यांत्रिक कविता
श्री. धनंजय यांच्या लेखाच्या शीर्षकात कविता-यंत्र हा शब्द पाहिला आणि पूर्वी वाचलेला "कवितांचा कारखाना(यांत्रिक कविता)" हा विनोदी लेख (बहुधा श्री.कृ.कोल्हटकर यांचा) आठवला.या यंत्राच्या काही कळा दाबल्या आणि ते गरगर फिरवले की कविता आपोआप तयार होऊन बाहेर पडते. मग आपण अर्थ लावायचा. अशी काहीशी कल्पना होती.
श्री.धनंजय यांचे लेख वाचून विषयाची गहनता लक्षात आली. श्री.राजेश घासकडवी यांनीही असा एक प्रयोग केला होता (अशी माझी समजूत आहे.)विषय आवडीचा असला तरी आवाक्यात येत नाही. लेखाचे पूर्णांशाने आकलन झाले(अथवा ते झाले आहे असा समज झाला) तरच प्रतिसाद लिहिणे शक्य होते.तेव्हा लेखाचे शीर्षक वाचून ज्या विनोदी लेखाची आठवण झाली, त्या लेखाविषयी लिहावे हे बरे! या दोन लेखांत "यांत्रिक कविता" या कल्पनेव्यतिरिक्त अन्य कोणतेही साम्य नाही.
त्या लेखात एक यांत्रिक कविता होती ती अशी:
मामा आत्या काका गागा।
आता याचा अर्थ लावायला हवा.
विवेचन: *पाला: वृक्ष वेलींची पालवी. वृक्षवेली बागेत(उपवनात) असतात. म्हणून पाला शब्दावरून बाग असा अर्थबोध होतो.
*नाला: ओढा. म्हणजे पाणी आठवते. बागेच्या संदर्भात पाणी म्हणजे पुष्करिणी, तळे हे(तळ्यातील पाण्याला ओघ नसला तरी!);ओघानेच आले.
*जोडा: लक्ष्मी नारायणाचा जोडा हा शब्दप्रयोग परिचित आहेच. त्यावरून इथे जोडा म्हणजे युगुल.(नायक, नायिका)
*फोडा: हे क्रियापद मानावे लागेल. नायिकेने किंकाळी फोडली असा अर्थ संभवतो.
*मामा:या शब्दावरून चांदोमामा आठवणे स्वाभाविक आहे. चंद्र शब्द रात्र सुचवतो. पर्यायाने मामा= चांदणी रात्र असा अर्थ सहजच लागतो.
*आत्या, काका: हे दोन शब्द एकत्र घेतल्यास "आत्याबाईंना मिशा असत्या तर काका म्हटले असते" हे अपरिहार्यपणे आठवते. म्हणजे "आत्या काका" हे शब्द मिशादर्शक आहेत असे मानणे सयुक्तिक होईल.
*गागा: आद्याक्षरे मानल्यास गाणे गाते/गातो/गातात(द्वंद्वगीत) असा अर्थ करण्यात काहीच प्रत्यवाय नाही.
: वरील सर्व विवेचनावरून अन्वयार्थ असे:
अन्वय: मामा पाला नाला जोडा(भेटली).आत्या काका (पाहून किंकाळी) फोडा.(आणि) गा गा.
अर्थ:
गाणे कोणते? प्रत्येकाने कल्पना करावी. एक संभाव्य गाणे असे:
नायिका:
तव पीळ मिशीचे हलले रे!
नर्तन विचलित झाले रे!
तिलोत्तमेचे मन बावरले
अधर ऊर्वशीचे थरथरले
रंभेचे उत्तरीय ढळले
मेनकाचित्तही चळले रे। तव पीळ मिशीचे.....
****************************************************
Comments
+1
+1
बेश्ट की हो!
चन्द्रशेखर
ह ह पु वा
एका दगडात दोन पक्षी?
दुसरे छोटा गंधर्व
श्री यनावालासर यांच्या कारखान्यात गडबड आहे काय ? आमच्याकडील संभाव्य गाण्यात
"उरोज उर्वशीचे थरथरले " असे आहे. आता शब्द फ़िरवले जाण्याऐवजी श्री. यनावलासरांच्या कारखान्यात गात्रे तर फ़िरवली जात नाहीत ना ? की सर छोटा गंधर्व यांचा कित्ता गिरवून उपक्रमवासीयांच्या बालमनावर विपरित परिणाम होवू नयेत म्हणून सुधारित आवृत्ती देत आहेत ?
(शाळकरी वाचकांनी हा प्रतिसाद वाचू नये)
शरद
पिटातील
आम्ही पिटात बसून शिट्ट्या माराणारं पब्लिक. आमच्यासाठी कृपया गाण्यांच्या PG-13 आवृत्त्या यापुढेही द्याव्यात ही विनंती. :)
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे
तोंड
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आरागॉर्न लिहितातः''आमच्यासाठी गाण्यांच्या... आवृत्त्या यापुढेही द्याव्यात ...."
यावर विचार करता असे लक्षात आले:
सुंदर युवतीला चारी अंगांनी नीट न्याहाळण्यासाठी शंकराला आणखी चार तोंडे फुटली आणि तो पंचानन झाला, याचे आपल्याला कौतुक वाटते. पण यांत्रिक कवितेतील पीळदार मिशांच्या नायकाविषयी पार्वतीच्या मनात आकर्षण निर्माण झाले असे दूरान्वयाने सुचवले तरी वादाला तोंड फुटेल. "हिंदुदेवतांचा अपमान करणार्याचे आम्ही तोंड फोडून टाकू"असे संस्कृतिरक्षक दर्डावतील.
अशांच्या तोंडी कोणी लागावे? तेव्हा चार अप्सरांविषयी लिहून तोंड मिटून गप्प बसलेले बरे!
+१
मस्तच. अजून दुसरा अर्थ येउ देत. (गागा = लेडी गागा वगैरे आणि ही लेडी गागा ह्यांच्याच बागेत आली आहे आणि तिला पाहायला मामा , काका , आत्या वगैरे आल्या. त्यामुळे नायक नायिकेचं प्रेम प्रकरण उघडकीस आल असुन ते मग हिंदी चित्रपटातील गाण गात आहेत : -- हमारी पकडी गयी है बस चोरी..)
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
गागा म्हणजे
गागा हा शॉर्टफॉर्म गामा-गुंगा या दोन पहिलवानांसाठी वापरला जावयाचा. १०० वर्षांपूर्वी ते डब्ल्यूडब्ल्यूएफ़ मधील अजस्त्रकाय
पहिलवानांसारखे प्रसिद्ध होते. कवीला मामा,आत्या, काका त्या श्रेणीतले वाटत असावेत !
शरद
ऐतिहासिक कविता
मला तर या कवितेत फार मोठे ऐतिहासिक भाष्य दिसले.
पाला नाला जोडा फोडा ।
मामा आत्या काका गागा।
ही कविता शिवाजीराजांच्या राजकारणावर भाष्य करते. स्वराज्याच्या स्थापनेसाठी माणसे, बागा-वने-शेते, पाणी जोडा किंवा फोडा. मामा, आत्या, काका आणि गागाभट्टांची साथ मिळत असेल तर त्यांना स्वराज्यासाठी जोडून घ्या पण जोडण्यास तयार नसतील तर फोडायलाही हरकत नाही. ;-)
समर्पक शब्दयोजना
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
संदर्भः श्री. शरद यांचा प्रतिसाद.
* मिशी आणि ओठ यांचा अन्योन्य संबंध स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळे:
"अधर ऊर्वशीचे थरथरले" ही शब्द योजना समर्पक आहे असे वाटते. त्यांनी दिलेला पर्याय छंदात सुद्धा बसत नाही.मात्रा चुकतात.
*"उपक्रमवासीयांच्या बालमनावर विपरित परिणाम...." या वाक्यात शरदराव उपक्रमींना बालके समजतात. मी या विचाराशी मुळीच सहमत नाही. उपक्रमी परिपक्व, जाणकार आणि बुद्धीने अधिक प्रगल्भ आहेत हे नि:संशय. म्हणून येथे सूचक लेखन योग्य. यास्तव इथे "रंभेचे उत्तरीय ढळले" एव्हढे पुरे.सगळे उघड उघड लिहिले म्हणजे संकेतस्थळ वयात आले असे नव्हे!
दूरगामी परिणाम
मानवांनी देवांविरुद्ध लव जिहाद सुरू केलेला दिसतो.
पण कोणती प्रेयसी प्रियकराला असा भाव देईल? हे म्हणजे एखाद्या स्टार्टअपच्या एचआर ने "गूगलचा एचआर तुझी चौकशी करीत होता" असे म्हणण्यासारखे आहे.
वेदांमध्ये मिशीच्या सेक्स अपील विषयी काही उल्लेख आहेत का? अन्यथा "वेद, राजा रविवर्म्याची चित्रे आणि यनाभारत यांच्यात सुसंगती लावताना होणारे घोळ" या विषयावर ३०१० साली चर्चेचा प्रस्ताव येईल.
शुभानन गांगल
मोरोपंतांच्या घरील भिंतींवर अनेक यमकयुक्त आणि अनुप्रासयुक्त शब्द लिहून ठेवलेले असायचे, असे म्हणतात. गरज़ पडली की त्यांतला एखादा उचलून ते आपल्या आर्येत टाकायचे.
हल्लीच्या काळी अशीच सोय शुभानन गांगल यांनी करून दिली आहे. कोणत्याही भाषेत सहजरीत्या कविता पाडता येतील यासाठी साहाय्यरूप होणारे एक पुस्तक त्यांनी लिहिले आहे. गांगलांच्या संकेतस्थळावर त्याची जाहिरात असते.--वाचक्नवी
सामाजिक, राजकीय, कौटुंबिक अर्थ
पाला नाला जोडा फोडा ।
मामा आत्या काका गागा।
घोड्यांच्या पायाला नाल जोडून (भाजी) पाला फोडून (भरडून) काढा. मग मामा, तुम्ही आत या - राज्य तुमचंच आहे. काका, तुम्ही खुशाल गा. तुम्ही कितीही भिकार चालीवर कितीही भसाड्या आवाजात गायलात तरीही तुम्हाला कोणी बोलण्याची शामत नाही. पाला हे उघड उघड पददलितांचं प्रतीक आहे, ते नालांखाली चिरडावं, व आपलं राज्य निर्माण करून आपल्या नातेवाईकांना झुकतं माप द्यावं असं बेमुर्वतखोरपणे करणाऱ्या राजकारण्यांवर ती टिप्पणी आहे.
दुसरा थोडा अनवट अर्थ आहे. पाला फोडा म्हणजे पा शिल्लक राहातो, त्याला नाला जोडा म्हणजे 'पानाला' शब्द तयार होतो. गागा हे याया चं अपभ्रष्ट रूप आहे. म्हणजे जेवणाच्या पंगतीच्या वेळी मामा आत्या व काका यांना पानाला याया असं म्हटलेलं आहे. पण हा अर्थ ओढूनताणून काढल्यासारखा वाटतो. कदाचित वरील अर्थामुळे कवीला कोर्टात जाण्याची पाळी आली तर एक साधाभोळा अर्थ पळवाट म्हणून देण्यासाठी तो असेल कदाचित.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
गमतीदार कविता
यात "चित्र" हा शब्दालंकार आहे. पूर्ण कडव्यात दोनच स्वर वापरलेले आहेत. नुसते स्वर बघितले तर असे दिसतात.
आ-आ आ-आ
ओ-आ ओ-आ
आ-आ आ-आ
आ-आ आ-आ
अर्थात व्यंजनांनी अनुप्रास/यमके/द्विरुक्ती हे प्रकार साधलेलेच आहेत.
कोल्हटकरांची प्रतिभा वाखाणण्याजोगी आहे. लेख पुरता वाचेपर्यंत कडवे लक्षात राहिले पाहिजे. कडवे इतपत रंजक, अलंकृत असले पाहिजे, खास. पण निरर्थक बेडौलपणा विशेष हास्यास्पद पाहिजे.
मागे एका नाटकात एका नटीने "बेसुर गाणारी" असे पात्र वठवलेले मी बघितले होते. ही मोठीच तयारीची गायिका होती. ऐकणार्याला हसवण्या इतपत बेसुर-बेताल गायचे, पण प्रेक्षक नाराज होऊन प्रेक्षागृहा सोडून जाणार नाहीत इतपत नव्हे - यासाठी तिला सुर-तालावर बरेच प्रभुत्व लागले.
त्याच प्रकारे कोल्हटकरांच्या यंत्रापाठीमागच्या यांत्रिकाचे कौशल्य स्पष्ट दिसते आहे!
बेसूर-सूर
>>मागे एका नाटकात एका नटीने "बेसुर गाणारी" असे पात्र वठवलेले मी बघितले होते. ही मोठीच तयारीची गायिका होती. ऐकणार्याला हसवण्या इतपत बेसुर-बेताल गायचे,....
मला यावरून मन्ना डे यांचे "यक चतुर नार..." आठवले.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
हे हेत्वारोप उचित नाहीत.
(१) उर्वशीतला व उरोजमधला "उ" हा शब्दालंकार होतो असे कवीला वाटले असेल. यतिभंग होतो, मान्य. पण कविता माझी नाही, कवी काय काय चुका करणार त्याला मी जबाबदार नाही. श्री. यनावालांना "त्यांची" कविता बरोबर वाटत असेल तर तसेही असेल. इतक्या जुन्या कवितेतील पाठभेदांबद्दल कोण काय बोलणार ? असो.
(२) काही उपक्रमवासी प्रौढ व प्रगल्भ असतीलही. पण सर्वच तसे नाहीत. उदा. "माझ्या बालमनाला धक्का बसला '
असे वाचल्याचे नक्कीच आठवते. आणि " प्रौढत्वी निज शैशवास जपणारे " कवी, भले ते छुपे असतील व येथे कविता न देता बाहेर लिहित असतील, बालच म्हणावयास पाहिजेत ना ? काय ? आणि मी स्वच्छ लिहले आहे शाळकरी लोकांनी वाचू नये; प्रतिसाद इतरांकरिता. द्या सोडून.
(३) श्री राजेश यांनी पानाला शब्द मिळवण्यासाठी उगीचच लांबचा घास घेतला आहे. "पा" ला "नाला" जोडा असा सरळ आदेश आहे. म्हणजेच "पानाला" झाले. हे पान म्हणजे पंक्तीतले ताट. आमंत्रणपत्रीकेत नावाच्या अलिकडे रा.रा. (राजमान्य राजेश्री)जोडतात तसे गागा( पक्षी: गामा-गुंगा, भारतीय सुमो) हे विशेषण मामा ,आत्या, काका यांना लावले आहे. फोडा ही एक लहानशी चूक आहे, तेथे झॊडा असे पाहिजे. "पुख्खा झॊडणे" म्हणजे भरपूर खाणे हा वाक्प्रचार लक्षात घेतला म्हणजे अर्थ असा लागतो :
हे तुंदिलतनू मामा, आत्या व काकांनो, तुम्ही (पंक्तीला) पानावर बसल्यावर भरपूर खा ".
शरद
हा पाठभेद नव्हे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शरद आपल्या प्रतिसादात लिहितातः"इतक्या जुन्या कवितेतील पाठभेदांबद्दल कोण काय बोलणार ? "
लेखात नायिकेच्या तोंडी जे संभाव्य गाणे घातले आहे, ते मीच (मला जमेल तसे) लिहिले आहे.ती पूर्वी कधी वाचलेली ,ऐकलेली कविता नव्हे. त्या कवितेत दुसर्या कुठल्या जुन्या कवितेतील ओळ बसेलच असे नाही. ती ओळ चुकीची आहे असे म्हटलेले नाही. ती या कवितेत बसवणे चुकीचे एव्हढेच.यात हेत्वारोप कोणताही नाही.
पाठभेद नव्हे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शरद् आपल्या प्रतिसादात लिहितातः"इतक्या जुन्या कवितेतील पाठभेदांबद्दल कोण काय बोलणार ? "
लेखात नायिकेच्या मुखी जे संभाव्य म्हणून गाणे घातले आहे ते मीच, मला जमेल तसे, लिहिले आहे. ती पूर्वी वाचलेली /ऐकलेली कविता नव्हे. त्या कवितेत दुसर्या एखाद्या जुन्या कवितेची ओळ योग्य तर्हेने बसेलच असे नाही. ती ओळ चुकीची आहे असे म्हटलेले नाही. ती या कवितेत बसवणे चुकीचे आहे इतकेच.इथे कोणताही हेत्वारोप नाही.