शिवसेनेचा पोपट
मुंबई म्हणजे आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखी वेठीस धरणार्या ठाकरे कुटुंबियांचे वर्चस्व संपायच्या मार्गाला आले आहे का? शिवसेनेच्या भाकड धमक्यांना आणि पोकळ गर्जनांना भिक न घालता दिल्लीकरांनी मुंबई गाजवली अश्या बातम्या हे त्याचे द्योतक असावे. लोकसत्ता मधील बातमी :
शिवसेनेचा पोपट!
एकेकाळी बाळासाहेबांनी आवाज दिल्यावर बंद होणाऱ्या मुंबईत आज शिवसैनिकांची पार गोची झाली. जवाहरलाल नेहरू यांना मराठी माणसाने फिरू न दिल्याची आठवण ‘सामना’मधून देऊनही राहुल गांधी यांनी चक्क अंधेरी ते घाटकोपर लोकलने प्रवास करून शिवसेनेचा मुंबईत ‘आवाज’च बंद करून टाकला.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा कार्यभार सांभाळल्यापासून शिवसेनेतील आक्रमकपणा संपल्याचे बोलले जात होते. गेल्या काही दिवसांतील घटना पाहता शिवसेनेच्या तिखटजाळ मटणाच्या रश्शाचे अळूचे फदफदे झाल्याचे स्पष्ट होत आहे. नारायण राणे सेनेतून बाहेर पडल्यावर राणेंच्या कार्यकर्त्यांनी ‘बघता काय रागाने..’ म्हणत असा काही ढोस सेनेला दिला की, शिवसैनिकांमधील सगळे अवसान गळले होते. त्यानंतर राणे यांनी शिवसेनेच्या विरोधात चालून आलेल्या प्रत्येक संधीचा फायदा उठवत त्यांना पुरेपूर नामोहरम केले.
राज ठाकरे बाहेर पडल्यावर शिवसेनेला आणखी मोठा धक्का बसला. राज ठाकरे यांनी मनसेची निर्मिती केल्यानंतर मनसे आक्रमक होत असताना हे अळवावरचे पाणी आहे, काही दिवसांतच उडून जाईल, असे सेनेचे नेते बोलत होते. प्रत्यक्षात उलटेच घडले. मनसेने विधानसभेत १३ जागा निवडून आणल्या. या पाश्र्वभूमीवर सत्ता तर दूरच राहिली पण सेनेचे विरोधी पक्षनेतेपदही गेले. त्यानंतरही उद्धव यांच्या आसपासचे एकदोनतीन राऊत आणि गोऱ्हे वगैरे मंडळींनी प्रसारमाध्यमांमधून सेनेचा आक्रमकपणा जिवंत असल्याचा संभ्रम पेरणे सुरुच ठेवले.
मात्र गल्लीतील मराठी तरुणाला हा बदल चांगलाच कळत असल्यामुळे मनसे वाढत असताना शिवसेनेला ओहोटी लागल्याचे चित्र स्पष्ट होत गेले. निवडणुकीत दगडू सकपाळ लालबागमध्येच पडल्याने सेनेला मोठा हादरा बसला होता. नेमक्या या सगळ्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने पारंपरिकरित्या प्रसारमाध्यमांना लक्ष्य करण्याचे योजले आणि आयबीएन लोकमतवर हल्ला चढवला. मात्र घडले विपरितच. त्या हल्ल्यातही शिवसैनिकांनाच टाळकी फोडून घ्यावी लागली होती.
Comments
बरं मग?
लोकसत्ता मधली बातमी जशीच्या तशी देण्यामागे काय विचार आहे? (खरं म्हणजे काय् गरज आहे?)
का कॉपी-पेस्ट कसं करावं याची प्रॅक्टीस चालली आहे?
बातमीमधली भाषा (पोपट्?) तर अगदीच शाळकरी आहे..नशीब "शिवसेनेचा पचका पचका.." असा मथळा दिला नाही.
हेच म्हणतो
हेच म्हणतो. यात चर्चा प्रस्तावासारखे काय आहे? आणि नक्की कशाची चर्चा करायची आहे? असो.
हो
मुंबई म्हणजे आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखी वेठीस धरणार्या ठाकरे कुटुंबियांचे वर्चस्व संपायच्या मार्गाला आले आहे का?
हो
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)