तुम्ही बेल वाजवली का?

गेल्या काही दिवसात ह्या जहिराती पाहिल्या आणि योगायोगाने त्याचवेळेस इतर काही घडामोडी चाललेल्या बघून काही विचार मनात डोकावले. जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा मूकपणे बघत राहणे हे केवळ चूकिचे नसून गुन्ह्याला/गुन्हेगाराला प्रत्यक्ष मदत करणारे आहे. ह्या जाहिरातीत दाखवल्या प्रमाणे कुणीतरी बेल वाजवणे फार महत्वाचे आहे.

कायदाही म्हणतो अशा वेळेस चूप बसू नका. गुन्हा होणार आहे हे कळल्यावर आपण चूप का बसतो असे चूप बसणे इम्मॉरल आहे, आणि हे फक्त डोमेस्टिक वायलंसपुरतेच नाही. आणखी एक जाहिरात त्याच कॅम्पेनमधली:

ही जाहिरात म्हणजे आपापसात चर्चा करून काहीच न करणे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. तुम्हाला जी काही माहिती असेल ती निर्भीडपणे उघड करा, अशाने जे लोक गुन्ह्यांवर पांघरुण घालायचा प्रयत्न करत आहेत त्यांना आळा बसेल आणि गुन्हेगारांना योग्य ते शासन होईल.

लेखनविषय: दुवे:

Comments

मिपा

हम्म...मिपावर सध्या दुसर्या video मध्ये दाखवल्याप्रमाणेच चालू आहे...ज्याची त्याला पोच नाही आणि शेजार्याला झोप नाही..

असेच पण थोडे वेगळे

चर्चाप्रस्तावातील "योगायोगाने त्याचवेळेस इतर काही घडामोडी चाललेल्या" वरून हल्ली मिसळपाव संकेतस्थळावर चाललेल्या एका चर्चेचा विचार मनात आला. त्यावरून येथील चर्चाप्रस्तावाला अनुलक्षून काही विश्लेषण सुचले :

भाग १:
१. तिथे चाललेल्या चर्चेत "ज्यांचे अजून नुकसान झालेले नाही" त्यांचा सर्वाधिक फायदा होतो आहे. म्हणजे पैसे हरवण्यापूर्वीच प्रतिबंध होतो आहे. (सारांश : या प्रकाराचा भावी बकरे वाचण्याचा फक्त खूप फायदा, तोटा कोणालाच नाही.)

२. काही लोक चर्चेच्या अनुषंगाने उघडपणे आणि व्यक्तिगत निरोपांमधून नुकसानभरपाई कशी होऊ शकेल याबद्दल काही युक्त्या सांगत आहेत. पैकी कित्येक जण प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. यामुळे झाल्यास काही थोड्या लोकांना पैसे परत मिळवण्यात यश मिळू शकेल. झाले त्यापेक्षा अधिक नुकसान कोणाचेच होणार नाही. (सारांश : या प्रकाराचा फक्त थोडा फायदा, तोटा कोणालाच नाही.)

३. काही प्रतिसादकर्त्यांना "हे असे कसे होऊ शकते" याविषयी मनोवैज्ञानिक कुतूहल आहे. त्यांना अभ्यासाठी कदाचित काही आधारसामग्री मिळू शकेल. परंतु फार नाही - त्या चर्चेतून काढलेले मनोवैज्ञानिक निष्कर्ष तार्किकदृष्ट्या तकलादू आहेत. तकलादू निष्कर्षावरून "आपण मूर्ख बनू शकत नाही" असा गैरवाजवी आत्मविश्वास बळावल्यास पुढे गंडले जाण्याची शक्यता वाढते. (सारांश : या प्रकाराचा फक्त थोडासाच फायदा, निष्कर्ष चुकल्यास थोडासाच तोटा.)

४. काही प्रतिसादकर्ते पैसे हरवलेल्या मूर्ख लोकांबद्दल हसून आनंद उपभोगत आहेत. किंवा त्यांना फाजील सहनशीलतेबद्दल दोषारोपण करून स्वतःच्या उच्च नैतिक स्थानावर अधिक आनंदाने स्थापन होत आहेत. मात्र ज्यांचे हसे होते, ज्यांच्यावर दोषारोपण होते, त्यांना क्लेश होतो. (सारांश : या प्रकारात ज्यांचे मनोरंजन, आत्मप्रौढी होते, त्यांचा खूप फायदा, ज्यांचा अपमान होतो त्यांचा खूप तोटा.)

(वरील विश्लेषणात पैसे गिळंकृत करणार्‍याच्या फायद्या तोट्याचे गणित केले नाही. वरील चारही प्रकारात त्याचा तोटाच होतो. त्यामुळे चार प्रकारांमध्ये वेगळे विश्लेषण सांगण्याची गरज नाही.)

- - -

प्रकार १ आणि प्रकार २ यांच्यातून निव्वळ फायदा (net benefit या अर्थी) मिळतो. प्रकार ४ मधून होणारा तोटा हा ज्याला आधीच दुखापत झाली त्याला होत असतो. त्यामुळे असा तोटा दुखापत झालेल्याला प्रकार १+२च्या फायद्यांपेक्षा अधिक वाटू शकतो.

खुद्द मला वरील नैतिक गणित करताना त्रास झाला, पण कालांतराने १+२चा फायदा मला ४मधील तोट्यापेक्षा निश्चित जास्त वाटतो आहे. परंतु माझीच आदली चलबिचल बघता असे वाटते, की काही बळींच्या दृष्टीने तुलनेचे गणित वेगळे सुटेल.

- - -
भाग २:

वरील उदाहरणे सांसारिक हिंसेबद्दल आहेत. वरील प्रकारचे विश्लेषण पूर्णतः तिथे लागू पडत नाही. थोडेसे लागू पडते.
(१) बेल वाजवून वर्तमानकाळात होणारी दुखापत प्रामुख्याने थांबते (वरच्या उदाहरणात मुख्य फायदा भविष्यात फसणार्‍यांना होतो. सारांश : हल्लीच्या दुखणेकर्‍याचा खूप फायदा. तोटा कोणाचा नाही.)
(२) फोनवरून चुकीच्या व्यक्तीशी बोलून कदाचित कोण्या दुसर्‍या ठिकाणची मारहाण थांबू शकेल. (सारांश : भविष्यातील दुखणेकर्‍याचा नगण्य फायदा, हल्लीच्या दुखणेकर्‍याचा तोटा चालू राहातो.)
(३) "लोक बेल का वाजवत नाहीत, चुकीच्या ठिकाणी फोन का करतात?" याबद्दल तकलादू मनोविश्लेषण. सशक्त विश्लेषण असल्यास त्या मानसिक प्रवृत्तींवर परिणाम करणारी जाहिरात बनवता येते, लोकशिक्षण करता येते. भविष्यातील दुखणेकर्‍यांचा फायदा त्यावरून कमीअधिक होऊ शकेल. (सारांश : विश्लेषण तकलादू की सशक्त त्यावर फायदा-तोटा अवलंबून आहे.)
(४) "मारहाण सहन करणारे खुद्दच का पुढे येत नाहीत, पोलिसांकडे का जात नाहीत" याबद्दल त्यांचे हसे आणि नैतिक दोषारोपण करून मनोरंजन आणि आत्मप्रौढी वाटणारे लोक. असे लोक अपल्याला अधूनमधून समाजात दिसतात, पण सुदैवाने मराठी संकेतस्थळांवर क्वचितच दिसतात. काही दुखणेकर्‍यांना समाजातील नाचक्कीपेक्षा घरची मारहाण परवडते, असे वाटत असल्यास तोटा होतो. (सारांश : ज्यांचे मनोरंजन होते, किंवा आत्मप्रौढीची छान भावना मनात येते, त्यांचा फायदा - हा नैतिकदृष्ट्या अयोग्य मानला जातो. काही दुखणेकर्‍यांचा फार तोटा. ज्या दुखणेकर्‍यांना मरहाण असल्या लांछनांपेक्षा नावडते, ते दुखणेकरी लक्ष उपय करतातच - त्यांचा नगण्य तोटा.)

(वरील विश्लेषणात मारहाण करणार्‍या व्यक्तीचा फायदातोटा लक्षात घेतलेला नाही. बहुतेक वरील चारही प्रकारांमध्ये त्याची नाचक्कीच होते. परंतु मारहाण केल्याचे थांबल्यामुळे संबंध सुधारतात असे काही लोकांना जाणवते. असे असल्यास वरील प्रकार १-३ मध्ये मारहाण करणार्‍याचा दूरगामी फायदा असेल.)

यात १-३ मध्ये तोट्यापेक्षा फायदा आहे - कमीजास्त मात्रेत का असेना. पण ४ मधील तोटा पूर्णतः दुर्लक्ष करण्यालायक नाही. उत्तम लोकशिक्षणात १-३ मधले फायदे मिळून ४ मधील तोटा होणार नाही, अशी काळजी घेतली जाते.

वरील दोन्ही जाहिराती या चतुर लोकशिक्षणाचे उत्तम नमुने आहेत. मिसळपावावरील चर्चेत प्रकार ४ मधला तोटा अशाच चतुर आणि संवेदनाशील लेखाने मला घलवता आला असता का? असा विचार मनात चालू आहे.

माझे मत

४. काही प्रतिसादकर्ते पैसे हरवलेल्या मूर्ख लोकांबद्दल हसून आनंद उपभोगत आहेत. किंवा त्यांना फाजील सहनशीलतेबद्दल दोषारोपण करून स्वतःच्या उच्च नैतिक स्थानावर अधिक आनंदाने स्थापन होत आहेत. मात्र ज्यांचे हसे होते, ज्यांच्यावर दोषारोपण होते, त्यांना क्लेश होतो. (सारांश : या प्रकारात ज्यांचे मनोरंजन, आत्मप्रौढी होते, त्यांचा खूप फायदा, ज्यांचा अपमान होतो त्यांचा खूप तोटा.)

हसून आनंद उपभोगण्याबाबत आणि उच्च नैतिक स्थानावर स्थानापन्न होण्याबाबत म्हणाल तर ते अटळ आहे. पण ह्या बाबी वारंवार लोझेंजसारख्या चघळून लुबाडणूक झाल्याच्या वेदनेचे शमन होणार असल्यास हरकत नाही. (हे वाक्य तुमच्या प्रतिसादाला मुळीच उद्देशून नाही, हे इथे स्पष्ट करावेसे वाटते आहे.)

ह्या अशा लोकांसाठी लोकलाज महत्त्वाची आहे; ह्या लोकांसाठी रक्कम महत्त्वाची नाही, असा निष्कर्षही काढता येईल. आपल्याला लुबाडलेले आहे, आपल्यासोबत काहीतरी वाईट घडले आहे किंवा चांगले घडलेले नाही, ही गोष्ट चारचौघांना सांगितल्यावर खरे तर फार बरे वाटायला हवे. मला तरी फार मोकळे वाटते. मी मित्रांना, आप्तांना वेळोवेळी माझ्या दुर्दैवाची खबर देत असतो. असो.

अर्थव्यवस्था खुली झाल्यापासून गावोगावी अशी प्रकरणे होत आहेत. असे असूनही लोक शहाणे का होत नाहीत? आठवड्याभरात ३ टक्के कमवायची इच्छा सगळ्यांनाच असते, असे नाही. तुमच्यासारखे केवळ आपुलकीपायी, फसवले जात आहोत किंवा "धिसिज़ टू गुड्टुबिट्रू" हे कळूनही, पैसे देतात. काही मात्र केवळ शब्दांवर विश्वास ठेवून आपली पुंजी देत असावेत. ह्या शेवटच्या वर्गाबाबत सगळ्यात जास्त वाईट वाटते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

थोडा फरक वाटतो

मी ही‌ माझ्या मित्रांना, आप्तांना वेळोवेळी माझ्या दुर्दैवाची खबर देत असतो. विचार करतो की माझे मित्र, आप्त मला भावनिक आधार देतील. असे नाही की, माझी व्यथा ऐकून ते (मित्र, आप्त) माझी टिंगल करतील, निरर्थक शहाणपणा शिकवतील.

धनंजय यांच्या त्या लेखाबद्दल बोलणार तर इतर वाचकांसाठी संभावीत धोकयाची घंटा त्यांनी वाजवली. म्हणून इतर सर्व वाचकांनी त्यांचे आभारच मानायला हवे. बस्स. आभाराशिवाय येणार प्रत्येक प्रतिसाद त्या लेखाशी अवांतर वाटला.

अवांतर नाही

मी ही‌ माझ्या मित्रांना, आप्तांना वेळोवेळी माझ्या दुर्दैवाची खबर देत असतो. विचार करतो की माझे मित्र, आप्त मला भावनिक आधार देतील. असे नाही की, माझी व्यथा ऐकून ते (मित्र, आप्त) माझी टिंगल करतील, निरर्थक शहाणपणा शिकवतील.

आम्ही बोलून मोकळे होतो. भावनिक आधार मिळेलच असे नाही. आम्ही त्याची अपेक्षा ठेवत नाही. किंबहुना काही जण टिंगलही करतात. जखमेवर मीठ चोळतात. पण आम्हाला त्या टिंगलीचे काही वाटत नाही.

धनंजय यांच्या त्या लेखाबद्दल बोलणार तर इतर वाचकांसाठी संभावीत धोकयाची घंटा त्यांनी वाजवली. म्हणून इतर सर्व वाचकांनी त्यांचे आभारच मानायला हवे. बस्स. आभाराशिवाय येणार प्रत्येक प्रतिसाद त्या लेखाशी अवांतर वाटला.

का बरे? मला तरी अवांतर वाटला नाही. बहुतेक प्रतिसाद विषयाला धरूनच होते. त्यातून समाजप्रबोधनही होत होते.

थोडक्यात आभारप्रदर्शन करून लोकांनी गप्प बसायला हवे. हे प्रकरण फसवणारा व फसणारा ह्यांच्यातले आहे त्यामुळे इतरांनी लक्ष देऊ नये, चूप बसायला हवे असे तुम्हाला वाटते का? असे वाटत असल्यास चुकीचे आहे. आजूबाजूला ज्या घडामोडी घडत असतात त्यावर प्रत्येकाने चौकस नजर ठेवायला हवी. वाईट प्रवृत्तींना शक्य होईल तिथे, शक्य होईल तसा विरोध करायलाच हवा.

इतर संकेतस्थळांवर टिका-टिप्पणी करणे हे उपक्रमाचे धोरण नाही याची कृपया नोंद घ्यावी. व्यक्तिगत रोखाचा मजकूर संपादित करण्यात आला आहे.

असो. सगळ्यांचे भले होवो! ह्यातून मार्ग निघो !

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हो नजर चौकस झाली आहे

हे प्रकरण फसवणारा व फसणारा ह्यांच्यातले आहे त्यामुळे इतरांनी लक्ष देऊ नये, चूप बसायला हवे असे तुम्हाला वाटते का?

झालेल्या घटनेतला माझा नसलेला सहभाग व ह्या घटनेबद्दल मला असलेली तुरळक माहिती, मला ह्या घटनेबद्दल स्पष्ट मत बनविण्यास असमर्थ ठरवतात (माझे अस्पष्ट मत कुणासही कामास येणार नाही हे मी जाणतॊ). व मी चूप बसतो.

आजूबाजूला ज्या घडामोडी घडत असतात त्यावर प्रत्येकाने चौकस नजर ठेवायला हवी.

हो नजर चौकस झाली आहे. म्हणूनच धनंजय यांचे अनेक आभार. त्यांनी हा लेखच लिहीला नसता तर माझी नजर ह्या विषयाबद्दल आळशीच राहिली असती असे परत परत वाटून जाते.

वाईट प्रवृत्तींना शक्य होईल तिथे, शक्य होईल तसा विरोध करायलाच हवा.

ह्या विषयाबद्दलच बोलयचे झाले तर फसलेल्या लोकांनी आपापले अनुभव कथन करून लोकजागृती करायला हवी म्हणजेच अश्या लोकांना अनुभव कथन करावयास प्रवृत्त करायला हवे, असे वाटते.

आता, धनंजय यांच्या प्रतिसादातील वाक्य बघा.

खुद्द मला वरील नैतिक गणित करताना त्रास झाला, पण कालांतराने १+२चा फायदा मला ४मधील तोट्यापेक्षा निश्चित जास्त वाटतो आहे. परंतु माझीच आदली चलबिचल बघता असे वाटते, की काही बळींच्या दृष्टीने तुलनेचे गणित वेगळे सुटेल.

त्यांच्या नैतिक धैर्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. पण त्यांच्यासारख्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या मानसाच्या मनाची जर चलबिचल होत असेल तर इतर मंडळी कुठल्या धैर्याने आपले अनुभव कथन करतील?

प्रतिसादकर्त्यांनी त्या मंडळीना ते नैतिक धैर्य गोळा करण्य़ास, आपापल्या प्रतिसादातून मदत करावी असे वाटते.

बेल वाजवून पहा

बेल वाजवून पहा :) दारावर पोलिस उभा होता म्हणून बेल वाजवता आली नाही अथवा गरज वाटली नाही असे उत्तर ऐकायला मिळेल कदाचित. अथवा दारावर बदमाश कंपनी होती. बेल तर् दूरच असे काहीतरी होईल.






'बुडीत खाते' पुन्हा बुडवले

हल्ली मिसळपाव संकेतस्थळावर चाललेल्या एका चर्चेचा

'बुडीत खाते' पुन्हा बुडवलेले दिसते. धागा गायब झालेला दिसतो. कारण काय असावे बरे? असो. गद्यलेखनाचा चांगला नमुना होता. किमान संदर्भासाठी तरी कुठेतरी जतन करायला हवा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मजकूर संपादित.

हम्म्

आता बेलची वीजच कापलेली दिसते...

आपला
गुंडोपंत

डोमेस्टिक व्हायलंस

डोमेस्टिक व्हायलंसचा अनुभव विचित्रही येतात. जी दुसरी चित्रफीत आहे तसा प्रसंग माझ्या लहानपणी इमारतीत झाल्याचे आठवते. आजूबाजूच्या लोकांनी सजगपणे पोलिस तक्रार केली परंतु पोलीस आल्यावर सदर स्त्रीने "अहो, काहीच झाले नाही. या लोकांचा काहीतरी गैरसमज झाला आहे." असे सांगितले आणि तिच्या घरातल्यांनी "हे लोक आमच्यावर जळतात. आमचे बरे त्यांना पाहवत नाही. आपला काहीही संबंध नसताना नाके खुपसतात." असा आरोप केला.

त्यानंतर या बाईच्या नवर्‍याने येऊन "आमच्या खाजगी भानगडींत तुम्हाला लक्ष द्यायचे कारण नाही. यांत पडाल तर खबरदार!" अशी धमकी दिली आणि त्या बाईने येऊन "तुम्ही यात पडू नका. मला जर या लोकांनी घरातून बाहेर काढले तर माझे वडिल मला थारा देणार नाहीत कारण माझ्या मागच्या दोन बहिणींची लग्ने व्हायची आहेत." अशी विनवणी केली.

घरगुती हिंसाचारात काही काळाने गुन्हेगार आणि पिडित हे बरेचदा वेळ आल्यावर एकत्र होतात. गुन्हा झाला हे सांगायची टाळाटाळ केली जाते. प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. शहानिशा करणार्‍यावर विचित्र आरोप केले जातात. त्यांना तोंडघशी पाडले जाते. त्यामु़ळे लोक दूर राहणे पसंत करतात.

गुन्हेगार आणि पिडीत एकत्र होण्याची कारणे पुढीलप्रमाणे

१. भीती
२. दबाव
३. प्रेम/मोह
४. लाज
५. आर्थिक अडचणी

गुन्हेगार आणि पिडित एकत्र आल्यावर तिर्‍हाईत आपल्या डोक्याला हात लावून बसतात आणि कशाला आपण या भानगडीत पडलो असे म्हणतात.

असो. वरील घटनेचा नेटाने पाठपुरावा केला होता आणि सदर जोडपे एकत्र कुटुंबातून वेगळे राहील अशी व्यवस्था केली होती.

क्लासिक केस

डोमेस्टिक व्हायलंसचा अनुभव विचित्रही येतात. जी दुसरी चित्रफीत आहे तसा प्रसंग माझ्या लहानपणी इमारतीत झाल्याचे आठवते. आजूबाजूच्या लोकांनी सजगपणे पोलिस तक्रार केली परंतु पोलीस आल्यावर सदर स्त्रीने "अहो, काहीच झाले नाही. या लोकांचा काहीतरी गैरसमज झाला आहे." असे सांगितले आणि तिच्या घरातल्यांनी "हे लोक आमच्यावर जळतात. आमचे बरे त्यांना पाहवत नाही. आपला काहीही संबंध नसताना नाके खुपसतात." असा आरोप केला.

तुम्ही सांगितलेली केस क्लासिक आहे. पीडित, पीडिताचे नातेवाईक अशावेळी सोयीस्कर कलाटणी देतात किंवा उलट अंगावर धावून येतात , हे खरे आहे. पण असे असले तरी गुन्हा घडल्यावर किंवा घडत असताना, मग तो दखलपात्र किंवा अदखलपात्र फौजदारी गुन्हा का असेना, त्याची बघ्यांनी योग्य ती दखल घ्यायला हवी. प्रत्येक वेळेस मदतीला पोलीस असतीलच असे नाही. विशेषतः ठाण्यातल्या पोलिसांच्या मागे खूप भानगडी असतात.

एकदा का फौजदारी गुन्हा दाखल झाला की पोलिसांना मागे वळता येत नाही, असे वाटते. त्यामुळे पोलीस गुन्ह्यांची, विशेषतः जे दखलपात्र किंवा अतिशय गंभीर स्वरूपाचे नाहीत, एकदम पक्की नोंद करीत नाहीत, असे वाटते. शिवाय मधल्या काळात संबंधित पक्षांशी बोलून प्रश्न सुटण्यासारखा असला तर सोडवता येतो. (किंवा पैसे घेऊनदेऊन 'सेटल' करता येतो. केस खराब करता येते. म्हणजे मामुली कलमे लावणे. एव्हिडन्स ट्याम्पर करणे वगैरे.) असो. चूभूद्याघ्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लोकजागृती

उत्कृष्ट/समयोचीत जाहिराती. गुन्ह्यांना आवर घालण्यासाठी योग्य वेळी बेल वाजवणे हे (फार) महत्वाचे आहे. हा लेख (इथे) आल्या नंतर मिसळपाववरही अनेकांनी बेल दाबायला सुरू केले आहे.
(व्हिसल ब्लोअर) बेसनलाडू

नाक खुपसणे

सदर प्रकरणात ज्यांचे (कॅन्सरच्या उपचारासाठी माणुसकीपोटी दिलेले) पैसे गेले त्यांच्याबद्दल अत्यंत वाईट वाटणे,
गुंतवणूक म्हणून सट्टेबाजीवर विश्वास ठेवून देणाऱ्यांचे पैसे गेले त्यांच्या आर्थिक इग्नोरंसबद्दल कीव येणे
व या घटनेत सामील होण्याचा प्रसंग आला नाही याबद्दल दैवाचे आभार मानणे अशा मिश्र भावना माझ्या मनात आहेत.

या आर्थिक फसवणुकीचा मला अगदी दोन दिवसांपूर्वी सुगावा लागला. त्यामुळे शिटी वाजवण्याची वेळ मिळाली नाही. पण एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून दोन अपरिचितांच्या आर्थिक व्यवहारासंबंधी पुरेशी माहिती नसताना अशी शिटी वाजवणे हे नाक खुपसण्यासारखे होऊ शकते असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तिर्‍हाईत/बेल

वरील व्हिडीओमध्ये जे दाखवले आहे - की बेल दाबा, ते बरोबर आहे, पण वरील व्हिडिओमध्ये बेल तिर्‍हाईत वाजवत आहेत, पीडित लोक वाजवत नाहीत. स्वत:ची सुटका करून घ्यायला मात्र पीडित स्त्रीनेच पुढे यावे लागेल. तिला कायद्याचे बळ लागेल, कोणी मदत करणारे लागेल आणि काहीएक प्लॅन लागेल. तेच दुसर्‍या व्हिडीओत गॉसिप करणारे इतर आहेत, पीडित स्त्री नाही.

एखाददुसर्‍या स्त्रीचे वेगळे आहे- पण एखादा क्लास ऍक्शन लॉसूट करायचा असला तर आधी सर्व पीडितांनी एकमेकांना विश्वासात घ्यायला हवे.
तो विश्वास नसला, तर आधी तो विश्वास तयार करावा लागतो. म्हणजे न पाहिलेल्या, न भेटलेल्या, खरी ओळख नसलेल्या, आणि तरीही परिचित अशा व्यक्तींशी संबंध येतो. आता अशा विश्वासाचा काही लोक गैरफायदा घेतात, काही लोक असा कुठचाच विश्वास कोणावर ठेवत नाहीत.
तेव्हा ओळखी/अनोळखीच्या सीमारेषेवर असलेल्या हया धूसर जागी लोकांचे मानापमान, लोकलज्जा असे मध्ये येत नसावे तर प्रत्येकाचा आपापल्या परिघात विचार चाललेला असावा असेच दिसून येते.

सहमत

लेखाचा रोख कुठल्या दिशेने आहे ते सर्वश्रुत आहे.

काही लोकांचे असे म्हणणे आहे की ज्यांचे पैसे गेले ते बोलत नसतील तर तुम्हाला इतका इंटरेस्ट का? काही लोकांचा हेतू मजा बघणे आहे हे दिसतेच आहे. पण हे नेहेमीच होते. चर्चा मुद्यांवरून गुद्यांवर येणे, १७६० आयडीचा धुमाकूळ, राष्ट्राच्या दृष्टीने गंभीर घटनांमध्ये राष्ट्रविरोधी पवित्रा घेणे वगैरे गोष्टी मसावर चालत असतानाही हे लोक मजाच बघतात. त्यात काही नवीन नाही. इथे मुद्दा व्यापक आहे.

मसावर हे पहिल्यांदा घडले आहे. हे किती लोकांच्या बाबतीत झाले हे जाणून घेण्याचा हेतू हा की प्रकरणाची व्याप्ती समोर यावी. यात कारवाई व्हावी किंवा नाही हा संबंधित व्यक्तींचा प्रश्न आहे. एकुणात जे वाचायला मिळते आहे त्यावरून हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचे दिसते. (तरीही दोषी व्यक्तीचे समर्थन करणारे पाहून धृतराष्ट्र आठवला.)
कुठलाही अनुचित प्रकार घडला की सत्याला सामोरे न जाता प्रकरण मिटवण्याकडे बहुतेक लोकांचा कल असतो. दुर्दैवाने यामुळे संधीसाधू व्यक्तींचे फावते.

समजा धनंजय यांनी या प्रकरणाला वाचा फोडली नसती तर?
---
सम पीपल आर भलाचंगा, सम आर भिकमंगा
कॅनॉट जज एनीबडी, सरीफ ऑर लफंगा

विजकपात

विजकपात आहे; बेल वाजली नाही. टिंक् टिंक् :)

एखाद्या घरात पिडित नसेल तरीही बेल वाजवून त्रास देता येईल आणि काहीजण दूखावलेले नसताना ४९८अ कायद्याची कायद्याची मदत घेऊन दु:ख देतो अशी बतावणि करुन त्याला जेलमधे टाकतील.

बेल वाजवली पण.....

मी एकदा रेल्वेने प्रवास् करीत होतो. शेजारीच नवविवाहीत दांपत्य होते. नवरा उभा होता आणि बायको बसलेली होती. त्यांचे घरुन निघतांना काही भांडण झाले असावे. बाजूच्या माणसाचा धक्का लागण्याचे निमित्त झाले अन् नवरोबाने त्याच्या बायकोच्या कानाखाली मारली. हे पाहून एका व्यक्तीला बेल वाजवायचा मोह झाला. त्याने बेल वाजवली देखील. मात्र पुढच्याच सेकंदाला मार खाण्यार्‍या बायकोने त्या व्यक्तीच्या कानाखाली मारली. आमचे नवरा-बायकोचे भांडण आहे. तु कशाला मध्ये तोंड घालतो ? असे म्हणून त्यालाच झाडले. बेल वाजविणारा बिचारा पुढील स्टेशनावर उतरुन गेला.

सत्यमेव जयतेच्या निमित्ताने

चर्चा वर आणतो आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर