शिक्षणपद्धतीच्या मर्यादा

शिक्षणाच्या विविध प्रकारे केलेल्या पुस्तकातील व्याख्या ह्या बह्वंशी आजच्या युगाला लागू पडतात. संस्कृतिपूर्व अश्मयुगात मनुष्य हत्यारे बनवू लागल्यापासून शिक्षण - खास करून कृतिशिक्षण (training) - ही प्रक्रिया सुरु असताना त्याची सार्वकालिक व्याख्या असू नये हे खटकते. ही सार्वकालिक व्याख्या काय असावी?
मानवी शिक्षणव्यवस्थेत जी अनेक स्थित्यंतरे होत गेली (जसे अश्मयुगीन - संस्कृतिकालीन - मध्ययुगीन - अर्वाचीन) त्यांच्यामधून सामायिक घटक शोधल्यास दिसते की "जीवनसंग्रामात तग धरून रहाण्याची क्षमता प्राप्त करून देणे" हाच शिक्षणाचा प्राथमिक हेतू आहे. सांस्कृतिक संमीलन वगैरे आवश्यक (necessary) असले तरी पुरेसे (sufficient) नाही. तेव्हा सर्वच महाजन - शिक्षणतज्ज्ञांपासून राज्यकर्त्यांपर्यंत - काहीही म्हणत असले, तरी जनसामान्यांच्या अंतर्मनात ही सार्वकालिक व्याख्याच घर करून असते असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते?
आजच्या शिक्षणपद्धतीत या सार्वकालिक व्याख्येकडे काणाडोळा झाला आहे आणि त्यातील काही दोष ही शिक्षणाची सार्वकालिक व्याख्या डोळ्याआड करण्याची परिणती आहे असे मला वाटते. उदाहरणार्थ:
1. शिक्षणपद्धतीतील अंतर्विरोध:
सामाजिक - वैज्ञानिक-तंत्रज्ञानविषयक कारणांनी मनुष्यमात्राच्या परिस्थितीत आज इतके आणि इतक्या झपाट्याने बदल होत आहेत की, वरील सार्वकालिक व्याख्येला अनुसरणारी शिक्षणव्यवस्था ही गतिशील असणे आवश्यक आहे. पण हे पूर्णांशाने शक्य नाही. याचे कारण "आपल्या शिक्षणपद्धतीत भूतकाळात तयार झालेले शिक्षक, वर्तमानकाळातील विद्यार्थ्यांना भविष्यकाळाला तोंड देण्यासाठी तयार करतात."हा अंतर्विरोध तुम्हाला पटतो काय? त्यातून मार्ग कसा काढायचा?
2. शैक्षणिक धोरणविषयक निर्णयांचे प्रामुख्याने व्यक्तिनिष्ठ स्वरूप:
जीवनसंग्रामात तग धरण्याची क्षमताप्राप्ती ही निव्वळ निर्गुणी किंवा मोघम व्याख्या आहे. मुळात तग धरण्याची ही प्रक्रिया व्यक्तिनिष्ठ असते. त्यातील यशापयशाची काही कारणे परिस्थितीवर तर काही त्या व्यक्तीवर अवलंबून असतात. मात्र, तग धरण्यासाठी आवश्यक/ अनावश्यक घटक कुठले हा सगुण (किंवा अंमलबजावणीयोग्य) विचार आणि निर्णय सरासर व्यक्तिनिष्ठ असतॊ. सबब शिक्षण-संघटन-विषयक निर्णय प्रामुख्याने व्यक्तिनिष्ठ बनतात. निर्णायक व्यक्तींच्या वस्तुनिष्ठ-विचारक्षमतेनुसार ही व्यक्तिनिष्ठा कमीजास्त होते. किंवा अनेक तज्ज्ञांच्या एकत्रित सल्लामसलतीनेही निर्णयांचे व्यक्तिनिष्ठ स्वरूप घटते. मात्र मनुष्य-स्वभाव-वैचित्र्य विचारात घेता, सर्वस्वी वस्तुनिष्ठ निर्णय शिक्षणक्षेत्रात तरी अशक्यप्राय वाटतो.
ज्यावेळी समाजात फक्त मामुली बदल घडत असतात, त्यावेळी या अंगभूत व्यक्तिनिष्ठेपोटी आलेले दोष हळूहळू उघड होत वगळले जातात. शिक्षणव्यवस्था निर्दोष होत जाते. या प्रक्रियेला साधारणपणे किमान एक पिढी जावी लागते. उदाहरणार्थ अंदाजे १९४४ चा पाचवी ऐवजी आठवीपासून इंग्रजी शिकवण्याचा निर्णय बदलायला १९६१ उजाडले. मराठी भाषेच्या प्रश्नपत्रिकेत बहुपर्यायी प्रश्न विचारू नये हे कळायला म.रा.मा.शि. मंडळाला अंदाजे २० वर्षे लागली. अनेक उदाहरणे असावीत. पण ज्यावेळी समाजात आजच्यासारखे व्यापक बदल सतत होत असतात, त्यावेळी एक दोष वगळण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदरच नवे बदल आणि नवे दोष अंतर्भूत होत रहाणार! याला उतारा?
नैधृव काश्यप

लेखनविषय: दुवे:

Comments

अंतर्विरोध आणि त्यावर मार्ग

"आपल्या शिक्षणपद्धतीत भूतकाळात तयार झालेले शिक्षक, वर्तमानकाळातील विद्यार्थ्यांना भविष्यकाळाला तोंड देण्यासाठी तयार करतात."हा अंतर्विरोध तुम्हाला पटतो काय?
~नाही!

तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला आहे तो सगळ्याच संस्थापनांना लागू होतो. नव्या गोष्टी, (उदा. बँकांमधे नवे सॉफ्टवेअर वापरणे), कर्मचाऱ्यांना शिकाव्याच लागतात- स्वतःच्या अस्तित्वासाठी तसेच इतरांना त्याचे ज्ञान देण्यासाठी सुद्धा- जर तेच त्यांचे काम असेल तर. आयटी कंपन्यातील कर्मचारी वर्ग जर म्हणाला की, आम्हाला फक्त जावा टेक्नॉलजी मधली कामे द्या; इतर नवे तंत्रज्ञान आम्हाला समजत नाही, तर त्या कंपनी गाशा गुंडाळावा लागेल किंवा नवे कर्मचारी आणावे लागतील.

बहूतांश वेळा जो नियम लागू पडतो, तो ८०-२० नियम येथेही लागू होतो असे मानल्यास, असे मानू की, २०% शिक्षक नवे ज्ञान आत्मसात करण्यात यशस्वी होतात. इतर नाही. त्यामुळे शाळेमधे "कंटेन्ट डिलिव्हरी" व "कंटेन्ट डिझाईन" अशी कामे करणारे वेगळे वर्ग असावेत असे वाटते. जो अनुभवी शिक्षक वर्ग आहे त्यांच्या कडून किती प्रमाणात प्रशासन स्वरुपाचे काम किती कंटेन्ट डिझाईन, रिसर्च, कंटीन्युअस इंप्रुव्हमेंट व्हावे हे ठरवावे लागेल. इतरांवर प्रोसेसनुसार कंटेन्ट डिलिव्हरी हीच अपेक्षा ठेवल्यास, कामाची गुणवत्ता वाढू शकेल.

हे झाले मोठ्या- शहरी शाळेत. जेथे मुख्याध्यापकापासून शिपायापर्यंत सगळी कामे करणारे शिक्षक असलेल्या शाळा असतील तेथे हे कसे शक्य आहे? त्यांना ही सर्व्हीस देणारी संस्था आहे का? दुसरा मुद्दा- एकच विषय अनेक वर्षे शिकवला जातो; असे असतांना दर्वर्षी मुळापासून लेसन प्लॅन करावा लागत असेल तर तो का?- आधीचा लेसन प्लॅन पुन्हा सुधारुन (आधीच्या त्रुटी निस्तारुन) वापरला जातो का? शाळांमधे प्रश्न-पेढी तयार असते का? त्यामुळे एकच काम पुन्हा-पुन्हा करण्यात वेळ वाया जात आहे का? रियुजेबिलिटी कशी वाढवता येईल हे पाहता येईल.

त्यामुळे जेथे मुलभूत सुविधाही नसतात तेथे "कंटेन्ट डिझाईन" ते "कंटेन्ट डिलिव्हरी" असे सगळे काम करणारे सुपर-शिक्षक असावेत ही अपेक्षात मुळात चूकीची आहे.

अंतर्विरोध

अंतर्विरोध
"भूतकाळात तयार झालेले शिक्षक वर्तमानकाळातील विद्यार्थ्यांना भविष्यकाळाला तोंड देण्याकरता तयार करतात "
हा अंतर्विरोध वाटला तरी त्याला "मार्ग" शोधला पाहिजे असे मला वाटत नाही. कोणत्याही बदलत जाणार्‍या, प्रसरणशील व्यवस्थेत , यात तंत्रज्ञान, साहित्य, संगीतासारख्या कला, सामाजिक व कौटुंबिक स्थित्यंतरे आदी सर्व आली, हे नैसर्गिक व त्रिकालाबाधित आहे. व या अंतर्विरोधाला जगाने यशस्वीरीत्या तोंड दिले आहे. शिक्षकाने शिकवलेले ग्रहण करतांना विद्यार्थी/ उद्याचा शिक्षक बदलही थोडाथोडा का होईना स्विकारीत असतोच व ते बदलेलेच पुढे सरकवत असतो. थोडा वेळ जातो, त्याने काय फरक पडतो ? कालोह्ययं निर्वधीर् ! मी दोन उदाहरणे देतो.
पहिले साहित्यातले. मर्ढेकर, पु.शि.रेगे, नेमाडे, ग्रेस लिहू लागले तेव्हा महाविद्यालयात शिकवणार्‍या प्राध्यापकांना ते एकदम थोडेच आकलले ? वेळ गेला पण आता या सर्वांना "समजावून" सांगणारे शिक्षक आहेतच ना ? पहिल्या ३ महिन्यात झाले नाही, कबूल. बिघडले नाही.

संगीतात धृपद-धमार पुरेसा नाही वाटल्याने एकाने ख्याल निर्माण केला, दुसर्‍याला ख्याल हा भावना व्यक्त करावयाला अपूरा वाटला, त्याने ठुंबरी-टप्पा गायला सुरवात केली, नंतर भावगीत आली. संगीताचा प्रवाह अडला नाही.

माणसाची "लवचिकता" हा महत्वाचा घटक आहे. तो अशा सर्व बदलांना सहज आत्मसात करवयास समर्थ आहे. मार्ग शोधावयाची गरज नाही,तो आपोआप निर्माण होत असतोच.
शरद

शिक्षणाचा मूळ हेतू

सुसंस्कृत मानवी समाजात नवीन पिढीला शिक्षण कशासाठी दिले जाते? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. आधीच्या पिढ्यांनी जे ज्ञान प्राप्त केलेले आहे ते नवीन पिढीला विनासायास मिळावे व वर्तुळाकृती चाक परत परत शोधत बसण्याचा अनावश्यक उपद्व्याप करावा लागू नये या साठी नवीन पिढीला शिक्षण दिले जाते. अशी कल्पना आणि अपेक्षा असते की या शिक्षणाच्या (किंवा जुन्या पिढ्यांच्या अनुभवाच्या) मूळ बैठकीवर या नवीन पिढीने आणखी विचार करून मानवी समाजाची एकूणच ज्ञानपातळी उंचावत न्यावी.

शिक्षण हे जुन्या पिढ्यांनी प्राप्त केलेले ज्ञान असल्याने जुन्या पिढीतील शिक्षकांनी ते देण्याचे कार्य करणे हे सर्वात उचित ठरावे. यात काही अंर्तविरोध आहे असे मानण्याचे काहीच कारण दिसत नाही.
चन्द्रशेखर

धन्यवाद. आणखी विचार आवडतील

प्रतिसादकांचे आभार.
शिक्षणाच्या सार्वकालिक हेतू बद्दल:
चंद्रशेखर यांनी मांडलेल्या शिक्षणाच्या हेतूबद्दल (पूर्वानुभव नव्या पिढीकडे पोचवणे याबद्दल) दुमत नाही. किंबहुना मूळ लेखात दिलेल्या जीवनसंग्रामात तग धरून रहाण्याची क्षमता देण्याचा तो एक भाग आहे.
भूत-वर्तमान-भविष्यकालिक अंतर्विरोधाबद्दल:
माझे प्रश्न टप्प्याटप्प्याने आणि अधिक नेमके असायला हवे होते. उदा. "आपल्या शिक्षणपद्धतीत भूतकाळात तयार झालेले शिक्षक, वर्तमानकाळातील विद्यार्थ्यांना भविष्यकाळाला तोंड देण्यासाठी तयार करतात." ह्या विधानात वर्णिलेली परिस्थिती कितपत खरी? कितपत काल्पनिक?
मला वाटते की त्या विधानात दिलेली स्थिती अचूक आणि खरी आहे आणि त्याला तीन्ही प्रतिसादकांचा दुजोरा आहे.
ही स्थिती अंतर्विरोधपूर्ण वाटते काय? मी, अजय भागवत, व शरद यांना तसे वाटते. पण चंद्रशेखर यांना मात्र तसे वाटत नाही. मला त्यांचे स्पष्टीकरण वाचायला आवडेल. मला वाटते की आज शिक्षण घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी सतत बदलत्या भविष्यकाळाला कसा सामोरा जाणार याचा विचार मनात आणला तर त्यांना हे पटेल. उदा. NASCOMच्या एका अहवालानुसार आपल्या देशात दर वर्षी जे अभियांत्रिक पदवीधर बनतात त्यांच्यापैकी केवळ २५% माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नोकरी मिळवण्यास लायक आहेत. अशी इतरही उदाहरणे सापडतील.
यातून मार्ग कसा काढावा?
अजय भागवतांनी शिक्षकांच्या जबाबदारीचा उहापोह केला आहे. सामान्यपणे शहरभागातील ८०% आणि गावभागातील १००% शिक्षकांना हे शक्य नाही हे त्यांचे मत मान्य. पण जे २०% काही करू शकतात, त्यांना आपले शिक्षणतज्ज्ञ कोणती मदत करणार? सरकार तर त्यांच्याकडून गैरशिक्षकी कामेच करून घ्यायच्या मागे लागलेले दिसते. तेव्हा हे काही खरे नाही.
शरद असे सुचवितात की या अंतर्विरोधाला जगाने यशस्वीरीत्या तोंड दिले आहे. हे पूर्वी नक्की खरे होते, पण आता ते खरे वाटत नाही. शिक्षणाचा जीवनाशी संबंध सुटत चालला आहे अशी तक्रार आता का ऐकू येते?
या समस्यांचे निराकरणाचे बाबतीत माणसाची लवचिक बुद्धी महत्त्वाची आहे. हे मान्य. पण निराकरणाचे मार्ग आपोआप निर्माण होत असतात (पक्षी आपण प्रयत्नपूर्वक काही करण्याची गरज नसते) हे अमान्य. तसे पाहिले तर सगळे राजकारणी हाच विश्वास बाळगून असतात. पण धोरण म्हणून मला हे अमान्य वाटते. कारण शिक्षणविषयक धोरणाचे फार दूरगामी परिणाम असतात. (मूळ लेखात त्याची उदाहरणे पहा.) मला वाटते की अकर्मकऐवजी सकर्मक धोरणांनी आपले विद्यार्थी भविष्यकाळाला सक्षमपणे सामोरे जाऊ शकतील.
शरद यांनी दिलेली साहित्य व संगीत क्षेत्रातली उदाहरणे, साहित्य वा संगीतक्षेत्राशी नव्हे तर शिक्षणक्षेत्राशी आणि जीवनसंघर्षात तग धरून रहाण्याच्या क्षमतेशी कशी जोडायची हे स्पष्ट होत नाही. त्यांचे स्पष्टीकरण वाचायला आवडेल.
अन्य:
अजय भागवत यांनी कण्टेण्ट डिझाइन व कण्टेण्ट डिलिव्हरी याबद्दल कामे करणारे वर्ग वेगळे करायला सुचवले आहे. हे कसे करायचे? विद्यार्थ्यांची गटवारी करून की न करता? याला बऱ्याच जणांचा विरोध आहे. तसेच प्रयोगशील शाळांबद्दल आपल्या सरकारचा दृष्टिकोन अनुदार आहे. (वाचा -लीला पाटील किंवा अभय बंग यांचे अनुभव)
मूळ धाग्यातील निर्णयाच्या अंगभूत व्यक्तिनिष्ठ स्वरूपावर उपक्रमींची टिप्पणी वाचायला आवडेल. तसेच या समस्यांवर (शिक्षकांना सुधारण्याबरोबरच) अभ्यासक्रम/ शिक्षणपद्धती/ परीक्षापद्धती सुधारून काही उत्तर काढता येते का या बद्दलही काही सूचना वाचायला आवडेल.
पुनःश्च धन्यवाद
नैधृव काश्यप

शिक्षकांचे वर्गीकरण

कण्टेण्ट डिझाइन व कण्टेण्ट डिलिव्हरी याबद्दल कामे करणारे वर्ग - शिक्षकांचे.

शिक्षण

श्री. नैधृव

या विषयावरचे माझे विचार आपल्याला माझ्या या ब्लॉगपोस्टवर वाचता येतील.

चन्द्रशेखर

थोडक्यात स्पष्टीकरण

शिक्षणक्षेत्राशी संबंध

(१) मराठी साहित्यात जेव्हा मर्ढेकर-रेगे यांनी लिहावयास सुरवात केली तेव्हा त्यांचे लेखन परंपरा टाकून देऊन निराळ्या प्रदेशात झेपावले होते. त्यावेळी महाविद्यालयात शिकवणार्‍या प्राध्यापकांना त्याचे आकलन होणे अवघड होते. थोडक्यात प्राध्यापक भूतकाळातला, शिकणारा विद्यार्थी वर्तमानकाळातला व उद्याचा शिक्षक होता. प्राध्यापकांचे अज्ञान हा अंतर्विरोध होता. पण हळुहळु मर्ढेकर-नेमाडे-ग्रेस आवाक्यात आले व आज त्यांच्याबद्दल इतके लिहले गेले की महाविद्यालयातील प्राध्यापकच नव्हे तर शाळेतला शिक्षकही अशा लेखकांच्या साहित्याचे योग्य मुल्यमापन विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. अंतर्विरोधावर शिक्षण पद्धतीत बदल न करताही मार्ग शोधला गेला. साहित्यातील नवीन प्रवाहांचा व शिक्षणाचा दुवा साधला गेला. इथे जीवनसंघर्षात तग धरण्याचा काही संबंध येत नाही.

(२) संगीत सर्वथ: गुरुमुखानेच शिकवले जाते. जेव्हा धृपद-धमार एवढेच होते तेव्हा ख्याल आला व हा नवा प्रवाह पहिल्या उस्तादांना आपल्या शिष्यांना शिकवावयाचे म्हटले की तुम्ही म्हणता तो अंतर्विरोधही आला. तीच गोष्ट ठुंबरी व भावगीतांची. पण आपण पहातो की शिक्षण पद्धती न बदलताही मार्ग शोधला गेलाच. आज तुम्हाला हे सर्व प्रवाह संगीतात गुण्यागोविंदाने नांदताना आढळतात. श्री.बखले-वझे यांसारख्या शास्त्रीय संगीतातील दिग्गजांनी नाट्यसंगीताला दिग्दर्शन केलेच. व त्या साठी गुरुगृही वर्षानुवर्षे शिकावयाच्या पद्धतीला मुरड घातली, ती सर्वथ: बदलली नाही.

माझा मुद्दा एवढाच की आपण म्हणता तो अंतर्विरोध शिक्षण क्षेत्रात होता, आहे व पुढेही असणारच. मात्र त्याची फार काळजी करण्याचे कारण नाही. फक्त तंत्रविज्ञानात फार झपाट्याने बदल होत असल्याने तो एकदम अंगावर आल्यासारखा वाटतो. पण आजचे चलाख तरुण त्यालाही यशस्वी रीतीने तोंड देत आहेत व पुढेही देतील. Why bother ?

शरद

काही शंका , काही मते.

मानवी शिक्षणव्यवस्थेत जी अनेक स्थित्यंतरे होत गेली (जसे अश्मयुगीन - संस्कृतिकालीन - मध्ययुगीन - अर्वाचीन) त्यांच्यामधून सामायिक घटक शोधल्यास दिसते की "जीवनसंग्रामात तग धरून रहाण्याची क्षमता प्राप्त करून देणे" हाच शिक्षणाचा प्राथमिक हेतू आहे.
हे विधान थोडे अतिसर्वसाधारण आहे असे वाटले. अश्मकुलीन काळाचा संदर्भ जोडण्याइतपत माझे ज्ञान नसल्याने चालू काळातली उदाहरणे देऊन मुद्दे मांडण्याचा प्रत्न करतो. शिक्षणाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरचे , वेगवेगळ्या विभागातले उद्देश वेगवेगळे असू शकतात. शालेय शिक्षणाचा उद्देश मूलभूत गरजा भागवण्यासाठी आहे असे आपण म्हणू शकतो. "साक्षरता अभियान" सारख्या योजनांचे ध्येय प्रत्येकाला "जीवनसंग्रामात तग धरून रहाण्याची क्षमता प्राप्त करून देण्याइतपत" साक्षर करावे असा आहे असे आपण या अर्थाने म्हणू शकतो. विविध प्रकारच्या व्यावसायिक प्रशिक्षणांचा उद्देशही उपजिविकेकरता चालू काळासाठीची व्यावसायिक कौशल्ये मिळवणे असे विधान करता येईल. मात्र पीएच्डी, पोस्ट्-डॉक सारख्या पातळ्यांचा उद्देश उपजीविकेचा आहे असे म्हणता येणार नाही.

महाविद्यालय-विश्वविद्यालयामधून व्यावसायिक स्वरूपाचे शिक्षण देणार्‍या उपक्रमांमधून , व्यावसायिक आयुष्यात खर्‍या अर्थाने उपयोगी पडेल असे शिक्षण कितपत मिळते याबद्दल दुमत होऊ शकते. पहिल्या काही नोकरीच्या ठिकाणी केलेल्या उमेदवारीतून (अप्रेंटीसशिप) मधून व्यावसायिकांना खर्‍या अर्थाने व्यवसयोपयोगी शिक्षण मिळते असे माझे मत आहे. याचा अर्थ महाविद्यालय-विश्वविद्यालयामधून मिळणारे पायाभूत शिक्षण व्यर्थ आहे असे नव्हे. परंतु मुद्दा "जीवनसंग्रामात तग धरून रहाण्याची क्षमता प्राप्त करून देण्याचा " आहे. आणि या दृष्टीने उपरोक्त ठिकाणचे शिक्षण कितपत पुरेसे आहे याबद्दल जबर शंका वाटते. माझ्या डोळ्यांसमोर विविध क्षेत्रांमधल्या सर्वोत्तम संस्था आहेत. या संस्थांमधून बाहेर पडणार्‍यांना हमखास नोकरी मिळते हेही मला मान्य आहे. तरीही, व्यावसायिक क्षेत्रांमधील कौशल्ये कमावण्याकरता अप्रेंटीसशिपला पर्याय नाही असेच वाटते.

याच अनुषंगाने "भूतकाळातले शिक्षक-भविष्यातल्या गरजा" या तथाकथित अंतर्विरोधाबद्दल बोलता येईल. कुठलीही शिक्षणसंस्था सध्याच्या व्यावसायिक जगातल्या गरजा भागवणारे शिक्षण देण्याचा दावा करू शकतील असे वाटत नाही. मूलभूत तत्त्वांचा अभ्यास तिथे घडेल , विविध शाखांमधल्या मूलभूत तत्वांबद्दलचे अद्ययावत ज्ञान देण्याचा दावा करणे शक्य आहे, परंतु चालू काळातल्या व्यावसायिक कौशल्यांची प्राप्ती अप्रेंटीसशिप मधे होते असे मला वाटते.

विविध क्षेत्रांमधली उमेदवारी वेगवेगळ्या स्वरूपाची. डॉक्टर्स् शासकीय रुग्णालयामधे इंटर्न्शिप करतील. सीए किंवा वकील त्यांच्या फर्म्स् मधे. आयटीमधले कंपन्यांमधे. एंजिनियर्स् त्यांच्या कामाच्या ठिकाणी. उमेदवारीची, लर्निंग-द-रोप्स् ची योजना वेगवेगळ्या क्षेत्रांमधे वेगवेगळी असू शकते.

मूलभूत शिक्षण आणि एक विशिष्ट कार्यक्षमता येण्यासाठी शिक्षण

या चर्चेत मूलभूत शिक्षण आणि एखादे विशिष्ट कार्य करता यावे म्हणून दिले जाणारे शिक्षण (एज्युकेशन ऍन्ड ट्रेनिंग) या दोन गोष्टींमधला फरक लक्षात घेतला जात नाहीये. मूलभूत शिक्षणात दिले जाणारे ज्ञान हे जुनेच असते. ते देणार्‍या शिक्षकाला नवीन तंत्रज्ञान किंवा शास्त्रे यांची माहिती आवश्यकच असते असे नाही. या उलट एका विशिष्ट कार्यासाठी(उदा. संगणक चालवणे, एखाद्या यंत्राची देखभाल करणे) यासाठी दिल्या जाणार्‍या शिक्षणासाठी शिक्षकाला सर्व नवीन ज्ञान माहिती असणे गरजेचे असते.

चन्द्रशेखर

एक अवांतर विचार

खालचा मुद्दा मूळ प्रस्तावाशी संलग्न नाही. सहज सुचलेला विचार आहे.

माझ्या दृष्टीने, कुठल्याही शिक्षणाच्या संदर्भात "लर्निंग टू लर्न" या गोष्टीचे तंत्र म्हणा, तत्व म्हणा, समजणे हा कळीचा मुद्दा आहे . जेव्हा शिक्षक , जी शिक्षणप्रणाली उपरोक्त "तिळा उघड" विद्यार्थ्याला देऊ शकतो , जेव्हा विद्यार्थी हा तिळा उचलू शकतो तेव्हा त्या त्या विषयाचा गाभा त्याच्या हाती लागू शकतो.

पुनश्च आभार

पुनश्च आभार
अजय भागवतांनी सुचवलेले कण्टेण्ट विषयक काम करणारे शिक्षकांचे वर्ग हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. हे प्रयत्न नक्कीच झाले असणार. पण विविध कारणांनी हे वर्ग यशस्वी होत नसावेत. एकतर ते पुन:पुन: सातत्याने घ्यावे लागतील. भागवतांनी सांगितलेल्या ८०% - २०% (पॅरेटो) तत्वानुसार ८०% शिक्षक बदलायला तयार होत नाहीत हेही एक महत्वाचे कारण. अन्य काही कारणे माझ्या पहिल्या उत्तरात आहेत. आणखीही बरीच असतील.
शरद यांची साहित्य व संगीत क्षेत्रातली उदाहरणे (प्राथमिक अर्थाने) जीवनोपयोगी नाहीत. पण त्यांच्या लिखाणावरून मला एक नवा मुद्दा सुचतो. जीवनात कलेचेही काही स्थान असते. जीवनसंघर्ष लढण्यासाठी शिक्षण आणि कलाशिक्षण या दोघांचीही माणसाला गरज भासते. म्हणूनच शाळांमधून गायनासारखे विषय असतात. आता या दोन्ही गरजांचे मूळ, त्या दोघांच्या शिक्षणप्रक्रियेतील भेदस्थळे/ साम्यस्थळे, त्यांचे शालेय अभ्यासक्रमातले आदर्श प्रमाण याबद्दल वाचायला आवडेल. एक नवा पैलू उजागर केल्याबद्दल शरद यांना धन्यवाद. why bother? ही भूमिका मला का मान्य नाही याबद्दल मी पूर्वीच्या प्रतिसादात लिहिले आहे.
मुक्तसुनीतांनी ज्या विधानाला आक्षेप घेतला आहे, ते थोडे अधिक सुस्पष्ट लिहितो. "जीवनसंग्रामात तग धरून रहाण्याची क्षमता प्राप्त करून देणे" हा व्यापक स्थित्यंतरांमधला, किमान समाईक (पक्षी सार्वकालिक व म्हणून प्राथमिक) हेतू आहे. या बदलानंतरही हे विधान सर्वसाधारण वाटणे स्वाभाविक आहे. कारण तो फार मोठ्या कालखंडातल्या स्थित्यंतरांमधला किमान सामायिक घटक आहे. पण तो फुटकळ आणि नगण्य नक्कीच नाही. तो माणसाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. इतक्या विशाल कालखंडातून हा समान घटक उजागर होणे हेच मला मोठे विशेष वाटते. हे कसे निष्पन्न होते ह्याबद्दल स्वतंत्रपणे लिहावे लागेल.
शिक्षणाच्या विविध पातळ्यांवरचे उद्देशांची गोळाबेरीज मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे अर्थातच विस्तृत असेल. पण त्या जुगाडाला "जीवनसंघर्षात पुरून उरण्याच्या क्षमतेचा" (दृष्य वा अदृष्य) आधार असणे हे मला क्रमप्राप्त वाटते. (लिहिता वाचता न येणारा नावाडी आणि पोहोता न येणारा बहुश्रुत शास्त्री यांची रूपक कथा आठवा.) प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षणात ह्या विवक्षित-क्षमताधिष्ठित शिक्षणाचे प्रमाण जास्त असेल व उच्च शिक्षणात ते फारच कमी असेल हे मान्य. (चंद्रशेखर सुचवतात त्याप्रमाणे कृतिशिक्षण (training) व विचारशिक्षण (education) या दोहोतही या क्षमताविषयांचे प्रमाण वेगवेगळे असेल हेही मान्य.)
आतापर्यंत लिहिताना मी पदव्युत्तर आणि अत्युच्च शिक्षण विचारात घेतलेले नव्हते. त्यासंबंधी मी अजून विचार केलेला नाही. पटकन सुचलेला एकच मुद्दा मांडतो. पदव्युत्तर शिक्षणाकडे वळणाऱ्यांपैकी, चांगले prospects असतात म्हणून वळणारे किती, आणि केवळ संशोधनाची आवड म्हणून जाणारे किती?
मुक्तसुनीतांची उमेदवारीची कल्पना आणि विश्लेषण सर्वस्वी मान्य. हा एक चांगला उपाय आहे. जर्मन शिक्षण पद्धतीत उमेदवारीविना कुठलेच शिक्षण पुरे होत नाही असे मी ऎकतो. (जाणकार उपक्रमींनी कृपया माहिती पुरवावी.) उमेदवारीविना निव्वळ विद्यापीठीय शिक्षणाचे अपुरेपणाचा मुक्तसुनीतांचा निष्कर्ष मान्य.
शेवटी, मुक्तसुनीतांनी मांडलेला कसे शिकावे (Learning to learn) हा पैलू अवांतर नसून या लेखात मांडलेल्या अंतर्विरोधाची धार व दुष्परिणाम कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे असे माझे ठाम मत आहे. त्याबाबतची माझी वैचारिक मांडणी सुरू आहे. शिकायला कसे शिकावे/ शिकवावे यावरही लिहावेसे वाटते. पण त्याचा आवाका कवळायला माझा अनुभव तोकडा पडेलसे वाटते. प्रयत्न करू.
जाता जाता माझ्या धाग्यातील अन्य प्रश्नांवर उपक्रमींनी प्रतिक्रिया दिल्या नाहीत याचा मी विधायक अर्थ लावतो.
माझ्या विचारांना नेमकेपणा देणाऱ्या, आणि नवी उदाहरणे व परिमाणे पुरविणाऱ्या सर्वच प्रतिसादकांचे आभार.

नैधृव कश्यप

कण्टेण्ट विषयक काम करणारे शिक्षकांचे वर्ग

"कण्टेण्ट विषयक काम करणारे शिक्षकांचे वर्ग" ह्या संदर्भात् हा पूर्वी लिहिलेला एक लेख पहावात.
ज्ञानाचे स्वरुप , पातळी व त्यानुसार सुचवलेले पाठ्यपुस्तकातील बदल

मुख्य मुद्यांना

मुख्य मुद्यांना हात घालून चांगली सुरूवात आहे.

शिक्षणाचा हेतू - जीवनसंग्रामात तग धरणे - आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीत हाच हेतू कमी दिसतो. म्हणजे असे की शिक्षणाची साधने आहेत, नंतर करण्याच्या व्यवसायावर तर केंद्रित आहेत, पण हेतू साध्य होतो आहे की नाही, हे तपासण्यात कमी पडतात. आमचे शाळेत एक अतिशय सज्जन शिक्षक होते - ते सतत वाचून झाल्यावर "आता पाच मिनिटे मनन करा" असा धोशा लावत. पण हेतू कितीही चांगला असला, तरी नुसतेच मनन कसे आणि कसले करणार? त्याच्याशी काही एक अनुभव जोडला गेला तर तो अनुभव ते ज्ञान नोंदवणार ना?

कारण "आपल्या शिक्षणपद्धतीत भूतकाळात तयार झालेले शिक्षक, वर्तमानकाळातील विद्यार्थ्यांना भविष्यकाळाला तोंड देण्यासाठी तयार करतात."हा अंतर्विरोध तुम्हाला पटतो काय? त्यातून मार्ग कसा काढायचा?
खरे आहे. पण शिक्षकांना ह्यासाठी विचार करायला आणि स्वतःची उन्नती करायला वेळ द्यायला हवा. वर अजय म्हणतात ते पटण्यासारखे आहे.


त्यावेळी एक दोष वगळण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदरच नवे बदल आणि नवे दोष अंतर्भूत होत रहाणार! याला उतारा?

मुळात जुने दोष दूर करताना नवीन दोष कमीत कमी यावे यासाठी अनेक तज्ञांनी एकत्र येऊन विचारमंथन व्हावे.

यासारख्या विषयांवर लिखाण जरूर करावे असे म्हणते.

चांगली चर्चा

चर्चाप्रस्ताव आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक आहेत.

 
^ वर