उदय प्रकाश

आज श्री. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या निधनानिमित्त अनेक लोकांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली वाहिली , चित्र्यांच्या व्यक्तीत्वाच्या आणि लिखाणाच्या आठवणी काढल्या. यात हिंदी लेखक श्री. उदय प्रकाश यांचाही समावेश आहे. (उदय प्रकाश यांनी वाहिलेली श्रद्धांजली.)

या निमित्ताने उदय प्रकाश यांच्या लिखाणाच्या आठवणी निघाल्या. हिंदीतला उत्तम दर्जाचा हा लेखक मी वाचला मात्र मराठीमधे. "तिरीछ आणि इतर कथा" या नावाने त्यांच्या निवडक कथा मराठीमधे प्रकाशित झालेल्या आहेत.

हा कथासंग्रह प्रकाशित व्हायच्या आधीच त्यांची "पॉल गोमरा का स्कूटर" नावाची कथा मी मराठी मधे वाचली होती. या कथेचा मनावर झालेला संस्कार अजूनही आठवतो. प्रस्तुत टिपण हे या आठवणींच्याच नोंदी आहेत असे म्हणता येईल.

पन्नासच्या दशकामधे उत्तर प्रदेशात जन्माला आलेल्या आणि दिल्लीमधल्या एका सरकारी कचेरीमधे काम करणार्‍या एका मध्यमवयीन माणसाला नव्वदीच्या दशकामधे आलेले अनुभव असे या कथेचे सरळसोट् वर्णन करता येईल. परंतु, या साध्याशा घटनेच्या निमित्ताने उदयप्रकाश सद्य काळामधे झपाट्याने बदलणार्‍या जगामधे सामान्य माणसाच्या मूल्यव्यवस्थेमधे झालेली उलथापालथ नोंदवतात. बदलत्या वास्तवाचे , त्या बदलाच्या वेगाचे, या सार्‍या वेगात सामान्य माणसाच्या उडालेल्या गोंधळाचे चित्रण करतात.

"रामगोपाल सक्सेना" नावाचा हा गोंधळलेला , हिंदी कवितांवर प्रेम करणारा माणूस असा गोंधळलेला आहे. काळाने रोखलेल्या शिंगाला तो भिडू शकत नाही. आपल्या देशी, कुठलीही बहुपदरी ओळख नसलेल्या आपल्या व्यक्तित्त्वाचा या आधुनिक जगतामधे मेळ घालता यावा म्हणून दोन निर्णय घेतो . एक म्हणजे आपल्या "रामगोपाल" या नावाचा त्याग करून "पॉल गोमरा" असे नाव घारण करणे आणि परवडत नसतानाही एक स्कूटर विकत घेणे ! कधीही चालवता न आलेल्या स्कूटरमागे त्यांची झालेली धूळाधाण आणि एकंदरच नव्या जगाचा आणि त्या जगात आपल्या अस्तित्वाचा अर्थ समजून न आल्यामुळे शेवटी इतरांना वेडे वाटेल अशा अवस्थेपर्यंतचा त्यांचा प्रवास आणि त्यांचा मृत्यू हाच या कथेचा गाभा.

अत्यंत गंभीर , प्रसंगी जीवघेण्या अशा घालमेलीचे चित्रण कराताना त्यांची शैली एकाच वेळी व्यंगात्म असते आणि त्याचबरोबर करुणेने ओतप्रोत भरलेली. आपल्या चालू काळाचे अनेक स्नॅपशॉट् घेतल्यासारखी भेदक , चित्रदर्शी शैली. या शैलीची या कथेपुरती झलक पाहू :

"... म्हणजे ते कामचुकार होते असंही नव्हतं. ते अतिशय कष्टाळू होते. प्रूफ रीडींग, ले आउट् ची कामं झपाटून एखाद्या भुताप्रमाणे करत. इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. पण वर्तमानकाळ मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर होता.....खूप परिश्रमपूर्वक एकाग्रतेने ते सद्यस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न करत, पण तोवर ती परिस्थिती बदलून जातसे. खासकरून गेल्या दहा वर्षांत तर पाहता पाहता सर्व जग बदलून गेलं होतं. त्यांचं वर्तमानपत्रच मोनोप्रिंटींगह्या भूतकाळातून निघून फोटो-कंपोझिंगमधे जाता, आता पूर्णपणे कंप्यूटराईज्ड् होऊन गेलं होतं. पापणी लवण्याच्या आत पानंच्या पानं सॅटेलाईट् प्रक्षेपणाद्वारे दिल्लीहून मुंबई, अहमदाबादला जाऊन पोचत. जाड भिंगांचा चष्मा घातलेले, चिमटीने टाईप जुळवून एकेक अक्षर मात्रा जुळाविणारे विड्या फुंकणारे म्हातारे कंपॉझिटर्स् नाहीसे झाले होते...."

"पॉल गोमरांच्या नजरेला दिसणारं दृष्य आणि त्यांच्या मेंदूतले विचार यातली तर्कसंगतीच गडबडून गेली होती. संन्यासी वातानुकुलित गाडीतून तीर्थयात्रा करत होते आणि एनाराय् धनाच्या सहय्याने कारसेवा करत होते. एक तांत्रिक आंतरराष्ट्रीय शस्त्रबाजारात खरेदीविक्रीत दलाली करत होता.आणि पन्नास वर्षे एका झाडावर मकाण बांधून राहिलेल्या एका बाबाच्या पायाच्या अंगठ्याची धूळ मस्तकाला लावण्यासाठी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं मंत्रिमंडळ रांग लावून चिखलात उभं होतं..."

...." हे दोन्ही निर्णय हिंदी कवी पॉल गोमराच्या आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे निर्णय होते. आणि प्रतिकात्मरीत्या या दोन्ही निर्णयांचा परीघ अतिशय विस्तृत होता.त्यांना या युगाचे अगणित संदर्भ होते.."

"..पॉल गोमरांची स्कूटर अजूनही शांतिवनाशेजारच्या दर्यागंज ट्राफिक पोलिसांच्या आवारात मागल्या बाजूला मोडतोड झालेल्या अवस्थेत पडलेली आहे. त्या दुर्घटनाग्रस्त स्कूटरच्या बॉडीवर विक्षिप्त पॉल गोमरांच्या रक्ताचे डाग आहेत. जे सुकून् काळे पडले आहेत.

आणि त्या स्कूटरच्या डिकीत पॉल गोमरांच्या कवितेची एक डायरी अजून् पडून आहे. तिच्या शेवटच्या पानावर लिहिलं आहे :
लुप्त होत आहेत ज्या प्रजाती
वास्तव नष्ट करतंय त्यांचं अस्तित्त्व
होता नये आपण त्यांच्या हत्येत सामील
आणि शक्य झाल्यास जपून ठेवायला हव्यात
त्यांच्या प्रतिमा....
या प्रतिमा स्मृतिचिन्हे आहेत पूर्वकाळाची....."

Comments

उदय शंकर आणि पॉल गोमरा यांची ओळख

उदय शंकर आणि पॉल गोमरा यांची ओळख उत्तम.

प्रतीकात्मक कथा लिहायची वार्ताहारी शैली, अथवा वास्तवकथानकी शैली ही विसाव्या शकतातील हिंदी सामाजिक व्यंग्य-लेखनातली खासियत असावी. अशा प्रकारची शैली कृशन चंदर किंवा हरिशंकर परसाईसुद्धा मोठ्या खुबीने वापरतात. (माझे हिंदी वाचन फारच तोकडे आहे - अन्य लोकांनी साम्यस्थळांची चर्चा करावी, म्हणून ही नावे पेरली आहेत.)

पुनश्च उदय शंकरांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

उदय प्रकाश

उदय प्रकाश यांच्या प्रतिभेचा छान अल्पपरिचय. हिंदीत खरोखरच काही लक्षणीय साहित्यिक आहेत. आजही काही जण छान लिहिताहेत. हरिशंकर परसाई तर ग्रेटच आहेत. त्यांचे 'जैसे उनके दिन फिरे' नावाचे पुस्तक वाचले. मजा आला. उपरोध किती अचूक वर्मी लागणारा असू शकतो. ते परसाई वाचल्यावर कळते. सध्या सर्वश्रेष्ठ हिंदी हास्य-व्यंग कथा वाचतोय. मस्त आहेत. काहींची शैली तर फारच मस्त आहे. फणिश्वरनाथ रेणुंच्या कथांचे पुस्तक आणलंय हा माणूसही ग्रेट होता. वातावरण निर्मिती इतकी सुरेख असते की यंव रे यंव. मजा येते.

उदय प्रकाश यांच्या 'त्या' ब्लॉगचे स्वैर रूपातंर येथे आहे.

(भोचक)
रविवार पेठ नि कुठेही भेट !

आभारी.

उदय प्रकाश यांची ओळख करुन दिल्याबद्दल आभारी...!!!

हिंदीतील मोजक्याच लेखकांची नावे सांगता येतील, वाचन मात्र काहीच नाही. :(

-दिलीप बिरुटे

 
^ वर