शब्दचित्रे
शब्दचित्रे
चित्रे काढणे हा मानवाचा आदीछंद. हजारों वर्षांपूर्वीपासून माणुस चित्र काढतो आहे. जगभरच्या गुंफांमधून त्याने काढलेल्या चित्रांचे नमुने आपणास पहावयास मिळतात. भोपाळजवळचे भीमबेटका हे त्यातले एक. आदिवासी चित्रकला अजून त्या चित्रांचे बोट धरूनच भिंती सुशोभित करते. ( या दोहोंमधले साम्य पुढे केंव्हातरी एकत्र बघू).तर ही चित्रकला किंवा चित्र काढण्याची उर्मी म्हणू, आता माणसाच्या जीवनाच एक भागच झाला आहे. आठवत, आपण लहानपणी सगळ्यांनी काढलेले एक चित्र ? तीन शंकूसारखे एकमेकाला चिकटलेले डोंगर, एका दरीतून उगवणारा अर्धा सूर्य,त्याची अर्धवट (सारखी नसलेली) किरणे, वेडीवाकडी नदी, त्यातील होडी ( ती शीडाचीच पाहिजे), त्यातला नावाडी. तो बहूदा होडीपेक्षा मोठाच असावयाचा, काठाने जाणारी लहानशी पायवाट, एक वाकडे नारळाचे झाड, झाडावर तीन-दोन असे पाचच नारळ.....अजून आठवले की एक लहानसे हास्य ओठावर फुलते ! आपण निरागस बालपणात जातो आणि तेथून बाहेर पडताना विचार करू लागतो..अरे, हे चित्र मी काढले, वर्गातील सगळ्यांनी काढले, धाकट्या भावाने काढले , हो, आपल्या मुलीनेही काढले ! ही लहानशी आठवण आनंद देते आणि एखाद्याला आनंद मिळत असेल तर तो देण्याचा प्रयत्न करणारा दुस्रराही जन्माला आलेला असतो. कवी-लेखक आपल्य प्रतिभेने, रंग-कुंचला न वापरता, एक चित्र तयार करतात आणि तुम्हाला वाचण्याकरिता, पहाण्याकरिता नाही, तुमच्यासमोर ठेवतात. शब्दचित्र ! चित्रातल्या रेखा, रंगछटा, पोत, वातावरण, .... ते शब्दसामर्थ्याने तुमच्यासमोर उभे करतात. चित्रकाराचा फलक लहान-मोठा असतो, यांचे काव्यही. चित्रकार रंग फिके-गडद निवडेल, हे शब्दांच्या अर्थातील छटा. चित्र पाहून तुम्हाला उल्हास वाटावा, उदास वाटावे, आंतरिक शांतता लाभावी,... जो जो चित्रकाराचा उद्देश असेल तो तो आपल्या काव्यात आणावयाचा प्रयत्न कवी करतो. चित्र सरळधोपट असेल वा अमूर्त (Abstract); कविताही तशीच. तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा म्हणून चित्रकार मोकळ्या जागा सोडतो, कवी शब्दांमध्ये जागा सोडतो. व एका बाबतीत तर शब्दचित्र चित्रापेक्षा प्रभावशाली ठरते; चित्र तुम्ही नेहमी बरोबर ठेवू शकत नाही, पाठ केलेली कविता कुठेही, केंव्हाही तुमच्या बरोबरच असते.
तर अशी ही शब्दचित्रे.ती पद्यात असतील वा गद्यात.ती निसर्गवर्णन करतील वा व्यक्ती-रेखन. "पाहुणेर" मध्ये वा बदामीवरील अरुणा ढेरे यांच्या लेखात ही चित्रे कशी उठावदारपणे समोर येतात हे आपण पाहिलेच होते. . मला आवडलेली मी देणार आहे, आपणही सक्रीय भाग घ्या.आज सुरवात एका साध्या, शालेय कवितेपासून करणार आहे.शालेयच कां ? तर शब्दचित्रांची ओळख तेथूनच होते. "लहान माझी बाहुली ". "आजीचे घड्याळ", "फुलपाखरू, छान किती दिसते", सर्व शब्दचित्रेच आहेत. इंग्रजी वाङ्मयात कशी सुरवात करतात ते माहित नाही पण बघावयाला नक्कीच आवडेल.
श्रावणमासी
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फ़िरुनी ऊन पडे !
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे !
झालासा सुर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर, उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे !
उठती वरती जलदावरी अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा !
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुन येती अवनीवरती ग्रहगोलचि एकमते !
फडफड करुनि भिजले आपुले पंख पाखरे सावरिती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती !
खिल्लारे ही चरती रानी,गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पावा गात तयाचा श्रावणमहिमा एकसुरे !
सुवर्णचंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवरळा
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला !
सुंदर परडी घेउनी हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती !
देवदर्शना निघती ललना हर्ष माइना हृदयात
वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावे श्रावणमहिन्याचे गीत.
भा.रा. तांबे
केवढा विस्तीर्ण पट कवीवर्यांनी आपुल्यासमोर उलगडला आहे ! हिरवळ, इंद्रधनुष्य, पिवळे ऊन. संध्याराग, बगळ्यांची रांग, गोप आणि त्याच्या गाई, केवडा - पारिजातकासारखी फुले, ओले पंख फडफडवणारी चिमणी, काही काही बाकी ठेवले नाही. slide show मध्ये निरनिराळी दृष्ये एकामागून एक समोर यावीत तशी ही सर्व उभी रहातात. पण चित्रांइतकेच महत्वाचे आहेत त्यांना जोडून आलेले संदर्भ. इंद्रधनुष्य पाहिल्यावर मनाच्या चक्षुवर उमटते मंगल तोरण; बगळ्यांबरोबर समोर येतात ग्रहगोल आणि पारिजात दिसला की सत्यभामेचा रोष ! परडी आता नाहिशी झाली म्हणावयास हरकत नाही पण अजून आमच्या कोकणातल्या घरी अजून तीतच फुले गोळा करतात. मला भावते शेवटची ओळ. श्रावण महिन्याचे गीत पुस्तकात वाचण्याकरिता नाही : ते वाचावे देवदर्शनाला निघालेल्या, हर्षभरीत ललनांच्या वदनावर ! का बात है !!
शरद
Comments
श्रावणमासी
माफ करा ही कविता बालकवींची आहे.
नितीन
बालकवी
अगदी बरोबर. खरे म्हणजे चूक पहिल्यांदी कोण शोधतो याचीच उत्सुकता होती. धन्यवाद, नितीन. चला, एक कळले. उपक्रमवासी काळजीपूर्वक वाचतात. लिहणार्याचा उत्साह वाढविणारी झुळुक.
शरद
बालकवींच्या कविता...
>>खरे म्हणजे चूक पहिल्यांदी कोण शोधतो याचीच उत्सुकता होती.
तुम्हीच दुरुस्ती कराल म्हणून वाट पाहात होतो.
नाही तर, माझाच नंबर पहिला होता. :)
-दिलीप बिरुटे
[नंबर दुसरा]
भा. रा. तांबे
भा. रा. तांबे म्हटले की 'रे हिंदबांधवा, थांब या स्थळी ही कविता आठवते.
रे हिंदबांधवा, थांब या स्थळी - भा. रा. तांबे
रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराकमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रु ll
तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मी बाई मूर्त महाकाली ll १ll
घोडयावर खद्दां स्वार्,
हातात नंगि तलवार,
खणखणा किरत ती वार,
गोर्याची कोंडी फोडीत, पाडीत वीर इथें आली ll २ ll
कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या, पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll
मिळतील इथें शाहीर,
लववितील माना वीर,
तर, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फु टतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll
पुन्हा भा.रा....
गुराख्याचे गाणे
कुरणावरती वडाखाली गाई वळत बैसतो
स्फटिकापरि निर्मळ हा खळखळ झरा वाहतो
पावा फुंकुनि मंजुळ नादें रान भरुनि टाकितो,
आनंदाने डोळे भरता प्रभुजिला प्रार्थितो
गाईमागे रानोमाळी शीळ भरित हिंडतो
दर्यादर्यातून रान ओ।अलावरी मौज मारितो.
अशी एक दीर्घ कविता आहे. रानावनात गुरे चारणारा गुराखी
काय काय करतो. त्याचे वर्णन कवी करतो.
-दिलीप बिरुटे
अजून काही शब्दचित्र
शब्दचित्र म्हणाल तर बालकवींच्या कवितेत कितीतरी ठिकाणी शब्दचित्र दिसतील.
खेड्यातील रात्र, पारवा,जीर्ण दुर्ग, इत्यादी.
ग्रामीण कवितेत [जानपद गीतात ]'गस्तवाल्यांची गीते आणि निवडक कविता' यात ग.ह.पाटील यांच्या कवितांचा उल्लेख मुद्दामहून करतो...
गस्तवाल्याने पाहिलेली स्वारी. या कवितेतील वर्णन पाहा.
पुनवेचा माथ्यावरुनी ढळला खाली चांद
गावातुनी घालून आलो गस्तीची साद
धर्माजी वेस्कर माझ्या संगे जोडीदार
गावशिवेवरुन गेलो ओलांडून पठार
चांदण्यात बहिरोबाचे डोले शुभ्र निशाण
दीपमाळ काळीकाळी पुढती भ्रग्र भयाण
सामोरा घारकड्याचा भव्य अहा विस्तार
बसला की पंख उभारुन विशाल कोणी घार. १
किंवा 'वटराज' कवितेत पाहा.
विशाल भुज वटराज आपुले मार्गी विस्तारुनी
गावशिवेची राखण करितो पारावर राहूनी
गर्द साउलीखाली त्याच्या जुन्या समाधी किती
अवकाळ्या रात्री न कुणीही फिरके त्याभोवती. २
'शिवनेरीवर' नावाची कवितेत...
ती शरदामधील रम्य पहाट
मी शिवनेरीची चालत वाट
ये रानजाईला शुभ्र बहार
झुळझूळ सुगंधी वाहत वात
दहिवरात शीतल भिजले पाय
ये धुंद धुक्याची रांगत लाट
'लेण्यांद्री' अंधुक दृष्टिपथात
अन् पश्चिमेस तो 'नाणेघाट'३
अजून खूप कविता आहेत.
संदर्भ १. गस्तवाल्यांची गीते आणि निवडक कविता.(ग.ह.पाटील) संपादन: मंदा खांडगे. पृ.क्र.३१.
२. - तत्रैव- पृ.क्र.४२
३. - तत्रैव-पृ.क्र. ५४
टॅग बंद
श्री बिरुटे टॅग बंद करायला विसरू नका.
तत्रैव, इबिड वगैरे.
तत्रैव वरून कित्त्याची आठवण झाली. इबिड(इबाइडेम या लॅटिन शब्दाचे संक्षिप रूप) याला संस्कृतमध्ये जसा तत्रैव हा प्रतिशब्द आहे, तसाच आणि त्याच अर्थाचा फारसीतून मराठीत आलेला शब्द म्हणजे कित्ता. त्यामुळे हे दोनही शब्द मराठीत ’इबिड’करिता वापरता येतात. अर्थ इंग्रजीसारखाच--सदरप्रमाणे, जिथून पूर्वीचे अवतरण घेतले आहे तिथूनच.--वाचक्नवी
छान
उत्तमोत्तम चित्रदर्शी कविता येथे वाचता येतील. मजा येत आहे.
गोदा गौरव
चंद्रशेखर यांचे गोदा गौरव खंड काव्य याच प्रकारात येते.
सातवीत किंवा आठवीत असताना त्यातला काही भाग अभ्यासाला होता, आता सर्व आठवत नाही.
त्यानंतर येणारे गंगेच्या पुराचे वर्णन :
नितीन
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे भवताप हरी|
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
..."तुज हृदयंगम घाट विहंगम, भाट सकाळी आळविती
....
हे असे हवे:
तरु तीरीचे तुजवरि वल्ली पल्लव चामर चाळविती|
तुझ्या प्रवाही कुंकुम वाही बालरवी जणुं अरुणकरी|
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे भवताप हरी|
स्वभावोक्ती
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
गद्यात ज्याला शब्दचित्र म्हणतात त्याला कवितेत स्वभावोक्ती म्हणतात.त्यात दृश्याचे यथार्थ वर्णन असते.ते वाचून वाचकाच्या डोळ्यांसमोर ते दृश्य उभे राहाते.अनेक निसर्गकवितांत स्वभावोक्ती अलंकार दिसतो.बालकवींची "औदुंबर"(ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन.."कविता स्वभावोक्तीचे उत्तम उदाहरण आहे.यात एकाच दृश्याचे स्थिरचित्रण आहे.(श्रावणमासी मधे अनेक चित्रांची सरमिसळ आहे.)
स्वभावोक्तीचे रामायणातील एक उदाहरण असे:
गायन्ति केचित् प्रहसन्ति केचित् ।
नृत्यन्ति केचित् प्रणमन्ति केचित् ।
पठन्ति केचित् प्रचरन्ति केचित् ।
प्लवन्ति केचित् प्रलपन्ति केचित् ।
..मोजक्या सोप्याशब्दांत वाल्मीकीने उभे केलेले शब्दचित्र.प्रत्येकाने यथाकल्पना त्यात रंग भरावे.
(मारुती सीतेचा शोध लावून परतला.सीतेची सुटका करण्यासाठी लंकेवर स्वारी करायची असे राम आणि सुग्रीव यांनी ठरविले.आता आपल्याला लंकेत जायला मिळणार आणि राक्षसांशी युद्ध करायला मिळणार या कल्पनेने सर्व वानरांना अत्यानंद झाला.आणि:...)
काहीजण गाणी म्हणू लागले (गायन्ति).कित्येकजण मोठमोठ्याने हसतच सुटले.(प्रहसन्ति).कित्येक जण एकमेकांना सलाम ठोकू लागले.(प्रणमन्ति). काहीजण(मंत्र) पठण करू लागले.(हे बहुधा भित्रे असावे).कित्येकजण नुसते इकडून तिकडे हिंडू लागले.(प्रचरन्ति).कित्येकजण उड्या मारू लागले. (प्लवन्ति).तर काहीजण तोंडाला येतील ते प्रलाप(आता दाखवतोच एकेकाला! मी एकटाच त्या रावणाला कसा झोडपतो ते नुसते पाहात राहा! असे काहीतरी)बडबडू लागले.(प्रलपन्ति).
अहाहा
सुंदर
___________________________________
गॉड् बोलणे हा यशाचा बेअरर् चेक् आहे
त्यामुळे मी कुणाशी क्रॉस होत नाही.
माघातील मुंबई
शालेय शब्दचित्रांचा विषय आणि मर्ढेकर नाहित असे कसे होईल? त्याची माघातली मुंबई एकेक शब्दांच्या कुंचल्याच्या फराट्यांनी डोळ्यांसमोर उभी रहाते...
न्हालेल्या जणू गर्भवतीच्या
सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई
माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल
अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळुनी दोन्ही
पितात सारे गोड हिवाळा !
डोकी अलगद घरे उचलती
काळोखाच्या उशीवरुनी
पिवळे हांडे भरून गवळी
कवाड नेती, मान मोडूनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे
काळा वायू हळूच घेती
संथ-बिलंदर लाटांमधुनी
सागर-पक्षी सुर्य वेचती
गंजदार, पांढर्या नि काळ्या
मिरविती रांगा अन नारिंगी
धक्क्यावरच्या अजुन बोटी
साखारझोपेमधी फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल
गरम चहाचा पट्टी गंध
कुठे डांबरी रस्त्यावरच्या
भुर्या शांततेचा निशिगंध
ह्या सृष्टीच्या निवांत पोटी
परंतु लपली सैरवैरा
अजस्त्र धांदल, क्षणात देईल
जिवंततेचे अर्घ्य भास्करा
थांब! जरासा वेळ तोवरी -
अचेतनांचा वास कोवळा;
सचेतनांचा हुरूप शीतल;
उरे घोटभर गोड हिवाळा!
कवी : बा.सी.मर्ढेकर
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
गणपत वाणी
गणपत वाणी ही बा.सी. मर्ढेकरांची अजुन एक कविता. हि कविता छान पैकी वक्तिचित्र शब्दातुन प्रकट करते.
गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नसुतीच काडी;
महणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;
मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.
गि~हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्य गिळत,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;
स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.
गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.
काडे गणपत वाणयाने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदवै रुतली आणिक रुतली.
काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानातल्या जमीनीस त्या
सदवै रुतल्या आणिक रुतल्या.
गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
दवे दतसे जन्मांधाला.
विंदा करंदीकर
विंदा करंदीकरांना विसरून कसे चालेल?
देणार्याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
हिरव्या पिवळया माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरूनी
छातीसाठी ढाल घ्यावी
सायंकाळची शोभा
पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर
झाडांनी किती मुकुट घातले डोकिस सोनेरी
कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी
हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे, चहुंकडे हिरवे गालीचे
शेवटच्या दोन ओळीत-
पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा
कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा.
सुर्य मावळतीला जातांना निसर्गाचं सुंदर दृष्य डोळ्यासमोर उभं करावं ते भा.रा.तांबेंनी.
-दिलीप बिरुटे
गुराख्याचें गाणें - भा.रा.तांबे
गुराख्याचें गाणें (इ. स.१९०२) - भा.रा.तांबे
कुरणावरती वडाखालती गाइ वळत बैसतों
स्फटिकापरि निर्मळ हा खळखळ झरा जवळ वाहतो.
पावा फुंकुनि मंजुळ नादें रान भरुनि टाकितों,
आनंदानें डोळे भरतां प्रभुजीला प्रार्थितों.
गाईंमागें रानोमाळीं शीळ भरत हिंडतों,
दर्यादर्यांतुनि रान-ओहळावरी मौज मारितों.
उन्हाची भीती कवणाला ?
पाउस काय करिल मजला ?
भितों मी कोठे थंडीला ?
श्रीमंतापरि गरिबा कोठे वारा तो दुखवितो ?
देवाजीवरि सदा हवाला टाकुनि मी राहतों.
तृषा लागतां नीर झर्याचें ओंजळिनें मी पितों,
क्षुधा लागतां कांदाभाकर यथेच्छ मी जेवितों.
फिरतां फिरतां करवंदें हीं तोडुनि मी भक्षितों,
काठीनें मी कांटे दाबुनि बोरेंहि तोडितों.
धनिका ताट रुप्यांचें जरी,
पांचहि पक्वान्नें त्यावरी,
नाहीं गोडि मुखाला परी.
गाईंसंगें हिंडुनि रानीं थकुनि सुखें जेवितों,
जाडें भरडें खाउनि धनिकाहूनि अधिक तोषतों.
पुच्छ उभारुनि थवा गाइंचा ज्या वेळीं नाचतो,
मोरमुगुटबन्सीवाल्यापरि उभा मौज पाहतों.
ओहळावरी थवा तयांचा पाणी जेव्हां पितो,
उभा राहुनी प्रेमें त्यांना शीळ अहा घालितों !
कशाला मंदिल मज भरजरी ?
घोंगडी अवडे काळी शिरीं,
दंड करिं गाइ राखण्या, परी
कुवासना घालिति धिंगा तो महाल मी टाकितो
गाईंसंगें हवेंत ताज्या नित्यचि मी राहतों.
क्रोध, काम, मद, मत्सर यांही गांव सदा गर्जतो
दूर टाकुनी त्यांस शांतिनें सुखें दिवस लोटितों.
समाधान हा परिस अहा ! मज रानांतचि लाभतो,
दुःखाच्या लोहास लावितां सुखसोनें बनवितो.
चढल्या पडावयाची भिती;
गरिबा अहंकृती काय ती ?
काय करि त्याचें खोटी स्तुती ?
परवशतेच्या बिड्या रुप्याच्या पायांत न बांधितों,
निजं ह्रदयाचा धनी धरणिचें धनित्व अवमानितों.
========================
वरची कविता मनोहर भासते, आणि छंदबद्ध कविता रचायला कौशल्यही नक्कीच लागते. पण सुशिक्षितांची संस्कृतप्रचुर भाषा आणि प्रौढांची विचारप्रगल्भता एका गुराखी मुलाच्या तोंडी घालण्यात असलेली विसंगती उघडपणे भा. रा. तांबेंच्या लक्षात आली नव्हती; (पुष्कळ वाचकांच्याही ती लक्षात येत नाही).
कवितेत प्रदीर्घपणे वर्णन केल्याप्रमाणे काही थोडकी गुराखी मुले त्यांच्या परिस्थितीत अगदी सुखासमाधानात असतील, पण आणखी काही वर्षांनी त्यांच्या गरिबीच्या आयुष्यातल्या विविध प्रकारच्या ओढगस्ती त्या थोडक्या गुराखी मुलांचेही समाधान हिरावून घेण्याची शक्यता खूप दाट असल्याचे कोणी नाकारेल का?
वर म्हटल्याप्रमाणे कविता वाचताना मनोहर भासते, पण ती वाचल्यानंतर गेल्या शंभर वर्षात तिच्या एकातरी वाचकाने आपला कारकुनी, वकिली, फौजदारी इत्यादी कोणतातरी "रम्य" कामधंदा सोडून तिच्यातले गुराख्याचे (किंवा एकाद्या शेतकर्याचे) "खूप अधिक रम्य" आयुष्य खरोखरच कंठायला सुरवात करण्याचा विचार एक क्षणतरी केला असेल का?
Shangrila.
=================================
नॉव्
नाही_
_______________________________________________
गॉड् बोलणे हा यशाचा बेअरर् चेक् आहे
त्यामुळे मी कुणाशी क्रॉस होत नाही.