संस्कृती विषयी विचार

हा मी नवीन चर्चेचा प्रस्ताव जरी सुरु करत असलो, तरी "वेदकालीन ज्ञानाची शास्त्रीय..." ह्या चर्चेतल्या काही संदर्भांवरून ही चर्चा पुढे सुरू करतोय.

मूळ मुद्दा असा होता की सुसंस्कृतपणा आणि शहरबांधणी (व त्यातील चातुर्य) ह्यांचा काय संबंध आहे. जो जेवढी मोठी सुव्यवस्थित शहरं आणि बांधकामं करेल तो जास्त सुसंस्कृत का?

तसं असतं तर बिल्डर लोकं सर्वात सुसंस्कृत मानली गेली असती (ह. घ्या.)!

मला आपली संस्कृती आवडते कारण त्यात कर्मयोगासारखे उत्तम तात्विक विचार आहेत, कालिदास, भास यांसारखे उत्तम कवी / लेखक आहेत, मनुष्यजातीच्या सुरुवातीपासून आजवर (जवळ जवळ ) अखंड चालत आलेला आणि कित्येक दिव्य पुरुषांनी आणि स्त्रियांनी सजवलेला इतिहास आहे, आणि निसर्गापासून दूर न जाता आजही वापरता येण्यासारखी आयुर्वेद, हठयोग, प्राणायाम यासारखी स्वास्थ्य टिकवायची साधनं आहेत. शिवाय निसर्गाशी निगडीत पण सुस्वास्थ्यानी आणि सहजतेनी राहण्यची एक शैली आहे, ती मला आवडते.

अर्थात आपल्या "संस्कृतीत" वाईट गोष्टीही अनेक आहेत, पण त्यांच्याकडे लक्ष देण्यात मला रस नाही.

मला फक्त एवढंच म्हणायचय, की कोण किती ऊंच महान राजांची थडगी बांधतय की कोण किती मोठमोठाल्ली शहरं बांधतय ह्यावरुन त्यांच्या संस्कृतीचं अनुमान बांधणं हा सुद्धा पाश्चात्य दृष्टीकोनच आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

मला वाटते

'संस्कृती' हा शब्द 'सिविलायझेशन' (उदा. सिंधू संस्कृती) आणि 'कल्चर' (आचारविचार, परंपरा इ.) या दोन्ही अर्थाने वापरला जात असल्याने असा गोंधळ होतो असे वाटते. शहरांची निर्मिती ही सिविलाझेेशनांच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी वापरता येऊ शकेल. अश्या समाजात माणसांनी शिकार/शेती याहीपुढे जाऊन व्यापार (व्यापाराच्या मार्गावर असलेल्या आणि व्यापाराला सोयीस्कर असणार्‍या ठिकाणांचे शहरात झालेले रूपांतर उ. इस्तंबूल किंवा 'सिल्क रूट' वरील शहरे) आणि सुनियोजित राज्यकारभार (राजधान्यांची शहरे, समाजगृहे, मंदिरे, शिल्पे इ.) इत्यादी क्षेत्रात प्रगती केली आहे असे म्हणता येऊ शकेल.

साहित्य, तत्त्वज्ञान, आचारविचार (निसर्गप्रियता इ.) या गोष्टी 'कल्चर' च्या अंतर्गत येतात त्यामुळे शहरांची निर्मिती, 'कल्चर' या अर्थाने वापरलेल्या संस्कृतीचे मूल्यमापन करण्यासाठी वापरता येणार नाही.

सहमत-सिविलायझेशन

'संस्कृती' हा शब्द 'सिविलायझेशन' (उदा. सिंधू संस्कृती) आणि 'कल्चर' (आचारविचार, परंपरा इ.) या दोन्ही अर्थाने वापरला जात असल्याने असा गोंधळ होतो असे वाटते. शहरांची निर्मिती ही सिविलाझेेशनांच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी वापरता येऊ शकेल.

सहमत.

मराठीत सिविलायझेशन आणि कल्चर या दोन्ही शब्दांसाठी मी संस्कृती हाच शब्द वापरते. वेगळे शब्द असल्यास कल्पना नाही. सिविल हा शब्द नागरीक, शहरे यांच्याशी संबंधित आहे.

सहमत

मला वाटते जेव्हा एखादी संस्कृती प्रगत होते, तेव्हा इतर कलांबरोबर वास्तुशास्त्रातही नवे प्रयोग होणे साहजिक आहे. युरोपमध्ये रेनेसांसबरोबर जी क्रांती आली तिचे पडसाद शास्त्र, साहित्य, संगीत याबरोबर वास्तुशास्त्रातही उमटले. हा एक परिणाम आहे, कारण नव्हे.

परिणाम / प्रमाण

हा मुद्दा महत्वाचा आहे. संस्कृतीच्या आवाक्याचा एक परिणाम म्हणून ह्या प्राचीन शहरांकडे बघणं ठीक आहे, पण त्यालाच संस्कृतीचं प्रमाण म्हणणं बरोबर वाटत नाही!

सुसंस्कृत

जो जेवढी मोठी सुव्यवस्थित शहरं आणि बांधकामं करेल तो जास्त सुसंस्कृत का?

सुसंस्कृत ही संकल्पना सापेक्ष आहे. कुठली संस्कृती चांगली हे ठरवावे कसे?

जो जेवढी मोठी सुव्यवस्थित शहरं आणि बांधकामं करेल (करवून घेईल) तो जास्त प्रगत/संपन्न असे म्हणता येईल.

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

सिविलाइझ्ड् सोसायटी

मानसशास्त्राचा पाया घालणारा सिग्मंड फ्रॉइड याने एके ठिकाणी असे म्हंटले आहे की
Repression is the price we have to pay for having a civilized society.
यावरून 'स्वतःच्या नैसर्गिक आक्रमक प्रवृत्ती नियंत्रणांत ठेवणार्‍या माणसांचा समाज म्हणजे सुसंस्कृत समाज (सिविलाइझ्ड् सोसायटी)' असा अर्थ निघतो.

भाषांतर

फ्रॉइड यांचे शब्द पाहता "सुसंस्कृत (?) समाजासाठी, (उपजत प्रवृत्तींच्या) दमनाची किंमत मोजावी लागते." असा काहिसा अर्थ वाटला. आपल्या भाषांतरात भासते ती व्याख्या अर्थाचा विपर्यास तर करत नाही ना?

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

उत्तर....

'तो' यांस
कृपया 'विपर्यास नव्हे व्यत्यास' या शीर्षकाखालील मजकूर पहावा.

विपर्यास नव्हे व्यत्यास

फ्रॉइडच्या विधानाचे शब्दशः भाषांतर आपण म्हंटल्याप्रमाणे 'सुसंस्कृत समाजासाठी उपजत प्रवृत्तींच्या दमनाची किंमत मोजावी लागते' असेच आहे. त्याचा व्यत्यास 'दमनाची किंमत मोजणार्‍या माणसांचा समाज हा सुसंस्कृत समाज असतो' असा होतो. फ्रॉइडच्या विधानावरून मी काढलेला अर्थ व्यत्यासाशी जुळणारा आहे.
आपणही जमेल तितके दमन करीतच असतो. त्यांत आपला हेतु इतरांनी (समाजांतील इतर सदस्यांनी) आपल्याला 'सभ्य' (सुसंस्कृत वर्तणूक असलेला) समजावे असाच असतो. हे लक्षांत घेतले तर फ्रॉइडच्या विधानावरून मी काढलेला अर्थ विपर्यस्त नाही असे दिसून येईल.

 
^ वर