पुन्हा एकदा दादोजी आणि शिवाजी

खाली लोकप्रभामधील लेखाचा दुवा दिला आहे. त्यात इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंग पवार हे आधी दादोजी हे शिवाजीचे गुरू आहेत या मताचे होते तर आता दादोजी शिवाजीचे गुरू नाहीत या मताचे झाले, याबद्दल उहापोह केला आहे. पवार हे नवीन पुरावा उपलब्ध झाला असे सांगतात पण कोणता विचारल्यावर परमानंदाच्या शिवभारताचे नाव सांगतात. हा नवा नक्कीच नाही. दादोजी शिवाजीचे गुरू असल्याचे इतिहासकार शेजवलकरांचे मत पवारांनी आपल्या पुस्तकात उद्धृत करून त्याच्याशी सहमत असल्याचे पवारांनी लिहिले होते. मात्र आता मतपरिवर्तनाचे समाधानकारक स्पष्टीकरण अजून त्यांनी दिले नाही.

डॉ. पवार याला सविस्तर उत्तर देतील शी अपेक्षा आहे.

विनायक

<"लोकप्रभामधील लेख">

लेखनविषय: दुवे:

Comments

मूळ प्रश्न

दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास यांचे शिवाजी महाराजांच्या जीवनातील स्थान याविषयी एवढी वादळे उठण्याचे एकमेव आणि ढळढळीत कारण म्हणजे हे दोघेही ब्राह्मण होते, असे आणि इतकेच आहे. ज्या शिवाजी महाराजांना मराठा समाजाने कायम आदर्शवत मानले आणि ब्राह्मणांविरुद्धचे प्रमुख अस्त्र म्हणून वापरले, त्या शिवाजीच्या जडणघडणीत ब्राह्मणांचा वाटा होता, हे पचवणे ब्राह्मणेतर समाजाला, विशेषतः मराठा समाजाला फारच अवघड जात आहे. इतिहासाची मोडतोड करत राहाणे आणि नवनविन पुराव्यांच्या आधारे ही दोन नावे इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न करणे ही यावरची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. रामदासांचे उल्लेख 'रंडीबाज रामदास' असे करणे, दादोजी कोंडदेवांचा लाल महालातला पुतळा हलवावा म्हणून आंदोलन करणे हे असेच प्रयत्न आहेत. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातली ब्राह्मणांची संख्या हीही अशीच खुपणारी बाब. गेल्या काही वर्षांत असे प्रयत्न पद्धतशीरपणे सुरु आहेत - विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात.
ब्राह्मणांना इतका विरोध का यावर पूर्वीही चर्चा झाली आहे. टाळी एका हाताने वाजत नाही. ब्राह्मण समाजानेही वर्षानुवर्षे समाजावर आधी धर्माचा, मग बुद्धीचा वापर करुन आपले वर्चस्व ठेवले. आता बदलत्या परिस्थितीनुसार कुवतीवर आधारलेली
समाजरचना स्वीकारणे ब्राह्मणांनाही जडच जात आहे. 'कितीही झाला भ्रष्ट, तरी तो तीन्ही लोकी श्रेष्ठ' हे ब्राह्मणांनाही विसरता आलेले नाही. 'देवब्राह्मण, गोब्राह्मण' हे उल्लेख आता सांकेतिक अर्थाने घ्यायचे आहेत, हे ब्राह्मणही विसरलेले आहेतच.
त्यामुळे ही तेढ अशीच राहाणार, किंबहुना वाढतच जाणार असेच दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. गागाभट्टांनी राजांचा राज्याभिषेक केलाच नाही, असे मराठा महासंघातर्फे सादर केलेल्या नवनवीन पुराव्यानिशी शाबीत होईल (होतेच आहे!) आणि ब्राह्मण महासंमेलनात जानवे आणि शेंडी ही ब्राह्मणवैशिष्ट्ये जपली पाहिजेत, ब्राह्मणांनी संततीनियमन करु नये, ब्राह्मण मुलींनी जीन्स घालू नयेत आणि परजातियांशी लग्ने करु नयेत असे ठराव संमत होतील (झालेलेच आहेत!) . या सगळ्या गदारोळात 'इतिहासाचे अवजड ओझे, डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्यांचे आणिक, चढुनि त्यावर भविष्य वाचा' हे लिहून ठेवलेल्या एका दृष्ट्या कवीकडे कुणाचेही लक्ष जाणार नाही व अगदी गेलेच, तर तो कवी ब्राह्मण असल्यामुळे त्याचे म्हणणे स्वीकारायचे की नाही यावर नवे वाद सुरु होतील!
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

काही प्रमाणात असहमत

ब्राह्मणांना इतका विरोध का यावर पूर्वीही चर्चा झाली आहे. टाळी एका हाताने वाजत नाही. ब्राह्मण समाजानेही वर्षानुवर्षे समाजावर आधी धर्माचा, मग बुद्धीचा वापर करुन आपले वर्चस्व ठेवले. आता बदलत्या परिस्थितीनुसार कुवतीवर आधारलेली
समाजरचना स्वीकारणे ब्राह्मणांनाही जडच जात आहे. 'कितीही झाला भ्रष्ट, तरी तो तीन्ही लोकी श्रेष्ठ' हे ब्राह्मणांनाही विसरता आलेले नाही. 'देवब्राह्मण, गोब्राह्मण' हे उल्लेख आता सांकेतिक अर्थाने घ्यायचे आहेत, हे ब्राह्मणही विसरलेले आहेतच.

मला वाटते ब्राह्मणांना विरोध असण्याचे मुख्य कारण म्हणजे पेशवाई. (मराठा) शिवाजीचे राज्य (ब्राह्मण) पेशव्यांनी बुडवले असा मराठ्यांचा समज आहे. दुसरे म्हणजे इंग्रजी राज्य आल्यावर ब्राह्मण समाजाने इंझपाट्याने ग्रजी शिकून नोकर्‍या पटकावल्या. तीच गोष्ट महार समाजाची. आंबेडकरांच्या प्रेरणेने तोही समाज शिकून पुढे आला. म्हणून मराठा समाज या दोघांच्याही विरोधात आहे. भले वरून कितीही फुले - शाहूमहाराज - आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्याचा घोषणा देऊ देत.

सध्याची व्यवस्था कुवतीवर आधारलेली आहे की नाही यावर दुमत असू शकेल, पण ब्राह्मण समाजाने वस्तुस्थिती स्वीकारली आहे. शेवटी कुरूंदकरांचे एक वाक्य कायमचे लक्षात राहिले आहे "ब्राह्मणांनी कितीही स्वतःला अग्रजन्मा म्हणवले तरी पृथ्वीचा उपभोग क्षत्रिय आणि वैश्यच घेतात ही वस्तुस्थिती आहे."ब्राह्मण संमेलनात पास झालेले ठराव ब्राह्मण खरोखर आचरणात आणत असतील असे वाटते? करमणूक यापेक्षा जास्त किंमत या ठरावांना नाही.

विनायक

याच्याशीही असहमत

मला वाटते ब्राह्मणांना विरोध असण्याचे मुख्य कारण म्हणजे पेशवाई. (मराठा) शिवाजीचे राज्य (ब्राह्मण) पेशव्यांनी बुडवले असा मराठ्यांचा समज आहे. दुसरे म्हणजे इंग्रजी राज्य आल्यावर ब्राह्मण समाजाने इंझपाट्याने ग्रजी शिकून नोकर्‍या पटकावल्या. तीच गोष्ट महार समाजाची. आंबेडकरांच्या प्रेरणेने तोही समाज शिकून पुढे आला.

मला असे वाटत नाही. ब्राह्मणांना विरोध करणारे इतके पुढे जातच नाहीत. शिवाजीच्या मोठेपणात ब्राह्मणांचा काहीही हातभार लागला नव्हता एवढे सिद्ध झाले की पुरे.
महार समाजाने आंबेडकरांपासून नक्की काय प्रेरणा घेतली आणि तो समाज किती पुढे आला हा वादाचा विषय आहे. महार समाज म्हणजे शहरात लठ्ठ पगारांवर आरक्षित जागा मिळवलेले काही मोजके लोक नव्हे. तळागाळातला, खेड्यापाड्यांतला महार समाज 'पुढे' आला आहे असे मला तरी म्हणवत नाही.
."ब्राह्मण संमेलनात पास झालेले ठराव ब्राह्मण खरोखर आचरणात आणत असतील असे वाटते? करमणूक यापेक्षा जास्त किंमत या ठरावांना नाही.

तो मुद्दा नाही. असे ठराव संमत केले जातात आणि शेंडी व जानव्याचा त्याग करा असे म्हणणार्‍या विदुषीला व्यासपीठावरुन माफी मागावी लागते, हे ब्राह्मणांच्या वैचारिक गुलामगिरीचेच प्रतिक आहे, असे मला वाटते.
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

गुरू

>>त्या शिवाजीच्या जडणघडणीत ब्राह्मणांचा वाटा होता, हे पचवणे ब्राह्मणेतर समाजाला, विशेषतः मराठा समाजाला फारच अवघड जात आहे.

याउलट ब्राह्मण गुरू होते म्हणून शिवाजी घडला (रामदास आणि दादोजी नसते तर शिवाजी कुठला इतका पराक्रम करता!!) असा दावा करण्यासाठीच ब्राह्मणांनी इतिहासात ही नावे घुसडली असे मराठ्यांचे म्हणणे असते. खरेखोटे माहिती नाही. कुरुंदकरांनी आपल्या जागर पुस्तकात असेच काहीसे म्हटल्याचे स्मरते.

(मूळ गंमतीची गोष्ट म्हणजे शिवाजी मराठा - क्षत्रिय असल्याचे तेव्हाच्या मराठ्यांना कोठे मान्य होते?).
नितिन थत्ते

ब्राह्मण् असणे हा गुन्हा?

दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास यांचे शिवाजी महाराजांच्या जीवनातील स्थान याविषयी एवढी वादळे उठण्याचे एकमेव आणि ढळढळीत कारण म्हणजे हे दोघेही ब्राह्मण होते, असे आणि इतकेच आहे
असे आणि इतकेच नसून वादळे उठवणार्‍यांचे वैयक्तिक, राजकीय,सामाजिक स्वार्थ ही कारणे खरी आहेत.
पेशव्यांना राज्य मिळाले हे सत्य असले तरी ब्राह्मण बहुतांशी राजाश्रयावर जगत आले ही बाब नाकारता येत नाही.
राजाश्रयामुळे लिमिटेड सत्ता असलेले ब्राह्मण वर्णव्यवस्थेतील इतरांना जास्त छ्ळतील की ज्याच्या हातात राज्याची सत्ता आहेत ते?
राज्यकर्ते, जमीनदार,सावकार हे सर्वच ब्राह्मण होते का?
बलात्कार्, वेठबिगारी, देशोधडीला लावणे, वर्णव्यवस्थेतील ठराविक लोकांची अशी पिळवणूक करणारे ब्राह्मण होते का? याचे उत्तर नाही असेच आहे. मग ब्राह्मणांविरोधी मते मुद्दाम तयार केली गेली , त्यांच्या वागण्यात जे काही थोडेसे बोट ठेवण्यासारखे दिसले त्याच्या आधाराने काळेकुट्ट चित्र तयार केले गेले. असो.
वैचारिक गुलामगिरी फक्त ब्राह्मण करतात का? नाही. ब्राह्मण करतात ते सर्व चुकीचे आणि इतर करतात ते सगळे बरोबर असे मत असणे फार फायद्याचे असते. (वेळ झाल्यास आणखी सविस्तर प्रतिसाद देईन.)

मान्य आणि अमान्य

दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास यांचे शिवाजी महाराजांच्या जीवनातील स्थान याविषयी एवढी वादळे उठण्याचे एकमेव आणि ढळढळीत कारण म्हणजे हे दोघेही ब्राह्मण होते, असे आणि इतकेच आहे
असे आणि इतकेच नसून वादळे उठवणार्‍यांचे वैयक्तिक, राजकीय,सामाजिक स्वार्थ ही कारणे खरी आहेत

सहमत
राजाश्रयामुळे लिमिटेड सत्ता असलेले ब्राह्मण वर्णव्यवस्थेतील इतरांना जास्त छ्ळतील की ज्याच्या हातात राज्याची सत्ता आहेत ते?
राज्यकर्ते, जमीनदार,सावकार हे सर्वच ब्राह्मण होते का?
बलात्कार्, वेठबिगारी, देशोधडीला लावणे, वर्णव्यवस्थेतील ठराविक लोकांची अशी पिळवणूक करणारे ब्राह्मण होते का? याचे उत्तर नाही असेच आहे. मग ब्राह्मणांविरोधी मते मुद्दाम तयार केली गेली , त्यांच्या वागण्यात जे काही थोडेसे बोट ठेवण्यासारखे दिसले त्याच्या आधाराने काळेकुट्ट चित्र तयार केले गेले. असो.

असहमत. या सगळ्या गोष्टींत 'धर्म' या बाबीबडे लक्ष गेलेले नाही. धर्माचा पगडा इतका भयानक होता (आणि ब्राह्मणांकडे त्याचे नेतृत्व आयतेच- म्हणजे जन्मानेच चालून आलेले होते) की त्यामुळे 'वर्णव्यवस्थेतील ठराविक लोकांची' म्हणजे दलितांची फार मोठी पिळवणूक ब्राह्मण समाजातर्फे केली गेली. अर्थात आता या सगळ्याच गोष्टी काळाच्या ओघात वाहून गेल्या आहेत, पण अजूनही समाजाची विभागणी आधी हिंदू - मुस्लिम आणि नंतर ब्राह्मण-ब्राह्मणेतर अशी केली जाते, हे सूचक आहे.
आता दुसरा प्रश्न आहे की ब्राह्मण असणे हा गुन्हा आहे का? अर्थातच नाही. ब्राह्मण असण्याची शरम वाटण्याचेही काही कारण नाही. अगदी आवश्यक असेलच तर ब्राह्मणांनी ब्राह्मण असल्याचा अभिमानही बाळगावा, पण ब्राह्मणांचे दोष डोळसपणे स्वीकारण्याची तयारीही असावी.
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

सहमती.

सुवर्णमयी म्हणतात:

असे आणि इतकेच नसून वादळे उठवणार्‍यांचे वैयक्तिक, राजकीय,सामाजिक स्वार्थ ही कारणे खरी आहेत.

यावर सहमत् आहे. २% (हा आकडा काही वर्षांपुर्वी कुठेतरी वाचला आहे, चुभु दे घे) प्रमाण् असलेले ब्राह्मण राजकीउ दृष्ट्या फारसे ताकदवान नाहीत. ही मते गेलीत् तरी बहुसंख्य मते मिळवण्याकरता ब्राह्मणेतर लोकांच्या मनात् द्वेष सतत तेवत ठेवता आला तरी राजकीय् फायदा पुष्कळ आहे.

आता दुसरा प्रश्न आहे की ब्राह्मण असणे हा गुन्हा आहे का? अर्थातच नाही. ब्राह्मण असण्याची शरम वाटण्याचेही काही कारण नाही. अगदी आवश्यक असेलच तर ब्राह्मणांनी ब्राह्मण असल्याचा अभिमानही बाळगावा, पण ब्राह्मणांचे दोष डोळसपणे स्वीकारण्याची तयारीही असावी.

सन्जोपरावांच्या या मताशी पुर्णपणे सहमत आहे.

३.५% ??

मूळात ब्राह्मणी संस्कृतीला ' साडे तीन टक्क्यांची संस्कृती ' म्हणत पहिला शह दलित साहित्याने दिला . ' साडे तीन टक्केवाले ' हा शब्द लक्ष्मण मानेंचा . ज्या ब्राह्मणी मूल्यकल्पनांच्या विळख्यात साहित्य आणि समाज व्यवहार अडकून पडला होता , त्याविरोधात बंड करताना जाणीवपूर्वक वापरला गेलेला हा शब्द होता

अधिक माहिती

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

जातीनिहाय शीरगणती

स्वतंत्र भारतात जातीनिहाय शीरगणती झाली नसावी. शेवटची जातीनिहाय शीरगणती बहुधा ब्रिटिश काळातच झालेली असावी, ज्याला आता साठ वर्षांहूनही अधिक काळ लोटला आहे. ह्या काळात डेमोग्राफी बदलली असण्याची शक्यता कितपत आहे?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

जातींचा समावेश

२००१ च्या जनगणनेत बहुधा जातींचा समावेश पुन्हा केला गेला होता.
समावेश केला म्हणून गळा काढण्याचे कारण नाही. विविध योजनांचा/कृतींचा लाभ पोचतो आहे की नाही हे पाहण्यासाठी याची गरज आहे.

नितिन थत्ते

साडेतीन टक्के

मुळात ब्राह्मणी संस्कृतीला ' साडे तीन टक्क्यांची संस्कृती ' म्हणत पहिला शह दलित साहित्याने दिला . ' साडे तीन टक्केवाले ' हा शब्द लक्ष्मण मानेंचा.

माझ्या माहितीप्रमाणे साडेतीन टक्के हा शब्दप्रयोग पहिल्यांदा केशवराव जेध्यांनी केला. जेधे-जवळकर-बागल हे ब्राम्हणद्वेष्टे म्हणून एकेकाळी कुप्रसिद्ध होते.--वाचक्‍नवी

सुधारक

>>जेधे-जवळकर-बागल हे ब्राम्हणद्वेष्टे म्हणून एकेकाळी कुप्रसिद्ध होते.
सुधारकांनाही कुप्रसिद्ध म्हणतात काय ?

-दिलीप बिरुटे

जमीनदार

>>राज्यकर्ते, जमीनदार,सावकार हे सर्वच ब्राह्मण होते का?
सावकार तर ब्राह्मण होतेच.

जमीनदार मात्र नसावेत. ब्रिटिशांच्या आगमनानंतर ब्राह्मण जमीनदार हा प्रकार झाला असावा.
पूर्वी राजेरजवाड्यांचा ब्राह्मणांना गावे 'दान' करण्याचा प्रघात होता. तशा सनदी देशभरच्या ब्राह्मणांकडे असत. परंतु गावे दान करण्याचा भारतातला अर्थ 'त्या गावाचे करस्वरूपातले उत्पन्न' असा होता. त्या जमिनीची मालकी त्या ब्राह्मणाला दिलेली नसे. (किंबहुना जमिनीची खाजगी मालकी ही कल्पनाच अस्तित्वात नसावी). तसेच त्या जमीनींवर शेती करणार्‍यांना प्रतिबंध करणे वगैरे करणे शक्य नसे.

ब्रिटिशांच्या अंमला खाली ब्रिटिशांच्या मालमत्तेविषयक कल्पनांनुसार या दानपत्रांचा मालकी हक्क असा अर्थ लावला गेला. त्यामुळे गावोगावी जमीनदार ब्राह्मण निर्माण झाले. आणि नव्या कल्पनांनुसार मालकी हक्काबरोबरच 'एक्सक्लूजिव् राईट्स्' ची कल्पना रूढ झाली. (ब्रिटिशांच्या राज्यात वकील या जमातीला एकदम महत्त्व आले त्याचे कारणही बहुधा मालमत्तेविषयक ह्या बदललेल्या कल्पना हे होते).

वरील स्वरूपाचे विवेचन स्टॅनले वोल्पर्ट व जवाहरलाल नेहरूंच्या लिखाणात वाचले होते.

तर सांगण्याचा मुद्दा हा की जमीनदार ब्राह्मण हे प्रकार नजीकच्या भूतकाळातले (कूळकायदा अस्तित्वात येईपर्यंतचे) वास्तवच होते. ते फुले आगरकर इत्यादि सुधारकांना दिसत होते. त्यामुळेही ब्राह्मण हे शोषक म्हटले गेले असतील.

नितिन थत्ते

हम्म!

जमीनदार मात्र नसावेत. ब्रिटिशांच्या आगमनानंतर ब्राह्मण जमीनदार हा प्रकार झाला असावा.

असहमत. ब्रिटिशांच्या आगमनानंतर ब्राह्मण जमीनदार झाले असावेत याच्याशी असहमत आहे. पेशव्यांच्या आधीचे फारसे माहित नाही परंतु पेशव्यांच्या काळापासूनच ब्राह्मणांच्या जमिनी होत्या. इतकेच नव्हे तर पटवर्धन, रास्ते, पेठे हे सरदार काय जमिनी न ठेवून होते काय? ते वतनदार होतेच. याबरोबरच, महाराष्ट्रात ही प्रथा असेल तर कल्पना नाही परंतु दक्षिणेत ब्राह्मणांची स्वमालकीची देवळे आहेत. त्याचे संपूर्ण उत्पन्न, देवळांच्या आजूबाजूची जमिन, तिचे उत्पन्न हे ब्राह्मणांचेच आहे. त्यामुळे ब्राह्मण कधीच जमिनदार नव्हते हा दावा हास्यास्पद आहे.

असो. प्रत्येक चांगला शिक्षक हा गुरु असतो या न्यायाने दादोजी हे शिवाजीचे गुरुच ठरतात.

अवांतरः राजकीय आणि इतर स्वार्थासाठी ब्राह्मणांमु़ळे शिवाजी घडला असे सांगणार्‍या महाभागांना आणि ब्राह्मणांमुळे शिवाजी घडला नाही असे सांगणार्‍या महाभागांना आणि इतिहासातील ओ का ठो माहित नसताना हिरिरीने मते मांडणार्‍या प्रभृतींना कोपरापासून नमस्कार. :-) (हे अवांतर कोणा एकाला उद्देशून नाही. ज्यांना उपप्रतिसाद दिला त्यांना आणि चर्चाप्रस्ताविकाला उद्देशून तर अजिबात नाही. गैरसमज नसावा.)

सहमत - आक्षेपार्ह

जमीनदार मात्र नसावेत. ब्रिटिशांच्या आगमनानंतर ब्राह्मण जमीनदार हा प्रकार झाला असावा.

असहमत. ब्रिटिशांच्या आगमनानंतर ब्राह्मण जमीनदार झाले असावेत याच्याशी असहमत आहे. पेशव्यांच्या आधीचे फारसे माहित नाही परंतु पेशव्यांच्या काळापासूनच ब्राह्मणांच्या जमिनी होत्या. इतकेच नव्हे तर पटवर्धन, रास्ते, पेठे हे सरदार काय जमिनी न ठेवून होते काय? ते वतनदार होतेच. याबरोबरच, महाराष्ट्रात ही प्रथा असेल तर कल्पना नाही परंतु दक्षिणेत ब्राह्मणांची स्वमालकीची देवळे आहेत. त्याचे संपूर्ण उत्पन्न, देवळांच्या आजूबाजूची जमिन, तिचे उत्पन्न हे ब्राह्मणांचेच आहे. त्यामुळे ब्राह्मण कधीच जमिनदार नव्हते हा दावा हास्यास्पद आहे.

नितीन थत्ते यांच्याशी असहमत आणि प्रियालीशी सहमत. ब्राह्मणांना नोकर्‍या आणि जहागिर्‍या देण्याचे प्रमाण निजामशाहीच्या काळात बरेच होते. करवसुली आणि जमीनीची कामे यासाठी निजामशहाने ब्राह्मणांना नोकर्‍या दिल्या असे सर जदुनाथ सरकारांच्या शिवाजीवरच्या पुस्तकात वाचले आहे.. शिवाजीने वतने तोडून दिली नाहीत तरीही काही ब्राह्मण सरदार जहागिर्‍या राखून होते. त्यातल्या एका सखो भिकाजी देशपांड्याची जहागीर त्याच्या चुलत भावाने स्वत: बळकावल्याचे आणि अष्टप्रधान मंडळातले आठपैकी सात लोक याला सामील असूनही शिवाजीने सखो भिकाजीला न्याय मिळवून दिल्याची हकीकत सेतुमाधवराव पगडींच्या पुस्तकात दिली आहे. पेशव्यांच्या काळातही पराक्रम करणार्‍या ब्राह्मणांना जहागिर्‍या देणे वाढले असावे. इंग्रजांच्या काळात यात वाढ झाली असेल असे वाटत नाही. उलट ज्यांना वारस नाही अशी झाशी वगैरे संस्थाने त्यांनी खालसा केली.

अवांतरः राजकीय आणि इतर स्वार्थासाठी ब्राह्मणांमु़ळे शिवाजी घडला असे सांगणार्‍या महाभागांना आणि ब्राह्मणांमुळे शिवाजी घडला नाही असे सांगणार्‍या महाभागांना आणि इतिहासातील ओ का ठो माहित नसताना हिरिरीने मते मांडणार्‍या प्रभृतींना कोपरापासून नमस्कार. :-) (हे अवांतर कोणा एकाला उद्देशून नाही. ज्यांना उपप्रतिसाद दिला त्यांना आणि चर्चाप्रस्ताविकाला उद्देशून तर अजिबात नाही. गैरसमज नसावा.)

हे वाक्य मला उद्देशून नसले तरी अत्यंत आक्षेपार्ह आहे. कोणाला कुठल्या विषयात किती कळते याचा निवाडा करणारे आपण कोण? एक सामान्य सदस्य म्हणून इतिहासावर लिहिण्यासाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे काय? अशी परीक्षा उपक्रमावर कुठे मिळेल? तेव्हा आपल्याला विनंती. आपण ज्यांच्या बुद्धीला अविषय नाही अशा विद्वान आहात यात संशय नाही. पण दुसर्‍याला किती माहिती आहे/नाही, हे ठरवणार्‍या न्यायाधीश होऊ नका.

विनायक

निवाडा..हाहा

तिरका तिरका टॅग बंद केला आहे.

>>हे वाक्य मला उद्देशून नसले तरी अत्यंत आक्षेपार्ह आहे.

निवाडा...मी कुठे आणि कधी केला. काहीतरीच. मी फक्त कोपरापासून नमस्कार केला. त्याबद्दल कोणीही आक्षेप घेऊ नये कारण जगात -

राजकीय आणि इतर स्वार्थासाठी ब्राह्मणांमु़ळे शिवाजी घडला असे सांगणारे महाभाग आणि ब्राह्मणांमुळे शिवाजी घडला नाही असे सांगणारे महाभाग आणि इतिहासातील ओ का ठो माहित नसताना हिरिरीने मते मांडणारे महाभाग जगात असावेत याबद्दल माझ्या मनात कोणताही किंतु नाही. मी कोठेही उपक्रमाचा हवाला दिलेला नाही. :-) आणि माझ्या लेखनात उपक्रमाचे नावही घेतलेले नाही. उलट, आपण माझा रोख उपक्रमाकडे किंवा उपक्रमींकडे आहे असे सांगून इतरांचा गैरसमज करून देत आहात.

असो.

आपण ज्यांच्या बुद्धीला अविषय नाही अशा विद्वान आहात यात संशय नाही.

उलट, आपले हेच वाक्य अतिशय आक्षेपार्ह आहे आणि वैयक्तिक रोखाचे आहे आणि खोटारडे आहे. मला अनेक विषय कळत नाहीत. उदा. संतांची काही वचने, कवितेतील छंद, भौतिकशास्त्रावरील लेख. मी तिथे प्रतिसाद देऊन हिरिरीने मत व्यक्त करण्याच्या फंदातही पडत नाही. इतरांनाही मी प्रतिसाद देऊ नये असे म्हटलेले नाही. केवळ कोपरापासून नमस्कार केला आहे. :-)

आदर

आपण ज्यांच्या बुद्धीला अविषय नाही अशा विद्वान आहात यात संशय नाही.

उलट, आपले हेच वाक्य अतिशय आक्षेपार्ह आहे आणि वैयक्तिक रोखाचे आहे आणि खोटारडे आहे.

वैयक्तिक रोखाचे आहे हे मान्य आहे. पण आक्षेपार्ह कसे? उगीच तिरकसपणे लिहिले नसून आपल्याबद्दल खरोखर आदर असल्याने लिहिले आहे हे आवर्जून सांगतो. खोटारडे नाही. अतिशयोक्तीचे आहे असे आपले म्हणणे असेल तर तो आपला विनय आहे.

विनायक

ठीक

उगीच तिरकसपणे लिहिले नसून आपल्याबद्दल खरोखर आदर असल्याने लिहिले आहे हे आवर्जून सांगतो. खोटारडे नाही. अतिशयोक्तीचे आहे असे आपले म्हणणे असेल तर तो आपला विनय आहे.

आपले म्हणणे अतिशयोक्तीचे कसे आहे हे मी माझ्या प्रतिसादातून लिहिले आहेच. खोटारडे हा शब्द मागे घेते. त्याप्रमाणेच, माझे वाक्य कोणा एका व्यक्तिला उद्देशून नाही आणि आपल्याला तर नाहीच कारण आपल्या इतिहासविषयक ज्ञानाबद्दल मलाही आदरच आहे असे सांगून मी हा विषय माझ्यापुरता बंद करते.

सहमत आहे.

आता दुसरा प्रश्न आहे की ब्राह्मण असणे हा गुन्हा आहे का? अर्थातच नाही. ब्राह्मण असण्याची शरम वाटण्याचेही काही कारण नाही. अगदी आवश्यक असेलच तर ब्राह्मणांनी ब्राह्मण असल्याचा अभिमानही बाळगावा, पण ब्राह्मणांचे दोष डोळसपणे स्वीकारण्याची तयारीही असावी.

सन्जोपरावांच्या वरील मताशी सहमत. आणि हे सगळ्याच जातींना लागू पडते हे ही तितकेच खरे.

जहागिरी

जहागिरी नव्हत्या असे माझे म्हणणे नाही. परंतु जमिनीची मालकी हा प्रकार ब्रिटिशांच्या अंमलात घडला. शहाजीला पुणे सुप्याची जहागीर होती म्हणजे तेथील जमीन शहाजीच्या मालकीची नव्हती. त्या जहागिरीत आम जनतेला येण्याजाण्यास, शेती करण्यास, राहण्यास शहाजी कुठल्याही प्रकारे मज्जाव करू शकत नसे. जहागीर म्हणजे फक्त करवसुलीचे हक्क.

तसा 'एक्सक्लूजिव राईट टु लॅण्ड' (राईट टु एक्सक्लूड अदर्स फ्रॉम यूज) ब्रिटिशांच्या काळातच निर्माण झाला.

तसाच प्रकार दक्षिणेतल्या मंदिरांच्या जमिनीबाबतही असावा.

नितिन थत्ते

सहमत

ब्राह्मण असणे हा गुन्हा आहे का? अर्थातच नाही. ब्राह्मण असण्याची शरम वाटण्याचेही काही कारण नाही. अगदी आवश्यक असेलच तर ब्राह्मणांनी ब्राह्मण असल्याचा अभिमानही बाळगावा, पण ब्राह्मणांचे दोष डोळसपणे स्वीकारण्याची तयारीही असावी.

संजोपरावांच्या वरील अवतरणाशी तसेच एकूण प्रतिसादाच्या मतितार्थाशी सहमत.

यावरून पुलंनी "माझा नवा मित्र: हंगेरी"त दिलेले झोल्तान कोदॉयचे वाक्य आठवले "आपल्या वाद्यावर प्रेम जरूर करा मात्र जगात प्रेम करण्यासारखे ते एकच वाद्य आहे असे मात्र समजू नका"

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

^ वर