दारू पिण्यास कारण की....

आजच्या वर्तमानपत्रांमध्ये एक रोचक बातमी आली आहे.

हायकोडताने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नसल्याने दारू पिऊन वाहन चालवल्यास पोलीसांनी कडक शिक्षा करू नये (समजून घ्यावे) असे सांगितले आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था चांगली नसणे आणि दारू पिऊन गाडी चालवणे याचा संबंध कोडताने कसा जोडला ते समजत नाही. परंतु ते दारू पिऊन गाडी चालवण्यास 'पुरेसे कारण' आहे सुचवले आहे.
यातून काही प्रश्न निर्माण होतात.

१. मुंबईची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था चांगली नसल्याचे कोडताने प्रमाणित केले आहे. बाकीच्या शहरांतील वाहनचालकांनी दारू पिऊन गाडी चालवण्यासाठी कोडताचे प्रमाणपत्र आणावे लागेल का?
२. प्रमाणपत्रे देण्याची व्यवस्था कोडतात केली आहे की त्या त्या शहरातील बार मध्ये ती मिळू शकतील? (या प्रमाणपत्रांविषयक प्रोसिजरची अधिसूचना लवकरच सरकारतर्फे काडली जाईल असे वाटते...)
३. पुणे, ठाणे वगैरे शहरांतील चालकांनी तर 'फुल टाईट' होऊन गाडी चालवायला हरकत नाही. कारण जितकी वाहतुक व्यवस्था वाईट तितकी जास्त दारू प्यायला हरकत नसावी.
४. आता ३१ डिसेंबरला पोलीस कोणाला पकडू शकणार नाहीत.
५. काही बड्या धेंडांवर नशेत गाडी चालवून फूटपाथवरील लोकांना चिरडल्याचे खटले चालू आहेत. ते आता खुनाचे खटले म्हणून न चालवता किरकोळ (अदखलपात्र) गुन्हे म्हणून चालवावे लागतील (चालवता येतील).

जय हो !!!!!

या चर्चेने हायकोडताचा अपमान (कण्टेम्प्ट ऑफ कोर्ट्) होतो का त्याचा खुलासा हैयो हैयैयो आदि वकिलांनी करावा.
उपक्रमाला तसे वाटल्यास चर्चा उडवून टाकावी.

नितिन थत्ते.

लेखनविषय: दुवे:

Comments

'उच्च' निर्णय

खरेच की काय! हा निर्णय देताना उच्च न्यायालय पिऊन 'उच्च' (हाय) झाले होते की काय? बार असोसिएशनच्या कार्यालयात व न्यायमूर्तींच्या एँटीचेंबरमध्ये काय काय घडते हे जाणून घ्यायला आवडेल.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हे सर्व

हे सर्व पकडला गेला तर...
प्रत्येक वाहनचालकाने दारु प्याली आहे काय? हे व्यावहारिकदृष्ट्या तपासणे शक्य नाही. उन्मादाच्या भरातील वाहन चालवणे हे केवळ दृष्टीने देखील समजु शकते. तोंडाचा भकाभका वास येत असताना तपासणीसाठी ब्रेथ अनालायझर वापरणे म्हणजे विनोदच!
प्रकाश घाटपांडे

सार्वजनिक वाहतूक

फारच छान! ज्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली असेल त्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत सहप्रवासी आल्यास आता त्याला समजून घ्यावे लागणार असे दिसते. जेथे अशा व्यवस्थेचे बारा वाजलेले आहेत, तेथे तर लोकांना पिऊन गाड्या चालवण्याला ला कोर्टाची परवानगीच नव्हे तर उत्तेजनच आहे, असे दिसते. उत्तम!
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

पब्लिक ट्रान्सपोर्ट

'सार्वजनिक वाहतुक व्यवस्था' चा अर्थ पब्लिक ट्रान्स्पोर्टेशन असा तर नाही? तसा असल्यास, दारू प्यायल्यानंतर बस वा तत्सम सार्वजनिक वाहनातून प्रवास शक्य/योग्य प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे त्या व्यक्तीस स्वतःच वाहन चालवण्याव्यतिरिक्त इतर पर्याय नाही, म्हणून कडक शिक्षा करू नये असे सांगितले असू शकते. आता ह्यात तथ्य किती, हे योग्य किती वगैरे वेगळे मुद्दे.

मलाह् तोच अर्थ वाटतो

मलाही तोच अर्थ वाटतो. समजा दारु पिल्यावर वाहन् चालवु नये हे मला मान्य आहे. परंतु मला माझ्या घरापर्यंत नेण्यास सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम नाही अशावेळी मी काय करावे अशा अर्थाचे ते प्रातिनिधिक वक्तव्य असावे.
या किती प्रमाणात प्यावी हा मुद्दा गौण आहे.
प्रकाश घाटपांडे

कायतरीच.

अहो मग सार्वजनिक वाहन व्यवस्था चांगली होईपर्यंत दारू पिऊच् नये हे चांगले नाही का?

असो. मग सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारेपर्यंत विना-लायसन्सही गाडी चालवायला परवानगी द्यावी.

नितिन थत्ते

बार असोसिएशन

वकिली व्यवसायासंदर्भातील बार असोसिएशन व तत्सम शब्द न्यायमूर्तींनी भलतेच गंभीरपणे घेतलेले दिसत आहेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कडक शिक्षा

सर्वप्रथम हायकोर्टाने काहीच निर्णय घेतलेला दिसत नाही. फक्त खालच्या कोर्टाने परत खटला चालवावा असे म्हणले आहे. तसेच शिक्षा करण्यापासून पोलीसांना रोखलेले नाही पण किती करावी या संदर्भात मात्र विचार करावा असे म्हणले आहे. असे म्हणायचे कारण त्यांना जो प्रश्न विचारला आहे त्या संदर्भात कायद्याच्या चौकटीत जे सांगणे शक्य आहे ते त्यांनी सांगितले असे दिसते.

आता कडक शिक्षेबाबतः

मध्यंतरी येथील थँक्सगिव्हींग च्या वेळी एनपीआरवर ऐकत असताना न्यूयॉर्क राज्यातील नवीन कायदा ऐकला. एका दारू पिऊन गाडीचालवणार्‍या बाईमुळे काही मुले दगावली हे कारण... या नवीन कायद्याप्रमाणे आता जर मागे मुले असताना पोलीसाने केवळ अडवले आणि गाडीचालकाची चाचणी घेतली आणि दारू प्यायल्याचे लक्षात आले तर त्याचे तात्काळ लायसन्स जप्त होणार (होऊ शकते). जर लहानसा (थोडीफार इजा) अपघात झाल्यास १५ वर्षापर्यंत आणि मोठा अपघात (मृत्यू) २५ वर्षे तुरूंगवास भोगावा लागू शकेल. अर्थात याचा अर्थ मागे लहान मूल नसताना पण दारूच्या नशेत जर पकडले (ड्रायव्हर असताना/पोलीस असताना नव्हे ;) ) तर् सोपे असा नाही.

बाजूच्या गावातील, केंब्रिज मॅसॅच्युसेट्स मधील राज्य प्रतिनिधी (आमदार) दारूच्या नशेत एका गाडीस धडक मारून पळून गेला. अर्थात त्याचा गुन्हा सिद्ध झाला. एका पेक्षा अधिक वेळेस हा प्रकार झाल्याने त्याचे लायसन्स जप्त झाले आहे. त्याला सर्व स्टेट कमिटीज् वरून राजीनामा देणे भाग पडले आहे. त्याला काही दिवस सक्तीने घरात ठेवून दारू पिण्यापासून (कायद्याने) वंचीत करण्यात आले. अर्थात हा शेवटचा भाग त्याने पाळला नाही आणि आता अधिक शिक्षा झाली आहे... :-(

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पुन्हा खटला

खटला पुन्हा चालवण्याचा निर्णय दिला आहे म्हणजेच आत्ताची शिक्षा रद्द केली आहे.

खटला परत चालवायला सांगितला आहे कारण लायसन्स रद्द करण्याची शिक्षा 'फार जास्त' आहे असे 'मत व्यक्त केले आहे. म्हणजे खालच्या कोर्टाने लायसन्स रद्द करण्याची शिक्षा देऊ नये (दिल्यास आणि कन्व्हि़क्टने परत अपील केल्यास ती रद्द केली जाईल असे अप्रत्यक्षपणे सुचवले आहे.

(पुन्हा खटला चालवण्याचे कारण आरोपीला बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही हे आहे. जसे काही अशा ट्रॅफिकबाबतच्या खटल्यांमध्ये आरोपीला कोर्टात बोलूही दिले जात नाही हे हायकोर्टाला "आत्ताच नव्याने कळले" किंवा "फक्त याच खटल्यात" आरोपीला बाजू मांडण्याची संधी दिली नाही असे हायकोर्टाला वाटते आहे)

नितिन थत्ते

 
^ वर