तुम्हाला बिल गेटसने पैसे दिले का?
दचकलात का? अहो पण दचकायला काय झालं? एक-दोन वर्षापूर्वी मी तुम्हाला एक ढकलपत्र नव्हते का धाडले, ज्यात आपला (हो निदान पैसे देतोय तर आपला म्हणायला काय हरकत आहे) बिल त्याचे पैसे वाटून टाकणार आहे असे म्हटले होते? मला नाही मिळाले अजून म्हणून म्हटलं इतर कोणा कोणाला मिळालेत ते विचारावे.
असो. थट्टेचा भाग बाजूला ठेवू या. पण माझी खात्री आहे हे ढकलपत्र प्रत्येक इ-मेल-पत्ताधारी व्यक्तीला किमान एकदा(पॉइंट टू बी नोटेड. मला किमान पाच जणांकडून आले. काय पण शेजार आहे नाही! ) तरी मिळालेच असणार. आणि कदाचित 'I know the truth, but just in case... ' असे म्हणत पुढे ढकललेही असेल, हो ना? माझ्या एका केरळी गणितविभाग-प्रमुख (म्हणजे मराठीत HOD हो) मित्राने प्रथम पाठवले. आणि त्याच्या 'cc' मध्ये जवळजवळ सव्वाशे नावे होती (हाय का आवाज? ). अर्थातच माझेही समाजसेवी पत्र (जे मी प्रत्येक खोट्या ढकलपत्राच्या 'प्रेषिता'ला पाठवतो) ते त्यांना पाठवून त्यांना "धन्यवाद" दिले. माझ्या एका सहकारी कन्येनेही 'just in case... ''म्हणत हेच पत्र पाठवले.
असेच एक ढकलपत्र आले त्यात एका विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियातील तथाकथित 'भयानक' अनुभव कथन केला होता (किडनी रॅकेटचा संदर्भ) आणि ऑस्ट्रेलियात जाणाऱ्यांनी सावध असावे असा सल्ला दिला होता. आणखी एकामध्ये एका प्रथितयश हॉस्पिटलचा संदर्भ देऊन (अगदी त्यांच्या संकेतस्थळाचा पत्ता, दूरध्वनी क्र. विभागप्रमुखांची नावे वगैरे) आणि खाली प्रेषक म्हणून डीनचे नाव होते. आणि प्रत्येक इ-पत्त्यामागे श्री. रतन टाटा रूग्णालयाला २००० रू (चु. भू. द्या घ्या) देणार आहेत असे लिहिले होते. (हो त्यांचा बिल तर आमचे टाटा का मागे राहतील? ) ९/११ च्या नंतर दैनिक "सकाळ" मध्ये आलेले छायाचित्र आठवते का? धडकणाऱ्या विमानाचे अगदी दोन मिनिट आधीचे 'योगायोगाने' मिळालेले ते चित्र नंतर फोटोशॉपची किमया होती हे लक्षात आल्यानंतर सकाळने माफी मागितली होती. हे चित्रही ढकलपत्र म्हणून दोन-तीन दिवस वेगाने फिरत होते.
मला खात्री आहे अशी अनेक ढकलपत्रे पाठविली जातात. बहुतेक पत्रातून तुमच्या भावनेला आवाहन करून (गणपतीचे पत्र २१ जणाना पाठवा; हो मला विपत्र म्हणून आले होते), घाबरवून (ऑस्ट्रेलियातील अनुभव), वा तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करून (खालील समाजसेवेचे उदाहरण पहा) पुढे ढकलण्याचे आवाहन केले जाते. बहुतेक वेळा खर्च पडत नाही म्हणून आपणही 'ढकला' चे बटण दाबून मोकळे होतो. यामुळे सर्व ढकलणाऱ्या मंडळींच्या इ-पत्त्याची साखळीच जालावर फिरू लागते. अर्थात यात मूळ प्रेषकाचा फायदा काय हा प्रश्न माझ्यासाठी तरी अनुत्तरितच आहे. अशा प्रकारात प्रत्यक्ष नुकसान होत नसले तरी, अनावश्यक जाहिरातींचा मारा होणे, जालावरील विपत्रांचे अनावश्यक ये-जा वाढणे असे अप्रत्यक्ष दुष्परिणाम होतातच.
यातील काही कथा प्रत्यक्ष नुकसान करणार्याही असतात. काही काळापूर्वी मला एक विरोप आला होता. त्यात वेगवेगळ्या देशात दर-माणशी खाण्याचे प्रमाण फटूंच्या सहाय्याने दाखवले होते. शेवटी भारतातील प्रमाण किती कमी आहे आणि आपण अन्न वाचवावे वा वाया घालवू नये असे आवाहन होते. शेवटी एका सामाजिक संस्थेचे नाव देऊन त्यांचा दूरध्वनी क्रमांकही दिला होता. आपण पार्टी वगैरे दिल्यानंतर उरलेले अन्न वाया न घालवता या संस्थेला द्यावे (त्यांचे स्वयंसेवक येऊन घेऊन जातील असे आश्वासन दिले होते). ही संस्था अनाथ मुलांसाठी काम करते आणि हे अन्न त्या मुलांना मिळू शकेल जेणेकरून त्यांना चांगले अन्न मिळेल असा समाजसेवी सूर होता. एखादी समाजसेवी संस्था असे ढोल वाजवून अन्न जमा करेल हे मला शंकास्पद वाटले म्हणून मी गुगलून पाहिले तर अशी संस्था खरेच अस्तित्वात होती व (अन्यत्र आलेल्या परिचयानुसार) चांगले कामही करीत होती. दिलेला दूरध्वनी क्रमांक ही बरोबर होता. परंतु त्यांनी आपण असे अन्न जमा करत असल्याचा स्पष्ट इन्कार केला होता (त्यांच्या संकेतस्थळावर तसेच अन्य काही फोरम्सवर). ही मेल उघडपणे खोटी होती. मग प्रश्न असा होता की मुळात अशी मेल पाठवणाऱ्याचा उद्देश काय असावा. अचानक मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तो दूरध्वनी क्रमांक 'टोल-फ्री' होता. म्हणजे प्रत्येक येणाऱ्या कॉलचे बिल हे संस्थेकडून भरले जात होते. अशा मेल मुळे अनेक जण फोन करीत असल्याने संस्थेचे फोन-बिल विनाकारण वाढत जात असणार. संस्थेवर राग असणाऱ्या एखाद्या विघ्नसंतोषी माणसाने हे काम केले होते का? कुणास ठाऊक.
सामान्यपणे अशा पत्रांना नागर-गप्पा (Urban Legends) (गाव-गप्पा वरून हे भाषांतर सुचले) जाल-अफवा असे म्हटले जाते. काही संकेतस्थळे अशा नागर-गप्पांचा पाठपुरावा करतात. यात अर्बन लेजंडस (http://urbanlegends.about.com) व स्कॅमबस्टर्स (http://www.scambusters.co) या दोन स्थळांचा समावेश होतो. आपल्या 'आवडत्या' (favorites) संकेतस्थळांच्या यादीत यांचा समावेश असलेला चांगला.
सामान्यपणे अशा पत्रांच्या प्रेषकाला मी वरील दोन दुवे पाठवतो आणि काही ठोकताळे ज्यांच्या आधारे आलेल्या ढकलपत्राची शहानिअशा करता येईल आणि तुमच्या मित्रांचे इ-पत्ते अनोळखी व्यक्तींच्या हाती पडण्याचे तुम्हाला टाळता येईल.
अ. सदर पत्रातील विषय/दावा विश्वासार्ह वाटतो का हे पाहणे (हो पण 'ज्याची त्याची बुद्धी आणि ज्याची त्याची जाणीव' आहेच. उदा. बिल गेटस त्याचे पैसे खरेच वाटणार आहे असे समजणाऱ्यांबद्दल काय बोलावे. )
ब. सदर ढकलपत्र नाही ढकलले तर काही नुकसान होणार आहे का ते पाहावे. नसेल तर न ढकलणे योग्य.
क. ढकलपत्रात उल्लेख केलेल्या संस्था, व्यक्ती अथवा मूळ प्रेषक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सहभागाची खात्री करून घ्यावी.
ड. वरील दोन दुव्यांवर जाऊन सदर ढकलपत्राचा पाठपुरावा झालेला आहे का पाहणे.
ई. काही वेळा (उदा. स्थानिक संदर्भ, वरील अन्न जमा करण्याचे) या दुव्यांवर असा पाठपुरावा केला नसेल तर गुगलून पाहणे.
फ़. जर यापैकी सर्व मार्गाने हे विपत्र बनावट असल्याचा पुरावा मिळाला नाही आणि पत्रातील मजकूर पुढे पाठविण्यालायक असेल तर :
1. पत्रातील सर्व इ-पत्ते काढून टाकावेत.
२. ज्यांना पाठवायचे आहे त्यांचे इ-पत्ते 'bcc' मध्ये टाकावेत.
३. कोणालाही त्यांच्या कार्यालयीन इ-पत्त्यावर ढकलपत्रे पाठवू नये.
वरील दोन दुवे तसेच (http://mashable.com/2009/07/15/internet-hoaxes/) येथे काही नागर-गप्पांचा उहापोह केलेला आहे. गंमत म्हणून कधीतरी वाचावे. याशिवाय इतरांना काही अनुभव असतील अशा विपत्रांचे तर इथे लिहावेत. तसेच वरील दोन दुव्यांशिवाय इतर दुवे माहित असल्यास इथे द्यावेत ही विनंती.
Comments
उत्तम विषय
आंतर्जालाआधी इथे (अमेरिकेत) अशी कागदी पत्रं यायची. त्यात पाच नावांची यादी असायची. त्यातल्या सर्वांना १ डॉलर पाठवायचा आणि यादीतलं खालचं नाव काढून टाकून तुमचं नाव वरती टाकायचं आणि तुम्हाला पाहिजे तितक्या लोकांना ते पत्र पाठवायचं. अशी पिरॅमिड योजना होती. खरंच लोकं पाठवायचे की काय कोण जाणे. पण खूप यायची तेव्हा काही तरी प्रतिसाद येत असावा.
ही साखळीपत्रं म्हणजे इ-विश्वातले 'जीव' (विषाणू पातळीचे) म्हणून विचार करता येईल. ते त्यांच्या प्रतिकृती वाढवतात, व त्यांची "लागवड" करणाऱ्यांचा काही फायदा करून देतात.
अशा साखळी विपत्रं ओळखण्याच्या आणखीन काही खुणा आहेत
१. अगदी लहान मुलाला समजावून सांगावं अशी बोली, अतिशयोक्ती करणारी भाषा. व्यावसायिक भाषा नाही. ठळक केलेली , अधोरेखित केलेली वाक्यं.
२. तुमच्या इमित्रांना पुढे ढकलण्याची आर्जवं. मी कुठल्याही मला व्यक्तीश: माहीत नसलेल्या बाबीची पत्रं ती बाब माहीत नसलेल्यांना पुढे ढकलत नाही.
३. तुमच्या भावनांना हात घालणारी भडक भाषा. कोणालातरी वाचवणं, देवाचा कोप (आजकाल दिसतं नाही), भाग्य उजळण्याची आश्वासनं, कथा इ.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
रिकामटेकडे उद्योग
लोकांचे इमेल भरून त्यांना साखळीत ओढणे हा आणखी एक रिकामटेकडा उद्योग. - ह. घ्या.
खालील जाहिरात माझी सर्वात आवडती जाहिरात आहे. तशी ती साखळी पत्रांवर नाही परंतु इथे द्यावीशी वाटली.
एखादी इमेल हवी तेव्हा एखादी शिवी हासडून, न वाचता पुसून टाकणे हे एक वरदान वाटते. पाठवा हवी तेवढी साखळी पत्रे, डिलीट बटन एकदाच दाबले की काम होते.
सर्व साखळी इ-पत्रांची ट्र्याशक्यानमध्ये रवानगी करणे सर्वात सोपे काम आहे.
फिल्टरांचा वापर
फिल्टरांचा वापर करून जास्तीतजास्त ढकलपत्रे कचरापेटीत जातील अशी तजवीज आपण करू शकतो. असे केल्याने काही मित्र नाराज होण्याची शक्यता असते. पण धडाधड ढकलपत्र पाठवणारे मठ्ठ किंवा रिकामटेकडे मित्र काय कामाचे? जो अगदी कधीकधीच ढकलपत्र पाठवतो त्याचे ढकलपत्र मात्र उघडले जाते. बाकी तुम्ही दिलेले नमुने एकापेक्षा एक आहेत. टोल-फ्री किस्सा फारच रोचक आहे. डिटेक्टिव आहात! नागर-गप्पा हा शब्दही फार आवडला.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"