कितवे गये

कितवे गये

आयुष्याच्या साय़ंकाळी, "लागले नेत्र रे पैलतीरी" असे म्हणावयाची वेळ आलेली असते तेव्हा गतकालाचा आढावा घेतांना डोळ्यासमोर येतात आप्तमित्र, ज्यांनी आपल्याला अनेक वर्षांची साथ दिलेली असते. दिन ढळला असला तरी " संध्याछाया भिवविती हृदया " अशी घबराट असतेच असेही नाही. कारण हे पुढे गेलेले लोक. कुठे गेले आहेत ही माणसे ? माहीत नाही. पण कुठे का असेनात, तिथे जर परत भेटणार असतील तर आनंदाचीच गोष्ट आहे, घाबरायचे कशाला ? यांच्यामुळेच या पर्वताएवढे दु:ख असलेल्या संसारात चार सुखाचे क्षण लाभले आहेत ना ? गतकाळात आम्ही शाळेतील चार मित्र सहकुटुंब भेटलो की की क्षुल्लक कारणांवरून मी भांडण उकरून काढत असे. सौभाग्यवती कावून समजूत घालावयाचे प्रयत्न करत पण माझा सवाल असा की " भांडण मित्राशी करावयाचे नाही तर काय अनोळखी तिकिटचेकरशी ? " मित्रांनी त्यावेळी दुर्लक्ष केले, भले होते. आज क्षमा मागावयाची म्हटले तरी शक्य नाही. पण या रागलोभांनी आयुष्याचे क्षण लख्ख केले, सर्वसामान्य आयुष्य सजवले हे आता ध्यानात येते.

याची आठवण व्हावयाचे कारण श्री. किशोरीताईंनी गायलेला बिलावल. मागे बिहाग व भैरवीतील रचना पाहिल्या त्यावेळी त्यातील काव्य मनाला भावून गेले होते. या छोट्याश्या रचनेचे शब्द आहेत

आली रे कितवे गये लोगवा जा संगत सुख पायो !!
जिनमे सजवे जनम बीत गये काम क्रोध जा नही आवे !!

दोन ओळींत समग्र आयुष्याचे सार काढले आहे!
मागील लेखात चीजेच्या शब्दांबद्दल चुका झाल्या होत्या. कानाला खडा. लगेच अदितीला व्यनि पाठवला. तिने चीज व सुरेख माहितीही सोबत पाठवली. तीही खाली देत आहे.

शब्द असे आहेत :
राग यमनी बिलावल
अस्ताई :
आली री कित वे गये लोगवा
जा संगत सुख पायो
अंतरा :
जिनमे सजी वे जनम बीत गये
काम क्रोध नही आवे
रचनाकार :उस्ताद अल्लादिया खाँ साहेब
अल्लादिया खाँ हे पंडित भास्करबुवा बखल्यांच्या तीन गुरूंपैकी एक होते. फैज महंमद खाँ , नथ्थनखाँ आणि अल्लादिया खाँ ही भास्करबुवांची गुरूत्रैमूर्ती. भास्करबुवांच्या विद्या मिळवण्यासाठी केलेल्या अथक श्रमांची आणि तेजस्वी तळपत्या गायकीची कथा पु ल देशपांड्यांच्या (बहुतेक) 'गुण गाईन आवडी' या पुस्तकातल्या बुवांच्या चरित्रात वाचायला मिळते.
अल्लादियाखाँ हे मूळचे गुजराती नागर ब्राह्मण होते. उस्ताद अल्लाऊद्दीन खाँसाहेबांप्रमाणेच अल्लादिया खाँसाहेबांना आपल्या पूर्वजांच्या हिंदू परंपरांबद्दल प्रेम होते. शुद्ध हिंदी भाषेत त्यांनी काही चिजा बांधल्या आहेत. संगीत सौभद्र या नाटकातील 'मम सुखाची ठेव' हे तिलक कामोदातले अवीट गोडीचे नाट्यगीत अल्लादियाखाँसाहेबांच्या 'सूर संगत राग विद्या' या चिजेवरून बांधलेले आहे.
'आली री कितवे गये' ही चीज खाँसाहेबांनी आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमधे बांधली आहे. बरोबरचे सगळे सखे सोबती पुढे निघून गेल्यामुळे आलेले एकटेपण या चिजेत दिसून येते. ज्यांच्याबरोबर सुखाचा काळ घालवला ते लोक कुठे बरे गेले असा काहीसा भाव यात आहे.
मागच्या पत्रामधे मी या रागाचे नाव अल्हैया बिलावल असे सांगितले होते त्याबद्दल क्षमस्व. हा राग त्याच्या जवळचा आहे. रागाचे नाव यमनी बिलावल. हा गाताना प्रकर्षाने दाखवल्या जाणार्‍या तीव्र निषादामुळे आणि 'नी रे ग' अशा यमनचे चलन दाखवणार्‍या संगतीमुळे हा राग अल्हैया बिलावल या रागापासून वेगळा दिसून येतो.
या चिजेचे शब्द गानसरस्वती किशोरी आमोंडकर यांच्या ध्वनिमुद्रिकेतून जसेच्या तसे लिहिले आहेत. एखादा शब्दभेद - पाठभेद जाणवल्यास तो माझ्या श्रवणाचा दोष मानावा.
अदिती
क्या बात है !
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

दुवा

सदर चीज खालील दुव्यावर ऐकता येईल.
आली री कितवे गये लोग

 
^ वर