शाळांमधून संस्कृत हा विषय बंद केला जावा का?
संस्कृत सारखी व्यवहारात निरुपयोगी असलेली भाषा माध्यमिक शिक्षणात शिकवल्याने नक्की काय फायदा होतो ते मला अजूनही लक्षात आलेले नाही. कृपया कोणतीही भाषा शिकण्याचे सर्व-साधारण फायदे देऊ नयेत. कारण ते 'कोणत्याही' भाषेला लागू होतात. संस्कृत ऐवजी जपानी किंवा स्पॅनिश अशा भाषांचे पर्याय दिल्यास त्यांचा व्यवहारात काहीतरी उपयोग होऊ शकतो. पण तरीही जवळपास प्रत्येक मराठी शाळेत १०० मार्क संस्कृत हा विषय मोठ्याप्रमाणावर अजूनही शिकवला जातो. इतक्या घाऊक प्रमाणात शाळांमधून संस्कृत शिकवण्याचे कारण काय असावे? मी शाळेत असताना निव्वळ प्रवाहासोबत जायचे म्हणून संस्कृत विषय घेतला आणि नंतर पस्तावत घोकंपट्टी करत कसा बसा सोडवला. त्याकाळी संस्कृत हा पर्यायच शाळेत नसत तर मला ह्या उपयोग शून्य नरकातून जावे लागले नसते. उपक्रमींना काय वाटते? शाळांमधून संस्कृत हा विषय बंद केला जावा का?
माझ्या मते, ज्यांना संस्कृत शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा पर्याय महाविद्यालयात असावा. माध्यमिक शालेय पातळीवर असले अनावश्यक विषय भरण्याची बिलकुल गरज नाही.
Comments
आवडता विषय...!
वरील विषयावर बर्याचदा नकारात्मक प्रतिसादांबरोबर, मी माझे मत मांडले आहे. यावेळेस माझी कल्पना अशी आहे की, [वेळ मिळाला तर हं ] संस्कृतच्या काही माझ्या ओळखीच्या प्राध्यापक मित्रांची मतं इथे मांडीन. त्यांची मत चाचपून बघू या ? तो पर्यंत आपल्या लेखनाला ही केवळ पोच समजावी.
-दिलीप बिरुटे
फायदा
वसंतकाका, संस्कृत शिकवणार्या शिक्षकांना वेतन मिळते म्हणजे त्यांचा फायदाच झाला की नाही? शाळांतले संस्कृत बंद केले तर पंडितांचे कसे होणार?
- राजीव.
सत्यनारायण
हे म्हणजे सत्यनारायणाच्या पुजेसारखेच झाले. :)
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
दगड मारुन तरंग उमटवणे
अधूनमधून तळ्यात एक दगड मारायचा आणि काही खळबळ माजते की बघायचे हे वसुलि यांचे तत्व दिसते आहे. आता याचा कंटाळा आला.
संस्कृत ऐवजी जपानी किंवा स्पॅनिश अशा भाषांचे पर्याय दिल्यास त्यांचा व्यवहारात काहीतरी उपयोग होऊ शकतो
हा हा हा. उपक्रमावर विनोदी लेखन होत नाही असे कोण म्हणतो?
सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का
?
कुठलातरी नाजूक भाग दुखावलेला दिसतो. असो..
'आता कंटाळा आला' ह्यातून तुम्ही पुर्वी मजा लुटायचात असे दिसते. आताच्या कंटाळ्या बद्दल दिलगीर आहे हां!
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
हा हा हा
"आता कंटाळा आला' ह्यातून तुम्ही पुर्वी मजा लुटायचात असे दिसते" असा याचा अर्थ नाही.
एक काल्पनिक कथा सांगतो बोध घेता आला तर बघा.
एका माणसाचा पाय चुकून गटारात पडला. लोक हसले. त्याला वाटलं आपण काहीतरी मोठा विनोद केला. आता त्याने आता मुद्दाम पाय टाकला. लोक परत हसले. तिसर्या वेळेला मात्र लोक हसले नाहीत तर त्या माणसाची कीव करत आपल्या वाटेने निघून गेले.
कल्पनेच्या भरार्या
मूळात एखाद्या मनुष्याचा पाय गटारात पडला म्हणून हसू येणार्या महान विनोद बुद्धीचे लोक उपक्रमावर तरी कमी असावेत. संजोप रावांचे लेखन वाचता त्यांची विनोदबुद्धी इतकी सुमार असेल असे मला वाटत नाही.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
व्यक्तिगत रोखाचा मजकूर संपादित.
सहमत
अगदी हाच विचार मनात आला होता.
"संस्कृत ऐवजी जपानी किंवा स्पॅनिश व्यवहारात उपयोगी" हे वाचून हसून हसून पुरेवाट झाली. रशियन फ्रेंच वगैरे का नको यावर काही आपले मौलिक विचार? त्यासाठी वेगळा धागा काढा. तेवढीच करमणूक... हा हा हा हा
(यालाच "खाजवून खरूज काढणे" म्हणतात काय की हे असले उपद्व्याप म्हणजे "नकारात्मक प्रसिद्धी मिळवण्याची युक्ती? यावर असलाच दोन चार ओळीचा धागा काढावा म्हणतो )
अरे वा!
२८ आठवडे आणि ३ दिवसांच्या वाटचालीत अखेर पहिलाच प्रतिसाद नोंदवण्यासाठी ह्या धाग्याने तुम्हाला प्रवृत्त केलेले पाहून आनंद झाला.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
अरे वा!!
आपल्या या आणखी एका अमूल्य संशोधनाने उपक्रमींना नवीन माहीती मिळाली. त्याबद्दल आभार. आनंद वाटला...
अवांतर प्रतिसादाना माझ्याकडून पूर्णविराम.
(आता आणखी २८ आठवडे आणि ३ दिवस शांत बसावे म्हणतो. आपण शोध लावत राहा. आमच्याकडून प्रतिकूल प्रतिसाद येणार नाही याची खात्री बाळगा. पु सं शु)
हू केअर्स?
हू केअर्स?
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
अभ्यासक्रम बदलावा
मी शाळेत असतानाचा शालेय अभ्यासक्रम कमकुवत होता. असा माझासुद्धा अनुभव आहे.
(शाळांमध्ये शिकवण्यालायक विषय कोणते? व्यवहारोपयोगी विषय, आणि जीवन उपभोग्य-सुंदर करणारे विषय, यांच्यामध्ये किती प्रमाणात शैक्षणिक तासांचा वाटप करावा? - हे सर्व मुद्दे विचार करण्यालायक आहेत. मात्र वेळ विभागल्यानंतर दोन्ही प्रकारच्या विषयांचे प्रमाण ०%पेक्षा अधिक आहे, असे मी गृहीत धरले आहे.)
संस्कृत भाषेच्या अध्ययनाचे प्रमुख प्रयोजन "त्या भाषेतील समृद्ध साहित्याचा आस्वाद घेणे" असा असू शकतो. काही थोडे लोक संस्कृतात रोजव्यवहारातले संभाषण करण्यास उत्सूक असतात. संभाषणेच्छुकांची अल्प संख्या, त्यांच्यापैकी बहुतेकांचे मर्यादित कौशल्य बघता, शाळेमधून संस्कृत शिकवण्यासाठी हे प्रयोजन दुय्यम आहे, असे मला वाटते.
प्राथमिक प्रयोजनासाठी कार्यक्षम अभ्यासक्रम हा सध्याच्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळा असावा. दुय्यम प्रयोजनासाठीसुद्धा अभ्यासक्रम वेगळा असावा लागेल. परंतु अभ्यासक्रम दुय्यम प्रयोजनासाठी बदलला, आणि प्राथमिक प्रयोजनाकडे दुर्लक्ष झाले, तर तसे धोरण योग्य नाही.
सुंदर/समृद्ध विषयांच्या अध्ययनासाठी पर्याय जमेल तितके अधिक हवेत. पैकी एक पर्याय संस्कृत हा विषय असल्यास काहीच हरकत नाही. (अ) संगीत गाणे/वाजवणे आणि त्याचे अभिजात प्रकार, (आ) नृत्य आणि त्याचे अभिजात प्रकार, (इ) अभिजात चित्रकलेचा इतिहास आणि आस्वाद ... असे कितीतरी पर्याय शाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध असावेत. शाळेला किती शिक्षक नेमणे परवडते, त्यावर हे अवलंबून आहे.
जर शाळांना (पाठ्यक्रम सुयोग्य झाल्यानंतर) संस्कृत अध्यापनासाठी शिक्षक सापडत नसतील, तर हा विषय उपलब्ध नसल्यास हरकत नसावी. ज्या थोड्या शाळांमध्ये सुयोग्य शिक्षण दिले जाते, त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाची परीक्षा देण्यास शालांत परीक्षा मंडळाने तरतूद करावी, हे बरे - या तरतूदीचा काही मोठा खर्च येत नाही. त्याच प्रमाणे अभिजात संगीत-आस्वादाचे शिक्षण कुठे सुयोग्य तर्हेने मिळत असेल, तर त्या विद्यार्थ्यांना संगीत विषयात परीक्षा देता यावी.
महाविद्यालयांत "संस्कृत" हा शैक्षणिक पर्याय आग्रहाने उपलब्ध असावा, आणि विद्यापीठांमध्ये संस्कृत विषयाचे अध्यापन करणारा विभाग अवश्य स्थापलेला असावा. चर्चाप्रस्तावकाशी या बाबतीत सहमत आहे.
सहमत आहे
महाविद्यालयात संस्कृत शिकवले जावे, किंबहुना उपलब्ध असलेच पाहिजे. शाळांमधे मात्र तुम्ही म्हणता तसे गायन वादन असे विषय असल्यास फारच छान. संस्कृत शिक्षक नेमणे परवडत असेल तर गायन शिक्षक नेमणे का परवडू नये?
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
'अभिजनपणा' दाखवण्याच्या प्रयत्न
बरोब्बर बोललात धनंजयराव. १०० टक्के सहमत.
मीही सहमत आहे. भाषेचा, भाषाशास्त्र ह्या विषयाच्या विद्यार्थ्यासाठी संस्कृत भाषेचे ज्ञान उपयोगी ठरावे.
संस्कृत श्लोकांमुळे स्मरणशक्ती वाढते वगैरे मुद्दे हास्यास्पद आहेत. काही जण आपला 'अभिजनपणा' दाखवण्याच्या प्रयत्न करीत आहेत. संस्कृतपासून दुरावलो तर आपण आपल्या संस्कृतीपासून, धर्मापासून दुरावू की काय अशी भीती काहींना वाटत असावी. असो. ज्ञानेश्वरी व गाथा आहे ना मराठी भाषेत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
संस्कृत श्लोक, श्लोकसंख्या व तालबद्धता
संस्कृत श्लोकांमुळे स्मरणशक्ती वाढते.
संस्कृत श्लोकांमुळे मेंदूवर काही विशेष परिणाम होऊन स्मरणशक्ती वाढते व त्याऐवजी हिब्रू किंवा तमिळ श्लोकांमुळे असा फायदा होत नाही असा या मुद्द्याचा मथितार्थ नाही.
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी कोणत्याही गोष्टीचे लक्षपूर्वक व एकाग्रतेने वारंवार स्मरण करणे उपयुक्त असते असे म्हणतात. मी ज्ञानेश्वरी वाचलेली नाही व गाथा ही त्यातील अनेक (आक्षेपार्ह?) शब्दांमुळे व एकाच एक छंदात बांधलेली नसल्यामुळे लहान मुलांना पाठ करण्यास देणे सोयीचे नसावे. त्यामानाने अनुष्टुभ छंदातील रामरक्षा ही पाठ करण्यास सोपी, म्हणण्यास तालबद्ध व श्लोकसंख्येने पुरेशी (परंतु अगदी जास्त नाही अशी) मोठी असल्याने शक्यतो रामरक्षा स्तोत्राचे पाठांतर करणे लहान मुलांसाठी सोयीचे असावे.
संस्कृतपासून दुरावलो तर आपण आपल्या संस्कृतीपासून, धर्मापासून दुरावू की काय अशी भीती काहींना वाटत असावी
मला तशी भीती संस्कृताबाबत तरी वाटत नाही, कारण रोजच्या व्यवहारात संस्कृताशी थेट संबंध येणे तसे बंद झाले आहे. (क्वचित एखादा पब्लिक सेक्टर आयपीओ आला तर त्या कंपनीच्या लोगोवरील संस्कृत श्लोक नजरेस पडतो तेवढ्यापुरताच संबंध. उदा. योगक्षेमं वहाम्यहम्. किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेचा 'कटिबध्दा जनहिताय' असा अशुद्ध1 संस्कृतात लिहिलेला शब्दसमूह.) मात्र मराठीपासून दुरावलो तर संस्कृतीपासून व धर्मापासून दुरावू अशी भीती जरुर वाटते. पण संस्कृताबाबतची भीती दुरावलो तरी वास्तवात आलेली नसल्याने मराठीबाबतची भीतीही वास्तवात येणार नाही अशी आशा 2 जरूर आहे.
1. ध्द उच्चारता येत नाही, त्यामुळे कटिबध्दा अशुद्ध.
2.आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला । यया बद्धाःप्रधावन्ति मुक्तास्तिष्टन्ति पंगुवत्
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
बहुमत - पर्यायी विषय
वरील प्रतिसाद -
हास्यास्पद या कटु शब्दापेक्षा दुय्यम असा शब्द वापरायला हवा. थोडे समजावून सांगतो.- ही स्मरणशक्ती उच्चशिक्षणात लागते. उदा. मॅथ्समध्ये कशाचे इंटिग्रेशन काय? किंवा कशाचा झेड ट्रान्सफॉर्म/ लाप्लास ट्रान्स्फॉर्म काय हे पाठ करावे लागते.(ती सूत्रे आहेत. प्रत्येकवेळी त्याच्या सिद्धता कोणी करत बसत नाही. करता येतात. पण सूत्रे लक्षात ठेवणे जास्त सोयीचे असते.) पाठांतराची सवय लहानपणात झाली की पुढे सोपे जाते. संस्कृत भाषेच्या शिक्षणात पाठांतरावर भर असतो. त्यामुळे ती भाषा शिकल्यास स्मरणशक्ती उत्तम होते अथवा पाठांतराची सवय लागते हा (दुय्यम का होईना) फायदा आहे हे अमान्य करता येणार नाही.
पुन्हा 'दाखवण्याचा प्रयत्न' हे कटु शब्द आहेत. 'अभिजनपणा' या शब्दाची व्याख्या खूपच विस्तृत आहे. (ती संस्कृत भाषेपुरती मर्यादित नाही. जसे - शेरोशायरी करणे/शायरी आवडणे, चित्रकला आवडणे इ.इ.) पण संस्कृतचा अभ्यास हा त्यात नि:संशयपणे अंतर्भूत होतो. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहेच. पण त्यात धर्माचा काय संबंध? ते कळले नाही. हिंदूधर्मिय इंग्रजीचा अभ्यास करत नाहीत काय?किंवा इतरधर्मिय संस्कृतचा अभ्यास करत नाहीत काय?
मूळ चर्चा -
येथील बहुतेक जनांना संस्कृत हा शालेय शिक्षणात एक पर्यायी विषय असावा हे मान्य आहे असे दिसते.
पाठांतर
स्मरणशक्तीचे फायदे कुणी अमान्य केलेले नाहीत. (एका मर्यादे पर्यंत) पाठांतराचा आयुष्यात नक्कीच फायदा होतो. मुद्दा हा आहे की त्यासाठी संस्कृतच शिकले पाहिजे असे नाही. १-३० पर्यंत पाढे, रसायन शास्त्रातील सुत्रे, इतिहासातल्या सनावळ्या इ.इ. मधून नको इतके पाठांतर लादले जात असतेच.
कुठल्याही भाषेच्या/विषयाच्या शिक्षणाचा भर पाठांतरावर असेल तर ती शिकवण्याची पद्धत सदोष आहे असे मी मानतो. पाठांतर हे एका मर्यादे पर्यंत ठीक आहे, त्यावरच भर देऊन शिकवणे हे अयोग्य.
वर म्हंटल्या प्रमाणे पाठांतर हे भारतीय शाळांच्या अभ्यासक्रमात सगळ्याच विषयांमधे नको इतके ठासून भरलेले आहे. तेव्हा संकृतची पाठांतर सोडून आणखी काही उपयुक्तता असल्यास सांगावे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
न पटणारे निकष
संस्कृत भाषेच्या अध्ययनाचे प्रमुख प्रयोजन "त्या भाषेतील समृद्ध साहित्याचा आस्वाद घेणे" असा असू शकतो. काही थोडे लोक संस्कृतात रोजव्यवहारातले संभाषण करण्यास उत्सूक असतात. संभाषणेच्छुकांची अल्प संख्या, त्यांच्यापैकी बहुतेकांचे मर्यादित कौशल्य बघता, शाळेमधून संस्कृत शिकवण्यासाठी हे प्रयोजन दुय्यम आहे, असे मला वाटते.
इच्छुकांची अल्प संख्या आणि बहुतेकांचे मर्यादित कौशल्य हे निकष विषय प्रयोजन दुय्यम ठरण्यासाठी पुरेसे नाहीत असे मला वाटते. खरे तर आवश्यकही नसावेत. उदाहरणार्थ १९७५ पासून बोर्डाने महाराष्ट्रात इंग्रजी, विज्ञान आणि गणित हे विषय अनिवार्य केले. त्या आधी कुठलेही ७ किंवा ८ विषय घेऊन मॅट्रिक व्हायची मुभा होती. सध्या या विषयात नापास होणार्या विद्यार्थ्यांची संख्या बघता हे विद्यार्थीही तितके उत्सुक नसावेत आणि यातल्या बहुतेक विद्यार्थी - शिक्षकांचे कौशल्यही मर्यादित असावे. म्हणून हे विषय शाळेमधून शिकवण्याचे प्रयोजन दुय्यम आहे असे आपण म्हणू का? किंवा हे विषय सक्तीचे न ठेवता ऐच्छिक करावेत असे म्हणू का?
या विषयांना उच्च शिक्षणामध्ये आणि करियरमध्ये असलेले महत्त्व लक्षात घेऊन हे विषय सध्या आहेत तसेच अनिवार्य ठेवावेत या मताचा मी आहे. विषय मनापासून आवडणार्यांची संख्या कमी असेल तर त्या विषयात गोडी कशी लागेल असे बघू. शिक्षक - विद्यार्थी मर्यादित कौशल्याचे असतील तर ते वाढवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू पण एका किमान पातळीवर प्रत्येक विद्यार्थ्याला त्यात प्रावीण्य मिळेल असे बघू.
हाच न्याय संस्कृताला, संभाषण - संस्कृताला का लावू नये? इथे माझे मत वेगळे आहे. संस्कृत, संभाषण संस्कृत हे विषय गणित, विज्ञान, इंग्रजी यांच्याप्रमाणे अनिवार्य न ठेवता ऐच्छिक ठेवावेत कारण इच्छुकांची कमी संख्या किंवा मर्यादित कौशल्य नाही तर उपयोगिता. जितके गणित, विज्ञान आणि इंग्रजी उपयोगी आहेत तितके संस्कृत, संभाषण - संस्कृत उपयोगी नाही.
थोडक्यात - इच्छुकांची अल्प संख्या किंवा मर्यादित कौशल्य वगैरे निकषांपेक्षा उपयोगिता हा एकच निकष लावून विषय सक्तीचा की ऐच्छिक ठरवावे. रोग्याला बरे व्हायचे असेल तर डॉक्टराचे कडू औषध प्यावेच लागते त्याबद्दल तक्रार करून चालत नाही तसे आहे.
विनायक
ऐच्छिक
संस्कृत हा विषय ऐच्छिक असावा असेच माझे ही मत आहे आणि मुलांनी तो जरूर शिकावा (त्याचा फायदा मी माझ्या इतर एका प्रतिसादात लिहिला आहे). स्पॅनिश किंवा जपानी शिकण्यापेक्षा संस्कृत शिकलेले बरे असे वाटते.
परंतु या वैकल्पिक विषयांमध्ये पालक-शिक्षकांची मनोधारणा आणि शाळा चालवण्याचे अर्थकारण आडवे येते.
शाळांत सहसा 'हुशार' (म्हणजे काय कोणास ठाऊक) आणि 'बेताच्या' मुलांचे वेगवेगळे वर्ग असतात. हुशार मुलांनी संस्कृत शिकावे अशी धारणा असते. त्याच बरोबर शास्त्र आणि गणित इंग्रजीतून शिकावे अशी धारणा असते. त्यामुळे ज्यांना शास्त्र गणित इंग्रजीतून शिकायचे आहे त्यांना संस्कृत सक्तीने शिकायलाच लागणार. तसेच उलट.
सहसा संस्कृत शिकवणारे जास्तीत जास्त दोन शिक्षक शाळेत असू शकतात. इतर शिक्षकही मर्यादितच असतात आणि तुकड्याही मर्यादित. त्यामुळे शास्त्र इंग्रजीतून शिकणारे, गणित मराठीतून शिकणारे आणि संस्कृत न शिकणारे, शास्त्र व गणित दोन्ही इंग्रजीतून शिकणारे आणि संस्कृत न शिकणारे अशा प्रकारच्या तुकड्या करणे शक्य नसते. (कॉलेजात जशी त्या तासाला काही मुलांनी उठून दुसर्या वर्गात जाणे इत्यादि पद्धती असतात तशा शाळेत करता येतील का?)
(अवांतर : ज्या पालकांची मुले भरपूर फी असलेल्या शाळांत जातात त्या पालकांची इच्छा मात्र त्यांच्या मुलांनी नेहमीच्या विषयांबरोबरच, संस्कृत, फ्रेंच्, जर्मन, कॉम्प्युटर, कराटे, पोहणे, गाणे/संगीत, टेनिस, क्रिकेट, जिम्नॅस्टिक्स, नाट्यकला, वक्तृत्व सगळेच शिकावे अशी असते. :) )
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
सक्ती
म्हणूनच संस्कृत शिकवणे शाळांमधून बंद करुन टाकावे का? असा प्रस्ताव मांडला आहे. संस्कृतची ही अप्रत्यक्ष सक्ती टाळता येणे हे मुलांनी उठून दुसर्या वर्गात जाणे इत्यादि पद्धती अवलंबल्या तरच शक्य आहे. आणि तरीही संस्कृत घेतल्याने मिळणारे स्कोरिंगचे ऍडवांटेज आहेच ज्यामुळे स्पर्धेत राहण्यासाठी संस्कृत घेण्याची सक्ती पुन्हा आलीच. तेव्हा संस्कृत हे शाळांमधून बंद केलेलेच बरे असे माझे अजूनही ठाम मत आहे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
सहमत... आणखी
नितीन
आपण उपस्थित केलेल्या व्यावहारिक अडचणींबद्दल सहमत आहे. अश्या अडचणी सोडवण्यासाठी शाळांकडून जास्त शिक्षक नेमले जाणे अपेक्षित आहे, तसे मिळाले नाही तर विद्यार्थ्यांनी थोडीशी गैरसोय सहन करून इच्छा नसतानाही संस्कृत शिकावे. अगदी काहीही झाले तरी संस्कृत शिकणार नाही असा निश्चय केलेल्यांसाठी शाळा बदलण्याचा पर्याय आहेच. यापेक्षा कुठल्या वेगळ्या पद्धतीने ही समस्या सोडवणार? आयातुल्ला वसुलि यांनी "शाळेत संस्कृत शिकवायलाच बंदी करावी" असा जो फतवा काढला आहे तो म्हणजे शाळेतल्या गोष्टीत होते तसे राजा झोपलेला असताना त्याच्या नाकावर माशी बसलेली पाहून राजाचे आवडते माकड एकदम त्याचे नाकच तलवारीने कापून टाकते तसे आहे.
माझा रोख दुसर्या एका प्रतिसादाकडे होता. काही लोकांना संबंध असो की नसो संस्कृताचा विषय निघाला की संभाषणेच्छुक संस्कृतप्रेमींबद्दल (यात प्रसारकही आले) प्रतिकूल, हिणकस, लिहिल्याशिवाय राहवत नाही. "संभाषणेच्छुकांची अल्प संख्या आणि बहुतेकांचे मर्यादित कौशल्य यामुळे रोजच्या संभाषणात संस्कृतचा वापर हे शाळेत संस्कृत शिकवण्याचे दुय्यम प्रयोजन आहे" हा प्रतिसाद अगदी त्याच प्रकारचा. असला मासलेवाईक युक्तिवाद फक्त त्यांना न आवडणार्या संस्कृत - संभाषणेच्छुक प्रसारक - विद्यार्थी - शिक्षक यांच्या बाबतीतच हे लोक करतात. आज मॅट्रिकला नापास होणारी बहुसंख्य मुले गणित, इंग्रजी, विज्ञान अशा विषयात नापास होतात तिथे "शिकू इच्छिणार्यांची अल्प संख्या आणि बहुतेकांचे मर्यादित कौशल्य" हे मुद्दे येत नाहीत किंवा यामुळे हे विषय शिकण्याचे प्रयोजन दुय्यम आहे असे हे लोक म्हणत नाहीत.
या युक्तिवाद किती पोकळ आहे हे दाखवण्यासाठीच आधीचा प्रतिसाद लिहिला होता.
उपप्रतिसाद
आदला प्रतिसाद आश्चर्यकारक वाटला होता. पण इथे तर वाढवतच चालले आहे.
प्राथमिक आणि दुय्यम प्रयोजनामधून असा काही कडवट अर्थ निघू शकतो असे मला माहीत नव्हते.
"संस्कृतभारती" नावाच्या संभाषणेच्छुक संस्थेला मी थोडीफार कार्यशील मदत करतो. शोधणार्यांना ती गूगलून सापडेल. अर्थातच माझ्या अल्प कौशल्यामुळे माझे कार्य फारसे भारी नाही. तरी त्या संस्कृतप्रचारकांशी माझे वागणे आदरपूर्णच राहिलेले आहे. तरी "न-आवडणार्या" "हीन" "हिणकस" वगैरे आरोपांनी खेद वाटला.
हा मूर्ख आणि असंबद्ध युक्तिवाद माझ्यावर लांछन शोधण्याच्या इच्छेने उद्भवला असावा. व्यवहारोपयोगी आणि समृद्ध शिक्षणविषयांबद्दल माझ्या प्रतिसादात काही सांगितले होते, त्याबाबतीत बळेच आंधळेपण पत्करून असंबद्ध आरोप करायचे असतील, तर मला याउपर प्रतिसाद देण्यात काही रस नाही.
कोणाला भारतात झुलू लोकांचा अतिशय सुंदर नाच शिकायचा असला, आणि त्यांची संख्या कमी असली, विद्यार्थी-शिक्षकांचे कौशल्य मर्यादित असले, तर त्याचा अभ्यासक्रम शाळेत निर्माण करण्याचे प्रयोजनही माझ्यासाठी दुय्यमच आहे. झुलू लोकांच्या नाचाबद्दल माझे कुठलेही हीन मत नाही. इतकेच काय मी स्वतःसुद्धा कधी तो शिकायला जाईन, आणि स्वतःच्या खाजगी पैशाने मदतही करीन. प्राथमिक प्रयोजन अर्धवट सोडून सरकारी पैसे दुय्यम प्रयोजनांवर खर्च करण्याबाबत माझा विरोध राहील. त्यातून दुय्यम प्रयोजनांना "हीन" "हिणकस" वगैरे म्हणतो, हा आरोप खोटा आहे, खोडसाळ आहे.
भलते आणि खोटे आरोप कोणी करत राहिले, तर एखादेच प्रत्युत्तर दिल्यानंतर मौनाशिवाय आंतरजालावर माझ्यापाशी कुठलाही उपाय नाही.
तुमचे - माझे मराठी
काही थोडे लोक संस्कृतात रोजव्यवहारातले संभाषण करण्यास उत्सूक असतात. संभाषणेच्छुकांची अल्प संख्या, त्यांच्यापैकी बहुतेकांचे मर्यादित कौशल्य बघता, शाळेमधून संस्कृत शिकवण्यासाठी हे प्रयोजन दुय्यम आहे, असे मला वाटते.
हे विधान तुम्ही केले आहे. मला एक गोष्ट जाणून घ्यायची इच्छा आहे. ती म्हणजे अ) संभाषण - संस्कृत शिकू इच्छिणार्या शालेय विद्यार्थ्यांची संख्या अल्प आहे आणि ब्) संभाषण - संस्कृत शिकवणार्या शिक्षकांचे शिकवण्याचे - व/वा विद्यार्थ्यांचे शिकण्याचे कौशल्य मर्यादित असते दोन विधाने नेमकी कशाच्या आधारावर केलीत. म्हणजे एखाद्या शाळेने संस्कृत - संभाषण हा विषय नव्याने सुरू करता यावा म्हणून काही सर्वेक्षण केले, किती चांगले शिक्षक मिळू शकतील याची चाचपणी केली आणि त्यावरून हे दोन निष्कर्ष निघाल्याने असा विषय सुरू करण्याचे रद्द केले. असा काही पुरावा आपल्याकडे असल्यास मला तो विदा बघायला आवडेल. निदान किती टक्के विद्यार्थी इच्छुक आहेत, किती नाहीत आणि जे नाहीत त्यांनी काय कारणे दिली याबद्दल उत्सुकता आहे.
जरी एखाद्या शाळेने असे सर्वेक्षण - चाचपणी केले आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे निष्कर्ष निघाले तरी एकंदरीत महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या सर्व शालेय विद्यार्थी - शिक्षकांना हे निष्कर्ष कसे लागू होतील? तेव्हा राज्य अथवा देशाच्या पातळीवर असे सर्वेक्षण - चाचपणी झाली असेल आणि त्याच्या निष्कर्षांवरून आपण हे लिहीत असाल तर (आणि तरच) तुमचा मुद्दा निर्विवाद आहे असे मानेन.
असा काही विदा आपल्याकडे नसल्यास आपण केवळ कयास केला आहे असे मी समजेन. आता ही विधाने जर कयासच असतील तर आपण ही विधाने संभाषणेच्छुक लोकांबद्दलच्या आकसाने केलेली असून यांना प्रतिकूल आणि हिणकस म्हटले तर काय चुकले?
माझ्याजवळ काही विदा नाही. त्यामुळे नुसत्या तर्काने बोलतो. आज ज्याप्रमाणे संस्कृतात स्कोरिंग होते तशाच प्रकारच्या स्कोरिंगची खात्री दिली तर हा विषय घेणार्यांची संख्या अल्प नसेल. इथे पुन्हा अल्प म्हणजे किती हा प्रश्न आहेच. वर्गातल्या पन्नासापैकी पंचवीसांना अल्प म्हणणार का? की सव्वीस पुरेसे आणि चोवीस अल्प?
दुसरे म्हणजे सर्वच विद्यार्थी - शिक्षक मर्यादित कौशल्याचे असतील असे मी समजत नाही. इतर कुठल्याही विषयाबद्दल होते तसे बरेचसे साधारण, काही सुमार आणि काही चांगले असे होणारच.
शेवटी तुमच्या - माझ्या मराठीमध्ये तफावत आहे. तुम्ही लिहिलेल्या विधानांचा अर्थ मी असा लावला. "मोठे आले संस्कृतात संभाषण करणारे. आधी येतेय कोण तुमच्या वर्गाला? चिटपाखरूही फिरकत नाही तिकडे. समजा आलाच एखादा योगायोगाने, तरी शिक्षक काय लायकीचे आहेत? एकाला योग्य प्रकारे बोलायला येत असेल तर शपथ. आणि हे काय शिकवणार कपाळ?
असा अर्थ निघू नये असे वाटत असेल तर नि:संदिग्ध लिहावे.
विनायक
.
.
सरकारी पैसे
हे तुमच्या आमच्यासारख्या जनतेने दिलेल्या करातूनच येतात ना? संस्कृत - संभाषणेच्छुक विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक हे लोकही कर भरत असणार (निदान ज्या प्रमाणात इतर सामान्य जनता भरते त्याप्रमाणात तरी भरत असावेत असा माझा अंदाज आहे. अगदी एकाही संभाषणेच्छुक विद्यार्थ्याचे पालक किंवा एकही संभाषणेच्छुक शिक्षक कर भरत नाही असे सिद्ध झाल्यास हा युक्तिवाद सपशेल मागे). त्यामुळे सरकारी पैशावर इतरांप्रमाणेच त्यांचाही अधिकार आहे. कर भरणार्या इतर लोकांप्रमाणेच या लोकांच्या इच्छा आकांक्षा सरकारने पुर्या करायला हव्यात नाहीतर त्यांच्याविरुद्ध सरकारचा आकस आहे असे होईल. अर्थात या इच्छा आकांक्षा समाजविघातक नसाव्यात हे उघडच आहे आणि संस्कृत संभाषण विद्या शिकण्याची - शिकवण्याची इच्छा समाजविघातक नाही. त्यामुळे सैद्धांतिक पातळीवर सरकारी पैसे या कामावर खर्च करायला कोणाचा आक्षेप नसावा. अगदी पंचतारांकित हॉटेलात हा वर्ग भरवा अशी मागणी कोणी करणार नाही. शाळांमधून जसे इतर विषय शिकता येतात तसाच इच्छुकांना हाही शिकण्याचे स्वातंत्र्य असावे आणि त्याला कोणीही अडथळा करू नये अशीच त्यांची मागणी असणार, जी मला न्याय्य वाटते.
सरकारला व्यावहारिक पातळीवर पैसे द्यायला अडचण असू शकते. त्यावर उपायही निघू शकतो. पालकांनी वर्गणी जमवणे, सेवाभावी शिक्षक मिळू शकतात का याची चाचपणी करणे, कोणी प्रायोजक मिळू शकतात का ते बघणे आणि बाकी थोडा खर्च सरकारने सोसणे.
विनायक
कर देणे म्हणजे हक्क निर्माण करणे नाही
सरकारी पैसा हा करदात्याचा पैसा हे बरोबर असले तरी तो मी दिला आहे म्हणून मला पाहिजे त्यावरच तो खर्च करा असा आग्रह धरता येत नाही. आपण समजा शिक्षणकर दिला असला तरी तो ५% विज्ञानशिक्षण, १५% भाषाशिक्षण असा ब्रेक अप नसतो. तो संस्कृत शिक्षणावर खर्च करावा की नाही हे एकूण शाळेच्या अर्थकारणात ते बसते की नाही (किती मुले इच्छुक आहेत, किती पगार शिक्षकाला द्यावा लागेल) यावरच ठरेल. ५ मुलांना अर्धमागधी भाषा शिकायची आहे म्हणून अर्धमागधी शिकवणार्या शिक्षकाची नेमणूक शाळेत करता येणार नाही. ती तशी केलीच पाहिजे अशी मागणी कर देतो म्हणून त्या मुलांचे पालक करू शकणार नाहीत. सध्यातरी खूप मुले इच्छुक आहेत असेच आहे त्यामुळे जेवढ्या प्रमाणात अर्थकारणात बसते तेवढ्या प्रमाणात बर्याच शाळांतून संस्कृत शिकवण्याची सोय आहे.
(त्यांच्याकडे अर्थातच वेगळे पैसे खर्च करून पेश्शल क्लास लावण्याचा पर्याय उपल्ब्ध आहेच. जसा अनेक लोक नृत्य, संगीत या कलांच्या बाबतीत स्वीकारतात. चित्रकला या कलेबाबत मात्र पुरेसे विद्यार्थी तयार असतात म्हणून शिक्षक ठेवता येतो. तेव्हा चित्रकला न आवडणार्या/न येणार्या मुलांना चित्रकलेचा अभ्यास करावाच लागतो).
अजून एक फरक म्हणजे कर देणारा आणि त्या करातून ज्याला सेवा मिळते तो या दोन वेगळ्या व्यक्ती असू शकतात किंबहुना बहुधा असतातच. कारण कर या कल्पनेचे तत्त्वच हे आहे की ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडून ते घेऊन ज्याला गरज आहे त्याला सेवा उपलब्ध करून देणे.
प्रत्येक जण काही पैसे देतो आणि प्रत्येक जण सेवा घेतो अशा व्यवस्थेला सरकार/पालिका वगैरे न म्हणता क्लब, सोसायटी वगैरे नावे आहेत आणि दिलेल्या पैशांना वर्गणी असे नाव आहे.
धनंजय यांचे म्हणणे मुळात संस्कृत शिकण्याचे प्राथमिक उद्दिष्ट संभाषण करता येणे हे नाही इतकेच होते.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
पाच मुले आणि अर्धमागधी.
इंग्लंडमध्ये एखाद्या गावात प्राथमिक शाळेत जाण्यायोग्य एकच मुलगा किंवा मुलगी असली की त्याला/तिला शिकायला शाळा आणि तिच्यात शिक्षक असतात. फ़र्ग्युसन कॉलेजमध्ये १९६५ मध्ये बी.ए.ला अर्धमागधी घेणार्या चार मुली आल्या. त्यापूर्वी सतत आठ वर्षे एकही विद्यार्थी नव्हता. पण कॉलेज चालू होते आणि प्राध्यापकांचे पगारही. खर्च डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा. दापोलीजवळच्या कोळथरे नावाच्या एका गावात उर्दू शाळेची एक अतिभव्य इमारत दिसली. तिथे जाऊन शिक्षकांशी गप्पा मारल्या. जरी त्या शाळेत ५०० विद्यार्थी सहज बसू शकतील इतके वर्ग होते, तरी एकूण विद्यार्थी होते फक्त पाच, आणि त्यांना शिकवायला पंधरा शिक्षक. शाळेचा सर्व खर्च सरकारचा. अल्पसंख्याकांच्या शाळेवर कितीही सरकारी खर्च झाला तरी त्याला कुठलाही नियम/संकेत आड येत नाही. दुर्दैव फक्त मराठी शाळांचे. एका वर्गात किमान ७० मुले पाहिजेत आणि वर्गामागे फक्त दीड शिक्षक मिळतो. संस्कृत शिकवायला शिक्षक नाही, संस्कृत बंद; क्रीडाशिक्षक नाही, खेळ बंद. शाळेचा निकाल वीस टक्क्याच्या खाली लागला की अनुदान बंद.
थोडक्यात काय तर विद्यार्थीसंखेचे बंधन फक्त मराठी शाळांना आणि तेही फक्त महारा्ष्ट्रात. उगीच नाही महाराष्ट्रापेक्षा भारतातील इतर प्रांत शिक्षणात आघाडीवर.--वाचक्नवी
इतर विषय
शाळेत शिकलेले मराठी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, क्वचित कुठे पर्यावरणशास्त्र, अर्थशास्त्र वगैरे विषय किती उपयोगी पडतात? ते संस्कृतापेक्षा जास्त उपयोगी असतात असे जर वसुलि यांचे मत असेल तर गणित कसे केले ते सांगावे आणि जर ते संस्कृताइतकेच "उपयोगी" असतील तर केवळ संस्कृतावरच त्यांचा इतका राग का? अर्थात् ज्याला हिटलरची स्तुती केली म्हणून सावरकर विकृत वाटतात पण हिटलरला प्रत्यक्ष भेटून त्याची स्तुती करणारे सुभाषचंद्र बोस वाटत नाहीत त्याचा संस्कृतावरचा राग मी समजू शकतो.
विनायक
विनायक
मराठी, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, अर्थशास्त्र हे कसे उपयोगी पडतात हे खरंच स्पष्ट करायला हवं आहे का?
हे कुणाला उद्देशून आहे? चर्चा प्रवर्तक ह्या न्यायाने मला उद्देशून असेल, तर सावरकर मला विकृत वाटतात हे संशोधन कशावरुन केले त्याचा संदर्भ द्यावा. अन्यथा हे बेसलेस विधान मागे घ्यावे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
रागाचे कारण.....कसा बसा सोडवला :)
मी शाळेत असताना निव्वळ प्रवाहासोबत जायचे म्हणून संस्कृत विषय घेतला आणि नंतर पस्तावत घोकंपट्टी करत कसा बसा सोडवला. त्याकाळी संस्कृत हा पर्यायच शाळेत नसत तर मला ह्या उपयोग शून्य नरकातून जावे लागले नसते. उपक्रमींना काय वाटते? शाळांमधून संस्कृत हा विषय बंद केला जावा का?
माझ्या मते संस्कृत हा विषय हा कुठेही सक्तीचा नाही. आपल्याला तो घ्यायची सक्ती नव्हती. आता आपण तो घेतलात, न झेपल्याने कसाबसा सोडवलात आणि त्याचा दोष संस्कृत विषयावर ढकलता हे योग्य नाही. फारतर लोकांनी हा विषय घेऊ नये कारण त्यात कमी मार्क्स मिळण्याची शक्यता आहे अशी जनजागृतीची मोहीम आपण सुरू करू शकता. अर्थात् "मला कमी मार्क्स मिळाले तसेच् तुम्हालाही मिळतील" हा युक्तिवादाला "'नाचता येईना अंगण वाकडे' तुम्ही अभ्यास न केल्याने कमी मार्क्स मिळाले, पण जास्त अभ्यास करून जास्त गुण मिळवलेले लोकही आम्ही पाहिले आहेत. तसेच आम्हीही जास्त अभ्यास करून जास्त गुण मिळवू' असे उत्तर मिळाल्यास तुमचे काय उत्तर असेल याचे कुतूहल आहे.
आमच्या वेळी तर १०० मार्कांचे संस्कृत हा पर्यायच नव्हता. १०० मार्कांचे हिंदी किंवा ५० - ५० हिंदी संस्कृत. त्यापैकी दुसरा पर्याय घेतल्याने ७६ मार्क्स मिळाले. १०० मार्कांचे संस्कृत असते तर ९०+ मिळाले असते. पण म्हणून आम्ही रडत बसलो नाही किंवा १०० मार्कांचे हिंदी किंवा ५० - ५० हिंदी संस्कृत हे पर्याय बंद करून फक्त १०० मार्कांचे संस्कृतच चालू ठेवावे असे विचार मी मांडले नाहीत.
विद्यार्थ्यांकरता सर्व पर्याय उपलब्ध असावेत. लोकांनी हवे ते निवडावे हीच माझी धारणा आहे.
विनायक
धन्य आहे!
चर्चेतले मुद्दे सोडून माझ्याविषयीच काढलेले हे निष्कर्ष पाहून थक्क झालो!
गेट वेल सून!!
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
सहमत
माझ्या मते संस्कृत हा विषय हा कुठेही सक्तीचा नाही.
हेच म्हणतो. संस्कृत हा 'स्कोअरिंग' विषय आहे असा एक गैरसमज सर्वदूर पसरलेला आहे. प्रवाहपतितांप्रमाणे मीही दहावीला 'स्कोअर' करण्यासाठी संस्कृत हा विषय घेतला. मात्र आमच्या शाळेत संस्कृतला पर्याय असलेल्या हिंदीमध्ये अनेकांना तुलनेने अधिक गुण मिळाले होते. व हिंदीपेक्षा संस्कृतात नापास झालेल्यांची संख्या जास्त होती. सुदैवाने मला संस्कृतात चांगले गुण मिळाले मात्र हिंदीमध्ये माझ्याइतकेच गुण माझ्या स्पर्धकाला मिळाले. मात्र संस्कृत शिकून माझा बराच फायदा झाला.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
प्रवाहपतित
'प्रवाहपतित' हा विस्मरणात जाऊ पहात असलेला शब्द पुन्हा वापरात आणल्याबद्दल टाळ्या!
सन्जोप राव
हर इक बात पे कहते हो की तू क्या है
तुम्ही कहो कि ये अंदाजे-गुफ्तगू क्या है
अभ्यासक्रम
मध्ये कुठेतरी 'बीजगणिताचा तुम्हाला व्यवहारात काय उपयोग झाला' अशी चर्चा वाचली. त्यात कोणीतरी यादी देऊन 'खरं तर कुठच्याच विषयाचा काहीच उपयोग नाही' असा निष्कर्ष काढला होता ते आठवलं. असं असूनही आजकालचं सुशिक्षित जग अधिक समृद्ध कसं, हा प्रश्न राहातोच.
असो. मला वाटतं आपण उपयुक्तता कशाला म्हणतो याच्यावर सर्व अवलंबून आहे. त्यासाठी शिक्षणसंस्थेची तीन महत्त्वाची कार्यं बघणं आवश्यक ठरतं.
१. मनुष्यबळाचा विकास - यात समाजाला आवश्यक अशी तंत्रं विद्यार्थ्याला शिकवणं हे येतं.
२. विद्यार्थ्याचा विकास - विद्यार्थ्याला समृद्ध नागरिक, व समृद्ध व्यक्ती बनवण्यासाठी आवश्यक माहिती देणं, तंत्रं शिकवणं.
३. विद्यार्थ्यांची वर्गवारी - कोण अधिक कर्तबगार व कोण कमी याची सर्टिफिकेटं देणं.
या तीन पूर्णपणे स्वतंत्र नाहीत, पण उपयुक्तता या तीन वेगवेगळ्या गोष्टींनी ठरते. उदाहरणार्थ, निव्वळ पाट्या टाकणारे कारकून बनवायचे असतील तर इतिहास शिकण्याची तरी काय गरज आहे? असा वाद घालता येईल. इतिहास १. साठी आवश्यक नसून २. साठी आवश्यक आहे. संस्कृत भाषा इतिहासाप्रमाणे क्र. २ चं कार्य करते असं वाटतं. अर्थातच तो विषय, क्र. ३ चंही कार्य करतो.
याहीपुढे विद्यार्थ्याचा विकास म्हणजे काय हेही नुसत्या गणित विज्ञानादी 'उपयुक्त' विषयांनी होत नाही. आपल्या बुद्धीमत्तेचे अनेक पैलू असतात. त्या सर्व पैलूंसाठी आवश्यक त्या विषयांची विभागणी गरजेची आहे. तसंच सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी एक विशिष्ट लवचिकताही आवश्यक आहे. हे सर्व तोकड्या साधनांनिशी करावं लागतं.
माझा मुद्दा असा आहे की शिक्षणव्यवस्था ही सोपी गोष्ट नाही. ती बदलायची असेल तर मूलभूत विचार करायला हवा. केवळ एक खांब काढून दुसरा ठेवायचा याने एखादी बिल्डिंग दुरुस्त होत नाही, तसं काहीसं तुमचा प्रश्न वाचून वाटलं. मी मांडलेल्या चौकटीसारख्या चौकटीत तुमचा प्रश्न कुठे बसतो ते सांगा. त्या गृहितकांचा, तत्वांचा परिपाक म्हणून इतर विषयही कसे अपरिहार्य ठरतात हेही दाखवून द्यावं असं वाटतं. म्हणजे नीट विचार करता येईल. अन्यथा चर्चा वाहावण्याची शक्यता आहे.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
उपयुक्तता
माध्यमिक शालेय पातळीवर ते कसं काय होते ह्याचे अधिक स्पष्टीकरण दिल्यास आवडेल.
निश्चितच नाही. मराठी /इंग्रजी ह्या भाषा आणि त्यातील साहित्य अभ्यासक्रमातून काढावे असे माझे बिल्कुल मत नाही. मराठी/इंग्रजी ह्या भाषा प्रवाही आहेत, त्यातील साहित्यात सतत भर पडत असते. ह्या विषयांची पाठ्यपुस्तके वाचून साहित्याची गोडी निर्माण झालेली अनेक उदाहरणे देता येतील परंतू त्या तुलनेत संस्कृतच्या अभ्यासाने संस्कृत साहित्याची गोडी लागली अशी उदाहरणे किती देता येतील?
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
फॉरेस्ट अॅंड ट्रीज...
तुमचा आक्षेप संस्कृत भाषेला आहे की शालेय पातळीवर ते शिकवायला हे कळलं नाही. संस्कृत हा आपल्या सांस्कृतिक इतिहासाचा, भाषेच्या पायाचा एक भाग आहे या पलिकडे मी काय स्पष्टीकरण देणार? तुम्ही या सर्व यंत्रातल्या या चाकाचा उपयोग काय असा प्रश्न विचारता आहात. मी म्हणतो आहे की संपूर्ण यंत्राचा विचार करणं आवश्यक आहे.
किती उदाहरणं आवश्यक आहेत? किती असतील तर संस्कृत हा विषय असणं लाभदायक ठरेल? साहित्याची गोडी लागणे याचे नक्की निकष काय? तुम्ही मलाच प्रश्न विचारण्याऐवजी तुमचे विचार व्यापक चौकटीत मांडून मला (व इतरांना) समजावलेत तर बरं होईल असं म्हणतोय. बर्डन ऑफ प्रूफ हे बहुतेक वेळा नवीन विचार मांडणाऱ्याकडे असतं. तेवढं तुम्ही पाळावं एवढंच मी म्हणतोय. निरुपयोगी म्हणजे काय, उपयोगी म्हणजे काय याच्या तुमच्या व्याख्या सांगा, त्यानुसार इतर विषय कसे उपयोगी आहेत हे दाखवा, मग पुढचं बोलू. जर तुम्हाला हा व्यापक विरुद्ध कोतं हा विचारच कळला नसेल, किंवा पटला नसेल तर तसं सांगा...
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
आक्षेप
तुमचा आक्षेप संस्कृत भाषेला आहे की शालेय पातळीवर ते शिकवायला हे कळलं नाही.
हे वाचलेत का? ह्याहून काय सोपे करुन सांगायचे ते सांगा.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
अशी सीरियल उत्तरं नका हो देऊ
तुमचा आक्षेप शाळेत संस्कृत शिकवायला आहे हे मी अधिक काळजीपूर्वक वाचायला हवं होतं खरं. मी तीनचार प्रश्न विचारले, एक चुकीचा विचारला, तर त्यावर का गाडी अडवून ठेवता? सम्यक उत्तर द्यावं ही विनंती. नाहीतर प्रतिसाद, उपप्रतिसादांची गाडी लांबत जाते.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
हि घ्या बाकीची उत्तरे...
तुमच्या पहिल्याच प्रश्नात चूक निघाली त्यामूळे ती सुधारल्याशिवाय गाडी पुढे ढकलणे अवघड झाले. असो..हि घ्या बाकीची उत्तरे.
संस्कृत हा आपल्या इतिहासाचा भाषेचा पाया आहे ह्या गृहितकाशी मी सहमत होण्याइतपत पुरावे मला सापडलेले नाहीत. मी स्वतः (शालेय) संस्कृत शिकलेलो आहे आणि त्याचा मला इतिहास, भाषा शिकण्यात काहीही फायदा झाला नाही. तसेच संस्कृत हे जर यंत्राचे चाक असते तर ज्यांनी हे चाक यंत्राला लावलेच नाही अशा लोकांचे यंत्र कसे काय चालते?
इतर प्रवाही भाषांशी तुलना करता येतील इतकी उदाहरणे आवश्यक आहेत. गोडी लागणे म्हणजे आवड निर्माण होणे. साहित्य वाचनाची/ लिखाणाची आवड असणे. संस्कृतची उपयुक्तता ही जीवन उपभोग्य-सुंदर करणारा विषय म्हणून विचारात घ्यायची असेल तर त्यातील साहित्याची आवड लागणे हा पैलू अभ्यासणे महत्वाचे आहे. शाळेत मराठी भाषा शिकल्याने पाठ्यपुस्तकातून मला कितीतरी पुस्तकं/लेखक ह्यांची ओळख झाली आणि मराठी साहित्य वाचण्याची गोडी निर्माण झाली. मराठी भाषा शालेय अभ्यासक्रमात शिकवण्याचा जीवन उपभोग्य-सुंदर करणारा विषय म्हणून मला फारच उपयोग झाला. संस्कृत भाषा शिकल्याने मला तसा अनुभव आलेला नाही.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
उदासीन
या चाकामुळे हे यंत्र तद्दन वाईट चालत असावे असा आपल्याला संशय आहे. पण आपल्याकडे कुठचाच विदा चांगलं वा वाईट दर्शवणारा नाही. तेव्हा तो बदल करणं निरर्थक होणार नाही का? शिक्षणव्यवस्थेत काही बदल आवश्यक आहेत यावर मी विश्वास ठेवू शकेन, पण त्याचा असा तुकड्यातुकड्याने विचार करायला माझा विरोध आहे. संस्कृत हा संपूर्ण अभ्यासक्रमाच्या सुमारे ५% असतो. इतक्या बारीक तुकड्याचा तर निश्चितच विचार स्वतंत्रपणे होऊ नये.
दुर्दैवाने मला व्यापक विचार म्हणजे काय म्हणायचं होतं हे तुमच्या लक्षात आलेलं नाही. 'भाषाच जर शिकायची झाली तर तिचे क्ष फायदे असले पाहिजेत, व ते मला मिळाले नाहीत' एवढंच तुम्ही म्हणता आहात. त्यात शिक्षणाचा समाजाला, व व्यक्तीला असलेल्या फायद्याचं गणित मांडलेलं नाही.
त्यामुळे माझी तुमच्या मूळ प्रश्नांवर 'उदासीन' अशी प्रतिक्रिया आहे.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
व्यापक विचार??
तुम्ही धागा नीट न वाचता समजून न घेता पुन्हा पुन्हा शब्दांना घाई झाली म्हणून कागदावर बसवण्याची गडबड करत आहात. चाकामुळे यंत्र वाईट चालत आहे असा मला संशय नसून मूळात ज्याला चाक म्हंटले जात आहे ते चाक नसून अनावश्यक भार आहे असे माझे मत आहे. अशी अनेक अनावश्यक ओझी बाळगण्याची क्षमता यंत्रात असते त्यामुळे यंत्र वाईट चालेलच असे नाही, पण म्हणून ही अनावश्यक ओझी बाळगलीच पाहिजेत का? फरक लक्षात यावा..
पुन्हा तेच.माझे प्रतिसाद कृपया नीट वाचावेत. "अनुभव आलेना नाही ह्यामागे माझा किंवा मला ज्या पद्धतीने संस्कृत शिकवले गेले त्या पद्धतीचा दोष असू शकतो हे मी मान्य करतो" असे स्पष्ट लिहिलेले आहे. आणि म्हणूनच तज्ञांची मते द्यावीत इतर उदाहरणे द्यावीत असे इतरत्र म्हंटलेले आहे. तरीही, 'भाषाच जर शिकायची झाली तर तिचे क्ष फायदे असले पाहिजेत, व ते मला मिळाले नाहीत' एवढंच तुम्ही म्हणता आहात. हे विधान करणे म्हणजे खोडसाळपणा आहे की काय असे वाटू लागले आहे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
संस्कृत विषय सक्तीचा असावा
माझ्या मते, ज्यांना संस्कृत शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा पर्याय महाविद्यालयात असावा. माध्यमिक शालेय पातळीवर असले अनावश्यक विषय भरण्याची बिलकुल गरज नाही.
माझ्या मते संस्कृत हा विषय माध्यमिक शालेय पातळीवर सक्तीचा असावा. त्याऐवजी हिंदी हा विषय ऑप्शनल करावा. तशीही रस्त्यावर वापरण्यापुरती हिंदी, सिनेमे बघून शिकता येतेच. मात्र संस्कृत तसे शिकता येत नाही.
उपयोगाबाबत म्हणाल तर अभियांत्रिकीमध्ये आम्हाला अप्लाईड सायन्स नावाचा महाभयंकर विषय दोन सत्रांमध्ये होता. पहिल्या सत्रात उत्साहाने अभ्यास करुन ७० गुण मिळाले पण या विषयाचा संगणक शास्त्राशी काही संबंध नसल्याचे लक्षात आल्यावर हा विषयच ऑप्शनला टाकल्याने दुसऱ्या सत्रात मी या विषयात नापास झालो व अनेक कंपन्यांच्या क्यांपस इंटरव्यूच्या निकषात बसू शकलो नाही. अद्यापिही अधूनमधून श्रॉडिंजर वगैरे भयानक शब्द आठवतात (उपक्रमावरही कोणीतरी त्याबाबत चर्चा करते ) व दोनचार दिवस झोप उडते.
अर्थात यापेक्षाही भयानक असे अप्लाईड मेकॅनिक्स सारखे विषय इतरेजनांना होते हे पाहून त्यांच्या दुःखात आम्ही समाधान मानत असू. (ते सदस्यही पुढे संगणक कंपन्यांमध्येच आले व मेकॅनिक्स अप्लाय करायला संधी मिळाली नाही)
केवळ उपयोजितेचा निकष लावला तर फक्त भूगोलासारखेच विषय सक्तीचे करावेत म्हणजे उन्हाळ्यात रात्र छोटी व दिवस मोठा, तर हिवाळ्यात रात्र मोठी व दिवस लहान वगैरे गोष्टींचा व्यावहारिक आयुष्यात वापर होऊ शकतो व निदान भर उन्हाळ्यात होणारी लग्ने बंद होऊन लोक जरा दिवाळीबिवाळीत लग्ने करतील.
असो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
२२ जून
एका अवांतर प्रतिसादाला दुसरा अवांतर प्रतिसाद.
लग्ने दिवाळीबिवाळीत लागतील.
छ्या, काही तरीच काय ? आमची रात्री लहान असतांना मेत लागली आणि तुमची हिवाळ्यात पाहिजेत काय ? लुच्चे कुठले !असो. एक किस्सा ऐकलेला. एका अमेरिकन माणसाला २२ जूनला लंडनमध्ये त्याची इंग्लिश मैत्रीण म्हणाली, " तुला माहीत आहे? आज वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे." तो संध्याकाळी पॅरिसला गेला. तेथे त्याची फ़्रेंच मैत्रीण म्हणाली, " तुला माहीत आहे? आज वर्षातली सर्वात लहान रात्र असते."
शरद (जून-डिसेंबर सारखेच समजणारा स्थितप्रज्ञ)
खरे म्हणजे हा विनोद सुभाष भेण्डे यांचा
लग्ने उन्हाळ्यात लावण्याबाबतचा मूळ विनोद सुभाष भेण्डे यांचा आहे. त्यांच्या एका कथेचा नायक भूगोल विषयाचा प्रा.डॉ. असतो व बराच काळ त्याचे लग्न जमत नसते. अखेरीस लग्न जमते तेव्हा तो हळूच भेण्डे यांच्या कानात सांगतो की आज लग्न करण्याचे कारण म्हणजे आजची रात्र सर्वात मोठी असते. (पुढे श्री भेण्डे म्हणतात की हा दिवसातून बायकोभोवती किती परिभ्रमण करतो याची मात्र कल्पना नाही.)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
नेहमीचा तरीही वेगळा चर्चा विषय
संस्कृत जी भाषा जिवंत आहे का हा मुद्दा वेगळा आणि ती शिकणं / शिकवणं गरजेचं आहे का हा मुद्दा वेगळा असे मी समजतो. मी स्वतः १०० मार्कांचे संस्कृत शिकलो. सध्या गेले ३ महिने एक परदेशी भाषा शिकतो आहे. आणि इतकं सांगु शकतो की परकीय भाषा शिकताना मला इतर कोणत्याहि भाषेपेक्षा (अगदी मराठीपेक्षाही) संस्कृत शिकल्याचा फायदा होतो आहे. कारण संस्कृत शिकताना जो व्याकरणाभिमुख विचार करण्याची सवय लागते / लावली जाते त्याचा उपयोग नवी भाषा शिकताना होतो.
उदा. द्यायचं झालं तर मराठी बोलताना एखाद्या शब्दाला द्वितीयेचा प्रत्यय लावावा का तृतीयेचा हा विचार मी जाणीवपूर्वक करत नाहि.. मात्र परकीयभाषा शिकताना संस्कृतचे अमुक धातुला अमुकची अपेक्षा असते वगैरे आठवतं.. त्याच पद्धतीने नवी भाषा शिकताना जावीवपूर्वक व्याकरणाचा विचार करणे आवश्यक असते व त्याची सवय संस्कृतने लावली आहे.. नव्या भाषेतील विभक्ती प्रत्ययांचा (संस्कृतसारखा) वेगळा तक्ता केला तर भाषा शिकणे सुलभ होते हा स्वानुभव आहे.
आता प्रश्न रहातो संस्कृतच का? कोणतीही परकीय भाषा शिकता येईल.. हरकत काहिच नाहि मात्र त्यासाठी ती भाषा तितक्या अधिकाराने व इतक्या विस्ताराने शिकवणारे शिक्षक इतक्या संख्येने भारतात सहज उपलब्ध आहेत का?
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
चांगला मुद्दा
हा मुद्दा नक्कीच विचार करण्याजोगा आहे. संस्कॄत शिकल्याने व्याकरणाभिमुख विचार करण्याची सवय लागते हा माझा तरी अनुभव नाही. पण तो माझा किंवा मला ज्या पद्धतीने संस्कृत शिकवले गेले त्या पद्धतीचा दोष असू शकतो हे मी मान्य करतो.
खाली विसुनाना म्हणतात तसे भाषाशस्त्राचा पाया पक्का होण्यासाठी संस्कृत शिकणे महत्वाचे आहे ह्या मतास तज्ञांनी दुजोरा दिल्यास माझे मत बदलेल.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
विषयाला फाटा फोडण्याचा प्रयत्न
आरक्षणाच्या विरोधात 'मेरिट'विषयक युक्तिवाद करण्यासाठी संस्कृत विषयातील गुणांचा संदर्भ देतात का? तशी तफावत असते का?
संस्कृत विषय सक्तीचा असावा
ही चर्चा महाराष्ट्रापुरत्या पाठ्यक्रमाशी संबंधित आहे.पण तरीही ती पूर्ण भारताला लागू पडेल अशी आहे.
आजानुकर्ण यांच्या मताशी सहमत. पूर्ण भारतभर निदान ५० गुणांचा तरी संस्कृत विषय माध्यमिक शिक्षणात असावा.
१. संस्कृत भाषा भारतातील अनेक भाषांची आई किंवा मावशी असल्याने ती भाषा शिकल्यास इतर भाषांची निदान तोंडओळख तरी सोपी होईल.
२. भारतात काही विशिष्ट समुहापुरते मर्यादित असलेले, मक्तेदारी समजले जाणारे ग्रथित ज्ञान सर्वजनांमध्ये पसरू शकेल.संस्कृत शिकणे अवघड असते, ते काही खास लोकांनाच शक्य आहे अशा अनेक गैरसमजुती नाहीशा होऊ शकतील.
३. संस्कृत व्याकरण अभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीला चालना मिळेल.
४. संस्कृतातील अनेक 'अप्लाईड' साधने सोपी होतील - उदा. वैदिक गणित.
५. निदान काही सुभाषिते तरी पाठ होतील - हेही नसे थोडके.
(संस्कृत अवघड आहे. पण माध्यमिक शाळेत इंग्रजी आणि गणित हे विषय अवघड जाणारे अनेक विद्यार्थी आहेत. तसेच भारतातील शेकडा >५०% विद्यार्थ्यांचा बीजगणित - भूमिती यांच्याशी प्रत्यक्ष आयुष्यात व्यावहारिक संबंध येत नसावा. विदा नाही.)
सक्ती बिक्ती नसावी.
संस्कृत ज्याला शिकायचे त्याने शिकावे, शाळेत ती ऐच्छिक भाषा म्हणून असायला हरकत नाही. आणि सध्या तिचे स्वरुप तसेच आहे, असे वाटते. फक्त तिच्यामुळे इतर भाषेची ओळख होते वगैरे यात काही तथ्य मला तरी वाटत नाही. एखाद्या भाषेवर अनेक भाषांचा, शब्दाचा प्रभाव असतो. तसा तो काही एकाच भाषेमधील प्रभाव नसतो. आणि असा प्रभाव सोडला तरी बाकी त्यात विशेष असे अभ्यासण्यासारखे काही नसते, नसावे. कोणतीही भाषा शिकायची असेल तर भाषाभ्यासक असे म्हणतात की, त्या त्या भाषेचे व्याकरण समजावून घेतले पाहिजे. त्यासाठी संस्कृतचेच व्याकरण समजून घ्यावे असे काही नाही. बरं ! भाषा म्हणजेच व्याकरण असा आपण समज करुन घेतल्यामुळे आपण उगाच व्याकरणाला महत्त्व देतो. कारण व्याकरण भाषेची नियमावली असते. आणि नेमकी भाषा ही परिवर्तनशील असते, प्रवाही असते. त्यामुळे व्याकरणाला भाषेतील बदल मानवत नाहीत. बदलत्या भाषेचे स्वरुप समजून घेण्यासाठी पारंपरिक व्याकरण उपयोगाचे ठरत नाही. त्यामुळे संस्कृत व्याकरणामुळे स्मरणशक्तीला चालना मिळते हे मला तरी न पटणारे आहे. चुभुदेघे.
-दिलीप बिरुटे
संस्कृत आणि स्मरणशक्ती
संस्कृतातील अथर्वशीर्ष, रामरक्षा स्तोत्र, श्रीसूक्त व तत्सम अनेक (निरुपयोगी) गोष्टींच्या पाठांतरामुळे माझी स्मरणशक्ती उत्तम राहिली आहे असे मला वाटते. संस्कृत शिकल्यामुळे या स्तोत्रांचे तुटकतुटक अर्थ लावण्यात चांगला टाईमपास झाला हाही एक फायदा आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥