प्रचलित हिंदू धर्मातील देवतांचे सगुण रूप

दोन महिन्यांपूर्वी हिंदू धर्मग्रंथाच्या कालाबद्दल एक लेखमाला मी उपक्रमवर लिहिली होती. त्या वेळी काही संदर्भ वाचन करत असताना एक प्रश्न माझ्या डोक्यात घोळत असे. सध्या आपण ज्या देवतांचे पूजन करतो त्या देवतांना सध्या प्रचलित असलेली त्यांची सगुण रुपे कोणी व कधी दिली असावीत? म्हणजे गणपतीला गजमुख दाखवायचा किवा शंकराला जटा व गळ्याभोवती नाग या स्वरूपातच दाखवायचा. लक्ष्मीला कमलपुष्पातच उभे करायचे.

यापैकी ही रुपे कधी दिली गेली असावीत या संबंधी अंदाज बांधणे त्या मानाने सोपे आहे. मोहोंजोदारो व हडाप्पा संस्कृतीमधे देवताना सगुण रूप होते परंतु त्या वेळी प्रजननक्षमता (Fertility) हीच देवता पूजत असत. या देवतेच्या सगुण रूपाला अदिती असे नाव होते असे काही तज्ञांचे म्हणणे. म्हणजे सध्याच्या प्रचलित देवता इ.स.पूर्व 1300 च्या आधी तरी नव्हत्या एवढे ढोबळपणे म्हणता यावे. आर्य टोळीवाले मूर्ती पूजकच नव्हते. त्यांचे देव म्हणजे इंद्र, वरुण, सूर्य, रुद्र व विष्णू. या देवतांचे पूजन ते अग्नीच्या माध्यमातून करत. आर्य संस्कृती भारतात रुजली तेंव्हाही सध्याच्या देवतांची सगुण रूपे नसणार. म्हणजेच आपण इ.स.पूर्व 1000 पर्यंत आलो. हा काल व इ.स,पूर्व 500 हा बौद्ध धर्माच्या उदयाचा काल या मधेच देवतांना सध्याची सगुण रूपे दिली गेली असावीत असे मला वाटते.

परंतु या सर्व देवतांना ही सगुण रूपे कोणी दिली असावीत याचा काहीही अंदाज मला तरी बांधता येत नाही. बघुया दुसर्‍या कोणी उपक्रमीला काही सांगता येते का?

लेखनविषय: दुवे:

Comments

सगुणरुपे ही उपयोजनासाठी

त्यांचे देव म्हणजे इंद्र, वरुण, सूर्य, रुद्र व विष्णू. या देवतांचे पूजन ते अग्नीच्या माध्यमातून करत.
इंद्र, वरुण, सुर्य, रुद्र, विष्णू यांच्या पैकी बरेच जण खरेच (म्हणजे सगुणच)आर्य टोळ्यांचे नेते होते. अग्नीच्या माध्यमातुन पूजनाचा संबंध सरळसरळ यज्ञ व आहूतीशी संबंधित आहे.

आर्य संस्कृती भारतात रुजली तेंव्हाही सध्याच्या देवतांची सगुण रूपे नसणार.
सहमत.

मधेच देवतांना सध्याची सगुण रूपे दिली गेली असावीत असे मला वाटते.

सहमत. ही अशी रुपे देण्यामागे तत्कालिन समाजामनावर भीती, लालसा या बाबींचा वापर करुन अधिपत्य गाजवणारी व्यवस्था निर्माण करणे हा हेतू होता. हा हेतू आजतागायतही सफल झालेला आहे. ही सगळी सगुण रुपे होऊन गेलेल्या नायकांवर काल्पनिक देवत्व आरोपित करुन, त्यांच्या पराक्रमांच्या अतिरंजित कहाण्या निर्माण करुन त्यांच्या आधारे निर्माण करण्यात आली. या रुपांचा तत्कालिन नायकांच्या खऱ्या रुपाशी फारसा संबंध नसुन ती रचणाऱ्याच्या मानसिकतेत त्या रुपाच्या उपयोजनाची काय संकल्पना असेल त्यावर आधारीत आहेत. ही रुपे नायकांची असल्याकारणाने ती रचनाकर्त्यांच्या समुहाचेच प्रातिनिधित्व करणारी आहेत.

अवांतर
ही सगुण रुपरचना करतांना अर्थात खलनायकांचीही सगुण रुपे तयार करावी लागली. देवांचे नायक जसे चित्रित झाले तसे राक्षसांचेही खलनायक चित्रित करावे लागले. वास्तविक राक्षस हे ही अस्तित्वात असलेल्या भारतातील पूर्वप्रस्थापित टोळ्यांचे नायकच होते. परंतु ते शत्रु असल्या कारणाने त्यांची रुपे लांब नखे , सुळे दात, शिंगे, अस्ताव्यस्त वाढलेले केस, काळाकुट्ट रंग, गडगडाटी हास्य करणाऱ्या भेसूर मुद्रा अशा तऱ्हेची रेखाटली गेली. पण अशी काही मानवजात अस्तित्वात असावी असे वाटत नाही. आणि हे मानव नसुन हिंस्र पशू असते तर देवनायकांना त्यांच्याशी इतकी दमछाक होईपर्यंत लढायचे कारणही नव्हते. असो. जेणेकरुन या खलनायकांचे सगुणरुप चित्रण ही लबाडी आहे हे दिसून येते. तशीच देवदेवतांची सगुण रुपे तयार करणे हा ही एक लबाडीचाच भाग आहे.

राजा रविवर्मा

आपल्या देवी देवतांना सगुण रुपे देण्यात राजा रविवर्मा आणि इतर चित्रकारांचा मोठा हात आहे. हल्लीच लोकप्रभामध्ये यावर लेख होता. येथे वाचा.

रविवर्मा यांनी लक्ष्मी आणि सरस्वती यांना नऊवारी साड्या आणि शिवलेले ब्लाऊज नेसवले. वीणा घेऊन मोरावर बसलेली सरस्वती आणि कमळात उभी राहिलेली लक्ष्मी यांना रेखाटताना त्यांनी एका पारशी महिलेला (लेखात पारशी माणसाची बायको असे म्हटले आहे परंतु काळ लक्षात घेता पारशी माणसाची पारशी बायकोच असावी असे वाटते.) मॉडेल म्हणून वापरले होते. ही चित्रे आज घराघरातून पूजली जातात. :-)

असो.

कालच लेक विचारत होती, कृष्ण आणि राम रंगाने निळे कसे? तिला म्हटले "मला हाच प्रश्न गेली कित्येक वर्षे सतावतो आहे की कोणा चित्रकाराने कृष्ण, राम, शंकर यांना निळे करून टाकले? तुला काय उत्तर देणार?

मूर्तीपूजा अस्तित्वात आल्यावर प्रत्येक कालखंडातील शिल्पकार, चित्रकार यांनी आपापल्या कुवती आणि समजानुसार देवांना रेखाटले असावे.

दुसर्‍या शतकातील शंकराची मूर्ती पहा. तिच्या गळ्यात नाग नाही. हातात त्रिशूळ आहे आणि शंकर मिशीधारी दिसतो. शंकराच्या हातातील त्रिशूळही पाश्चात्य ट्रायडेंटशी (पसायडन किंवा नेपच्यूनच्या हातातील) मेळ खातो. नंतरच्या चित्रांत मात्र त्रिशूळाचा आकार आणि स्वरुप बदलेले दिसते. (असेही असू शकेल की ही मूर्ती गांधारातील असल्याने वेगळी घडवली असेल.)

काही अंशीच

आपल्या देवी देवतांना सगुण रुपे देण्यात राजा रविवर्मा यांचा मोठा हात आहे.

राजा रविवर्माचा व इतर चित्रकारांचा हात असु शकेल हे मान्य पण त्यांनी ज्या मानसिकतेतुन ही चित्रे रेखाटली ती मानसिकता पारंपरिकतेने तयार झालेली आहे.

देवतांचे सगुण रूप

ज्या मानसिकतेतुन ही चित्रे रेखाटली ती मानसिकता पारंपरिकतेने तयार झालेली आहे.
सहमत...

सगुण रुपाची वर्णण ग्रंथात असली पाहीजे.रामरक्षेत...

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा !
पुरुतो मारुती यस्य तं वंदे रघुनंदनम !!

अश्या प्रकारे वर्णन असावीत.

राम जन्माच्या दिनाच्या सर्व उपक्रम वाचकांना शुभेच्छा. प्रभु रामाचा आदर्श जिवनात येत राहो.

श्रीराम
श्रीराम

सगुण रूपे

कालानुरुप सगुण रूप बदलत जात असणारच पण सर्व प्रथम या देवतांना कोणी सगुण रूप दिले त्याचा काही अंदाज बांधणे शक्य आहे का?
चंद्रशेखर

बहूदा

सर्व प्रथम या देवतांना कोणी सगुण रूप दिले त्याचा काही अंदाज बांधणे शक्य आहे का?

बहूदा यापूर्वीच अंदाज बांधला गेला आहे :)

या चर्चेत पूजेसाठीचे ढोबळ पिंड "सगुण" म्हणून चालेल का?

पूजेसाठीचे ढोबळ पिंड "सगुण" म्हणून चालेल का?

पूजनासाठी ढोबळ पिंडे (शेंदूर फासलेले, कधीकधी मोठे डोळे चितारलेले लंबगोल पाषाण) ही बहुधा फार प्राचीन काळापासून वापरात असावी. या वेगवेगळ्या "आया" आणि "बा" आहेत.

काही भक्तश्रीमंत ग्रामदैवतांची ओळख प्रमुख पौराणिक देवांशी जुळवल्याच्या घटना अगदी अलिकडे सुद्धा दिसतात.

खंडोबाचा शंकराशी संबंध, महाराष्ट्रातील बहुतेक आयांचा पार्वतीशी संबंध, काही आयांचा विष्णुपत्नीशी संबंध, लिंगरूप दैवताचा वैदिक रुद्राशी संबंध...

असे करता पौराणिक/वैदिक देवाला दृश्य-स्पर्शरूप मिळते. ते दृश्य-स्पर्शरूप लोकांमध्ये आधीच पूजनीय असल्यामुळे, त्या पिंडाची पूजनीयता नव्याने पटवून द्यावी लागत नाही.

दा. ध. कोसंबी यांच्या "मिथ अँड रिऍलिटी" मध्ये महाराष्ट्रातील अनेक आई-देवतांबद्दल समूळ संशोधनासहित चर्चानिबंध आहे. त्यात काही वैदिक/पौराणिक<->लौकिक/स्थानिक दैवतांच्या जोड्यांची चर्चा सापडेल - जोड्यांमधली दैवते मुळात वेगळी असली तरी क्षेत्रमाहात्म्यात अभेद झालेली आहेत.

मनुष्याकार नसलेल्या पूजनीय पाषाणांवरती मनुष्याकृती मुखवटे चढवतात, ही प्रथा तर सर्वांच्या ओळखीचीच असेल. गोव्यातील शंकरांच्या पिंडींवर मुखवटे असतात. हल्लीच वैष्णोदेवीच्या देवळात गेलो, तिथे दैवते अखंड नैसर्गिक अभिषेक होत असलेले "स्टॅलॅक्टाइट" आहेत. पण त्यांच्यापुढे देवीचा घडीव मुखवटा आहे.

कोकणातल्या एका घरगुती पूजाविधीमध्ये देवीचा मुखवटा तांदळाच्या उकडीने बनवतात. या रूढीत सुद्धा काहिशा-निर्गुण पिंडाला दिखाऊ सुंदर सगुण रूप देण्याची लोकपरंपरा दिसते, असा माझा कयास आहे.

पुरीच्या जगन्नाथाच्या कथेतून सगुण-निर्गुण पिंडांबद्दल लोकांच्या श्रद्धेमध्ये जो तणाव आहे, त्याचे अंशदर्शन घडते. (राजाला जगन्नाथाची मूर्ती सुबक बनवायची होती, पण विश्वकर्म्याने ढोबळ पिंडे बनवली...)

सुबक मूर्ती

>>पुरीच्या जगन्नाथाच्या कथेतून सगुण-निर्गुण पिंडांबद्दल लोकांच्या श्रद्धेमध्ये जो तणाव आहे, त्याचे अंशदर्शन घडते. (राजाला जगन्नाथाची मूर्ती सुबक बनवायची होती, पण विश्वकर्म्याने ढोबळ पिंडे बनवली...)

सहमत आहे. गणपतीच्या बहुतांश देवळांतील मूर्ती (त्यांना मूर्ती तरी म्हणावे का नाही असा संभ्रम होतो) ढोबळ असतात. गणेशोत्सवातल्या गणपतीसारख्या मूर्ती सहसा देवळात नसतात. शंकराच्या देवळात सहसा पिंडच असते.

वैष्णव देवळांतल्या (राम, कृष्ण, दत) मूर्ती मात्र सुबक असतात का? हे अर्वाचीन देव (दत्त अर्वाचीन आहे यात शंका नाही) असावेत का?

बाबासाहेब जगताप यांनी म्हटल्याप्रमाणे सरंजामशाहीत एखाद्यावरील अतिरेकी निष्ठा हा गुण आवश्यक होता. त्या गुणाचा विकास करण्याचे काम भक्तीमार्गाच्या प्रसारातून साधले गेले.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

माणूस स्वतःवरून इतरांना जोखतो

माणसाने फक्त देव देवतांनाच नाही तर सजीव-निर्जिव अशा अनेक गोष्टींना मनुष्यस्वरुप दिले आहे. लोककथांतील बोलणारे-गाणारे प्राणी आणि पक्षी, झाडे, डोंगर, नद्या वगैरेंना मानवी गुण प्रदान केलेले आहेत. केवळ वेशच नाही तर प्रेम, असूया, मत्सर, दु:ख अशा अनेक गुणांनी माणसाने आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टींना सगुण बनवलेले आहे. इसापच्या गोष्टी, पंचतंत्र, जातककथा वगैरे. देव-देवता या त्यातील एक भाग. आता याची सुरुवात कधी झाली हा प्रश्न गहन आहे - बहुधा माणसाने स्वतःचे पोट आणि जीव सोडून अन्य गोष्टींवर विचार करण्यास सुरुवात केली तेव्हाच असावी. (हे उत्तर ढोबळ आहे याचा अंदाज आहे, यापेक्षा चांगले उत्तर उत्क्रांदीवादावर अभ्यास करणार्‍याकडून येऊ शकेल. :-))

आर्यांनी देवतांना मनुष्यस्वरुप दिले नाही तरीही त्यांचे देव सगुण आहेत कारण त्यांना क्रोध, मद, मत्सर या सर्व भावना आहेत त्यामुळे तुम्हाला नेमके काय हवे? भारतात देवतांना मूर्तस्वरुप कधी आले असा प्रश्न आहे का?

जेनेसिसमध्ये एक वचन आहे - God created man in His own image, in the image of God He created him; male and female He created them. :-) प्रत्यक्षात प्रकार उलट आहे पण तरीही त्यांचा अमूर्त देवसुद्धा मनुष्यस्वरुपच आहे.

सहमत

निर्गुण निराकार रुप हे द्वैताला अवघड. सगुण साकार झाल्याने व पुढे भक्तवत्सल करुणाघन झाल्याने द्वैत सुकर झाले. किंबहुना द्वैत सुकर होण्यासाठीच हा प्रवास झाला.
प्रकाश घाटपांडे

थोडे वेगळे उदाहरण...

निर्गुण निराकार रुप हे द्वैताला अवघड. सगुण साकार झाल्याने व पुढे भक्तवत्सल करुणाघन झाल्याने द्वैत सुकर झाले.

या संदर्भात थोडे वेगळे उदाहरण:

मी जे काही इथे वेगवेगळे ठळक, तिरपे, अधोरेखीत, रंगी तसेच इतर बरेच लिहीत आहे ते अशा

आदी चिन्हांमुळे सहज शक्य होते. मग आपल्याला संगणकीय यंत्र/तंत्र भाषा येत नसली तरी काही फरक पडत नाही. चिन्हांवर टिचकी मारली तर चालते....

तेच जर प्रत्येक सभासदाला < strong >, < em >, < u >, < span style="color: #FF0000;" > वगैरे संगणकीय भाषेत लिहीण्याची वेळ आली तर कितीजण लिहीत बसतील?

म्हणूनच ईश्वरीय उपासनेचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत असे वाटते. ज्यांना त्याची गरज न लागता पुढे जाता येते त्यांनी तसे जावे. मात्र या सर्व उपासना पद्धतीतून एकीकडे जसे अभौतिक फलप्राप्तीचे मधाचे बोट लावले आहे तसेच खर्‍या उपासनेमधे एकाग्र/समतोल वृत्ती/स्थिरता पण अंगी बाणून भौतिक उपयोग होऊ शकतात असे वाटते. हे प्रत्येक धर्मातच सांगितले आहे असे वाटते. अर्थात दुर्दैवाने त्यातील फारच सोपे आणि कोते "आऊटकम" नजरेत ठेवून बहुसंख्य जनता वागते त्यामुळे ना धड ती उपासना होते ना धड भौतिक स्व-उन्नत्ती होते असे वाटते. तसेच जे या मार्गावरून कुठल्याही कारणाने जात नाहीत, ते पण काही तसे न गेल्याने (एकाग्र/समतोल वृत्ती/स्थिरता आदी संदर्भात) संपूर्ण यशस्वी होतात का हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.

या संदर्भात गीतेमधील १२व्या अध्यायात श्रीकृष्ण जे काही विविध मार्ग अर्जूनाला सांगतो (त्यात अर्थातच मुर्तीपूजा नाही आहे) त्याची या "if-then-else" संदर्भात आठवण झाली:

मन माझ्यात तू ठेव बुद्धि माझ्यात राख तू म्हणजे मग निःशंक मी चि होशील तू स्वये ॥ ८ ॥
जाईल जड माझ्यात चित्तास करणे स्थिर । तरी अभ्यास-योगाने इच्छूनि मज मेळवी ॥ ९ ॥
अभ्यास हि नव्हे साध्य तरी मत्कर्म आचरी । मिळेल तुज ती सिद्धि मत्कर्म हि करूनिया ॥ १० ॥
न घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी । तरी सर्व चि कर्माचे प्रयत्ने फळ सोड तू ॥ ११ ॥
प्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे । मग पूर्ण फल-त्याग शीघ्र जो शांति देतसे ॥ १२ ॥

(याचा अर्थ आमच्या पूर्वजांना "if-then-else" अथवा तत्सम अधुनिक संदर्भातील लॉजिक सांगायचे होते असे म्हणायचे आहे, असा कोणी घेऊ नये ही विनंती. ;) )

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सध्या प्रचलित

गणपतीला गजमुख दाखवणे हे किमान ९ व्या शतकाआधीपासून असावे असे विकीपीडियाच्या संदर्भावरून वाटते. ११ व्या शतकापूर्वी गणपतीचे सध्याचे रूप व्यवस्थित प्रचलित झाले होते असे वाटते. विकीवरच श्रीलंकेत २र्‍या शतकातली गणपतीची या प्रकारची मूर्ती आहे असे म्हटले आहे. पण मूर्तीच्या चित्राचा दुवा मिळाला नाही.

कमळ हे भारतीय साहित्यात खूपच महत्त्वाचे फूल आहे. ऋग्वेदातही सरस्वती नदीच्या पात्रातील कमळांचा उल्लेख आहेच. नंतरच्या काळात शिल्पकलेतही याचा उपयोग आहेच. गजलक्ष्मीचे बर्‍यापैकी प्राचीन बौद्ध शिल्प (शुंग काळ, ख्रिस्तपूर्व १ -२ शतके) - यात हत्ती, अर्थातच पण पायाशी कमळही आहे.

काही अधिक चित्रे इथे -

 
^ वर