किलर व्हेलचा हल्ला
नुकतीच ओरलँडो, सी वर्ल्डमध्ये किलर व्हेलने खेळादरम्यान एका जुण्या जाणत्या ट्रेनरला ( Dawn Brancheau) ठार केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. मी सहजच म्हणून माझ्याकडील जुने फोटो चाळले आणि मला डॉनचा खेळादरम्यानचा फोटो मिळाला. कुठेतरी मनात प्रश्न येतो की
- सामान्य कुवतीच्या आणि असामान्य आकाराच्या/ शक्तिच्या प्राण्यांबरोबर खेळ करणे योग्य आहे का?
- याचप्रकारे चालणारे सर्कशीतील प्राण्यांचे खेळ बंद केले गेले आहेत. अर्थात, सर्कशीतील प्राण्यांची (दैन्या)वस्था आणि सीवर्ल्डमधील प्राण्यांची बडदास्त वेगळी असावी. तरीही?
ओहायोमधील व्हेल प्रशिक्षकाची यावेळेस मुलाखत पाहिली. त्याचे म्हणणे असे होते की - 'कामाच्या ठिकाणी अपघात व्हायचेच. त्यासाठी किलर व्हेलची गरज नाही. औद्योगिक आणि रासायनिक कारखान्यांत यापेक्षा अधिक मृत्यू होत असावेत. गेल्या सुमारे ४६ वर्षांत ओरलँडो, सीवर्ल्डमध्ये व्हेलच्या खेळात झालेला हा पहिलाच मृत्यू. त्याचा बाऊ करू नये.'
मी ट्रेनरचे प्रसिद्ध झालेले फोटो पडताळून पाहिले आहेत. मला निधन झालेली ट्रेनर आणि फोटोतील ट्रेनर एकच वाटते आहे. कोणाला तीच ही ट्रेनर नाही असे वाटल्यास कळवावे. हा फोटो काढता येईल.
मूळ बातमी : http://www.businessweek.com/ap/financialnews/D9E2PIO80.htm
Comments
अपघात
कारखान्यातील अपघात आणि प्राण्यांमुळे झालेले अपघात यांची गल्लत करु नये असे वाटते. कारखान्यांतल्या अपघातापेक्षा हे अपघात - विशेषतः जर प्राण्यांबरोबरच्या 'खेळात' मनोरंजन एवढाच हेतू असेल तर - टाळन्यासारखे असतात. धोकादायक प्राणी; उदा. मगरी, विषारी साप यांना हाताळण्यात प्रशिक्षित माणसांकडूनही चूक होऊ शकते, आणि ती प्राणावर बेतू शकते. स्टीव्ह आयर्विनचे उदाहरण तसे ताजे आहे. त्याने आपल्या तान्ह्या मुलीला अशा स्टंटसमध्ये घेऊन लोकांची टीका ओढवून घेतली होती. स्टीव्ह तसेही जरा अतीच करायचा. हॉटेलच्या खोलीच्या खिडकीतून आपल्या तान्ह्या बाळाला बाहेर काढणार्या मायकेल जॅक्सनसारखा.
सन्जोप राव
हुई मुद्दत कि 'गालिब' मर गया, पर याद आता है
वो हर इक बात पर कहना, कि यूं होता तो क्या होता
कीस काढला तर असं म्हणता येईल की....
यात 'योग्य आहे का?' चा अर्थ मी 'त्यातला धोका पत्करण्याजोगा आहे का?' असा लावतो आहे. यात दोन उपप्रश्न आहेत - कोणी हा धोका पत्करावा का? आणि समाजाने हा धोकादायक प्रकार मुळात घडू द्यावा का?
कोणी हा धोका पत्करावा का याला मी माझे नेहेमीचे रास्ततेचे व उपयुक्ततेचे निकष लावतो. उद्दीष्ट रास्त आहे का -असा खेळ करण्यामध्ये रोमांचकारी अनुभव, आर्थिक फायदा (नोकरी, प्रसिद्धी, इ.) व त्या प्राण्याविषयी प्रेम (किंवा पर्यावरणाविषयी प्रेम) अशी तीन वेगवेगळी उद्दीष्टं साध्यं होऊ शकतात असं दिसतं. प्रत्यक्ष ट्रेनरचं काम करणारे या तिन्हींचा संगम साधतात. या तिन्हींपैकी कुठलंच मुळात आक्षेपार्ह नाही. यापेक्षा कितीतरी पट अधिक धोका एव्हरेस्ट चढणे (रोमांचकारक अनुभव - १०% मृत्यू), विविध धोकादायक कामं करणे (यादी देत नाही - पण तुम्ही दिलेला ओहायोमधल्या ट्रेनरचा युक्तीवाद), व इतर गोष्टींच्या प्रेमापोटी त्या करणे (टोर्नेडोचा पाठलाग करणे, देशासाठी प्राण अर्पण करायला तयार होणे) घडताना दिसतात. त्या सर्व पुन्हा करण्यायोग्य आहेत का? असा प्रश्न उपस्थित होईलच. पण मला असं म्हणायचंय की इतकाच धोका असलेल्या अनेक गोष्टी आहेत, आणि खूप लोकं तो धोका घ्यायला तयार होतात - याचा अर्थ त्यांच्या दृष्टीकोनातून तो धोका पत्करण्याजोगा असतो. असं असताना आपण कोण सांगणारे की हा धोका तुम्ही पत्करू नये? धोका न पत्करण्यात आनंदाला मुकण्याचा धोका आपण पत्करतच असतो. इथेच उपयुक्ततेचाही निकाल लागतो.
समाजाने हे चालू द्यावं का हा जरा जास्त व्यापक प्रश्न आहे. एखादी गोष्ट पुरेशी धोकादायक असेल तर समाज त्यावर बंदी घालतो. उदाहरणार्थ आत्महत्येचा प्रयत्न. हे पुन्हा योग्य की नाही यावर वेगळा वाद होऊ शकेल - पण तूर्तास तो बाजूला ठेवू. काही धोकादायक द्रव्यांवर समाज बंदी घालतोच. त्या तत्त्वाशी सुसंगत राहूनही समाज ज्या इतर वर दिलेल्या गोष्टींना परवानगी देतो त्या मानाने ही तितकी धोकादायक आहे असं वाटत नाही. प्राण्यांच्या हाती मृत्यू वर्षाला फार तर काही दशसहस्रात असतील असा अंदाज आहे. ट्रेनर्सचे मृत्यू शंभराच्या आत असावेत. त्या तुलनेत धोकादायक काम केल्याने मृत्यू दशलक्षात असतील. (नॉर्मलायजेशनचा विचार झाला पाहिजे, पण सकृद्दर्शनी गरज वाटत नाही). तेव्हा यावर बंदी घालण्याची गरज नाही.
हाच प्रश्न प्राण्यांच्या दृष्टीकोनातून बघितला की किचकट होतो. यात तुम्हाला 'असे खेळ करण्यासाठी प्राण्यांना कैदेत ठेवून त्यांना हीन वागणुक दिली जाते - ते योग्य आहे का?' हा प्रश्न गृहित धरतो. पुन्हा रास्त - सी वर्ल्डचा उद्देश आहे पैसा कमावणे - माणसाच्या प्राण्यावरच्या प्रेमाचा वापर करून. त्यासाठी मानवांत प्राण्यांवरचं प्रेम वाढवणं त्यांच्या हिताचं आहे. त्यामुळे त्यांचे हेतू सर्वसाधारणपणे रास्त आहेत असंच म्हणावं लागेल. उपयुक्त - माझ्या मते सी-वर्ल्डमुळे मुलांना प्राण्यांवर प्रेम करायला शिकायला मदत होते. यासाठी माझ्याकडे काहीही विदा नाही. पण एका प्राण्याला 'वापरून' व ट्रेनरसाठी थोडा धोका पत्करून एकंदरीत चांगलं होतंय का - यासाठी हो म्हणावं लागेल.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
आणखी थोडा कीस
तुमचे प्रश्न योग्य आहेत. कोणी हा धोका पत्करावा या विषयी तुमच्या विवेचनाशी १००% सहमत आणि जवळ जवळ दुसर्या प्रश्नाशीही. थोडासा फरक सैनिक किंवा एवरेस्ट चढणार्यांमध्ये आहे तो असा की ते करमणूकीचे खेळ नाहीत. एवरेस्ट चढून जाणारा फक्त स्वतःची इच्छा पूर्ण करत असावा, तेच टोरनॅडोचा पाठलाग करण्याविषयी. मला या विषयाची संपूर्ण माहिती नाही परंतु प्राण्यांच्या बाबतीत ट्रेनर आणि स्टंटमॅन ही दोन्ही कामे एकच व्यक्ती सहसा करताना दिसते. यांतून इतरांची करमणूक व्हावी हा उद्देश देखील असतो आणि हे करताना किंवा दरवर्षी प्रेक्षक खेचण्यासाठी स्टंटमध्ये विविधता आणणे यासाठी धोका पत्करला जातो का हा प्रश्न येतो.
याच धर्तीवर सर्कशीतील कलाकार पाहिले तर पोटापाण्यासाठी ते धोकादायक खेळ करण्यास धजावत असतील असे वाटते. माझ्या लहानपणी सर्कशीत केरळातील मुली दिसत. केरळचा कायापालट होऊन, साक्षरतेचा विकास, गल्फमधील बरकत वगैरे अनेक गोष्टींमुळे आता केरळातील मुली न दिसता नेपाळातील मुली दिसतात. पुन्हा, सीवर्ल्डमध्ये असे होत नसावे असे वाटते.
समाज हे खेळ चालू देईलच कारण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्राण्यांनी अशाप्रकारे ट्रेनरचे मृत्यू होण्याचे प्रमाण नगण्य आहे. परंतु, संजोपराव म्हणतात त्याप्रमाणे गरज नसताना अधिक धोकादायक खेळ केले जातात का? सीवर्ल्डबाबत याची शहानिशा लवकर होईलच. सध्या या लेखात झालेली दिसली.
असो. बंदी घालावी असा म्हणण्याचा माझा प्रयास नाही हे सांगायला नकोच. :-) परंतु, खेळ करताना प्राण्यांचा आकार आणि प्रवृत्ती लक्षात घेणे आवश्यक आहे.
मुंबईच्या बाजारांत हत्ती फिरवले जातात आणि घाईतले लोक आरामात त्याच्या आजूबाजूला चालत असतात तेव्हा नेहमी माझ्या मनात प्रश्न येतो की हा हत्ती बिथरला काही कारणाने तर काय करायचे? कदाचित तो हत्ती गेल्या १५ वर्षांत न बिथरल्याने लोक बिनधास्त त्याच्या आजूबाजूने चालत असावेत.
आता इथेच बघा. हा हल्ला मुलांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला. पालक मुलांचे जी/पीजी-रेटेड चित्रपट सुद्धा पडताळून/ पारखून पाहतात. अर्थात, येथेही हेच म्हणता येईल की उद्या फ्रीवेवर प्रवास करताना तुमच्या मुलांसमोर अपघात झाला तर काय होईल? असे प्रसंग यायचेच आणि ते खरेच आहे. अशा गोष्टी टाळता येत नाहीत.
शिकवणे
प्राण्यांना शिकवण्यामागचे तत्त्व हे भूक, शिक्षा, बक्षीस अशा स्वरूपाचे असते. म्हणजे भुकेल्या डोल्फिनने पाण्याबाहेरच्या रिंगमधून उडी मारली की त्याला बक्षीस म्हणून खायला मिळते.
अशा वेळी त्या भुकेचे प्रमाण चुकले म्हणजे तो प्राणी जास्त भुकेला झाला तर अशी परिस्थिती ओढवू शकते.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
नॅचरल इंस्टिन्क्ट
हो हे खरे आहे. याचबरोबर, काही प्राण्यांत हल्ला करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. या संदर्भात, डॉ. पूर्णपात्रे यांच्या सिंहीणीचा किस्सा आठवतो की जन्मजात पाळीव सिंहिण असून सुद्धा बकर्या आणि शेळ्यांच्या मागे दबकत जायची कला तिला साध्य होती. किंवा, काही पाळीव कुत्र्यांनीही मालकांवर हल्ले केल्याचे आढळतात.
या संदर्भात, एका के-९ कुत्र्याचे प्रात्यक्षिक मी पाहिले आहे. या कुत्र्याला ड्रग्ज हुडकता येतात. जो पोलिस अधिकारी त्याला प्रशिक्षण देतो किंवा त्याची काळजी घेतो त्याच्या पायाशी हा कुत्रा प्रेमाने शांत बसला होता. जेव्हा या अधिकार्याने हाताला कडक वेष्टन घालून संरक्षित केले होते पण त्या वेष्टनाला ड्रग्जचा वास होता. त्याबरोबर त्या कुत्र्याचा कायापालट झाल्याप्रमाणे त्याने त्या अधिकार्याच्या हातावर हल्ला केला. त्या कुत्र्याला आवरायला दोनजण लागले आणि तरीही त्याने सोडवणूक करून ते वेष्टन खेचून काढले आणि चावून काढले. सर्व झाल्यावर पुन्हा गुमान अधिकार्याकडे जाऊन बसला परंतु त्या हल्ल्याच्या वेळी त्याचा आवेश घाबरवून टाकणारा होता.
नैसर्गिक प्रवृत्ती
बरोबर. ज्या प्राण्याचे नावच 'किलर' व्हेल आहे त्याने आक्रमकता दाखवल्यास त्यात नवल ते काय?
हरकत नसावी.
माझ्यामते जर प्रांण्यांना क्रूर वागणूक दिली जात नसेल तर अश्या खेळांना अपघात होत असले तरी हरकत नसावी. अपघातांचा हा बाऊ करणे चालले आहे असे वाटते.
इतर प्राणी हाताळणे/पकडणे वगैरे कसब हे नैसर्गिक नाहि तर प्रशिक्षणाचा भाग आहे आणि ते कसब/कला लुप्त होऊ देणे मानवजातीला परडवणारे नाहि.
शिवाय कितीतरी जमातींचे उदरभरण प्राण्यांशी संबंधित आहे. जसे मदारी, दरवेशी वगैरे.. अश्या खेळांवर बंदी आल्यास त्यांनी काय करायचे.
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
आश्चर्य
मदारी, दरवेशी प्राण्यांना क्रूर वागणूक देत नाहीत असे छातीठोकपणे सांगता येईल का? आणि क्रूर वागणूक याची व्याख्या कशी करायची? जे वन्य प्राणी आहेत म्हणजे डोमेस्टिक किंवा पाळीव प्राणी नाहीत त्यांना दावणीला बांधून नाचवणे, त्यांना त्यांचे नैसर्गिक अन्न न देता पोळी, पावांच्या तुकड्यांवर वाढवणे, नागांना सणाच्या नावाखाली दूध लाह्या खायला लावणे हे क्रूर नव्हे काय?
नाग पकडण्यासाठी गारुडी त्याच्या बिळात काठ्या घालून त्याला हुसकवतात त्याला जर प्रशिक्षण म्हणायचे असेल तर कठिण आहे.
पोटापाण्यासाठी आता अनेक उद्योग आहेत आणि ते करण्यासाठी जाती-जमाती पाहिल्या जात नाहीत तेव्हा अशा खेळांवर बंदी आणणे उत्तम आहे.
बंदी आहेच
शिवाय कितीतरी जमातींचे उदरभरण प्राण्यांशी संबंधित आहे. जसे मदारी, दरवेशी वगैरे.. अश्या खेळांवर बंदी आल्यास त्यांनी काय करायचे.
अशा बहुतेक प्रकारच्या खेळांवर आता कायद्याने बंदी आलेलीच आहे. सर्कशीतही काही ठराविक प्राण्यांचे खेळ दाखवण्यासच परवानगी आहे.
सन्जोप राव
हुई मुद्दत कि 'गालिब' मर गया, पर याद आता है
वो हर इक बात पर कहना, कि यूं होता तो क्या होता
वाईट वाटले
धोक्याची माहिती असतांना धोक्याशी लगट करणे म्हणजे जीव घालवणेच.
आम्ही पेपरात वाचलं त्यावरुन म्हणतो की, जर त्या व्हेलकडून पूर्वी असे अपघात झालेले होते तर,
पुन्हा त्याच व्हेलशी 'धोक्याचा चान्स' घ्यायचा मुर्खपणाच होता असे मला वाटते.
अहो, प्राण्यांचा काय भरवसा ! त्यांना कितीही शिकवले तरी ते आपल्या मूळ स्वभावाला कधी जातील
किंवा अनपेक्षित कृती करतील याची काय खात्री देता येते का ? नाही.
तेव्हा अशी कृती म्हणजे अपघाताला निमंत्रणच असे वाटते.
असो,
*सामान्य कुवतीच्या आणि असामान्य आकाराच्या/ शक्तिच्या प्राण्यांबरोबर खेळ करणे योग्य आहे का?
नाही.
अवांतर : अहो, आमच्याकडे पाळलेला कुत्रा आहे. खूप लाडात येतो. सांगितलेल्या आदेशाचे पालनही करतो
पण मला त्याच्या चाव्याची सतत भीती वाटतच असते. कधी कधी त्याचा चांगला मूड असूनही असा डेंजर पाहतो आणि दात काढतो की,
त्याच्यापासून दूर होण्याची हीच योग्य वेळ आहे असे आम्ही समजतो. कशाला रिस्क घ्यायची, हो की नाही ?
-दिलीप बिरुटे
पशुवैद्यकाला दाखवा
हाहाहाहाहाहाहाहा.
कधीकधीच डेंजर पाहत असल्यास काही नाही. पण खूप आक्रमक होत असल्यास. पशुवैद्यकाला दाखवा. टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढली की असे होते बहुधा. कधी कधी कॅस्ट्रेशनही करायला सांगतात व्हेटरनरी डॉक्टर.
सी वर्ल्डने घेतलेली खबरदारी
या अपघातानंतर सी वर्ल्डने घेतलेली खबरदारी येथे वाचता येईल.