हा काय प्रकार आहे?

वर्तमानपत्रातल्या नाटक-सिनेमाच्या जाहिराती आपण पाहतो ते कोणत्या थिएटरमधे कोणता शो किती वाजता आहे हे समजण्यासाठी. पण गेले काही दिवस 'लोकसत्ता'मधली "माय् नेम् इज् खान" ची जाहिरात वेगळ्याच कारणासाठी माझे लक्ष वेधून घेत्ये.

साधारणपणे सिनेमांच्या जाहिरातींत सिनेमाचं नाव व इतर तपशील, त्याचबरोबर कुठल्या थिएटरमधे त्याचे शो किती वाजता आहेत ही माहिती असते. त्यावरून ठराविक ठिकाणी किंवा ठराविक क्षेत्रात रोज किती शो होताहेत याचं ढोबळ गणित मांडता येतं. सर्वसाधारण सिनेमाच्या बाबतीत ही संख्या ५० ते १०० असते असं आढळून येईल.

शिवसेना व शाहरुखखान यांतील वादावादीमुळे "माय् नेम् इज् खान" चं प्रदर्शन १२ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर पडलं. त्याची १२ फेब्रुवारीच्या 'लोकसत्ता'मधली जाहिरात पाहिली तर या सिनेमाचे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, या परिसरात रोज सुमारे ७५० शो लावल्याचं दिसतं. १५ फेब्रुवारीच्या जाहिरातीतही रोज जवळपास तेवढेच शो लावले होते असं दिसतं. याच दिवशीच्या ('लोकसत्ता'तल्याच) जाहिरातीत याच परिसरात '३ ईडियट्स्' चे रोज ५० शो लावल्याचं दिसतं. २२ फेब्रुवारीच्या जाहिरातीत "माय् नेम् इज् खान"चे (त्याच परिसरात) रोज सुमारे ५०० शो लावल्याचं दाखवण्यात आलं आहे. एखाद्या सिनेमाचे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, परिसरात रोज इतके शो होणं शक्य आहे का? की शिवसेनेनी थांबवलेला सिनेमा कसा तुफान लोकप्रिय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या जाहिरातीतून केला गेला आहे? सिनेमाचे रेटिंग साडेतीन स्टार आहे असं कळतं.

आपल्याला काय वाटतं?

Comments

वाद होणार्‍या विषयाची उत्सूकता

'माय नेम इज...' या चित्रपटाचे उगाच वाद करुन महत्त्व आणि उत्त्पन्न वाढवले याच्याशी सहमत आहे.
आपली आकडेवारी पाहता 'थापा' मारण्यात जाहिरातीचा मोठा वाटा, उद्योग आहे. तेव्हा त्यात काही नवल नाही. आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही.

कोर्डे साहेब, आमच्या औरंगाबादेत मी जेव्हा 'माय नेम इज...' साठी थेट्रात गेलो तेव्हा थेटर जेमतेमच भरलेले होते. मला काही शाहरुखखान सहन झाला नाही. 'मीष्टर प्रेसिडेंट आय एम नॉट टेरीरीष्ट' इथपर्यंत चित्रपट पाहिला. बाकीचा चित्रपट पाहण्याची उत्सूकता सध्या तरी नाही.

चित्रपटाच्या निमित्ताने 'एस्पर्जर सिन्ड्रोम ' या आजारांची माहिती कळली. चित्रपटांमधून येणार्‍या वेगवेगळ्या आजारांची लाट कधी थांबेल कोणास ठाऊक ?

-दिलीप बिरुटे

प्रकाटाआ

.

चक दे!

चित्रपटांमधून येणार्‍या वेगवेगळ्या आजारांची लाट कधी थांबेल कोणास ठाऊक ?

क्रिकेट, हॉकी, फूटबॉल, तिरंदाजी, मॅरेथॉन वगैरे वगैरे खेळांतील पहिले स्थान आपण चित्रपटांत मिळवत नाही तो पर्यंत.

हा हा हा

>>क्रिकेट, हॉकी, फूटबॉल, तिरंदाजी, मॅरेथॉन वगैरे वगैरे खेळांतील पहिले स्थान आपण चित्रपटांत मिळवत नाही तो पर्यंत.

खरंय ! पण क्रिकेट, हॉकी, फूटबॉल, यावर पूर्वी प्रयोग झाले आहेत असे वाटते. फक्त तिरंदाजी, मॅरेथॉन, कबड्डी, खो-खो इकडे चित्रपट निर्माते वळले नाही वाटतं ! पण वळलेच तर माझी कल्पना अशी -

भारत आणि पाकची कबड्डीची म्याच असेल. गूण बरोबरीत झाले असतील. खेळ संपायला एक मिनिट बाकी असेल. पीच्चरचा हिरो मध्य रेषेपासून कब्बाड, कब्बाड... असे म्हणत पाकचा खेळाडू बाद करण्यासाठी पुढे सरकेल. इकडे महादेवाच्या मंदिरासमोर नटी [नटीला सोमवारचा उपवास असेल] भावगीत म्हणेल. सोसाट्याचा वारा सुटेल, आभाळ भरुन आलेले असेल, विजांचा लखलखाट होत राहील. महादेवाची पिडं, मंदिर तिरपे-तारपे हलायला लागेल. घंटानाद होईल. सर्व भारतीय आपापल्या देवदेवतांच्या प्रार्थना करत आहेत असे चित्र दाखवायचे, सर्वत्र प्रचंड अस्वस्थता दाखवायची. आणि नंतर पींडीवरील बेलाचे पान पडेल. [इथे महादेव प्रसन्न झाले असा अर्थ घ्यायचा] आणि तिकडे आपला हिरो एक गुण मिळवून आणेल. आणि मग 'जय हो'. नायक, नायिकेची भेट. असा सुखान्त शेवट करायचा. [ खूप पारंपरिक स्टोरी झाली वाटतं :( ]

-दिलीप बिरुटे
[रिकामा उपक्रमी]

वा!

एक छान विषयांतर! मजा आली वाचताना!

 
^ वर