लट उलझी

लट उलझी सुलझा जा बलमा

श्री. राजेश यांनी त्यांच्या प्रतिसादात चतुर सुदरा बालमवा ह्या चीजेचा उल्लेख केला होता व श्री. छोटा गंधर्व ताना-आलापांच्या भेंडोळ्यात तुम्हाला शब्द कळणारच नाहीत याची कशी काळजी घेत याचे छान वर्णन केले होते. बर्‍याच गायकांच्या गायनात हे असे नकळत का होईना घडते व श्रोत्याला चीजेचे शब्दच कळत नाहीत. हे खरे की बर्‍याच वेळी त्याने काही फरक पडत नाही. पण हे ही तितकेच खरे की काही सुंदर भजने व ललितरम्य काव्य यांचा आस्वाद घेण्याची संधीही हुकते. कित्येक वेळीं अस्थाई (चीजेचा पहिला भाग, !!धृ!!) कळते व अंतरा (पुढचा भाग, कडवे) कळत नाही वा गायक गातच नाही. आता सामान्य श्रोता या चीजा कोठून मिळवून वाचणार ? कित्येकवेळी ते गायकांनाही दुरापास्त असते. पं. भातखंडे वा पं. कुमार गंधर्व याची पुस्तके ही सहजासहजी मिळणारी पुस्तके नाहीत. सहज मिळणारी म्हणजे पं.विनायकबुवांची परिक्षेची टेक्स्ट बुके. बरेच होतकरू नवशिके त्या चीजा वाचून गायचेच सोडून देतात! ते असो.(आपले भाग्य!.)

तर एकदा काय झाले, एक चीज कानावर पडली, " लट उलझी, सुलझा जा बलमा " पुढचे ऐकावयाचा प्रयत्न केला पण काही उमगले नाही. फार हळहळ वाटली. काय situation आहे बघाना. ती म्हणते आहे, " प्रिया, केसांचा गुंता झाला आहे, बघ ना. जरा गुंता काढून, विंचरून, सरळ करून दे ना !" बस, एवढेच कळले. केस कशामुळे गुंतले, प्रियकराने नंतर काय केले,कशाचाच उलगडा नाही. म्हणजे जवळ्जवळ सगळा कॅनव्हास मोकळा, रंग तुम्हीच भरावयाचे. दोन दिवस विचार करून लक्षात आले की " गड्या, हे काम तुझे नाही, योग्य माणसालाच विचार."
आमच्याच कंपूतल्या एका कवीला फोन मारला. त्याला सांगितले, " ही ओळ, कवितापूर्ती कर " आता आमच्या कंपूतल्या कवीच्या हातात हे कोलीतच दिले असे म्हणा ना. त्याने एक लावणीवजा कवीताच आमच्या तोंडावर फेकली. काल रात्री तूच एवढा गोंधळ घातलास, सकाळी केसांची ही गत ! आताच तूच निस्तारले पाहिजेस. गोंधळाचे अंमळ जास्तच वर्णन होते व आमच्या कंपूतला म्हटल्यावर राम जोशी, वसंत बापट पाठच होते. त्यामुळे रंग जरा गडदच होते. असो. ती कविता आता देता येणार नाही, पण माझी आमचे नवीन कवीमित्र श्री. चतुरंग यांना विनंती आहे की त्यांनी ही कवितापूर्ती करून दोन पिढ्यांमधील कवींमध्ये काही फारसा फरक नाही हे दाखवून द्यावे. माझ्या विनंतीला मा्न देऊन श्री. धनंजय वेळ काढतात (व कविता लिहतात) तर श्री चतुरंगही तसेच उपकृत करतील व आपणास एक छान कविता/लावणी वाचावयास मिळेल अशी आशा करू या.

यथावकाश हिन्दी चीजही मिळाली. नर्म शृंगाराचे एक सुरेख प्रदर्शन त्यात घडते. मराठमोळा रोखठोक शृंगार नाही तरी भावनांची एक छान रंगरेखा समोर उभी रहाते, चीज आहे

लट उलझी, सुलझा जा बलमा, मेहंदी हात लगी !!
माथेकी बिंदिया बिछड पडी है, अपने हात लगा जा !!

हाताला मेंदी लावल्यानंतर तीच्या लक्षात आले की, केस विंचरावयाचे राहिलेच आहेत व कपाळाची बिंदी, तीही खालीच पडलेली दिसते. आता ओल्या मेंदीच्या हाताने हे निस्तरणे तर शक्यच नाही. तेव्हा थोड्या लाडीगोडीने ती विनंती करते आहे, लट उलझी. आता जवळच्या माणसाने इतके जवळचे काम सांगितल्यावर कोण बलमा नाही म्हणणार आहे ?

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

अनुमोदन

चतुरंग यांच्या दरबारी केलेल्या मागणीस पूर्ण अनुमोदन.
छोटेखानी लेख भारी.

आज मूड आला...

माझं हिंदी तसं कच्चंच, पण तुम्ही ज्या नजाकतीने वर्णन केलं त्यामुळे त्या सुंदरीविषयी विचार करणं थांबवता आलं नाही. जे सुचत गेलं ते लिहीत गेलो... शब्द शोधायला मराठीपेक्षा हिंदीत फारच त्रास होतो असं लक्षात आलं. पण हा पहिला प्रयत्न गोड मानून घ्या. मी तुमच्या ओळीत माझ्या डोक्यात असलेल्या चालीत बलमा च्या ऐवजी रे बलमा केलं.... मधल्या ओळी साधारण "जो मै होती पिया, काली बदरीया" वर म्हणता येतात. अर्थ बरा वाटला तर शब्द अजून थोडे बदलता येतील.

लट उलझी, सुलझा जा रे बलमा, मेहंदी हात लगी !!
माथेकी बिंदिया बिछड पडी है, अपने हात लगा जा !!

जो ना मै मानी, बाते तुमरी
करके मोसे, जोराजोरी
काहे गिरादी, बिंदिया मोरी

बालों मे गजरा बसा जा, रे बलमा मेहंदी हाथ लगी !!

ना कीजो अब ऐसी शरारत
देख ना ले कोई तुमरी हरकत
जान ले सब तो आवे नौबत

सर घुंघट तो मोरा चढा जा, रे बलमा, मेहंदी हाथ लगी !!

साजन अब कल फिर मत आना
बाहोमे मुझको अब ना समाना
मेहंदी पे मेरे हक ना बनाना

बैठी मै सजके दुल्हनिया, रे बलमा, मेहंदी हाथ लगी !!
ही कविता इथे संपली असं वाटतं पण खाली स्क्रोल करून बघा....

अब ना हो मिलना अपना कुछ दर
मेहंदी रंगेगी सूख के धुलकर
जायेंगे वो कही बनके सौदागर

दर पे मेरे ना कुंडी ना ताला, रे बलमा मेहंदी हाथ लगी

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

क्या बात है !

शरद

ह्याचा अर्थ काय हो घासकडवी?

ही कविता इथे संपली असं वाटतं पण खाली स्क्रोल करून बघा....

डोकेदुखी आणि डोळ्यांना त्रास ह्याशिवाय वरील ओळींना कुठला अर्थ आहे हो घासकडवी? असल्यास सांगावा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

दिलगिरी...

धम्मकलाडू,

त्या खरं तर दोन वेगवेगळ्या कविता आहेत. एक तीन कडव्यांची व एक चार कडव्यांची. पहिली कविता करुण आहे. मेंदी हे तिच्या असहायतेचं प्रतीक आहे. व ती आपल्या प्रियाला सांगते की हे लोढणं माझ्या गळ्यात पडलं आहे तेव्हा तू उद्यापासून कधीही भेटू नकोस. ही आपली शेवटची भेट.

दुसऱ्या कवितेत पहिली कडवी तीच आहेत पण शेवटच्या कडव्यामुळे तिची प्रतिमा बदलून जाते. मेंदी ही असहायता नसून तिची तात्पुरती अडचण आहे. ती त्याला सांगते उद्या येऊ नकोस. पण परवा तेरवा ये.

या दोन कविता वेगवेगळ्या कशा मांडायच्या हे मला नीट ठरवता आलं नाही. पहिली संपल्यावर मला थोडा अवकाश जाऊ द्यायचा होता. कदाचित दोन स्वतंत्र प्रतिसाद दिले असते तर बरं झालं असतं. प्रतिसादात केवळ रिटर्न कॅरेक्टर खूप वेळा वापरून काही फरक पडत नाही. एकच मोकळी ओळ येते. म्हणून काहीतरी अंक टाकण्याचा प्रपंच.

कलाविष्काराच्या समृद्धीसाठी केलेल्या, व फसलेल्या प्रयोगामुळे आपल्याला डोकेदुखी झाली व डोळ्यांना त्रास झाल्याबद्दल दिलगीर आहे. आपण अत्यंत प्रेमळपणे ही चौकशी केल्याबद्दल धन्यवाद. त्यात आपल्याला तीच अक्षरमाला पुन्हा उद्धृत करून इतरांच्या डोकेदुखीला कारणीभूत व्हावं लागलं याबद्दलही दिलगीर आहे. तुम्हाला टाईप करण्याच्या कष्टाबद्दल मी तुमचे हात चेपून द्यावे का या विचारात आहे.

आपला
(संत) राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मूळ चीज

लट उलझी सुलझा जा बालम, हातनमे मेरे मेहंदी लगी है||
माथेकी बिंदिया बिखर गयघै, अपने हाथ लगा जा बालम||
अशी आहे असे आम्हाला शिकवले आहे. राग बिहागातली ही रचना फारच सुरेख आहे. मी एकदा मलिका ए तरन्नुम् नूरजहाँ यांच्या आवाजात याचे ध्वनिमुद्रण ऐकले आहे. इतर कोणा गायकाने म्हटलेली चीज ऐकायला खूपच आवडेल. कुणाच्या संग्रही असेल तर कळवाल का?

तसेच वर उल्लेख केलेल्या 'चतुर सुघरा' या चिजेचे पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातले ध्वनिमुद्रण माझ्याकडे आहे. राग दुर्गामधील ही चीज आणि त्याचे सादरीकरण हे दोन्हीही अतिशय उच्च दर्जाचे आहे. कोणाला ऐकायचे असल्यास मला कळवावे.

इथली समस्यापूर्ती वाचायची उत्सुकता आहे. लौकर लिहावी.

--अदिती

-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने

पं. भीमसेन जोशींची ’लट उलझी’

पं. भीमसेन जोशींची ’लट उलझी’ अप्रतिम आहे. विलंबितमधील ’कैसे सुख सोवे’ नंतर भरदार आवजातील पण लडिवाळ ’लट उलझी’ म्हणजे पर्वणीच! त्यांचे शब्द कळले नाहीत तरी सूरच सर्व भाव व्यक्त करतात.
गौरी

प्रकाटाआ

प्रकाटाआ

नूरजहाँचे 'लट उलझी'

नूरजहाँचे लट उलझी. संगीतकाराचे नाव रशीद अत्रे. पण हे अत्रे बहुधा पंजाबी.
पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

मी ऐकलेली चीज अशी आहे..

१)
लट उलझी सुलझा जा बालम|
हाथोमे मोरे मेहंदी लगी है||
माथेकी बिंदिया गिर गयी सेजपे|
अपने हाथ लगा जा बालम||

२)
पं. जसराजांच्या आवाजात ऐकलेली चीज अशी आहे.. माझ्याकडे ह्याचे ध्वनीमुद्रण आहे. जवळ जवळ २४-२५ एमबीचे असल्यामुळे विरोपातून पाठवता येईल की नाही ही शंका आहे.

लट उरझी सुरझा जा बालम|
हाथन मेहंदी लगी मोरे बालम||

माथेकी बिंदिया गिर गयी सेजपे
अपने हात लगा जा बालम ||

देखो मोरी रंगमे भिगोये डारी
मोरी नई नई चुनरिया
सावरियाने काटछलत.... वगैरे वगैरे...झटपट गायल्यामुळे नीट काही लक्षातच नाही राहात..ह्याच्या पुढे दोन ओळी आहेत ...त्यानंतर अजूनही एक कडवं आहे.

बहुदा वेगवेगळ्या घराण्याचे गायक आपापल्या सोयीप्रमाणे ह्यात काही बदल करत असावेत.

वर शरद ह्यांनी उल्लेखलेले चीजेचे शब्द बहुधा पं. भीमसेनांच्य तोंडी मी ऐकलेत.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

भीमसेन जोशी व जसराज

या लेखाच्या निमित्ताने एका कान तृप्त करणार्‍या सफरीवर धाडल्याबद्दल श्री शरद यांचे आभार. जालावर या गाण्याच्या दिग्गजांनी गायलेल्या काही प्रती मिळाल्या त्या खाली देत आहे.

पं. जसराजांनी गायलेली प्रत येथे ऐकता येईल. श्री देव, मी शब्द पकडायचा प्रयत्न केला पण ऐकतांना तिकडे दुर्लक्ष झाले.

पं. भीमसेन जोशींच्या आवाजात युट्युबवर असलेली चित्रफीतः

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

प्रतिसाद लॉक करतो.

नवीन काही प्रतिसाद आला की काय म्हणून पाहतो तर प्रतिसाद अद्यावत झालेला दिसला.
चार वेळेला फसलो ना राव....! म्हणून उपप्रतिसाद देऊन प्रतिसाद बंद करतो. :)

-दिलीप बिरुटे

कोमल निषाद..

अण्णा एकदा नेहरू सेंटरला गायले होते तेव्हाचा बिहाग आहे हा. सुरेखच गायला आहे. याची ध्वनिफित माझ्या संग्रही आहे..

'लट उलझी..' गातांना अण्णा क्वचित प्रसंगी बिहागात वर्ज्य असलेल्या कोमल निषादही लावतात.. अगदी एखाद् कण. चवीपुरता! :)

हा कोमल निषाद अण्णांनी त्यांना गुरुस्थानी असलेल्या नारायणराव बालगंधर्वांकडून घेतला. 'मम आत्मा गमला..' गातांना नारायणरावसुद्धा अगदी सुरेख कोमल निषाद लावायचे. पण अगदी चवीपुरता! बिहागच्या गालावर कोमल निषादाची सुरेखशी तीटच म्हणा ना! :)

अर्थात, भीमपलासीत शुद्ध गंधार काय, किंवा बिहागात कोमल निषाद काय, नारायणरावांना तो अधिकार होता..! आणि गुरुची किंवा गुरुसमान व्यक्तिची गायकी अगदी नेमकेपणाने आणि नेटकेपणाने आपल्या गाण्यात दिसली पाहिजे हीच आमच्या अण्णांची खासियत!

असो..

आपला,
(गाण्याबजावण्यातला) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

लट उलझी...

'मिसळपाव' या मराठीतल्या सर्वोत्तम लोकप्रिय मराठी संकेतस्थळावर 'लट उलझी' गाण्याबद्दल सुबक ठेंगणी यांनी लिहिले होते त्याची आज आठवण झाली. मला रहेमानचं मनमोहिनी खूपच आवडले होते. आता त्या दुव्यावर ते सापडत नाही. पण तेव्हापासून आजही लट उलझी माझ्या भ्रमणध्वनीवर संग्रही आहे. कधी तरी डिवटीला जातांना हेड फोन कानाला लावून ते गाणे मी हमखास ऐकतो. वरील गाण्यावरील आणखी एक चर्चा मिपावर...'लट उलझी सुलझा जा बालमा'... नक्की वाचा. आणि जमलेच तर इथे अभिप्राय लिहिल्यावर तिथेही थोडेफार लिहा. :)

-दिलीप बिरुटे
[बींदी उचलणारा]

छोटेखानी ओळख आवडली

छानच.

पूर्ण ओळी वाचल्यानंतरही श्री. शरद यांच्या मित्रांनी सुचवलेला अर्थ अजूनही शक्य वाटतो. त्यात श्री प्रमोद देव यांनी सांगितलेल्या पाठभेदात बिंदिया शेजेवर पडलेली आहे... शेजेवर काय बरे चालू होते, बिंदी पडण्यासारखे?

तरीसुद्धा मधुर रात्रीनंतरच्या गुंत्याऐवजी मला मात्र विप्रलंभ शृंगाराची ही पुढची कल्पना आवडते :
गायिकेला मधुर रात्रीचा विलंब राहावत नाही. आपल्या परीने काय करू शकतो त्या सगळ्या कामात फार घाई होते आहे. सजायचा-नटायचा क्रम उलट-पुलट होत आहे. केस विंचरायच्या आधीच मेंदी लावली. बिंदी घाईत नीट लावलीच नाही, म्हणून पडली.

"अरे प्रिया! तुझ्याचसाठी सजते आहे, त्यात माझा घोळ होतो आहे. म्हणून तुझ्या आवडीप्रमाणे तूच मला सजव. सजल्यानंतरच्या मीलनाची हुरहुर असह्य होते आहे, त्याबद्दल मी आताच बोलणार नाही, पण त्याची पूर्वतयारी करायला तूच मदत कर."

अशी परिस्थिती कल्पिली, तर आध्यामिक/मधुराभक्तीमधला अर्थ स्पष्टच आहे. भक्त करवित्यालाच म्हणत आहे की तुझ्याशी मीलन दु:साध्य आहे, साक्षात कर्ताच होऊन मला तुझ्या मीलनासाठी तयार कर ना!

विप्रलंभ शृंगार म्हणजे छळवादी शृंगार ?

धनंजयराव, जरा सामान्यांसाठीही लिहीत जा. विप्रलंभ शृंगार म्हणजे छळवादी शृंगार म्हणता येईल काय?
बाकी ह्या किंवा कुठल्याही गाण्याचे रसग्रहण रसग्राहकाच्या मूडवर अवलंबून असावे. हवे हवे ते, नको नको ते, भलेबुरे, चांगले वाईट अर्थ हा मूडच घेऊन येतो. त्याबद्दल काय बोलायचे. कारण बरेच काही बोलता येईल.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अरे खरेच की!

जेव्हा मीलनाची परिस्थिती नसते, त्या परिस्थितीतला शृंगार म्हणजे छळवादीच!

परंतु वरील वाक्य कदाचित चुकीचेही असेल. मीलन होणार हे ठाऊक असले तर त्याआधीची हुरहुर छळवादापेक्षा वेगळी, गोग्गोड असू शकते.

"दशरूप" ग्रंथात धनंजय (मी नव्हे, दुसरा कोणी प्राचीन लेखक) म्हणतो, की मीलनापूर्वीच्या या परिस्थितीला विप्रलंभ म्हणताच कामा नये.

रससिद्धांत सांगणारा कोणी प्राचीन "धनंजय" होता हे मला आजपर्यंत ठाऊक नव्हते, पण गूगल-विकींकडून कळले.

रसग्रहण हे आस्वादकाच्या मनःस्थितीवर अवलंबून असते. अगदी-अगदी मान्य. आस्वादक म्हणून माझी मनःस्थिती वेगळी असेल, प्रियव्यक्तीशी कडवट भांडण होऊन शिवाय दारूच्या हँगओव्हरमुळे डोके ठणकत असेल, समजा. तर "लट उलझी" कवितेतून/गाण्यातून अत्यंत बीभत्स अनुभव मला येऊ शकेलसे वाटते.

शिवाय जी आस्वादवस्तू असते त्यावरती सुद्धा अर्थ अवलंबून असतो. "लट उलझी"च्या तशा बीभत्स आस्वादाची परिस्थिती माझ्यासाठी फार क्वचित येते.

वेगवेगळे आस्वादक कधीकधी एकाच "सामान्य" मनःस्थितीतून आस्वाद घेत असावेत, आणि त्या मनःस्थितीत जाणवलेल्या भावना एकमेकांना सांगितल्या तर एकमेकांना पटू शकतात. म्हणूनच का काय एकमेकांना "मला असे वाटले" सांगायची इच्छा होते, आणि ऐकायची इच्छा होते.

"सामान्य" रस

मीलन होणार हे ठाऊक असले तर त्याआधीची हुरहुर छळवादापेक्षा वेगळी, गोग्गोड असू शकते.

बरोबर. पण हुरहूर छळवादी असू शकते ना.

वेगवेगळे आस्वादक कधीकधी एकाच "सामान्य" मनःस्थितीतून आस्वाद घेत असावेत, आणि त्या मनःस्थितीत जाणवलेल्या भावना एकमेकांना सांगितल्या तर एकमेकांना पटू शकतात. म्हणूनच का काय एकमेकांना "मला असे वाटले" सांगायची इच्छा होते, आणि ऐकायची इच्छा होते.

हे पटण्यासारखेच आहे. मुळात कविता, ओळ, चीज "सामान्य" असताना "सामान्य" मनःस्थितीतून आस्वाद घेणारे तिला ग्रेट ठरवू शकतात ना. त्यातही "सामान्य"ता जेव्हा चित्कारू "सामान्य"ता बनते तेव्हा ती अधिकच मनोरंजक होते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

शृगारनायिका

शृंगार आणि शृंगार नायिका
लट उलझी आता छान वळण घेऊ लागलेली दिसते. श्री. धनंजय व श्री. धम्मकलाडू यांच्या प्रतिसादानंतर आता संस्कृत साहित्यातील शृगारांचे प्रकार व ओघानेच शृंगारनायिकांचेही आठ प्रकार यांची ओळख उपक्रमवर करून देणे गरजेचे दिसते. श्री. धनंजय वा संस्कृत समुदायाच्या सभासदांपैकी कोणी रसिकांनी सुरवात केली तर उत्तमच ...

शरद

दीनानाथ दलालांच्या ८ शृंगारनायिका

अल्लड अवखळ
पिंजरा
सूर मोकळे
लावण्यवेल
मन वेडे गुंतले
शृंगारस्नान
घायाळ मी हरणी...
सांग तुझ्या स्वप्नात कोण..
मोकळे करून टाक...

(महाराष्ट्र टाइम्सवरून साभार)

ह्याशिवाय वासकज्जा, विरहोत्कंठिता, स्वाधीनपतिका, कलहांतरिता, खंडिता, विप्रलब्धा, प्रोषितभर्तृका, अभिसारिका ह्या आठ नायिकांची चित्रे कोणे एकेकाळी मेनका मासिकात पाहिल्याचे आठवते. शरदरावांसारख्या अनुभवी जाणकारांनी त्यांच्याविषयी आणखी माहिती द्यावी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

वा!

वा! सुंदर चित्र.. एकसे एक आयटम आहेत! :)

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

भले भले

काय राव,
आता चित्रे दिली तर त्याचबरोबर पुस्तकातल्या लेखांचा सारांशही द्या ना. ललित
लेखनाचा सुंदर आविष्कार संस्कृतातून तेथे अवतरला आहे.
शरद

प्रचंड आवडलं

नजरचुकीने हा धागा वाचलाच नव्हता.. पण उत्तमोत्तम प्रतिसाद पाहिल्यावर हा धागा नंतर आरामात वाचल्याचा आनंद होतोय.

बाकी शरदराव्गांच्या रसग्रहणाबद्द्ल मी पामर काय बोलणार.. फारतर मला प्रचंड आवडलं इतकंच सांगु शकतो.

पण श्री. राजेश व श्री. धनंजय यांनीही कल्पनाशक्ती सुंदरप्रकारे ताणली आहे :)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

 
^ वर