विमा योजना:कोणती योजना चांगली?

आता नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. ह्या काळात गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधण्यास सुरुवात होते तेव्हा एक पर्याय आयुर्विम्याचा असतो. आयुर्विमा ही एक उत्तम गुंतवणूक आहे अशी चुकीची समजूत बर्‍याच मराठी कुटुंबात आढळते.

ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही तुमचे पैसे जेव्हा कुठेही गुंतवता, बचत करुन ठेवता, किंवा कोणालाही कर्जाऊ देता तेव्हा निश्चितच त्या रकमेचे व्याज म्हणून आपल्याला परत काही पैसे नक्कीच मिळाले पाहिजेत ही मनात असलेली धारणा. विम्याचा एक अ-लोकप्रिय प्रकार असलेल्या टर्म इन्शुरन्स मध्ये अर्थातच हे तत्त्व पाळले जात नाही.

टर्म इन्शुरन्स ही थोडक्यात तुम्ही विमा कंपनीबरोबर लावलेली एक पैजच आहे. मी मेलो तर तुम्ही मला (म्हणजे माझ्या वारसदारांना) अमुकतमुक पैसे द्यायचे आणि मी जगलो तर हप्त्याने भरलेले पैसे तुम्हाला.

मात्र खरं सांगायचं तर इन्शुरन्सचा हाच एकमेव प्रकार हा सर्वात स्वस्त आणि योग्य आहे.
काहीतरी परतावा मिळवण्याच्या हव्यासापोटी गुंतवणूकदार बर्‍याचदा "एन्डोमेन्ट" किंवा "कॅश बॅक" अशा परतावा देणार्‍या योजनांच्या मागे लागतात, आणि आपल्या पायावर धोंडा पाडून घेतात.

कसा?

एक उदाहरण घेऊ
श्री. सर्किट हे ३० वर्षाचे गृहस्थ आहेत.
त्यांना हवे असलेले विमा कव्हरः १० लाख
विमा योजनेचा कालावधी: १० वर्षे

आता या व्यक्तीसाठी टाटा एआयजी कंपनीच्या विविध प्रकारच्या विमायोजनांचे हप्ते आपण पाहूयात.

विमा योजना हप्ता कालावधी अखेरीस मिळणारा परतावा
टर्म इन्शुरन्स : (ऍश्युअर लाईफलाईन प्लॅन) ३५१० रुपये ० रुपये
कॅश बॅक : (ऍश्युअर सेक्युरिटी ऍंड ग्रोथ प्लॅन) १,५१,१५० रुपये ११००००० + ५००००० रुपये. *

थोडक्यात सर्किट यांनी कॅश बॅक योजनेऐवजी जर साधी सोपी टर्म इन्शुरन्स योजना घेतली असती तर त्यांना केवळ ३५१० रुपयांचा हप्ता भरावा लागला असता, व उरलेली १,४७,७४० रुपयांची गुंतवणूक त्यांच्या आवडीच्या इतर साधनांमध्ये करता आली असती.

समजा त्यांनी उरलेले पैसे १२००० रुपये प्रति महिना या दराने एचडीएफसी इक्विटी या म्युच्युअल फंडमध्ये १० वर्षे गुंतवले असते तर त्यांना दहा वर्षांअखेर मिळणारी रक्कम १,२०,३५,७२४ इतकी असती.

मात्र हेच पैसे त्यांनी कॅशबॅक योजनेद्वारे गुंतवले असते तर त्यांना साधारण १६००००० रुपये मिळाले असते. (वर दाखवलेले ११ लाख + ५ लाख रुपये बोनस पकडूयात) जे १,२०,३५,७२४ च्या तुलनेत अर्थातच अतिशय कमी आहेत.

कळाली का इन्श्युरन्स कंपन्यांची गंमत?

इन्श्युरन्स कंपन्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे?

तुम्ही इन्श्युरन्स कंपनीला देत असलेल्या हप्त्याची पूर्ण रक्कम गुंतवली जात नाही. तुम्ही भरलेल्या हप्त्याचे साधारण तीन भागात विभाजन होते
१. खर्च. (यामध्ये विमा प्रतिनिधींचे कमिशन, विमा वितरण व जाहिरातींचा खर्च इ. चा समावेश होतो)
२. मृत्यूनंतर द्यावयाची रक्कम
३. गुंतवणूक

यात पुन्हा "गुंतवणूक" मधील केवळ ८ ते १० टक्के रक्कम ही समभागांसारख्या जास्त परतावा देणार्‍या साधनांमध्ये गुंतवली जाते. त्यामुळे इन्श्युरन्स योजनांचा परतावा कमी असणे साहजिक आहे.

शिवाय कॅश बॅक सारख्या योजनांचा हप्ता हा खूप जास्त असल्याने तुम्हाला जितकी आवश्यकता आहे त्यापेक्षा कमी विमा घेण्याची शक्यताही वाढते.

उदा. श्री. नीलकांत या २६ वर्षाच्या तरुणाला १० लाख रुपयांच्या विम्याची १० वर्षापर्यंत आवश्यकता आहे. जर त्याने टर्म इन्श्युरन्स घेतला तर त्याचा वार्षिक हप्ता हा १९६४ रुपये येईल. मात्र परतावा काहीच मिळत नाही तेव्हा त्याच्या एजंटने सुचवल्याप्रमाणे त्याचे सर्व हप्ते योजनेअखेरीस परत करणार्‍या स्वधन या योजनेचा तो स्वीकार करतो.
मात्र आता त्याला १० लाख-१० वर्षे अशा विम्यासाठी १२७९१ रुपये हप्ता भरावा लागेल. जो जास्त वाटत असल्यामुळे शेवटी नीलकांत स्वधन योजनेच्या ५ लाख रुपयांच्या विमायोजनेचा स्वीकार करतो जेथे त्याला ६३९६ रुपये हप्ता असेल. मात्र हप्ता कमी करण्यासाठी त्याला आवश्यक असलेल्या १० लाखांऐवजी आता त्याला केवळ ५ लाखांचीच विमायोजना घ्यावी लागत आहे.

विमाप्रतिनिधींचे कमिशन हे तुम्ही भरत असलेल्या हप्त्यांच्या समप्रमाणात असते. तुम्ही जितका जास्त हप्ता भराल तितके जास्त कमिशन त्यांना मिळते. त्यामुळे अर्थातच अतिशय स्वस्त व योग्य अशा टर्म इन्शुरन्स ऐवजी विमाप्रतिनिधी हे "परताव्याच्या" भूलभुलैयात तुम्हाला अडकवून जास्त हप्त्याच्या कॅश बॅक योजना तुमच्या गळ्यात मारतात. तेव्हा तुमच्या विमाप्रतिनिधीचा व तुमचा प्राधान्यक्रम वेगळा आहे हे ध्यानात ठेवून तुम्हाला जी योग्य वाटेल ती टर्म इन्श्युरन्स योजनाच खरेदी करा.

टीप: या लेखामधील माहिती ही रेडिफ डॉट कॉम व व्हॅल्यू रिसर्च ऑनलाईन डॉट कॉम मधील काही लेखांचे भाषांतर आहे.
* येथे विमा कंपन्या देत असलेला टर्मिनल बोनस रुपये ५ लाख इतका गृहीत धरला आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

फार सुंदर लेख

माझ्या मते एल्. आय्. सी ची एखादी टर्म इंन्शुरन्स काढावी आणि बाकी पैसा म्युचुअल फंडात टाकावा हे मत् बरोबर् आहे.

माहितगार सदस्यांना युलिपबद्दल काय् वाटते तेही सांगा.

छान/काही शंका

योगेश, लेख छानच आहे. अर्थव्यवहार आणि गुंतवणूक याविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये उदासीनता दिसून येते अश्या लेखांमुळे या विषयांवर चर्चा होऊन ती काही अंशी दूर होईल अशी आशा वाटते.

दोन शंका आहेत.
१. टर्म इन्श्युरन्स मध्ये कालावधी अखेरीस मिळणारा परतावा शून्य रूपये असा लिहिला आहे याचा अर्थ कालावधी अखेरीस आपण हप्त्यांच्या रूपात भरलेली रक्कम आपल्याला परत मिळते पण त्या व्यतिरिक्त काही पैसे मिळत नाहीत असाच होतो ना? ("टर्म इन्शुरन्स ही थोडक्यात तुम्ही विमा कंपनीबरोबर लावलेली एक पैजच आहे. मी मेलो तर तुम्ही मला (म्हणजे माझ्या वारसदारांना) अमुकतमुक पैसे द्यायचे आणि मी जगलो तर हप्त्याने भरलेले पैसे तुम्हाला." या वाक्यामुळे माझा गोंधळ झाला. मी जगलो आणि विम्याचा कालावधी पूर्ण झाला की मी भरलेले पैसे मला परत मिळतात ना?)
२. आपण भरलेल्या हप्त्याचे खर्च, मृत्यूनंतर (मुदतीनंतर?) द्यायची रक्कम आणि गुंतवणू़क अश्या तीन भागात विभाजन होते, तर विमा कंपन्यांना कश्यातून नफा होतो?

केवळ उदा.

लेखात दिलेला विदा हा केवळ उदा. म्हणून घ्यावा :)

ओसामा अल्लाबरोबर आहे ही आतली खबर आहे का?

उत्तरे

यूलिप: युनिट लिन्क्ड इन्श्युरन्स प्लॅन ही म्युच्युअल फंड व इन्श्युरन्स यांची भेळ करुन ग्राहकांना मामा बनवण्यासाठी केलेली योजना आहे. गुंतवणुकीचे सर्वात उत्तम तत्त्व म्हणजे विमायोजना व गुंतवणूक यांची गल्लत न करणे. तुमच्या अंदाजपत्रकातील गुंतवणूक जितक्या साध्या-सोप्या आणि आपल्याला समजणार्‍या साधनांमध्ये कराल तितका समाधानकारक परतावा तुम्हाला मिळेल.
यूलिप सारख्या साधनांमध्ये तुम्ही देत असलेल्या रकमेपैकी किती रक्कम ही रोख्यांमध्ये व किती रक्कम ही समभागांमध्ये गुंतवणार हे सुस्पष्टरीतीने सांगितलेले नसते. तुमच्या हप्त्यांपैकी किती भाग हा विम्यासाठी व किती भाग हा गुंतवणुकीसाठी आहे हे कधीही स्पष्ट सांगितले जात नाही.
शिवाय विमायोजनेवर आधारित गुंतवणूक योजनांमध्ये तुमची तथाकथित गुंतवणूक ही विमायोजनेच्या कालावधीइतका वेळ तुम्हाला वापरण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे लिक्विडिटीचाही प्रश्न निर्माण होतो.
यूलिपसारख्या योजनांमध्ये विमाप्रतिनिधीला सुरुवातीचा काही काळ २५ टक्क्यांपर्यंत गलेलठ्ठ कमिशन दिले जाते, हे कमिशन विमाकंपन्या तुमच्या हप्त्यांमधूनच वसूल करतात.

तेव्हा विमायोजना व गुंतवणूक यांची गल्लत न करता. साधीसोपी टर्म इन्श्युरन्स योजना व दरमहा गुंतवणूक करण्यासाठी उत्तम म्युच्युअल फंड निवडणे हिताचे आहे.

शशांक यांची शंका:
१. टर्म इन्श्युरन्स मध्ये तुम्ही देत असलेल्या हप्त्यांपैकी एकही रुपया तुम्हाला योजनेअखेरीस मिळत नाही. हा तोटा नसून फायदाच आहे कारण या योजनेसाठी लागणारा हप्ता हा योजनेअखेरीस सर्व प्रिमियम परत करणार्‍या योजनेच्या हप्त्यापेक्षा खूपच कमी असतो व ही रक्कम विमा कंपनीला देण्याऐवजी तुम्ही एखाद्या गुंतवणूक साधनात गुंतवू शकता.

योजनेअखेरीस तुम्ही भरलेला प्रीमिअम परत करणार्‍या योजनेची तुलना आपण सोप्या टर्म इन्श्युरन्स योजनेशी करुया. येथे विमायोजनेचा कालावधी व आवश्यक असलेले विमा कव्हर जर सारखेच आहे असे गृहीत धरले तर...

विमा योजना वार्षिक हप्ता योजनेअखेरीस परत मिळणारी रक्कम
एसबीआय लाईफ इन्श्युरनस शिल्ड (टर्म इन्श्युरन्स) २०४३ ० रुपये
एसबीआय लाईफ : स्वधन (प्रीमिअम रिफन्ड) १३८१६ सर्व प्रीमिअम परत. १३८१६० रुपये

येथे २०४३ रुपयांचा हप्ता असणारा टर्म इन्श्युरन्स घेऊन उरलेली ११७७३ रुपये ही रक्कम दरमहा १००० रुपये अशा प्रकारे एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतवली तर विमायोजनेच्या तुलनेत हमखास चांगला परतावा मिळेल.

२. विमा कंपन्यांना होणारा नफा हा तुम्ही देत असलेल्या हप्त्यांच्या गुंतवणुकीतून मिळणार्‍या परताव्यामधूनच होतो. तुम्हाला आश्वासन दिलेला परतावा व विमा कंपन्यांना होणारा फायदा यात मोठी तफावत आहे. विमा कंपन्या कधीही ६ टक्क्यापेक्षा जास्त परताव्याची हमी देत नाहीत. जर जास्त फायदा झाला तर तुम्हाला मिळेल अशी लालूच दाखवतात. मात्र ह्या कंपन्यांनी अगदी कॉन्झर्व्हेटिव्ह अशा डेट/गिल्ट योजनांमध्ये जरी पैसे गुंतवले तरी सद्यस्थितीमध्ये वार्षिक १० टक्क्यापर्यंत फायदा सरळसरळ होऊ शकतो. समभागात जर पैसे गुंतवले तर अर्थातच जास्त परतावा मिळेल.

मराठी टंकलेखनासाठी वापरा

धन्यवाद!

योगेश, स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद! माझी समजूत भलतीच चुकीची होती तर! "मुदतीअखेरीस भरलेली रक्कम परत" योजनांपेक्षा टर्म योजना चांगल्या हे पटण्यासारखे आहे. फक्त योग्य विनियोग किंवा गुंतवणू़क करता आली पाहिजे. टर्म योजनांऐवजी मु.भ.र.प. योजना ग्राहकांना विकल्याने विमाप्रतिनिधींना काही आर्थिक लाभ होतात का?

अर्थातच

विमाप्रतिनिधींचे कमिशन हे तुम्ही भरत असलेल्या हप्त्यांच्या समप्रमाणात असते. तुम्ही कमी विमा कव्हरसाठी जितका जास्त हप्ता भराल तितके जास्त कमिशन त्यांना मिळते. हे एकदा ध्यानात ठेवले की एजंट लोक जास्तीत जास्त प्रीमिअम असणार्‍या योजनांचाच पुरस्कार नेहमी का करतात हे सहज लक्षात येईल.


मराठी टंकलेखनासाठी वापरा

धन्यवाद/गुंतवणुकीचे पर्याय

धन्यवाद योगेश!
योगेश आणि इतर अनुभवी सदस्यहो, टर्म योजना स्वीकारल्यास उरलेल्या रकमेची गुंतवणूक करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि प्रत्येक पर्यायात परतावा/जोखीम किती आहे यांची माहिती (वेळ मिळेल तेंव्हा) दिल्यास सर्वांना मार्गदर्शक होईल.

कर सवलत

लोक विमा योजनांकडे कर सवलतीसाठी उपयुक्त म्हणून त्यात पैसे टाकतात. मग टर्म इन्शुरन्स मध्ये गुंतवून उरलेले पैसे टॅक्स सेवर् फंड मध्येही टाकू शकतो.

नाहीतरी योगेश म्हणतो तसे विमा कंपन्या आपले पैसे घेउन् स्वतः कुठेतरी गुंतवतात. आणि येणार्‍या परताव्यातली मामूली रक्कम आपल्याला देतात. त्यापेक्षा आपल्या भविष्याची काळजी २ हजार वर्षिक हप्ता देऊन मिटवायची आणि वारसदारांसाठी फंड किंवा इक्विटीमध्ये(समभाग) पैसे गुंतवायचे.

ही वेल्थ क्रिएशन मधली पहिली पायरी ठरो.

योगीभाय आपला अभ्यास चांगला आहे या विषयाचा. :-)

अभिजित

धन्यवाद

गुंतवणू़क कशी, कुठे करावी याचा गेले बरेच दिवस विचार करते आहे. अभ्यासपूर्ण माहिती आयतीच समजली. धन्यवाद योगेश.

ज्यांच्या मासीक उत्पन्नाची शाश्वती नाही

लेखाबद्दल आभार,
ज्यांच्या मासीक उत्पन्नाची शाश्वती नाही, म्हणजे मासीक हप्ता१०,००० वा १००० रु भरू शकतो की नाही याची मला कल्पना नाही, कदाचीत मी त्यापेक्षा जास्त भरू शकेल किंवा पुढिल २-३ महिने काहीही हप्ता भरू शकणार नाही अशा माझ्यासारख्यांसाठी गुंतवणूकीचे कोणते पर्याय आहेत.
शेअर बाजार, अर्थव्यवस्थेतील चढ-उतार यांच्या भानगडीत पडणारा मी नाही किंवा मला त्यातलं कळत नाही अश्या माणसाने डोळे झाकून गुंतवणूक करावी म्हणून काही पर्याय उपलब्ध आहेत का?

उत्तर

जर मासिक उत्पन्नाची शाश्वती नसेल तर येईल तशी रक्कम ही अल्पकालीन योजनांमध्ये गुंतवून त्यातील एक ठराविक भाग प्रतिमहिना दीर्घकालीन समभागाधारित योजनांमध्ये गुंतवणे योग्य ठरेल.
विविध गुंतवणूक साधनांची माहिती एका लेखमालेद्वारे येथे देण्याचा विचार आहे त्यात बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील असे वाटते.

मराठी टंकलेखनासाठी वापरा.

शानभाग यांचे विचार

योगेश यांचा लेख उद्बोधक आहे. बहुतेक लोकांच्या मनात आयुर्विम्याविषयी ज्या चुकीच्या कल्पना असतात त्यांचे अशा प्रकारे वारंवार निराकरण केले गेले पाहिजे असे मला वाटते.
मी स्वतः श्री. ए. एन्. शानभाग यांच्या "वंडरलँड ऑफ इन्वेस्टमेंट" या पुस्तकावरून खूप काही शिकलो, त्यातले एक प्रकरण आयुर्विम्यासंबंधात आहे. त्यातील काही मुद्दे खाली देत आहे.
१. विमा ही एक अशी वस्तू आहे की ती आपण विशिष्ट हेतूने विकत घ्यायची असते, त्यासाठी काही खर्च करावा लागतो . म्हणून तिच्यापासून फायदा होईल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.
२. विमा व बचत यांची गल्लत करू नये. विमा कंपन्या ही गल्लत गिर्‍हाइके मिळवण्यासाठी मुद्दाम करतात, याला आपण फसता कामा नये.
३. विमा आवश्यक आहे की नाही, नक्की किती आवश्यक आहे याची तपासणी केल्याशिवाय तो घेणे योग्य नाही. अनावश्यक असताना वाटेल तेवढ्या रकमेचा विमा घेतल्यास फायद्याऐवजी तोटाच होतो. शानभाग यांच्या शब्दात सांगायचे तर "भविष्यकाळाच्या तरतुदीसाठी आपण वर्तमानकाळाचे नुकसान करून घेतो"
४. किती रकमेचा विमा घ्यावा याचे गणित करता येते. त्यासाठी
अ- आपली एकूण मालमत्ता किती याचा आधी हिशोब करून घ्यावा.
ब- मग आपल्यामागे जे लोक आपल्या उत्पन्नावर अवलंबून आहेत त्यांना खर्च किती येतो/येईल याचा हिशोब करावा (यासाठी सध्या आपल्या स्वतःवर येणारा खर्च वगळला पाहिजे हे लक्षात घ्यावे). भविष्यकाळात काही खर्च एकरकमी येणार असतात त्यांचाही समावेश करावा. [जे आपल्या उत्पन्नावर अवलंबून नाहीत (उदा. मिळवती मुले) त्यांच्यासाठी तरतूद करण्याचा विचार या हिशोबात करू नये. विमा ही गोष्ट गरज भागवण्यासाठी असते, कोणासाठी एखादे घबाड किंवा वारसा ठेवण्यासाठी नसते हे ध्यानात असू द्यावे.]
क- आपल्या मालमत्तेची रक्कम गुंतवून तीवर येणार्‍या/येऊ शकणार्‍या व्याजा/उत्पन्नापेक्षा हा खर्च कमी की जास्त आहे ते पहावे.
ड- खर्च कमी असेल तर विम्याची गरज नाही. पण सहसा असे होत नाही. मग जेवढी तूट येत असेल ती भरून काढण्यासाठी म्हणजे तेवढे भरीचे उत्पन्न मिळण्यासाठी (गुंतवणूक करण्यायोग्य) किती रक्कम हवी ते काढून तितक्याच रकमेचा विमा घ्यावा.
हे जमत नसल्यास जेवढी रक्कम आपण विम्यासाठी बाजूला काढू शकतो तिच्यामध्ये जास्तीत जास्त किती रकमेचा विमा मिळू शकेल तो घ्यावा.
ई- विमा ही विकत घेण्याची वस्तू असल्याने ती कमीत कमी खर्चात घेतली पाहिजे. यासाठी योगेश यांनी केलेले मार्गदर्शन विचारात घ्यावे. प्रतिनिधींनी केलेल्या रसभरीत वर्णनामुळे कितीही मोह झाला तरी तर्काने जे पटते त्याचाच अवलंब करावा, केवळ विमाप्रतिनिधींच्या सल्ल्यावर अवलंबून राहिल्यास खड्ड्यात पडण्याची शक्यताच जास्त. याबाबतीत व्यक्तिशः कोणावरही टीका करायची नाही पण, विमाप्रतिनिधी आपल्या नात्यातला वा ओळखीचा असल्यास अधिक सावध राहण्याची आवश्यकता असते असे नम्र निवेदन करू इच्छितो.

- दिगम्भा

उत्तम माहिती

दिगम्भा, आपल्या प्रतिसादाने माहितीत छान भर टाकली आहे.

तात्या अभ्यंकरांचे विचार

या विषयावर आपल्या तात्या साहेबांचे विचार काय आहेत हे अजून कळलं नाही.
तात्या आपण जरा बोलाल का या विषयावर?

पल्लवी

सवडीने..

या विषयावर आपल्या तात्या साहेबांचे विचार काय आहेत हे अजून कळलं नाही.
तात्या आपण जरा बोलाल का या विषयावर?

आम्ही या बाबतीतले आमचे मतप्रदर्शन सवडीने करू,

आपला,
(भारतीय आयुर्विमा महामंडळाचा दलाल) तात्या.

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

विमा उतरवताना...

योगेश,

तुम्ही दिलेली माहिती खरोखरच खूपच अभ्यासपूर्ण आहे परंतु -

१. टर्म इन्शुरन्ससाठी ठरवून दिलेली महत्तम वयोमर्यादा ही इतर विमायोजनांच्या मानाने अत्यंत कमी आहे. ३० वर्षाच्या इसमाऐवजी ६० वर्षाच्या इसमाचे उदाहरण घ्यावे म्हणजे लक्षात येईल.
२. वेळेत प्रिमियम न भरू शकल्यास टर्म इन्शुरन्स तिथेच संपतो आणि त्यादरम्यान विमाधारकाच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास काहीही मिळत नाही. तेच जर इतर विमायोजनेद्वारे विमा उतरवलेला असेल तर १ महिना अधिक मिळतो विलंबाकारासहित पैसे भरण्यासाठी. या दरम्यान विमाधारकाच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास उरलेले प्रिमियम विलंबाकारासहित भरून त्यास पूर्ण परतावा मिळतो.
...

विमाप्रतिनिधीला विम्याच्या प्रकारानुसार पहिल्या वर्षी ५% ते ४०% कमिशन मिळते हे खरे आहे पण पहिला हप्ता भरल्यानंतर विमाधारकाने पुढील हप्ते भरलेच नाही तर तो विमा कंपनीचा निव्वळ तोटा असतो कारण पहिल्या तीन वर्षींचे प्रिमियम हे निव्वळ ऍडमिनिस्ट्रेटिइव्ह खर्च करण्यातच खर्च होतात.

सर्व दिग्गजांनी विमा उतरवताना पूर्वग्रहदूषीत असू नये म्हणून 'विमा व बचत यांची गल्लत करू नये' असे सांगितले ते अगदी बरोबर आहे पण त्यांनी असे सांगितलेले नाही की जर कुठल्या कंपनीच्या कुठल्या योजनेंतर्गत तुम्हास या दोहोंचा सुवर्णमध्य साधता येत असेल तर तसे करू नये. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता असे म्हणावेसे वाटते की आपल्यापाशी उपलब्ध द्न्यानाचा, पैशाचा पुरेपुर वापर करून आणि आपल्या गरजा ठरवून जी योजना फायदेशीर वाटेल तीमध्ये पैसे अडकवावे.

- वेदश्री.

विमा कंपन्यांची कार्यपद्धती

मला अजूनही विमा कंपन्यांची कार्यपद्धती कळालेली नाही. कृपया यासंदर्भात अधिक मार्गदर्शन् करावे.
आणि, टर्म इंशुरन्समध्ये शेवटी काहीच रक्कम का बरे परत मिळत नाही?
अनिरुद्ध दातार

टर्म इन्शुरन्स

टर्म इन्शुरन्स हा ठराविक् कालावधीकरता काढलेला असतो. त्या कालावधीत जर् विमाधारकाला काही झाले तरच इन्श्युरन्सची रक्कम परत मिळते. पण कालावधीनंतर काही झाले तरी रक्कम मिळत नाही. टर्म इन्शुरन्स हा एक हेजिंग चा प्रकार आहे. तसाच मेडिक्लेम ही असाच हेजिंग चा प्रकार आहे. विमाधारकाला काही झाले तर त्याच्या कुटुंबाला कोण बघणार हा उद्देश ध्यानात घेऊन अश्या योजना काढल्या जातात.
पण माझ्या मते, मी परतावा मिळणा-या योजनांमध्ये गुंतवणूक करीन. त्याकरता अत्ता जास्त रक्कम भरावी लागली तरी हरकत नाही पण कालांतराने ती एकरकमी परत मिळेल याची तरी हमी असते.
मी एल.आय.सी. ची जीवन आनंद ही योजना घेतली आहे. त्यात कलावधी संपल्यावर जेवढ्या रकमेचा विमा काढलाय तेवढी मला परत मिळणार आणि माझ्या मृत्युपश्चात माझ्या 'नोमिनी' ला माझ्या विम्याच्या एवढीच रक्कम पुन्हा मिळणार.

विमा आणि आंतरराष्ट्रीय प्रवास

विमा आणि आंतरराष्ट्रीय प्रवास: या विषयावर कोणी माहिती देऊ शकेल का? आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करताना विमा सोबत असणे बंधनकारक आहे हा अनुभव आहे. आज पर्यंत याबद्दल अंधानुकरण झालेले आहे. कारण त्याबद्दल जास्त काही ज्ञान नव्हते. हा विमा का सोबत असावा लागतो? त्याचे फायदे तोटे काय आहेत? कोणी त्याचा गैरवापर करू शकते का? भारतात असे विमा कोणत्या कंपन्या विकतात? इत्यादी बद्दल कोणी तज्ञ माहिती देईल का?


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

टर्म इंशुअरन्स

एल्.आय्.सी. ची 'जीवन अमृत' ही नवीन योजना आली आहे. कृपया या योजनेची माहिती मिळवा. अधिक माहिती साठी संपर्क साधा:
kvc_123@rediffmail.com cell No: 09822248471

विमा की बचत?

माहीती छान आहे- वाचुन आनंद, विमा व बचत यातील फरक सांगितल्या बद्द्ल धन्यवाद!

 
^ वर