लगता नही है दिल मेरा

लगता नही है दिल मेरा

बहादुरशहा जफर हा मोगल साम्राज्याचा शेवटचा बादशहा. रसिक, विद्वान, कलाप्रेमी, गुणिजनांचा चाहता व दुर्दैवीही. इंग्रजांनी दिल्लीतून उचलून पार रंगूनला नेऊन ठेवले. एकाकी अवस्थेत १८६२ साली तो वयाच्या ८७ व्या वर्षी निधन पावला. जौक देहलवी हा त्याचा शायरीतला उस्ताद. जफरच्या गझल या खर्‍या जौकच्याच असेही म्हटले जाते पण ते खरे नसावे. आज त्याची एक अतिप्रसिद्ध गजल बघूं.

लगता नही है दिल मेरा उजडे दयार मे
किसकी बनी है आलमे-नापाइदारमे ...१.

बुलबुलको पासबॉंसे ना सैयादसे गिला
किस्मतमें कैद थी लिखी, फस्ले-बहारमें ...२

कह दो इन हसरतोंसे कही और जा बसे
इतनी जगह कहॉं है, दिले-दागदारमें ...३

उम्रे-दराज मांग कर लाये थे चार दिन
दो आरजूमें कट गये, दो इंतजारमें ...४

कितना है बदनसीब "जफर" दफ्नके लिये
दो गज जमीन भी न मिली कू-ए-यारमें ...५

(दयार- घर, जागा. आलम-विश्व. नापाइदार-अस्थिर, अनिश्चित. पासबा-रखवालदार. सैयाद-शिकारी. गिला-तक्रार. फस्ले-बहार.वसंतऋतूतील बहार हसरत- इच्छा,आशा,आकांक्षा, दु:ख दिले-दागदार-कलंकित, भग्न हृदय. उम्रे-दराज- दीर्घ आयुष्य. कू-ए-यार- प्रेयसीची गल्ली, आंगण )

रंगूनमधील नजरकैदेत आपले उदासवाणे जीवन डोळ्यासमोर आणून जफर म्हणतो आहे

" या वैराण घरात जीव रमत नाही हे खरे, पण या अस्थिर, नाशवंत जगात कोणाचे काय चालते म्हणा ! मीच काय पण कोणीही स्वेच्छेने थोडाच वागू शकतो ?"
स्वत:च्या नशिबाला दोष देत तो म्हणतो
"या कोकिळकंठी बुलबुलाला ना बागेच्या रखवालदाराबद्दल ना पारध्याबद्दल तक्रार करावयाची आहे. भर वसंत ऋतूतच जर कपाळी कैद लिहली असेल तर दोष कोणाला देणार ? "
प्रत्येकाच्या काही लहानमोठ्या इच्छा-आकांक्षा असतातच. पण जफर म्हणतो " या माझ्या हृदयातील इच्छांना आवर घालावयासच पाहिजे. जा,आता दुसरीकडेच जागा शोधा. फुटक्या घड्यात पाण्याला जागा नसते त्या प्रमाणे माझ्या भग्न हृदयात आता कोठलीच इच्छा वास करू शकत नाही." हसरत याचा दुसरा अर्थ "दु:ख" हा घेतला तर आर्तता आणखीनच गडद होते. आता जफरच्या काळजात दु:खालाही वाव नाही !
" देवाकडे मागताना तर दीर्घ आयुष्याची याचना केली होती. मिनतवारीने मिळाले काय तर चार दिवस ! त्यातले दोन तर गेले चिंतन करण्यात, कसे जगावे याचा विचार करण्यात आणि उरलेले दोन गेले, जे मागितले- ज्याची इच्छा केली, त्याची वाट पाहण्यात !" शेवटी जफर रिक्तहस्तच.
" अरे, जफर, इतका कसा रे तू कमनशीबी ? मेलास, आता तरी फासे पालटावेत ? पण नाही, आता तुला पुरण्याकरिता दोन वार जागा पुरे, तीही प्रेयसीच्या आंगणात मिळूं नये ? "

जीएंच्या कथेत नायक म्हणून "फ़िट" बसावा असा हा जफर. नियतीने पूरापूरा नागावलेला. पण एक गोष्ट लक्षात आली कां ? पहिल्या चार शेरात तो आपल्या दु:खाला, वैयक्तिक पातळीवरून एकदम वैश्विक पातळीवर नेऊन पोहोचवतो ? किसकी बनी है, ..दो आरजूमे सगळे आपणही केव्हा न केव्हा म्हणतच असतो. तीव्रता कमीजास्त पण टोचणी अटळ.

शरद

Comments

गझल

प्रख्यात पार्श्वगायक पै. महंमद रफीसाहेबांनी गायलेली हीच गझल माझ्या संग्रहात होती. त्याची आठवण झाली.खरोखरच अप्रतिम काव्य आहे हे.
यातली प्रेयसी म्हणजे जफरचा प्यारा हिंदोस्ता आहे असे गझल जाणकार म्हणतात. त्या अर्थाने या गझलचा अर्थ लावला पाहिजे.
चन्द्रशेखर

सहमत

पुन्ह पुन्हा ऐकावी अशी गझल!

आवडली

गजल आवडली. रसग्रहणाबद्दल आभार.

 
^ वर