न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टी

आपल्याकडे न्यायदेवता म्हणून हातात तराजू घेतलेल्या व डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या स्त्रीची मूर्ति असते. न्यायदेवता स्त्री असल्यामुळे आरोपीच्या सौंदर्यामुळे तिचं लक्ष विचलित होऊन त्याचा न्यायदानावर परिणाम होऊ नये म्हणून तिच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते असं काहीसं स्पष्टीकरण पूर्वी ऐकल्याचं आठवतं.

मध्यंतरी मलेशिया सिंगापूर पर्यटनास गेलो असता तिथल्या गाझ्डनी भारतीय न्यायदेवतेच्या मूर्तीचा उल्लेख करून असं संगितलं की सिंगापूरमधल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली नसते कारण तिनी डोळे उघडे ठेवून न्यायदान करावं अशी तिथल्या लोकांची अपेक्षा असते.

यावरून काही प्रश्न मनात येतात. एक म्हणजे आपल्याकडे डोळ्यावर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेची कल्पना पुरातन काळापासून आहे का? की ही कल्पना आपण आक्रमक राज्यकर्त्यांकडून घेतली? तसे असेल तर सिंगापूरप्रमाणे आपणही न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढायला काय हरकत आहे?

लेखनविषय: दुवे:

Comments

थेमीस

आपल्याकडे डोळ्यावर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेची कल्पना पुरातन काळापासून आहे का?

नाही, आपल्याकडे ही कल्पना पुरातन काळापासून नसावी. आपल्याकडे ती ब्रिटिशांबरोबर आली असावी.

ही कल्पना आपण आक्रमक राज्यकर्त्यांकडून घेतली?

स्वतः ब्रिटिशांनी ही कल्पना ग्रीको-रोमन संस्कृतीतून घेतली असावी. थेमीस ही न्यायदानाची ग्रीक देवता, जस्टिशिया या रोमन देवतेपासून लेडी जस्टीस उदयास आली असावी.

तिच्या डोळ्यांवर पट्टी या कारणास्तव बांधली जाते. आरोपीचे सौंदर्य ही त्यातील फक्त एक क्षुल्लक बाब आहे. थेमीसच्या डोळ्यांवर पट्टी नसते. जस्टिशियाच्या डोळ्यांवर ती नंतर बांधली गेली असावी.

भारतात न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढून घ्यावी अशी परिस्थिती अद्याप आलेली नाही असे वाटते.

अवांतरः


न्यायदेवता स्त्री असल्यामुळे आरोपीच्या सौंदर्यामुळे तिचं लक्ष विचलित होऊन त्याचा न्यायदानावर परिणाम होऊ नये म्हणून तिच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते असं काहीसं स्पष्टीकरण पूर्वी ऐकल्याचं आठवतं.

हे बाकी भारी आवडले. :-) स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त चवचाल असल्याने त्यांचे लक्ष विचलित होण्याचा संभव अधिक आहे की स्त्रियांना सौंदर्याची जाणीव पुरुषांपेक्षा अधिक असते असे यावरून सांगायचे आहे का ते नेमके कळले नाही परंतु तिरके विधान मला अधिक विश्वासार्ह वाटल्याने ;-) लेखातील वाक्य फारच आवडले.

अरोपीकडे पाहून नव्हे तर कायद्यानुसार

भारतात न्यायदेवतेच्या प्रतीकात्मक मुर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधण्याचे लेखात दिलेले कारण नव्याने ऐकले.
न्यायदान हे आरोपीच्या किंवा न्याय मागणाऱ्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा आर्थिक दर्जाला न पाहता कायद्यानुसार पुराव्यांवर लक्ष केंद्रीत करूनच दिले जाते. न्याय देणाऱ्या यंत्रणेला आरोपी अथवा न्याय मागणारा यांच्या कडे असणारी संपत्ती, त्यांची राजकीय शक्ती तसेच त्यांचे समाजातील स्थान या व इतर तत्सम बाबी नजरेआड करून पुराव्यांनुसारच न्यायदान करावे लागते, नव्हे ते तसे केले जावे हा संदेश देण्याहेतूने प्रतिकात्मक न्यायदेवतेच्या डोळ्यावर प्रतिकात्मक पट्टी बांधलेली आहे.

न्यायदेवतेच्या डोळ्यावरली पट्टी.

न्यायदेवतेच्या डोळ्यावरली पट्टी.

हा विषय तसा वादग्रस्त वाटणारा नसावा, परंतु बार-रूम मध्ये अधून मधून चर्चेत येत असतो. काही लोकांच्या मते न्यायदेवतेस 'आंधळी' करणारी ही पट्टी आहे. ही पट्टी विलायतेतून आलेली आहे, मात्र ती आपण स्वीकारलेली नाही. आरंभापासूनच आंग्ल न्यायनिर्णयपद्धतीस आपल्याकडे विरोध होत आलेला आहे. आजही विरोधक आहेतच. ही न्यायनिर्णयपद्धती भारतीयांवर लादण्यात आली असावी अशी शंका घेण्यास रास्त वाव आहे.

आरोपीची समाजातील पत, स्थान, मुख्य म्हणजे राजेराजवाड्यांतील उठबस ह्याकडे लक्ष वेधले जावून न्यायदानावर परिणाम होऊ नये हा उद्देश त्यामागे आहे. श्री. बाबासाहेब (जगताप) ह्यांनी त्याबाबत विस्तृतरीत्या लिहिले आहेच!

भारतीय न्यायशास्त्राच्या मूलभूत सिद्धांतांनुसार धर्म-न्यायशास्त्र हे राजापेक्षाही मोठे असे असल्यामुळे दण्डनीतिसमोर आरोपीस मूल्य शून्य. ह्यामुळे न्यायदेवतेने डोळसपणे निर्णय करणे भारतीय न्यायशास्त्रास अपेक्षित आहे. अर्थात्, तसे किती होते, किती नाही हाही प्रश्न न्यायशास्त्राभ्यासाच्या कक्षेत यावयास हवा, तर त्या सिद्धांतांस काही अर्थ आहे.

आरोपीचे सौंदर्य हा युक्तिवाद मात्र श्री. बाबासाहेबांप्रमाणे मीही पहिल्याप्रथमच ऐकण्यात येतो आहे!

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

 
^ वर