कमल घर

कमल घर

हायकूच्या प्रतिसादांमध्ये श्री. राजेश यांनी एक प्रतिसाद दिला
कमल घर
बघ कमल घर
कमल बघ
व विचारले ह्याला हायकू म्हणावयाचे का ? माझा यावरचा प्रतिसाद थोडा दीर्घ व अवांतर असल्याने तेथे न देता एक नवीन चर्चा विषय म्हणून मांडत आहे. चर्चा का हे पुढे वाचल्यावर लक्षात येईल.
फारा वर्षांपूर्वी सत्यकथेत एका लेखिकेची एक कविता प्रसिद्ध झाली. त्यावेळी कवीमंडळात ही एक फार मानाची गोष्ट होती. आता आम्हाला कळली नाही, पण हे काही नवीन नव्हते. नेहमीचीच ओरड. खरी गंमत पुढील अंकात. त्या लेखिकेने पत्रच लिहले. " माझ्या अनेक कविता सत्यकथेने साभार परत पाठवल्या म्हणून मी पुरुष असून एक कविता स्त्रीचे नावाने पाठवली. या कवितेला काहीही अर्थ नाही. केवल स्त्रीचे नाव आहे म्हणून ही कविता छापली गेली." भागवत-पटवर्धन ही पोचलेली माणसे.त्यांनी पत्र छापले व त्याखाली खुलासा केला. "सत्यकथेकडे इतक्या स्त्रीलेखिकांच्या कविता दरमहा येतात की केवळ लेखिका म्हणून त्यांच्या कविता छापावयाच्या ठरवले तर तेवढाच उद्योग करावा लागेल. बाकी सर्व बंद. तेव्हा ते सोडा. आता कवीची कविता सर्वांना कळली पाहिजेच असे नाही. नाहीतर मर्ढेकर-पु.शि.रेगे अजून अप्रकाशितच राहिले असते. पण तरीही आम्हाला लागलेला कवितेचा अर्थ हा." त्यांनी कवितेचे रसाळ रसग्रहण खाली दिले.
मागे एका लेखात मी लिहले होते की कवितेचा तुम्हाला लागलेला अर्थ तुमच्यापुरता तरी बरोबरच. ( हे मी अनेक लेखकांच्या लेखनाचे कॉपीराईट भंग करून काढलेले सार) तेव्हा श्री. राजेश यांच्या ५-७-५, तीन ओळी, या हायकूच्या फॉर्मात बसविलेल्या रचनेला हायकू म्हणावयास हरकत नसावी. आता दुसरे रसीक तज्ञ श्री. धम्मकलाडू यांना ती रचना सपाट वाटली व "भावगर्भ साक्षात्कार" झाला नाही म्हणून त्यांनी ही हायकू नव्हे असा निर्णय देऊन टाकला. मी श्री. धम्मकलाडू यांना प्रेमळ फुस (फुकट सल्ला) देऊ इच्छितो की " मित्रा, तुझे म्हणणे असे मांड
"ही रचना सपाट आहे व त्यातून मला कोणताही भावगर्भ साक्षात्कार झाला नाही म्हणून या रचनेला मी हायकू म्हणावयास तयार नाही ".
Quits. श्री. धम्मकलाडू एकदम तमाम थोर मराठी टीकाकारांच्या (म्हणजे कुलकर्ण्यांच्या) पंक्तीत पळी-पंचपात्र टाकावयास मोकळे. कवीवर्य श्री. राजेश यांनी एक अर्थ लावून दाखवला खरा पण त्यात एक कमतरता भासते. हायकूचे एक लक्षण " चित्र" पाहिजे ते तेवढे स्व:च्छपणे समोर येत नाही. आता मी माझ्या कुवतीने एक अर्थ लावून चित्र उभे करतो. कमल घर... समोर सगळा राडाच राडा, पण त्याकडे दुर्लक्ष करू नकोस, तोही बघ., पण तो बघतांना त्यातील कमल, तेही बघ, हे झाले चित्र. आता भावगर्भ साक्षात्कार बघा. आज जीवनात कोठेही नजर फिरवली तरी क्लेषकारक,मन खिन्न करणार्‍या गोष्टीच दिसतील पण त्या पाहतांना, तेथेही मन प्रसन्न करणारी कमलिनी आहे , तिच्याकडेही कटाक्ष टाकावयस विसरू नकोस. खल्लास.

(धला साहेब, उपक्रमपंताना पसंत नाही तरीही आपण या स्थळावर कवितांची तस्करी करत आहोत, कशाला आरडाओरडा करावयाचा, काय ?)

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

तस्करी ?

उपक्रमपंताना पसंत नाही तरीही आपण या स्थळावर कवितांची तस्करी करत आहोत

कवितांची तस्करी परवडली पण ही कशी ही कशी म्हणून आमचाही (की आमचीही, त्या निमित्ताने हायकू हे स्रीलींगी की पूल्लींगी ही एक शंका) एक हायकू पेश करण्याची हौस भागवण्याची संधी काही उपक्रमींनी सोडली नाही. असो.

खल्लास.

हा अर्थ की अनर्थ :)

यावरुन आठवण झाली

कोणत्या अनुभवाला किंवा शब्द रचनेला उच्च दर्जाचे साहित्य रुप लाभेल ते काय सांगता येणार नाही. 'कमल घर' 'बघ कमल घर' 'कमल बघ' याचा अर्थाच्या बाबतीत 'शरद' यांनी घडवलेला साक्षात्कार 'उच्च' आहे. एखाद्या रचनेला 'सुमार' म्हणावे पण वरील अर्थ पाहता मी तरी 'सपाट' म्हणणार नाही. कवितेच्या अर्थ घेणार्‍याला वेगळा आणि कसाही अर्थ शोधता येऊ शकतो. खालील किस्सा अनेकांना माहिती असेल, पण, लिहिण्याची संधी आपण का सोडावी, नाही का !

मिर्झा गालिब यांची जेव्हा आर्थिक परिस्थिती नाजूक होती. तेव्हा त्यांना नोकरी करण्याची वेळ आली. आणि नोकरीच्या ठिकाणी ते रूजू व्हायला गेलेही. पण आपल्या स्वागताला कोणीच आले नाही हे पाहून त्यांना तो अपमान वाटला. या घटनेत काव्य काय आहे असे कोणी विचारील. पण त्यांनी तो 'शेर' अजरामर करुन टाकला.

'निकलना खुल्द से आदम का सुनते आये थे लेकीन
बहुत बे आबरु होकर तेरे कुचे से हम निकले .

आता वरील अनुभव गालिबचा नौकरीच्या बाबतीतला होता. पण, शेर वाचणार्‍या व्यक्तीला मात्र प्रेयसीकडून अपमान झाल्याचे मनोगत वाटते. सारांश असा की, कवितेतून अर्थच काढायचा झाला तर [रचना सुमार असो की सपाट] तो कसाही काढता येतो हे वर चर्चाप्रस्तावकाने दाखविलेच आहे. :)

-दिलीप बिरुटे

काहीही...

मिर्झा गालिब यांची जेव्हा आर्थिक परिस्थिती नाजूक होती. तेव्हा त्यांना नोकरी करण्याची वेळ आली. आणि नोकरीच्या ठिकाणी ते रूजू व्हायला गेलेही. पण आपल्या स्वागताला कोणीच आले नाही हे पाहून त्यांना तो अपमान वाटला. या घटनेत काव्य काय आहे असे कोणी विचारील. पण त्यांनी तो 'शेर' अजरामर करुन टाकला.

'निकलना खुल्द से आदम का सुनते आये थे लेकीन
बहुत बे आबरु होकर तेरे कुचे से हम निकले
काहीतरीच काय! या तर्काचा काही पुरावा मिळेल काय?
वडाची साल पिंपळाला. याच गजलेतला एक शेर असा आहे:
मुहब्बत में नहीं है फर्क, जीने और मरने का
उसी को देखकर जीते है, जिस काफिर 'प' दम निकले
आता याचा अर्थ गालिब आपल्याला नोकरी देणार्‍याच्या प्रेमात पडला होता असा घ्यायचा काय?
याच गजलेतला एक प्रसिद्ध शेर असा:
कहां मैखाने का दरवाजः 'गालिब' और कहां वाइज
पर इतना जानते है, कल वो जाता था कि हम निकले
याचा गालिबच्या नोकरीशी अर्थाअर्थी काही संबंध आहे काय? नवप्रसव रचनांच्या अर्थाची काथ्याकूट चालू दे, पण बिचार्‍या गालिबला यात ओढू नका....

सन्जोप राव
हुई मुद्दत कि 'गालिब' मर गया, पर याद आता है
वो हर इक बात पर कहना, कि यूं होता तो क्या होता

का अर्थ घेऊ नये... रजेचा अर्ज... गालिबचे फॅन.

'गालिब’ एक और नवाबी रहन-सहन के आदी थे तो दुसरी और जीवनभर आर्थिक विपदाओंसे जूझते रहे” इथपर्यंत आपल्याला मान्य न होण्यासारखे काही नसावे.

राहिला अर्थाच्या बाबतीतला प्रश्न तर एक गोष्ट खरी की, वरील घटना आणि अर्थाच्या बाबतीत आत्ता माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. कदाचित सांगोवांगीच्या गोष्टीपैकी ती एक गोष्ट असेल. पण, आपण जो पर्यंत संदर्भाच्या आधारे गालिबच्या व्यक्ती, जीवन आणि त्याच्या शायरी बाबतीत काही संदर्भ देऊन सांगत नाही. तो पर्यंत आपला आक्षेप मी तरी मान्य करणार नाही. अर्थात आपण उपक्रमवर कधी संदर्भ देऊन लेखन केल्याचे स्मरत नाही. पण अपेक्षा करायला काय हरकत आहे नाही का ? [हो हो अपेक्षा करायला पाहिजेच]

अर्थ दुसरा, कृपया त्रास करुन घेऊ नये. आपण ज्या गझलेचा उल्लेख करीत आहात त्यातल्याच दोन ओळी-

’अगर लिखवाये कोई उसको खत, तो हमसे लिखवाये
हुई सुबह, और घर से कान पर, रखकर कलम निकले.

आता वरील ओळीतून कोणी 'उसको’ म्हणजे प्रेयसीला पत्र लिहिणार असेल आणि ’गालिब’ च्या हस्ताक्षरात जर ते पत्र जाणार असेल तर त्याच्या प्रेयसीला कदाचित स्पर्श, भावना,गंध पोहचावा किंवा पोहचत असेल म्हणून कदाचित गालिब सकाळ झाल्याबरोबर कानावर ’कलम’ लटकावून बाहेर पडत असेल.

अर्थ दुसरा, कार्यालयात कोणाला रजे बिजेचा अर्ज लिहिण्यासाठी किंवा जुन्या काळी पोष्टाच्या कार्यालयाबाहेर पत्र लिहिणारे वाचणारे जसे असायचे तसे 'गालिब' दोन पैसे मिळावेत म्हणून कानावर पेन लटकावून फिरत होता असा अर्थ कोणी काढला तरी गालिबच्या वाचकांनी ’गालिब' वर कितीही प्रेम असले तरी फार वाईट वाटून घेऊ नये असे वाटते.

-दिलीप बिरुटे

मै भी मुंह मे ज़बान रखता हूं,
काश पुछो कि मुद्दाआ क्या है. - गालिब

चविष्ट कल्पना...

प्रत्यक्ष गालिब बसलाय पोष्ट हापिसात, आणि त्याच्यासमोर बसून कोणी आपल्या पठाणकोटच्या आयशाला पत्र लिहवून घेतोय..."...आन् तिला म्हनौ, आलक् च्या तब्बेतीकडं लक्ष आसू दे... आलक् म्हंजी आमचा उंट बरका... मी यीनच एक सा म्हैन्यात..त्ये आलक् चं ल्हिलं ना, हा. न्हायतर लय हाल करते त्याचे..."

वा. दिन बन गया.
(गालिबप्रेमींना - या कल्पनाविलासात एकाही गालिबला इजा झालेली नाही. तेव्हा कृपया भावना दुखवून झुंडशाही वगैरे सुरू करू नका)

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सुधारणा

’अगर लिखवाये कोई उसको खत, तो हमसे लिखवाये
हुई सुबह, और घर से कान पर, रखकर कलम निकले.

एकतर वरील शेरात 'अगर' हा शब्द नसून 'मगर' हा शब्द आहे ( संदर्भ : दीवान-ए-गालिब, संकलक नूर नबी अब्बासी, गालिब इन्सिट्यूट, दिल्ली, तिसरी आवृत्ती, पृष्ठ क्र. २०७). आता 'अगर' आणि 'मगर' यातल्या फरकाने गजलेच्या अर्थात काय फरक पडतो? तर या शेराचा संबंध त्या आधीच्या
भरम खुल जाए, जालिम! तेरे कामत की दराजी का
अगर उस तुर्रः-ए-पुरपेच-ओ- खम- का पेच- ओ-खम निकले
या शेराशी आहे. या शेराचा अर्थ ध्यानात घेतला तर ही गजल कुणाला उद्देशून आहे, हे कळेल. किंबहुना तिचा गालिबच्या नोकरीशी लावलेला बादरायण संबंध ध्यानात येईल. जर तितके मोकळे मन असेल तर.
हाच गालिब
गालिब वजीफाखार हो दो शाह को दुवा
वो दिन गये के कहते थे नौकर नही हूं मैं
म्हणतो तेंव्हा तो नोकरीबद्दल म्हणत आहे, हे उघड होते. गालिबची शायरी सांकेतिकतेत (नको इतकी) अडकली असली तरी त्याच्या शेरांचे भलतेच अर्थ काढले तर कबरीत त्याला कूस बदलून बदलून हैराण व्हावे लागेल बिचार्‍याला!
गालिबच्या विपन्नतेविषयी कुणाला अमान्य होण्यासारखे काही नसावेच.हे आणि हेलिहिल्यानंतर मला तर ते नाहीच नाही. त्यामुळे त्या उल्लेखाचा संदर्भ कळाला नाही. बाकी राहिला प्रश्न माझ्या ससंदर्भ लिखाणाचा, पण प्रस्तुत चर्चेत तोही विषय गैरलागूच आहे.
सन्जोप राव
हुई मुद्दत कि 'गालिब' मर गया, पर याद आता है
वो हर इक बात पर कहना, कि यूं होता तो क्या होता

दुर्गमता

कवीला अगर लेखकाला, एखादे रूपक वापरताना जो अर्थ अपेक्षित असतो त्यापेक्षा वेगळा (आणि कधी अधिक प्रभावी) अर्थ वाचकाला असू शकतो याचा मला अनुभव आहे. म्हणून काव्य निर्माण झाल्यावर कवीचे त्यामागचे उद्देश मागे पडतात. त्याचा अर्थावरचा अधिकार हा इतर अनेक रसग्राहकांइतकाच राहातो असं मला वाटतं. शरद यांनी जास्त व्यापक व चित्रपूर्ण अर्थ लावला याबद्दल मी त्याचा आभारी आहे.

काव्याची दुर्गमता हा असाच एक अर्थ कळण्यामागे अडसर असतो. ती आवश्यक असते का यावर वाद घालता येईल. या कवितेत ती दुर्गमता, फसव्या सोपेपणाचं, अर्थहीनतेचं रूप घेऊन आलेली आहे. मूळ कवितेकडे, हीत अर्थ आहे, या गृहितकाने बघितलं तर दिसू शकतो. पण हे काय अर्थहीन शब्दांचं गाठोडं, या भावनेने बघितलं तर तो दुर्गमतेचा अडसर ओलांडायला कष्ट पडतात. असं अनेक कवितांचं आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

अजूण एक अर्थ :

कमल घर -- कमल, आपलं स्वप्नातलं घर काय होतं ते आठव.
बघ कमल घर --कमल ते स्वप्न कुठे गेलं , काय ही अवस्था झाली आहे घराची.
कमल बघ -- कमल आपल्याला धीर खचुन चालणार नाही. पुन्हा एकदा त्या स्वप्नासाठी प्रयत्न करायचा आहे.

 
^ वर