बिनपैशाचे जग व बॅंकांचा उदय

पैशाशिवायच्या जगाची कल्पना करुन पहा. गेल्या शंभरेक वर्षांत अनेकांनी- कडवे कम्युनिस्ट, अतिभुमिका घेणारे, कडवे मुलतत्ववादी, आणि हिप्पी- असे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न केला आहे. लेनिनचे ह्याबाबतचे विचार तपासून पहाता येतील. तरीही, कोणतेही कम्युनिस्ट राज्य- अगदी उत्तर कोरीयाही- आजपर्यंत पैशाशिवाय व्यवहाराची अंमलबजावणी करु शकले नाहीयेत.

असे काही दाखले आहेत की, अति-दुर्गम जंगलातील आदीवासी, ज्यांचा बाहेरील जगाशी काडीमात्राचाही संबंधा आलेला नव्हता, जेव्हा आधुनिक जगाच्या संपर्कात आले तेव्हा ते ज्या पद्धतीने वागले ते पाहून त्यांना पैशा-विना जगातील तोटे जाणवत होते असेच म्हणता येईल. त्यांच्यातील ४०-६०% पेक्षा जास्त पुरुष आपापसात भांडतांना मरण पावलेले असतात असे पाहणीतील निष्कर्ष सांगतात. ही भांडणे अर्थातच जननक्षम स्त्री व शिकार केलेल अन्न ह्यासाठीच केली जाते. (उदा. ऍमेझॉन खोऱ्यातील नुकाक-माकू ही जमात)

प्रागैतिहासिक मेसोपोटेमिया संस्कृतीबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, ५००० वर्षांपुर्वी, लोक मातीपासून बनवलेल्या पातळ वड्या एकमेकांतील व्यवहार टिपून ठेवण्यासाठी वापरत. त्यावरुन असे दिसते की, शेतीजन्य वस्तू, लोकर, चांदीसारखे धातू हे चलन म्हणून वापरले जात. राजा एखाद्याला अशाच बिस्कीटावर एखाद्याला बक्षीशी लिहून द्यायचा व त्या व्यक्तिला बिस्कीटावरील मजकुरानुसार वस्तू राज्यातील कोणत्याही शहरात मिळत असत. हे बिस्कीट त्यास राजाच्या खजिन्यात अथवा धान्यगृहात भर घातल्याच्या बदल्यात मिळत असे. आधुनिक जगातील बॅंकनोट हेचतर करतात. हे राजाचे एक प्रकारचे वचनच असे, व असेच वचन आजही आपल्याला बॅकनोटेवर पहावयास मिळते.

पैसा घेणारा आणि देणारा ह्यांच्यात एक प्रकारचा निश्चीत संबंध प्रस्थापीत करतो. वरील मेसोपोटेमियाच्या उदाहरणातील बिस्कीट पैसे देणारा त्यावर काय दिले जाणार आहे व कधी अशा प्रकारचा मजाकूर नोंदवायचा. ऐतिहासिक बॅबिलॉन संस्कृतीतील कर्ज देण्याची पद्धत तर आधुनिकच म्हणता येईल. त्यात ऋण घेणारा ऋणाचे हस्तांतर करु शकत असे. "पे द बेअरर" असे म्हणण्याची प्रथा तेव्हाचीच. ऋण घेणारे त्यावर २०% पर्यंत व्याज देत असत. व्याजाची प्रथा कदाचित तेव्हा पाळीव जनावरांच्या कळपातील जनावरांच्या संख्येत अपेक्षित असलेल्या वाढीमुळे झाली असावी असे मानले जाते. बॅबिलॉन संस्कृतीतील हम्मुराबी राजाच्या काळातील गणित व त्याविषयीच्या नोंदी अभासल्या असता असे कळाले की, त्या काळात चक्रवाढ व्याज काढले जायचे व जास्त काळाच्या ऋणावर ते लावले जायचे. पण, ऋण घेणाऱ्याची पतही विचारात घेतली जायची जी विश्वासावर बेतलेली असायची. (म्हणूनच credit- हा शब्द credo- लतिन "I believe" वरुन आला आहे). सनापुर्वी सहाव्या शतकात बॅबिलॉनमधे ईजिबी कुटूंब एक शक्तिमान प्रस्थ म्हणून गाजले. त्यांच्याकडे शेकडो एकर जमीनी होत्या व ते सावकारी करत. त्यां काळातील हजारो मातीच्या बिस्कीटांवरुन हे कळते की, कित्येक माणसे ह्या कुटूंबाकडून ऋण घेत असत. हे कुटूंब जवळपास ५ पिढ्या ह्या व्यवसायात होत्या, ज्यावरुन असे म्हणता येईल की, त्यांचे पैसे परत मिळण्याचे प्रमाण बरे असावे.

बॅंकांचा उदय होण्याआधी ज्या घटना घडल्या त्यातील एक अत्यंत महत्वाचा कालखंड समजला जातो. स्पॅनिश लुटारुंनी इंका साम्राजावर केलेला निर्णायक हल्ला. स्पॅनिश लुटारुंनी राजाश्रयाखाली तेथून हजारो किलो सोने व चांदी स्पेन मधे आणली. तेथील तिजोऱ्या रिकाम्या झाल्यानंतर त्यांनी जेथून हे सोने व चांदी इंकांनी खोदले होते अशा खाणींवर कब्जा मिळवून स्थानिक लोकांना गुलाम बनवून कित्येक हजार टन सोने व चांदी स्पेनमधे नेले (४५००० हजार टन चांदी नेली असावी असा कयास आहे). हे सगळे घडत असतांना स्पेनची सांपत्तीक स्थिती प्रमाणाबाहेर सुधारली हे सांगावे लागणार नाही. पण हळुहळू असे घडले की, इतकी चांदी तेथे आणली गेली की, त्याचे मुल्य खूपच कमी झाले- चांदीच्या बदल्यात ज्या वस्तू घेतल्या जायच्या त्याची "किंमत" वाढायला सुरुवात झाली. थोडक्यात प्रथमच युरोपात १५ व्या शतकात चलनवाढीची परिस्थिती निर्माण झाली. स्पॅनिश लोकांना हे कळायला वेळ लागला की, चांदीसारख्या मौल्यवान धातूची किंमत तिच व एकच राहू शकत नाही; पैशाची किंमत तेव्हढीच असून शकते जी त्याबदल्यात मिळाणाऱ्या वस्तूंवर अवलंबून असते. येथे मागणी- पुरवठा ह्या तत्वाचा पाया घातला गेला.

कर्जाची आधुनिक कल्पना जशी आहे तीच त्याकाळी होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. गरजेनुसार ह्या तत्वाचा वापर राजाकडून केला जायचा असे मानू. तरीही, आजच्या काळातील कर्जाच्या संकल्पनेचे बीज त्यात होते असे मात्र म्हणता येईल; आजच्या काळातील कर्ज पध्दतीचा पाया घातला गेला असे म्हणता येईल.
सातत्याने वाढणारे घेणारे-देणारे ह्यांच्यातील संबंध हा जागतिक पातळीवरील व्यवसायाचा महत्वाचा घटक- घेणारे-देणारे नसतील तर ही सगळी रचना कोलमडून पडेल. ऐतिहासिक उदाहरणे तसेच अलिकडच्या काळातील अनेक उदाहरणे पाहिली असता हेच दिसून येते की, जेथे-जेथे घेणारे-देणारे ह्यांच्यातील संबंध निर्माण झाले, वाढीस लागले, तेथे-तेथे लोंकांनी डोळे दिपवणारी प्रगती केली.

[आधारीत]

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगली

सुरुवात, पुढील भागांची वाट पाहतो. ('ऍसेंट ऑफ मनी' ही डॉक्युमेंटरी हा मुख्य स्रोत आहे का?)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

'ऍसेंट ऑफ मनी'

होय, अगदी बरोबर. इतके माहितीपूर्ण पुस्तक आहे की, त्यातील काही मुख्य माहिती सतत मनात फिरत राहतेय.

तरीच

तरीच विचार करत होतो कुठे वाचलंय.. याच पुस्तकावर एक डॉक्युमेंटरी डिस्कव्हरीवर दाखवत होते तीही पाहिली होती.
पैशाचा इतका सुंदर परामर्श मराठीतून जालावर घेताय याबद्दल आभार व अभिनंदन
पुढील भाग येऊ दे

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

चांगला लेख

अतिशय सोप्या भाषेत पैशाच्या उगमाची व वेगवेगळ्या अंगांचं वर्णन केलेलं आहे. पैसा म्हणजे शेवटी वचन आहे हे पटलं. किंबहुना त्यासाठी पाच हजारच वर्षं काय, त्याही खूप आधीपासूनच्या काळात चलनी वस्तू नसली तरी 'तुझ्या शिकारीत आज मला वाटा दे, मला शिकार मिळेल तेव्हा मी तुला वाटा देईन' असं वचन देऊन मांस 'विकत' घेण्याची प्रथा असेलच. कोण आपली वचनं पूर्ण करतो, कोणामध्ये ती पूर्ण करण्याची शक्ती आहे, यावरून पत ठरत असणारच.

मात्र चलनाची किंमत बदलते हे समजायला पंधरावं शतक उजाडावं लागलं असेल असं वाटत नाही. जेव्हा बार्टर पद्धत होती तेव्हा धान्य देऊन वा जमीन देऊन इतर वस्तू घेता येत असत. याचा अर्थ शेतकऱ्यासाठी ही दोन्ही चलनं होती. मात्र दुष्काळात धान्याची किंमत शंभरपट सहज होत असे, व धान्यांच्या काही गोण्यांसाठी शेत विकल्याची उदाहरणं सापडू शकतील. पुरवठा कमी पडणं याची आपल्या प्राचीन पूर्वजांना चांगली जाण होती.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

पंधरावं शतक उजाडावं लागलं?

"मात्र चलनाची किंमत बदलते हे समजायला पंधरावं शतक उजाडावं लागलं असेल असं वाटत नाही...."

खरं आहे तुमचे म्हणणे. पण हे पुस्तक इतिहासातील नोंदींचा संदर्भ घेऊन लिहिले आहे. पण तरीही असे समजण्यास बऱ्यापैकी वाव आहे की, चलनवाढ ही संकल्पना आधीच माहिती झाली असावी.

सहमत - मागणी-पुरवठा-विनिमय तत्त्व प्राचीन असावे

सहमत -
मागणी-पुरवठा-विनिमय तत्त्व प्राचीन असावे. (बहुधा मनुष्येतर जनावरांमध्येसुद्धा दिसते.)

- - -
मात्र राजाच्या शिक्क्याची/नाण्याची किंमत ही प्रमाण असून, फक्त नाशिवंत वस्तूंच्या किमती दुष्काळ-सुकाळानुसार बदलतात, असे थोडेसे सुलभीकरण सोयीस्कर असावे. पूर्वीच्या काळी कदाचित खूपच सोयीस्कर असावे.

आजकालसुद्धा नोकरीसाठी बोलणी करताना, कंत्राटे ठरवताना, शासनाने सांगितलेल्या मुद्रेमध्येच किमती/वेतने ठरवली जातात. जणूकाही वेतन मिळेपर्यंत किंवा कंत्राटपूर्ती होईपर्यंत चलनाची किंमत बदलणार नाही!

म्हटल्यास हा तितकासा दोष नाही. काही देशांमध्ये "चलनाची किंमत बदलली तर लहान कालावधीत बदल नगण्य असेल" असे सुलभीकरण केल्यास फार मोठे नुकसान होत नाही. काही देशांत मात्र नुकसान होते.
- - -

सारांश : विनिमयाचा दर बदलतो हे ज्ञान फार प्राचीन आहे. उलट "अराजक नसल्यास चलनाची किंमत थोड्या काळात जवळजवळ स्थायी असते" ही कल्पना नवी असू शकेल - स्थायी राज्यांच्या काळापासूनची असावी.

- - -
लेखमाला आवडली - पुढील भागांबद्दल शुभेच्छा.

छान!!

एसेंट् ऑफ् मनी मालीकेचा दुवा नंदन यांनी दिला होताच. ही लेखमाला संग्रहणीय होणार!

आधीच लिहिलं गेलंय्?

अरे! उपक्रमावर ह्या विषयावर आधीच लिहिलं गेलं असेल तर मी उगीचच पुन्हा त्याच विषयावर लिहिणार नाही. कृपया, त्या लेखाचा दुवा द्यावात.
पण ते पुस्तक वाचनीय आहेच व ज्यांना अर्थकारणात काम करायचे आहे त्यांना मी नक्कीच हे पुस्तक वाचा असे सुचवेन.

नाही

नाही, केवळ त्या डॉक्युमेंटरीची लिंक देण्यात आली होती. या विषयावर लेखन झालेले आठवत नाही. वरील प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहोत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

+१

नाही, केवळ त्या डॉक्युमेंटरीची लिंक देण्यात आली होती. या विषयावर लेखन झालेले आठवत नाही. वरील प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहोत.

हेच म्हणतो. कृपया पुढील भाग येउ देत. मराठी आंतरजालावर हा इतिहास आलेला नक्कीच आवडेल. उपक्रमावर ही एक मुखपृष्ठावर दुवा दिला जावा, अशी लेखमाला असेल.

वाचनीय

लेखमाला वाचनीय होईल असे वाटते. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे.

 
^ वर