ब्रेन डेड् की हार्ट डेड्?

ब्रेन डेड् की हार्ट डेड्?

मृत्युची बदलती व्याख्या
मागच्या वर्षी क्यूबा येथे शेकडो नसतज्ञ, वैज्ञानिक व तत्वज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. त्या परिषदेतील चर्चेचा मुख्य विषय होता, मृत्युची व्याख्या. वरवरून पाहिल्यास मृत्यू हा विषय वैज्ञानिक संशोधनाचा किंवा तत्वज्ञांच्या गंभीर चर्चेचा विषय असता कामा नये. परंतु थोडयाशा खोलात जाऊन विचार केल्यास जीवन व मरण यांच्यातील सीमारेषा दिवसे दिवस अस्पष्ट व धूसर होत असल्यामुळे आता तो गंभीर चर्चेचा विषय होऊ पाहात आहे. व मृत्युकडे एक मोठी समस्या म्हणून बघितले जात आहे. या समस्येचा उदय सुमारे 40 वर्षापूर्वी झालेला असून मेंदू पूर्णपणे निकामा वा मृतवत झाल्यानंतरसुध्दा कृत्रिमपणे श्वासोच्छ्वास व हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या व्हेंटिलेटर्सचा शोध प्रामुख्याने या समस्येला कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे प्रथमच मेंदूची कार्यावस्था व मृतावस्था यांची नीटपणे व्याख्या करता येईल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. काही शास्त्रज्ञांच्या मते मेंदूतील फ्रंटल लोब निकामा होणे व त्याबरोबरच सर्व गोष्टी विस्मृतीत जाणे, या अवस्थेला मृत म्हणून जाहीर करण्यास पुरेशे ठरतील. अनेक विकसित राष्ट्रांमध्ये कायदेशीर मृत्युसाठी पूर्ण मेंदूचा मृत्यू हाच निकष ग्राह्य धरला जात आहे. परंतु या व्याख्येमुळे कायमचे व्हेजिटेटिव्ह अवस्थेमध्ये असणाऱ्यानांसुध्दा मृत म्हणून घोषित करावे लागेल. अशा अवस्थेतल्यांचा मेंदूचा उर्वरित भाग कुठल्याही बाह्यसाधनाविना व्यवस्थितपणे, श्वासोच्छ्वासासकट, सर्व कार्य करू शकते. त्यामुळे मात्र इतर काही तज्ञांच्या मते 'मेंदू मृत' ऐवजी हृदयक्रिया बंद होणे हेच मृत्युचे लक्षण समजावे.
व्यावहारिक वा कायदेशीर कुठलीही व्याख्या ग्राह्य धरली तरी डॉक्टर्स नेहमीच जिवंत असणाऱ्या रुग्णावर उपचार करतात, मृत व्यक्तीवर नव्हे. मृत म्हणून एकदा घोषित केल्यानंतरच त्या शरीरातील काही महत्वाचे अवयव, अवयवारोपणासाठी, काढून घेण्याची कायद्यात तरतूद आहे. या कायद्यानुसार हृदय, यकृत, मूत्रपिंड यासारख्या जैव अवयवांना, प्रत्यक्ष अवयवरोपणापर्यंत, व्हेंटिलेटर्सच्या मदतीने जिवंत ठेवण्यास अनुमती दिली आहे. परंतु काही जैवनीतिज्ञ मात्र प्रत्येकाने - कायमची व्हेजिटेटिव्ह अवस्था व हृदयगती पूर्णपणे थांबणे यामधल्या कुठल्यातरी अवस्थेला - मृत्युची व्याख्या स्वत: ठरवावे असे सुचवत आहेत. परंतु प्रत्येक रुग्णशय्येप्रमाणे मृत्युची व्याख्या बदलत राहिल्यास अत्यंत गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. सांस्कृतिक व व्यावहारिकदृष्टयासुध्दा ते योग्य ठरणार नाही.
प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचे परिणाम
रोग निदान लक्षणाच्या तंत्रज्ञानातील अभूतपूर्व प्रगतीमुळे मेंदू पूर्ववत होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे 'मेंदू मृत' म्हणून घोषित करणे दिवसे न दिवस दुरापास्त होत आहे. मुळातच मेंदूची दुखापत ही मृत मेंदूच्या प्रारूपापेक्षा फार गुंतागुंतीची असू शकते. मेंदूचा मोठा भाग व्यवस्थितपणे कार्य करत असतानासुध्दा मेंदूच्या एखाद्या छोटया भागाला झालेली इजासुध्दा रुग्णाला कायमची बेशुध्दावस्था आणू शकते ElectroEncephaloGraphy (EEG ) या आधुनिक उपकरणामुळे 'मेंदू मृत' म्हणून घोषित झालेल्यांच्या मेंदूचा काही भाग अजूनही व्यवस्थितपणे कार्य करत आहे, हे विद्युतलहरीवरून लक्षात येवू लागले. अनेक वेळा विद्युतलहरी नसतानासुध्दा मेंदू कार्य करत आहे, याची प्रचीती आली. सहा महिन्यापेक्षा जास्त काळ व्हेजिटेटिव्ह अवस्थेतील रुग्णांचा मेंदूसुध्दा कमी जास्त प्रमाणात कार्य करू शकतो, हे त्यांच्या फंक्शनल रेसोनान्स इमेजिंग (f-MRI) वरून कळू लागले. म्हणूनच 'मेंदू मृत' कशाला म्हणावे हेच कळेनासे झाले आहे. मेंदूचा काही भाग निकामा झाल्यानंतर त्या भागाच्या कामाचा पुनर्वाटप मेंदू करू शकतो, हे समजल्यानंतर डॉक्टर्सना 'मेंदू मृत' म्हणून घोषित करणे अवघड ठरत आहे. मुळात 'मेंदू मृत' म्हणून घोषित करताना र्मेदूचा निकामा झालेला भाग कुठल्याही वैद्यकीय उपचारातून पूर्ववत होणार नाही याची खात्री करून घेतलेली असते. परंतु यानंतर मात्र 'मेंदू मृत' म्हणून घोषित केल्यानंतरसुध्दा व्हेंटिलेटर्सच्या मदतीने शरीराला दीर्घ काळ जिवंत ठेवण्याचे प्रयत्न डॉक्टर्सना करावे लागणार आहे.
मेंदूची स्वयं दुरुस्ती करण्याची क्षमता व या क्षमतेत वाढ करण्यासाठी विकसित होत असलेले संशोधन यामुळे गुंता आणखी वाढत आहे. जनुक उपचार पध्दती व इतर काही औषधामधून मेंदूची ही दुरुस्ती यंत्रणा कार्यक्षम करता येते, हे समजल्यामुळे पुढील संशोधनाची दिशा निश्चित होत आहे. पुढील कालावधीत रुग्णांच्या मेंदूतील निकाम्या भागात दुरुस्ती करू शकणाऱ्या पेशींचे रोपण करण्याचे तंत्रही आत्मसात झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. नॅनो तंत्रज्ञान व लघुरूपीकरण तंत्रज्ञानामुळे इजा पोचलेल्या मेंदूच्या भागातच सूक्ष्म मशिन्सचे रोपण करणे शक्य होईल. मेंदूच्या अंतर्भागातच ठेवण्याजोगे जैव-अनुरूप संगणकांचे चिप्स, व त्यांचे वायरिंग यांचे तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे बहिऱ्यांना ऐकू येऊ लागेल, आंधळयांना दिसू लागेल. संगणक चिप्सच्या रोपणामुळे अर्धांगवायुपीडीतांच्या अवयवांचे नियंत्रण करणे शक्य होईल. हृदयाच्या ठोक्याचे नियंत्रण करणाऱ्या पेसमेकरसारख्या एखाद्या मशिनचेच रोपण करणे शक्य होईल व त्यातून आपस्मार, उदासीनता वा विषण्णतेसारख्या मनोविकारावर मात करता येईल. या क्षेत्रातील काही संशोधकांच्य मते हजारो नॅनोरोबोंचे मेंदूत रोपण करून मेंदूच्या कार्यप्रणालीचे नियंत्रण करणेसुध्दा कठिण नाही. अशा प्रकारच्या सोनेरी भविष्याच्या स्वप्नांची यादी आणखी लांबवता येईल. यातील 1-2 टक्के जरी प्रत्यक्षात उतरली तरी लाखो रुग्णांना दिलासा मिळेल.
अनुत्तरित प्रश्न
या सर्व संभाव्यतेमुळे एखाद्याला 'मेंदू मृत' म्हणून घोषित करणे कठिण ठरत आहे. मेंदूंच्या काही दुखापतीवर कितीही संशोधन झाले तरी त्यांना पुनर्जिवित करणे कदापि शक्य होणार नाही. काहींना व्हेजिटेटिव्ह अवस्था नको असली तरी काही अती उत्साही (व पैसेवाल्या) रुग्णांना मेंदूंच्या संशोधनात प्रगती होईपर्यंत स्वत:ला शीतनिष्क्रियतावस्थेत (hibernation) ठेवावे, असे वाटण्याची शक्यता आहे. परंतु या सर्व गोष्टीमुळे तिढा वाढतच जाणार आहे. यामुळे आपल्याला अनेक सामाजिक व भावनिक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. बेशुध्दावस्थेत किंवा शीतनिष्क्रियतावस्थेत ठेवणे अती खर्चिक बाब आहे. यासाठीचा वैद्यकीय खर्च पूर्ण कुटुंबाच्या खर्चाच्या अनेक पट जाण्याची शक्यता आहे. सामाजिकद्रृष्टया या गोष्टी अत्यंत निरुपयुक्त ठरू शकतील. शिवाय मृत मेंदूची काळजी घेणाऱ्यांनासुध्दा काही तरी चमत्कार घडेल या आशेवर किती दिवस काळजीत रहायचे याचाही विचार करावा लागेल.
दुखापत झालेल्या मेंदूला पुन: कार्यक्षम करणाऱ्या वैद्यकीय तंत्रज्ञान व क्षमतेमुळे मृत्युच्या व्याख्येत बदल करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कदाचित या तंत्रज्ञानामुळे मेंदू कार्यक्षम झाला तरी मेंदूतील पूर्व स्मृती, सुखद आठवणी, अनुभव इत्यादींचा अस्त झाल्यास ती व्यक्ती खऱ्या अर्थाने जिवंत आहे असे म्हणता येईल का? मेंदूच्या पुनर्जन्मामुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व पूर्णपणे हरवून जात असल्यास त्याला व्यक्ती म्हणणे कितपत सुसंगत ठरेल? अशा स्थितीत फक्त शरीर जिवंत असेल व त्याचे व्यक्तिमत्व मरून जाईल. त्यामुळेच आपल्यासारख्यांना असले वैद्यकीय संशोधन पूर्ण व्हायच्या आतच मरण येवू दे व पार्थिवाची शक्यतो लवकरात लवकर विल्हेवाट होऊ दे असे वाटत राहील. क्यूबाच्या अधिवेशनात शास्त्रज्ञ व तत्वज्ञ 'मेंदू मृतां'च्या लक्षणाविषयी व 'मेंदू मृत' रुग्णांच्या उपचाराविषयी चर्चा करत राहतील. परंतु मृत्यु म्हणजे नेमके काय हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहील.

लेखनविषय: दुवे:

Comments

फार आवडला.

अंतर्मुख करायला लावणारा लेख फार आवडला. शेवटचे दोन परिच्छेद तर विशेषच. बाकी वैद्यकीय तपशील जाणकार लिहतीलच.
काहींना व्हेजिटेटिव्ह अवस्था नको असली तरी काही अती उत्साही (व पैसेवाल्या) रुग्णांना मेंदूंच्या संशोधनात प्रगती होईपर्यंत स्वत:ला शीतनिष्क्रियतावस्थेत (hibernation) ठेवावे, असे वाटण्याची शक्यता आहे.
हे भाष्य फार खोल आहे.
सन्जोप राव
हुई मुद्दत कि 'गालिब' मर गया, पर याद आता है
वो हर इक बात पर कहना, कि यूं होता तो क्या होता

अवांतर सुचना

लेख उत्तमच पण
लेख आकर्षक करण्यासाठी उपशीर्षकाला ठळकपणा आवश्यक
मृत्युभोवती सगळे अध्यात्म फिरते
प्रकाश घाटपांडे

मृत्यू ही समस्या?

मृत्युकडे एक मोठी समस्या म्हणून बघितले जात आहे.

हाच खरं तर दैवदुर्विलास आहे असं वाटतं. जितका जन्म नैसर्गिक आहे तितकाच मृत्यू. मग जर एखाद्याचा जन्म ही समस्या नसेल तर मृत्यू का वाटावी?

असो.

ज्यांना (अती उत्साही (व पैसेवाल्या) रुग्णांना) असे अनैसर्गिक जगायचे असेल त्यांना शुभेच्छा!

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

चांगला लेख

काही अती उत्साही (व पैसेवाल्या) रुग्णांना मेंदूंच्या संशोधनात प्रगती होईपर्यंत ...

आशेची साखळी कशी क्षितिजापलिकडे पोचते हे दिसून येतं. माझा अर्थातच अशा प्रवृत्तीला जोरदार पाठिंबा आहे. श्रीमंत लोकांवर हा एक प्रकारचा वेल्फेअर टॅक्स आहे असं मी समजतो. या खर्चिक प्रयोगांतूनच वैद्यकीय प्रगती होईल अशी आशा आहे.

या क्षेत्रातील काही संशोधकांच्य मते हजारो नॅनोरोबोंचे मेंदूत रोपण करून मेंदूच्या कार्यप्रणालीचे नियंत्रण करणेसुध्दा कठिण नाही.

एक वेळ अशी येईल की माणूस कुठे संपतो व यंत्र कुठे सुरू होतं ही रेषाच शिल्लक राहाणार नाही. छत्रीच्या काड्या, कापड, दांडी व मूठ बदलून घेतली की सातत्य नक्की कसलं, हाही प्रश्न विचारवंत चावून चोथा करतील. शरीर आणि आत्म्याचं द्वैत कायमचं संपवण्याचा हा एक मार्ग वाटतो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

लेख आवडला

काहींना व्हेजिटेटिव्ह अवस्था नको असली तरी काही अती उत्साही (व पैसेवाल्या) रुग्णांना मेंदूंच्या संशोधनात प्रगती होईपर्यंत स्वत:ला शीतनिष्क्रियतावस्थेत (hibernation) ठेवावे, असे वाटण्याची शक्यता आहे.

बांधा लेको पिरॅमिडे!
पिरॅमिडांमध्ये इजिप्तचे फराओ सम्राट पुन्हा जिवंत होऊ शकतील अशा प्रकारे (त्या काळच्या समजानुसार आणि तंत्रानुसार) त्यांचे देह जतन करून ठेवत असत. शिवाय आभूषणे, ऐवज आणि नोकरचाकरही पिरॅमिडात पुरून ठेवत असत.

भविष्यकाळात कोणाला हायबर्नेट करून ठेवले, तर जागेपणी त्यांना आयुष्यातील सुख-सोयी मिळाव्यात म्हणून त्यांची आवडती भांडीकुंडी, जनावरे, प्रियव्यक्ती यांनासुद्धा सोबतच हायबर्नेट करून ठेवायची प्रथा प्रचलित होईल.

 
^ वर