तर्कक्रीडा: २ आश्रमकन्या

क्र.१ चे उत्तर वरदा यांनी युक्तिवादासह दिले.तर आवडाबाई यांनी उत्तर काढले पण कसे ते स्पष्ट केले नाही.
आता क्र. २

कण्वमुनींच्या पर्णकुटी परिसरात हेमचंपकांची झाडे फुलांनी बहरली होती.काही आश्रमकन्या मोठी परडी घेऊन ती फुले तोडायला आल्या.
प्रथम त्यांनी हेमचंपकाची झाडे मोजली.जेवढी झाडे तेवढीच फुले प्रत्येक झाडावरून काढून परडीत ठेवली.(फुलांची संख्या पूर्णवर्ग)
नंतर त्यानी त्या फुलांच्या माळा गुंफल्या.प्रत्येक माळ दहा (१०) फुलांची.याप्रमाणे माळा गुंफून झाल्यावर काही अगुंफित(सुटी) फुले परडीत उरली.(अर्थात १० पेक्षा कमी)
आता प्रत्येक कन्येने दोन(२) माळा धारण केल्या. एकच माळ उरली. ती त्यांनी एका बालहरिणीच्या गळ्यात घातली.तेव्हा सुगंधाने उत्तेजित झालेले ते मृगशावक हुंदडत गेले.
आता परडीत उरलेल्या फुलांतील एक एक फूल प्रत्येक कन्या घेऊ लागली.पण फुले पुरेशी नव्हती तीन(३)जणींना फुले मिळाली नाहीत.
तर त्या आश्रमकन्यांची संख्या किती?त्यांनी एकूण किती फुले तोडली?

लेखनविषय: दुवे:

Comments

एकापेक्षा अधिक उत्तरे

वरील कोड्यामध्ये आणखी थोडी माहिती द्यायला हवी, अन्यथा एकापेक्षा अधिक उत्तरे संभवतात.
१. आश्रमामध्ये हेमचंपकाची 'क्ष' झाडे होती व 'य' आश्रमकन्या फुले तोडावयास गेल्या असे मानू.
२. जेवढी झाडे तेवढीच फुले प्रत्येक झाडावरून तोडली असल्यामुळे फुलांची एकूण संख्या = क्ष वर्ग
३. प्रत्येकीने प्रत्येकी १० फुलांची एक अश्या २ माळा घालून १ माळ राहिली. म्हणून माळांतील फुलांची संख्या = १०(२य+१)
४. सुटे फूल तिघींना मिळाले नाही, म्हणून सुट्या फुलांची संख्या = य - ३
५. म्हणून, क्ष वर्ग = १०(२य + १) + (य - ३)
क्ष वर्ग = २१य + ७
६. वरील समिकरणामध्ये य = २ घेतल्यास, क्ष वर्ग = ४९ ही पूर्णवर्ग संख्या मिळते. मात्र तिघींना फुले मिळाली नाहीत त्या अर्थी एकूण आश्रमकन्यांची संख्या तीनाहून अधिक हवी. त्यामुळे य = २ हे बाद ठरते.
७. वरील समीकरण य = ९, ३७, ५८, ११४, १४९... अशा अनेक संख्यांसाठी लागू होते.
८. आश्रमकन्यांची संख्या फुलांची संख्या झाडांची संख्या
९ १९६ १४
३७ ७८४ २८
५८ १२२५ ३५
११४ २४०१ ४९
१४९ ३१३६ ५६
२३३ ४९०० ७०
. . .
. . .
. . .
वरीलपैकी तुम्हाला अपेक्षित असलेले उत्तर कोणते? ९ कन्या, १९६ फुले?

थोडी गफलत....... विचारात!

'७ . वरील समिकरण य=९, ३७, ५८ ....... वगैरे अनेक संख्यांसाठी लागु होते. '
विधान सत्य असले तरी पुर्ण सत्य नाही. कारण (य - ३ ) < १० , म्हणजेच य < १३ म्हणुन
य = ९ एवढेच उरते.
परत वरदांच्या विचार करण्याच्या तर्कशुद्ध् पद्धतीला सलाम !

हो की!!

य - ३ <१० हे मी विसरले होते!! हीच ती अधिकची माहिती, जिच्यामुळे केवळ एकच उत्तर संभवते. धन्यवाद केशव.

१९६

माळांची संख्या विषम असल्याने फुलांची संख्या विषम दशक अधिक 'काही' एकक अशी आहे.

तसेच फुलांची संख्या ही पूर्ण वर्ग आहे. त्यामुळे एकक = ६ शिवाय दुसरा पर्याय नाही!!

एकक = ६ म्हटले की मुलींची संख्या = ६ +३ = ९!!!

त्यामुळे माळांची संख्या = ९*२ + १ = १९.

फुले = १९६

नीट समजले नाही.

एकलव्य महाराज ,
' .......... तसेच फुलांची संख्या ही पुर्ण वर्ग आहे. त्यामुळे एकक = ६ शिवाय दुसरा पर्याय नाही. ' ------ हे नीट समजले नाही.

एकक ६

वर्गाच्या एककस्थानी कुठला अंक येईल हे वर्गमुळाच्या एकक स्थानच्या अंकावरून ठरते.
४ व ६ च्या वर्गाच्या एककस्थानी ६ तर दशकस्थानी विषम अंक (१,३) आहे.याव्यतिरिक्त ०-९ सर्व अंकांच्या दशकस्थानी सम अंक(किंवा ०) आहे.
यापुढेही हाच क्रम ज्या वर्गात दशकस्थानी विषम अंक आहे त्यांच्या एककात ६ हाच अंक येतो. हे वर्ग वर्गमुळात ४ किंवा ६ असणार्‍या संख्यांचे आहेत. जसे (४,६,१४,१६,२४,३६...)

एकलव्यांच्या माळा विषम, फुले विषम अंक दशकस्थानी असणारा वर्ग यावरून वरील तत्वाचा वापर करून काढलेल्या 'एकक स्थानी ६' या निष्कर्षाचा अर्थ या प्रतिसादामुळे स्पष्ट होईल असे वाटते.

एकलव्यांची पद्धत आवडली.

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

आश्रमकन्या

वरदा,केशव,एकलव्य आणि तो यांस
* "हे कोडे तोंडी सोडवावे.लेखी आकडेमोड आवश्यक नाही."असे लिहायला हवे होते, ते राहिले.
* पूर्णवर्गाच्या दशकस्थानी विषम अंक असेल तर एकक स्थानी ६ हा अंक असतो हे केशव आणि तो यांनी नेमके हेरले आणि अचूक उत्तर शोधले.

*** माझे उत्तर असे:
"पूर्णवर्ग संख्येच्या एककस्थानी ६(सहा) हा अंक असेल तर,आणि तरच, त्या संख्येच्या दशकस्थानी विषम अंक असतो." या गुणधर्मावर हे कोडे आधारित आहे.
१० फुलांची एक याप्रमाणे अधिकतम माळा गुंफल्यावर उरलेली फुले त्या पूर्णवर्गाचा एककांक दाखवितात. तर माळांच्या संख्येचा एककांक म्हणजे पूर्णवर्गाचा दशकांक.इथे मालासंख्या विषम आहे हे सहज दिसून येते. म्ह्. एककांक ६च.अगुंफित फुले ६. ती सहा जणीनी घेतली. तिघींना फूल मिळाले नाही.म्ह.कन्या (६+३)=९.माळा ९गुणिले २ +१=१९.फुले १९०+६=१९६.चंपकवृक्ष १४. उत्तर एकमेव.
****आपणा सर्वांस धन्यवाद.
......................यनावाला

१४

पुन्हा एकदा उशिराने न बघता... :)
३ च कन्या उरल्या म्हणजे त्या कन्या ३हून कमी किंवा १२ हून जास्त नव्हत्या म्हणजे फुले ७० ते २६० पैकी कितीतरी
या दरम्यान फक्त १९६ याच वर्गसंख्येचे दशकस्थानापर्यंतचे आकडे विषम आहेत. म्हणून १४ वृक्ष.

 
^ वर