गोष्टी अखंड महाराष्ट्राच्या - प्रत्यक्षात सगळे घेणारी मुंबई
(श्री. ठणठणपाळ यांनी हल्लीच लिहिलेल्या एका लेखाबाबत मुद्द्यापेक्षा शैलीबाबत चर्चा झाली. त्यांच्या लेखाचा लेखी मराठी शैलीत मला जमेल तसा अनुवाद येथे मी देत आहे. मूळ लेखकासारखा स्वानुभव मला नसला तरी त्यांची तळमळ अनुवादात उतरवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. या अनुवादातून लेखनशैलीबद्दल काही चर्चा होऊ शकेल अशी माझी आशा आहे.)
- - -
गोष्टी अखंड महाराष्ट्राच्या - प्रत्यक्षात घेते सगळे मुंबई
(मूळ लेखातल्यापेक्षा मी शीर्षकात कमी शब्द वापरलेले आहेत. दुर्योधनाचा नेमका कुठला दुर्गुण उपमेत आहे, हे सांगण्यासाठी शीर्षक लांब लागेल. ते टाळले पाहिजे. मात्र जर लेखकाला "सुईच्या अग्राइतकेही कोणी उर्वरित महाराष्ट्राला देत नाही" असे म्हणायचे आहे, तर ती भावना कमीत कमी शब्दांत शीर्षकात आली पाहिजे.)
अखंड महाराष्ट्राच्या गोष्टी करता पण तुमचे वागणे मात्र दुर्योधनासारखे आहे. सुईच्या अग्रावर राहील एव्हढेही वीज-पाणी बाकी महाराष्ट्राला देण्याची तयारी नाही.
फक्त उत्सव साजरे करा, बाकी काही केले नाही तरी चालते - असा या मुंबईतील मराठी नेत्यांचा समज झालेला आहे. उभा महाराष्ट्र पाण्या आणि वीजे अभावी तळमळत आहे पण या नेत्यांना याची फिकीर नाही. यांना फक्त माध्यमांच्या झोतात चमकायचे आहे. लोकांना एक वेळचे जेवण मिळत नसताना हे पुरणपोळी खाण्याच्या स्पर्धा आयोजित करत आहेत. जनाची नाही तरी मनसेची लाज वाटायला पाहिजे. गेल्या ४० वर्षात मराठी च्या भल्यासाठी यांनी फक्त घोषणा बाजी केली. भ्रष्टाचार कमी पडला, आता जनतेचे रक्त जमवून गिनीज बुक मध्ये नाव येण्यासाठी तर पुरण पोळीच्या विक्रमाची थेरे करत आहेत.
तुम्ही पुरणपोळी उत्सव करतात म्हणून आम्हाला राग नाही. राग आहे तो तुमच्या दुटप्पी वागण्याचा. उभ्या महाराष्ट्रात आज वीज नाही. पन मुंबईत तुम्ही दिवस रात फ्लडलाईट च्या प्रकाशात भ्रष्ट क्रिकेटसंघांमधील सामने जल्लोषात खेळता. हाच सामना दिवसा उजेडात ठेवून कांही खेड्यांच्या घरातील एक मिणमिणता दिवा उजळावा असे वाटले नाही. रक्तदानाचा विक्रम केलात अभिमान आहे. पण सामान्य जनतेला त्याचा काय फायदा झाला का? याचा अंतर्मुख होवून विचार करा. राजाचे धोरण जनतेच्या हिताचे पाहिजे. पण येथे फक्त नेत्याच्या मोठेपणाचा विचार केला जातो.
स्वतःच्या नाकर्तेपणाची जगभरात बदनामी होवू नये म्हणून मुंबई या आंतरराष्ट्रीय शहरात सर्व राज्याची वीज चोरून रोज दिवाळी साजरी करता. हा अन्याय काय म्हणून आम्ही सहन करावा? आता शेतीला पाणी कापून तुम्हाला रेन डान्स करण्याकरता पाणी पुरवठा केला जातो. जरा कोठे गैरसोय झाली की माध्यमांसमोर तुमचा धिंगाणा चालू असतो. आमच्या रोज मरणावर तुम्ही "शेतकर्यात हिम्मत नाही म्हणून आत्महत्या करतात" असे अकलेचे तारे तोडतात. जरा मुंबईच्या बाहेरचे जगात फक्त ८ दीवस वीजपाण्या शिवाय राहून दाखवा, तर तुमचे पाय धरतो. अखंड महाराष्ट्राच्या गोष्टी करता पण तुमचे वागणे मात्र दुर्योधना सारखे आहे. सुईच्या अग्रावर राहील एव्हढीही वीज पाणी बाकी महाराष्ट्राला देण्याची तयारी नाही.
आपण बेळगावच्या नावाने गळे काढून रडतो पण विदर्भातल्या गडचिरोली येथील आदिवासी यांची दु:खे दिसत नाही. आत्महत्या दिसत नाही. आधी घर नीट सांभाळा नंतर बेळगाव चा विचार करा. या हरलेल्या लढाईचा बहाणा करून जनतेला मूर्ख किती दिवस बनवणार? आणि मुख्य गोष्ट अशी की बेळगाव हे कांही पाकिस्तानात नाही - ते भारतातच आहे. तेथे बेळगाव सुखी आहे. फक्त कांही लोकांच्या राजकारणा करता पोटापाण्या करता हा प्रश्न तेल ओतून सतत ज्वलंत कसा राहील असे पाहीले जाते. मी बेळगावला नेहमी जातो. महाराष्ट्राच्या कोणत्याही बकाल शहरा पेक्षा बेळगाव चांगले विस्तारले आहे. अजूनही शांत आहे. पश्चिम महाराष्ट्रासारखी गुंडगिरी नाही.
लोकसत्ता रविवारचा सुवर्ण महोत्सव अंक दिनाक २५/०४/२०१० पहा - प्रत्येक क्षेत्रात तुमच्या नाकर्तेपणाचा पुरावा सर्व पुराव्यानिशी वाचा. पण महोत्सव साजरा करण्या पासून तुम्हाला वेळ मिळाला तर पाहिजे?
स्वतःच्या शोकांकरिता वाटेल तसा खर्च करता येतो. मल्टिप्लेक्समध्ये ५० रुपयाचे २० ग्राम पॉपकॉर्न आरामात खाता, १०० रुपयांचा कोकाकोलाचा टिन आरामात पिता - पण शेतमालाचे भाव जरा वाढले की माध्यमांचा आणि तुमचा महागाई वर तमाशा सुरु असतो. घोड्यांच्या शर्यती चालतात, कॅबरे डान्स जोरात चालतो, पण खेड्यातील बैलांच्या शर्यती, तमाशा चालत नाही. कोर्टातून मूर्ख मानवतावादी, पांढरपेशे समाजसेवक, ढोंगी प्राणी प्रेमी बंदी आणतात. बालकामगारांचा हिडीस डान्स चालतो पण पोट भरण्यासाठी काम करणारा बालकामगार चालत नाही. घाशीराम कोतवाल, गिधाडे, सखाराम बाईंडर चालतात पण दादा कोंडकेचे सिनेमे चालत नाहीत. पण हे लोक शहरातील बदमाशी बद्दल तोंडाला गांधीछाप चिकट टेप लावून गप्प बसतात. लाचलुचपत, भ्रष्ट्राचारा विरुद्ध अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा करा. त्यांना तुरुंगात टाका. त्यांची वैध-अवैध मालमत्ता जप्त करण्या करता कोर्टात जात नाहीत. कारण ही व्यवस्था त्यांच्या फायद्याची आहे, ते स्वतः त्या व्यवस्थेचे एक कडी आहे. हे मान्य करण्याची हिम्मत नाही.
आता "महाराष्ट्रात का राहावे" या करिता तुम्ही मराठीच्या भावने शिवाय दुसरे एक तरी कारण आम्हाला सांगाल का? आणि बेळगाव महाराष्ट्रात का पाहिजे?
- - -
(वाक्यरचनेत बदल केलेले असल्यास नगण्य. काही शब्द बदलून प्रमाण, किंवा सामान्य तर्हेने लिहिलेले आहेत. या अनुवादात मूळ लेखकाची तळमळ कायम राहिलेली आहे. मुळात अभिनिवेश असल्यास तोही कायम आहे. मात्र मुळात "ते करतात" आणि "तुम्ही नेते करता" अशी द्वितीय-तृतीय पुरुषी वाक्यरचनांची सरमिसळ होती. द्वितीय पुरुषी लेखनात "नेत्यांना उद्देशून निर्भर्त्सना" असा नाट्यमय प्रभाव साधला जातो. "ते नेते वागतात" असा तृतीयपुरुषी प्रयोग केला तर वाचकांशी आपुलकी साधून वाचक-लेखक दोघांना तिसर्या कुठल्या नेत्यांबद्दल वाटणारी चीड सांगितली जाते. पण सरमिसळीने नुसता गोंधळ होतो - "तुम्ही म्हणजे नेमके कोण?" अनुवादात फक्त द्वितीयपुरुषी नाट्यमयता कायम ठेवलेली आहे. अनुवाद वाचताना मला तरी मुद्दे नीट लक्षात येत आहेत. अनुवादामध्ये त्यांच्या भावनेचा विपर्यास झाला असल्यास मूळ लेखक सांगतीलच. वाचकांना मुद्दे समजल्यास विचारांची देवाणघेवाण होईल. उपक्रमींना आणि मूळ लेखकांना काय वाटते?)
Comments
'तुम्ही' विरुद्ध 'आम्ही' शिवाय
शीर्षक योग्य वाटते आहे. पण अजूनही लेख भाषणासारखाच वाटतो आहे. 'तुम्ही' विरुद्ध 'आम्ही' शिवाय लिहून बघायला हवे.
वानगीदाखल:
तुम्हीमुंबईकर पुरणपोळी उत्सव करतात म्हणूनआम्हालाराग नाही. राग आहे तोतुमच्या दुटप्पी वागण्याचा.उभ्या महाराष्ट्रात आज वीज नाही. पन मुंबईततुम्हीदिवस रात फ्लडलाईट च्या प्रकाशात भ्रष्ट क्रिकेटसंघांमधील सामने जल्लोषात खेळता. हाच सामना दिवसा उजेडात ठेवून कांही खेड्यांच्या घरातील एक मिणमिणता दिवा उजळावा असेवाटले नाही.कुणाला वाटत नाही. रक्तदानाचा विक्रम केलात अभिमान आहे. पण सामान्य जनतेला त्याचा काय फायदा झाला का? याचा अंतर्मुख होवून विचार करायला हवा. राजाचे धोरण जनतेच्या हिताचे पाहिजे. पण येथे फक्त नेत्याच्या मोठेपणाचा विचार केला जातो.खोडलेला भाग रद्द.
अधोरेखित भाग नवा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
लेखातील मतांची तिव्रता कमी वाटत नाही.
महाराष्ट्र हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.
*************************
धनंजयराव मस्त....यापेक्षा अधिक आपण काय़ करु शकतो.लेखातील मतांची तिव्रता कमी वाटत नाही. श्री ठणठणपाळ अमंल करतील ही अपेक्षा.
शैलु.
मग खेडी सोडून द्या!
मुंबईकरांनी तेथील महागाई, गर्दी, प्रदूषण, इ. विषयी तक्रार केली तर आपण त्यांना मुंबई सोडण्याचा सल्ला देऊ. त्याचप्रमाणे खेड्यातील भारनियमनाचा त्रास होत असणार्यांना मुंबईला जाण्यार्या लोंढ्यांत शिरणेही शक्य आहे.
लेखनाचे स्वरुप
आपल्या लेखन शैलीमुळे मागील लेखापेक्षा या लेखात 'शैली'च्या बाबतीत किती बदल जाणवतो ते जाणकार सांगतील. पण याही लेखनातून 'भाव' [तीव्रता तीच] तोच जाणवतो असे मला वाटते. ठणठणपाळ यांच्या लेखनाची शैली पूर्वीच्या निबंधकारांची आठवण करुन देतात. त्यांच्या लेखनाचे स्वरुप मला आवडते. अशा लेखनाची शैली जराशी भडक वाटत असते.
एक जुने उदा. पाहा. लो. टिळक म्हणजे काय आहे ? या विषयी दिनकरराव जवळकर लिहितात.
''ज्या टिळकांनी अस्पृश्यांच्या सहभोजनाच्या जाहिरनाम्यावर सही केली नाही, असल्या या देशघातकी सैतानाला देशभक्त म्हणने, यापेक्षा मुर्खपणा तो कोणता ? सोवळ्या ओवळ्याची महती गाऊन भोळ्या ब्राह्मणेत्तरांच्या अज्ञानपणाचा फायदा घेणारा हा चित्पावन टिळक सर्व राष्ट्राचा पुढारी होता, असे हवे तर भटांनी म्हणावे. टिळकांनी ज्या मराठ्यांना शूद्र ठरवण्याचा प्रयत्न केला. ते अस्सल मराठे टिळकांच्या चित्रावर लाथ मारल्याखेरीज राहणार नाहीत. अस्पृश्यांच्या उद्धारकर्ता कसा होतो ? भटांनो, जरा थांबा ! जरा अस्पृश्य जागे होऊ द्या. मांजराने ताटात तोंड घातले तर ज्या टिळकांचे ताट बाटत नव्हते, मांजरापेक्षा ज्याने अस्पृश्यांना हीन लेखले ते अस्पृश्य जागे झाल्यावर टिळकांचे मुंडके गाळात कोंबून उलटे उभे करतील''
'सत्यशोधकीय साहित्यातील समाजकारणाचा विचार' या लेखाचे लेखक 'पार्थ पोळके' यांच्या लेखातील उतारा.
-दिलीप बिरुटे
आशय, मांडणी, शीर्षक, शुध्दलेखन, तार्किक सुसंगती
प्रबोधनकार ठाकरे किंवा वर ज्यांच्या लिखाणातला उतारा दिला आहे, अशांची शैली ठणठणपाळांच्या शैलीशी मिळतीजुळती आहे. हल्ली अशा शैलीत लिखाण करणे प्रशस्त समजले जात नाही. भडक लेखन न करताही वाचकाला आशय पटवून देता येतो. धनंजयांनी काय केले, तर फक्त शीर्षक बदलले आणि लेखात तार्किक सुसंगती आणायचा प्रयत्न केला. आशय तोच ठेवला पण त्याची मांडणी तशीच राहिली. शुद्धलेखन आणि व्याकरणामध्ये यत्किंचितही बदल केला नाही. निदान शब्दयोगी अव्यये जर शब्दाला जोडून आली असती तरी वाचन डोळ्याला सुसह्य वाटले असते. --वाचक्नवी
हा हा हा
>>>प्रबोधनकार ठाकरे किंवा वर ज्यांच्या लिखाणातला उतारा दिला आहे, अशांची शैली ठणठणपाळांच्या शैलीशी मिळतीजुळती आहे.
अगदी सहमत...!
>>>शुद्धलेखन आणि व्याकरणामध्ये यत्किंचितही बदल केला नाही. निदान शब्दयोगी अव्यये जर शब्दाला जोडून आली असती तरी वाचन डोळ्याला सुसह्य वाटले असते.
कोणास काय सुसह्य वाटेल काय सांगता येत नाही. वाक्य वाचून हहपुवा झाली. :)
-दिलीप बिरुटे
[वाचक्नवी यांच्या शुद्धलेखन आणि व्याकरणाचा फॅन]
विचाराचा मुकाबला विचाराने करा केवळ भाषेत दोष काढून रान उठवू नका
माझे विचार आजच्या व्यवस्थे ला पटणारे नाही, ते प्रक्षोभक वाटतात , कारण या विचारसरणी मुळे त्यांच्या स्वार्थाला सुरुंग लागल्याची शक्यता आहे.
आज वर्तमानपत्रे ही भांडवलदारांची किंवा सरकारची बटिक झालेली आहेत त्यांना समाजाशी कांही देणे घेणे राहिलेले नाही.या मुळे सामान्य माणूस हा सर्व बाजूने लुबाडला जात आहे. त्याचे प्रश्न मांडण्यास आज दुर्देवाने कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नाही. या करता संगणकावरील ब्लोग्स हा पर्याय मी निवडला.आणि हळूहळू याचा आपण ब्लोगेर्स नी नेमेका उपयोग केले तर व्यवस्थेला बदलण्यास भाग पडता येईल .पण आज ब्लोगेर्स केवळ खाणे-पिणे-स्वानुभव- गुळगुळ बोलणे एकमेकांची तळी उचलणे या पलीकडे जात नाही. आणि माझ्या सारखा एखादा लिहित असला तर त्याचे विचार ऐकण्या ,सजून घेण्या शिवाय त्याची भाषा त्याचे हेडिंग यावरच टीका केली जाते .विचाराचा मुकाबला विचाराने करा केवळ भाषेत दोष काढून रान उठवू नका हेच माझे मत आहे. आज उभा महाराष्ट्रा पाणी विजे अभावी जळत असताना मुंबईत लेझर किरण ,मोठे महोत्सव आयोजित करून विजेची नासाडी केली गेली हे अनेकांना खटकले पण बोलण्याची हिम्मत करत नाही. पण मी सुद्धा गप्प बसावे असे नाही.
विशाल तेलंग्रे म्हनतात
बरोबर आहे... आमच्याकडे लाइट जात नाही (औरंगाबाद लोडशेडिंग मुक्त आहे ना!) त्यामुळे मला तुमच्या परिस्थितीची जाणीव नसेल असे नाही, पण आता तर तुमच्यासारख्या लोकांनी (खासकरून खेड्यांतील) या ६ ते १८ घंटे जाणार्या लाईटची सवयच करून घेतली आहे. आपण महेंद्र काकांच्या "निर्लज्जपणा" या पोस्टवर नोंदवलेल्या मताशी मीसुद्धा सहमत आहे. दररोजच्या बारीक-सारीक चुका सुधारून बरीच वीज साठवता येऊ शकते, हे सत्य आता प्रत्येक समजंस नागरिकाने अंगिकारायला हवे. असो, IPL मध्ये झालेल्या नासाडीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासनाकडून काही कठोर पावले उचलल्या जाण्याची तीव्र इच्छा आहे! काल मुंबईतील गीरगाव चौपाटीवर भव्य लेझर शोची तशी फारशी गरज नव्हती, त्यासाठी कित्येक वॅट वीजेचा वापर केला गेला असावा...
धन्यवाद!
Kaun Kehta ki aasmaan me CHEED nhi hota , ek patthar zara tabiat se uchalo yaro........हेच माझे म्हणणे आहे. आपल्या मित्रान बरोबर चर्चा करा . माझे कांही चुकत असले तर मोकळ्या मनाने मला सांगा मी स्वीकारीन. पण विचार मात्र ठाम आहेत भारतात दर १५ मैला वर भाषा, खाणेपिणे रीतीरिवाज बदलत असतात.त्यामुळे प्रत्येकाची भाषा वेगळी वाटते. आपण मकरंद अनासपुरेचे सिनेमे पाहीले असतील तर तो प्रत्येक वाक्यात मायला मायला करत असतो पण ते खटकत नाही. विदर्भ ,कोकणी भाषेत तर वाक्य गणिक शिव्या असतात याचा अर्थ मुंबई पुण्या कडील लोकांना खटकतो पण आम्हाला खटकत नाही.
सुई च्या अग्रावर राहील एवढीही माती पांडवांना देणार नाही असे दुर्योधनाने म्हंटले होते, तोच संदर्भ मी वीज पाणी करता वापरला तर बटबटीत म्हणून ओरड झाली
--
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com
अ
आपण निवडलेला पर्याय हा उत्तम आहेच. पण हे ब्लॉग्स वाचयला electricity लागते. उपक्रम वाचणारे खूप लोक उसात आहेत(USA त). महाराष्ट्रातील ज्या लोकांनी तूमचा ब्लॉग वाचयला हवाय ते बहूतांश लोकं electricity आणि internet च्य अभावा मुळे ते वाचू शकत नाहीत. आणि माझ्यसारखी जी लोकं तूमचे ब्लॉग नियमीत वाचतात त्याना बर्याचदा तूम्हाला काय म्हणायचे आहे पुर्णपने कळत नाही. मागील लेखाचे शिर्षक मला ह्या लेखात समजले.
उपक्रमीं तुम्हाला सुचवत आहेत की तूमचा लेख आधीक प्रभावी बनन्यसाठी काय करायला हवे. अनासपुरे जरी आयला/मायला असे शब्द वापरत असतील तरी त्यांना काय म्हणायचे आहे हे आपल्यास कळते(आणि ते त्या प्रकारच्या बोलण्याने अधिक प्रभावी होते). आपणांस नेमके काय म्हणायचे आहे , आपला रोख नेमका कुणावर आहे, रोख जर वाचकांवर असेल तर तो कसा सौम्य शब्दात हवा ह्यासाठी उपक्रमी आपणांस थोडेसे सल्ले देत आहेत.
आपल्याला जर ते पटत नसतील तर त्यांना मनातल्या मनात फाट्यवर मारा. इथे प्रतीशब्द केल्याने तुमचे चाहते (माझ्यासारखे..) तुमच्य लेखापेक्शा बाकी गोष्टीवर लक्श देउ लागले आहेत आणि त्यामूळे तुम्ही निवडलेला पर्याय (ब्लॉगींग करून मत लोकांपर्यंत पोहोचवणे) हा योग्य मार्ग घेत नाहीये.
उपक्रमावर आणि इतर स्थळांवर प्रत्येक क्षेत्रांवर वेगवेगळे लेख आहेत, आपण नेमके काय वाचता ह्यावर ते डेपेंड करतं. आज तुम्हाला लाइटचा प्रश्न
दिसतोय , उद्या आजकालच्या बायका चांगला स्वयंपाक करत नाहीत हा प्रश्न पडेल आणि तेंव्हा तुम्ही "खाणे-पिणे-स्वानुभव" हे वाचण्यास सुचवाल. तेंव्हा तूम्ही म्हणाल आजकाल लाइट-बीइट वर लो़कं वायफळ चर्चा करतयेत आणि मी "खाणे-पिणे-स्वानुभव" सुचवले तर लोक थैमान घालतयेत.
तर तुम्ही काय वाचता त्यावर डेपेंड करत.
शिवाजी महाराज एकच असतांत. सगळेच असते तर ती नासाडी झालीच नसती किंवा "आधी लग्न विजेचं मग हे सगळं " असं झालं असत.
आणि आपण इथे "अनेकांना" हा शब्द वापरून दुसर्यावर बोट करतायेत. आपण सर्वच त्यातले.
हाच प्रतीसाद निरोपाने पाठवण्याचे कारण काय?
महाराष्ट्र हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.
*************************
वर दिलेला हाच प्रतीसाद निरोपाने पाठवण्याचे कारण काय?
ठाकरी शैलीचा केवळ भडकपणा आहे परीपक्वता आहे की नाही शंका आहे.शिवाय constructive कामाचे काय? प्रबोधनकारांशी तुलना अयोग्य आहे.
शैलु.
बल्क/स्पॅम
मलासुद्धा हाच व्य.नि. पाठविला.
क्षीण प्रयत्न
मुळ लेख आणि हा बदलाचा प्रयत्न दोन्ही क्षीण वाटले.
नक्की काय ते सांगणे कठीण आहे.. भडक लेखन ही कमतरता नसावी.. माझ्यामते विषयाची तर्कदुष्ट क्रमाने मांडणी ही मूळ लेखन शैलीत कमतरता आहे.
बाकी, उगाच ठाकरे/टिळक/आंबेडकर/ज्योतिबा फूले यांच्या भडक पण मुद्देसुद व तर्कशुद्ध मांडणीशी तुलना करण्यात काय हशील?
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे