उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
आणखी शब्द- फुलांची नावे
राधिका
March 10, 2010 - 4:40 am
नमस्कार मंडळी,
काही दिवसांपूर्वी आपण एक-एक विषय घेऊन शब्द जमवले होते, ते सर्वांना आठवत असेलच. यावेळचा विषय आहे फुलांची नावे. फुलांची नावे सुचवण्याबरोबर त्या फुलाचा एखादा फोटो उपलब्ध असल्यास तो दिला तर उत्तम. त्याखेरीज त्या फुलाचा काही विशिष्ट उपयोग केला जात असेल किंवा त्याबद्दल इतर काही माहिती असेल तर तीही द्यावी. उदा.- जास्वंद- हे फुल गणपतीला वाहतात. परंतू याच्या काही विशिष्ट जातींतील फुले वाहिली जात नाहीत.
किंवा
मोगरा- याचे गजरे विणून बायका केसांत माळतात.
राधिका
दुवे:
Comments
पांढरा धोतरा
धोतऱ्याला कंटकफल किंवा शिवशेखरही म्हणतात. धोतरा, भांग व भोळ्या शंकराचे अतूट नाते आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अरे वा
सुंदर फोटो. धोत्र्याच्या बीत वीष असतं असं म्हणतात ना?
राधिका
धोत्र्याचे सर्वच अवयव विषारी
धोत्र्याचे सर्वच अवयव विषारी असतात. कमी प्रमाणात मरण न येता येणारी नशा काही लोकांना आवडते. परंतु झाडा-झाडामध्ये विषाचा अंश कमीजास्त असतो. म्हणून नशेसाठी वापरणे विशेष धोक्याचे.
माहितीचा स्त्रोत : पूर्वी वाचले होते, विकीवर तपासले.
व्यापक विषय
यावेळचा विषय फारच व्यापक आहे आणि अनंत आहे.
या विषयाला ही माझी 'फूल ना फुलाची पाकळी!' - अनंत
अनंताचे फूल पांढरे असते आणि त्याला सुरेख वास असतो. त्याला अनंत का म्हणतात हे मात्र माहीत नाही.
तसेच एक फूल म्हणजे घाणेरी. हिची फुले गुच्छात उमलतात. वेगवेगळे रंग किंवा एकाच रंगांची अनेक फुले असे याचे स्वरूप असते. ही फुले अतिशय सुंदर दिसत्तात. पण हिची लागवड मुद्दाम कोणी करत नाही. कदाचित सांडपाण्यावर बांधावर ही आपोआप उगवते म्हणूनच आपण हिला घाणेरी असे नाव दिले असेल. या फुलांमधे मध असतो असे आमच्या ग्राऊंडवर येणार्या एका मुलीने मला सांगितले होते. आणि आम्ही एखाद्या गुच्छातील फुले चोखून पहायचो. त्यात मध नक्कीच असणार कारण तशी चव लागायची. शिवाय या फुलांना मुंग्या लागलेल्याही मी पाहिल्या आहेत. पण मी मधमाशी नसल्यामुळे खात्रीशीर सांगू शकत नाही ;) . दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र' मधे घाणेरीचं फार सुरेख वर्णन केलं आहे. गुजराथी - राजस्थानी लोकांमधे हिच्या अनेकरंगी सुंदर फुलांमुळे हिला ' चुनडी' असे नाव आहे असेही त्यांनी लिहिले आहे. ही फुले मात्र देवाला वाहिलेली माझ्या ऐकण्यात - पाहण्यात नाहीत.
बाकी फुलांची नावे खूपच आहेत. त्यावर सवड मिळेल तसे लिहीत जाईन.
--अदिती
-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने
हरसिंगार..
पारिजातकाच्या फुलांना हिंदी मधे "हरसिंगार" (हर म्हणजे शंकर ज्याने शृंगार करतो) असे सुंदर नाव आहे.
हर?
हा हरिशृंगार चा अपभ्रंश तर नव्हे? फार संदर्भ माहीत नाहीत पण पारिजात हा स्वर्गीय वृक्ष असून त्याचे फूल विष्णूला फार आवडते असे कानावरून गेल्याचे आठवते. शंकराचा पारिजात किंवा प्राजक्ताशी काही पौराणिक संबंध नसावा आणि असला तर हे विधान माझ्या अज्ञानामुळे केले आहे त्याबद्दल क्षमस्व.
बाकी बंगाली भाषेत याच फुलाला शेफालिका असे म्हणतात.
--अदिती
-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने
नेमके मलाही ठाऊक नाही....
हरिशृंगार चा अपभ्रंश आहे की नाही ते मलाही नेमके ठाऊक नाही मी ही फार पूर्वी असेच कुठेतरी वाचले होते. अमृतमंथनात निघालेल्या १४ रत्नांमधे हे पारिजातकाचे झाड एक रत्न होते. त्यावेळी निघालेले हलाहल प्राशन केल्यावर होणारा दाह शमवण्यासाठी नीलकंठ महादेवाने गळ्यात नाग/ भाळी चंद्र धारण केला, त्याला पारिजातकाची फुले वाहीली गेली शेवटी रामनामाने तो दाह शमला अशी काहीतरी कथा होती.
नेमके ठाऊक नसतांना लिहीणे हा उपक्रम वरील काही मंडळींच्या लेखी (मला आशा आहे तुम्ही त्यात नाही.) कलम ३०२ चा गुन्हा :) मी केला आहे खरा, पण असु दे आता.
हा हा
>>नेमके ठाऊक नसतांना लिहीणे हा उपक्रम वरील काही मंडळींच्या लेखी (मला आशा आहे तुम्ही त्यात नाही.) कलम ३०२ चा गुन्हा :) मी केला आहे खरा, पण असु दे आता.
अहो मला तरी कुठे नेमके ठाऊक आहे!
तरी लिहायचं. आपल्याला असलेली माहिती इतरांना दिली की त्यांना असलेली माहिती आपल्याला कळते आणि सगळ्यांच्याच ज्ञानात भर पडते एवढाच उद्देश. बाकी काही नाही.
--अदिती
-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने
घाणेरी
घाणेरी हे झाड मुळात भारतीय नाहीय.... आफ्रीकन आहे.
त्यामुळे कदाचीत देवीला-देवाला वाहण्याचा प्रघात नसावा.
हो..... तीची फळं खाऊन पाहीलीत का ? मस्त, बारीक, काळसर निळी...... मधुबिंदूच.
...........
अजुन कच्चाच आहे
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?
अच्छा!
ही नवी माहिती कळली. धन्यवाद!
घाणेरीचे फळ चाखून पहायचा धीर झाला नाही कधी. आता बघेन.
बाकी आपली लाडकी ज्वारी सुद्धा आफ्रिकेतूनच आपल्याकडे आली म्हणतात. आणि मानवाचे जन्मस्थानही जर आफ्रिकेतच असेल तर घाणेरीची फुले देवाला वहायला काय हरकत आहे ;)
माझ्या मते घाणेरीचे झाड दुर्लक्षित असते आणि तिची फुलेही अगदीच इटुकली असतात. म्हणून बिचारीला कोणी गणतच नसेल.
--अदिती
-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने
घाणेरीची फुले
...........
अजुन कच्चाच आहे
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?
टणटणी
घाणेरीला आम्ही टणटणी म्हणतो. तिची मधुर काळी फळे खाऊन पाहिली नाहीत असे कुणी असेल असे वाटले नव्हते. या झुडपाची पाने खरखरीत असतात. जिभेवर घासले की रक्त कसे येते हे आम्ही दुसर्यावर प्रयोग करून सिद्ध करत असू. हे झुडूप परदेशी असल्याने काँग्रेस गवताप्रमाणे त्याला नियंत्रित करता आलेले नाही. ज्या मूळ देशातले आहे तिथे त्याला प्रतिरोध करणारे घटक अस्तित्वात असणार, तसे भारतात नाहीत. त्यामुळे हे कुठेही उगवते आणि माजते. घाणेरी या नावाचा घाणीशी काही संबंध नाही. ते नाव का पडले ते सांगणे कठीण आहे. कुंपणासाठी उत्तम, जनावरेही पाने खात नाहीत.
बुलबुल आणि तत्सम पक्षी या झुडुपांमध्ये घरटी बांधतात आणि त्याची फळे खाऊन बी इतस्ततः टाकतात. त्यांतून घाणेरीचा बेसुमार प्रसार होतो. शास्त्रीय नाव Lantana camara. कलमे करून लागवड केल्यास बागेत लावायची विविध रंगसंगती असलेली रोपे तयार होतात. ही कमी उंचीची फुलझाडे बागेला अतिशय शोभा देतात. --वाचक्नवी
चविष्ट
टणटणीची फळे चविष्ट असतात. टणटणीच्या फुलांचा-पानांचा वास थोडा उग्र असला तरी छान वाटतो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
काही कळत नाही
माझ्याकडील श्री. विष्णु सहाय यांच्या "उद्यानपुष्पे" या पुस्तकात दीडदोनशे फुलांची इंग्रजी-मराठी-हिंदी नावे, त्यांच्या लागवडीचा काळ, ती कोठेकोठे वाढतात, वगैरे माहिती व अनेक फुलांचे फोटो दिले आहेत. उपक्रमवर ही माहिती देऊन काय साधणार आहे ? येथे फुलांचा ज्ञानकोश अपेक्षित आहे काय ?
शरद
उत्तर
फुलांचा ज्ञानकोश अपेक्षित नाही. केवळ मराठी भाषेतील फुलांची नावे आणि त्यांचे सांस्कृतिक संदर्भ अपेक्षित आहेत. जसे वर उल्लेखलेल्याप्रमाणे कोणती फुले देवाला वाहता येतात, कोणती फुले देवाला वाहणे वर्ज्य, कोणती फुले स्त्रिया केसांत माळतात व कशी (म्हणजे एक फूल घेऊन की त्याचा गजरा करून) इ. माहिती
राधिका
ज्ञानकोश
श्री. विष्णु सहाय यांच्या "उद्यानपुष्पे" या पुस्तकात दीडदोनशे फुलांची इंग्रजी-मराठी-हिंदी नावे, त्यांच्या लागवडीचा काळ, ती कोठेकोठे वाढतात, वगैरे माहिती व अनेक फुलांचे फोटो दिले आहेत.
फुलांची माहिती टाका. आणि त्याच्यासोबत वेगवेगळे वर्ग करा. केसात माळायाची फुले, देवाला वाहण्याची फुले, वासाची फुले, बिनवासाची फुले, देवाला / माणसाला आवडणारी फुले, सजावटीची फुले, औषधी फुले, पुष्पगुच्छांमधील फुले.. :)
>>उपक्रमवर ही माहिती देऊन काय साधणार आहे ?
उपक्रमवर माहिती देणे आणि घेणे ही प्रक्रिया चालू राहील असे वाटते.
-दिलीप बिरुटे
[फुलवाले ]
थोडे स्पष्टीकरण
सांस्कृतिक संदर्भ म्हणजे केवळ एवढेच नाही. आपल्याकडे फुलांचे उपयोग मुख्यतः दोन- केसांत माळणे आणि देवाला वाहणे. म्हणून ती दोन उदाहरणे दिली. पण याहूनही बरेच वेगळे संदर्भ असू शकतात. जसे तेरडा हे फूल. ही रोपे पावसाळ्यात उगवतात आणि काही दिवसांनी त्यांचे काय होते माहित नाही, पण फुले मात्र नाहीशी होतात. त्यामुळे तेरड्याचा रंग तीन दिवस ही म्हण आपल्याकडे आलेली आहे.
तसे बघायला गेले, तर फुले सगळीकडे सारखीच. आणि फुलांच्या विशिष्ट जातींची वैशिष्ट्ये जगभरात सारखीच. परंतू वेगवेगळ्या संस्कृतींत त्यांना वेगवेगळे महत्त्व असते. जसे ब्रह्मकमळ हे फुल फुलताना बघायला आपण मुद्दाम जातो. मध्यभागी फणा काढल्यासारखे परागकण ज्यात उगवतात त्या फुलाला आपळा नागपिंडी म्हणतो, याचं कारण आपल्याकडे नागाला विशिष्ट महत्त्व आहे, हे. असो. माहिती देणे पटत नसेल, तर नुसती फुलांची नावे दिली तरीही चालतील.
राधिका
'पुष्प की अभिलाषा' आठवली
लहानपणी शिकलेली 'पुष्प की अभिलाषा' ही माखनलाल चतुर्वेदींची कविता अनायास आठवली.
पुष्प की अभिलाषा
चाह नहीं मैं सुरबाला के
गहनों में गूँथा जाऊँ,
चाह नहीं प्रेमी-माला में
बिंध प्यारी को ललचाऊँ,
चाह नहीं, सम्राटों के शव
पर, हे हरि, डाला जाऊँ
चाह नहीं, देवों के शिर पर,
चढ़ूँ भाग्य पर इठलाऊँ!
मुझे तोड़ लेना वनमाली!
उस पथ पर देना तुम फेंक,
मातृभूमि पर शीश चढ़ाने
जिस पथ जावें वीर अनेक।
- माखनलाल चतुर्वेदी
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मातृभूमि पर शीश चढ़ाने जिस पथ जावें वीर अनेक।
क्या बढिया याद दिलाई यार.
ही कविता दूरदर्शन वर धीरगंभीर आवाजात ऐकायला,बघायला फार छान वाटत असे. मिले सुर मेरा तुम्हारा बनवणर्या लोकसेवा संचार परिषदेनेच बनविली होती. ती क्लिप जालावर आहे का कुठे?
रुईची फुले
रुईची फुले
रुईच्या पानांचा हार मारुतीला वाहातात.
रुईचा चीक विषारी आहे, विशेषतः डोळ्यात गेल्यास आंधळे करतो असा लोकप्रवाद आहे.
ही वनस्पती खाल्ल्यास विषारी आहे, पण प्रमाणात खाल्ल्यास औषधी उपयोग आहेत, असे म्हणतात. याच्या कळ्या हवाबंद फुग्यांसारख्या असतात. लहानपणी त्या दाबून "फुट्ट्" करून फोडण्यात मला गंमत वाटत असे.
याची फळे करंजीच्या आकाराची असतात, आणि त्यात (शेवरीसारख्या) मऊसूत तंतूंचा झुपका असलेल्या मुलायम बिया असतात.
हिंदीमध्ये काही लोक कपाशीला "रुई" म्हणतात, आणि या वनस्पतीला "आक" म्हणतात.
झेंडुचे फुले
कोणा एकाच देवाला वाहण्यासाठी अशी काही स्वतंत्र ओळख झेंडूंच्या फुलांची नसावी. [चुभुदेघे]
लक्ष्मीपूजनाला आणि दसर्याला दारावर तोरणाला लावायला झेंडूची फुले मात्र हमखास सापडणार.
कोणत्याही देवस्थानाला गेल्यावर हार-फुले विकणार्याजवळ झेंडूची फुले दिसले नाही तर नवल वाटावे. त्यातला गेंदा फूल तर दिसायला लै भारी आणि नुसत्या दोन-चार पाकळ्या असलेल्या झेंडुच्याच फुलाला आम्ही 'फकडी' म्हणायचो. बाकी, झेंडुच्या फुलाचे शास्त्रीय नाव वगैरे काही माहिती नाही.
-दिलीप बिरुटे
फोटो कसे जोडायचे ?( दुवा क सा जोडायचा?)
फोटो कसे जोडायचे ?( दुवा क सा जोडायचा?)
आमच्या वाडयात मोहरीचे रोप आले आहे त्याचा फ़ोटो कसा देवु. मी प्रथमच पाहीले मोहरी कशी उगवते ते मला माहीती नव्हते
शैलु.
सुवासिक विषय
छान, सुवासिक विषय! फक्त काही औषधी माहिती अपेक्षित असली तर बहुदा मी तरी देऊ शकणार नाही :(
आम्ही लहानपणी गुलबक्षीच्या फुलांचे गजरे घालायचो. फुले संध्याकाळी उमलतात, अगदी थोडावेळ टिकतात. अतिशय नाजूक आणि साधारण १/२ इंच घेराची फुले आणि पोकळ दांडे असतात. हे दांडे अतिशय नाजूक असतात आणि दांड्यांमधून सुया ओवता येत नाहीत. म्हणून दांड्यांचीच वीण करून गजरा (खरे तर वेणी) करावा लागतो. याचे आयुष्यही मर्यादित असते. लगेच कोमेजतात ही फुले. पण त्यांच्या वेण्या सुंदर दिसतात. देवांनाही वाहतात.
सोनटक्का (चाफा) नाही, हेही असेच एक सुंदर आणि सुवासिक फूल. खरे तर अफलातून सुगंध असतो. सोनटक्का आल्याशिवाय मला पावसाळा आल्यासारखे वाटत नसे. देवांना वाहतात, डोक्यातही घालतात. केसांत घालायचे तर पिना लावायच्या नाहीत, नुसतेच केसांची बट काढून खोचायचे.
कारण देठ अतिशय नाजूक असतात. शिवाय त्यात गोडसर मध असतो, तोही आम्ही चाखत असू. पावसाळ्यात उगवते. अतिशय नाजूक आणि पांढरे असते. मध्यभागी नाजूक तुरे असतात.
गोकर्णाचे फूल अतिशय नाजूक, मध्ये पोकळ, आणि निळा - पांढरा रंग असलेले असते. मध्ये अगदी थोडासा पिवळा रंग असतो.
बाकी बरीच आहेत. किती सांगू?
सोनटक्का
सोनटक्क्याच फुल सफेद असत तसच पिवळ..... गर्द नव्हे.... अगदी हलक्या, सुंदर, सुखद पिवळ्या छटेच ही असत.
...........
अजुन कच्चाच आहे
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?
गुलाब
गुलाब हा फुलांचा राजा. याच्या शेकडो जाती असतात, व दरवर्षी नव्या निघत असतात. हा नावावरनं गुलाबी रंगाचा असतो असं वाटेल, पण तसं झालं तर तुम्ही कोत्या चक्रीय व्याख्येला बळी पडलात असंच म्हणावं लागेल. हा अनेक रंगात, अनेक वासांत व अनेक प्रकारे उगवतो - झु़डूप, कलम, वेल इत्यादी. पण शेवटी सगळ्यांना एकाच गुलाब या नावानेच ओळखलं जातं, कारण कोणी कवी म्हणूनच गेलेला आहे - नावात काय आहे, गुलाबाला कुठचंही नाव दिलं तरी शेवटी तो गुलाबच.
गुलाब हा संस्कृत काव्यात सापडत नाही. म्हणून त्या फुलाला असंस्कृत कदाचित म्हणता येईल. पण संस्कृत भाषेप्रमाणेच केवळ तग धरून असलेले व तिने एके काळी शिरोधारी चढवलेले कमळ (त्याचबरोबर कमळ-भुंगा जोडीही - शमा परवान्याच्या पर्शियन काव्य क्लिशेला संस्कृतचा सडेतोड जबाब) आजकाल गुलाबाच्या लोकप्रियतेचा बळी ठरले आहेत. हीन मानल्या गेलेल्या आयपीएल मधल्या हीन मानल्या गेलेल्या उत्तान आनंद-नर्तकी जशा आजकालच्या असंस्कृत जगात (त्यांच्या अर्धवट कपड्यांतून) पुढे येत आहेत व दंडावर ठेवलेला रुपया कलात्मक रीतीने ओठाने उचलणाऱ्या मराठमोळ्या सुसंस्कृत लावणी नर्तकी कशा मागे पडत आहेत त्याचेच हे पुष्पजगतातले पडसाद आहेत.
हा मदनाला किंवा रतीला विशिष्ट दिवशी अर्पण करावा असं त्यांचे ब्रह्मचारी भक्त श्री. संत. व्हॅलेंटाईन (की व्हॅलेतिनो? की व्हॅलेंटिनस?) यांचं म्हणणं होतं असा प्रवाद आहे. या प्रवादापायी अब्जावधी रुपयांची गुलाबाची फुलं १४ फेब्रुवारीला विकली जातात. ती तशी अर्पण केली जाऊ नयेत (किंवा कदाचित त्या विक्रीवर काही 'कर' सरकारदरबारी जमा व्हावा) यासाठी मुतालिक यांसारखे हिंदु संस्कृतीचे (पाहिजे तो अर्थ काढावा) रक्षक (पुन्हा पाहिजे तो अर्थ काढावा) नि:शस्त्र (काठ्या लाठ्या न घेता - केवळ मुद्दे व गुद्दे यांचा वापर करून व अनेक स्त्रियांना महत्कर्तृत्वाने जमीनदोस्त करून [यांना आतंकवादी म्हणावे काय?]) सेना घेऊन जन आंदोलन करतात. त्याच आंदोलनाविरुद्ध काही नवी, जवळपास तितकीच नि:शस्त्र आंदोलनं (काळी शाई घेऊन, पण पेनातली नव्हे बरं का - ती कसली नि:शस्त्र? ती तर नीर्जीव...) निर्माण होतात. मग काही उच्चभ्रू संस्थळांवर यापैकी कुठचे कमी नि:शस्त्र यावर बरीच अधिक नि:शस्त्र चर्चा होते. त्या चर्चेचं फलित दोन्ही आंदोलनांपर्यंत पोचतं व ती दोन्ही पुन्हा डोकं वर काढत नाहीत. आधी असलीच जन आंदोलनं करणाऱ्या काही सेना मात्र त्यांचे धोत्र्याला शिव-गुलाब नाव देऊन १४ फेब्रुवारीला शिव-दिन म्हणवून घेण्याचे जुने आंदोलन पुन्हा उगाळत बसत नाहीत. मराठीच्या प्रश्नाप्रमाणेच त्यांनी हाही प्रश्न नवीन सेनेला आउटसोर्स केला असावा असे काही विचारवंतांचे म्हणणे आहे. अर्थात विचारवंत कोण व खरे विचार कोणाचे हे सेनेच्या सामर्थ्यावर ठरते हा वाक्प्रचार माहीत नसल्याने ते विचारवंतच नाही, असं इतरांचं म्हणणं आहे. काही काळांनी ते इतर लोक विचारवंत ठरतील बहुतेक. पण ते सेनेच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे.
असो, तर असा हा गुलाबाचा महिमा...
राजेश
गुलाब
मागे एकदा काही तुर्की लोकांची भेट झाली होती. गुलाबपाणी, गुलकंद वगैरे गोष्टी भारतात वापरल्या जातात हे ऐकून त्यांना खूप बरे वाटले कारण त्यांच्या मते त्या अस्सल तुर्की गोष्टी होत्या. :-)
गुल, गुलशन, गुलफाम आणि त्या पठडीतील एक शब्द गुलाब असावा का? का गुल म्हणजेच गुलाब?
असो. मला फुलांची फार काही आवड नाही म्हणजे डोक्यात माळणे, गजरे वगैरे पण गुलाब भयंकर आवडतात. अतिशय चिवट झाड आणि थंडी पोषक असणारे. गुलाबाचे डवरलेले ताटवे मोहक दिसतात. माझ्या बागेत सध्या ८-१० प्रकारचे/ रंगांचे गुलाब आहेत. या वर्षी अजूनही लावण्याचा मानस आहे. मला फोटोग्राफी फारशी जमत नाही पण बागेतले काही फोटो इथे दिले आहेत.
बाकी, घासकडवींचा गुलाबावरील प्रतिसाद मजेशीर आहे.
व्युत्पत्ती
फारसीमध्ये "गुल" (उच्चार "गोल") म्हणजे कुठलेही फूल. (गुलाबाचेच असे नाही.)
गुल, गुलशन, गुलफाम : फूल, फुलांचा बगीचा, फुलांच्या गुणांचा-सुकुमार
(दूरदर्शन मालिकेत तीन वेगवेगळ्या हाउसबोटींची ही नावे होती.)
गुल+आब (दोन्ही अवयव, समासही फारसी) = फूल-पाणी = फुलाचे पाणी
कुठल्या फुलाचे असे सांगितले नाही, तर सामान्यपणे "रोझ/मराठी-गुलाब" या फुलाचे पाणी असे मानतो.
गुलाब हे त्या विशिष्ट जातीच्या फुलाचे पाणी असल्यामुळे, शिवाय त्या शब्दाची फारसी भाषेतील फोड माहीत नसल्यामुळे, कदाचित भारतीय भाषांमध्ये त्या विशिष्ट जातीच्या फुलासाठी "गुलाब" हे नाव रूढ झाले असावे.
लिली
हे आणखी एक आवडते फूलझाड. गुलाबाप्रमाणेच चिवट. एकदा चुकून मी लिलीच्या मूळावर कुदळ चालवली. लक्षात आले नाही की त्या मूळाची शकले होत आहेत पण कळले तेव्हा वाईट वाटले की "अरेरे! त्या कंदाची वाट लावली." पण लिली कसली चिवट. त्या चेंदामेंदा झालेल्या मूळातूनही ती पुन्हा नव्याने जन्म घेऊन उगवली.
लिलीच्या पाण्यावर उगवणार्या जातीला वॉटर लिली असे म्हणतात. हे फूल कमळासदृश दिसते परंतु कमळाचा आकार आणि पाकळ्या मोठ्या असतात.
जाई
शास्त्रीय नावं - जास्मीनम ग्रँडिफ्लोरम
इंग्लिश नावं - स्पॅनिश जास्मीन
संस्कृत नावं - जातिका
एक नाजूक, सुगंधी फुल, ज्याचे गजरे माळले जातात.
ह्या फुलापासून सुगंधी तेलही तयार करतात.
फूल खिले हैं गुलशन गुलशन
संस्थळावरून साभार
White leadwort
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
बेशरम!
अरेरे! फूलाचे नाव बेशरम?
फटफटी, आमटीवेल, महालुंगी :-) ही सर्व नावे मजेशीर आहेत.
महालुंगी = म्हाळुंगे?
माझी आजी कोकणातल्या "म्हाळुंगं" फळाबद्दल सांगे. (गोव्याच्या कोंकणीत "मावळिंगे" म्हणतात ते हेच फळ असावे). हे फळ मी कधी बघितलेले नाही.
माझा एक गोवेकर मित्र म्हणाला की "ओडोमोस"च्या वासाने त्याला मावळिंग्याच्या वासाची आठवण येते.
महालुंगीचे फूल हे त्याच फळझाडाचे फूल असू शकेल काय?
महालुंगीचे फूल
महालुंगीचे फूल खरे तर गुलबक्षीच्या फुलासारखे दिसते आहे.
गुलबक्षीला फळ मात्र येत नाही. अगदी बारीक मिर्यांएवढ्या काळ्या बिया (का फळ?) मात्र येतात. त्यालाही मसाल्यांप्रमाणे विशिष्ट वास असतो.
वर जे घंटी फूल म्हणून दिले आहे तसेच बिट्टी नावाच्या झाडाचे फूल असते, त्यालाही लांब दांडा, पिवळे फूल, असते पण हा पोकळ दांडा मात्र बर्यापैकी घटट आणि फुलाला व्यवस्थित आधार देणारा असतो.
चिवट आणि लवचिक
बेशरम कुठेही उगवतो/उगवते. बेशरमाची फुले विषारी असतात असे म्हणतात. बेशरमाच्या काड्या चिवट आणि लवचिक असतात. काड्यांच्या टोपल्याही बनवतात.
संकेतस्थळ
एक छान संकेतस्थळ सापडले आहे- http://flowersofindia.net/
इथे भारतात उगवणार्या सर्व फुलांची नावे आणि छायाचित्रे दिली आहेत. इथे त्यातले काही फोटोज द्यायचा विचार होता, पण त्यामुळे हा धागा उघडायला वेळ लागेल.
राधिका