तव नयनाचे दल हलले ग
तव नयनाचें दल हललें ग
कवीवर्य बा.भ. बोरकर हे बालकवींप्रमाणेच निसर्गात रंगणारे. त्यामुळे त्यांची एक कविता द्यावयाची म्हटले तर त्यांच्या अनेक निनांतसुंदर निसर्गकविता समोर येतील. पण आज मी आज एक भावकविता देत आहे. हीच का ? तर तुमच्या आवडत्या कवीच्या अनेक कविता तुम्हाला प्रिय असल्या तरी दोन चार तुमच्या स्वत:च्या असतात. त्या नेहमी वाचण्याकरिता नसताच मुळी. एखाद्या खास "मूड"मध्येच त्यांची आठवण येते. आणि "आज अचानक गाठ पडे" प्रमाणे परवा एका टीव्हीवरील कार्यक्रमात ही सुरेल आवाजात ऐकावयास मिळाली.
तव नयनाचें दल हललें ग !
पानावरच्या दवबिंदूपरि
त्रिभुवन हें डळमळलें ग !
तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषि, मुनि, योगी चळले ग !
ऋतुचक्राचे आंस उडाले
आकाशांतुनि शब्द निघाले,
"आवर आवर अपुले भाले
मीन जळीं तळमळले ग !"
हृदयीं माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला जडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपि जग सावरले ग !
संपूर्ण कविता अगदी लहानश्या कालावधीवर बेतलेली आहे. तीने याच्याकडे पाहिले, नेत्रकटाक्ष टाकला असे नेहमीच्या काव्यात सांगितले जाते, व त्याच्या हे लक्षात येते ने येते तोच तीची नजर खाली, जमिनीकडे वळली. या अल्प काळात जे उत्पात घडून आले त्याचे कवी वर्णन करत आहे.
पहिल्या दोन ऒळीतले सौंदर्य ध्यानात घेण्यासाठी जरा सकाळी लवकर उठून बागेत चक्कर मारली पाहिजे. हिवाळ्यातली...एखादी पावसाळ्यातील पहाटही चालेल, पानावर साचलेले दवबिंदू बघा, गवताचे पातेही दिमाखाने हे वैभव मिरवत असते. कोवळे ऊनही काही मिनिटापुरते त्या थेंबाला हिरकणीचे सौंदर्य बहाल करते. वार्याचया एखाद्या झुळुकीने पान हलते, थेंब इकडे तिकडे हलतो, खाली पडणार, पडणार असे वाटे तो परत जागेवर येतो . प्रियकराच्या दृष्टीने मात्र त्रिभुवनच डळमळलेले असते.
दिग्गज पंचाननसे वळले.... येथली गंमत कळावयास थॊडी पुराणांची ओळख पाहिजे. पंचानन हे शंकराचे नाव. हे योगीराज एकदा बसले असतांना एक लावण्यलतिका त्यांना नमस्कार करण्याकरिता प्रदक्षिणा घालते. ती बाजूला वळल्यावर यांना त्या दिशेला एक मुख फुटले. ही चार नवीन तोंडे मिळाली म्हणून शंकर पंचानन. पुराणातला दुसरा पंचानन म्हणजे मारुती. तोही शंकराचा अंशावतार म्हणूनच पंचानन. विंदांच्या गजलेतला मारुती यामुळेच मागे वळून पहात नाही ना ? आता दिग्गजच असे वळले तर गिरि ढासळणारच !
नेत्रकटाक्षाला भाल्यांची उपमा ही काही नवी नव्हे. हृदय विद्ध करावयाला हे नेहमीचेच आयुध आहे. पण या भाल्याच्या पात्यावरील चकचकणार्या , लखलखीत तेजाला "तळमळणार्या मीनांशी" जोडून देणे खास गोयकराचे. येथे मीनाक्षीतले मीन नाहीत. तीच्या नेत्रातील चमक व तळमळत असल्यामुळे सुर्कन फेर्या मारणार्या माश्यांच्या खवल्यावरील चमकेतील साम्य कवीला जाणवत आहे. आणि हो, तळमळही दोघांची, मीनाची व कवीची !
चकमक झडली, ठिणगी पडली व हृदयाला आग लागली ... नाही नाही, प्रेयसी अशी उर्दू गझलेतील साकी सारखी निष्ठूर नाही. तीने नजर खाली वळवली व किमया झाली तरी पुनरपि जग सावरलेच. ( तीला आपल्या सामर्थ्याची पुरेपुर जाणीव असल्याने तर तीने वेळेवर नजर फिरवली नसावी ना ?)
शरद
Comments
आवडले
रसग्रहण आवडले.
पंचाननाची पुराणातील कथा माहिती नव्हती. कवीने ही कल्पना सुरेखच वापरली आहे!
धन्यवाद!
+१
हेच म्हणतो. सुरेख विवरण.
सहमत
आहे. उत्तम रसग्रहण.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आवडले.
संवेदनशील मन काही सुंदर ऐकले पाहीले की हरखून जाते. आणि हे पून्हा साऱ्यांना कौतुक भरल्या उत्साहाने दाखवणे ही याच मनाचे वैशिष्ट्य.
पानावर साचलेले दवबिंदू बघा, गवताचे पातेही दिमाखाने हे वैभव मिरवत असते. कोवळे ऊनही काही मिनिटापुरते त्या थेंबाला हिरकणीचे सौंदर्य बहाल करते. वार्याचया एखाद्या झुळुकीने पान हलते, थेंब इकडे तिकडे हलतो, खाली पडणार, पडणार असे वाटे तो परत जागेवर येतो .
हे मूळ कवितेइतकेच सुंदर.
हेच म्हणतो....
संवेदनशील मन काही सुंदर ऐकले पाहीले की हरखून जाते. आणि हे पून्हा सार्यांना कौतुक भरल्या उत्साहाने दाखवणे ही याच मनाचे वैशिष्ट्य.
पानावर साचलेले दवबिंदू बघा, गवताचे पातेही दिमाखाने हे वैभव मिरवत असते. कोवळे ऊनही काही मिनिटापुरते त्या थेंबाला हिरकणीचे सौंदर्य बहाल करते. वार्याचया एखाद्या झुळुकीने पान हलते, थेंब इकडे तिकडे हलतो, खाली पडणार, पडणार असे वाटे तो परत जागेवर येतो .
हे मूळ कवितेइतकेच सुंदर.
असेच म्हणतो!
केवळ अप्रतिम....
शरद, तुम्ही सगळ्यांचा पुस्तकरुपी संग्रह का काढत नाही?
पंचानन मनमोहन
रसग्रहण मस्तच!
पण ती पंचाननाची गोष्ट गडबड वाटते. :-) शंकराला प्रत्येक दिशेला तोंडे फुटली तर लावण्यलतिका प्रदक्षिणा घालेल अशा दिशा चारच मग पाचवे मुख कुठे आले? असो.
पंचानन हे मारुतीचे नाव असल्याचे नव्याने कळले. गणेश पंचानन असतो. त्याला चार दिशांना चार तोंडे आणि एक मुख उर्ध्व दिशेस असते.
शंकराचेही तसेच
शंकराच्या पाच तोंडांपैकी एक ऊर्ध्व दिशेला आहे. दक्षिण दिशेला असलेले तोंड रौद्र आणि बाकीची सौम्य आहेत, असे महाभारत अनुशासनपर्वात (१४०.४६) म्हटले आहे.
पाच तोंडाच्या गणपतीच्या किंवा हनुमानाच्या ज्या मूर्ती असतात, त्यांना पंचमुखी गणपती किंवा पंचमुखी हनुमान म्हणतात. पण या देवतांना पंचानन असे म्हटल्याचे कधी वाचनात आले नाही. पंचानन हा शब्द खास शंकरासाठीच(आणि सिंहासाठी!).
शंकर कधी स्त्रीलोलुप असल्याचे माहीत नव्हते. ही ख्याती इंद्राची आणि ब्रह्मदेवाची. वरती जी कथा आली आहे, अगदी तशीच कथा ब्रह्मदेवाच्या बाबतीत वाचली आहे. ब्रह्मदेवाने स्वत:च्याच अर्ध्या शरीरापासून निर्माण केलेली त्याची पत्नी शतरूपा अति लावण्यवती होती. आजूबाजूला ब्रह्मदेवाचे मानसपुत्र बसले असताना चारी बाजूने फिरणार्या शतरूपाकडे कसे टक लावून पाहत रहावे? वळून वळून पाहणे मुलांसमोर फरच विचित्र दिसले असते, म्हणून त्याने चार तोंडे धारण केली. एकदा शतरूपा डोक्यावरून उडाली; तिला पाहण्यासाठी ब्रह्मदेवाच्या जटांजवळ पाचवे तोंड फुटले. हे पाचवे डोके शंकराने पुढे केव्हातरी उडवले.(मत्स्यपुराण ३.३०-४०).
सिंह या अर्थाने पंचानन हा शब्द तुलसीदासाने रामचरितमानसमध्ये अनेकदा वापरला आहे.
फूलहिं फरहिं सदा तरु कानन। रहहि एक सँग गज पंचानन ॥
किंवा, जथा मत्त गज जूथ महुँ पंचानन चलि जाइ । वगैरे. --वाचक्नवी
फारच छान!
सुंदर रसग्रहण! अश्या रसग्रहणांचे पुस्तक काढून समस्त मराठी शिक्षकांना धाडायला हवे.
मूळात प्रत्येक दिशेला नविन तोंड फुटणे हेच कसे शक्य आहे?
अहो, ह्या पुराणकथा आहेत. त्यावर चिकित्सा करण्यात काय हशील? "चल रे भोपळ्या टुणुक टुणुक" म्हणा आणि सोडून द्या.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
मराठी शिक्षकच का ?
अशा रसग्रहणांचे पुस्तक काढून समस्त मराठी शिक्षकांना धाडायला हवे. कां? मराठी शिक्षकांना कमी का लेखले आहे? त्यांना याहूनही चांगल्या पद्धतीने रसग्रहणे करण्याची सवय असते, यावर विश्वास का नसावा? माझा तरी आहे.--वाचक्नवी
एकंदर गुणवत्ता बघता लायकी काढल्यास नवल नाही
मराठी शिक्षकांना कमी का लेखले आहे?
मराठी शिक्षकांची, प्राध्यापकांची एकंदर गुणवत्ता बघता त्यांची लायकी काढल्यास नवल नाही. अर्थात काही चंदनाची झाडे आहेत.
त्यांना याहूनही चांगल्या पद्धतीने रसग्रहणे करण्याची सवय असते, यावर विश्वास का नसावा? माझा तरी आहे.--वाचक्नवी
माणसाने उमेद व विश्वास सोडायला नको. तुमचा विश्वास का आहे ते सांगावे. शक्य झाल्यास दाखले द्यावेत ही विनंती.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मस्त!
शरदराव, रसग्रहण मस्तच झालंय.
पंचानन...सिंहाला देखिल म्हणतात..अर्थात इथे त्याचा संबंध नाहीये.
जोवरी ऐकला नाही पंचानना, तोवरी जंबूक(शंभू..असेही रूप वापरल्याचे पाहिलंय) करी गर्जना...अशी एक म्हण आठवली.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
मूळ शब्द
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
संदर्भः श्री.प्रमोद देव यांचा प्रतिसाद
मूळ शब्द असे आहेतः
"
जंव त्या पंचानना देखिले नाही रे बाप||"
जंबूक म्हणजे कोल्हा. तिथे शंभू हा पाठभेद पूर्ण चुकीचा आहे.
धन्यवाद!
यनावाला सर धन्यवाद.
आपण दिलेल्या ओळी बरोबरच आहेत. श्री स्नेहल भाटकरांनी गायलेल्या एका (बहुदा संत ज्ञानेश्वरांच्या) गीतातील ते शब्द आहेत.
मी जो पाठभेद दिला...तो समाजमनातील अपभ्रंशित पाठभेद दिला जो म्हणीच्या स्वरूपात वापरला जातो....तरीही त्यातला महत्वाचा शब्द आहे "पंचानन"....आणि तोच इथे अधोरेखित करायचा आहे.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
ज्ञानेश्वर नाही तुकाराम
हा अभंग तुकारामाच्या गाथेतला आहे. मूळ अभंग असा :
तोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥1॥
तोंवरि तोवरिं सिंधु करि गर्जना । जंव त्या अगिस्तब्राह्मणा देखिलें नाहीं ॥ध्रु.॥
तोंवरि तोंवरि वैराग्याच्या गोष्टी। जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ॥2॥
तोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाईंचा पुत्र दृष्टी देखिला नाहीं ॥3॥
तोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें । जंव तुक्याचें दर्शन जालें नाहीं॥4॥
स्नेहल भाटकरांनी गाताना अभंगाच्या शब्दांत थोडा बदल केला आहे.--वाचक्नवी
जालावर हे मिळाले
वाचक्नवी...हे जालावर मिळाले..मला वाटतंय की हेच नेमके स्नेहल भाटकरांनी गायलंय...त्यांनी त्यात काही बदल केला असेल असे नाही वाटत.
जंववरी रे तंववरी जंबुक करी गर्जना । तंव त्या पंचानना देखिलें नाही बाप ॥१॥
जंववरी रे तंववरी वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाहीं बाप ॥२॥
जंववरी रे तंववरी मैत्रत्व संवाद । जंववरी अर्थेसि संबंध पडिला नाहीं बाप ॥३॥
जंववरी रे तंववरी युद्धाची मात । जंव परमाईचा पूत देखिला नाही बाप ॥४॥
जंववरी ते तंववरी समुद्र करी गर्जना । जंव अगस्ती ब्राह्मणा देखिलें नाहीं बाप ॥५॥
जंववरी ते तंववरी बाधी हा संसार । जंव रखुमादेविवरा देखिला नाहीं बाप ॥६॥
*
शेवटच्या ओळीतला 'रखुमादेविवरा' हा शब्द ज्ञानेश्वरांकडे बोट दाखवतोय.
ह्यावरून...असा निष्कर्ष निघतो(दावा नाही) की बर्याच संतांनी त्याच त्या उपमा आपापल्या शब्दात मांडलेल्या असाव्यात.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
खरोखरीच घोटाळा
ही माहिती खरोखरीच बुचकळ्यात टाकणारी आहे. ज्ञानेश्वर हे तुकारामांच्या आधीचे, तेव्हा तुकारामानींच वाङ्मयचौर्य केले असे निष्पन्न होते. जालावर तुकारामाच्या गाथा आहेत, त्यात २७७३ क्रमांकाचा अभंग येथे आहे. तो मी वर दिल्याप्रमाणे आहे. --वाचक्नवी
तुकारामांचे वाङ्मयचौर्य
तुकारामांचे वाङ्मयचौर्य म्हणण्यासाठी केवळ ही एक जागा पुरेशी वाटत नाही. आणखीही अशा जागा दाखवता येतात का याचा पाठपुरावा करावा लागेल.
बहुधा हे वाङ्मयचौर्य नसावे..
नंतर कुणीतरी अशा काही ओव्या तुकाराम महाराजांच्या नावावर खपवल्या असाव्यात...त्यात त्या लोकांचा काय हेतू असेल ते मात्र सांगणे कठीण आहे.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
रसग्रहण
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.वसंत लिमये यांच्या:
सुंदर रसग्रहण! अशा रसग्रहणांचे पुस्तक काढून समस्त मराठी शिक्षकांना धाडायला हवे.
या प्रतिसादाशी सहमत.येथे उपक्रमवर वाचकांची (सदस्य+पाहुणे) संख्या अगदी मर्यादित आहे.श्री.शरद यांनी कविता रसग्रहण विषयक पुस्तक प्रसिद्ध केल्यास त्यांचे आस्वादलेखन अनेक काव्यरसिकांपर्यंत पोहोचेल.त्यांना अनेक चाहाते लाभतील
व्वा !
सुंदर रसग्रहण.
-दिलीप बिरुटे