेक्षा आपल्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवतो. 'देअर आर लाईज, देअर आर डॅम लाईज, अँड देन देअर इज स्टॅटिस्टिक्स' किंवा 'स्टॅटिस्टिक्स इज लाइक अ बिकिनी, इट हाईड्स मोअर दॅन इट रीव्हील्स' वगैरे क्लिशे आपण सहज फेकतो. पण आकडेवारी मागणे व ती तपासून पाहाणे, याला एक शिस्त लागते. ती आपण किती प्रमाणात पाळतो? वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तो एक भाग आहे. मृत्यूच्या दरांमधली एवढी प्रचंड तफावत सकाळ सारख्या प्रस्थापित दैनिकात राजरोसपणे येते आणि कोणाला त्याची पडलेली नाही हे कसलं लक्षण आहे?

मुद्दा ही तफावत नक्की कुठच्या चुकीमुळे आली हा नाही. आकडेवारीला आपण इतकं गौण स्थान का देतो? हा खरा प्रश्न आहे. क्लिशे जर पलटवायचा झाला तर असंही म्हणता येईल 'देअर आर स्टुपिड पीपल, देअर आर डॅम स्टुपिड पीपल अँड देन देअर आर दोज हू मिसइंटरप्रिट स्टॅटिस्टिक्स'. काही काळापूर्वी, शाळेत गणित शिकण्याचा काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित झालेला बघितला, आणि वाटलं, की शाळेत जे शिकवलं ते शिकलंच नाही, किंवा वापरण्याला नकार देण्याचा आडमुठेपणा केला तर ही परिस्थिती येऊ शकते.

तुम्हाला काय वाटतं? नक्की प्रश्न काय आहे? किंवा उत्तर काय आहे?

लेखनविषय: दुवे:

Comments

अपघाताची कारणे

पुण्यातील अपघाताची जी कारणे असतात ती जास्त क्लेषदायक असतात. उदा- रस्त्यावर बेदरकारपणे व निष्काळजीपणे पसरलेली खडी, मधेच रस्ता दुभाजक सुरु करणे व त्याला दर्शक नसणे आणि त्यामुळे.., गावातून जड व अतिजड वाहतूक होऊ देणे व त्यावर वर्षानूवर्षे काहीच उपाययोजना नसणे, अशा व इतर अनेक रस्ते इंजिनियरींगबरोबर तफावत असलेल्या खुणा जागोजागी दिसतात. अशा गोष्टींकडे मला वाटते थोडे लक्ष दिले तर ती आकडेवारी आणखी कमी करता येईल

विषयांतर

वाहतूक हा लेखाचा विषय नसून आकडेफेक हा आहे असे मला वाटते.

मिसिंग द पॉईंट

जर जगाच्या ३ पट सुरक्षित वाहतुक असेल तर त्याबाबत जैजैकार नको का? सुधारणा कसल्या सुचवता आहात?

अपघात का होतात व ते कसे थांबवावे असा मुद्दाच नाही... असली आकडेवारी कशी येते, व आपण ती चालवून घेतो हे कसलं लक्षण आहे हा मुद्दा आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

गडबड

तुमच्या आकड्यांवरील माझ्या आकडेमोडीनुसार पुणे येथील वाहतूक जगाच्या केवळ ३ पट सुरक्षित आहे.

शिस्त

प्रकाटाआ.

बिपिन कार्यकर्ते

दहाच्या पटीचा गोंधळ...

जगात दर दहा हजारात अठराऐवजी १.८ पाहिजे....
भारत ३० पट सुरक्षित ऐवजी ३ पट सुरक्षित हवे...

धन्यवाद

हाच लेख ३ पट ने लिहितालाअला असता, पण चूक काढणार्‍या धाग्यात चूक असावी हे लांच्छनास्पद आहे.

संपादकांना विनंती आहे की धागा उडवावा...

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

धडक धडक धडक धडक

अपघातांच्या संख्येच्या प्रमाणाचा अर्थपूर्ण विदा काढण्यासाठी लोकसंख्येऐवजी प्रतिमाणसी गाड्यांची संख्या व त्या संख्येच्या तुलनेत होणारे अपघात असा निकष लावणे योग्य ठरेल. त्यावरुन पुण्याच्या वाहतुकीचे व भारतातील अपघातांचे गंभीर स्वरुप लक्षात येईल. केवळ लोकसंख्या जास्त आहे म्हणून अपघातांचे प्रमाण कमी हे सिद्ध करणे दिशाभूलमूलक आहे. दोन चालणारी माणसे एकमेकांना धडकून फारसे अपघात होत नाहीत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विदा काढायची पद्धत

एखाद्या शहरात (शहराच्या हद्दीत) किती अपघात होतात आणि त्याची जागतीक/देशांतर्गत हे मुळात चूक आहे. म्हणजे ज्या गावातून हायवे जातो तेथील आकडेवारी खूप जास्त होऊ शकते.
एका शहरातील आकडेवारी दुसर्‍या शहराशी जोडता येईल ती पण सावधपणे.

गंमत म्हणजे जागतिक आकडेवारी १.८ पेक्षा जास्त असावी. भारतातील आकडेवारी ३. -३.५ च्या घरात जाते (दर दहाहजारी ). http://en.wikipedia.org/wiki/Road_accident इथे पाहिले तर तसे वाटले.

मी पंतप्रधान झालो असतो तर या नावाचे निबंध शाळकरी जीवनात लिहितो. त्याचा एक भाग म्हणून म्हणतो की 'चुकीची आकडेवारी /माहिती दिल्याबद्दलची दिलगीरी लगेच छापून/प्रसारित करण्याचा कायदा मी केला असता.'

प्रमोद

आकडेवारीतील चुका

एका शहरात नोंद झालेल्या सर्व मृत्यूंच्या आकड्यांची वयोगटावार विभागणी करण्यात आली. त्यानुसार असे दिसले की त्यामधील ७० ते ८०, ८० ते ९० आणि ९० ते १०० वयोगटांमधील लोकांचे प्रमाण घटत जाते आणि १०० वर्षावरील एकाही माणसाच्या मृत्यूची मुळी नोंदच झालेली नाही. कोणी तरी यावरून असा निष्कर्ष काढला की सत्तरी गाठल्यानंतर मरणाची शक्यता कमी होत जाते आणि शंभरी उलटल्यानंतर माणूस अजरामर होतो.
यानंतर दुसर्‍या माणसाने त्याच शहरातील जीवंत असलेल्या माणसांची आकडेवारी काढली. त्यानुसार असे दिसले की ७० ते ८०, ८० ते ९० आणि ९० ते १०० वयोगटांमधील जीवंत लोकांचे प्रमाणसुध्दा घटतच जाते आणि १०० वर्षावरील एकाही माणसाच्या अस्तित्वाची मुळी नोंदच झाला नाही.
या दोन्ही आकडेवार्‍या मिळवून पाहिल्या तर नक्कीच वेगळा निष्कर्ष निघेल.
अपघाताच्या तीव्रतेची आकडेवारी काढण्यासाठी काय महत्वाचे आहे हे वर दिलेल्या प्रतिसादांमध्ये आलेले आहेच.

विद्याचा गैरवापर

ह्यावरून अलिकडे झालेले उदाहरण आठवले.

दक्षिण चीनमधील शन्झन येथील फॉक्सकॉन ह्या, जगातील अनेक नामवंत इलेक्ट्रोनिक्स साधने निर्माण करणार्‍या (मुख्यत्वे ऍपल, तसेच नोकिया, एच. पी. इ.) कंपन्यांच्या कंत्राटदार कंपनीतील अनेक कामगार आत्महत्या करू लागले. ह्या कंपनीची शन्झन येथील फॅक्टरी (चीनमधील इतर अशाच संस्थापनांसारखीच) म्हणजे एक मोठी वसाहतच आहे. इतर प्रांतांतून आलेले कंपनीच्या कामावर असलेले कामगार डॉर्मिटरीजमधे रहातात. त्यांच्यासाठी भोजन व इतर व्यवस्था ह्या 'गावा'त केलेली असते. फॉक्सकॉनच्या सदर कंपनीत सुमारे ४००,००० कामगार कामावर आहेत. जानेवारीपासून त्यातील १३ कामगारांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे अर्थात खळबळ उडाली व ह्या कंपनीच्या सदर आस्थापनाकडे जगाचे लक्ष वेधले.

तेव्हा हा आत्महत्येचा दर कसा सर्वसामान्य आहे, व त्यात वावगे काहीही नाही, हे दर्शवणारे तथाकथित भाष्यकारांचे लेखही वर्तमानपत्रांतून येऊ लागले. ह्या लेखांत फॉक्सकॉनच्या कामगारांच्या आत्महत्येची तुलना अगदी आंकडेवारीसकट जगाच्या आकडेवारीशी , तसेच काही देशांच्या वार्षिक आकड्यांशी करण्यात येऊ लागली. व ह्या तथाकथित भाष्यकारांनी इथे काहीही वावगे चाललेले नाही, असा निर्वाळा दिला. विद्याचा असा सरसकट गैरपार झालेला वाचून माझीही अवस्था घाकडवींसारखीच झाली होती, ते आठवले.

समजले नाही

गैरवापर काय झाला ते समजले नाही.

अवांतर : विद्या बालन

अवांतर : विदाचे अनेकवचन विद्याचा/ची/चे आणि बालनांची विद्या या दोन्हींच्या उच्चारात आणि अर्थात फरक आहे. पण लिहीताना दोन्ही सारखेच लिहीतात.
यावर काही मार्ग/उपाय? की फक्त मला एकट्यालाच 'विद्याचा गैरवापर' म्हटल्यावर विद्या बालन आठवतेय?

सोल्यूशन

एक पाहिलेले सोल्यूशन.

'पुण्य' याचा हिशोब हे लिहायचे झाले तर 'पुण्याचा' हिशोब असे लिहावे लागते. यावर उपाय म्हणून 'पुण्ण्याचा' हिशोब असे लिहिलेले वाचले आहे. तसे विद्या बालनचा असे लिहायचे असल्यास विद्द्याचा असे लिहावे. या प्रमाणे विद्याचा हे विदा या गोष्टीचा या अर्थानेच वाचावे. ;)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

अडचण

तत्वतः सहमत आहे.

अडचण ही आहे की विदा हा शब्द पूर्णपणे रूढ झाला आहे असे वाटत नाही. बरेचदा मराठी सायटींवर न येणार्‍या (पक्षी : आमच्यासारख्या वेळ वाया न घालवणार्‍या) लोकांना विदा म्हणजे काय हे महित नसते. त्यामुळे विद्याचा वापर (data या अर्थी) यापेक्षा विद्याचा चित्रपट, विद्याचे सौंदर्य, विद्याचा अभिनय हे अधिक वापरले जातात/जातील.

पुण्याचा प्रमाणेच इथेही अर्थ लक्षात आल्यावर उच्चार बदलावा लागतो. उदा. हे वाक्य उच्चाराची चूक न करता म्हणता येईल का?

विद्याचा तक्ता करून संकलन करणे विद्याचे आवडते काम होते. विद्याने 'विद्याला देव मानले तर काम पुण्याचे होते' ही पुण्याची शिकवण* अंगी बाणवली होती.

*अर्थ लक्षात घेऊ नये, भावनाओं को समझो.

टंकनाच्या वेळीच

ही अडचण मला वाचताना येत नाहि.. मात्र टंकताना येते. मी साधारणतः लिहिताना विद्याला वगैरे (विदा ला प्रत्यय लावणे) टाळण्याचा प्रयत्न करतो.
तरीही लिहावा लागला तर सरळ डेटा शब्द वापरतो :)

पूण्ण्याबाबत काहि लिहिणं फारसं माझ्या वाट्याला येत नाहि ;)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सहमत

वरच्या अवांतराबद्दल क्षमस्व.

अर्थातच सहमत आहे. हे म्हणजे वाळूत तोंड खुपसून बसलेल्या प्राण्याप्रमाणे आहे.
पुण्यातील वाहतूक सुरक्षित आहे असे मत आंधळ्याचे देखील नसावे. त्याला विद्याची गरजही नाही. किंवा जगातील इतर ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळणार्‍यांची संख्या किती आहे आणि पुण्यात किती आहे असा विदा विचारात घेतला तर?

मुळात मुद्दा अधिक गहन आहे कदाचित त्यामुळेच त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कळीचा प्रश्न हा आहे की आपण शिस्तीने वागायला कधी शिकणार?

उपलब्ध विद्यावरून याचे उत्तर आहे, कधीच नाही.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

It's one of those irregular verbs, isn't it: I have an independent mind; you are an eccentric; he is round the twist. ~ Bernard, Yes, Minister

आकडेवारीची निष्काळजी फेकाफेकी चांगली नाही

सहमत.

आकडेवारीचा सुयोग्य वापर करणे सहज शिकता येते. लेखनात आणि वाचनात आपण "आकडेवारी अर्थपूर्ण असावी" असा आग्रह केला पाहिजे.

- - -
अवांतर : मी आजकाल "विदा" शब्द "डेटा"साठी प्रतिशब्द म्हणून वापरत नाही. मराठीत पूर्वीपासून उपलब्ध असलेला, तितकाच लहान शब्द "आत्त" वापरतो. याचा आनुषंगिक फायदा असा : "विद्याला" हा मला नावडणारा शब्दध्वनी आणि लिखित-आकृती टाळता येतात.

सर्वत्र

दुर्दैवाने आकडेवारीची फेकाफेकी करून हवा तो निष्कर्ष काढणे सगळीकडेच चालू आहे असे दिसते. नुकतेच वाचनात आलेले आणखी एक उदाहरण.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

It's one of those irregular verbs, isn't it: I have an independent mind; you are an eccentric; he is round the twist. ~ Bernard, Yes, Minister

 
^ वर